या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Wednesday 24 January 2007

एका प्रोग्रामरची 'अनु'दिनी

ctrl + alt +del चाव्या तावातावाने दाबून 'संगणकाला कुलूप लावा' वर टिचकी मारून मी तिसरा बेचव कॉफीचा कागदी पेला घेऊन यायला चहाकॉफीयंत्राकडे कुच केले. आमच्या कॅटीया युनिग्राफिक्स आणि सॅप च्या ८० जणांच्या जगात जावा प्रोग्रॅमिंग करणाऱ्या दोघांपैकी मी एक आहे. त्यामुळे आमच्या कचेरीत माझी योग्यता नासातल्या रॉकेट शास्त्रज्ञाइतकी किंवा मादाम क्यूरीइतकी किंवा 'सी' चा बाप डेनिस रिची याच्याइतकी आहे. (असं (फक्त) मी(च) समजते. पगार कम मिळ्या तो क्या हुवा? आय ऍम द ब्रेन बिहाइंड जावा प्रोजेक्ट!)

पण आज तंत्र जरा बिघडलंच होतं. माझ्या चांगलं लक्षात आहे, नेहमी प्रकल्प पूर्ण होत आला आणि सगळं छान वेळात पूर्ण झाल्याच्या खुशीत साहेबाला 'उद्या प्रकल्प जर्मनीला ग्राहकाकडे पाठवू.' असं सांगितल्यावर अचानक हे असं तंत्र बिघडतं. साहेबाने डोळ्यात तेल घालून तपासल्यावर अचानक प्रोग्रॅम चुकीची गणिते करायला लागतो. 'या गणिताचे उत्तर अनंत आहे' असे संदेश द्यायला लागतो. कधी प्रोग्रॅम सर्व उत्तरं शून्य देतो..कधी बटणाला टिचकी मारल्यावर स्वत:च अनंतात विलीन होतो आणि त्याला ctrl+alt+del आणि end task करून स्वतःच्या हाताने यमसदनी धाडावे लागते. पुढे सरकून संगणकाच्या पडद्यावर डोकं आपटावंसं वाटतं. मोठ्याने ओरडावंसं वाटतं. 'अरे दुष्टा, काल परवापर्यंत तर तू नीट चालत होता. शहाण्या बाळासारखा वागत होतास. आज मी फक्त आंग्ल भाषेबरोबर जर्मन भाषेत GUI दिसण्याचे फेरफार केले तर तू आधीचं सगळं विसरून गणितं चुकवायला लागलास? उद्या जर्मनीला पाठवेपर्यंत नीट वागला असतास तर माझा शनिवार रविवार चांगला गेला असता ना?अवलक्षणी कार्टा मेला!'

विमनस्कपणे कॉफीयंत्राकडे जाताना मन परत उदास होतं. का बरं असं? आज शुक्रवार संध्याकाळ. सगळी मंडळी फुलपाखराच्या तरंगत्या चालीने दारं उघडून घरी जातायत..तिकडे स्वागतकक्षावर मीता उशिरा आल्याने रोजचे नऊ तास पूर्ण करायला अजून एक तास असल्याने सिडने शेल्डन वाचते आहे.सडीफटिंग मुलं मन लावून याहू/विकिपीडिया/इसकाळ/लोकसत्ता/इकॉ.टाइम्स वाचतायत.आगगाडीने घरी जाणारी मंडळी घोळक्याने घड्याळं पाहत पळतायत. शिपाई मंडळी गणवेश बदलून रंगीत कपडे घालतायत. मग आम्हीच रे कसे असे कर्मदरिद्री? आता बसा डोकं आपटत आणि प्रोग्रॅममधल्या चुका शोधत. असं का? परत तर्कशुद्ध मन 'असं का' ची संभाव्य उत्तरं शोधायला लागतं. त्याला बरेच पर्याय सापडतात आणि एका क्षणात हे पर्याय डोक्यात चमकवून ते परत झोपा काढायला लागतं:
प) अनुला डोकं नाही.
फ) सुरुवातीपासून जर्मन भाषेतली आज्ञावली समांतर सुरू का नाही केली?
ब) नशीबच दरिद्री!
भ) जावाचं योग्य प्रशिक्षण घेतलं नाही.
म) मूर्ख बावळट कोणीकडची! जा आणि बस इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिझाइन/टेस्टिंग/सोल्डरींग करत! प्रोग्रॅमर बनायची तुझी लायकीच नाही!
य) गिऱ्हाईकाने जर्मन भाषा मागितली नसताना त्याला जर्मन भाषेतली आज्ञावली करून दिलीच पाहिजे असं सांगणारी मंडळी वेडी आहेत.
र) दुखी मन मेरे, सुन मेरा कहना ऽऽ जहाँ नही पैसा.. वहाँ नही रहना ऽऽ
ल) दिल पे मत ले यार! जम्या तो जम्या! नाहीतर काहीतरी लपेटून देऊन टाक. तसे पण गिऱ्हाईक दोन दोन महिने पाठवलेल्या आज्ञावलीकडे ढुंकूनही पाहत नाहीयेत.
व) पुढच्या वेळी या चुका करू नकोस. कामात लक्ष दे. चांगल्या पगाराची नोकरी आणि या कचेरीच्या कंत्राटातून मुक्ती मिळेपर्यंत कळ सोस.

'मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर ॥' तर हे आमचं मनरूपी ढोर (गाढव) प्रोग्रॅम पूर्ण होत आला की भरकटायला लागतं. मग काम पूर्ण झाल्याच्या आनंदात झोप यायला लागते. अचानक भ्रमणध्वनीवर धपाधप नंबर फिरवून गप्पा मारल्या जातात. अगदी 'आझाद पंछी' बनून हवेत तरंगावंसं वाटतं..प्रसाधनकक्षात जाऊन केस विंचरण्यात आणि स्त्रीवर्गाबरोबर गप्पा मारण्यात वेळ घालवला जातो.. आणि कचेरी सुटायला १५ मिनिटं असताना साहेबाकडून कळतं की अजून काही सुधारणा हव्या. मुळात यांत्रिकीच्या क्लिष्ट गणितांचे प्रोग्रॅम म्या अज्ञ इलेक्ट्रॉनिक अभियंत्याकडून करून घेणाऱ्या (प्रोजेक्ट लीडर) देवाची लीला अगाध आहे! गणितं समजणारा मेंदू एक,फोरट्रानचा गंधही नसताना जुन्या फोरट्रान आज्ञावलीवरून नवीन जावामध्ये गणिताची आज्ञावली बनवणारा मेंदू दुसरा..२० वर्षापूर्वीच्या जर्मनीत फोरट्रानच्या आज्ञावल्या बनवणारा आणि आता नोकरी सोडून गेलेला मेंदू तिसराच.. त्यात गंमत म्हणजे गणितं समजणारा मेंदू 'या मेंदूचे जास्त कामाचे तास या प्रोजेक्टमध्ये नकोत' म्हणून बऱ्याचदा शांत आणि तिसऱ्याच स्वरूपाच्या कामांमध्ये मग्न. 'द्येवा, बाबा, सोडव रे राया! पुढच्या जन्मी घरी बसून पापड लोणची मसाल्याचा उपयोग करीन! वडापावची गाडी टाकीन. क्रोशाची स्वेटरं विणीन. चकल्या तयार करून विकीन. पण हा प्रोग्रॅमरचा जन्म नको रे बाप्पा!' म्हणून आळशी मन विव्हळतं. तर्कशुद्ध मन गुरगुरतं, 'गपे! प्रोग्रॅमर आहेस म्हणून गाठीशी चार पैसे जास्त लागतायत! वातानुकूलित कचेरीत बसते आहेस! चांगला एक्सपी खिडक्या असलेल्या संगणक आहे. खाण्यात 'व्हेज ५६' आणि 'मटर पनीर' मिळतंय. संगणकाला आंतरजाल भ्रमण सोय आहे! जा बरं सगळं सोडून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये! बस कपॅसिटर आणि अँप्लीफायर डिझाइन करत.. मग कळेल.'

कॉफीयंत्रातली कमीत कमी दूधवाली टुकार कॉफी घेऊन मी परत जागेवर येते. जागेवर येऊन चपला काढून नाकाला थोडं व्हिक्स लावल्यावर(सर्दी नाही! आम्ही दु:खी झाल्यावर नाकाला व डोक्याला व्हिक्स लावतो. ती आमची सवय आहे. (पुढेमागे 'थोर शास्त्रज्ञांच्या आठवणी' मध्ये कोणी 'त्या काही सुचेनासे झाले की नाकाला व्हिक्स लावत असत' असं कोणी माझ्याबद्दल लिहील का?)) मनाला परत उभारी येते.'हा प्रोग्रॅम माझं बाळ आहे(इटस माय क्रिएशन.) शेवटी किती झालं तरी आपला तो बाब्या! सगळं व्यवस्थित होईल. चूक सापडेल. आणि नाही सापडली तर उद्या सापडेल.कूल, मॅन!' असं म्हणून मन ठिकाणावर येतं. आंतरजालाची मोहवणारी खिडकी बंद करून आणि घरच्या छान चहाची तल्लफ बाजूला सारून कडवट कॉफीचे गुटके घेत हात परत आज्ञा खिडकीत टंकू लागतात...
javac *.java
enter
(- अनुराधा कुलकर्णी)

6 comments:

Ashintosh said...

स्वागत.

आर. एस. एस. ची फ़ीड ही सुरू करा लवकरच.

तो

Kaustubh said...

:))

खरं सांगू का? कामावर वैतागू नका. तुमच्याकडे काहीतरी काम आहे, आणि ते गणित बिणित असल्याने चांगलं असावं असंही दिसतंय तुमच्या लिखाणावरून.
माझ्या मित्रांपैकी बरीच लोकं नुसती बसून आहेत. काम मिळण्याची वाट पाहत. :)

स्वत:ला एकट्यानेच का होईना पण डेनिस रिची समजण्यात पण शेवटी एक सुख आहे. नाही का? ;)

तुमचे इतरही लेख वाचेन सवड मिळेल तशी.

Abhijit Bathe said...

Good!

Now I have a feeling how annoyed you would be to find so many comments - but cant help it.

Got to read all the posts!

prashant phalle said...

Sahi lihites tu...
Pu La ncha ek kissa ahe..Paliv Prani madhil..."jya kuna truck valycha truck chya chakakhali ti chalvadi kutri meli asel tyachi dadhi kurvalavi asa vatata"
Tasach..tuze hath hatat ghvyvese vatata..
Sadhya amhihi bakavar basun kamachi vat pahatoy[kamachi vat lavnyasathi??]

kebyaa said...

hasun hasun pure vat... itaki ki zop udali ;)

Tessa said...

This is a great post thaanks