या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Tuesday 3 April 2007

आवराआवरीचा क्रॉनिक आजार

रविवारचा सुंदर दिवस. सकाळचे ८.३०. 'टॅडॅडँग टॅडॅडँग'(आम्ही 'वेध भविष्याचे' ला त्याच्या संगीतावरुन हे नाव दिले आहे) ला अजून अर्धा तास वेळ आहे. बाहेर बदाबदा पाऊस पडतो आहे. कोणाच्याही आतेमामेभावाचं, भाच्याचं लग्न नाहीये. कोणीही विमा एजंट योजना समजवायला येणार नाहीये. कोणीही आपल्या नुकत्या झालेल्या परदेशदौऱ्याचे फोटो दाखवायला घरी येणार नाहीये. किंवा कोणीही घरी बोलावले नाहीये. नवऱ्याच्या चुलतमावसबहीण चिंगीचे मावसकाका पुण्यात चक्कर टाकून रविवारी घरी भेट देऊन जाणार नाहीयेत. आणि अशावेळी आतापर्यंत दबून राहिलेला आवराआवरीचा आजार डोकं वर काढतो.

सुरुवात होते ती कपड्याच्या कपाटापासून. 'शी, किती पसरलंय! आवरायलाच पाहिजे.' मग त्वेषाने सर्व कपडे खणातून खाली जमीनीवर भिरकावले जातात. नवरा पलंगावर आडवातिडवा लोळत पेपर वाचत असतो. तो घाबरुन उठतो. त्याच्यापुढे पुढचे दोन तास आवराआवर आणि 'वर चढून हे काढ, ते ठेव' चं भीषण आज्ञापालन दिसायला लागतं. 'आता हे काय काढलंस? घड्या तर होत्या ना कपड्यांच्या? मग का सगळे खाली टाकलेस? मुळात दर आठवड्याला कपडे अस्ताव्यस्त होतातच कसे? मिसमॅनेजमेंट.'
'बाबा रे, एकतर शांत पेपर वाच नाहीतर मला मदत कर.तुझे कपडे हँगरला असतात. तुला काय कळणार बायकी कपड्यांच्या रचारचीतल्या यातना? मी आज कपडे व्यवस्थित लावल्याशिवाय 'टॅडॅडँग टॅडॅडँग' बघणार नाहीये.तूच माझी रास बघून ठेव.'
'मी मदत करणार नाही. मी रचलेलं काही तुला पटत नाही. तुझं तू आवर, काय वाट्टेल तो गोंधळ घाल. मी बाहेर पेपर वाचतो.' नवऱ्याचे रणांगणातून पलायन.

लहानपणी आईला कपड्यांचं कपाट आवरताना बघायचे तेव्हा मी विचारायचे, 'आई, आपण जर एका खोलीत चार पाच मोठ्या दोऱ्या टांगल्या आणि कपडे कायम त्या दोऱ्यांवर ठेवले तर? घड्या करायचा आणि कपडे आवरायचा सवालच नाही!'
'इथे शहरात घरात माणसांना रहायला खोल्या मिळत नाहीत आणि तू कपड्यांना एका खोलीची गोष्ट करतेस. उद्या म्हणशील धुतलेली भांडी लावूच नकोस,एक मोठ्ठी टोपली आणून त्यातच धुऊन त्यातच राहूदे.'
'हो मी पुढे तेच सांगणार होते तुला.'
'महान आहेस. मोठी झालीस की कळेल हं तुला! आता मला काम करु देत.'

आता बायकांचे कपडे म्हणजे कसे विविधरंगी, विविधआकारी आणि सुळसुळीत. साहजिकच कपड्यांचा रचलेला बुरुज रोज खणातून कपडे ओढून काढताना ढासळणार. ढासळलेला बुरुज रोज तात्पुरता उभा राहणार. शेवटी एक अवस्था अशी येणार की बुरुज नुसती हवा लागली तरी ढासळेल. म्हणजे बुरुज परत दोन तास खर्च करुन नीट बांधणं आलं.

कपड्यांनंतर समोरचं अस्ताव्यस्त पसरलेलं टेबल भेडसावायला लागतं. नाहीतरी चार दिवसापूर्वी आलेलं बँकेचं चेकबुक शोधायचं असतं. त्यामुळे हेही काम 'आधी लगीन कोंडाण्याचं' मध्ये जातं. कागदं भसाभसा उपसली जातात.
'अरे आत ये आणि मला सांग तुझ्या कागदातलं काय काय फेकायचं आहे ते.'
'सध्या माझ्या कपाटात कोंब. मी पुढच्याच्या पुढच्या शनिवारी कपाट आवरणार आहे तेव्हा बघीन.' (नवरा 'शॉर्ट टर्म प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍप्रोच' चा उपयोग करुन पेपरवाचनातील व्यत्यय टाळतो.)
'आत ये आणि मला माळ्याच्या कपाटातल्या माझ्या अभ्यासाच्या जुन्या फायली काढून दे.'
'माळ्याचं कपाट' म्हटल्यावर नवऱ्याला काम टाळताही येत नाही कारण ते 'उंची' मुळे कायम त्याच्या वाट्याला गेलेलं.
'हे काय गं? सगळा पसारा एकाच दिवशी काढायलाच पाहिजे का? टेबल पुढच्या रविवारी आवरलं तर नाही का चालणार? आणि अजून किती कागदं गादीखाली दडपणार?गादीला आलेल्या टेंगळांनी पाठ दुखते. अशाने एक दिवस गादीखाली सर्व कागदं जाऊन आपण टेबलावर झोपायची वेळ येईल.'
'ते गादीखालचं मी आवरणार आहे पुढच्या रविवारी‌. सध्या राहूदेत.'

मग पुढे टप्प्याटप्प्याने 'सखू येईपर्यंत स्वयंपाकघरातलं शेल्फ आवरणे', 'फ्रिज साफ करणे' 'बाहेरचे रद्दीचे कपाट आवरणे' ही कामं वेळापत्रकावर येतात. आजार गंभीर स्वरुप धारण करु लागतो..
'मी केस कापून आणि वडे घेऊन येतो. तुझ्या आवरा आवरीत लवकर काही पोटात जाईल असं वाटत नाही.'
'अर्धा तास थांब आणि मी कपाटातली सॉर्टेड रद्दी देते ती घेऊन जा‌. सॉर्टेड रद्दीचे दोनचार रुपये जास्त मिळतील.'
'त्याच्यासाठी थांबलो तर न्हावी बंद होईल.रविवारी फक्त ३ तास उघडा असतो.' असं म्हणून नवऱ्याचे गनिमी काव्याने घराबाहेर प्रयाण.

तरी बरं का, हे शेल्फ एक महिन्यापूर्वी नव्हतं. तेव्हा इथल्या वस्तू कुठे असतील बरं? आता तर त्यांना दुसरी जागा पण नाही. वस्तू अशा जादूने द्याल तितकी सगळी जागा कशी व्यापतात?आता काढलेल्या वस्तू कुठे ठेवायच्या?हां, सध्या माळ्यावर टाकू. नंतर बघता येईल. म्हणून सर्व वस्तू माळ्यावर दडपल्या जातात.चादरी वॉशिंग मशिनात टाकून साबण आणायला न्हाणीघरात जावं तर न्हाणीघराच्या कपाटातून चार साबण आणि एक टूथपेस्ट आत्महत्या करते..देवा रे! मुळात इतके साबण शिल्लक राहतातच कसे? या घरातले लोक आंघोळ करतात की नाही?

'स्वयंपाकघर आवराआवरी' हा सर्वात भीषण प्रकार. घाई म्हणून, गरज लागेल म्हणून वेळोवेळी घेतलेल्या आणि जपलेल्या अनेक वस्तू आणि त्यांच्यामुळे होणारी अडथळ्याची शर्यत.'आवरायला कशापासून सुरु करायचं' हा सर्वात मोठा प्रश्न असतो. रांगत रांगत मी ओट्याखालच्या अरुंद जागेत जाते.
'जपून हं ढोले! तिथे अडकशील!'
'कळलं! इतकी विशाल झालेली नाही अजून मी.'
ओट्याखालचा संसार बघून मला भंगारवाल्याचा दुकानात आल्याचा भास होतो. तिथे नारळ, प्लॅस्टीकच्या पिशव्या, पोळपाट, विळी, मिक्सरचे खोके यांच्या गर्दीत जमिन दिसतच नसते. जरा अंधाराचा अंदाज घेऊन शोधाशोध करते तोच एक प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा मनोरा खाली कोसळतो. कोकाकोला, कधीकाळचे कोकम सरबत, मँगोला, बिस्लेरी अशा अनंत बाटल्या.
'काय हे? काहीतरी अडगळ जमा करुन ठेवत असतेस'
'इतके वाटते तर दर आठवड्याला कोकाकोला पित नको जाऊस.'
'बाटल्या मी फेकत असतो पिऊन. तू परत साबण घालून धुवून का ठेवतेस?'
'असू दे. पाहुणे आले की त्यांना जाताना पाणी न्यायला लागतात.'
'पण तोपर्यंत त्या १८५७ च्या बंडातल्या काळातल्या दिसतात ना! परवा ते काका धूळ जमलेली जुनाट बाटली बघून घाबरुन 'मी प्रवासात पाणी पित नाही' म्हणून तसेच निघाले ना!'
'असू देत. मला त्या अर्ध्या कापून त्यात फुलं ठेवायला लागतात'
'किती भिकार दिसतात अर्ध्या कापलेल्या बाटलीत ठेवलेली फुलं. त्या दिवशी अशीच कोपऱ्यात फळीवर ठेवलेली बाटली भर रात्री माझ्या डोक्यात पडून झोपेतून दचकून उठलो. बघतो तर डोक्यावर निशीगंधाची फुलं. बनियानवर पाणी आणि गादीवर चेपलेली कापलेली बाटली. यापुढे फुलं फळीवर अजिबात ठेवायची नाहीत. वाटलं तर फुलं गादीवर ठेव बहुमानाने. मी बापडा त्या ४ बाय ५ इंचाच्या फळीवर झोपतो. शेवटी काय, फुलं महत्वाची. नवरे काय, पैशाला पासरी मिळतात.'
अजिबात समजतच नाही या माणसांना! आता बाटल्या फेकायच्या आणि मग लागल्या की प्रवासात पाण्याच्या बाटल्यांना पंधरा पंधरा रुपये टिचवायचे. मी पण बाटल्या निमूट एका पिशवीत ठेवून कचऱ्याजवळ ठेवते. (नंतर गुपचूप परत ओट्याखाली!)

तितक्यात सासूबाई येतात. 'त्या श्रीखंडाच्या रिकाम्या डब्या फेकू नका हं! मला लागतात फराळ द्यायला.'
फ्रिजच्या आवरणाची लक्तरे झालेली. 'ए थांब ते फेकू नको! मी त्याचे चांगले भाग कापून शिवून मायक्रोवेव्हचे कपडे बनवणार आहे.'
'पण बाजारातून एक मायक्रोवेव्हचं कव्हर विकत आणायला प्रॉब्लेम काय आहे?'
'कशाला आणि खर्च?'

फ्रिजमधे सोड्याच्या बाटल्या, १८५७ मधील आले पाचक, कोकम सरबत, कधीकाळी केलेली मिरचीची चटणी, सॉसेस यांच्यासमोर मी हतबुद्ध होऊन खाली बसते. दुपार काय, संध्याकाळपर्यंत पण हा शीत डोंगर साफ व्हायचा नाही. मनाचा हिय्या करुन आधी भाजीच्या कप्प्यावरची काच धुवायला ओट्यावर टेकून ठेवते. दुसऱ्याक्षणी काच उभ्याची आडवी होऊन ओट्यावरील चहाच्या कपाचा मोरीत ढकलून खिमा करते.
'कुठे म्हणून न्यायची सोय नाही तुला. कायम फोडाफोडी. चांगले सहा एका रंगाचे कप फळीवर बघवतच नाहीत का तुला?'
'कप ओट्यावर कोणी ठेवला ते आठव.फळीवर ठेवला असतास तर हे असं झालं नसतं!'
'हो हो! तुम्ही कायम शहाणे. आम्ही मूर्ख. आधीच रविवारची अर्धी दुपार गेलीच आहे, उरलेली छान भांडणात घालवू.आता पुढच्या रविवारी ऑफिसात गेलो तर मला दोष नाही द्यायचा.' नवरा बाडबिस्तरा आवरुन संगणकाकडे मोर्चा वळवतो.

'हे काय? इस्त्रीला द्यायच्या कपड्यात माझा बनियान?उद्या फडकीही द्याल हो इस्त्रीला.' (अरे बापरे!काल कपडे घाईघाईत दांडीवरुन काढून न बघताच टाकले..)
'हो. आम्ही लंगोट्या पण देऊ इस्त्रीला. तुला काय करायचंय? स्वतः कधी काढतोस का कपडे?डोन्ट हाक शेळ्या सिटींग ऑन ऊंट.'
'आँ?? मी कपडे काढण्याचा इथे काय संबंध?'
'शब्दशः विनोद करुन वात नको आणूस रे. स्वतः दांडीवर वाळत टाकलेले कपडे दांडीवरुन काढतोस का? असं मी म्हणत होते.जा बाबा, तुझं काम कर. इथलं आवरलं की मी बोलावते जेवायला.'

समोरचे फ्रिजमधील ब्रम्हांड बघून आता आवराआवरीचा उत्साह जरा ओसरायला लागतो. मग धपाधप ओल्या फडक्याने पुसून १८५७ मधले सर्व पदार्थ तसेच्या तसे ठेवून मी फ्रिज बंद करते. ओटा आवरण्यासाठी ओट्यावरील दिसतील ती सर्व भांडी, तांब्याचा जग, पाण्याची टाकी सर्व धुवायला टाकते.
'अरे पण सखू आली का नाही अजून?'
तितक्यात बेल वाजते. 'सखूने पाठाव्लं. ती आजारी हाय. आज येनार नाय.'

'अरे देवा! आधी सांगायचं नाही का रे?आम्ही बाकी कामं जरा कमी केली असती..'
आता पुढे भांडी, मग यंत्रात धुणी..मग झाडू..माझ्या डोळ्यापुढे अंधार पसरतो.
सगळं आवरतं एकदाचं.
'हुश्श! यापुढे मी कमीत कमी पाच रविवार तरी काहीही आवरा आवरी करणार नाही.'
'तू काही करुच नकोस. पुढच्या रविवारी मी माझं कपाट आणि फायली आवरणार आहे. तू फक्त तिथे बसून काय काय कुठे कुठे ठेवायचं ते वेगळं काढ.'
(वाचवा!वाचवा! आवराआवरीचा आजार परत बळावला!)

(हा लेख सर्वप्रथम २००६ मधे मनोगत डॉट कॉमवर प्रकाशित.)

20 comments:

Gayatri said...

:)) jabaree!

मन कस्तुरी रे.. said...

फ़ार म्हणजे फ़ारच सुंदर लिहिलं आहेस.....
हे सर्व मी शब्दशः अनुभवलं आहे....

मला हे समजतच नाही की कपड्यांच कपाट पुन्हा जैसे थे कसं काय होतं........आणि ओट्याखालच्या वस्तूंचं वर्णन वाचून तर मला आमच्याच ओट्याखाली शिरल्या सारखं वाटलं....

स्त्रिया विनोदी लेखनात मागे आहेत हे बिरूद आता रद्द करायची वेळ आली आहे.....


फ़ार छान!

अश्विनी

nivant said...

Tu khup chhan lihites ... barach vachanyasarakha ahe...
marathi madhye lihayala mala shikala pahije...

Yogesh said...

sahee :)

HAREKRISHNAJI said...

बिच्चारा नवरा. रविवारचा सुद्धा आराम नाही.

सहज said...

ekdum 'Hasun_HAsun_Purewat' category hota ha...khup aavadala..masttttt ..:)

Unknown said...

jitka tuza likhan aprtim ahe...titakch kinwa tyhunahi tuze suwechar bhanaat...hasun hasu bejar...! kadhihi kantala asel tar tuza blog ha ek tonic cha ahe...thanks..:))

Tejaswini Lele said...

malaa khup daya ali ga tuzi he vachtana...:D
aamchi aai amhala asa hatakhali dharun rabavate....
itkae diwas mala vatayacha..amchyach aaila batlya sathvaychi haus aahe!! pan ata vachun jara husshh zala!!
aai ali ki tila ha blog vachayala dein.. :)
khup khup chhan lihilays...

Kamini Phadnis Kembhavi said...

'आई, आपण जर एका खोलीत चार पाच मोठ्या दोऱ्या टांगल्या आणि कपडे कायम त्या दोऱ्यांवर ठेवले तर? घड्या करायचा आणि कपडे आवरायचा सवालच नाही!'>>>>>

उद्या म्हणशील धुतलेली भांडी लावूच नकोस,एक मोठ्ठी टोपली आणून त्यातच धुऊन त्यातच राहूदे.'>>>
ही ही ही :P
अगदी अगदी,
जबरीच आवडलाय तुझा blog,

Samved said...

ही ही ही...आमच्या इथेही शेम टू शेम..
मस्तच

Unknown said...

'आई, आपण जर एका खोलीत चार पाच मोठ्या दोऱ्या टांगल्या आणि कपडे कायम त्या दोऱ्यांवर ठेवले तर? घड्या करायचा आणि कपडे आवरायचा सवालच नाही!'>>>>>

माझ्या एका (पुण्यातील) बहीणीकडे मुलांच्या बंकबेडच्या वरच्या मजल्याचा उपयोग खोली आवरायच्या वेळी नको असलेले कपडे वगैरे टाकण्यासाठी करतात. खालुन काहीही दिसत नाही. आम्ही त्या जागेला विहीर ( bottom less pit)म्हणतो.
माझी नाशीकची बहीणही हल्ली तीच्या बंकबेड्चा असाच उपयोग करते.

a Sane man said...

:):):).....bhannat...tumachi itarahi kahi likhaNa vachali...far kami ThikaNi aajkal changala vinodi vachayla miLata...tumcha blog khooN (bookmark) karun Thevlay tevhapasun pratyek raTaL kamanantar ughaDun vachla jatoy...:)

Anonymous said...

khupach chan!!!
hasaun bejar zale
agadi mazech anubhav vatale mal.
keep it up
khupach chan!!

- madhavi kulkarni

Anonymous said...

sundar lekh.mnapasun hasayla aale.

आल्हाद said...

No Comments..
चुकुन माझ्या आईनी "लेख आवडला" ही comment वाचली तर मला घरी जाउन पसारा करता येणार नाही मनसोक्त :)
anyway ...

आवरा-आवरीचं हे अस्सच होतं ...

मस्त बांधलत तुम्ही शब्दात

Anonymous said...

Anu , ekdum mast lekh... AawraAawri cha rog ekda balavla kee jaat nahi patkan .... tya dhulee mule aajar pan hotat lagech aani doctor kade wareee....

Aani navrya var tantan kamee kar jara... navre lokanna emotions nastaat pan chhal kela kee kalto tyanna....

Ek pate kee baat saangto.... navryala tyacha aawadta padartha khau ghal aani mag haluch aawara aawaree karayla saang.... narajee cha soor kamee hoil.

mazya mummy la jamlay... dad kapde dhutaat aamchya kade....

Anonymous said...

ekdam sahi....... :)

shilpa said...

sahich ahe.........majhya ghari pan shit kapatachi ashich halat aste ga....maja aali vachun.....mala te aavraycha pan faar kantala asto....asa watat ki Alibabachya guhet shirnar ahe ata mi...:)

हेरंब said...

हा हा हा ... काय सोल्लिड झालाय हा blog.. कपडे वाळत टाकायला ४-५ दोर्या आणि भांड्यानसाठी मोठ्ठ टोपली .. हा हा हा .. नवर्याच्या डोक्यावर flower pot आणि बनियान इस्त्रीला ... हा हा हा .. आणि भांडण वाचून धम्माल आली. माझ्या आणि बायकोच्या भांडणाची आठवण झाली. अगदी शेम तू शेम :)

Anonymous said...

hahaha sahi lihilay. mI nehamI waachate haa blog. paN tU khUp lihit jaa pls.