या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 5 March 2007

अभ्यासाचं भिजत घोंगडं

धाप्प!!!रात्रीच्या नीरव शांततेत आवाज घुमला आणि मी दचकून जागी झाले. अर्धा किलो वजनाचं 'पॉइंटर्स इन सी' वेडंवाकडं मुरगळून हातातून खाली पडलं होतं. अभ्यासाचं पुस्तक पडून वाचताना दहा मिनीटात 'नीरव शांतता' 'रव अशांतता' बनते आणि त्यात माझ्या घोरण्याचे 'खूऽऽ श्यू ऽऽ' किंवा तत्सम उच्चार वातावरणात घुमतात असं आसपासची मंडळी म्हणातात पण मी तिकडे लक्ष देत नाही बाई. माझ्यासारख्या सुंदर(??) बायका कधी घोरतात का?

नोकरीसाठी बनवलेल्या व्यक्तीगत माहितीपत्रकाला (याला हल्लीच्या 'ट्रेंड लँग्वेजमधे' 'रेस्युमे' म्हणतात बरं!) मुद्रीत करताना अचानक शोध लागतो, 'अरे, इथे 'स्किलसेट' सदरात एकच ओळ भरते आहे. चांगली नाही दिसत. तीन ओळी तरी भरायला हव्यात बुवा' आणि मग मनात तयार होतो एक दृढनिश्चय. 'ठरलं तर. आजपासून अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. कचेरीत जेवण लवकर उरकून संगणकावर अभ्यास. घरी कुकर लावल्यावर वीस मिनीटं अभ्यास. रात्री जेवणानंतर २ तास अभ्यास. सहा महिन्यात 'रेस्युमे' मध्ये घाऊक प्रमाणात स्किलसेट भरती झालेच पाहिजेत!'

अभ्यासाबाबत असे अनेक दृढनिश्चय मी नेहमी करते हो. अभियांत्रिकी शिक्षणात सुद्धा परिक्षांच्या वेळी सर्व वीर रात्री बारापर्यंत एक एक करुन गळायचे पण अस्मादिकांचा दृढनिश्चय तसाच्या तसा. 'आज रात्री फुल नाईट मारायची, पहाटे सहा पर्यंत विषय पूर्ण, मग १ तास झोपायचं आणि पुढे पेपराची घंटा वाजेपर्यंत चांगली उजळणी.' म्हणून वसतीगृहात खुर्ची अंगणात घेऊन एक उशी टेकायला, एक लाकडाचा तक्ता खाली धरायला, एखादं दिड दोन किलो वजनाचं पुस्तक, लागल्यास शेजारी रफ वही, पेन,पेन्सिल अश्या जय्यत तयारीनिशी पेपराच्या आदल्या दिवशी अभ्यासाचा श्रीगणेशा होई. बारा वाजेपर्यंत मैत्रिणी, जेवण, कालच्या पेपराबद्दल प्रत्येकीचा अंदाज, गप्पांच्या ओघात एखाद्या 'वर्ग-अबंधू' चा निघालेला विषय इ.इ. होई. बारा वाजता मन अभ्यासाच्या स्फूर्तीने भरून जाई. 'चला आता झकास चहा पिऊन तोंड धुवून सुरुवात. उद्याच्या पेपरात किमान पाच पुरवण्या तरी लिहीणार.'

थोडा वेळ अभ्यास कर, पाय मोकळे करुन ये, भूक लागली म्हणून '२ मिनीट शेवया' बनवून खाणे असं करत दोन वाजले की 'आता आत जाऊन पडून वाचूया. मन शांत आणि आरामात असताना अभ्यास चांगला होतो.' म्हणून सर्व चंबूगबाळे खोलीत नेलं जाई. खाटेशेजारी पाणी, दोन पुस्तके, आडवं पडून पोटावर एक गलेलठ्ठ पुस्तक अशा थाटात 'आरामात अभ्यास' सुरु होई. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पाळला जाऊन अर्ध्या तासात पुस्तक पोटावर १८० अंशात आडवं आणि आमची स्वारी पऱ्यांच्या राज्यात जाई. आता एखाद्या परीने 'फायबर ऑप्टीक्स' पुस्तकासारखा लाल वायरींचं चित्र असलेला झगा घातला आहे किंवा दुसऱ्या परीच्या हातात पुरवण्यांचा आणि ट्वाईनच्या दोऱ्यांचा गठ्ठा आहे असं कधीकधी वाटायचं, पण स्वप्नातच 'हॅ! काहीतरी काय? हे स्वप्न आहे. इथल्या गोष्टी खऱ्या नसतात काही!' म्हणून 'आराम' चालू रहायचा.

हा हा म्हणता शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीच्या भवसागरात हातपाय मारायला सुरुवात केली. वाटलं, आता अभ्यास बिभ्यास नाही. छान कधीही गोष्टीची पुस्तकं वाचावी. काम काय, कचेरीत वरिष्ठ शिकवतीलच. पण कसचं काय? 'हे नविन तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे. हे माहितीपत्रक. नीट अभ्यास करुन कसं वापरायचं वगैरे शिकून घ्या आणि उद्या मी तुमच्याकडून शिकून घेईन.' आता साहेब शिकणार म्हटल्यावर 'गुंडाळणे' वगैरे बाजूला ठेऊन झक्कत आणि सखोल अभ्यास करणं आलं. पुढे पुढे शिकणंही कमी झालं, पण स्वतःच्याच शिकण्याच्या गरजा वाढत गेल्या. 'जग पुढे चाललं आहे. जर या स्पर्धेत मागे रहायचं नसेल तर ज्ञान कायम अद्यावत हवं' म्हणून सी ++ शिका, अमकं शिका, तमकं शिका ची कधी न संपणारी शर्यत सुरु झाली. सोबत घरी 'पुरणपोळी शिका,लोणची शिकून घ्या,भरलं वांगं आमच्या पद्धतीने शिकून घ्या,दगड न बनवता ईडलीसारखी ईडली घरी बनवायला शिका,कधी कडक न होणाऱ्या मऊसूत पोळ्या शिका' इ.इ. 'अद्ययावतीकरण' प्रकार होतेच.

तरीही दृढनिश्चय म्हणजे दृढनिश्चय!! मग कपाटात वरच्या खणात ठेवलेले गठ्ठे बाहेर निघतात. अभ्यासात सर्वात महत्वाची पायरी म्हणजे पुस्तकांना कव्हरं घालणे आणि खुणा करायला पेन्सिल शोधणे. हा 'शोधणं' प्रकार जादूगाराच्या खिशातल्या रिबनीसारखा लांबत जातो. 'कव्हरं घालायला पुरुषमंडळींची गुळगुळीत गाड्यांची मासिकं शोधा, वर घालायला प्लॅस्टीकसाठी कालची किराण्यातली गव्हाची मोठी प्लॅ. पि. कातरा.(आता यात बऱ्याच उपशाखा येतात. ते बेपिशवी गहू परत ठेवायला रिकामा डबा शोधणे, कात्री शोधणे,डब्यात टाकता सांडलेले गहू हलक्या हाताने उचलून वेगळे ठेवणे), नंतर चिकटपट्टी शोधा. (चिकटपट्टी मिळते, पण तिचे सर्व कपडे निघून गुंडाळीला फक्त शेवटचा पांढरा कागद शिल्लक असतो.),स्टॅपलरच्या पिना शोधा, त्या नेहमीप्रमाने संपलेल्या असतातच. मग जुन्या कव्हराच्या पिना हलक्या हाताने काढून हाताच्या कारागिरीने त्या नविन कव्हरात खुपसणे' इ.इ.

रात्री उशीवर पडून पुस्तक हातात घेणार तोच.. 'चॅलेंज २००६! अगर आप चाहते है की मै जीत जाऊ तो प्लीज प्लीज प्लीज वोट किजीये, टाईप किजीये ए बी सी और एस.एम.एस. किजीये ७५७५ पर' वाला गीत कार्यक्रम सुरु होतो. आणि पुस्तक घेऊन मोर्चा बाहेर जातो. 'बघू तरी सुनित जिंकतो का इंद्रजीत!' म्हणून हिरीरीने पैजा लावल्या जातात. अभ्यासाचं घोंगडं भिजत पडलेलं असतं.

शनिवारी सकाळी सकाळी लवकर चहा इ. आवरुन निवांत 'जावा-शेंग लियांग' हातात घ्यावं तितक्यात दारावरची घंटी शुभवर्तमान घेऊन येते, 'ताई, लक्ष्मी ३ दिवस येनार न्हाय तिचा बा आजारी हाय.' झालं!! आता बसा भांडी घासत आणि धुणी धूत. जाऊदे, बाहेर जेवायला जाऊ आणि लवकर घरी येऊन अभ्यास करु. म्हणून नट्टापट्टा करायला घ्यावं तितक्यात नात्यातल्या कोण्यातरी चिंगीच्या बहिणीच्या वहिनीच्या नणंदेचा दूरध्वनी येतो, 'आता स्वारगेटात आहे. हे आणि मुलं पण आहेत. दहा मिनीटात घरी येतो.' 'मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस' ही म्हण चुकली बरं का! 'वूमन प्रपोजेस, रिलेटिव्ह डिस्पोजेस' अशी नविन म्हण बनवायला हवी.

भांडी, गप्पा, आईसस्क्रीम, गॉसिप,हाहा हीही हूहू संपून टाटा केल्यावर अस्मादिकांची स्वारी बिछान्यावर पडते. अरे, दाराला दुधाची पिशवी नाही लावली, सकाळी मनी येऊन पळवेल. अशी अनेक कामं आठवणीने केली जातात. अभ्यासाचं घोंगडं शेजारी भिजत पडलेलं असतं.

कचेरीत दिवस असाच चहापाणी, मिटींगा, यात सरत जातो. संध्याकाळी घरी येताना समोर मोठ्या पाटीवर 'माटे क्लासेस' ची जाहिरात दिसते आणि आठवतं, 'अरे, अभ्यासाचं पुस्तक कचेरीतच राहिलं आता घरी बसा टाळ कुटत.' त्या रात्री 'आर्ची कॉमिक्स' 'वपु' आणि 'पुल' खाटेवर ढिगारा करुन उभे राहतात आणि त्यांचा एक एक करुन फडशा पाडला जातो. बारा वाजतात पण डोळ्यावर झोपेचा टिप्पूस नाही! (पण मी म्हणते, नोकरी मुलाखतीत 'तुमचे आवडते पुस्तक आणी त्यातली गोष्ट' यावर का नाही विचारत?सी जावा काय, एकदा संगणकावर बसलं की बोटातून आपोआप टपकतंच की!!)

अशा प्रकारे अभ्यासाचं घोंगडं भिजत पडलं आहे. पण मी म्हणजे काय, दृढनिश्चय केला की यूं यूं शिकेन! फक्त आर्ची,वपु,पुल,चॅलेंज २००६,चिंगीच्या बहीणीच्या वहिनीची नणंद,लक्ष्मी यांना तेवढी कल्पना देऊन सावरुन घ्यायला सांगा म्हणजे अभ्यास फत्ते झालाच!!
-अनुराधा कुलकर्णी

5 comments:

Gayatri said...

फारच छान!
>>"वर्ग-अबंधू" :))
आणि तुझी कटाक्षाने मराठी शब्द वापरण्याची शैली आवडली खूप.

कोहम said...

hello anu....mala apalya dantakathanvar pratikriya dyayachi hoti pan manogatavar account ughadanyacha kahi margach sapadala nahi...tyamule ithe det aahe....atishay sundar....

Vidya Bhutkar said...

छान लिहिले आहे.माझ्या ब्लोगवर 'झोप' म्हणून एक पोस्ट आहे, बरीचशी मिळती-जुळती. :-) बाकी, मी ही असे अनेक निश्चय केले आणि तोडलेत.

Unknown said...

Hi anu,
Tumhi kharech changla lekh lihilela aahe. maze pan ase anek nishchay hote, pan aare sansar!! sansar!!
asso, ajun lihit ja,
what is ur email id

हेरंब said...

एकदम मस्त.. तुझी शैली खूप च छान आहे. एकदम pro वाटते...