या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Friday 2 March 2007

तात्पर्यकथाः दोन गाढवे

(इमेलमधून आलेली कथा. मूळ लेखक अज्ञात.)

कोणे एके काळी एका धोब्याकडे दोन गाढवे होतीः गाढव क आणि गाढव ख. दोघांना सारखाच भार वाहून न्यायचा होता. क ने विचार केला की आपण मालकाला प्रभावित करु. म्हणून क ने जास्त ओझे वहायला सुरुवात केली. मालक खूष झाला आणि त्याने ख कडून पण जास्त ओझे वाहण्याची अपेक्षा करायला सुरुवात केली. ख जास्त ओझे वाहू शकला नाही. म्हणून मालकाने त्याला मारले.

त्या दिवशी ख क ला रडत म्हणाला, 'तू असं का करतोस? आपण दोघंही पूर्वीइतकं ओझं वाहून मजेत राहू.'
पण क ने ऐकलं नाही. क ने आता जास्त आणखी ओझं घेऊन धावायला सुरुवात केली. मालक क वर खूष झाला आणि ख असं का करत नाही म्हणून ख वर रागावला. असेच काही दिवस गेले. मालक ख वर खूप चिडला होता. एक दिवस जास्त ओझं वाहत नाही म्हणून त्याला मालकाने मारुन मारुन ख मरुन गेला.

क आता आनंदी झाला कारण आता त्याचा एकाधिकार होता. पण मालकाने क चे कर्तृत्व पाहून त्याला ख चं पण ओझं द्यायला सुरुवात केली. आणि त्याला ते घेऊन धावावं पण लागत होतं. असे काही दिवस गेल्यावर क ची पाठ दुखायला लागली. इतकं ओझं त्याला झेपेनासं झालं. मालक क वर पण चिडला आणि मालकाने क ला एक दिवस मारुन मारुन क पण मेला.

मालक नव्या गाढवांच्या शोधात निघाला!
तात्पर्येः
१. अशा मालकांनी शक्यतो गाढवं स्वस्त मिळतील अशा जागी वास्तव्य करावे.
२. हाताखालील प्रत्येक सहकाऱ्याला सारखी वागणूक द्यावी आणि प्रत्येकाची कुवत समान मानावी.
३. ओझे बरोबरीने वहावे व आपल्या मालकापुढे जास्त प्रभाव पाडण्यासाठी अतिशहाणपण करु नये.
४. आपला सहकारी संकटात असेल तर त्यात आनंद मानू नये.
५. अतिकष्ट करु नये, हुशारीने काम करावे.
६. गाढवांनी आपली संघटना स्थापन करुन मालकांवर नजर ठेवावी.
७. मालकाने गाढवांच्या कामाचा 'टाईम स्टडी' करुन जास्तीत जास्त फायदा मिळेल अशाप्रकारे गाढवांचे ओझे व वेग ठरवण्यासाठी समिती नेमावी.
८. गाढवांनी कायद्याचे पूर्ण ज्ञान मिळवून मालकावर 'हॅरासमेंट चार्ज' लावावे.
९. एका गाढवाने शक्यतो आपल्या अगदी जवळच्या नात्यातले गाढव असेल तिथे काम करणे पसंत करावे,म्हणजे स्पर्धा सौम्य होईल.
१०. मालकाने योग्य 'मॅनपॉवर सर्च' सल्लागार कचेरीला कंत्राट देऊन जास्तीत जास्त ओझं वाहू शकणारी 'क्वालिटी' गाढवं निवडावी.
११. जगात गाढवांना तोटा नाही, तस्मात् मालकांनो, आपल्या फायद्याचं बघा,गाढवांचा विचार करु नका.
(हेच नियम कंपन्या आणि त्यातले कर्मचारी यांना लावून बघा बरं!!हल्ली जास्तीत जास्त गाढवं मिळवून त्यांना राबवणंच चालू आहे सगळ्या कंपन्यांचं.)
-अनुराधा कुलकर्णी

2 comments:

चित्तरंजन भट said...

अनुताई,


तुमचा ब्लॉग अतिशय आवडला. फाफॉमध्ये काही ठिकाणी अक्षरे तुटतात.
स्टाइलशीटमध्ये line-spacing जिथे दिसेल तिथून त्याला हद्दपार करावे

तुमचा ब्लॉग वाचणाऱ्यांसाठी माहिती

कविवर्य सुरेश भट ह्यांच्या नावाने संकेतस्थळ नुकतेच सुरू झाले आहे. मराठी गझल आणि कविवर्य सुरेश भट ह्यांना समर्पित असे हे संकेतस्थळ आहे. www.sureshbhat.in आणि www.sureshbhat.com ह्या दोन पत्त्यांवरून ह्या संकेतस्थळाला भेट देता येईल.

चित्तरंजन भट

Kaleidoscope said...

तुमचे लिखाण खुप छान असते. "मनोगत" मधे मी ते बर्‍याचदा वाचलेले आहे. तुमची लेखन शैली मला फार आवडते. ब्लॉग ही छान आहे. असेच लिहीत रहा ही शुभेच्छा..!!

-गणेश पवार