या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Wednesday 24 January 2007

एका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा

अधिक चांगल्या संदर्भांसाठी यापूर्वी वाचा: वरचा लेख

'आपण शोधत असलेली वस्तू आपल्याला शोधाच्या सर्वात शेवटी का सापडते?'
'सोपं आहे. वस्तू सापडल्यावर आपण शोधणे थांबवत असल्याने वस्तू सापडण्याची क्रिया नेहमी शेवटच्या क्रमांकालाच येणार.'
'बरं मग समजा वस्तू शोधाच्या शेवटीच सापडू नये, आधीच सापडावी म्हणून आपण काय करु शकतो?'
'अं..... साधा सोपा पर्याय म्हणजे वस्तू सापडल्यानंतर पण शोधत रहायचं. म्हणजे वस्तू शोधाच्या 'शेवटी' सापडली असं होणार नाही.'(हाय की नाय अक्कल?)
'मग प्रोग्रॅममधली चूक शोधाच्या शेवटीच कशीबशी सापडते त्याला पण असंच करता येईल ना? चूक सापडल्यावर पण तीच चूक एक दोन दिवस शोधत बसायचं. म्हणजे चूक 'शेवटी' सापडल्याची खंत मनात राहणार नाही.'

हल्ली, म्हणजे प्रोग्राममध्ये बग सापडल्यापासून अस्से छान छान प्रतिभावान विचार डोक्यात येतात बघा. माझा 'आभासी पिकासो'(म्हणजे पिकासो जसा 'ऍबस्ट्रॅक्ट' चित्रं काढायचा तसा 'ऍबस्ट्रॅक्ट' विचार करणारा.) होत चाललाय का?

झालं असं,प्रोग्रॅममधली चूक जवळजवळ सापडत आली. आणि मग टुकार कॉफी घ्यायला जात असताना माझ्या डोक्यात विचारांचे तेज:पुंज कण चमकायला लागले. मुळात प्रोग्राममध्ये चूक राहतेच कशी? ती न रहावी किंवा राहिली तर पटकन सापडावी(म्हणजे असं बघा, साहेबाने विचारलं 'ही चूक का आहे?' की त्याला झटकन सांगता यावं, 'प्रोग्रॅममधल्या अमुक भागाच्या एक हजार सातशे एकूणसाठाव्या ओळीमध्ये ध चा मा केला की ही चूक राहणार नाही.') म्हणून काय काय करता येईल बरं? असा दिव्य विचार करताना मला हे पर्याय सापडले बघा. तुम्हाला पण उपयोगी पडतील या महान परोपकारी हेतूने हे 'हेटाळा वटाळा घोटाळा' (डोन्ट'स टू ऍव्हॉइड बग्स) माहितीपत्रक तयार केलं.

१. प्रोग्राम लिहीताना जागे रहावे.
२. झोप लागल्यास कळफलकावर हात ठेवून झोपू नये. झोपलेल्या हाताने जी अक्षरे दाबली जातात त्यानंतर एखादे ctrl s दाबले गेले तर प्रोग्रॅममधल्या चुका शोधणं कितीही तास/दिवस खाऊ शकतं.
३. जेवणाच्या सुट्टीत जेवायला जाताना संगणक ctrl+alt+del करुन त्याला कुलूप लावूनच जावे. एखादा कर्तव्यदक्ष शिपाई तितक्या वेळात कळफलक मन आणि जोर लावून पुसतो आणि त्यातून प्रोग्राममध्ये झालेली अक्षरांची भेसळ अप्रतिम बेमालूम होते.
४. साहेबाचे लक्ष गेल्यास पंचाईत होऊ नये म्हणून लांब इपत्रे प्रोग्रामच्या खिडकीत प्रोग्रामच्या खाली टंकीत करुन ठेवण्याची सवय टाळावी.
५. आजूबाजूला कचेरी राजकारण विषयक गप्पा चालू असल्यास त्यात भाग घ्यावा. मन आवरुन प्रोग्राम लिहीत बसू नये. त्याने प्रोग्राममध्ये नकळत 'नालायक व्यवस्थापन', 'वेडा साहेब' असे शब्द टंकिले जाऊन चुकांची शक्यता वाढते.
६. निबंध लिहावा लागला तरी चालेल, पण प्रोग्राममध्ये भरपूर टिप्पणी लिहाव्यात. अमुक एक बदल केल्यावर खाली दुर्लक्षचिन्हांमध्ये 'हा बदल अमुक एक तारखेला अमुक वाजता अमुक कारणाने आणि अमुक माणसाच्या सुचवणीवरुन/स्वखुशीने केला' हे लिहिण्यास कितीही कंटाळा आला तरी लिहावे. अजून तपशिलात माहिती/आठवण हवी असल्यास 'त्या दिवशी साहेबाने त्या अमक्याला सर्वांसमोर झापले होते/भरपूर पगारवाढ दिली होती/उपाहारगृहातील खाणे अप्रतिम होते' अशा दुर्मिळ ऐतिहासिक घटनाही नमूद केल्यास उत्तम.
७. अमुक एक चूक गिऱ्हाईकाच्या फायद्याची कशी ठरेल त्याचा अभ्यास करुन ठेवणे.
८. प्रोग्राममध्ये १०० चुका आढळल्यास दर एक चूक दुरुस्त झाल्यावर प्रोग्रामची प्रत करुन ठेवावी. संगणकाचा साठवणीचा बोजा वाढल्याची खंत करु नये. एक चूक दुरुस्त करताना दुसरी निर्माण झाली असे ९९ वेळा झाल्यास ते शोधणे महाकठीण.
९. गिऱ्हाईकाला अवास्तव वचने देण्यापासून साहेबाला हिरीरीने रोखावे. 'आम्ही असे करुन देऊ की बटण दाबल्यावर तुमच्या डोळ्यासमोर महाल उभा राहील' अशी वचने देण्याचा मोह जबरदस्त असतो. मुळात गिऱ्हाईकाचे २ खोल्यांच्या घरावर भागत असल्यास त्याच खर्चात त्याला महाल देण्याच्या वल्गना 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' म्हणून कितीही छान वाटल्या तरी गवंड्यांच्या कौशल्याला पैसे व वेळाच्या मर्यादा असतात.

बोला, आवडले की नाही 'हेटाळा वटाळा घोटाळा' माहितीपत्रक?
(- अनुराधा कुलकर्णी)

5 comments:

Kaustubh said...

:)) लेखनशैली आवडली.

टिप्पण्या लिहिणे (Commenting) खरोखरच फार महत्ताचे असते मात्र.
मी Engineering नंतर एक वर्ष Sybase मधे होतो. तिथे अगदी भरपूर Commenting करावं लागे.
कंटाळवाणं काम असलं तरी काही लोकं विनोदबुद्धी शाबूत ठेवून Commenting करत. म्हणजे काहीतरी नवीन Functionality टाकली,की ती टाकताना आलेला वैताग,त्रास हे तिथेच लिहून ठेवत. नवीन कोणी त्यावर काम करणारा आला तर त्याला त्रास होऊ नये म्हणून काही Dos आणि Donts तिथेच लिहून ठेवत. अगदी विनोदी रितीने.

बऱ्याचदा कंटाळलो असलो तरी असल्या भन्नाट Comments वाचून काम करायचा हुरूप यायचा. :)

a Sane man said...

haaaha...hausn hasun pure vaaT....heTaLa vaTaLa ghoTaLa mahitipatrkatil shevaTachi nond apratim....:D

kebyaa said...

baapre.. bass aata 3 post vachlyat... aata nahi hasan shakya ;)


६. निबंध लिहावा लागला तरी चालेल, पण प्रोग्राममध्ये भरपूर टिप्पणी लिहाव्यात. अमुक एक बदल केल्यावर खाली दुर्लक्षचिन्हांमध्ये 'हा बदल अमुक एक तारखेला अमुक वाजता अमुक कारणाने आणि अमुक माणसाच्या सुचवणीवरुन/स्वखुशीने केला' हे लिहिण्यास कितीही कंटाळा आला तरी लिहावे. अजून तपशिलात माहिती/आठवण हवी असल्यास 'त्या दिवशी साहेबाने त्या अमक्याला सर्वांसमोर झापले होते/भरपूर पगारवाढ दिली होती/उपाहारगृहातील खाणे अप्रतिम होते' अशा दुर्मिळ ऐतिहासिक घटनाही नमूद केल्यास उत्तम. ;)

हेरंब said...

झक्कास ... दुसरा शब्दच नाही..

अपर्णा said...

ekdam khataru....shevat tar ekdam maar daala..... गवंड्यांच्या कौशल्याला पैसे व वेळाच्या मर्यादा असतात.