या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Saturday 12 August 2023

हिंजवडी चावडी: लॉकडाऊन नॉकडाऊन

 (डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.हा लेख 24 मार्च 2020 पासून 2 वर्षं एका अनोख्या रोगाच्या जागतिक साथीमुळे सर्वत्र शहरं, दुकानं ऑफिसेस बंद करून लोकांना काही महिने घरून काम करावे लागले होते,कडक निर्बंध आणि मास्क नियम पाळावे लागले होते त्या काळाच्या संदर्भातला आहे.)

बऱ्याच दिवसांनी मांजर पार्किंग मधून लिफ्ट कडे निघाले होते.तितक्यात हँडस अप म्हणून कपाळावर बंदूक रोखावी तसं कोपऱ्यातून धावत उगवलेल्या सिक्युरिटी च्या माणसाने कपाळावर थर्मल गन रोखली.गेले अनेक दिवस स्वयंपाकघर ते बेडरूम इतकाच प्रवासाचा अनुभव असल्याने मांजर या गन बद्दल अगदीच विसरून गेले होते.घाबरून दोन्ही हात वर करणार तितक्यात '96.पुढे सरका' म्हणून खेकसून सिक्युरिटी वाल्याने मागच्या सुंदरीवर थर्मल बंदूक रोखली.सुंदरीने काळा मास्क, काळे हातमोजे, काळा कुर्ता, पोपटी लेगिंग, काळा चष्मा घातला होता.पार्किंग मध्ये अंधार असल्याने ही बहुतेक कोणावर किंवा भिंतीवर आपटून दात पाडून घेईल का या कल्पनेने मांजर मनात खुदखुदले.

लिफ्ट मध्ये वेगळीच कथा होती.भिंतीवर एका थर्माकोल मध्ये इयर बड खोचून ठेवले होते.लिफ्ट मध्ये सर्वत्र 'इयर बड ने मजल्याचे बटन दाबून इयर बड खाली कचऱ्यात टाका,एकमेकांपासून लांब राहा, खोकू नका, शिंकू नका,वाकू नका, टेकू नका,मिठी मारू नका, हात मिळवू नका, बाहेर पडताना रांगेत जा' अश्या कागदी पाट्या होत्या.एरवी सुंदर नितळ आरश्यात मनसोक्त बघायची लिफ्ट हीच एक संधी असे.हा आरसा खूप प्रेमळ आणि लकी पण आहे.यात वजन कमी दिसतं. पण आज सगळे आरसे पाट्या लावून झाकले होते.लोकांचा ऑफिसात जायचा अर्धा मूड इथेच पंक्चर झाला.

ऑफिसात आल्यावर परत एकदा थर्मल बंदूक प्रयोग झाला आणि सॅनिटायझर चे तीर्थ पायाने बटन दाबून हातावर ओतले आणि मांजर जागेवर एकदाचे बसले.मागच्याच आठवड्यात त्याला मेल ने बोलावणे आले होते. या मेल मध्ये सुद्धा एखाद्या शुद्ध मराठी खानावळीत लावाव्या तश्या भरपूर पाट्या होत्या. 'कृपया स्वतःचे डबे व नाश्ता आणावा'. 'कृपया स्वतःचे पाणी आणावे.' 'कृपया ऑफिसात आल्यावर कोणाच्याही जागेवर जाऊन हाय हॅलो करत बसू नये.' 'आम्ही चहा कॉफी मशीन चालू ठेवतोय पण कृपया सारखे चहा कॉफी मशीन कडे जाऊ नये.' 'कृपया डबे खायला एका वेळी फक्त 10 जण कॅफेत यावे.' 'एसी चालू करणार नाही.कृपया अपेक्षा ठेवू नये.' 'अपेक्षा' नावाच्या त्या बाईला 24 मार्च पासून कोणीच कुठेच ठेवत नव्हते.वैतागली असेल बिचारी.मांजराचा फालतू जोक मारण्याचा स्वभाव ऑफिसात आल्यावर परत उफाळून आला.

मीटिंग चालू झाली. मांजराला घरून काम करणाऱ्या सर्वांनी 'ऑफिस कसे आहे, खाणे मिळते का, बाहेरची चहा टपरी चालू आहे का, सिगरेटवाला अण्णा उघडा आहे का' इत्यादी महत्वाचे प्रश्न विचारून झाल्यावर कामाची बोलणी चालू झाली.निल्या च्या 2 वाक्यानंतर कुकर ची शिट्टी ऐकू आली.4 वाक्यानंतर मिक्सर चा आवाज चालू झाला.
'काय बेत आज?'
'बटाट्याची पिवळी भाजी, खीर, पोळी आणि मस्त मिरची ठेचा.या सगळे जेवायला.'
मांजर मनात फार कळवळले.आज त्याच्या डब्यात दोडके होते.(पाणीदार भाजी.गुड फॉर वेट लॉस वगैरे वगैरे..)
पिंकी कॉल मध्ये बोलत असताना मागे तिच्या मुलाचा शाळेचा क्लास चालू होता.
मन्या व्यवस्थित बोलत होता पण त्याच्या घरचे कोणती तरी 5 मिनिटाला एक खून होणारी वेब सिरीज बघत होते. त्याचा आवाज येत होता.
अमर च्या बोलण्या मागे हॉरर सिनेमा सारखा घोंघावणारा वादळाचा आवाज येत होता.
'कुठे जाऊन बसलायस रे भूत च्या सेटवर?'
'अरे टेकडीवर आलोय.इथे खेडेगावात घरी रेंज येत नाही इंटरनेटची.'
'पूर्ण दिवस टेकडीवर बसून काम करणार?'
'हो रे.फोल्डिंग गादी आणि डबा घेऊन आलोय गाडीतून.काय प्रॉब्लेम नाही.मस्त शांत आहे.छान काम होतं.'
आपल्या मीटिंग मध्ये मिळाला नाही तरी दिवसभरात, रात्री सर्व आवरल्यावर यांना कामाला शांत अवसर मिळेल आणि काम पूर्ण होईल हे आता मांजराला माहीत होतं.

रोज 'खूप गजबज आहे, सारखं लक्ष उडतं' म्हणून काम संध्याकाळ नंतरच छान होत होतं.पण आज आजूबाजूला कोणी नाही, आपण एकाकी बेटावर येऊन पडलोय या भावनेने मांजराचं मन लागेना.तो उठून कँटीन मध्ये गेला.

कँटीन मध्ये प्रत्येक टेबलवर एक रिकामं खोकं उभं ठेवलं होतं.दोनच जण एका टेबल पाशी बसून अंतर ठेवायला.मांजराला जुने दिवस आठवले.4 जणांच्या एका टेबल पाशी खुर्च्या ओढून बसलेले 7 जण, दुपारी खुर्च्या मिळवायला चाललेली स्पर्धा, कोण किती वेळात जेवण आवरतं याचा उभ्या उभ्या घेतलेला चोख अंदाज.ओळखीच्या लोकांकडे नजरेनेच टेबल साठी लावलेला नंबर.पंगतीत मागे उभं राहावं तसं मागे उभं राहून बसलेल्यांच्या पानातला शेवटचा घास संपला की टेबलवर घातलेली झडप.या कँटीन ने इतके कमी लोक आज पहिल्यांदाच पाहिले असतील.

समोर सेल्स चा शिऱ्या एकटाच एका टेबलवर काळीकुट्ट कॉफी पित बसला होता.कामाचा ताण जितका जास्त तितका कॉफी चा रंग काळा काळा होत जातो.'5 दिन मे गोरापन' जाहिरात करणाऱ्या क्रीम सारखे 'प्रोजेक्ट येऊ घातले->प्रोजेक्ट चालू->सुरुवातीचा अभ्यास चालू->प्रोजेक्ट जोरात चालू->प्रोजेक्ट उद्या करून पूर्ण पाहिजे' अश्या स्ट्रेसनुसार कॉफी च्या गोरापान ते काळाकुट्ट रंगाच्या स्टेज चे शेडकार्ड सर्वांच्या डोक्यात फिट होते.
मांजर शिऱ्या च्या समोर बसला.टेबलवर मध्ये ठेवलेल्या खोक्यांमुळे समोरच्याशी बुवा...कुक चा खेळ खेळत गप्पा माराव्या लागत होत्या.

'काय झालं रे?काळी कॉफी म्हणजे आग लागलीय ना कामात?'
'अजिबात म्हणजे अजिबात ऐकत नाही कस्टमर.त्याला आम्ही एक आठवडा आपल्या सॉफ्टवेअर च्या नव्या व्हर्जन ला अपग्रेड हो म्हणून त्याच्या मागे लागलोय.'
'चांगलंच आहे ना नवं व्हर्जन, मग का नाही घेत ते लोक?'
'मागच्याच वर्षी आपण त्यांना खूप चांगलं पटवून जुनं व्हर्जन विकलं.नवं महाग आहे.आता या स्थितीत खर्च कमी करायचेत.कसं घेतील?'
'वा रे वा.म्हणजे ते बिचारे शर्ट जाऊन बनियानवर आहेत आणि आपण नवं व्हर्जन घ्यायला लावून बनियान पण काढून घ्यायचा?'
'आपण एकदम फेअर प्रॅक्टिस वाले लोक.बनियान काढून नाही घ्यायचा.तो ओला आहे, फाटका आहे, त्यात पाल घुसलीय हे पटवून त्याला स्वतःच काढायला लावायचा.'
'हे म्हणजे तो बिचारा त्याचं बनियान आपल्याला देणार..'
'तो श्रीमंत घरचा आहे.त्याच्याकडे कपाटात 2 बनियान जादा चे असतात.आपले पगार व्हायचे तर त्याने बनियान म्हणजे लेटेस्ट व्हर्जन चे पैसे काढून दिलेच पाहिजेत.'
शिऱ्या कॉफी संपवून कपाळावर आठ्या पसरवत उठला.

'पगार' म्हटल्यावर मांजराला पटले.आणि तो बदामी रंगाची कॉफी पीत विचार करत बसला.आता जेवणाची वेळ जवळपास होत आली होती.आणि 'जेवणानंतर' हा कामाचा खूप महत्त्वाचा आणि एकाग्र वेळ असतो (असे मांजराला वाटते.)त्यामुळे मांजर गेटबाहेर चक्कर मारायला निघाला.

बाहेर रांगेत खूप गिफ्ट आणि किराणा दुकानं आहेत.त्यापुढे 4 ब्युटी सलोन.त्यांच्यापुढे परदेशी जंक फूड ची दुकानं.एरवी इथे कायम वर्दळ असते.पण आज सर्व सुनसान होतं.आपण मॅट्रिक्स मधल्या सारखं एका वेगळ्याच समांतर जगात आलोय, सगळं चालू आहे पण आपल्याला ते बंद दिसतंय असं काहीतरीच वाटायला लागलं.त्यामुळे मांजर जरावेळ कट्ट्यावर बसला.अजून काहीतरी चुकलं होतं. काय बरं?अरे हो.एरवी या कट्ट्यावर बसायला जागाच नसते.चार ऑनलाईन शॉपिंग साईट चे डिलिव्हरी वाले टेम्पो घेऊन येतात आणि इथे पार्सल वाटायला पार्सल पसरून कट्ट्यावर बसतात.(इथे तरी त्यांना ऐसपैस कट्टा मिळतो.अजून पुढे गेलं तर त्यांना एका रिकाम्या पाईपलाईन मध्ये बसून पार्सल वाटावी लागतात.)

शेजारी बसलेला मुलगा ओळखीचे हसला.हा तर आपला नेहमीचा पार्सल देणारा कुरियर वाला.
'काय, आज पार्सल नाहीत?'
'नाय ना.एकदम ऑफ शिजन.डिस्काउंट, मेगा सेल सगळं टाकून पण लोक शॉपिंग करत नाय.'
'करतील हो.थोडी ऑफिस भरू द्या.गणपती दिवाळी जवळ येऊ द्या.'
मांजराला खूप वाईट वाटत होतं.महायुद्ध संपल्यावर आपण ओस पडलेल्या गावातून फिरत असल्यागत.हे असं नाही चालणार.आपण,आपल्या सारख्यानी कंझ्यूमरीझम चालू ठेवायचा.इकॉनॉमी परत वर यायलाच पाहिजे.नाहीतर या आजाराने आपल्या अंगात न येता पण आपल्याला हरवलं असं होईल.

काहीतरी ठरवून मांजर झपाझप चालत गेटमधून परत ऑफिसमध्ये आला.त्याने दोन तीन शॉपिंग साईट उघडून सर्वात उपयोगी वस्तूंची डील बघून त्या खरेदी करून टाकल्या.एक मोठी व्हॉटसप पोस्ट लिहायला घेतली.त्यात बरेच मोठे शब्द टाकून शेवटी एका प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ माणसाचं नाव ठोकून दिलं आणि पोस्ट 3 मोठ्या ग्रुपवर पसरवून दिली.एखादी परिणामकारक गोष्ट कधीही तोंडाने बोलू नये.तो मूळ मुद्दा आणि ती गोष्ट जिंक्स होते.ती व्हॉटसप किंवा फेसबुकवर बोलावी.

इकॉनॉमी नॉर्मलवर येईल तेव्हा येईल, मांजर मात्र त्याच्या नेहमीच्या चक्रम आणि उद्योगी स्वभावाच्या नॉर्मलवर आलं होतं!!

डी आय वाय आणि आम्ही

आता काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला फक्त मेल मधलं एफ वाय आय तेवढं माहीत होतं.पण घरातल्या छोट्या प्राण्यांच्या कृपेने बरेच 'डू ईट युवरसेल्फ' व्हिडीओ बघायला मिळाले.छान दिसणारा लांब टीशर्ट फाडून त्याचा मिनीस्कर्ट आणि क्रॉप टॉप करणे,सुंदर लांब अंगभर स्कर्ट ला मध्ये शिवून त्याचा जम्पसूट करणे, गाडीत मिडी अडकून अर्धा फाटला तर त्याचा सरोन्ग करणे ,चांगल्या चांगल्या वस्तुंना छिद्र पाडून आत वेगळ्या रंगाची बुटाची लेस ओवून पार्टीत घालण्यायोग्य शॉर्ट ड्रेस बनवणे,बाटल्या उभ्या कापून त्यात टिश्यू रोल ठेवणे वगैरे प्रकार बघायला चांगले होते.आपल्या खिश्याला काही चाट बसत नव्हता.कधीकधी 'ए भवाने, फॅशन स्ट्रीट ला 150 रुपयात मिळतोय ना तो चिमुकला स्कर्ट, त्यासाठी गॅप चा 20 डॉलर चा टीशर्ट फाडायची अवदसा कुठून आठवली?' वगैरे सात्विक संताप उद्गार सोडले तर बाकी मस्त करमणूक होती.

आता सर्वांची दीर्घकाळ घरात राहण्याची फेज चालू झाली आणि हे डी आय वाय अरबांच्या उंटासारखं घरात घुसलं. जुन्या कॉटन पॅन्ट फाडून त्याचे मास्क बनवणे, त्यासाठी जुन्या लेगिंग/बर्म्युडा मधले इलास्टिक कापून किंवा स्वतःचे नवेकोरे केसांचे रबर्स अर्धे कापून त्यांना जखमी करणे असे प्रकार चालू झाले.शांतपणे बघणे आणि अधून मधून 'स्वच्छ धुतलेले वापरा रे कपडे' असे रोबो सारखे सतत बडबडत राहणे या शिवाय पर्यायच नव्हता.

यात 'आम्ही बनवलेले नवे पदार्थ बघा'आणि 'नवे पदार्थ काय बनवताय, इथे माणसं मरतायत' असे 2 विरुद्ध विचार प्रवाह असलेल्या 2 कुटुंब व्हॉटसप गृपात समतोल साधायला 'नवे पदार्थ पूर्ण एक जेवण' असा एक जुगाड पर्याय काढून पदार्थ डी आय वाय वाल्या सापळ्यात आम्ही अडकलोच. सामोसे चांगले झाले,कचोऱ्या करताना जीरा पावडर ऐवजी अगदी सारखं पाकीट असलेली ज्येष्ठमध पावडर ढकलली गेली तरी सारणाला कळू न देता अलगद हे घोळ निस्तारले आणि कोणालाही पत्ता लागू दिला नाही.तो डालगोन्या कॉफीचा मैलाचा दगड पण यशस्वी पणे पार पाडला.फेसबुकवर डालगोना कॉफी च्या इतक्या पोस्ट होत्या की 'डालगोना नाही केलीस, दूर हो जा मेरी फ्रेंड्स लिस्ट से' असं सगळे फेसबुकजिवलग घेराव घालून भाले टोचून म्हणतायत अशी स्वप्नं पडायला लागल्यावर डालगोना प्रयोग अटळच होता.

हे सगळे प्रयोग करून आत्मविश्वास वाढल्यावर एका शनिवारी 'पाणीपुरीची पुरी घरी' वाल्या घातक उपक्रमाची सांगता झाली.तरी रेसीपीत त्या समंजस बाईने स्पष्ट लिहिलं होतं की 'पुऱ्या सहज आणि भरोसेमंद जवळपास विकत मिळत असतील तर तो सोपा उपाय आहे.' हा इशारा अगदी खास माझ्यासाठीचा ईश्वरी संकेत वाटत होता.पण एकदा आली लहर की कहर केलाच पाहिजे.

अगदी काटेकोर मोजून 1 कप रवा 2 चमचे मैदा घेतला.काटेकोर मोजून एक अष्टमांश बेकिंग सोडा घेतला.काटेकोर मोजून चमचा चमचा पाणी घालत पाणीपुरी कणकेचा वृक्ष फुलवला.घरातला दुसरा प्राणी 'मी एकटा राहायचो तेव्हा मी आणि माझ्या रूममेट ने पाणीपुरी पुऱ्या करून पाणीपुरी बनवून खाल्ली होती' याची दवंडी आजन्म पिटत आल्याने त्याला पकडून जवळ उभा केला.नैतिक आधार म्हणून.आणि पुऱ्या तळायला घेतल्या.त्या काही फुगेचनात.अगदी तेलात टाकल्यावर अर्धचंद्र झाला म्हणून खुश होऊन पुरी उलटावी तर मागे अर्धचंद्राकृती विहीर निर्माण झालेली दिसायची. पुऱ्या चांगल्या चवीच्या, खुटखुटीत वगैरे झाल्या पण एकही शहाणी शेवटपर्यंत फुगली नाही.

"नक्की रेसिपी बरोबर वाचली ना तू? 2 चमचे रवा आणि 1 कप मैदा असेल."
"मी पाच वेळा वाचलीय."
"नक्की रवाच घातलाय ना?"
"आणि काय घालणार? रव्या सारखं दिसणारं आणि काय असतं जगात?"
"भगर बिगर नाही घातलीस ना?"
"ओह फिश!!(हे मला आवडतं म्हणायला. आता आताच शिकतेय.) अरे परमेश्वरा!!"

म्हणजे ही चूक दुसऱ्या प्राण्याचीच.आमच्या घरात नेहमी त्याचीच चूक असते.शेजारच्या बाईला याने तांदूळ दिले.मी अंघोळीला गेले होते तेव्हा.तांदळाच्या डब्यात अगदी थोडी राहिलेली भगर होती.(तांदळाच्या डब्यात का, असं कसं, पिशवीवर चिठ्ठी का नाही वगैरे प्रश्न विचारल्यास दात पाडीन.आमच्यात असंच असतं.) ती पिशवी त्याने काढून ओट्यावर रव्याच्या पिशवी शेजारी ठेवली.म्हणजे अर्धी भगर, अर्धा रवा आणि 2 चमचे मैदा असं सारण बनलं होतं.

"आपण ना याचं वेगळं काही करूया.म्हणजे नुसती पोळी लाटली आणि भाजली तर?"
"करता येईल.खाणार कोण?"
"पुरी मालपोआ?करंजी?मोमोज?"
"हे बघ, मुलं पावभाजीत थोडा लाल भोपळा आवडीने खातात असली तरी भगर रव्याचे मोमो खाण्याइतकी येडी नाही झाली अजून."
"मग काय करणार?"
"पाणीपुरी साठी उकडलेले मूग आलं मिरची लसूण वाटून घालून ते सारण भरून मसाला करंज्या."
तो नाही का, एक संन्यासी होता, त्याने कफनी उंदीर कुरतडतो म्हणून मांजर आणली, मग मांजरीला दुधाला गाय आणली.आणि गायीला सांभाळायला बायको आणली.तसं हे सुधार प्रकरण वाढतच चाललं होतं.शेवटी चार तिखट करंज्या, एक तिखट मोदक,1 कचोरी, अनेक कडक शेवपुरी पुऱ्या, त्यावर बटाटा चटणी मूग शेव घालून एस पी डी पी अश्या प्रकारे पाणीपुरीचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले.'जेव्हा आयुष्य तुम्हाला न फुगणाऱ्या पाणीपुरी पुऱ्या देतं तेव्हा पापडी चाट किंवा शेव बटाटा दही पुरी करा' असं साध्वी अनुमी यांनी म्हणून ठेवलंच आहे.

घरात थोडा खराब झालेला गूळ होता.'खराब झालेला गूळ' असलेली मला एकाच रेसिपी माहीत आहे: दारू.मग जरा गुळापासून दारू वर गुगल करून झालं.
"तुला साधी पुरणपोळी मोठी बनवता येत नाही.दारू कशी बनवणार?"
"सोपी असते.लोक मिथाईल स्पिरिट पिऊन मरतात. आपण त्यांना ऑरगॅनिक गुळाची, आयर्न आणि पचनशक्ती वाढवणारी दारू बनवून ऑनलाइन विकू."

यावर दुसऱ्या प्राण्याने अत्यंत तुच्छतेने मान उडवून माझा आत्मविश्वास डळमळीत केला.त्यामुळे या गुळाचं झाडांना घालायला जीवामृत बनवायचं ठरलं.'देशी कपिला गाईचं शेण व मूत्र असल्यास उत्तम.' हे वाचून परत एकदा अडखळायला झालं.आमच्या घराजवळच्या गोठ्यातला माणूस अजिबात अवेअरनेस वाला नाही.त्याला हे देशी कपिला वगैरे सांगितलं तर म्हशीचं नाव कपिला ठेवून तिचं शेण खपवेल. पण जीवामृत करायचंच नक्की.पुढच्या आठवड्यात.तो खराब झालेला गूळ काय एक आठवडा थांबावं लागलं म्हणून आत्महत्या करणार नाहीये.

डी आय वाय मध्ये पुढची साथ आमच्या घरात आली ती म्हणजे केस स्वतः कापायची.युट्युबवर त्याचे पण खूप व्हिडीओ होते.एक शेंडी कपाळावर बांधून पुढे घेऊन एक रबर लावून कापून टाकायची किंवा डोक्याचे चार भाग करून चार रबर लावून कापून टाकायचे(डोके नाही, केस) किंवा बोकडाच्या दाढीप्रमाणे दोन्हीकडून बटा घेऊन हनुवटीवर त्यांना एक रबर बांधून कापून टाकणे वगैरे बरेच प्रकार होते.जिचे केस सरळ लांब आणि कापायला सर्वात सोपे ती घाबरून इकडे तिकडे पळणार आणि ज्या मेम्बरांचे केस कापायला छोट्या लेयर म्हणून कठीण ते 'तू काप बिनधास्त,बिघडले तरी शाळा चालू होईपर्यंत वाढतील' म्हणून डोकं ताब्यात देऊन बसलेले.'केस कापले नै तर आकाश कोसळणार नाहीये' हे मात्र मी धरून कोणीही मानायला तयार नव्हतं.मग शेंड्या बांधून केस कापणे, मग कात्री घेऊन उभे उभे कातरुन लेयर्स करणे, मग एकीकडे लेयर्स लहान झाले म्हणून दुसरीकडे कातरणे असा बाल वॉशिंग्टन पणा चौफेर चालू झाला.सुदैवाने केस कातरलेली सगळी मेम्बरं बरी दिसत आहेत.घरातील सर्वात मोठे प्राणी कात्री पहिली तरी दचकत आहेत.पण त्यांनीही ही डी आय वाय ची गंगा पाहून व्हिडिओ बघून स्वतःचे केस रंगवून घ्यायला परवानगी दिली आहे.'इकडचे लेयर्स मोठे' च्या नादात केस जरा लहान कापल्याने मी पुढचा किमान दीड महिना व्हिडीओ कॉन्फरन्स करणार नाहीये.पण बाकी आमच्या डी आय वाय आयुष्यात सर्व मजेत चालू आहे.जीवामृत केलं की फोटो टाकतेच.घाबरू नका.फोटोला शेणाचा वास येणार नाही.

आम्ही आणि उपकरणे

 "मला सांग, जर एखादी 67 रुपयांची वस्तू 2 वर्षं वापरून कोणाच्या हातून तुटली तर किती इश्यू करायचा?"

समोरचा प्राणी एकदम कनवाळू मोड मध्ये होता.
"अजिबात ओरडू नये.मुलं निरागस असतात.कधीकधी होतात खराब त्यांच्या हातून वस्तू.मोटर स्किल्स तयार होत असतात."
अचानक याला वेगळाच संशय आला आणि त्याच्या भुवया वर गेल्या.
"आता काय तोडलंस तू? तुला गप्प बसवतच नाही का?"

"अरे मी मुद्दाम नाही केलं.कोबीचं थालीपीठ लावायचंय ना, आपला दोरी ओढायचा चॉपर कोबी बारीक करायला वापरत होते.जरा जास्त भरला गेला आणि दोरी किंचित जोरात ओढली गेली."
"किंचित? मी बघत होतो मीटिंग चालू असताना.नुसती दात ओठ खाऊन खसाखसा ओढत होतीस दोरी.मुळात कोबी ही काय दोरी चॉपर ने कापायची गोष्ट आहे?"
"मला मानसिक स्ट्रेस आहे आज गोडा मसाला करायचाय म्हणून.म्हणून पटापट आवरत होते.67 रुपयांचा चॉपर मोडला म्हणून इतके शालजोडीतले नको."
"काल पण गोडा मसाला बनवायचा म्हणून नुसती खिचडी केली.आज गोडा मसाला बनवायचा म्हणून नुसती थालिपीठं. गोड्या मसाल्याचा स्ट्रेस अजून किती दिवस कॅश करणार बाई तुम्ही?"

हा प्राणी स्वयंपाकघरात बसून ऑफिसचं काम करतो.त्यामुळे त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असतं.'पुरूषजातीवर अन्याय' वगैरे नाही.5जी ची सर्वात चांगली रेंज डायनिंग टेबलावर येते.राऊटर लावणाऱ्या ने हे एक बरं केलं.आता मला कुकर, गॅस वरचं दूध बंद करायला लक्षात ठेवावं लागतच नाही.

थालीपीठ कमी पडल्याने धिरडं करण्याचा बेत ठरला.आमचे साहेब धिरडी माझ्या पेक्षा चांगली मऊ लुसलुशीत करतात.त्यामुळे ते काम आऊटसोर्स करून मोबाईल बघायला घेतला.तेवढ्यात स्वयंपाकघरातून मोठा आवाज आला.एकदा मोबाईल मध्ये डोकं खुपसलं की समोर 3 रिष्टर स्केल चा भूकंप झाला तरी काढायचं नाही असा माझा नेम आहे.त्यामुळे शांतपणे मोबाईल चं काम आवरून स्वयंपाक घरात गेले.

"हे काय?तव्याचं हँडल कसं निघालं?"
"मी जरा संजीव कपूर सारखं फ्राईंग पॅन मध्ये धिरडं उंच उडवत होतो.तर हँडल चा स्क्रू निघून तवाच हवेत उंच उडाला."
"एकमेव जरा बरा नॉनस्टिक तवा होता तो.त्याला पण जायबंदी करून ठेवला."
"इथे इतका मोठा नवरा अपघातातून वाचला त्याचं काही नाही.माझ्या डोक्यावर पडला असता गरम तवा."
"गॅस वर पडून ग्लास टॉप पण फुटू शकला असता.अरे हो,लागलं नाही ना तुला?"

अश्या अजून काही छोट्या मोठ्या घटना घडून जेवण सुखरूप पार पडलं.आता आम्ही घरच्या चक्कीवर गोडा मसाला करणार.
ही चक्की आणल्या पासून मिक्स पीठाचा, दळलेल्या कॉफीचा,ओट च्या भाजणीचा, आयत्या लाडू मिक्स चा बिझनेस करण्याचं स्वप्न आम्ही खूप वेळा बघतो.घरकाआटा. कॉम आणि गिरणीवाला.कॉम,चक्कीवाला.कॉम,दळण. कॉम अशी डोमेन नेम पण बघून ठेवलीत.या सगळ्या स्वप्नांची फायनल स्टेज 'माहेर किंवा लोकप्रभा मासिकात वीणा पाटील मॅडम सारखा सूट बूट वाला टेबल खुर्चीत बसून फोटो' ही असते.(मेलं आम्ही स्वप्नात पण फोर्ब्स मॅगझीन मध्ये किंवा इकॉनॉमिक्स टाईम्स जात नाही.)जरबेरा लावून मासिकात सूटबूटवाला फोटो, पाणी वाचवायचं गॅजेट बनवून मा.सू. वा.फो., घरच्या घरी हेल्मेट होल्डर बनवून मा.सू. वा.फो. अशी या स्वप्नाची अनेक प्रती रूपं आहेत.प्रत्यक्षात आम्ही 'सोफ्यावर बसून लोळणे' सोडून बाकी कोणतंही व्हेंचर एकमताने करत नाही.

मी मसाला साहित्य एक एक करून भाजायला घेतलं.सगळं भाजून झाल्यावर चक्कीपाशी गेले आणि हळद कुटायचं वेगळं एक्सटेन्शन चक्कीला जोडलं.आणि एकदम कॉम्प्युटर हँग व्हावा तशी हँग झाले.
"अरे जरा मला बघून सांग ना.मसाला कुठून आता टाकायचा आणि कुटलेला मसाला कुठून बाहेर येणार ते?"
"गोडा मसाला यात करू नकोस.माझं ऐक. मिक्सरमध्ये वाट."
"माझे श्रम कमी झालेले नकोच असतात तुला.मला सांग बाकी सगळं मी करते. तू बस ते दळण ऐकत."

'ते दळण' हा वेगळाच किस्सा आहे.साहेब आवडलेलं गाणं रिपीट मध्ये 12 वेळा ऐकतात.लग्न नवं असताना जगजीत ची 'तेरे आने की जब खबर बहकी, तेरी खुशबू से सारा घर महके' ही गझल मी सतत 20 वेळा ऐकली.अजूनही ती गझल कोणी लावली की मी केस उपटत किंचाळत वस्तू फेकायला चालू करते असा आजूबाजूच्यांचा वृत्तांत आहे.त्यात त्या इन्स्ट्रुमेंटल सीडी.फक्त संगीत हा फक्त लिफ्ट मध्ये किंवा 5 स्टार हॉटेल मध्ये खाता खाता मंद आवाजात ऐकायचा प्रकार आहे असं माझं परखड मत आहे.चांगले शब्द हवेत.नाहीतर व्हाईल(1) मध्ये अखंड अडकलेल्या प्रोग्राम सारखं मन अखंड ते संगीत संपायची वाट पाहत बसतं. लिफ्ट मध्ये अडकून राहिल्या सारखं.

साहेबांना ऐकू न गेल्याने तरातरा जाऊन इन्स्ट्रुमेंटल बंद केलं.
"माझं इन्स्ट्रुमेंटल बंद का केलं?"
"आवाज मोठा होता.मला त्रास होतो."
"मग आवाज लहान करायचा.बंद का केलं?"
"आवाज वालं बटन बिघडलंय.मागच्या वेळी कमी केला होता तेव्हा सोसायटीत ऐकू जाईल इतका मोठा झाला होता. मला येत नाही याचा आवाज कमी करता."
"मग इलेक्ट्रॉनिक अँड रेडिओ इंजिनिअर म्हणवून घेऊ नये स्वतःला."
"तुला येतं का, टूल कटिंग मशीन किंवा लेथ मशीन स्वतः बनवता? मग बोलू नये."

अश्या माफक प्रेमळ संवादानंतर जगजीत सिंग ऐकणारा प्राणी चक्की बघायला आला.चक्की नवी असताना उत्साहाने आम्ही यात मिरपूड, दालचिनी पूड, कॉफी पूड, काळे राळे गोरे राळे मिक्स चे भाकरी पीठ असे बरेच प्रयोग केले.सगळ्या प्रयोगाचा पुढचा भाग 'दालचिनी फ्लेवर कणिक' 'कॉफी फ्लेवर भाकरी पीठ' 'मिरपूड फ्लेवर बेसन' असा आहे हे अनुभवल्यावर आम्ही शहाण्या बाळासारखे त्यात ज्वारी गहू बेसन पीठच बनवायला लागलो.दारूचं व्यसन असलेल्या माणसाने कधीतरी रीलॅप्स व्हावं तसं आज कातरवेळी गोडा मसाला चक्कीत बनवण्याची लहर आली होती.

आमची चक्की चालू केल्यावर त्यात धान्य पडेपर्यंत 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा' या प्रसिद्ध गाण्याची धून अव्याहत वाजवत राहते.आमचीच चक्की ती.विचार न करता अंदाधुंद कामं करायचे धडे नाही देणार तर काय.

चक्कीत मसाल्याचे भाजलेले पदार्थ टाकल्यावर 1 मिनिट चालून ती बंद पडली आणि परत 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा' चा जप करायला लागली.मग तिला गप्प करून उघडलं.तर ब्लेड वर काही बारीक झालेले मसाले काही आख्खे मसाले तसेच.परत शांतपणे ग्लोव्हज घालून ब्लेड चे बारीक न झालेले मसाले काढून चक्की चालू करून फीड केले.पण आज फारच हट्टीपणा करायला लागली.एखाद्या हट्टी बाळाला प्रेमाने छोटे छोटे घास भरवत जेवू घालावं तसं प्रेमाने तिला मूठ मूठ आख्खा मसाला हळूहळू खाऊ घातला.पण मूठ जरा मोठी केली की ती शहाणी परत 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा' म्हणून सत्याग्रह चालू करायची.

"मॅन्युअल आण. वाचूया."
"हे घे."
"यात कुठे लिहिलांय की गोडा मसाला होईल म्हणून?"
"त्यात 'हळद, सुकी मिरची वगैरे' लिहिलंय. ते वगैरे म्हणजे गोडा मसाला."
"महान आहेस बाई तू.इतक्या वेळात मिक्सरमध्ये चार वेळा करून झाला असता."
"म्हणजे तेच.बायकोने घाम गाळत मिक्सर पाशी उभं राहावं."
"मग आता आपण दोघेही घाम गाळत मसाला करणार, त्यानंतर ब्लेड साफ करणार, त्यानंतर जमीन साफ करणार."

भाजलेलं आणि ब्लेडने बारीक तेलकट झालेलं खोबरं आणि मसाल्यातली ती कडक टगी वेलची यांनी घात केला होता.त्या वेलची चे 3 दाणे एकत्र आले की चक्की लगेच बंद पडून "सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा" म्हणून नाचायला लागायची.शिवाय आता पुढच्या 2 बॅच 'गोडा मसाला फ्लेवर भाकरी' खावी लागणार होती.हे सगळं नाटक सकाळी 9 चे कॉल चालू झाल्यावर आवरता आलं नसतं त्यामुळे तातडीचं व्हॅक्युम क्लिनिंग पण लागणार होतं.

नेहमीचा व्हॅक्युम क्लिनर चालू केल्यावर मोठा घुरर आवाज करून बंद पडला.
"तू वापरला होतास ना शेवटी?"
"मी वापरला.त्याची पिशवी भरल्याने तो ओव्हरलोड झाला.आता पिशवी रिकामी करून पण चालत नाही.तू गेली 3 वर्षं पिशवी रिकामी का नाही केली?"
इथे पडद्यावर लाटा येऊन माझं मन फ्लॅशबॅक मध्ये.
3 वर्षांपूर्वी मला ट्रॉली मागे व्हॅक्युम क्लिनिंग करताना आत पाल ओढल्याचा भास झाला.त्यामुळे तो बरेच दिवस त्याच्या नळीत बोळा कोंबून ठेवला होता पाल मरावी म्हणून.आणि पिशवी रिकामी केलीच नाही.
"तुला पाल दिसली का रे पिशवी रिकामी करताना?"
"मी दुर्बीण लाऊन कचऱ्याची पिशवी बघत नाही."

आता ढोलू ची मदत लागणारच होती.ढोलू म्हणजे बाबांचा 40 वर्षं जुना पहिला अवजड व्हॅक्युम क्लिनर देऊन घेतलेला वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लिनर.हा मोठा आवाज करून आणि 15 मिनिटात 4 बाय 4 फूट ची जागा एकदम स्वच्छ करतो.आपण पाणी टाकायचं.मग थोडी जमीन खराट्याने कोपऱ्यात स्वच्छ घासायची. आणि मग हा पाणी ओढून जमीन स्वच्छ करतो.तो गोल गोल फिरून नाचणारा आणि स्वच्छ करणारा रुम्बा घेतलेला नाही.आमच्या कडचा कांद्याची सालं, तुटलेले क्रेयॉन, चिंध्या,कागद असा बहुगुणी कचरा बघून तो फेफरे येऊन पडेल.ढोलू ला घाई केलेली चालत नाही.शांतपणे काम घ्यावं लागतं.

ढोलू चालू केला आणि तिथे सोसायटी ग्रुपवर वेगळेच ताशे चालू झाले.'लॉकडाऊन मे कुलकर्णी के घर कार्पेन्तर को परमिशन कैसे दिया' म्हणून पलीकडचा प्रेम भक्त भांडायला लागला.या शहाण्याचं नाव 'प्रेम भगत' आहे आणि हा कचाकचा दिवसभर सोसायटी ग्रुपवर वाद घालत असतो.

"बघ आता तो फडया निवडुंग चालू झाला ग्रुपवर त्याला समजवावं लागेल."
"त्याला ढोलू चा फोटो काढून पाठव.म्हणावं याचा आवाज आहे."
"पण आता ढोलू ला काढायची गरज होती का?टिचभर काम नि गावभर आवाज."(अश्या यमकातल्या म्हणी ही यांच्या मातोश्रींची लिगसी.)
"ढोलू बद्दल वाकडं बोललेलं आवडणार नाही.सांगून ठेवते.बाबांची आठवण आहे ती."
"बाबांची आठवण 500 रुपयात विकून तू ढोलू घेतलास.इतकंच असतं तर तो 40 वर्षं जुना व्हॅक्युम क्लिनर प्रेमाने वापरला असतास."
"माझा चांगला चालणारा व्हॅक्युम क्लिनर तू ओव्हरलोड केलास.त्यामुळे ढोलू ला त्रास द्यावा लागला."
"इतक्यात 4 वेळा झाडू पोछा करून झाला असता."
"4 वेळा कोणी?मीच ना?मग मला ठरवुदे झाडू पोछा करायचा की ढोलू ला वापरायचा ते.माय हाऊस माय टूल्स."

घरातला तिसरा छोटा प्राणी गॅलरीत आराम खुर्चीत कँडी क्रश खेळणाऱ्या चौथ्या प्राण्याकडे गेला.
"आजी, आई बाबा खूप वेळ वादावादी करतायत. घरात वेगळाच वास आहे कुकिंग सारखा.सगळीकडे पसारा आहे.तू ये ना."
"ते गेली अनेक वर्षं वादावादी करतायत.त्यापेक्षा तूच ये.आपण कँडी क्रश खेळू."

-अनुराधा कुलकर्णी

(ज्याने पाहिला तो)मेला!!

 हा मेला अनेक प्रकारे एपिक आहे.आमिर चा आपल्या भावाबरोबर चा, ट्विंकल बरोबरचा बहुधा एकमेव पिक्चर.सुरुवातीला नावं येत असताना ट्विंकल पांढरा शुभ्र स्किन फिट लो नेक फ्रंट बटन जॉर्जेट लखनवी ड्रेस घालून अंधाऱ्या रात्री एका झोक्यावर झोका घेत गाणं म्हणताना दिसते.हे बघून बऱ्याच प्रेक्षकांचा हा भुताचा चित्रपट आहे आणि त्याचे नाव (ट्विंकल)'मेली' ऐवजी चुकून 'मेला' ठेवलंय असा समज होतो.नीट निरीक्षण केल्यास ट्विंकल च्या ड्रेस ला मागे झिपर दिसेल.बॉलिवूड मधली लेडी भुतं सैल पांढरे कुर्ते किंवा गाऊन घालतात.झिपर असलेले डिझायनर टाईट्ट कपडे नव्हे.यावरून हा साधाच नॉन भूतपट आहे हे समजावे.

पुढच्या सीन मध्ये ट्विंकल कोणत्या तरी देवीच्या उत्सवात असते.आणि तिचा लष्करातला भाऊ येतो.(हा आहे दिल चाहता है मध्ये आमिर खान ला ठोसा मारून त्याचा डोळा जांभळा करणारा अयुब खान.भविष्यजन्मपिक्चर च्या पापाची आधीच शिक्षा म्हणून इथे त्याला आमिर खान च्या एन्ट्री पूर्वीच मारलंय.) त्यानंतर अयुब खान सैन्याच्या ड्रेस मध्येच गावात घोषणा करतो की त्याने रूपाचा(ही ट्विंकल) विवाह त्याच्या पलीकडच्या गावच्या मित्राबरोबर ठरवलाय.हे ऐकून ट्विंकल प्रचंड चिडते.या सीन मध्ये आपल्याला दोन वेण्या आणि बंद गळा ड्रेस वाली शाळेच्या युनिफॉर्म सारखी घडी करून 2 पिना लावलेली नवनीत निशान आणि चांदोबातल्या खात्या-पित्या राजकन्येच्या चित्रासारखे सारखे लाल कपडे, पिवळे धमक दागिने(बहुधा कोणत्यातरी व्हॉटसप टिप्स वाचून सोनं हळदीत उकळलं असेल स्वच्छ करायला) आणि केशभूषण घातलेली अर्चना पुरणसिंग दिसते.या दोघींनी पण अजून लग्न केलेलं नसतं.त्यामुळे ट्विंकल ला 'हे काय मलाच लग्न का करायला लावतात' म्हणून सात्विक संताप येतो.तितक्यात एक लहान मुलगा रूपा माझ्याशी लग्न करेल असं सांगून मोठ्याने रडतो.अयुब खान तिला समजावतो की मुलगा बघून तरी घे.(पूर्वी ना, एसटीत विक्रेते यायचे.कंपनीचा प्रचार आपला फायदा.घेतलं पाहिजे असा आग्रह नाही.वस्तू बघा.बघायला पैसे पडणार नाहीत. असं काही काही म्हणायचे आणि लोकांना स्क्रू ड्रायव्हर चा सेट, 5 किलो वजन करणारा स्प्रिंग चा वजन काटा असं काहीकाही विकायचे.तसं बरं का.)

आता गावात एक मंत्री येतो.त्याच्या स्वागतासाठी या गावकऱ्यानी जितके पोशाख वापरून मेळा(ला) ठेवलेला असतो तितके ड्रेस आपल्या इथे 26 जानेवारी परेड मध्ये सगळी राज्य मिळून वापरतात.या दृश्यात इतके रंग आहेत की डोळ्याच्या दवाखान्यात रंगांध असण्याची टेस्ट करायला हे 3 मिनिटांचं गाणं दाखवावं.अयुब खान चा काळा ड्रेस नारिंगी विटकरी स्कार्फ,डार्क गुलाबी धोतर, ट्विंकल वर लाईन मारणाऱ्या लहान मुलाचा पिवळा धमक कुर्ता, कथकली ड्रेस मधली 2 माणसं, पंजाबी माणसं,फेटा भगवा झेंडा वाली माणसं, नटरंग मधल्या अतुल कुलकर्णी सारखा गेटप वाला प्रसिद्ध डान्सर,लिंबू कलर,गुलाबी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम कलर,निळा कलर मधल्या बायका,हिरवी भडक नऊवारी वाल्या बायका, क्रीम कलर शर्ट ग्रे पॅन्ट मधले 2 जण,टोमॅटो लाल घागरा वाली ट्विंकल.(ट्विंकल च्या ब्लाऊज ची फॅशन आय ड्रीम ऑफ जिनी मधल्या जिनीच्या लाल श्रग आणि गुलाबी ब्लाऊज सारखी आहे.शिवाय सध्याची कोल्ड शोल्डर ची फॅशन पण केलीय.) अर्चना पुरणसिंग ला बजेट कमी असल्याने तिचे कॉलेज च्या फेस्टिव्हल मध्ये शिवलेले ब्लाउज वापरायला सांगितले आहेत.नवनीत निशान ला पण राजा हिंदुस्तानी मध्ये वापरलेले कपडेच घेऊन ये असं सांगीतलंय.इतके विविध कपडे घेण्यात बजेट बरंच गेल्याने मंत्री महोदयांसमोर टेबल नाही.शेजारी चिमुकल्या स्टूल वर हार ठेवलाय.

या गाण्याच्या सुरुवातीला अयुब खान मूकबधिर समाचार मध्ये करतात तसं जायंट व्हील कडे बोट दाखवून, आणि नाकातला शेंबूड काढल्याची ऍक्शन करून त्या लहान मुलाला काहीतरी सांगतो.मुलाला बराचवेळ काही झेपत नाही आणि तो 'काय डोक्यावर आपटलास का भिडू, नीट सांग ना'असे हावभाव करतो.जायंट व्हीलकडे बघून 'मेला दिलो का आता है, एक बार आके चला जाता है' हे कसं गेस होईल हे कोडं मला अजूनही उलगडलं नाहीये.

हे गाणं संपताना टाईट स्किन फिट काळी जीन्स आणि काळं घोंगडं आणि फेटा घालून निळे लेन्सेस लावून गुज्जरसिंग नावाचा डाकू येतो.(घोंगडं पांघरून,गळ्यात नाणेहार टाईप घट्ट दोन पदरी नेकलेस घालून गन हाताळणं, टाकीचे सापाकृती जिने चढणं, गन काढणं,फायर करणं किती कठीण जाईल ना.पण फॅशन चॉईस पुढे कम्फर्ट चे बलिदान द्यावेच लागते. त्याला त्याची फिगर सध्या गावाला उघड करायची नाहीये.)निळे लेन्स लावून याचा एक डोळा लाल झालाय.त्यामुळे त्याला लाल कपड्यातली रूपा इतक्या डान्सर्स च्या गर्दीत पण लगेच दिसते आणि आवडते.'पहिले लाईन मारणं की पाहिले कर्तव्य' या धर्म संकटात तो साधारण 15 सेकंद सापडतो आणि मग मंत्र्याला गोळी मारतो.इथे एक डाकू चालत्या जायंट व्हील मधून गोळ्या मारताना दाखवला आहे.मी गुज्जर असते तर या डाकूला हलत्या जागेवरून गोळ्या मारून वाया घालवल्याबद्दल 'बिलो एक्सपेक्टड टारगेट' असं रेटिंग देऊन पगार नक्की कमी केला असता.अयुब खान ने गुज्जरसिंग वर पिस्तुल रोखलेले असते.पण त्याला डायलॉग पूर्ण करायचा मोह न आवरल्याने मागून तितक्यात त्यालाच कोणीतरी गोळी मारतं.आता गुज्जर घोंगडं फेकून देऊन त्याला पट्ट्याने खूप मारतो.(अजून 2 चांगल्या लोकांच्या हातात बंदुका असतात पण ते बघत बसतात.)मग गुज्जर घोंगडं गावातच सोडून रूपा ला उचलून घेऊन जातो.डाकू अड्ड्यावर गुज्जर ला रूपा शी तिचा नक्की करियर प्लॅन डिस्कस करण्याचा मोह न आवरल्याने तितक्यात रूपा धबधब्यातून खाली उडी मारते.(खरं तर पिक्चर स्त्री प्रधान असल्याने नाव मेली असायला हवं होतं.कारण इथे ती मेली आहे असं आपण मानायचं आहे.)

आता आमिर खान आणि त्याचा भाऊ ट्रक चालवत चालवत एका ठिकाणी आंघोळीला थांबतात.रूपा वाहत वाहत बेशुद्ध पडलेली असते दुसऱ्या टोकाला.बेशुद्ध पडण्यापूर्वी रूपा च्या ब्लाउज च्या मधल्या भागात मण्यांचं भरतकाम असतं.पण पडल्यावर तिच्या सगळ्या ब्लाउजवर मण्यांचं भरतकाम येतं.मग ही रूपा पलीकडे चालत जाऊन आमिर खान चा शर्ट चोरून घागरा ब्लाउज ठेवून जाते.(जे अंगात पूर्ण घालेपर्यंत आमिर खान ला कळतच नाही की आपण शर्ट ऐवजी स्कर्ट आणि ब्लाउज घालतोय.)आणि नंतर रूपा ते शर्ट पॅन्ट घालून खिश्यातली नोटांची गड्डी बाहेर काढून मोजत बसते.(काय बै, अयुब खान ने अजिबात संस्कार केले नाहीत.आमचे आई बाप असते या जागी तर लहानपणी पासून मार मारून पैसे चार ठिकाणी विभागून ठेवायचे संस्कार केले असते.पैसे इतके सुरक्षित लपवून ठेवायचे की कधीकधी स्वतःला पण 3-4 वर्षं सापडणार नाहीत.)तर असे उघड्यावर पैसे मोजत बसल्याने रूपावर परत संकट येतं तितक्यात आमिर खान 6 जणांशी मारामारी करून तिला सोडवतो.

रूपा त्यांच्याच ट्रक मध्ये लपून पुढे येते.आणि सापडल्यावर तिला नौटंकी मध्ये काम करायची ऑफर देऊन हे दोघे लिफ्ट देतात.नौटंकी च्या सीन मध्ये फैजल ने घातलेला काळा जाळीदार बनियान एक महिन्याने कहो ना प्यार है मध्ये एक पल का जीना गाण्यात ह्रितिक ने उसना घेतला असण्याची मला दाट शंका आहे.

रूपा पळून जाता जाता परत गुज्जर च्या माणसाला सापडते आणि तिथून पळून आमिर फैजल च्या नौटंकी मध्ये गाणं गाते.या गाण्याचे सुरुवातीचे हॉरर पिक्चर मधल्या सारखे आलाप ऐकून बऱ्याच लोकांना रूपा खरंच मरून आत्मा रूपाने आलीय अशी शंका येईल.शिवाय तिचा पाठलाग करणारा गुज्जर एम्प्लॉयी पण बऱ्याच रामसे पटात असतो त्यामुळे शंका अजूनच गडद होईल.पण तसं नाहीये.

आमिर फैजल ने बस फुगडी खेळत वाजवलेली गिटार हा अत्यंत प्रेक्षणीय आयटम आहे.(ही गिटार पण नंतर बऱ्याच वर्षांनी दिवानी मस्तानी गाण्यात दीपिका ने रियुज केली असण्याची शंका आहे).रूपा ने ऐन वेळी तिला दरडावल्यावर गायलेलं गाणं पण आमिर फैजल ला माहीत असतं. आणि त्याला द्यायचा ठेका पिटात बसलेल्या वादकांना पण माहीत असतो.या गाण्यात रूपाला पकडायला आलेल्या तिन्ही डाकूंनी ड्रेस वर स्कार्फ घातले आहेत.त्यातल्या एकाला मारून रूपा परत पळून जाते ती थेट परमीत सेठी च्या घरी.(हा म्हणजे तो 'तू निदान बघून तरी घे मुलगा, बघायला पैसे पडत नाहीत' वाला रुपासाठी अयुब खान ने ठरवलेला मुलगा.)या सीन मधली रूपा ची डायलॉग डिलिव्हरी नाटकाच्या स्टेज वरच्या सारखी मोठ्या आणि खणखणीत आवाजात आहे.ती इतक्या मोठ्याने आणि ठासून बोलते की परमीत सेठी बहिरा असावा अशी प्रेक्षकांना शंका येते.(खूप खूप बोला...कर्णबधिरांशी वाली ती जाहिरात आठवते ना).परमीत सेठी शी पण पटत नाही.(पोरीला कुठ्ठे म्हणून ठेवायची सोय नाही.सगळीकडे भांडणं करते.)मग रूपा पळून जाऊन एका एकाकी पण वर led लायटिंग केलेल्या देवळात जाऊन देवी मां शी परत खणखणीत आवाजात ओरडून बोलते.त्यामुळे देवी वैतागून दुर्लक्ष करते. तितक्यात गुज्जर चे 3 स्कार्फ वाले डाकू तिला पकडायला परत येतात.यातल्या एकाला तर तिने भोसकलेलं पण असतं.पण स्कार्फ मात्र अजिबात इकडचा तिकडे होत नाही.इथे त्या बिचाऱ्या भोसकलेल्या डाकूवर परत पूर्ण रुपाला उचलून बऱ्याच पायऱ्या उतरायचं टास्क दिलंय.तितक्यात तिच्या हाका ऐकून आमिर फैजल परत येतात आणि स्कार्फ वाला डाकू तिला उचलून तिथेच थांबतो.इथे त्या डाकूच्या डोळ्यातले 'लवकर या की पावट्यानो..इथं आतडं तुटाय आलंय वजन उचलून' वाले याचनेचे भाव आपल्याला स्पष्ट दिसतात.बरीच फायटिंग झाल्यावर तिन्ही स्कार्फ वाले पळून जातात आणि रूपा स्वतःशी जोरजोरात स्वगत बोलते(परत एकदा 'खूप खूप बोला...कर्ण बधिरांशी..') आणि ठरवते की आपण या दोघांना प्रेमात पाडून आपला सूड पूर्ण करायला वापरायचं.

गुज्जर पाण्यातून बाहेर येताना त्याला ही अशी पळून गेल्याची बातमी कळते.(हा स्त्री प्रधान चित्रपट असल्याने पुरुष पाण्यातून बाहेर येऊन जास्त देह प्रदर्शन करतात.रोल रीव्हर्सल.)या सीन मध्ये गुज्जर ने वॉटर प्रूफ आय लायनर लावलाय.इथे तो 'असला बारुद आणि असली बारुद' दोन्ही घेऊन या असं त्याचा माणसांना सांगतो.इथे रूपा ला 'असला बारुद' का म्हटलंय मला कळलं नाही.'असला आरडाओरडा करणारा चक्रम मारकुटा बारुद' या अर्थाने म्हटलं असेल.

आमिर खान प्रेमात पडायला चालू होतो. पण फैजल खान मात्र तिला अश्या नाटकाबद्दल जाब विचारतो.(इथे रूपा परत मोठ्याने ओरडून त्याला सर्व कहाणी सांगते.)फैजल खान ला दया येऊन ते दोघे तिला डिझायनर पांढऱ्या जॉर्जेट लखनवी मध्ये गावी परत सोडतात.(पण हा वेगळा आणि सुरुवातीचा वेगळा.)तिथे परत त्रास चालू असतो.पण त्यातल्या त्यात परिस्थितीत सुधार हा की अर्चना पुरणसिंगला तिच्या नीट मापाची ब्लाउजं घेण्याइतकं बजेट मिळालेलं असतं.मग ते सगळे हिंमत ठेवायचं ठरवतात आणि रूपा अजून एका पांढऱ्या डिझायनर घागरा मध्ये आमिर खान बरोबर गाणं गाते.त्याच्या पूर्वी आरश्यात काळ्या डिझायनर घागरा मध्ये स्वतःशी ओरडून एक स्वगत म्हणायला ती विसरत नाही(खूप खूप बोला..कर्ण बधिरांशी..).

आता गुज्जर सिंग परत गावावर हल्ला करायला येतो.इथे त्याने पहिल्या वेळेला गावात येताना घातला तो सिग्नेचर कॉईन नेकलेस परत घातलेला दिसतो.लकी असेल.गुज्जर सिंग च्या गॅंग मध्ये फारच विषमता दिसते. गुज्जर बिचारा नेहमी बिना शर्ट चा फिरत असतो आणि त्याचे एम्प्लॉयीज मात्र डबल लेयर ललेदर जॅकेट आणि स्कार्फ बिर्फ घालून.

आता फायनल हल्ल्याच्या वेळी परत सुरुवातीचं गाणं आणि तसेच सर्व विविधतेत एकात्मता वाले कपडे घातलेले डान्सर्स असतात.मग गुज्जर परत रूपा ला पकडतो आणि आमिर फैजल सोडवतात.(ही शहाणी स्वतः एकटी काही डिफेन्स करू शकत नसताना नेहमी गुज्जर ला धमक्या का देत असते काय माहीत.) आणि आमिर खान चे तिच्याशी जुळते.फैजल शहाणा आणि दूरदर्शी असल्याने तो आरडाओरडा करणारी रूपा आमिर खान ला देऊन स्वतःसाठी ऐश्वर्या मिळवतो.आणि सगळे सुखाने नांदतात.

इथपर्यंत पिक्चर बघून 'अरे काय चाललंय काय..' म्हणत केस उपटणारा प्रेक्षकवर्गही 'मेला' असतो.पिक्चर चा उद्देश सुफळ संपूर्ण होतो.

हिंजवडी चावडी: ईस सुबह की रात नही

(लोकहो, यावेळी ही सिरीज थोडी जास्त तांत्रिक झाली आहे.वाचावी वाटली तर वाचा.सकारात्मक नकारात्मक सर्व प्रकारचे प्रतिसाद वेलकम आहे.तुम्ही कोणतातरी विषय काढून भांडण करून 200 प्रतिसाद केले तर मला जबरदस्त आनंद होणार आहे.पण तुम्ही इतके गोड मनमिळाऊ आणि क्युट लोक आहात की त्यापेक्षा लेख वाचणं सोडून द्याल. ☺️☺️बघुयात.पूर्ण वाचता की मध्येच सोडता ते.)

मांजर बस मध्ये शांतपणे गाणी ऐकत बसलं होतं.घरी "मला वेळ दे, आपण गप्पा मारू" वाली रोमँटिक बायको आणि ऑफिसात "मेल कशाला, एक मीटिंग करून निपटून टाकू" वाली साहेब मांजरे यामुळे ऑफिस बस हे त्याचं एकमेव विरंगुळ्याचं ठिकाण होतं.तितक्यात निल्या चा फोन आला.

निल्या हा अति उत्साही प्राणी.पण त्यामुळे फरशी स्वच्छ आरश्या सारखी पुसल्यावर पंखे पुसायला आणि जळमटं काढायला घ्यायची तसा हा ऐनवेळी काहीतरी सुधारता सुधारता दुसरे काहीतरी बिघडवून ठेवतो.

"निल्या, काय म्हणतोस?"
"अरे एक गोंधळ झालाय.आपला कामाचा टॉमकॅट सर्व्हर बंद पडलाय."
मांजराच्या डोळ्यासमोर पुढचा दिवस दिसायला लागला.
"ऑ, कसाकाय? बंद पडला? म्हणजे पूर्ण बंद पडला?काय झालं?आयटी टीम वाल्याना सांगितलं का?"
"ते काही नाही करू शकत.मी ऍडमिन पासवर्ड बदललाय."
"मग बदललेल्या ने लॉगिन कर."
"तो बदलला तर 5 ऍडमिन युजर्स चे पासवर्ड त्याच पासवर्ड ने बदलावे लागतात.लॉगिन त्या 5 पैकी एकाने होतं.आणि त्या 5 चा आधीचा पासवर्ड मला माहित नाही."
"मग पासवर्ड बदलला कसा, माहीत नाही तर?"
"अरे मी ओव्हर राईड केली कमांड.तसं केलं की आधीचा पासवर्ड माहीत नसला तरी बदलता येतो."
"मग बाकी 5 युजर्स चे बदल."
"ते सिक्रेट असतात.त्या युजर्स चे कमांड ओव्हर राईड करून बदलता येत नाहीत."
"अरे पण का? पासवर्ड बदलायची गरज काय पडली?काम झालं नाही तरी चालेल, पण झालेलं काम बिघडवायचं नाही.झाल्याचा मी येतोय 15 मिनिटात.तोवर अगदी शांत बस.कुठेही काहीही ओव्हर राईड करू नकोस.कोणालाही मेल वर, चॅट वर असा गोंधळ आहे सांगू नकोस.मी 2 तास मिळवतोय, त्यात तुला हा घोळ सोडवायचाय.नाहीतर मला मीटिंग मध्ये हा सर्व प्रकार तुझ्यामुळे झाला असं सांगावंच लागेल."(मांजराने बस मध्ये असल्याने सर्व शेलके शब्द फिल्टर केले.)

आजचा दिवस बराच नाट्यपूर्ण बनणार याची कुणकुण लागलीच होती.मांजराने लॅपटॉप उघडून सगळ्या देशी विदेशी जनतेला "सर्व्हर वाला पीसी आऊट ऑफ मेमरी गेल्याने आम्ही सर्व्हर ऑफ ठेवून मेमरी वाढवत आहोत, हे काम झाल्या झाल्या लगेच सर्व्हर चालू करू" असं मेल करून टाकलं.

ऑफिसात आल्या आल्या शायना समोर आली.
"हे काय आज हे नेहमीचेच कपडे?माझं मेल पाहिलं नाही का काल?"
मांजर नव्याने विचारात पडलं.आज काय आहे?मांजराकडे 5 काळे टीशर्ट आणि 4 सारख्याच निळ्या जीन्स आहेत.त्यामुळे मांजर नेहमीच्या आणि एक सारख्या कपड्यात दिसायची शक्यता आठवड्यातून 4 दिवस इतकी होती.मांजराच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह भाव बघून आपलं मेल अजून 'अनरीड' फोल्डर मध्येच आहे हे शायना ला कळलं.

"आज सगळ्या टिम्स नी वेगवेगळ्या स्टाईल ने आपली ओळख करून द्यायची इव्हेंट नाही का?ते शेजारचे टीम वाले आपल्या एरियात बाहुबली चा सेट बनवणार आहेत.तसा वॉर्डरोब पण.अगदी सेटबिट नाही, आपण निदान टीम सी आय डी तरी बनूया ना शर्ट इन करून?"
"शेजारचे टिम वाले त्यांचा कस्टमर कडचा 80% स्टाफ समर लीव्ह वर गेलाय म्हणून हे रिकामे उद्योग करतायत.आपला कस्टमर अजून जिवंत आहे.सुट्टीवर गेला नाहीय."

इव्हेंट च्या सोहळ्या निमित्त आज शायना ने सुंदर ठळक आय लायनर, अगदी फिका गुलाबी ब्लशर, स्मोकि चॉकलेटी आय शॅडो,स्किन फिट काळा इन-शर्ट आणि खाकी फॉर्मल पॅन्ट असा जामानिमा केला होता.मांजराला राहून राहून शक्तिमान मधलं 'अंधेरा कायम रहे हमेशा' म्हणणारं भूत आठवत होतं.हसू आवरून आणि शायना चे डोळे शोधून त्यात बघायचा प्रयत्न करत मांजर "तुम्ही तयारी चालू करा, ऐन वेळी मला आणि निल्या ला बोलवा" म्हणून पुढे निघालं.

निल्या ची तिसरी कॉफी चालू होती. पासवर्ड चा गोंधळ घालायला याला सकाळचा लवकर आलेला दीड तास पुरला होता.मांजर गुगल घेऊन बसलं.
"How to" टाईप केल्यावर गुगल ने "How to get pregnant" "How to get killed" "How to get a pet" वगैरे अगदी विषयाला धरून सुचवण्या दाखवायला चालू केलं.मुळात स्वतःला माहिती नसलेला पासवर्ड कामाच्या सर्व्हरवर परस्पर बदलता येतो हा नवाच शोध निल्या ने लावला होता.'गरज ही शोधांची जननी असते' त्या प्रमाणे 'निल्या हा समस्यांचा जनना असतो' अशी नवी म्हण बनवावी की काय असा विचार चालू होता.'पासवर्ड एनक्रिप्ट केलेला असतो आणि तो क्रॅक करणे कठीण आहे' इतकीच माहिती गुगल ने 20 लिंक उघडून वाचल्यावर दिली.निल्या उदास होऊन टपरीवर सुट्टा मारायला गेला आणि मांजर नेहमीच्या कामाकडे वळलं.

जरा चार पाच मेल वाचतो तोच समोरून प्रीती संतप्त पावलं टाकत चालत येताना दिसली.तिच्या वाटेत जो येईल त्याला तिने एखादा ठोसा मारला असता अश्या चेहऱ्याने ती येत होती.
"मी त्या बंगलोर च्या मुलाला परवा 1 तास खर्च करून सगळं समजावून सांगितलं.आता त्याने त्याच्या बॉस ला पाठवलेल्या मेल मध्ये "मी स्वतः 3 तास वेगवेगळा अभ्यास करून हे शोधून काढलं असं लिहिलांय.म्हणजे टीम स्पिरिट म्हणून मदत करणारे आम्ही वेडे का?"
"शांत.शांत.मी बघतो त्याच्याकडे.तू आजचं काम पूर्ण कर."
"हे असंच चालू राहिलं तर मी त्याला कधीही नॉलेज ट्रान्स्फर करणार नाही."

मांजराने शांतपणे मोठ्या यादीतून ते मेल शोधलं आणि त्याला "नाईस सजेशन. बट रि-इन्व्हेंटिंग द व्हील, ऍज प्रीती अलरेडी ट्राईड सोल्युशन सक्सेसफुली लास्ट वीक,गेट इन टच विथ हर फॉर मोअर डिटेल्स" असं उत्तर सगळ्या जनतेला ठोकून दिलं.
प्रीती खुश होऊन दुप्पट वेगाने कामाला लागली.
आता संध्याकाळी या मेल ला बंगलोर चा माणूस उत्तर देऊन प्रीती च्या उत्तरातल्या चुका काढणार होता.'दाऊद का आदमी व्हर्सेस छोटा राजन का आदमी' असं हे ढिशक्याव ढिशक्याव पुढचे 4 दिवस चालणार होतं.

निल्या सुट्टा मारून परत आला.
"मला सिगरेट घेताना तो राजेश भेटला.त्याला 5 वर्षांपूर्वी असाच एक प्रॉब्लेम आला होता.त्याच्याकडे एक एनक्रिप्शन तोडायचा कोड आहे.त्याने दिलाय.मी चालवून बघतो."
"बघ रे बाबा.अजून फार वेळ मला तुला वाचवता येणार नाही.12.30 पासून युरोप मध्ये लोक सर्व्हर वापरायला चालू करतील."
पासवर्ड ला कोणीतरी एखादी फाईल शोधून कुठूनतरी थेट कॉपी करू नये म्हणून कुलूप लावलेलं असतं.म्हणजे असलेल्या अक्षराची वेगळीच अक्षरं बनवलेली असतात.ही अक्षरं कोणत्या नियमाने बदलायची त्याचे 4-5 नियम आहेत.निल्या आता ते 4-5 नियम वापरून एनक्रिप्ट केलेला पासवर्ड मूळ अक्षरात बदलणार होता.

तितक्यात शायना परत सगळ्यांना बोलवायला आली.
"शायना, सध्या कोणालाच वेळ नाहीये.तुझ्याकडे पण कामं आहेत.या वर्षी नाही घेऊया आपण टीम इव्हेंट मध्ये भाग."
"आपल्याला नेहमीच वेळ नसतो.बाकी सगळे मजा करत असतात.आणि तसाही सर्व्हर चालू नाहीये."
(मांजर मनात "आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास" म्हणालं.व्हॉटसप वर म्हणी, कोडी सोडवून सोडवून मांजराचा शब्दसंग्रह वाढला होता.)
शेवटी एकदाचं ते सी आय डी टीम फोटोशूट 10 मिनिटात आवरून सगळे परत कामाला लागले.

"पिक युवर ब्रेन" नावाच्या त्या मीटिंग मध्ये बरेच मोठे मोठे लोक जमले होते.लोकांना इन्क्रीमेंट साठी 'इनोव्हेशन' ची परीक्षा म्हणून हा एक नवाच उद्योग कंपनी ने चालू केला होता. काहीतरी अगदी वेगळी कल्पना घ्यायची(म्हणजे ब्लुटूथ बसवलेला कंगवा, पावलं आपटलेली ओळखून माणसाच्या मूड प्रमाणे लाईट चा रंग बदलणारी जमीन,वजन सेन्स करून पाणी कमी जास्त वापरणारा फ्लश, सोलर पॅनल वाली पाणबुडी वगैरे) आणि त्यावर 1 तास चर्चा करायची.आणि शेवटी 10 पानी अहवाल बनवून द्यायचा.मांजर मराठी मिडीयम चं असल्याने 'पिक युवर ब्रेन' म्हटल्यावर त्याला सगळीकडे मेंदू पडले आहेत आणि त्यातला आपलावाला मेंदू शोधून वेचून डोक्यात बसवायचाय अशी चित्रं डोळ्यासमोर येत.सर्वात हुशार माणूस बोलत होता.

"म्हणजे आज आपण पाणबुडीवर हा प्रयोग करणार आहे.समजा आपण एका प्रयोगासाठी पाणबुडी निवडली.मला असं वाटतं की प्रयोग पाणबुडीवर करावा.पाणबुडी ही पाण्यात बुडलेली असते.पाणी पृथ्वीवर खूप असतं.पृथ्वी ही पाण्याने बनलीय.पाणबुडी पाण्यावर नसते.पाणबुडी सर्वात कमी सी लेव्हल वर आणि आकाश सर्वात जास्त सी लेव्हल वर असतं."

मांजराच्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या.सतत तोच तोच 2 वाक्याचा कंटेंट फिरवून फिरवून त्याची 200 वाक्यं करणाऱ्याचा आवाज त्याला अंगाई सारखा वाटायला लागला.डुलकी लागू नये म्हणून टेबलाखाली स्वतःला नखाने बारीक बारीक चिमटे घेत मांजराने एक तास संपवला.

जागेवर येऊन बसून लॅपटॉप उघडणार तितक्यात निल्या आला.
"अरे मला सापडला पासवर्ड. सर्व्हर चालू केला.सगळ्यांना मेल पाठवलं सर्व्हर चालू झाला, मेंटेनन्स संपला म्हणून."
मांजराचा जीव दणकन भांड्यात पडला.आजच्या दिवसातली पहिली चांगली बातमी.
"चल जेवायला जाऊ.मला सांग कसं केलं ते.म्हणजे परत कधी असंच झालं तर आपल्याला लक्षात ठेवता येईल."

निल्या सांगत होता.
"मी एनक्रिप्शन तोडायचा प्रोग्राम चालवून पाहिला.पण त्याने जो शब्द दिला तो पासवर्ड वाटत नव्हता.मग मी तो शब्द परत एनक्रिप्शन तोडायच्या प्रोग्राम ला दिला.तरी काहीतरी वेगळंच आलं.मग मी परत तो शब्द एनक्रिप्शन तोडायच्या प्रोग्राम ला दिला आणि मला पासवर्ड मिळाला.मी ऍडमिन चा पासवर्ड परत बदलला आणि सगळं चालायला लागलं."
"म्हणजे तीन वेळा एनक्रिप्ट केला होता?पासवर्ड काय होता?"
"पासवर्ड123" ☺️☺️
डोंगर पोखरून हा असा उंदीर निघाला होता.

जेवण झालं.निल्या कोडं सुटल्याच्या आनंदात परत एक सुट्टा मारायला गेटवर गेला.मांजर लॅपटॉप वर गाणी लावून काम करत बसलं.तितक्यात स्नेहा आली.स्नेहा हल्ली फार निर्विकारपणे कामं करते.तिला गेली 6 वर्षं बढती मिळालेली नाही.
"मला बोलायचंय तुमच्याशी.कॉफी घ्यायची का?"
मांजराला कॉफी ची गरज होतीच.


देऊन.नंतर मला इथे क्लेम ठेवता येईल का?"

"खरं मत सांगू?शब्द थोडे वेडेवाकडे असतील.हॅरेसमेंट फाईल करणार नाहीस ना?"
"तुम्ही असं काही करायची वेळ येऊ देणार नाही याची मला खात्री आहे.सांगा."
"चांगल्या चाललेल्या नोकरीत उगीच गॅप घ्यायला तुझ्याकडे एक पक्कं रिझन पाहिजे.तुझी मुलं मोठी आहेत.घरी आजारी नातेवाईक नाही.पी एम पी आणि प्रिन्स2 नोकरी करत करत देणारी किमान 2000 लोक सध्या लिंकडइन वर आहेत.तुझ्या प्रोफाइल साठी जाहिरात टाकली तर एका दिवसात नौकरी.कॉम वर 30 अप्लिकेशन येतात.1-2 वर्षं गॅप नंतर परत उजळ माथ्याने यायला तुझ्याकडे दाखवायला फुल टाईम MBA वगैरे सारखी डिग्री पाहिजे किंवा दाखवायला लहान बाळ तरी पाहिजे."
स्नेहा अत्यंत भडकली.
"म्हणजे?मी माझ्या मर्जीने ब्रेक घ्यायचा ठरवला तर मला प्रत्येक वेळी व्हॅलीड कारण म्हणून बाळ जन्माला घालायला पाहिजे?केवढ्यात पडेल ते?आणि 5 वर्षांनी मला परत ब्रेक घ्यावा वाटला तर परत बाळ? धिस इज बियॉन्ड रिडीक्युलस."
"मला माहिती होतं तुला वाईट वाटेल. पण गॅप नंतर परत मार्केट मध्ये येणं अशक्य नसलं तरी पूर्वीच्या स्टेटस वर, पूर्वीच्या पगारावर येणं कठीण नक्की आहे.शिवाय टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असेल.बाकी निर्णय तुझा.क्लेम अगदी पक्का ठेवता आला नाही तरी मी प्रयत्न नक्की करेन."

स्नेहा शी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून मांजर परत जागेवर आलं तोवर रोजच्या मीटिंग ची वेळ झालीच होती.
"निल्या हे काम आज संध्याकाळ पर्यंत पूर्ण करेल."
मांजराच्या बॉस ने पलीकडच्या युरोपियन माणसाला आश्वासन दिलं.निल्या तरातरा चालत आला आणि त्याने मांजराच्या हेडफोन वरचं म्युट बटण दाबलं.
"हे आज संध्याकाळी पूर्ण करायचं कधी ठरलं? परवा तू एक्सेल मध्ये लिहिलंय ना, की 1 रिसोर्स 3 मॅन डेज चं काम आहे म्हणून?"
"मला माहिती आहे.त्याला पण माहिती आहे.पण कस्टमर ला या कामावर इतके पैसे घालवायचे नाहीयेत.1 दिवसाचेच पैसे देणार आहेत.आपण जितकं जमतं तितकं बेसिक चालतं करून देऊन आज पूर्ण करायचं आहे.मी तुला मदत करीन.पण माझं नाव बिलिंग मध्ये नसेल."
"आणि आपल्या तर्फे टेस्टिंग कधी करणार?"
"टेस्टिंग करायचंच नाही.कस्टमर च्या टेस्टिंग टीम ला ते टेस्ट करायला पुढच्या आठवड्यात चालू करायचं आहे.तोवर आपण इतर कामं पटापट करून रोज थोडं थोडं टेस्ट करून काही असेल तर दुसऱ्या कामाच्या बरोबर सुधारून द्यायचं."

त्या गोष्टीत राजाला 'पोपट मेला आहे' असं थेट सांगायचं नसतं तसंच श्रीमंत पण हट्टी कस्टमर ला 'हे इतक्या वेळात होणं शक्य नाही' असं तोंडावर सांगायचं नसतं.जितक्या वेळा 'यस, श्यूअर' म्हणू तितकी पुढे मिळणारी नवी कामं वाढणार.मीटिंग संपेपर्यंत 4.30 वाजले.मांजर आणि निल्या चा दिवस आता चालू झाला होता.

मांजर आणि निल्या काम करत बसले.मध्ये मध्ये हेडफोन लावून ते तिसऱ्या एका टिम ला काही गोष्टी विचारत होते.शेवटी फरशी बसवायचं काम करायला आलेला कॉन्ट्रॅक्टर, मांजर, निल्या आणि सिक्युरिटी चा माणूस इतके चारच जण ऑफिसात उरले.आणि काम सुखरूपपणे पैलतीरी पोहोचलं.

मांजर आणि निल्या लिफ्ट पाशी उभे होते.
"शेवटची बस गेली 5 मिनिट पूर्वी.आता मला घरापर्यंत सोड."
"ठीक आहे.वाटेत पेट्रोल भरायला थांबावं लागेल थोडावेळ."
"मी मागच्या वेळी तुझ्याबरोबर आलो होतो तेव्हाच फुल केली होती ना?लगेच कसं संपलं?"
"शनिवारी बायको फिरवते ना गाडी.तिला पेट्रोल पंप च्या लेन मध्ये गाडी नेता येत नाही अजून."

फरशी वाला कॉन्ट्रॅक्टर पण आला.
"अरे सर, आप लोग भी वही थे ना?आपका कॉल सेंटर शिफ्ट खतम हो गया?"
निल्या तोंड उघडून तावातावाने काही बोलणार तेवढ्यात मांजराने त्याला डोळ्याने गप्प केलं आणि हसून हो म्हणाला.कानाला सतत हेडफोन चिकटलेले, 5 मिनिटात समजुतीने होऊ शकली असती ती कामं 1 तासाच्या कॉल मध्ये बडबड करून मग चालू करणारे, कस्टमर च्या कोणत्याही वाक्याला हो म्हणणारे आपणही एक वेगळ्या प्रकारचं कॉल सेंटरच ना?मांजर विचार करत करत निल्या च्या कार मध्ये बसून घरी गेलं.

-अनुराधा कुलकर्णी

पत्ते पे पत्ता

"वो 'अरे पिटल' का बोर्ड है ना उसके बाद अंदर लेफ्ट मारो और सौ मीटर आवो.ब्लु और सिल्व्हर कलर का पाटी है उधर से अंदर आव.गेट पर फोटो निकालके लो"
"अरे पिटल क्या है? पिटला भाकरी का नया हॉटेल खुला है क्या?"
"नही वो मॅक्सकेअर हॉस्पिटल है.लेकीन उसका बहुत सारा अक्षर बुझ गया है ना, पुरा नाम बोलूंगा तो आपको समझ मे नही आयेगा."

पलीकडे माझे हात शिवशिवत होते.या माणसाला फोनवर पत्ता सांगायला बसवायचा म्हणजे अवघड प्रसंग.खूप लांबच्या गोष्टी सांगतो पत्त्यात.दिड किलोमीटरवर असलेल्या हॉटेल च्या आपण नकाशात मागे असलो तरी तिथे मागे जायला रस्ता बराच फिरून आहे हे कोण सांगणार?ते माणसांना त्या हॉटेलच्या मागे जायला लागल्यावर रखवालदाराने हटकलं की कळणार.म्हणजे, 3 वर्षांपूर्वी होता हॉटेल च्या मागून रस्ता.पण मग हायवे च्या अर्धा किलोमीटर की काहितरी पर्यँत दारू प्यायची नाही असा नियम आल्यावर हॉटेल ने एकदम गोल गोल जंतर मंतर सारखा रस्ता बनवून त्याच्या मागच्या बाजूला हॉटेल ची एन्ट्री ठेवून लोकांना हायवेच्या अर्धा किलोमीटर लांब दारू पिता येईल अशी व्यवस्था केली.आणि आमच्या घरापर्यंत यायचा मार्ग लांबला.

त्यात हा शहाणा गेट वर ते नवं ऍप निघाल्या पासून बायका समारंभात एकमेकींना "जाताना हळदीकुंकू लावून घ्या हां ताई" सांगतात त्या उत्साहाने सगळ्यांना "आते टाईम गेट पर फोटो निकालके लो" सांगतो.

"मला दे बरं फोन"
"हां भैय्या, मै क्या बोलती हूँ, वो चाय की दुकान है ना, बहुत सारे लडका लडकी बैठके सिगारेट पी रहे दिखेंगे, वहा से मुडो. फिर एक बहुत बडा किराणा दुकान दिखेगा, उसपे बहुत सारे वेफर्स झाडू और पायपुसणे,सॉरी डोअर मॅट लटके होंगे, वहा से सीधा आव.फिर एक स्कुल लगेगा वहा पे बहुत सारा पीला गाडी पार्क किया दिखेगा वहा से आगे नीला सफेद पट्टा का गेट रहेगा वहा से अंदर आव."

"हा काय पत्ता आहे?सिगारेट पिणारी मुलं 24 तास असतात का?"
"अरे पिटल चा पत्ता सांगणं मला नाही पटत.त्याची वेगवेगळी अक्षरं बिघडतात.कार हॉस्पिटल, ऍक्स केअर हॉस्पिटल, मेयर ऑस्पिटल,मार ऑस्प,काई ऑस्प. ते खूप मिस गायडिंग ठरतं ना."

सगळ्या दुकानदारांनी ज्या उत्साहाने काही वर्षांपूर्वी चकचकीत पाट्या लावल्या, सगळ्यांच्या पाट्यातली अक्षरं विझायला लागलीत.एक "मूळव्याध क्लिनिक" मात्र एकही अक्षर न विझता ठसठशीत उभं आहे.पण ते काय आम्ही अजून तरी पत्त्यात सांगणार नाहीय.हायवे बनायच्या आधी आम्ही 'अँटिक वाइन शॉप च्या गल्लीत वळा' सांगितलं की कसं परफेक्ट कळायचं सगळ्यांना.

मला पत्ते सांगायचा आजार आहे.म्हणजे, कोणीही काहीही पत्ता विचारला की तो मला किंवा कोणालाही विचारला असला तरी सगळी कामं सोडून मी पत्ता सांगते.हावभावासहित. यातली काही रत्नं आमच्या उपद्रवी कुटुंब सदस्यांनी बरीच वर्षं लक्षात ठेवली आहेत.
"आता रस्ता वळेल.85% लोक तिथे वळतील.पण तुम्ही वळू नका.तुम्ही न वळल्याबद्दल बरीच गर्दी शिव्या घालेल. पण तसेच पुढे जा.मग आलाच रक्षक चौक."
"मोठी पांडबा पाटील स्मशानभूमी दिसली की गाडी स्लो करा.डावीकडे घ्या.जरा पुढे गेलं की लगेच आयुर्वेदिक नर्सरी."
"हापूस आंब्याची गाडी उभी आहे त्याच्या पुढच्या गल्लीत वळा."(गाडी आंबे विकून घरी गेली की रस्त्यातच तबला पेटी वाजवत बसा.)
"तो असा वळणा वळणाचा दोन एस आकार वाला रस्ता आहे त्याने सरळ या."
"तो लांबचा उजवा घेऊ नका, असा जवळचा उजवा घ्या मग हे असे इकडे वळा आणि खाली या सरळ."(हे असे इकडे ची दिशा फोनवर बोलताना हाताने दाखवलीय त्यामुळे पत्ता विचारणारे 'हे' लवकर घरी येण्याची अजिबात शक्यता नाही.)

हे खाली या सरळ आणि वर जा सरळ वाले पत्ते सांगायला मी पण हल्लीच शिकतेय.म्हणजे, असे पत्ते ऐकून 'वर म्हणजे कुठे' आणि 'खाली म्हणजे कुठे' हे मला अजून कळत नाही.मी स्टेशनवर उभी असायचे तेव्हा 'अप' म्हणजे नकाशात वर, राजस्थान,यूपी,गुजरात,जम्मू काश्मीर कडे जाणारी गाडी आणि 'डाऊन' म्हणजे नकाशात खाली पुणे, बंगलोर,कोल्हापूर, केरळ ला जाणारी गाडी हे खूप अभ्यासाने शोधून काढलं होतं.पण दुसऱ्याला सांगताना 'हे असे अमुक तमुक वरून खाली या सरळ' म्हणून दडपून द्यायचं.कुठे ना कुठे पोहचतील.कोणी ना कोणी पत्ता सांगेलच.नियतीच्या मनात असेल तर पोहचतील.

सर्वात भयंकर पत्ते ती मॅप वाली बाई सांगते."गोल चक्कर पे तिसरा निकास ले" म्हटलं की किंचाळून तिला गदागदा हलवून "गोलावर एक दोन तीन कोणत्या बाजूने मोजू?"म्हणून विचारावं वाटतं.तिसरा एक वेळ ठीक आहे, कधी कधी पाचवा निकास घ्यायला सांगते.असा पाच सहा आरे असलेला सूर्या सारखा दिसणारा चौक आपल्या इथे कुठे आहे याचा फार विचार करावा लागतो.परवा लोणावळ्याला पत्ता शोधताना बाईने आम्हाला एका अरुंद रस्त्याने एक मातीचा ढीग आणि एक नाला असलेल्या डेड एन्ड ला नेऊन सोडलं.मग नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की बाईच्या सेटिंग मध्ये 'एक्सक्लुड नॉन पेव्हड रोडस' असा एक ऑप्शन होता तो ऑफ करायचा होता म्हणे.अशीच एकदा खरेदी करत घरी जायला उशीर झाला म्हणून मी पोळीभाजी केंद्र शोधत होते चालत.मग बाईने आधी मला रिलायन्स फ्रेश च्या गोडाऊन ला, मग पु ना गाडगीळ च्या दारात आणि मग कपड्याच्या दुकानात सोडलं.प्रत्येक वेळी ती गंतव्य 20 मीटर वर आहे सांगत होती.शेवटी पोळीभाजी केंद्राचा नाद सोडून कपडयाच्या दुकानाला ईश्वरी संकेत मानून 2 टॉप घेऊन टाकले.

आम्ही सोलापूर ला चाललो होतो.तेव्हा मराठी मॅपबाई ला सोलापूर चा पत्ता सांगितला.आणि ऐन वेळी जवळ पुढे दुसरीकडे जायचं ठरलं. बाईला बिचारीला माहितीच नाही.ती आपली 'आता वळा' 'आता यु टर्न घ्या आणि मग वळा' 'आता डावीकडे चक्राकार मार्ग घ्या मग यूटर्न घ्या' म्हणून गयावया करायला लागली.आम्ही बरेच पुढे आल्याचं तिला कळल्यावर 'शक्य असेल तर वळसा घेऊन मागे वळा' असं दोन तीन वेळा म्हणाली आणि मग गप्प बसली. 'मी माझं सांगायचं काम केलं, तुम्ही ऐकत नाही.आता जायचं तिथे जा,रस्ता चुका आणि मरा मेल्यानो' असं मनात म्हणाली असेल शेवटी.

परवाचीच गोष्ट.आम्हाला खेड शिवापूर पुढे जाऊन एक चिमुकलं वळण घेऊन गराडे ला जायचं होतं.आणि मॅप बाई ते वळण जवळ आलंय सांगत होत्या.पण जवळ आल्यावर तिथे काही वळण बिळण दिसलंच नाही.मॅट्रिक्स सारखं कोणत्या तरी वेगळ्या समांतर विश्वात ते वळण असेल.परत यु टर्न घेऊन परत वळण शोध असं करत आम्ही 3 वेळा खेड शिवापूर टोल नाक्यातून गेलो आणि टोल भरला.शेवटी तिसऱ्या वेळा एका माणसाने विरुद्ध बाजूला विरुद्ध दिशेला वळायचा एक वेगळाच रस्ता सांगितला आणि त्याने आम्ही गराडे ला पोहचलो.हा मला अजूनही दैवी चमत्कार वाटतो.

"इतकं कठीण नसतंय पत्ते शोधणं.आपण एका हेलिकॉप्टर मध्ये आहे असं समजून सगळ्या परिसराचा एरियल व्ह्यू मनात डोळ्यासमोर आणायचा.पत्ता लगेच सापडतो." अशी एक बहुमूल्य टीप आमच्या एका फॅमिली मेम्बराने दिली आहे.आता मी एकटीने पत्ता शोधण्याची वेळ यायची वाट बघतेय.म्हणजे मग लगेच मनाच्या हेलिकॉप्टर मध्ये बसणार.मग पुढे गाडीचं काय व्हायचं ते होऊदे.

-अनुराधा कुलकर्णी

Friday 10 April 2020

इगो मसाज देणारी सौंदर्यवारी

(या लेखात पार्लर किंवा कोणत्याही व्यावसायिकाची बदनामी नाही.त्यांचे कौशल्य, त्यांच्या पुढच्या अडचणी आणि आव्हानं याची पूर्ण कल्पना आहे.)
"काय काय करायचंय?"
"पूर्ण हात अर्धेपाय भुवया पेडी हेअरकट आणि फेशियल." मी उडपी हॉटेल मधल्या सारखा मेनू वाचून दाखवला.
"आमच्याकडे ना, हिरे मोती आणि पोवळं पावडर घातलेल्या फेशियल ची ऑफर आहे.फक्त 2000 मध्ये."
(स्वगत: अगं सुंदरी, मी लग्नानंतर पहिल्यांदाच स्वतःच्या डोंबल्यावर इतके पैसे एका वेळी ओतणार आहे.ते पण वार्षिक वर्गणीत फुकट असलेले पैसे पॅकेज डिस्काऊंट मध्ये वसूल करायला.हिऱ्याची पावडर मी लग्नाच्या फेशियल मध्ये पण लावली नव्हती थोबाडाला.फेशियल झाल्यावर 'काय सुंदर मुलगी आहे आरश्यात' पासून 'बाई तश्या सुसंस्कृत व नीटनेटक्या दिसतायत' असं आरश्याला म्हणण्याच्या स्टेज ला चेहऱ्याला कोणतेही हिरे मोती प्लॅटिनम लावता आलेय मी.आज मला पाहिजे ती पावडर फासू दे तोंडावर.अजिबात प्रेशराईज करायचं नाही.)
"नाही मला हर्बल लव्हेंडरच पाहीजेय."
(स्वगत: निश्चयाचा महामेरू|| सकल जगासी आधारू|| तयाचे आठवावे रूप|| निर्धार दाखवावा खूप||)
"पण मॅडम डायमंड ने खूप छान रिझल्ट मिळतील."
"मला रोजच्या साठी पाहीजेय.डायमंड फंक्शन च्या आधी करेन."
(स्वगत: होत आलं.आता अजून थोडं लावून धरलं की झालं.थोडा ताण सहन कर.)
सुंदरीने भात्यातून पुढचा बाण काढला.
"मॅम लव्हेंडर चे किट्स संपलेत.जास्त जात नाही ना.सगळे डायमंड च घेतात."
(स्वगत: अगं ढमे!! दर वेळी कमी किमतीचं बरं संपलेलं असतं.पुढच्या वेळी मीच घेऊन येईन.पार्लर वर काय 'बाहेरचे सौंदर्यपदार्थ आणू नये' अशी पुण्याच्या खानावळी सारखी पाटी नाही.बस मग ओरडत!)
"मी पॅकेज घेतलं आहे.त्याच्या वर खर्च करणार नाही.त्यात बसेल ते चांगलं फेशियल सुचवा किंवा डायमंड फेशियल पॅकेज मध्ये बसवून द्या."
(स्वगत: मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं टाकली नाहीत.मी हिरे मोती पोवळं उचलणार नाही.)
"मॅम ओथ्री फेशियल थोडं महाग आहे पण मी बोलून बघते.तुम्ही पॅकेज मधलं पेडी कॅन्सल करून हे बसवू आपण."
ओथ्री च्या वाटाघाटी पूर्ण करून रोब घालायला खोलीत गेले.नेहमी प्रमाणेच 'कॅमेरे दिसतायत का' वगैरे शोध झाला.(आता कॅमेरे काय लावायचे असले तर लोक 'कॅमेरा' अशी पाटी लावून बाण दाखवून त्याचं भिंग दिसेल असा प्लांट करणार आहेत का?)
लग्नघरामध्ये 50 बायका एका वऱ्हाड खोलीत मेकअप, चेंजिंग, फिडिंग,चहा पिणे असा गोंधळ घालत असताना, दार उघडं असताना, त्यातून दर 3 मिनिटाला एक पुरुष नावाचा मोठा किंवा मुलगा नावाचा लहान प्राणी दर 45 अंशात शक्यतो गोंधळून सभ्यपणे लांब इकडे तिकडे बघत काहीतरी मागायला येत असतो अश्या ठिकाणी मोठा कुर्ता डोक्यात घालून पाठमोरं ब्लाउज/परकर बदलणाऱ्या अनुभवी शूरवीर बाया चेंजिंग रूम मध्ये कॅमेरा काय, उघड्या मैदानावर काचेच्या भिंती असल्या तरी बिचकणार नाहीत. आणि तरीही समजा आपण आलोच कोणत्या बिचाऱ्या कॅमेऱ्यात तर आरश्यात दात विचकून बघणे,पॅन्ट पोटावरुन वर खेचणे वगैरे बावळटलीला करून आपला व्हिडीओ रिजेक्ट करवायचा असतोय.आता काय ते इरोटीक फिरोटीक बघणारे, असं काही वेडं बागडं बघून काय करणारेत.(जाऊद्या, नको त्या भलत्या विचारांच्या गल्ल्यात जायला.एखादा बाई आरश्यात पिवळे दात विचकताना बघून टर्न ऑन होणारा पर्व्ह असायचाही जगात, कोणी पाहिलंय?)
सुंदरी सौंदर्य संवर्धन चालू करते.
"खूप टॅनिंग झालंय हाताला.तुम्ही हॅन्डकॅटा विथ डीटॅन अँड टोनिंग घ्यायला पाहिजे होतं."
"फंक्शन च्या आधी.ही रुटीन ट्रीटमेंट आहे."
"तुम्हाला रोज चांगलं दिसावंसं नाही का वाटत?"
"मला फंक्शन आधीच चांगलं दिसायला आवडतं.म्हणजे लोकांना फरक पटकन कळतो."
वाचायला म्हणून रेट कार्ड हाती घेतलं."केस कापणे" हा सर्वात स्वस्त प्रकार वगळता बाकी प्रकरणं अनेक हजारात जात होती.आपल्या केसाला हायलाईट नावाची झेब्रा रंगरंगोटी नुसती नाही करता येणार.त्याच्या आधी कॅनव्हास काळा पांढरा आहे तो 'कौआ काला' करायला ग्लोबल कलर करावं लागेल.जाऊदे बापडं.तेही पमी च्या लग्नापूर्वी करू.आता काय गरज नाही. 'हेअर स्ट्रेटनिंग' हा प्रकार 6000 ला असल्याचं वाचून आपले केस अत्यंत सरळ आहेत हे आठवून जीव दणकन भांड्यात पडतो.
लहानपणी हे केस कुरळे करायला काय काय नाही केलं.रोलर लावून झोपणे,धातूचा ब्रश गॅसवर गरम करून केसाला गुंडाळणे, लोकल मध्ये मिळणारी प्लॅस्टिक ची 'आरारो करने वाली जुनागड वाली' ची हेअरस्टाईल करणारी क्लिप डोक्याला लावून त्यात केस सर्व दिशानी वेडेवाकडे कोंबून वाफ घेणे.रात्रभर ओल्या केसांच्या वेण्या घालून झोपणे, प्रेमाने काळजी म्हणून अंडी,दूध,दही, निवडुंग,मेंदी,केळं, स्ट्रॉबेरी, काळीमिरी, लवंग, मुलतानी मिट्टी,हळद,दालचिनी, कांदे, टॉमेटो,जायफळ काय काय म्हणून थोबाड आणि केसाला लावायचं सोडलं नाही.आता केसच सोडून चाललेत ते सोडा.अजून 10 वर्षात काहीतरी गॅजेट येईल.हेल्मेट मध्ये ठेवून बटन दाबलं की पाहिजे तितके केस उगवतील.तोपर्यंत आपल्या डोक्यावर असलेले 4 केस टिकवणे.
विचारांची तंद्री अचानक कोणीतरी सुई भोसकायला लागल्याने भंग झाली.सुंदरीने ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड काढायला आकडा वाली सुई नाक आणि कपाळावर टोचायला चालू केली होती.अजून पोलिसांना थर्ड डिग्री ला वापरायला ही पद्धत कशी नाही दिसली काय माहीत.तरी परवाच "चपळ कोळश्याचा मुखवटा" (ऍक्टिव्ह चारकोल फेस मास्क) वापरून पण इतके काळे आणि पांढरे हेड होते.कोळश्याचा मुखवटा चढवल्यावर तो पूर्ण वाळेपर्यंत आणि उपटून काढता येईपर्यंत थांबावे.नाहीतर तो धुवायला प्रचंड पाणी लागते."जा अपना मूह काला कर.आज से तू हमारे लिये मर गयी" हे फक्त पिक्चरमध्येच ठीक.खरंच मुह काला केलं तर पाण्याचं बिल भरूनच फेस यायचा तोंडाला.
टोचण समारोह संपल्यावर ओथ्री फेस पॅक मुळे चेहऱ्याला शांती लाभली.सुंदरी होती छानच दिसायला.काम पण छान करत होती.ही चेहऱ्याला ओथ्री लावत असेल की हिरेमोती?हॉटेल मालक जेवायला दुसऱ्या हॉटेल मध्ये जातो तशी ही दुसऱ्या पार्लर ला जात असेल का?हिचं लग्न झालंय का?(स्वगत आवरतं घेतलं.नात्यातल्या सर्व मुलांची लग्न झालीत.आता ज्यांची झाली नाहीत ते मोठे होईपर्यंत 'लग्न' हा प्रकार बहुतेक म्युझियम मध्येच वाचायला मिळेल.)
आता थोबाड धुवून बाहेर जाऊन हेअर कट करायला एक काळे, सोनेरी आणि प्लॅटिनम केस रंगवलेला सुंदरा होता त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले."पुरुष बायकांचे हेअरकट बायकांपेक्षा चांगले करतात" ही स्त्रियांमध्ये पसरलेली "क्रिकेट मॅच च्या वेळी अमका बसला की हमखास भारताची टीम हरते" याच्या तोडीची अंधश्रद्धा आहे.कारण यु नो...पुरुषाच्या नजरेतून बाईला कोणते केस सुंदर दिसतील याचा आढावा वगैरे वगैरे...आता या तिरंगी प्राण्यापुढे सकाळपासून 100 बाया येऊन केस कापून,सरळ करून,वाकडे तिकडे करून नि रंगवून गेल्यात.त्यातल्या निम्म्या त्याच्या ताई काकू मावशी अक्का आणि उरलेला दुर्मिळ टक्का अप्राप्य इंग्लिश बोलणारा आणि आयफोन सोडून कुठेही नजर ढळू न देणारा स्वर्गीय सुंदर समूह आहे.
हा तिरंगकेशी मुलगा समोर स्त्री, अस्वल,मांजर,कुत्रे,लँगुर माकड,फर ची पर्स काहीही बसलं तरी तितक्याच निर्विकार मनाने केस कापतोय.सध्या याच्या समोर एक टोकदार दाढी वाला मुलगा आहे.याने मोहक(नाही नाही मोहॉक) मध्ये थोड्या स्टेप्स सांगून एक बराच सेटिंग लागणारा कट सांगितला आहे.शिवाय दाढी ट्रिम वगैरे.सध्या हा त्या स्टेप वाल्या मोहक प्रकाराने पूर्वीच्या काळी ते केसा सारखा दिसणारा जिरेटोप घालणारे सैनिक दिसायचे तसा किंवा ड्रॅगन च्या पाठीसारखा दिसतोय.काय ही मुलं..यांचे काका मामा गुळगुळीत दाढी आणि कमी केस स्पाईक्स वगैरे घेऊन वय लपवतायत आणि ही 16 का 20 ची मुलं चार मुलांचे बाप दिसतायत अश्या दाढ्या वगैरे ठेवुन.हे लोक मोठे होतील तेव्हा फॅशन काय असेल?2 वेण्या वगैरे?आंबाडा झाला, हेअरबँड झाला, शेंडी झाली.आता खोपा,झुल्याची वेणी, आणि फ्रेंच प्लेट वेणी राहिलीय.झाला एकदाचा बाब्याचा नट्टापट्टा.
"मॅडम लास्ट टाइम कुठे कापले होते केस? फारच वेडेवाकडे आणि फेज आऊट झालेत." तिरंगकेशी माझ्या केसांकडे वळलाय.
"तुम्हीच कापले होते.फोटो पण काढला होता छान सेट झालेत म्हणून."
मी मख्खपणे तिरंगी प्राण्याचा वडा करते.
"ओहो हो का, मला आठवलंच नाही.तसे व्यवस्थित आहे.ट्रिम केला की छान दिसेल शेप."
(ग्लोबल कलर आणि हायलाईट करावे का?नको इतके हजार एका महिन्यात केसांवर वसूल व्हायला रपंझेल सारखे मोठे केस लागतील.आणि परत दीड महिने आणि 10 शाम्पू नंतर आहेच काळा वांगी कलर पांढरा तिरंगी कारभार.जाऊदे नंतर बघू.)
तिरंगी प्राणी केसाला बरेच सिरम, क्लिपा लावून केस छान कापून वळवून देतो.हेअरकट आणि सेट केलेले केस पार्लर च्या आरश्यात जितके सुंदर दिसतात तितके पार्लर बाहेर येऊन 2 पावलं चाललं तरी टिकत नाहीत.त्यामुळे हा लूक फोटोबंद करणे आलेच.पब्लिक ला पुरावा म्हणून दाखवता येतो 'केला तेव्हा असा दिसायचा कट' म्हणून.बाकी केस धुतल्यावर किंवा स्कार्फ बांधल्यावर परत 'वेडेवाकडे केस वाढलेली वेडी बै' लूक आहेच.
आयब्रो साठी परत सुंदरी आली.मी अजून पार्लर मध्ये आयब्रो करून देणारा एकही पुरुष पाहिला नाहीय.कदाचित मायनिंग इंजिनियरिंग ला बाया घेत नाहीत तसं आयब्रो कॉलेज ला पुरुष घेत नसतील.
"कश्या करायच्यात?"
"अगदी फक्त रेषेबाहेरचे केस कमी करायचेत.पातळ नको.वर टोक नको."
सगळ्या बायकांना आयब्रो करायच्या असतात, पण 'आयब्रो केल्या' असं समोरच्याला जाणवू द्यायचं नसतं.खारी बिस्किटाला तुपामुळे ज्याप्रकारे मस्त चव येते, पण त्यातलं तुपाचं अस्तित्व जाणवत नाही त्याप्रमाणे आयब्रो हा 'केल्यात दिसू नये, पण चेहऱ्यात रेखीव बदल जाणवावा' असा छुपा प्रकार आहे.
आता हा "केस उपटा पण किसिको कानोकान खबर ना हो" वाला प्रकार प्रत्यक्ष अंमलात आणायला अत्यंत कठीण असल्याने सुंदरी मनात वैतागून जोरात किंचाळते पण आपले प्रयत्न चालू ठेवते.शेवटी 'इथून एक केस जास्त, उजव्याचा दोन केस कमी' असं करत स्टारट्रेक का वर्ल्ड मधल्या स्पोक सारखा तो पॉईंट येतोच.मी निश्चयाने या पॉईंट वरून नांगर फिरवून गोल ऐवजी सपाट आयब्रो निवडते.आणि एकदाचा हा प्रकार पूर्ण होतो.
तर अश्या प्रकारे पॅकेज चे पैसे वसूल झाले आहेत.पण पार्लर मधून बाहेर पडल्यावर मूळ नग मनातून बराच सुखावला असला तरी बाहेरून जवळजवळ सारखाच दिसतोय.अगदी 'पुरी ते परी' वाला फरक पडलेला नाहीये.कदाचित 'किती फरक पडला' पेक्षा 'स्वतःची काळजी घ्यायला महिन्यात इतके तास आणि पैसे खर्च केले' हा इगो मसाजच चेहऱ्यावर जास्त चमक आणत असावा!
-अनुराधा कुलकर्णी

Tuesday 22 January 2019

हस्तव्यवसाय: एक दहशतीचे साम्राज्य

मुलांच्या सहामाही परीक्षा संपलेल्या असतात.आपल्या मनात 'ते नवं पार्लर कसं आहे बघून येऊया' किंवा 'अमक्या पोराच्या बड्डे पार्टीला पोराला सोडून मस्त मॉल मध्ये (मुलाच्या)बापाबरोबर फिरुया' असे विचार घोळत असतात.बापांच्या मनात 'चला ऑफिसातून घरी लवकर येऊन मस्त मॅच बघू' इ. विचार घोळत असतात.इतक्यात शाळेतून ती नोटीस येते आणि नियती खदखदून हसते!

"कचऱ्यातून कलानिर्मिती.तुमच्या मुलांबरोबर दळणवळणाची साधने आणि शहर या विषयावर हस्तव्यवसाय म्हणून एक 3डी मॉडेल बनवून परवाच्या उद्या सकाळी शाळेत पाठवा.रोल नंबर 1 ते 15 ने हवेतील दळणवळण,16 ते 30 ने पाण्यातील दळणवळण आणि 30 पासून पुढच्यानी रस्त्यावरील दळणवळण बनवून आणावे.सूचना: मॉडेल चालते असले पाहिजे."

आणि पालकांच्या स्वप्नांचे फुलपाखरू होऊन जमिनीवर लोळायला लागते.मूल '5 मिनिट क्राफ्ट' चे फेसबुक व्हिडीओ दाखवून दर क्षणाला आपल्या कल्पना मिग विमान,राफाल, बोईंग 737,अंतराळयान,पेगासस घोड्याचा उडता रथ या रेंज मध्ये झपाट्याने बदलत असते.'5 मिनिट क्राफ्ट व्हिडीओ बघून आपण केलेल्या वस्तू त्या व्हिडीओ मधल्या सारख्याच बनतील' ही 'सरकार बदलेल आणि सगळं काही मस्त होईल' याच्या खालोखाल जगात पसरलेली मोठी अंधश्रद्धा आहे. मुलाला 5 मिनिट क्राफ्ट च्या गुलाबी आकाशातून जमिनीवर आणेपर्यंत आपल्या मावसजावेच्या नणंदेच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचे बारसे दूरगावी आहे आणि त्याला आपल्याला उद्या एका दिवसात जाऊन यायचे आहे असा शोध लागतो.म्हणजे राहिला 1 दिवस.1 दिवसात कचऱ्यातून कला बनवायला चांगला न चेपलेला,न मळलेला स्वच्छ कचरा घरात हवा.

आजूबाजूच्या दुकानांवर आजूबाजूच्या सोसायटीतल्या पालकांची धाड पडते.आपण 'सुरणाचे फायटर प्लेन','मक्याचे जेट विमान' वगैरे अकल्पनिय विचार करत असताना मूल अचानक 'आई माझ्या ग्रुप ला रोल नंबर प्रमाणे रोडवेज ट्रान्सपोर्ट आहे' जाहीर करतं आणि अमूल ताक किंवा फ्रुटी च्या खोक्यांची आगगाडी बनवण्याचा प्लॅन जाहीर करतं.आपण 'त्यात काय मोठं' म्हणून 2 अमूल ताक,2 फ्रुटी आणि प्रोटीन म्हणून उलट्या उभ्या जॉन अब्राहम ची जाहिरात असलेलं सोफिट सोया मिल्क खरेदी करतो.नियती इथे पण खदखदून हसत असते.(या नियतीचे एकदा दात पाडायला हवेत.)

बारश्याला जात असताना मन भूतकाळात जातं.आपण गृहकृत्यदक्ष वगैरे नसताना प्रि स्कुल होमवर्क म्हणून बटनांचं कासव, लोकरीच्या अनेक रंगाच्या तुकड्याचा कागदावर ससा,पेन्सिल शेव्हीन्ग चं घुबड,भेंडीचे ठसे काढून फुलांचा गुच्छ,कापसाचा पांढरा हत्ती(शाळा वाल्यांची समयसूचकता..त्या वर्षी फी वाढवल्याने तसेही ते पालकांसाठी पांढरा हत्तीच झालेले असतात.),बांगड्यांचं बदक, रिबन ची राजकन्या असे अनेक गड सर केलेले असतात.घराबाहेरच्या व्हरायटी वाल्या कडून त्याच्या कडची सगळ्या रंग आणि साईझ ची सगळी बटणं विकत घेऊन नंतर दुकानात बटणं घ्यायला आलेल्या पालकांचा पोपट करणे,चालू वर्षाचे फुलांचे कॅलेंडर फाडून कागदावर निसर्ग बनवणे,नवऱ्याच्या घड्याळाच्या खोक्यातून बुडाचे पांढरे सॅटिन उचकटून कागदावर त्याचा राणीचा फ्रॉक बनवणे, ऑफिसात केक कापल्यास त्या खालची चंदेरी कागद चिकटवलेले वर्तुळ साबणाने धुवून घरी आणून त्यावर मंडल डिझाइन काढणे वगैरे कला कौशल्ये पालकांच्या अंगी येत जातात.

शाळेच्या पालकांच्या व्हॉटसप ग्रुप वर सर्वांचे हताश उदगार चालूच असतात.अगदी 'सारखे क्राफ्ट प्रोजेक्ट देते' म्हणून शाळा बदलण्यापर्यंत टोकाला जाऊन होते.तितक्यात तमक्या आय सी एस ई बोर्ड च्या शाळेत 7 वी च्या मुलांना प्रोजेक्ट म्हणून एक अंकी इंग्लिश संगीत नाटक लिहायला आणि ऍक्ट करायला सांगितले हे ऐकून 'नाय नाय, सी बी एस ई कित्ती छान, मुलांना किती मस्त काय काय करायला सांगतात' वर गाडी येते.

इथे पमीच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचं बारसं आवरून आपण घरी उशिरा येतो.दुसऱ्या दिवशी सुट्टी असते आणि सकाळ पासून घरात आगगाडीचे वारे वाहायला लागतात.फ्रुटीच्या टेट्रा पॅक मध्ये थेंबभर राहिलेले फ्रुटी जिभेने चाटणे, मग मांडीवर पॅक झटकून पॅन्ट ला फ्रुटीचे डाग पाडणे वगैरे प्रकार करून होतात.एकदाचे डबे रिकामे करून त्याला चार्ट पेपर चिकटवून होतात.आता खिडक्या.खिडक्या करायला टूल बॉक्स मधले कटर घ्यावे तर ते आपणच ऑफिसात 'दिलशेपड इकोफ्रेंडली कंदील' स्पर्धेला नेलेलं असतं आणि ते टीम मधल्या चमन च्या मित्राने कुरियर चं पार्सल कापायला नेलेलं असतं.

मग सुरीने कॅन च्या खिडक्या भोसकणे चालू होते.'कचऱ्यातून कला' आपल्या 'सुट्टीचा कचरा' करणार आहे हा अंदाज आता आलेला असतो.'2 तासात पूर्ण करून उरलेल्या वेळात आराम' चे 'रात्री झोपेपर्यंत संपले पाहीजे' होत असते.जेरीस येऊन आगगाडी ची कार बनवून विषय संपवून टाकावा किंवा फक्त इंजिन बनवून 'बाकी गाडी पुढच्या स्टेशनला आहे' सांगणे असे पर्याय मनात येतात.पण आता छोट्या कलाकारांना आगगाडी चढलेली असते.खिडक्या बनवून डबे जमिनीवर ठेवल्यावर 'डबे चाकावर असतात' या शाश्वत सत्याची अनुभूती होऊन पांढरी झाकणे शोधली जातात.घरातल्या चिंच सॉस,शेझवान सॉस च्या बाटल्या उघड्या बोडक्या डोक्याने फिरायला लागतात.गाडीला 16 चाकं लागणार आणि आपल्याकडे कशी बशी 12 झाकणं आहेत असा शोध लागतो.मग मोठ्या डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी अमूल ताक होते ते) 4 चाकं आणि लहान डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी फ्रुटी होते ते) 2 चाकं लावायची ठरतात.'टेबलावरचं करकटक आण'म्हटल्यावर लहान कलाकार रेड्याने ज्ञानेश्वराकडे बघावं तसे आ वासुन बघत बसतात.मग 'कंपास आण' सांगावं तर प्लास्टिक चा फक्त पेन्सिली असलेला कंपास आणून दिला जातो.शेवटी उठून कर्कटक घेऊन आल्यावर चाकांची हिंसा करणे चालू होते.

चाकांना भोसकताना हिरोला वाचवायला पुढे आलेल्या साईड हिरोईन सारखा सोफा मध्ये येणे वगैरे माफक गोंधळ होऊन सर्व चाकांना भोकं पाडून होतात.चाकात लाकडी बार्बेक्यू स्टिक खुपसून व्हील शाफ्ट बनतो.चाक आणि व्हीलशाफ्ट च्या जोडावर वर केक च्या आयसिंग सारखं बदाबदा फेव्हीकोल ओतून सगळी चाकं वाळायला ठेवली जातात.आपण चाकं नसलेली बुलेट ट्रेन बनवायला हवी होती ही पश्चातबुद्धी होते.

चाकं लावून झाल्यावर ज्या गरीब डब्याना दोनच चाकं मिळालीत ते टपकन एका बाजूला तिरके होतायत असा शोध लागतो.मग त्या डब्याला खालून अजून जखमा करून त्यात दोन लाकडी बार्बेक्यू स्टिक चे तुकडे आधाराला घालून डबे उभे होतात.(इथे आपण रेल्वे च्या कारखान्यात इंजिनिअर नसल्याबद्दल नवरा ईश्वराचे आभार मानतो.)

या सगळ्या दैवी लीला करताना सामान्य मनुष्य बनून जेवण बनवणे, जेवणे,लहान कलाकार नाचाच्या क्लास ला सोडणे,पडदे धुणे,कपडे इस्त्री ला देणे अशी भूतलावरची सामान्य कामं पण करावी लागतात.आता पेप्सी चा टिन जांभळे इंजिन बनतो आणि आपल्याला 'इंजिनाला पण चाकं लागतात' असा शोध लागतो.सुदैवाने शेजाऱ्यांनी जपून ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांची झाकणं कामी येतात आणि निदान इंजिनाला तरी चार चाकं मिळण्याचं सौभाग्य लाभतं.

आता डबे एकमेकांना जोडणे.परत एकदा डब्यांच्या बाजू भसाभस भोसकल्या जातात.दिवार च्या अमिताभ ला गोळी मारण्याच्या जागेवर 786 चा बिल्ला असावा तसं या बाजूना टेट्रा पॅक बंद करताना एकावर एक आलेले 4 थर असतात.त्यामुळे डब्याचे कपलिंग बनवणे हे एक बिकट काम होऊन बसते.शेवटी भोक पाडून,त्यात सुतळी ओवून,सुतळी खिडकीतून बाहेर काढून त्याला बबल रॅप चा तुकडा बांधून सुतळी पक्की केली जाते.लहान कलाकार घरी नाहीत हे दुर्मिळ क्षण एकांतात एकमेकांबरोबर न घालवता सुतळ्या आणि सुऱ्या आणि फेव्हीकोल बरोबर घालवल्याबद्दल मनात 2 उसासे सोडले जातात.

"मी आगगाडी बनवली.आता रूळ तू बनव" म्हणून विश्वामित्र स्टाईल 'इदं न मम' करून झोपायला जावे तर बाहेरून हाका ऐकू येतात.दोन्ही इंजिनियरानी आगगाडी च्या निम्म्या लांबीचा लोहमार्ग बनवलेला असतो.शेवटी 'लोहमार्ग वळवून वळवून' गाडी पुठ्ठ्यावर माववून चिकटपट्टयांनी चिकटवली जाते.तितक्यात दोन चाकं प्राण सोडतात.इथे ग्रुप वर अग्नीबाणापासून ते विराट नौकेपर्यंत भारी भारी मॉडेल चे फोटो येत असतात.मुलाचे क्राफ्ट हा आता पालकांच्या इभ्रतीचा प्रश्न झालेला असतो.मुलीच्या आईने,मावशीने भरतकाम विणकाम केलेली रेडिओ कव्हर बनवून मुलगी बघायला आलेल्याला 'आमच्या सुलुने बनवलंय हो सगळं' सांगावं तसं सगळे निरनिराळे कलेचे नमुने साजरे करत असतात.शेवटी 'पुढच्या वेळी गुगल करून सोपी वस्तू निवडायची आणि सगळी स्वतः बनवायची' म्हणून लहान कलाकाराला दम दिला जातो.आणि सकाळी एकदाचं पारिजातकाच्या फुलासारखं जपत ती आगगाडी शाळेच्या बसमध्ये चढते.

परत येताना 6वी 7 वी च्या मुलांचे पालक भेटतात त्यांना 'तुमची मुलं सगळं स्वतः करत असतील ना प्रोजेक्ट' असं विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक हताश हास्य येतं ज्यात अनुभवी पालकांना 'डोंबल!घंटा!!सगळं स्वतः म्हणे!!' असे उद्गार ऐकू येतात.

लहान मुलांनी पानातली पालेभाजी पूर्ण संपवतानाचा व्हिडीओ पाठवा,लहान मुलांनी स्वतः केलेला खेळण्याचा पसारा आवरण्याचा व्हिडीओ पाठवा अश्या स्पर्धा शाळा कधी ठेवणार बरं?
- अनुराधा कुलकर्णी