या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Showing posts with label humour. Show all posts
Showing posts with label humour. Show all posts

Friday, 2 March 2007

पाककृती (बि)घडवण्यासाठी टिपा

आईने तयार ठेवलेल्या कणकेच्या आईनेच योग्य तापमानाला तापवून दिलेल्या तव्यावर २ पोळ्या करणे, आईने पुरण आणि कणिक तयार करुन दिल्यावर पुरणपोळ्या करणे, दिसेल त्या भाजीत भरपूर पंजाबी मसाला घालून त्या मऊ होईपर्यंत शिजवून कोथिंबीरीने झाकून 'पंजाबी डिश' म्हणून वाढणे या 'परिपूर्ण' कार्यानुभवावर अस्मादिकांची स्वारी आत्मविश्वासाने सासरी गेली. 'स्वयंपाक काय, आपोआप जमतो. स्त्रीला जन्माला घालतानाच तिच्यात पाककलाप्रविणता हे रसायन घालून पाठवलेलं असतं.' असे काही गोड गैरसमज सोबत होतेच. हळूहळू नवी नवलाई ओसरली आणि नवऱ्याला स्वयंपाक करुन खाऊ घालून तृप्त(आणि लठ्ठ) करण्याची महत्वाकांक्षा बळावू लागली. (नव्या नवलाईत पण पाककलेला थोडाफार हातभार लावला होताच. 'कांदे चिरुन दे' म्हटल्यावर कांदे चिरुन स्टीलच्या पूजेच्या ताम्हणात ठेवले होते. शिवशिव! कोण हा भ्रष्टाकार!) तर माझ्या २ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीत केलेल्या काही हमखास पाककृती मी तुमच्यासाठी सादर करित आहे.

हां, तर आता पाहूया काही पाककृती (बि) घडवण्यासाठी काय काय करावे लागते ते.
१. धिरडे- पीठ खूप पातळ भिजवावे आणि जुनाट तव्यावर तेलाची कंजूसी करुन पसरवावे. ५ मिनीटात 'तव्याला घट्ट चिकटलेले धिरडे' ही पाककृती विनासायास तयार होते. पाककृती तव्यापासून वेगळी करण्यासाठी उलथने आणि तवा घासण्यासाठी तारेची घासणी व भरपूर साबण तयार ठेवावा.
२. कुकरची भांडी न वापरता थेट कुकरमधे पुलाव/बिर्याणी शिजवणे- काही अरसिक लोक ही पाककृती मोजून मापून पाणी घालून व्यवस्थित करतात आणि पुलाव/बिर्याणी म्हणूनच खातात. पाककृती बिघडवायला इच्छुक लोकांना आपल्या कल्पनाशक्तीला खूप वाव आहे. कुकरमधे कुकरच्या तळाचा अंदाज न घेता भरपूर पाणी घाला, भाज्या व पोषकतत्वे असलेले तांदळाचे सूप तयार! कुकरमधे जेमतेम तांदळाच्या थराला लागण्याइतके पाणी घाल आणि ४-५ शिट्ट्या करा, खाली तांदळाची खळ आणि वर कडक तांदूळ/ कच्च्या भाज्या असा दुहेरी पदार्थ तयार! याहिपेक्षा नविन आणि अपारंपारिक पदार्थ करायचा असल्यास पाणी घालायला विसरा आणि काल्पनिक ३ शिट्ट्या करा. (शिट्ट्या होणार नाहीतच, साधारण वेळेचा अंदाज घेउन त्यात ३ शिट्ट्या ऐकल्या आहेत असे समजा.)
३. पुरण- पुरणपोळ्या बिघडवणे हा एक स्वतंत्र लेखाचा भाग होऊ शकेल म्हणून सध्या अभ्यासक्रमात फक्त पुरण बिघडवणे याचा अभ्यास करुया. साधारण २ वाट्या हरभराडाळ घ्यावी. त्यात ३ वाट्या पाणी व २ वाट्या साखर(गूळ वापरु नये, पोळ्या नीट बिघडत नाहीत.) घालून मंदाग्नीवर ठेवावे आणि दूरदर्शनवर 'चार दिवस सासूचे' किंवा 'ऊ ऽऽऽऽन पाऽऽऽवसाची कथाऽऽऽऽऽऽऽ' पहायला घ्यावे. मालिका संपल्यावर येऊन पहावे. साखरेचा गोळीबंद पाक होऊन पुरण घट्ट चिकटून बसले असले तर कृती यशस्वी समजावी. टिप- या कृतीला शक्यतो घरातले बिनमहत्वाचे आणि टाकून द्यायला झालेले भांडे वापरावे. पुरण न निघाल्यास बरे पडते आणि चांगले भांडे मुद्दाम टाकल्याचा आरोपही येत नाही.
४. पातळ पालेभाज्या- हि एक सोपी आणि यशस्वी कृती आहे. पालेभाज्या करण्याआधी कुकरमधे ५ शिट्यांवर भरपूर पाण्यात शिजवून घ्याव्यात. भाजीचा रंग फिकट काळ्यावर आल्यावर आणि वास इ नष्ट झाल्यावर ती भाजी शिजवण्यासाठी योग्य समजावी. २-३ उकळ्यांवर शिजवावी. हमखास बिघडते. ही पाककृती वाढल्यावर काही उपद्रवी कुटुंबघटक 'हे नक्की काय आहे' असा प्रश्न विचारुन नाउमेद करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.
५. आमटी- फोडणी करावी. मोहरी तडतडल्यावर स्टूलावर उभे राहून वरच्या फळीवरच्या डब्यातून हळद काढण्यास घ्यावी. हळद काढून झाल्यावर ती सावकाश फोडणीत टाकावी. आता शिजलेली डाळ, मीठ इ. घालून आच मोठी करुन ठेवावी आणि आजतक वरची एखादी सनसनाटी बातमी (रमेश कुमावत, आजतक. ये खबर आप सबसे पहले देख रहे है सिर्फ आजतक पर. ऐसी और खबरो के लिये देखते रहिये आजतक इ.इ.) बघायला घ्यावी.
६. कडधान्य वर्गातील भाज्या/काबुली चणे- मोजून ८ तास भिजू द्यावे व जेमतेम पाणी टाकून ३ शिट्ट्या शिजवावे. लगेच कुकर उतरवून वाफ जाऊ देऊन वापरावे.
७. पोळ्या- यातही कर्तबगारीला भरपूर वाव आहे. कणिक शक्य तितकी घट्ट मळावी. अशाने पोळ्या लाटताना हाताला नीट व्यायाम मिळून हात सुडौल होतात. तवा जास्तीत जास्त आचेवर ठेवावा. पोळी तव्यावर टाकून फोन घ्यावा. (यासाठी मैत्रिणींचे अथवा नातेवाइकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यांना फोन करण्यासाठी वेळ देऊन ठेवावी.) फोनवर आवश्यक तेवढेच बोलावे.(काय मग? पाऊस काय म्हणतोय? चिंगी काय म्हणते? आता चालायला लागली का? तुझ्या त्या आतेमावसभावाचं लग्न ठरलं का? माझ्या नणंदेच्या जावेची दूरची भाची लग्नाची आहे. तुझ्या मावससासऱ्यांची एकसष्टी कधी आहे, पिंटूला युनिट टेस्टमधे किती मिळाले इ.इ.) खरपूस वास यायला लागल्यावर पोळीकडे वळावे. ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीत कणिक एकदम पातळ करावी व पोळ्या पारदर्शक होइपर्यंत लाटाव्यात. तवा जास्तीत जास्त आचेवर ठेवून पोळ्या भाजून घ्याव्यात. पोळ्या भाजताना लागल्यास सुरीची मदत घ्यावी.

वि. सू.- या सर्व पाककृती प्रत्यक्ष करुन यशस्वी झाल्यावर मगच इथे दिल्या आहेत. वाचकांनी प्रयोग करुन आपले अनुभव अवश्य कळवावेत.
-अनुराधा कुलकर्णी

तात्पर्यकथाः दोन गाढवे

(इमेलमधून आलेली कथा. मूळ लेखक अज्ञात.)

कोणे एके काळी एका धोब्याकडे दोन गाढवे होतीः गाढव क आणि गाढव ख. दोघांना सारखाच भार वाहून न्यायचा होता. क ने विचार केला की आपण मालकाला प्रभावित करु. म्हणून क ने जास्त ओझे वहायला सुरुवात केली. मालक खूष झाला आणि त्याने ख कडून पण जास्त ओझे वाहण्याची अपेक्षा करायला सुरुवात केली. ख जास्त ओझे वाहू शकला नाही. म्हणून मालकाने त्याला मारले.

त्या दिवशी ख क ला रडत म्हणाला, 'तू असं का करतोस? आपण दोघंही पूर्वीइतकं ओझं वाहून मजेत राहू.'
पण क ने ऐकलं नाही. क ने आता जास्त आणखी ओझं घेऊन धावायला सुरुवात केली. मालक क वर खूष झाला आणि ख असं का करत नाही म्हणून ख वर रागावला. असेच काही दिवस गेले. मालक ख वर खूप चिडला होता. एक दिवस जास्त ओझं वाहत नाही म्हणून त्याला मालकाने मारुन मारुन ख मरुन गेला.

क आता आनंदी झाला कारण आता त्याचा एकाधिकार होता. पण मालकाने क चे कर्तृत्व पाहून त्याला ख चं पण ओझं द्यायला सुरुवात केली. आणि त्याला ते घेऊन धावावं पण लागत होतं. असे काही दिवस गेल्यावर क ची पाठ दुखायला लागली. इतकं ओझं त्याला झेपेनासं झालं. मालक क वर पण चिडला आणि मालकाने क ला एक दिवस मारुन मारुन क पण मेला.

मालक नव्या गाढवांच्या शोधात निघाला!
तात्पर्येः
१. अशा मालकांनी शक्यतो गाढवं स्वस्त मिळतील अशा जागी वास्तव्य करावे.
२. हाताखालील प्रत्येक सहकाऱ्याला सारखी वागणूक द्यावी आणि प्रत्येकाची कुवत समान मानावी.
३. ओझे बरोबरीने वहावे व आपल्या मालकापुढे जास्त प्रभाव पाडण्यासाठी अतिशहाणपण करु नये.
४. आपला सहकारी संकटात असेल तर त्यात आनंद मानू नये.
५. अतिकष्ट करु नये, हुशारीने काम करावे.
६. गाढवांनी आपली संघटना स्थापन करुन मालकांवर नजर ठेवावी.
७. मालकाने गाढवांच्या कामाचा 'टाईम स्टडी' करुन जास्तीत जास्त फायदा मिळेल अशाप्रकारे गाढवांचे ओझे व वेग ठरवण्यासाठी समिती नेमावी.
८. गाढवांनी कायद्याचे पूर्ण ज्ञान मिळवून मालकावर 'हॅरासमेंट चार्ज' लावावे.
९. एका गाढवाने शक्यतो आपल्या अगदी जवळच्या नात्यातले गाढव असेल तिथे काम करणे पसंत करावे,म्हणजे स्पर्धा सौम्य होईल.
१०. मालकाने योग्य 'मॅनपॉवर सर्च' सल्लागार कचेरीला कंत्राट देऊन जास्तीत जास्त ओझं वाहू शकणारी 'क्वालिटी' गाढवं निवडावी.
११. जगात गाढवांना तोटा नाही, तस्मात् मालकांनो, आपल्या फायद्याचं बघा,गाढवांचा विचार करु नका.
(हेच नियम कंपन्या आणि त्यातले कर्मचारी यांना लावून बघा बरं!!हल्ली जास्तीत जास्त गाढवं मिळवून त्यांना राबवणंच चालू आहे सगळ्या कंपन्यांचं.)
-अनुराधा कुलकर्णी

तात्पर्यकथाः काचेचा पेला

(ही कथा कधीतरी कोणाच्या तरी तोंडून ऐकली आहे. मूळ कोणाची आहे ते माहिती नाही.)

नोकरीसाठी मुलाखत चालू होती. समोर असलेल्या उमेदवारांच्या समूहाला साहेबांनी विचारलेः 'हा माझ्या हातात काचेचा पेला आहे. हा मी फोडला तर किती तुकडे होतील?' अनेकांनी अनेक उत्तरे दिली.
कोणी म्हणाले, 'ते पेला किती उंचीवरुन टाकला आणि कोणत्या जमिनीवर टाकला त्यावर अवलंबून आहे.'
कोणी म्हणाले, 'बरोबर २३५ तुकडे होतील.'
कोणी म्हणाले, 'तुकडे होणार नाहीत. पेला अभंग काचेचा आहे.'
कोणी म्हणाले, 'सांगता येत नाही. इनसफिशियंट डाटा.'
कोणी म्हणाले, 'मला एक दिवसाचा वेळ द्या.'
कोणी म्हणाले, 'असंख्य'

एका उमेदवाराने 'मी जरा वेगळ्या प्रकारे उत्तर देऊ का' म्हणून परवानगी घेतली. आणि पेला उचलून जोरात जमिनीवर टाकून दिला. 'बघा, आता खाली आहेत तितके तुकडे होतील.'
हा उमेदवार नोकरीसाठी निवडला गेला.

तात्पर्येः
१. नोकरीच्या मुलाखतीला अभ्यास करण्यात जास्त वेळ घालवू नये. कराव्या लागणाऱ्या कामाचा आणि त्या पदासाठी मुलाखतीत विचारलेल्या असंबद्ध प्रश्नांचा बऱ्याचदा कमी संबंध असतो.
२. बसून आणि मिटींगा घेऊन तर्ककुतर्क करण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीत जाऊन प्रश्नाला भिडावे.
३. मुलाखतीच्या ठिकाणी भारी आणि चांगले काचेचे पेले ठेऊ नयेत.
४. दुसऱ्याच्या किंमती चीजवस्तूच्या नुकसानाची पर्वा न करता आपल्याला हवं ते करणारे जगात पुढे जातात.
५. हा प्रयोग पुढच्या वेळी परत हाच प्रश्न विचारुन करु नये. उमेदवार बरेच असतात आणि तितके काचेचे पेले फुटून वाया जाणं परवडत नाही.
६. कचेरीत साफसफाई करणाऱ्या शिपाईवर्गाने आपल्या हक्कांबद्दल सतर्क रहावे. एकदा सफाई केल्यावर कोणी पेला फोडून कचरा केल्यास तो फोडणाऱ्याला स्वच्छ करायला सांगावा.
-अनुराधा कुलकर्णी

Thursday, 1 March 2007

मी गानसम्राज्ञी गीता दत्त(???)

"कॉलेजच्या वार्षिक संम्मेलनात गाण्यात भाग घ्यायची ज्याना इच्छा असेल त्यानी आपली नावे झुबीन शेख(तृतीय वर्ष यंत्रविज्ञान) कडे दि. २३ जानेवारी पर्यंत द्यावीत. "
नोटीस वाचली..आणि मन हवेत उडायला लागलं..सभागृह भरगच्च भरलं आहे..मी गातेय. गाणे संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला..सगळं कॉलेज आता मला ओळखत होतं..
"देऊया का आपण नावं?"सोनाली माझ्या कानात तिसर्‍यांदा ओरडली. मी भानावर आले.
"हो, देऊया की. दोघी असल्यावर धीर पण येईल."
आम्ही तडक झुबीन कडे गेलो. नावे देऊन आलो. निवडफेरी २४ ता. ला होती.
"काय गाणार आपण?"सोनाली.
"बघू, एखादे छान सर्वाना आवडणारे गाणे गाऊया."मी.
"मी मैने प्यार किया मधलं 'दिल दिवाना' गाईन म्हणते. मला आवडतं आणि पूर्ण आठवतं पण आणि सोपं पण आहे."सोनाली.
"मी एखादं दर्दभरं गाणं गाणार आहे. लोकांच्या हृद्याला भिडलं पाहिजे असं."-मी.
मग असेच हवेत उडत आम्ही तासाला गेलो. तास राईलकर सरांचा. ते खूप रंगून जाऊन शिकवतात, पण विषयच 'बोर' आणि त्यांचा तास मधल्या सुट्टीनंतर, त्याला ते तरी काय करणार? मी मागच्या बाकावर डोळे ताणून 'फ़्लिपफ्लॉप' आणि 'बूलियन लॉजिक' चे फंडे डोक्यात घुसवायचा प्रयत्न करत होते. परत माझं मन गेलं गच्च भरलेल्या सभागृहात!!मी गात होते.एकदम हलकं हलकं वाटत होतं..'समाधीअवस्था' वगैरे यालाच म्हणत असावेत..अचानक.....'यू, सिटींग ऑन लास्ट बेंच!! स्टँड अप!' इति राईलकर गुरुवर्य.'वॉश युवर फेस अँड कम.धिस इस लास्ट टाईम आय ऍम टेलिंग यु.'बापरे.डुलकी कधी लागली कळलंच नव्हतं मला.हरहर!कोण हा दैवदुर्विलास! नेमका आज मधल्या रांगेतला बेंच निवडला होता.सरांच्या डोळ्यांच्या सरळ रेषेत...'तेजोभंग' 'निद्राभंग' आणि रोखलेल्या ३८ डोळ्यांचे तीर सहन करत मी जड पावलांनी बाहेर गेले..पाण्याचा नळ तीन मजले उतरुन थोडे अंतर चालून समोर..पहिल्या मजल्यावर उभे सिनीयर्स.त्याना हा तोंड धुण्याचा प्रसंग बराच मनोरंजक वाटला..त्याना माहिती होतं राईलकरांचा तास चालू आहे..पण आले तोंड धुवून निधड्या छातीने परत वर्गात...
२३ तारखेच्या संध्याकाळी सोनाली म्हणाली,
'माझ्या ताईची मैत्रिण ऑर्केस्ट्रात आहे. ती आपल्याला गाणी सुचवेल.आणि रात्री तू माझ्याचकडे रहा.आपण प्रॅक्टीस करु.'
मग आम्ही दोघी कॉलेज सुटल्यावर सोनालीच्या घरी गेलो.
ताईच्या मैत्रिणीने' गाणी सुचवली ती ऑर्केस्ट्राची असल्याने एकदम वाद्यांचा भरणा असलेली होती. एक ओळ...मग टॅण..टुडुंग..टुंडुंग..दुसरी ओळ...टीरीरीरी..इ.इ.आम्हाला एक पण गाणं पटेना तिने सुचवलेलं..मग आम्ही घरी आलो. 'आपण आपल्याला आवडतात तीच गाणी निवडू.गाणं मनापासून आलं कि आपोआप चांगलं म्हटलं जाईल.'-सेंटीमेंटल मी.मग आमची प्रॅक्टीस सुरु झाली. 'केस वळवायचा गोल कंगवा' हा माईक हातात घेऊन. सोनाली गात चांगली होती. आता मी सुरुवात केली.
"तू २ ओळींच्या मधेमधे श्वास घेतेयस तो माईक मधे(कंगव्यामधे??) ऐकू जातो आहे."-सोनाली.
"मग मी काय करु? श्वास न घेता पूर्ण गाणं गायला मी काय शंकर महादेवन आहे?"-मी.
"झेपणारं गाणं निवड. हे गाणं खूपच हायफाय आहे.कळतं आहे तुला झेपत नाहीये ते. गाण्याचे कष्ट चेहर्‍यावर दिसतायेत."-सोनाली.

गाणं होतं गीता दत्तचं 'वक्त ने किया क्या हसीं सितम..'"मला हे आवडतं आणि हे मी चांगलं म्हणू शकते. मी माईक दूर धरेन म्हणजे श्वास ऐकू जाणार नाही."-मी.अशी रात्री १ पर्यंत आमची सुरांशी झटापट चालू होती. मग 'कपडे कोणते घालावे' 'हायहिल्स घालावे का' 'लिपस्टिक लावावी कि ते जास्तच शायनिंग वाटेल?' इ.इ. गहन प्रश्नांवर चर्चा झाली...शेवटी निवडलेल्या कपड्याला इस्त्री करुन आम्ही दोघी शांत झोपलो स्वप्ने बघत..

'निवडफेरी' चा दिवस आला..हॉल निवडफेरीला पण गच्च भरला होता..मुत्सद्दीपणा करुन झुबीनच्या मागच्या बाकावर बसून कौशल्याने त्याच्या हातातली यादी पाहण्याचा सर्वांचाच प्रयत्न होता.. पण आधी आलेल्या २ मैत्रिणींच्या वशिल्याने एकदाची मोक्याची जागा पटकावली.. गात सगळेच सही होते..सोनालीचा नंबर आला..'दिल दिवाना' तिने चांगले म्हटले...पण दुसरे कडवे तिला आठवेच ना..मी तोंड हलवून सांगत होते..पण 'मूकबधिर समाचार' चुकले असावेत..तिने एक कडवे २दा म्हटले..पुढे एका मुलाने 'माकारीना' गाण्याचे विडंबन म्हटले. त्याला भरपूर हशा आणि टाळ्या मिळाल्या..आता माझा नंबर आला. 'माकारीना' साठीच्या हशा आणि टाळ्या संपतच नव्हत्या.. माझ्या पोटातला गोळा वाढत होता‌. शेवटी मी धीर करुन माईक हातात घेतला, आणि म्हणाले, 'सायलेन्स अँड प्लीज को ऑपरेट!!' (मागून १ आवाज आला..'प्लीज को-ऑपरेट?? हॅ हॅ हॅ!!चक्रमच आहे!')
मी सुरु केले 'वक्त ने किया क्या हसीं सितम तुम रहे ना तुम.हम रहे ना हम..'
मधेच चोरट्या नजरेने सोनालीकडे पाहिले. 'श्वास ऐकू येतोय तुझा..' ती खाणाखुणांनी सांगत होती..मग मी माईक थोडा मागे घेतला..
आता 'बेकरार दिल इस तरह मिले...' बापरे..आवाज चढेचना..'बेकरार दिल' खुल्या आवाजात.. पुढचे 'इस तरह मिले' दम लागल्यामुळे जवजवळ घशात..अरे बापरे.. अजून 'जिस तरह कभी हम जुदा न थे' ला वरची पट्टी. शेवटी 'जिस तरह कभी'(किंचाळून)......हम जुदा न थे..(आवाज फाटला..)आता प्रेक्षकांतून फाटलेल्या आवाजाच्या नकला सुरु झाल्या..कोणीतरी मागून 'म्यांव' केले.. मी चोरट्या नजरेने पुन्हा सोनाली कडे पाहिले..ती कपाळाला हात लावून खाली बघत होती. त्यानंतर मी एकदम राजधानी एक्सप्रेसच्या वेगात 'हम भी खो गये तुम भी खो गये एक राह पर..चलके दो कदम...' म्हणून परत धृपद न म्हणता 'थँक्यू' म्हणून विजेच्या वेगाने येऊन माझ्या जागेवर बसले.. 'टाळ्यांचा कडकडाट' नाही पण हशाची झुळूक आली..त्यानंतर बरेच दिवस मी जाईन तिथे मुलं भावपूर्ण चेहरा करुन सुरु करत...'वक्त ने किया..क्या हसीं सितम..तुम रहे ना तुम...........हम रहे ना हम...'

माझ्या गाण्याने कॉलेजमधे सर्व मला ओळखतील' हे माझं स्वप्न पूर्ण झालं होतं..पण वेगळ्या प्रकारे!!!!
-अनुराधा कुलकर्णी

Tuesday, 27 February 2007

माझा पिवळेपणाकडे प्रवास -६

यापूर्वी वाचा: खालचा 'भाग ५'

सोमवारच्या ऐवजी मंगळवारी डॉक्टरांनी पेशंटाला सोडायची परवानगी दिली. आज पूर्वकल्पना दिल्याने 'पेशंट' आणि पेशंटचा नवरा पण जाण्याच्या पूर्ण तयारीतच गाशा गुंडाळून बसले होते. आता 'बहिणी' आणि 'भावांशी' चांगली ओळख झाली होती. पटकन आवरुन खाली नाश्ता करायला गेलो. आजही आंघोळीला सूर्याने गरम पाणी दिले नाही ते नाहीच! नाश्ता करत होतो तर बालडॉक्टर त्याच्या सहकाऱ्यासोबत नाश्त्याला आला. आम्हाला खालीच पाहून तो सौम्य वैतागला. 'हे काय, तुम्ही अजून खालीच? आता दहाला मोठ्या डॉक्टरांचा राउंड आहे. लवकर खोलीत जा.'

मी पटकन खोलीत जाऊन रोगीपणाच्या भूमिकेत गेले. डॉ. आले आणि त्यांनी रोग्याला सोडायला परवानगी दिली. नवरोबा खाली पैसे द्यायला आणि कागदपत्रे घ्यायला गेले. आणि बहिणीने मला एक फीडबॅक फॉर्म आणून दिला. 'फीडबॅक फॉर्म' म्हटलं की माझ्या अंगात भलता उत्साह संचारतो. मागच्या वेळी कोकणात एका हाटेलाच्या फीडबॅक फॉर्म मधे 'शॉवर कर्टन एका ठिकाणी फाटला आहे.मालकाचे हॉटेलाकडे लक्ष नाही' इ.इ. लिहीले होते. नवरोबा अशावेळी जरा वैतागतो. 'नाही त्या ठिकाणी तुझा स्पष्टवक्तेपणा.आपण निघाल्यावर ते तो फॉर्म ठेवतात की त्याच्यात भेळ खातात आपल्याला काय माहित?' पण फीडबॅक फॉर्म म्हटलं की प्रेमपत्र लिहीत असल्यासारखं मी पानंच्या पानं लिहायला निघतेच. आज नवरोबा जवळ नसल्याने भरपूर लिहीले. सूर्य गरम पाणी या खोलीत देत नाही, कॉफी यंत्राची कूपने चौथ्या मजल्यावर विकत मिळायला हवीत, जेवणाचे दर जास्त आहेत, इ.इ. 'खोलीत डिव्हीडी प्लेयर ठेवा' आणि 'रोग्यांना त्यांच्या पैशाचा मोबदला म्हणून ज्या गायिकेचे इस्पितळ आहे तिचे एक गाणे रोज संध्याकाळी 'लाइव्ह' ऐकवा' इ. लिहीण्याचा बेत होता. पण नंतर परत इथेच येऊन 'टुचुक' करावे लागले तर उट्टे निघेल या भीतीने लिहीले नाही.

मी घरी आले आणि ताबडतोब परीचित व नातेवाईकांचा घरगुती औषधविषयक सल्ल्यांचा मारा सुरु झाला.
'दह्यात सोडा कालवून रोज सकाळी सकाळी खावे.'(स्वगतः दह्यात सोडा? पण चहाचे काय?)
'खुन्या मुरलीधराजवळ एक वैद्य आहे तो सकाळी सूर्याच्या प्रकाशात डोळे बघून निदान करतो आणि औषध देतो.'(स्वगतः आमचे नशिब असे की आमच्या वेळी बरोबर ढग यायचे!इस्पितळात पण सूर्याने पाणी कुठे तापवून दिलं?)
'लोणावळ्याला एक वैद्य आहे.भल्या पहाटे घरातून निघा आणि तिथे जा. मोठी रांग असते. तो दोन थेंब देतो.'(स्वगतः दोन थेंबांसाठी लोणावळा?)
'आमच्या समोर एक वैद्य राहतो तो फुकट औषध देतो. ते उकडलेल्या केळ्यात कालवून खायचं पटकन गुण येतो.'(स्वगतः उकडलेले केळे? व्या ऽऽऽ क!)
'लिंबू अजिबात खाऊ नका.'(स्वगतः पण इंटरनेटावर म्हणतात की सारखे लिंबूपाणी प्या.)
'रोज चार किमान वेळा तरी लिंबूपाणी द्या.'(स्वगतः पण आमचे शेजारी म्हणतात की लिंबू अजिबात टाळा.)
'मी तुम्हाला सांगतो,काविळीवर जगात कोणतेही ऍलोपाथिक औषध अजून निघालेलं नाही. तुम्ही ऍलोपाथिक औषधं आधी बंद करा पाहू!फक्त कडक पथ्यं पाळा आणि ताक भाकरी खा.तेलतूप अजिबात बंद ठेवा. असं तीन महिने करा.'(स्वगतः तीन महिने???बापरे!)
'होमियोपाथीची औषधे घ्या.ऍलोपाथीची बंद करा.'(स्वगतः का पण?दोन्ही चालू ठेवली तर ती एकमेकांना मारतात का?)

शेवटी होमियोपाथीची औषधे घ्यायची आणि ऍलोपाथीची पण चालू ठेवायची हा तोडगा निघाला. एका प्रसिद्ध तज्ज्ञाची वेळ ठरवली. हा तज्ज्ञ ज्या ठिकाणी राहतो असे सांगितले होते तिथे गेलो तर तिथे त्वचारोगाचा दवाखाना! चौकशीअंती कळले की हा 'हॉक्टर'(होमियोपाथी डॉक्टर) दुसरीकडे गेला होता. त्याचा पत्ता 'एस. एन. डि.टी. च्या जवळच कुठेतरी राहतो' असा कळला. आता जवळ म्हणजे उजवीकडे, डावीकडे, पुढे का मागे? 'ते नक्की माहित नाही. तिथे जाऊन विचारा.कोणीही सांगेल.'

आम्ही एस. एन. डी.टी. ला उतरलो आणि चौकशी करु लागलो. एकदोन जणांनी 'पुढे चांभार आहे त्या गल्लीत आहे' म्हणून सांगितले. तिथे गेलो तर तो 'बालरोगतज्ज्ञ' निघाला. आम्ही परत मागे आलो.त्या तज्ज्ञाकडे दूरध्वनी केला. सहकाऱ्याने सांगितले की 'एम. एस. इ.बी. च्या मागे आहे.' तिथे गेलो तर काहीच दिसेना. शेवटी शोधत 'स्वाद' हॉटेलापाशी आलो. आतले 'स्वाद' पोटाला खुणावत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत 'हॉक्टर' कडे दूरध्वनी केला.
'आम्ही इथे स्वाद च्या बाहेर आहोत. तुमच्या जवळची काहीतरी खूण सांगा.'
'नाही हो, आमच्याजवळ काहीच नाही.फक्त आम्हीच आहोत.' (बापरे! आता पुण्यात राहून पाच वर्षं झाली. पण ही अशी उत्तरं ऐकली की हबकायला होतं. एस. एन. डी.टी. नळस्टॉपसारखा भरगच्च परीसर,आणि यांच्या जवळपास खूण म्हणून काहीच नाही?म्हणजे रिकामी पोकळी आहे चक्क? हे म्हणजे फारच झालं हां!)
'अहो पण काहीतरी जवळपास असेलच ना? एखादी तरी खूण सांगा.''अं... हां. अभिनव शाळेच्या जवळ एक पेरुवाला राहतो. या पेरुवाल्याच्या उजव्या हाताला एक गल्ली जाते. या गल्लीच्या टोकाला आमचा दवाखाना आहे.'

पुढची दहा मिनीटे पु लं. च्या 'मद्रासी रामासारखं' 'अभिनवचा ऽऽ पेरुवाला ऽऽ सांगा कुणी पाहिला ऽऽ' झालं. तितक्यात एक बोरंवाली सापडली. हिच्या उजव्या हाताच्या गल्लीत वळावं का यावर आमचे विचारविनीमय सुरु झाले.
'पण ही तर बोरंवाली आहे.'
'मग काय झालं? हिच्या गाडीवर पेरु पण असतील. हिचा नवरा बसत असेल, तो आज आला नसेल.' (सर्वांची तर्कशास्त्रं वेगाने धावत होती.)
'तिलाच विचारु?'
'हाहाहा! काय विचारायचं? की बाई, तू गाडीवर पेरु ठेवतेस का?आणि तुझा नवरा गाडीवर बसतो का?आणि गाडी आज नेहमी उभी करतेस त्याच दिशेला उभी केली आहेस ना?'

तितक्यात खराखुरा पेरुवाला पलिकडे दिसला आणि आमचा शोध संपला. त्याच्या उजव्या हाताला नाही, पण समोर गल्ली होती आणि तिच्या टोकाला दवाखाना पण!

होमियोपाथी हे एक प्रभावी शास्त्र असलं तरी त्याच्याबाबत अनेक गैरसमज आहेत. 'ते होमियोपाथीवाले म्हणजे आपल्या पोटात दुखत असलं तरी 'कातरवेळी उदास वाटतं का?' 'चादर घेऊन झोपता का नुसते?' 'हाताला खाज येते का?' असे असंबद्ध प्रश्न विचारतात.' हा एक नेहमीचा विनोद आहे. त्यामुळे आता काय काय प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील म्हणून मी तयारीतच होते. पण सुदैवाने जास्त प्रश्न विचारले नाहीत. गोळ्या दिल्या आणि 'ते ऍलोपाथीचं औषध बंद करुन टाका.' असा सल्ला दिला. मी तो ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिला. गुरुवारी ऍलोपाथी वैद्याला 'होमियोपाथी चालू केली आहे' सांगितल्यावर तोही तेच म्हणणार होता. 'आता बरी होत आली आहे ना काविळ? मग उगाच कशाला होमियोपथी आणि आयुर्वेद? नीट औषधे घ्या, पथ्यं पाळा. आपोआप बऱ्या व्हाल.'- इति ऍलोपाथी डॉक्टर उवाच.

गोळ्या देताना 'हॉक्टर' ने बरेच सल्ले दिले. 'गोळ्याना हात लावू नका, चावू नका, कागदावर घ्या आणि गिळा, जादा गोळ्या पडल्या तर परत बाटलीत टाकू नका,गोळ्यांच्या आधी आणि नंतर अर्धा तास व्हिक्स, मुखशुद्धी, चहा,पाणी,कॉफी, कांदा,लसूण घेऊ नका इ.इ.' या सर्व सूचमांबरहुकूम गोळ्या घ्यायला लागले तर बऱ्याचदा त्या खालीच पडायच्या.एकदा नाकात गेल्या. तेव्हा मात्र आई म्हणाली, 'चमच्यातून घे ना गोळ्या. अशाने सगळी बाटली जमिनीलाच खाऊ घालशील.' अरे हो की! ये अपने भेजेमेच नही आया!

अखेरीस ५ जानेवारीला आजारी पडून मी ८ फेब्रुवारीला पूर्ण बरी झाले आहे आणि पुनश्च काम, स्वयंपाक, रस्ते, खड्डे, कचेरी आदी दिनक्रम सुरु. 'कशाने बरी झाले?' अं..विचार करावा लागेल. बऱ्याच शक्यता आहेत.

१. घरच्यांचे प्रेम आणि माझी इच्छाशक्ती
२. होमियोपाथी
३. ऍलोपाथी
४. कधीतरी एकदा दोन मिनीटे केलेला कपालभाती प्राणायाम
५. खाल्लेला ऊस आणि काकवी
६. पथ्यपाणी
७. कधीतरी एकदा प्यायलेला गव्हाच्या रोपांचा रस
८. आजाराला माझ्या शरीरात राहून आलेला कंटाळा
९. पुष्कराजाच्या अंगठीमुळे वाढलेले गुरुबळ (??)

असो, शेवट गोड ते सारेच गोड. म्हणून याचे श्रेय सगळ्यालाच देऊया. बरेच पैसे, बऱ्याच सुया, घरच्यांचा बराच वेळ खाऊन संपलेला हा पिवळेपणाकडे प्रवास मला हे शिकवून गेला की 'तुमच्याकडे २ बंगले, ३ गाड्या, चार कंपन्या असतील, पण शरीर एकच आहे, म्हणूनच त्याची यथायोग्य काळजी घ्या.' गंभीर आजारासाठी 'इस्पितळाची पायरी' चढण्याची वेळ कोणावरही येऊ नये हीच सदिच्छा!


"सर्वे ऽ पि सुखिन: संतु । ।
सर्वे संतु निरामय: । ।
सर्वे भद्राणि पश्यंतु । ।
मा कश्चित् दु:खभाग्भवेत् । ।"

(समाप्त)
-अनुराधा कुलकर्णी

Tuesday, 20 February 2007

माझा पिवळेपणाकडे प्रवास - ५

या आधी वाचा: खालचा 'भाग ४'

आज रविवार रात्र. बघायला कचेरीतील लोक आले नाहीत. पण नातेवाईक मात्र येऊन गेले. त्यामुळे आजारपणाला अगदी चार नाही तरी निदान सव्वादोन अडिच चांद लागले.
खालच्या उपहारगृहामधील जेवण खाली जाऊन नवरोबाबरोबर जेवत होते रोज. इस्पितळातले उपहारगृह म्हणजे तीन निराळ्या संस्कृतींची मिसळण असते. पहिले म्हणजे रोग्याबरोबर आलेले आणि थोडे चिंताग्रस्त रोग्यांचे नातेवाईक, दुसरे म्हणजे जेवताना पण अगम्य वैद्यकीय भाषेत रोग्यांविषयी चर्चा करणारे डॉक्टर डॉक्टरीणी, आणि तिसरे म्हणजे या आजाराच्या छायेत असूनही रंगीबेरंगी फुलपाखराचे जीवन जगणारे आणि हसणारे खिदळणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे 'भावी' डॉक्टर-डॉक्टरीणी. मी इस्पितळांच्या उपहारगृहांमध्ये आधी पण एकदोनदा खाल्ले आहे, पण आज पहिल्यांदाच रोग्याच्या 'परस्पेक्टीव्ह' ने खात असल्याने हे निरीक्षण चालू होते.
जेवणानंतर खालच्या मजल्यावर बाकावर बसलो होतो. तिथेच खाली एक वृद्ध माणूस आणि बाई शेजारी वळकटी ठेऊन फरशीवर पांघरुण पसरुन झोपले होते. 'ते खाली का झोपलेत रे?''वर कॉमन वॉर्डमध्ये कोणीतरी ऍडमिट असेल.दूरगावाहून आले असतील.' माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. कोणीतरी जवळचा नातेवाईक अनेक दिवसांपासून आजारी..गावात सोयी नाहीत. कुठूनतरी कसातरी पैसा जमवून लगेच शहरात येऊन त्याला जनरल वॉर्डात ऍडमिट केलं..आणि या शहरात रात्रीपुरता निवारा परवडणार कसा? म्हणून बाहेरच पॅसेजमध्ये झोपायचं..उद्याच्या दिसाची आणि औषधांच्या खर्चाची चिंता करत..
मला परत एकदा स्वतःची लाज वाटली. आज मी महान बनून स्वतःच्या आजारपणावर विनोद करतेय..'बघा मी माझं आजारपण पण किती शूरपणे घेते' अशा अप्रत्यक्ष फुशारक्या मारतेय..कारण आजूबाजूला प्रेम, काळजी करणारी आणि जपणारी माणसं आहेत..सुदैवाने गाठीशी चार पैसे आहेत..वैद्यकीय खर्चाचा काही भाग देणारी कचेरी आहे..पण हे सर्व नसतं तर मी इतकी निवांत खाजगी खोलीत ऍडमिट झाले असते? इतक्या महागडया तपासण्या करू शकले असते? की काविळीच्या आयुर्वेदीक किंवा घरगुती औषधावर घरीच विश्रांती घेतली असती? पैसा गाठीशी असला की साधा सर्दी खोकला पण 'ऍलर्जी' बनून गोळ्या आणि हवापालट मागतो..पण 'पडू आजारी मौज वाटे भारी' हे खरंच खरं आहे का? आज आपण चालते फिरते आहोत..गंभीर आजारी नाही..म्हणून हे आजारपण मनाला आणि 'स्वयं' ला सुखावतंय का?
नाही, हे बदलायलाच हवं. 'पडू आजारी मौज वाटे भारी' ही वृत्ती जवळ फिरकताही कामा नये. आजारी पडून इतरांच्या 'अटेन्शन' चं सुख घेण्यापेक्षा स्वतःची नीट काळजी घेऊन जवळच्या सर्वांचाच त्रास कमी करणं हीच खरी मौज. या महागाईच्या दिवसात आजारी पडणं यासारखा गंभीर गुन्हा दुसरा नाही..
सोमवार सकाळ. भल्या पहाटे रक्त घेतलं. मग एक सलाईन आणि खाल्ल्यावर परत रक्त घेतलं. स्वगतः काय माणसं आहेत का ड्रॅक्युले?सारखे काय रक्त घेतात? काल पण घेतलं ना? त्यात डाव्या हाताच्या सलाईनच्या सुईचे उजव्या हातात स्थलांतर झाल्याने परत एकदोनदा 'टुचुक' झाले होते. आजारपणाचे 'विश्रांती' हे घी सोडल्यास बाकी सर्व 'बडगे' आता दिसू लागले होते! त्यात रोज सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच अशा घाऊक प्रमाणात गोळ्या खाव्या लागत होत्या. 'ऍलोपॅथिक औषधे शक्यतो घेणार नाही' या माझ्या नेहमीच्या बाण्याचा कचरा झाला होता.
मोठे डॉ. आले. 'वा वा.चांगली दिसते आहे तब्येत. पिवळेपणापण कमी झाला आहे. तुम्हाला आज जायला काही हरकत नाही.''पण आज तर घरचे सगळे कामावर गेले. आता दुपारी मी कशी जाऊ? बिबवेवाडीपर्यंत रिक्षा करावी लागेल मला आणि आईबाबांना.''तसा सर्व कागदपत्रं तयार होईपर्यंत दिड तास जाईलच. तितक्यात तुम्ही व्यवस्था करा.'
अरे बापरे. व्यवस्था करा काय? भर दुपारी हिंजेवाडीतून माझा नवरा काय तीन बस बदलून वेळेत येणार आहे का? आणि नवरा नामक 'बँक' जवळ नसेल तर पैशाचे काय? आईबाबा भरतील म्हणा तात्पुरते, पण त्यांच्याकडे वाहन नाही. आता जवळ पैसे काढायला कार्ड पण नसेल. आणि मोठ्या हौसेने घरुन मागवून घेतलेले पाच कपडे, नातेवाईकांनी हौसेने जमवलेला फळांचा ढिग, माझी प्रसाधने, काल मैत्रिणीने दिलेला सुंदर निशीगंधाचा गुच्छ आणि मी आणि आईबाबा इतकं सगळं रिक्षात तरी मावणार आहे का?
मी नवरोबाला फोन केला आणि कल्पना दिली. 'नक्की कळलं की सांग मी लगेच निघतो' म्हणाला. मीपण फिल्मी पद्धतीने 'हमारे पास पैसे नही है, ये पुष्कराजकी अंगठी रख लो' म्हणायची तयारी ठेवली!! पण सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ झाली तरी सुटायची चिन्हं दिसली नाहीत. बहीणीला विचारल्यावर कळले की रक्त तपासणीवरुन अजून एक दिवस थांबायचा निर्णय झाला आहे. आता मला परतीचे वेध लागले होते!
(अनुराधा कुलकर्णी )

Friday, 16 February 2007

माझा पिवळेपणाकडे प्रवास - ४

यापूर्वी वाचा: खालचा 'भाग ३'

नंतर सोनोग्राफी (यात म्हणे यकृत किती सुजलं आहे ते बघतात. मला तर काही दिसलं नाही बुवा. फक्त पोटात अर्ध्या तासापूर्वी खाल्लेल्या पोह्यांसारखं काहीतरी दिसलं.) , परत एकदा रक्त लघवी तपासणी इ. झाली. (एक रक्त लघवी तपासणी = कमीतकमी चारशे रुपयांचा खिमा हा हिशोब आता माहिती झाल्याने फुगणारा बिलाचा आकडा डोळ्यासमोर दिसत होता.) 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही' तसं 'तपासणीचे भाव सोसल्याशिवाय रोगीपण येत नाही' हे मात्र खरं! सोनोग्राफीसाठी चाकाच्या खुर्चीवरुन खाली नेलं तेव्हा खूपच विचीत्र वाटत होतं.
आता मोठे डॉ. तपासणीला आले. त्यांनी बालडॉक्टराने आदल्या रात्री केलेल्या तपासण्या परत केल्या. डॉ. कूल दिसले. 'पचेल ते आणि जास्त तिखट मसालेदार नसेल ते काहीही खा. पूर्वी काविळ झाल्यावर ताक भाकरीच खा, तेल तूप खाऊ नका इतकी कडक पथ्ये होती. आता मॉडर्न मेडीसीनमुळे तितकेसे कडक राहिलेले नाही पथ्यपाणी.' (मला ऐकून अर्थातच आनंद झाला कारण आता मी खाली कँटीनमध्ये पण खाऊ शकणार होते. घरच्यांनी मेहनत करून डबे दिलेच, पण नाश्त्याचा प्रश्न तरी सुटला.) मग खाली जाऊन इडल्या खाल्ल्या. अर्थात इडल्या हा पदार्थ पचायला हलका मध्ये मोडत नाही हे माहिती होते, पण 'साबूदाणा खिचडी ,वडे, सामोसे, इडली' हे पर्याय असतील तर इडलीच बरी! काल परवापर्यंत 'या पोटाने दगड सुद्धा पचवेन.खाण्याने किंवा पाणी बदलल्याने आजारी पडण्याइतकी लेचीपेची नाही मी' अशा फुकटच्या बढाया मी मारत होते. पण एकेका आजाराची पण काळवेळ असते. हे म्हणजे 'विनातिकीट यात्रा गुन्हा नाही, आणि त्याचा तुम्हाला काहीच त्रास होत नाही, पण अर्थातच जोपर्यंत तुम्ही पकडले जात नाही तोपर्यंत' तसे झाले. कधी पावसाळ्यात नळाला येणारे मातकट पाणी थेट पचवीन, आणि कधी एका बाहेरच्या पाणीपुरीचे निमीत्त पण आजाराला पुरे होईल. आता पाळत बस तीन महिने पथ्यं आणि पी उकळलेलं पाणी!
भ्रमणध्वनी वाजला. ऑफिसातील भैया सहकाऱ्याचा फोन होता. 'तू काल पाठवलेला प्रोग्राम चालत नाही.'फाईल नॉट फाउंड' म्हणतो.' मी मनातल्या मनात आनंदले. चला, म्हणजे आता स्वतः फोन करुन सांगायला नको. तसे आम्ही प्रसिद्धीपराडमुख (स्वगत : मला माहिती आहे या शब्दातल्या 'ड' ऐवजी 'न्ग' उच्चार असलेले ड सारखे दिसणारे अक्षर असते ते. पण ते मला आता सापडत नाहिये.) बरं का!'अरे बाबा मी ऍडमिट आहे. मला सलाईन लागले आहे.' (सलाईन लागणे ही आजारपणातील जास्त 'व्हि आय पी' अवस्था आहे असा माझा समज.)'आँ? कालपर्यंत ठिक होतीस ना?''हो पण आता इथे आहे. आपल्या साहेबांना पण नक्की सांग.' (स्वगत : नेहमी कचेरीतल्या बातम्यांची करतो तशी या बातमीची पण हा भैय्या चांगली 'पब्लिक शिट्टी' करून देईल अशी आशा.)
एका सलाईननंतर ब्रेकमध्ये खात असताना मोठ्या बंगाली साहेबाचा फोन आला. 'मला कळलं तुला ऍडमिट केलं आहे. काविळ कशी झाली?रस्त्यावरचं काही खाल्लंस का?''माहिती नाही हो साहेब. झाली खरी.''की सिगारेटी जास्त ओढतेस?''हॅ हॅ हॅ ! गुड जोक! नाही हो, मी फक्त दहाच ओढते दिवसातून.' (स्वगत : स्वतः सिगारेटचं धुराडं आहेस म्हणून इतरांना पण त्याच पारड्यात तोलतोस होय रे सायबा?)'काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे होऊन कामावर या.''हो सर. आय विल ट्राय माय बेस्ट. थँक यू.' (स्वगत : इथे मला एवढा मोठा ताजाताजा बाऊ झालाय आणि कोण तो वेडा चष्मेवाला सारखा काम काम करतोय? घर उन्हात बांधा रे त्याचं!)
साहेबाने 'खोली क्र.' इ. तपशील न विचारल्याने कचेरीतील साहेब लोक मला बघायला येण्याची आशा आता मी सोडून दिली आणि दूरचित्रवाणी संचाकडे लक्ष वळवले. आज पोगोवर 'मिस्टर बीन' बघता येणार होतं. नेहमी घरी म्हणजे 'या सुखां ऽऽ नो ऽऽ या ऽऽऽ' च्या बहुमतामुळे पोगो लागतच नाही.झी कॅफेवर 'फ्रेंडस' हिस्टरीवर होम्स. कार्टून नेटवर्कवर 'टॉम अँड जेरी'.एकंदरीत सलाईन सोडलं तर बाकी पेशंटपण बऱ्यापैकी खुशालचेंडू होतं.
बाबा घरी जाऊन आई ड्यूटीवर आली. मला 'आज दमले आहे. आज नाही येत माहेरी.' असं सांगून घरी लोळत आणि गोष्टीची पुस्तकं वाचत घालवलेले अनेक शनिवार आठवले आणि स्वत:ची लाज वाटली. खरंतर मी खूप गंभीर अवस्थेत वगैरे अजिबात नव्हते. चालती फिरती होते.खोलीत काही लागलं तर बोलावायला घंटा होती. हाताशी फोन होता.खिशात गरजेपुरते पैसे होते.टेबलावर मुबलक खाण्याचा साठा होता. पण नवरोबा, माहेर आणि सासर दोघांनीही या आजारपणात पेशंटची खूप काळजी घेतली. आपल्या माणसांची किंमत कठीण वेळीच कळते. एरवी आपली माणसं बऱ्याचदा गृहीत धरली जातात.
आईला चहा हवा होता. आमच्या खोलीच्या बाहेरच चहायंत्र होतं. पण त्यात घालण्याचं टोकन मात्र तिथे नव्हतं. चौकशी केल्यावर कळलं की टोकने फक्त तळमजल्यावरच विकत मिळतात. भले शाब्बास! प्रत्येक मजल्यावर चहाकॉफीयंत्र ठेवण्याचा उद्देश रोगी आणि नातेवाईकांना जास्त धावाधाव न करता जवळ चहाकॉफी मिळावी हा आहे ना? मग टोकन घेण्यासाठी चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर जायचं आणि परत तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर येऊन चहाकॉफी प्यायची?? तरी आई उत्साहाने २ टोकने घेऊन आली. दुसरे टोकन वापरताना ते यंत्रात अडकले आणि यंत्र बंद ! जर्मनीत असताना अशीच मी एकदा शीतपेय यंत्रात नाण्याऐवजी पाच युरोची नोट घातली होती. तिकडली काही यंत्रं नोटा टाकल्यावर उरलेले सुटे देतात हो परत! पण हे यंत्र 'खाईन तर नाणी नाहीतर पाजेन चांगलंच पाणी' होतं. पण नोट अडकली आणि मग आम्हाला ती चिमट्याने ओढून काढावी लागली होती.यंत्रं चालतात तोपर्यंत 'सूतासारखी सरळ', पण त्यांचं काही बिनसलं की मग 'भूत'!
संध्याकाळी छोट्या मराठी साहेबाचा फोन आला. 'कशा आहात? मी आणि बायको येणार होतो बघायला, पण माझे ना डोळे आले आहेत.''ओके. ओके. नो प्रॉब्लेम.'हाहाहा..म्हणजे आता कोणीच येणार नाही बघायला. असो. बघायला मराठी साहेब आले असते तर 'मिलो ना तुम तो हम घबराये ऽऽ (हपिसात आमच्या अपरोक्ष काही नविन कट शिजतो का या भितीने) , मिलो तो आँ ऽऽ ख चुराये ऽऽ(डोळे येऊ नये म्हणून हो!), हमे क्या हो गया है ऽऽ' म्हणावं लागलं असतं. जाऊदे. 'शायद हमारेही रिलेशन मेंटेनन्स मे कुछ कमी रह गयी' म्हणत मी उद्विग्नपणे सुस्कारा सोडला.
सूर्य उगवला. दुसऱ्या दिवशी पण सूर्याने पाणी तापवून दिले नाही. 'भाऊ' औषधे आणायची चिठ्ठी घेऊन आला. बाबा प्राणायाम करत होते. म्हणून मी चपला घालून आणि पुस्तक बदलायला घेऊन निघाले तर तो मद्रासी प्राणी म्हणाला, 'आप नही जानेका मेडीसीन लेने.' 'क्यों?आय ऍम नॉट बेड रिडन. और अगर मै निचे नाश्ता करने जा सकती हूं, लायब्ररी जा सकती हूं, तो मेडीसीन लाने क्यों नाही?''वो बाकी चलेगा. लेकिन ये अलौड नै है' हे पालुपद परत आळवून तो गेला.
आणलेली शांपू पिशवी बरीच जुनी असल्याने 'मृत' झालेली होती. नवरोबांना फोन केला. 'येताना एक शांपू पिशवी घेऊन ये.मला उद्या केस धुवायचेत.''काहीतरी नाटकं !! तिथे कोण तुला बघायला येणार आहे का? का पार्टी आहे?' (हाहाहा! याला म्हणजे बायकांचं काही कळतच नाही. मला म्हणजे कसं 'पेशंट विथ क्लीन फेस अँड वेल सेट हेअर' रहायचं आहे.) 'अरे पण केस खराब झाले आहेत.उद्या रविवार आहे.''असू दे, काही फरक पडत नाही. घरी आल्यावर पाहिजे तितके केस धू.तिथे आणि सर्दी वगैरे झाली तर?' (काळजी करतो नवरोबा! म्हणून बोलत असतो.राहूदे तर राहूदे.)
आता इस्पितळात चांगलाच जम बसला होता. मिळणारं लक्ष माझ्या 'स्वयं' ला चांगलंच सुखावत होतं.
(अनुराधा कुलकर्णी )

Thursday, 15 February 2007

माझा पिवळेपणाकडे प्रवास -३

(यापूर्वी वाचा: खालचा भाग २)

खोली मिळवली आणि गाठोडं घेऊन आमची स्वारी पलंगावर स्थानापन्न झाली. वा! खोली स्वच्छ आहे , आणि खोलीतल्या दूरचित्रवाणीसंचावर झी कॅफे , पोगो सह सर्व वाहिन्या आहेत . स्वयंपाक करायचा नाहीये , दूध तापवायचं नाहीये , कपडे घड्या करायचे नाहीयेत ,आवरा आवरी करायची नाहिये.. खाली ग्रंथालयात बरीच पुस्तकं आहेत.. ते सलाईनचं आणि काविळीचं लचांड सोडलं तर बाकी इथे एखादा आठवडा रहायला तसं जास्त त्रास होणार नाही बहुतेक. (चक्रम, ते लचांड नसतं तर इथे कशाला आली असतीस?) डॉ . बाई म्हणाल्याच होत्या ' तसे पण हल्लीचे दवाखाने म्हणजे थ्री स्टार हॉटेलंच असतात. '
निळा गणवेषधारी 'बहीण' उर्फ सिस्टर आली. 'तुम्ही कपडे बदलून घ्या आणि मग डॉ. येतील चेकिंगला.''पण माझा पेशंटचा ड्रेस कुठे आहे?''तुम्हाला पेशंट युनिफॉर्म नाही. स्वत:चेच कपडे बदला.'(हे काय? युनिफॉर्म पण नाही? नशिब, मी दोन तीन कपडे आणले. नाहीतर पेशंटचा ड्रेस आहे म्हणून एकच कपडा आणणार होते. हे काय पण? आमच्या पैशाचा मोबदला मिळालाच पाहिजे!!)
जरा सामान ठेवाठेवी होते न होते तोच एक नुकताच ताजा ताजा पास झालेला डॉ. आला. मी कोपऱ्यात दूरचित्रवाणीच्या रिमोटशी खेळत होते. सासर व माहेर काही आत काही बाहेर उभे बसलेले होते. बालडॉक्टराने खोलीत येऊन इकडेतिकडे जमलेल्या जनतेकडे पाहिलं आणि विचारलं , 'पेशंट कोण आहे?' (अरे, मी इतकी जेन्युइन आजारी पडले तरी चेहऱ्यावरुन ठणठणीतच दिसते की काय? असं असेल तर कचेरीवाल्यांचा विश्वास बसणं कठीण आहे बाबा. मला जरा चेहऱ्यावर आजारपण आणायला पाहिजे.) बालडॉक्टराने 'खाली बघा, वर बघा, श्वास घ्या, श्वास सोडा,पाठमोरे व्हा, परत श्वास घ्या, परत सोडा' इ.इ. तपासणी केली आणि म्हणाला , 'तुमचे मुख्य डॉ. उद्या सकाळी १० वाजता येतील. तयार रहा.' आणि तो गेला. या सर्व गोंधळात माहेर, सासर आणि खुद्द पेशंटचे सर्वांचेच जेवण राहून गेले होते. सासर जेवायला गेले. माहेर पण थोडावेळ थांबून घरी गेले. आणि नवरोबा रात्री सोबत करायला थांबले. हे एक म्हणजे जरा कंटाळवाणेच आहे बुवा. म्हणजे मला सोबत म्हणून कोणातरी एकाचा वेळ जाणार. आणि ते पण बाकी कामं सांभाळून धावपळ. नवरोबाची बिचाऱ्याची जास्तीत जास्त ओढाताण. माझा 'पडू आजारी मौज वाटे भारी' ताप थोडा उतरला.
पहिले सलाईन लावले. माझ्या 'व्हेन्स सापडत नाहीत.पातळ आहेत.'(हाहाहा..गुटगुटीत माणसाच्या व्हेन्स पातळ कशा बुवा?) असं बहिणाबाई त्यांच्या हाताखालच्या 'भावा' ला सांगत होत्या.(अशा त्या सापडल्या नाहीत की कधीकधी दोन तीन ठिकाणी 'टुचुक' करुन शोधाव्या लागतात.)'सलाईन' हा एक अत्यंत कंटाळवाणा प्रकार. स्वतःच्याच हाताला टोचणी लावून घेऊन वर बाटलीतून हळूहळू टपक टपक गळणारा द्राव पाहत बसायचा. लवकर लवकर संपावं म्हणून द्रावाचा वेग वाढवल्यास थंडी वाजते. त्यात या द्रावात पिवळ्या रंगाचं जीवनसत्व इंजेक्शन असल्यामुळे वेळ अंमळ जास्तच लागत होता. वर येता येताच जी ए कुलकर्णींचं 'काजळमाया' आणलं होतं.जरा अवघडूनच सलाईन नसलेल्या हातासरशी 'विदूषक' कथा वाचून काढली.(खोलीसाठी भरलेल्या पैशाचा मोबदला हवा ना! दिवसाला दोन या दराने एका आठवड्यात १२-१४ पुस्तकं वाचून झाली तरच पैसे वसूल!) एक वाजता झोपले. 'उद्या काही ऑफीस नाही. मनसोक्त लोळू' असं ठरवलं.
पहाटे सहाच्या ठोक्याला दार वाजले. नवऱ्याने झोपेतच दार उघडले. 'भाऊ' येऊन रक्तदाब घेऊन गेला. (माझा झोपेत वैतागून विचार: रक्तदाब भल्या पहाटे सहाला? का बरं? नंतर रक्त अंगातून निघून फिरायला किंवा ऑफिसला वगैरे जातं की काय?)परत झोपलो, तर परत दार वाजले. खोली झाडपूस झाली. अरेच्च्या, म्हणजे 'हॉस्पिटल इज नॉट थ्री स्टार हॉटेल' बरं का. इथेपण सकाळी लवकर उठावं लागणार! मग नवरोबा घरी गेले आणि बाबांची पेशंटवर 'ड्यूटी' सुरू झाली. 'पाट्यांचे शहर' या लौकिकाला जागून माझ्या खोलीत पण भरपूर पाट्या होत्या. 'या खोलीला खिडकी उघडी ठेवता येत नाही म्हणून आम्ही वातानुकूलन पुरवत आहोत तसेच या खोलीचा दर इतर खोल्यांपेक्षा ५० रू. कमी आहे' ही ('५० रू. कमी' मुळे जरा सुखकारक) पाटी, 'कमोड कसा वापरावा' याचे माहितीपत्रक, 'रूम सर्व्हिस' च्या (खाण्याचे दर महाग असल्याने जरा दु:खकारक) अटी, 'नळाला सूर्याने गरम होणारे पाणी आहे. ते फक्त ९.३० पर्यंतच येईल.' ही 'हॉस्पिटलात आलात म्हणून आंघोळ दिवसातून केव्हाही करायची ही टंगळमंगळ चालणार नाही बरं का!' असे अप्रत्यक्षरित्या बजावणारी पाटी, न्हाणी व कमोड स्वच्छतेच्या तपासण्या व त्यावर तीन जणांच्या रोज सह्या असलेला तक्ता यांचे वाचन झाले. आंघोळीला आत गेले. 'सूर्याने गरम होणारे पाणी' सोडले. पण ते काही गरम झाले नाही.म्हणून बाबांना सांगून 'बहिण'/'भाऊ' यांना बोलावणारी घंटा वाजववली. एक भाऊ खोलीत डोकावून 'पाणी पाच मिनीटं सोडून ठेवा, मग गरम येईल' सांगून गेला. पुन:श्च दहा मिनीटे पाणी सोडून ठेवले. पण गरम पाणी आलेच नाही. परत घंटा वाजववली. मग एक बहिण आली. मग तिने एका 'मावशी' ला पाठवले. मावशीने बादली घेऊन जाऊन विस्तवावर पाणी तापवून आणून दिले.
'सुबह हो गयी मामू..मामू..ए मा ऽऽ मू ऽऽ' तर हा असा माझा 'खोली नं. ४३९ ऍडमिट' कँपचा पहिला दिवस सुरू झाला! आता फक्त कचेरीतल्या लोकांनी बघून जायचाच अवकाश, 'अनुला काविळ झाली' ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असती आणि माझ्या आजारपणाला चार चांद लागले असते.पण अजून तर त्यांना माहितीच नाही! ते समजतात की शुक्रवारची सुट्टी घेऊन अनु ठणठणीत होऊन सोमवारी कामावर हजर!
(अनुराधा कुलकर्णी )

माझा पिवळेपणाकडे प्रवास-२

यापूर्वी वाचा: खालचा 'भाग-१'

डॉक्टरीणबाईंनी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे निकाल पाहिले. 'आज सकाळी का नाही आलीस?' -डॉक्टरीणबाई.'अं.. जरा कचेरीत काम होतं.' -मी'डोळे बघू. नखं बघू.''हेमोग्लोबिन शेवटचं कधी तपासलं?''तीन वर्षापूर्वी नोकरीसाठी वैद्यकीय तपासणी करताना.'- मी.'त्याच्यानंतर कधीच नाही? ७ हेमोग्लोबिन आहे. ऍनिमिया. आणि काविळ आहे. डोळे पिवळे दिसलेले कळले नाहीत का?'- डॉ.'डोळे,ते पण स्वत:चे, इतक्या बारकाईने कधी पाहिलेच नाहीत हो! आणि आमच्या घरातला आरशावरचा दिवा पण पिवळा आहे ना!'-मी.
सर्व तपासातपाशी झाली. डॉ. बाई टेबलाशी बसल्या. 'मी डॉक्टरांच्या नावाने चिठ्ठी लिहून देते, आता आवरुन अर्ध्या तासात त्या हॉस्पिटलात ऍडमिट करा.नंतर दहानंतर उशिर होईल आणि ते कदाचित पेशंट घेणार नाहीत.''ऍडमिट??किती दिवस?' माझा आजारपणाची रजा घेऊन घरी लोळत पडण्याचा आनंद टाचणी लागून फुटला. मुन्नाभाईमधल्या जहिरसारखे स्वगत मी (मनात) सुरु केले.'अभी तो साहिल मे तंदूरी आलू खाने थे..पिझ्झा हट मे पिझ्झा व्हेजी डिलाईट..मनमीत मे बास्केट चाट. सब हो जायेगा आधे घंटे मे? २६ जानेवारीके वीकेन्ड को पंचगनी जाना है.. नवरेके साथ अभिरुची जाना है.वॉटर पार्क जाना है.. सब हो जायेगा आधे घंटे मे?? छुट्टी के इंतजार मे पूरा डिसेंबर काम करके बिताया.मेरे ऑफिसके लोग तो सीक लीव्ह लेकर मॅच देखते थे...मैने एक भी लीव्ह नही ली.हमेशा अपनी अरमानोको दबाये रखा.. सोचा था, अभी बहुत वक्त है.. एक बात बताइये डॉक्टर, मेरे साथही ऐसा क्यूं होता है??'
'ऍडमिट व्हावंच लागेल का?घरी विश्रांती घेऊन चालणार नाही का?''ऍनिमिया नसता तर विचार केला असता.पण आताच्या परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये एक-दोन आठवडे ऍडमिट होणं सेफर साइडला राहिल.'-डॉ. शांतपणे.माझं मन किंचाळायला लागलं..'एक-दोन आठवडे? नही!!! बचाव!! मला नाही जायचं मोठ्या हॉस्पिटलांत. जिथे चांगले लोक निवडून त्यांच्या किडन्या विकतात. जिथे नजरचुकीने एडसची इंजेक्शने वापरतात. जिथे शम्मी कपूरची औषधे दुसऱ्या कोणाला दिली जातात..मुन्नाभाईमधल्यासारखे आणि हिंदुस्तानी मधल्यासारखे जिथे रुग्ण कॅज्युअल्टीमध्ये फॉर्म भरुन होईपर्यंत किंवा पोलीस केस करेपर्यंत मरतात..मला नाही जायचं तिथे.'
मी चाचरत विचारलं, 'पण डॉक्टर, सर्व ठिक असेल ना, नाही, म्हणजे या मोठ्या हॉस्पिटलांबद्दल आम्ही पेपरात जे वाचतो त्यामुळे भिती वाटते.''अहो मी रेफर करतेय ना? मोठ्या हॉस्पिटलात तुम्ही डायरेक्ट ओळखीशिवाय गेलात की यु आर अ नो मॅन्स लँड. पण तुम्ही माझ्या रेफरन्सने जाताय ना? आणि हॉस्पिटल चांगलंच आहे. निश्चिंत रहा.' -डॉ.'इंजेक्शन वगैरे काही घ्यायचंय का मला?' मी त्यांच्या हातातली सुई पाहून विचारलं. डॉ. मिश्किल हसल्या. 'आता मी इंजेक्शन द्यायची गरजच नाही. तुला ते सलाईनमधूनच सर्व इंजेक्शनं देतील.''सलाईन पण?????' मी मनातल्या मनात किंचाळले. आम्ही रात्री दहा वाजता गाशा गुंडाळून एका गायिकेने काढलेल्या धर्मादाय इस्पितळात निघालो. आता किती दिवस रहावे लागणार अंदाज नाही. म्हणून मी प्रसाधने गोळा करत होते. फेसवॉश, ओले कागदी टिश्यू, क्रिम, साबण, तेल, शांपू, पेपरमिंट, कंगवा, कागद, पेन,वाटी,चमचा,ताटली,पेला, थोडी चॉकलेटे घेतली. नवऱ्याचा संयम सुटत चालला होता. शेवटी नेलकटर पण पिशवीत घातले तेव्हा नवरोबा वैतागला. 'कायमची जाते आहेस का हॉटेलात मजा करायला जाते आहेस? नेलकटर कशाला? आणि टिश्यू कशाला?' 'अरे मी इतक्या दिवसांनी इतकी मोठी आजारी पडणार. लोक बघायला येणार. फळं आणणार. सुरी नको?ते बसणार. बोलणार. मला प्रेझेंटेबल रहायला नको?घाम आला तर पुसायला टिश्यू नकोत?''बरं आवरा पटकन आणि चला आता. आपण महान आहात. आम्ही लहान आहोत.' नवऱ्याची शरणागती.
दरम्यान आईबाबा आणि भाऊ वहिनीलाही उत्साहाने खबर दिली गेली. रात्री १०.३० वाजता, प्रवासाला जाणाऱ्या भैयाला सोडायला गाववाले ८-१० भैय्ये यावेत तसे मला सोडायला नवरा, सासूबाई,दिर, भाऊ,वहिनी आणि आईबाबा हा जत्था होता. माझा ऍडमिट व्हायचा उत्साह अजून कायम होता. पण पेशंटच्या खोल्यांचे भाव ऐकून तो कमी होतोय असे वाटले! 'पडू आजारी मौज वाटे भारी' ला 'खिशाला गळती' हा साईडइफेक्ट आहे हे ध्यानातच घेतले नव्हते!
(अनुराधा कुलकर्णी )

माझा पिवळेपणाकडे प्रवास-१

"आई गं!!"रस्त्यावरच्या एका खड्ड्यातून दुचाकी कडमडली आणि मी पोटात कळ येऊन कळवळले. "खड्डे अपनी जगह है, रास्ते अपनी जगह है ऽऽ". पण मग आजच पोटात ही अशी कळ का उठावी? माझ्या तर्कशुद्ध मनाने तीनचार निश्कर्ष काढले: अ). खड्डा कालपेक्षा जास्त खोल झाला आहे.ब). दुचाकीचे शॉक ऍबसॉर्बर बदलायला हवेत. क). पोट खरंच दुखतं आहे.
परत एकदा जिना चढताना 'आई गं!!' ने खात्री झाली की पर्याय क) हा सही जवाब आहे. जेव्हा दुपारचं खाणंही पचलं नाही तेव्हा विकीपिडीया उघडला. एकंदरीत लक्षणांवरुन मला १). मूत्रपिंड खडा अथवा २). स्वादुपिंडाचा कर्करोग(??) असावा असा अंदाज बांधून कामाला लागले. आज होता मंगळवार. मंगळवारी आजारी पडून रजा घेण्याची माझी फारशी इच्छा नसते. आजार पण कसा, गुरुवार, शुक्रवारी किंवा सोमवारी वगैरे आला की मस्त मोठी सुट्टी मिळते. मंगळवारी आजारी पडून परत गुरुवारी ठणठणीत आणि गुरु शुक्र अनिच्छेने काम करत बसावे लागते.
दिवस रेटून दुचाकीवर घरी जाताना माझ्या मनात करुण चित्रं तरळायला लागली. मला 'लिम्फोसर्कोमा ऑफ इन्टेस्टाइन' असेल तर? घरी ,शेजारी आणि कचेरीत लोक कसले हादरतील ना? हळहळतील. 'बिचारी! चांगली होती हो. तरुण वयातच गेली.' म्हणतील. आपण पण 'आनंद' सारखं आनंदी रहायचा प्रयत्न केला पाहिजे आता. बापरे, पण हे कर्करोग म्हणजे ते रेडिओथेरपी, टक्कल इ. लचांड येणार ना? आई गं! नाही, पोटात दुखतं म्हणजे अपेंडिक्स असू शकेल. ते फुटतं बिटतं ना म्हणे?
मनातल्या करुण विचारांशी मी इतकी एकरुप होऊन गेले की एक दोन अश्रू नाकावरुन ओघळून तोंडात गेले आणि मागून एक पल्सर मोठा भोंगा वाजवत वैतागून पुढे गेली. एरवी मी घरी असताना रडले वगैरे तर शक्यतो अश्रू चमच्यात गोळा करुन ठेवते. (सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात लिहीलं आहे 'अश्रूंमधे पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. एक चमचा अश्रू एक लिटरभर पाणी शुद्ध करतात.' कधी पाणी शुद्ध करुन पाहिलं नाही,पण चमच्यात गोळा मात्र करुन ठेवत असते.) पण अश्रू प्यायला म्हणजे अगदीच काहीतरी लागतात. गाण्यात म्हणायला ठिक आहे हो, 'आसूओंको पी गयीऽऽ' वगैरे.
घरी येऊन पतीराजांना माझी शंका बोलून दाखवली. 'हॅ, काहीतरीच काय? आता जाऊच डॉक्टरांकडे.' आम्ही आमच्या ज्येष्ठ डॉक्टरीणबाईंकडे गेलो. तपासणी इ. झाली. 'किती दिवस होतंय असं?' 'साधारण एक आठवडा असेल.' 'मग आधी का नाही आलात?' 'ऍसिडीटी असेल असं वाटलं. काही काळजी करण्यासारखं नाही ना?' माझा आवाज दाटू लागला. (मला सांगतील का आत्ता? का नंतर माझ्या नवऱ्याला बोलावून सांगतील 'इनको अब दवाओं की नही,दुवाओं की जरुरत है.') पतीराज म्हणाले, 'डॉक्टर, आमच्या घरातल्या बायकांना नेहमी स्वत:ला काहीतरी मोठा आजार झालाय असं का वाटत असतं हो?' 'तसंच असतं हो. प्रत्येकाला स्वत:ला 'कॅन्सर' हवा असतो.ग्लॅमरस आजार.' डॉक्टर हसून म्हणाल्या.'तुम्ही रक्त लघवी तपासून परवा सकाळी त्यांचा निकाल माझ्याकडे घेऊन या.' मी घाईत म्हणाले, 'बरं चालेल. परवा सकाळी नाही जमलं तर शनिवारी नक्की येऊ.' डॉक्टरीणबाई अधिकारवाणीने म्हणाल्या, 'परवाच जमवा.शनिवारपर्यंत थांबू नका.' (गेल्याच आठवड्यात मी त्यांना 'मला खोकल्यासाठी शक्यतो ऍलोपॅथिक औषधं घ्यायची नाहीत' सांगितल्याने त्यांनी मला बाहेर काढले होते. पण आमच्या या डॉक्टर एकदम प्रामाणिक आणि चांगल्या आहेत.म्हणजे आता परवा सकाळचं जमवावं लागेल.)
दुसऱ्या दिवशी मार्केटयार्डाच्या भाऊगर्दीतून गाडी चालवून ती पॅथॉलॉजी प्रयोगशाळा शोधली. सगळ्या पॅथॉलॉजी प्रयोगशाळा अशा जुन्या आणि लिफ्ट नसलेल्या इमारतीत का असतात काय माहित! रक्त आणि लघवी तपासायला सहाशे रुपये लागतात हे ऐकून पोटात नव्या दमाने कळ उठली.
आजारपण आणि सफरचंद यांचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. सारखं 'ऍन ऍप्पल अ डे, कीप्स डॉक्टर अवे' ऐकल्याने असेल. (आमच्या काही मैत्रिणी म्हणतात, 'इफ डॉक्टर इज हॅण्डसम, थ्रो द ऍप्पल अवे!') पण आमच्या कचेरीच्या इथे म्हणजे सफरचंदं भलती म्हणजे भलतीच महाग होती. स्थानमहात्म्य! ढोले पाटील रस्त्यावर सगळंच 'हायफाय'. म्हणून सफरचंद रद्द करुन दोन पेरू घेतले आणि रोजच्या कामाला लागले.
संध्याकाळी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेतून निकाल मिळाले. जास्त काही कळले नाही पण बऱ्याच ठिकाणी आकड्यांखाली पेनाने रेघा करुन ठेवल्या होत्या. 'चला, बऱ्याच दिवसात खरोखर आजारी पडून आजारपणाची रजा घेतली नव्हती! बघू आता, हा आजार २-३ रजा पदरात पाडतो का ते!' म्हणून मी घरी आले. आज संध्याकाळी बाहेर जेवायला जायचा बेत होता. 'अहाहा! कित्येक दिवसांनी व्हेज हॉट पॅन खायला मिळणार आज!जमलं तर तंदूरी आलू पण खाऊ.' आमची स्वारी मनात मांडे खात होती. डॉक्टरीणबाईंना भेट देऊन नंतर बाहेर खायला जायचे ठरले.
(अनुराधा कुलकर्णी )