या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Friday 9 March 2007

होम्स कथाः पिशाच्चाचा पाय

गेले अनेक महिने होम्स कामात हरवून प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होता. अर्थातच त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर दिसल्यावाचून कसे राहतील? अखेर डॉ. मूर यांच्या सल्ल्याने, किंबहुना इशाऱ्याने होम्स हवापालटाला कबूल झाला, कारण जास्त दुर्लक्ष केल्यास परिस्थिती इतकी बिघडेल की काम पूर्ण सोडून द्यावे लागेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.

आम्ही इथे या शांत आणि रम्य खेड्यात काही दिवसांपासून राहत होतो. भोवतीचा निसर्ग, आराम आणि फिरणे यात दिवस घड्याळाचे भान न ठेवता चालले होते. शेजारच्या चर्चच्या धर्मगुरुशी होम्सची बऱ्यापैकी मैत्री झाली. या धर्मगुरुचा भाडेकरू मॉर्टीमर ही थोडाफार ओळखीचा झाला होता.

एके दिवशी मी आणि होम्स गप्पा मारत बसलो होतो, आणि अचानक धर्मगुरु आणि मॉर्टीमर घाईघाईत घरी आले. धर्मगुरुला धाप लागली होती. 'रात्रीत एक भयंकर प्रकार घडला आहे. आणि तुमच्या सारख्या प्रसिद्ध माणसाचे आम्हाला साहाय्य हवे आहे.' होम्सने त्यांना बसायला सांगितले. मॉर्टीमर धर्मगुरुपेक्षा कमी अस्वस्थ दिसत असला तरी त्याच्या हाताची चाळवाचाळव आणि डोळ्यातल्या भावांवरुन तोही हादरलेला दिसत होता. 'तुम्ही सांगता की मी सांगू?' मॉर्टीमर धर्मगुरुला म्हणाला. 'मॉर्टीमर, तुम्ही प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असल्याने तुम्ही जास्त चांगले वर्णन करू शकाल.' होम्सने सुचवले.

धर्मगुरु म्हणाला, 'मी थोडी सुरुवात करतो. काल रात्री मॉर्टीमर त्याचे दोन भाऊ आणि बहीण ब्रेंडाला भेटायला त्यांच्या घरी गेला होता. बऱ्याच दिवसांनी चौघे एकत्र भेटल्याने संध्याकाळ मजेत आणि गप्पात गेली.रात्री जेवणानंतर ते चौघे पत्ते खेळत बसले. मॉर्टीमरला काम असल्याने रात्री दहाच्या सुमारास त्याने त्यांचा निरोप घेतला. पहाटे मॉर्टीमर नेहमीप्रमाणे फिरायला गेला होता, तेंव्हा या भावांचा नोकर धावत धावत जाताना त्याला भेटला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून मॉर्टीमर परत त्या घरी गेला. बघतो तर काय, बहीण ब्रेंडा खुर्चीत मरून पडली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भितीचे भाव तसेच गोठले होते. आणि दोन्ही भाऊ वेड्यासारखे बरळत आणि एकमेकांना टाळ्या देत हसत होते. असं वाटत होतं की ते कशाच्यातरी धक्क्याने वेडे झाले आहेत.'

'मॉर्टीमर, तुम्हाला काय वाटतं, असं का झालं असावं?' होम्सने विचारलं.
'ही काहीतरी अमानवी घटना आहे, त्यांनी असं काहीतरी पाहिलं की ते भितीनेच वेडे झाले आणि ब्रेंडाचा अंत झाला.' धर्मगुरु म्हणाला.
'जर तसं असेल तर हे प्रकरण माझ्याही आवाक्याबाहेरचंच आहे, पण या निर्णयाप्रत येण्याआधी आपल्या सर्व शक्यता पडताळून पाहायला हव्यात.मॉर्टीमर, एक प्रश्न मला विचारावासा वाटतो तो म्हणजे तुम्ही या तिघांपासून वेगळे घर घेऊन का राहत होतात?'
'बऱ्याच पूर्वी आमच्यात काही कारणावरून मतभेद होते. पण आता ते सर्व मिटलेले होते.आणि आम्ही मिळून मिसळून होतो.'
'कालची रात्र नीट आठवून पाहा. तुम्हाला काही विशेष प्रसंग, किंवा माहिती आठवते का, ज्याचा या प्रकरणाशी संबंध असू शकेल?'
'अं, तसं काही विशेष नाही, पण काल रात्री खेळताना माझी पाठ खिडकीकडे होती. जॉर्ज माझ्या समोरच बसला होता. अचानक मला जाणवलं की तो खिडकीकडे टक लावून बघतो आहे. मी मागे वळून पाहिलं तर मला अगदी पुसटसं दिसलं की काहीतरी ,प्राणी का माणूस माहीत नाही, ते खिडकीपाशी अगदी टेकून उभं असावं आणि ते दूर जात होतं. मला नीटसं दिसलं नाही. मी जॉर्जला विचारलं तर तो पण असंच काही दिसल्याचं म्हणाला. नंतर आम्ही ते विसरून परत पत्त्यात रंगून गेलो. '
होम्स उद्गारला, 'विचित्र आहे. मला वाटतं आपण लवकरात लवकर प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहिलं पाहिजे. काहीतरी दुवा मिळेल.'

आम्ही सर्व त्या बंगल्यात आलो. बंगल्याची नोकर पोर्टर तिथेच होती. खुर्च्या वगैरे सरकवून ठेवल्या होत्या. पोर्टरही खूप घाबरलेली होती. ती म्हणाली की रात्री तिने काहीच आवाज ऐकले नाहीत. सकाळी उठून जेव्हा खाली आली तेंव्हा ते दृश्य पाहून ती भितीने बेशुद्ध पडली.मग शुद्धीवर आल्यावर तिने पटकन नोकराला डॉक्टर आणि मदत आणायला पाठवलं आणि तो वाटेत मॉर्टीमरला भेटला.
आम्ही वर गेलो आणि ब्रेंडाचा मृतदेह पाहिला. साधारण तिशीच्या आतबाहेर असावी. ती अत्यंत सुंदर असावी. भितीच्या भावांनी चेहरा वेडावाकडा झालेला असला तरी चेहऱ्याचा रेखीवपणा आणि सौंदर्य लपत नव्हतं.

आम्ही खाली आलो. होम्स बारकाईने सर्व पाहत होता. त्याने खुर्च्या परत रात्री होत्या तशा सरकवल्या, त्यावर बसून पाहिले, खिडकी आणि फायरप्लेस तपासली. 'इतकी लहान खोली असूनही शेकोटी का? ही शेकोटी रोज पेटवतात का? ' 'नाही.काल रात्री जरा जास्त थंडी असल्याने मी आल्यावर शेकोटी पेटवली.' मॉर्टीमर म्हणाला.

होम्स विचारमग्न दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हतं की त्याला काही दुवा मिळाला आहे. तो म्हणाला, 'मॉर्टीमर, आम्ही आता तुमचा निरोप घेतो. मला वाटत नाही की या प्रकरणात मी काही शोधू शकेन. तरीही मला काही आठवलं तर मी परत भेटेन आणि तुम्हाला काही तपास लागल्यास मला कळवा.'

होम्स आणि मी घरी आलो. होम्स खुर्चीत बसला होता. 'वॅटसन,मला वाटतं आपण जरा फिरून यावं. मला काही सुचत नाही. असं काहीतरी मॉर्टीमरच्या जाण्यानंतर खोलीत आलं. काहीतरी..मनुष्य, पिशाच्च..मला माहिती नाही. पण त्याच्या येण्याने भितीने एका स्त्रीचा मृत्यू आणि दोन भाऊ वेडे होतात..खरंच विचित्र आहे.'

आम्ही फिरायला निघालो आणि होम्स परत बोलू लागला. 'आपण जरा नीट विचार करु. हं,तर जी थोडीफार माहिती आपल्या कडे आहे त्यावरुन..सर्वात पहिले आपण अमानवी अस्तित्व किंवा 'भूत' ही शक्यता बाजूला ठेवू. आपल्याला काय माहित आहे? तीन व्यक्ती कुठल्यातरी भयंकर भितीने इतक्या पछाडल्या की त्यातली एक व्यक्ती मेली आणि दोन मानसिक संतुलन हरवून बसल्या. हे नक्की कधी घडलं? माझं मत म्हणशील तर मॉर्टीमर खोलीच्या बाहेर गेल्यागेल्या. मला कसं कळलं? पत्ते टेबलावर तसेच पसरलेले आहेत.मंडळी नेहमी त्या दिवशीच्या वेळेपेक्षा लवकर झोपतात. जर घटना मॉर्टीमर बाहेर गेल्यानंतर खूप वेळाने घडली असती तर त्यांनी झोपण्याच्या इराद्याने पत्ते आवरलेले असते, खुर्च्या सरकवलेल्या असत्या..म्हणून मी म्हणू इच्छितो, की जे घडलं ते मॉर्टीमर खोलीच्या बाहेर गेल्यागेल्या काही मिनीटातच घडलंय.'

होम्सची निरीक्षणे आणि आडाखे मला नेहमीच अवाक करायचे आणि आताही मी कान देऊन तो काय म्हणतो ते ऐकत होतो. 'तर हे कळल्यावर अर्थातच आपल्यापुढे प्रश्न उरतो तो म्हणजे मॉर्टीमरच्या हालचाली बाहेर पडल्यावर काही संशयास्पद होत्या का? हे मला हवं होतं आणि म्हणून मी 'धांदरटपणा' करुन तो पाण्याचा जग पाडला. मला त्या पाण्यामुळे बाहेरच्या वाळूत मॉर्टीमरच्या पायांचा ठसा व्यवस्थित मिळाला.काल रात्रीपण पाऊस पडलेला होता. आणि कालचे त्याचे ठसे बघितले तर कळतं की तो घाईघाईत आणि लांबलांब ढांगा टाकत शक्य तितक्या लवकर त्या बंगल्यापासून दूर गेला आहे. का बरं?''आणि समजा मॉर्टीमरच्या सांगण्याप्रमाणे क्षणभर आपण असं मानू, की कोणीतरी खिडकीच्या अगदी जवळ आलं होतं आणि त्या व्यक्तीच्या भयंकर दर्शनाने तिघांची ही अवस्था केली..पण या व्यक्तीला पाहिल्याचा दावा कोण करतं? पोर्टर तर झोपायला गेली होती. बाकी तीन व्यक्ती आता काही पाहिल्याचं सांगण्याच्या स्थितीत नाहीत. उरतो कोण? मॉर्टीमर एकटा. त्यानेच खिडकीबाहेर कोणीतरी पाहिलं होतं, किंबहुना तसं आपल्याला सांगितलं होतं. अगदी तो खरं बोलतो असं धरलं तरी ती रात्र पावसाळी आणि धुक्याची होती. कोणीही खिडकीपाशी उभं दिसायचं म्हटलं तरी त्या कोणालातरी खिडकीला नाक लावून अगदी चिकटून उभं राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याशिवाय आतल्या कोणाला तो दिसलाच नसता धुक्यामुळे. म्हणजे या 'कोणीतरी' च्या पायाचे ठसे बागेत खिडकीवर कुठेतरी हवेत. पण बागेत खिडकीजवळ तर कोणाचेच ठसे नाहीत. चिखल आहे तसा आहे. म्हणजे आता बघ, कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तिघांना इतकं घाबरवलं. पायाचे ठसेही न सोडता हे कसं केलं असेल? आणी असं करण्यामागचा हेतू काय?'

'हो, हा प्रश्न आहे खरा.' मी होम्सच्या तर्कशास्त्रापुढे नेहमीप्रमाणे प्रभावित झालो.
'म्हणूनच मी म्हणतो, की सध्या आपण ही घटना बाजूला ठेवू. उगीच अपुऱ्या माहितीवर तर्ककुतर्क करणं नको.'

पुढचे दोनतीन तास आम्ही गप्पांत घालवले. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही बोलत होतो आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. दुपारी आम्ही घरी परतलो. दारात उभ्या माणसाने आमची गाडी परत आधीच्या विषयांवर आणली! आम्ही त्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी त्याच्या बद्दल ऐकून होतो. लंडनमधे प्रसिद्ध आणि सध्या आफ्रिकेत संशोधन करत असलेले डॉ. लिऑन!सिंहाच्या शिकारीबद्दल विख्यात. आम्ही एकदोनदा त्यांना गावात पाहिलं होतं. आज त्यांना आमच्या बद्दल चौकशी करत असलेलं पाहून जरा आश्चर्य वाटलं.

'पोलीस तपासात चुकतायत असं वाटतं.' डॉ. लिओन म्हणाले.
'मात्र होम्स, मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की तुम्हाला या प्रकरणात काही वेगळे दुवे मिळाले असतील.मी मॉर्टीमरच्या कुटुंबाला जवळून ओळखतो. असं काही अघटीत घडणं हा माझ्यासाठी मोठाच धक्का आहे. तुम्हाला सांगतो, मी आज इथून आफ्रिकेला जाण्यासाठी निघालो होतो आणि प्लायमाऊथपर्यंत पोहचलोही होतो, पण ही बातमी मला कळली आणि मी परत आलो.'
'पण तुम्हाला ही बातमी इतक्या तातडीने कळली कशी?'
लिऑनना प्रश्न फारसा आवडलेला नसावा, पण त्यांनी उत्तर दिलं. 'धर्मगुरु माझे मित्र आहेत आणि त्यांनी त्वरेने तार करुन ही बातमी मला कळवली. मी माझं काही सामनही बोटीत सोडून आलो आहे. अर्थात माझं महत्वाचं सामान प्लायमाऊथच्या हॉटेलातच आहे,त्यामुळे जास्त काही फरक पडत नाही. '
'मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो डॉ. लिऑन, की सध्यातरी माझ्यापाशी अगदी नक्की अशी दिशा नाही. पण मला आशा नक्कीच आहे की मला काहीतरी सापडेल आणि काही अंदाज मी केलेले आहेत.'
लिऑन म्हणाले, 'काय अंदाज केलेत मला कळू शकेल का?'
'माझ्या व्यावसायिक तत्वात ते बसत नाही आणि मी सांगू शकत नाही. माफ करा.' होम्स शांतपणे म्हणाला.
'मग मी इथे उगीच वेळ वाया घालवला!' काहीसे वैतागून डॉ लिऑन निघून गेले.

होम्स संध्याकाळपर्यंत अस्वस्थ आणि कशाचीतरी वाट पाहत असल्यासारखा दिसत होता. संध्याकाळी एक तार आली. त्याने ती वाचून बाजूला टाकली.
'मी प्लायमाऊथला तार पाठवली होती. मला खात्री करायची होती की डॉ. लिऑनची गोष्ट खरी आहे का. सर्व खरं आहे आणि खरोखर तो आपलं काही सामान जाऊ देऊन परत आला आहे.'
'असं दिसतं की त्यांना या प्रकरणात बराच रस असावा.' मी म्हणालो.
'खरं आहे. मला वाटतं की काहीतरी आपल्या अगदी जवळ आहे, पण तो दुवा आपल्याला अजून सापडलेला नाही. तो सापडला की आपण प्रकरण उलगडण्याच्या अगदी जवळ आहोत.'

प्रकरण अजून गंभीर झालं, कारण मी सकाळी दाढी करत होतो तेव्हा अचानक एक बग्गी येऊन उभी राहिली.
धर्मगुरु घाईघाईत आत आले. 'होम्स, होम्स, परत एक भयंकर प्रकार! मला तर वाटतं सैतानाने पछाडलंय या जागेला आणि तो हे अघटीत प्रकार घडवून आणतोय!' धर्मगुरु भयंकर उत्तेजित होता. थोड्यावेळाने शांत झाल्यावर तो म्हणाला, 'मॉर्टीमर आज सकाळी त्याच्या घरी मृत्यू पावला, आणि त्याच्या मृत्यूत तीच लक्षणे आहेत!ब्रेंडासारखे त्याच्या चेहऱ्यावर पण अत्यंत घाबरल्याचे भाव आहेत! हे सर्व अमानवी आहे!'

'आम्ही तुमच्या बग्गीतून येऊ शकतो का?' होम्सने विचारले.
'अवश्य.'
'वॅटसन,आपल्याला नाश्ता सध्या बाजूला ठेवावा लागेल. चल. काही पुरावे इकडेतिकडे होण्याआधी आपल्याला लवकर तिथे पोहचलं पाहिजे.'

आम्ही डॉक्टर आणि पोलीसांच्याही आधी पोहचलो, त्यामुळे सर्व काही जसेच्या तसे होते. ते दृश्य,मॉर्टीमरचा तो चेहरा मी विसरु नाही शकणार. वातावरणात एक प्रकारचा कोंदटपणा होता. मॉर्टीमरला पहिले मृतावस्थेत पाहणाऱ्या नोकराने खिडकी उघडून ठेवली होती, तरीही तो कोंदटपणा असह्य होता. टेबलावर एक चिमणी अजूनही जळत होती. आणि मॉर्टीमर खुर्चीवर होता. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर घाबरल्याचे भाव होते. बाहेर जायचे कपडे अंगात होते, पण ते अत्यंत घाईघाईत घातल्याचे स्पष्ट दिसत होते. खुर्चीवर बसून मागे वळून तो खिडकीकडे पाहत होता आणि तसाच मरुन पडला होता..नोकराने सांगितले की त्याच्या बिछान्यात तो काही वेळ झोपला होता, कारण बिछान्यात झोपल्याच्या खुणा होत्या. प्रसंग बहुधा पहाटे घडला असावा.

होम्सच्या चेहऱ्यात एकाएकी बदल झाला. खोलीत आल्यापासून तो गंभीर आणि सावध दिसत होता. त्याने सगळीकडे फिरुन पाहिले. एकही जागा सोडली नाही. खोली, खोलीच्या बाहेरचा भाग, वरची झोपण्याची खोली..मला त्याच्याकडे पाहून पोलीस पथकातल्या कुत्र्याची आठवण येत होती. झोपण्याच्या खोलीत आल्यावर त्याने खिडकी उघडली. खिडकीबाहेर पाहून त्याला काहीतरी सापडलं होतं हे नक्की. परत झपाट्याने वळून तो खाली आला. आणि जळणाऱ्या चिमणीकडे बारकाईने पाहू लागला. शेवटी त्याने चिमणीचं झाकण उचलून थोडी काजळी खरवडली आणि ती काळजीपूर्वक लिफाफ्यात ठेवली. आम्ही बाहेर आलो.

'मला थोडीफार दिशा मिळाली आहे.आता मला निघायला हवं, पण तुम्ही कृपया पोलिसांना माझे नमस्कार सांगा आणि त्यांना झोपण्याच्या खोलीची खिडकी आणि ती चिमणी यांचं निरीक्षण करायला सांगा.वॅटसन, आपण आता निघायला हवं.' होम्सने धर्मगुरुचा निरोप घेतला.

पोलीसांना कामात ढवळाढवळ आवडत नसावी असं दिसतं , कारण दोन दिवसात पोलीसांकडून काहीही संपर्क झाला नाही. होम्स दोन दिवसात गावभर लांबलांब एकटाच फिरायचा. आणि त्याने हुबेहूब मॉर्टीमरच्या घरातल्यासारखी चिमणी आणली होती. त्यात त्याने तेच तेल भरुन ती चिमणी जळायला किती वेळ लागतो हा प्रयोग केला. हे एकवेळ ठीक होतं, पण त्याने जो दुसरा प्रयोग केला तो मात्र आम्हाला फार महागात पडू शकला असता.

'वॅटसन,तुला आठवत असेल, या दोन्ही मरणात काही गोष्टी समाईक आहेत. एक म्हणजे दोन्हीकडे पहिल्यांदा मृताला पाहणाऱ्याला जाणवलेला कोंदटपणा.पोर्टर बेशुद्ध पडली होती. आणि मॉर्टीमरच्या भावंडांना पाहायला आलेला डॉक्टरही.मॉर्टीमरला पहिल्यांदा मृत पाहणाऱ्या नोकराणीने आधी खोलीची खिडकी उघडली.तिलाही मी विचारल्यावर मला कळलं की त्यानंतर बराच वेळ ती बरं वाटत नसल्याने पडून होती..याच्यावरुन काय वाटतं?दोन्हीकडे वातावरणात एक प्रकारचा विषारीपणा आहे.. दोन्ही ठिकाणी काहीतरी जळत होतं. अगदी त्या दिवशीची शेकोटी थंडीसाठी पेटवली असेल. पण मॉर्टीमरच्या घरातली चिमणी? ती तर गरजही नसताना मुद्दाम पेटवली होती. माझ्या तेलाच्या प्रयोगावरुन दिसतं की ती उजाडल्यावर पेटवली होती.का? समजा आपण असं धरुन चालूया की काहीतरी आगीत टाकलं होतं, ज्याच्यामुळे वातावरणात विषारीपणा आला होता. आता मॉर्टीमरच्या भावंडांकडचा प्रकार घे. पावसाळी वातावरण आणि थंडीमुळे जरी खिडक्या बंद असल्या तरी असा पदार्थ शेकोटीत टाकल्यावर थोडाफार धूर शेकोटीच्या चिमणीवाटे निघून गेला. त्यामुळे त्या ठिकाणी तीन जण असूनही विषाने एक स्त्री च फक्त मारली गेली. आणि बाकीचे त्या पदार्थाच्या तत्कालीन किंवा कायमस्वरूपी परिणामाने वेडे झाले. मॉर्टीमरच्या वेळी परिणाम जास्त होते आणि पूर्ण काम करुन गेले,कारण खिडकी बंद होती आणि हवा बाहेर जायला काहीच मार्ग शिल्लक ठेवला गेला नव्हता.' होम्स सांगत होता.

'आणि हीच शक्यता मनात ठेवून मी मॉर्टीमरकडच्या दिव्याचा शोध घेतला. मला दिव्याच्या काजळीत पांढरे अवशेष सापडले.इतकंच नाही, तर दिव्याच्या वातीभोवती मला एक पूड सापडली, जी अजून जळायची बाकी होती. मी अर्धी दिव्याची काजळे आणि अर्धी पूड घेऊन लिफाफ्यात गोळा केली.'
'अर्धीच का?' मी आश्चर्याने विचारलं.
'वॅटसन, मी पोलीसांच्या तपासात अडथळा आणणारा माणूस नाही. मी त्यांना सर्व पुरावे सोडले होते. इतकंच नाही तर धर्मगुरुला सांगून त्यांना एका दुव्याबद्दल अप्रत्यक्ष कल्पनाही दिली होती. त्यांना सापडलं नाही हे खरं , पण ते विष त्यांना सापडेपर्यंत त्या दिव्यातच राहील.'
होम्सने आपल्याकडचा दिवा काढून टेबलावर ठेवला.
'वॅटसन, माझ्याकडे तीच शिल्लक राहिलेली पूड आहे.आता आपण हा दिवा पेटवू. अर्थात आपण दार आणि खिडकी मात्र उघडी ठेवू, कारण जग दोन माननीय सदस्यांना कायमचं मुकावं असं मला वाटत नाही. तू खिडकीच्या जवळ बस,अर्थात तू शहाणा असशील तर या प्रयोगात भाग घेणार नाहीस. नसलास तर तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे.काय, तू भाग घेणार?मला वाटलंच होतं. बरं तर. आता आपण दोघं एकमेकांच्या चेहरा पाहू शकतो आणि काही बदल जाणवल्यास तत्क्षणी हा प्रयोग संपवू शकतो. हा मी ही पूड दिव्यात टाकतो‌. सावध.'
आणि होम्सने पूड दिव्यात टाकली.

लगेच मला एक घाणेरडा वास आला. आणि मी माझं भान विसरलो. माझ्या डोळ्यासमोर एक काळं धुकं पसरलं होतं. आणि त्या धुक्यात सर्व काही, जे जे मला भयंकर वाटतं आणि मी लहानपणापासून घाबरतो, ते होतं. मला काहीच कळत नव्हतं. ओरडायलाही होत नव्हतं. जीभ जड झाली होती. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जाणवत होतं की यातून बाहेर निघायलाच हवं.. अचानक या सगळ्याशी झगडत असताना क्षणभर माझे डोळे उघडले आणि मला दिव्याच्या शेजारच्या खुर्चीत बसलेला होम्स दिसला. त्याच्या चेहऱ्यावर तेच भितीचे भाव होते, जे ब्रेंडा आणि मॉर्टीमरच्या चेहऱ्यावर होते..

मी स्वतःला कसंबसं भानावर आणलं. आणि होम्सला ओढत नेऊन खोलीच्या बाहेर फरफटत गेलो. बाहेर हवा लागल्यावर थोड्या वेळात माझं डोकं ताळ्यावर आलं. होम्सही शुद्धीवर आला. त्याला सर्व आठवलं आणि तो खूप कळवळीने म्हणाला, 'वॅटसन, तू आज माझा जीव वाचवलास.तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत.'
माझ्यासाठी होम्सचं हे भावनिक रुप नविनच होतं. मी आतापर्यंत त्याला एक भावनाहीन यंत्र म्हणूनच पाहिलं होतं.
'नाही होम्स, तू माझा मित्र आहेस आणि तुला मदत करताना मला आनंदच होईल.'
'वॅटसन, आता तुला कळलं ना, मृत्यू कसे झाले?'
'हो, त्यात शंकाच नाही.'

'मॉर्टीमरच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की त्याचे त्या तीन भावंडांशी मतभेद होते. सलोखा झाला आहे असं जरी तो म्हणत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरुन मला असं वाटलं नाही की तो काही विसरणाऱ्यांपैकी आहे.त्याने त्या दिवशी सर्वांचा निरोप घेतला आणि लगेच ती घटना घडली‍. दुसऱ्या कोणी येऊन शेकोटीत ती पूड टाकली असती तर ते तिघं नक्की खुर्च्यांवरुन उठले तरी असते. पण ती पूड त्यानेच टाकली होती आणि म्हणून तो लांब लांब ढांगा टाकत घरापासून दूर गेला होता. आणि आपल्याला बनवायला तो खिडकीबाहेर दिसलेल्या माणसाचा प्रसंगही त्याने सांगितला.''पण मग मॉर्टीमरचा मृत्यू?त्याने आत्महत्या केली का?'

'कधीकधी अशा गुन्हयातून माणसं आत्महत्या करतातही, पण मॉर्टीमरने काय केलं हे माझ्यापेक्षा दुसरी एक व्यक्ती जास्त चांगलं सांगू शकेल. मी त्याना इथे बोलावलं आहे. हे काय, डॉ. लिऑन आलेच.'
'होम्स,मला तुमचा निरोप मिळाला आणि मी इथे आलो.पण मला इथे का बोलावलं त्याचं कारण कळू शकेल का?'
'होय.मला तुमच्याशी मॉर्टीमरच्या खूनाबद्दल बोलायचं आहे आणि माहिती हवी आहे.तो तुम्ही केला आहे.'
लिऑनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो उसळला. 'होम्स, लक्षात ठेवा, इतकी वर्षं जंगलात राहून मी स्वतःच माझा कायदा बनवतो.आणि तुम्ही हे विसरु नका, कारण मलाही तुम्हाला ईजा पोहचवायची इच्छा नाही.'
'मलाही नाही.' होम्स म्हणाला. 'म्हणूनच मी तुम्हाला निरोप पाठवला, आणि पोलीसांना पाठवला नाही.'
'हे पहा,ही जर थाप असेल तर खूप वाईट थाप आहे आणि तुम्ही त्याचे परीणाम भोगाल, होम्स.'

'ही थाप नाही. आणि मी हा निश्कर्ष कसा काढला सांगू? थांबा, मी सर्व प्रसंग तुमच्यापुढे उभा करतो.'
होम्स बोलू लागला. 'तुम्ही मला विचारायला आला होतात की मला या गुन्ह्यात काही दुवे मिळाले का?मी नाही म्हणून उत्तर दिल्यावर तुम्ही तुमच्या घरी परत गेलात. रात्र तळमळत घालवलीत. आणि सकाळी मनाचा हिय्या करुन उठलात. तुमच्या घराबाहेरची लाल खडी खिशात घातलीत आणि मॉर्टीमरच्या घराकडे गेलात.'लिऑन आश्चर्याने ऐकत होता. 'मॉर्टीमरच्या घरी कोणीच जागं नव्हतं.तुम्ही खिशातली खडी त्याच्या खिडकीवर भिरकावलीत. तो जागा झाला आणि खिडकीपाशी आला.तुम्ही त्याला खाली यायला फर्मावलंत. घाईघाईत कपडे करुन तो खालच्या खोलीत आला.तुम्ही थोडा वेळ बोललात. मग खिडकी बंद करुन आणि दिवा पेटवून बाहेर निघून गेलात आणि बाहेरुन सर्व प्रकार घडताना पाहिलात.मग तुम्ही आपल्या घरी निघून गेलात.लिऑन मला सांगा,या प्रकारामागचे तुमचे हेतू काय होते? ते मला पटले तर मी तुम्हाला वचन देतो, मी तरी पोलीसांना माझे अंदाज सांगणार नाही.'

लिऑनचा चेहरा पांढराफटक पडला.त्याने उदास मुद्रेने खिशातून फोटो काढला.
'ब्रेंडा!'मी उद्गारलो.
'होय ,हिच्यासाठी मी हे केलं. माझी ब्रेंडा. आम्ही लग्न करणार होतो.माझी पूर्वपत्नी मला घटस्फोट देत नव्हती. पण आमचं प्रेम सच्चं होतं. म्हणून ब्रेंडा थांबली. मी इतके वर्षं थांबलो. आणि आज त्या थांबण्याचं हे.. हे फळ मिळालं. धर्मगुरुला आमचं गुपित माहीत होतं. म्हणूनच त्याने मला तार करुन कळवलं.'

'वॅटसन,हे नाव तुम्ही आधी ऐकलंय का?' लिऑनने खिशातून एका पाकिटातून झाडाची मुळी बाहेर काढली. पाकिटावर लिहीलं होतं, 'डेव्हिल्स फूट रुट'.
'पिशाच्चाचा पाय?नाही बुवा, मी हे नाव कधीच नाही ऐकलं.'
'साहजिक आहे. कारण बुडापेस्टच्या एका प्रयोगशाळेतला नमुना सोडल्यास या मूळाचा एकही नमुना अख्ख्या युरोपात नाही. अजून हे मूळ वैद्यकीय यादीतही यायचं आहे. याच्या पायासारख्या विचीत्र आकारामुळे याला 'डेव्हिल्स' फूट रुट म्हणतात. आफ्रिकेत काही वैद्यांकडून हे मूळ विष म्हणून वापरलं जातं. मी सवतः याचा नमुना माझ्या संशोधनासाठी मोठ्या मुश्कीलीने आफ्रिकेतून मिळवला होता.'लिऑन पुढे सांगू लागला.
'ब्रेंडामुळे माझी तिच्या भावांशीही ओळख होती. मॉर्टीमरशी झालेल्या मतभेदांनंतर ते मिटल्यावर मॉर्टीमर माझ्या घरी एकदा आला होता. तेव्हा मी त्याला आफ्रिकेतून आणलेल्या आगळ्यावेगळ्या वस्तूंमधे ही मूळीही दाखवली होती. ही मूळी मेंदूतल्या भितीच्या केंद्रावर ताबा मिळवते आणि माणसाला भितीने मृत्यू किंवा कायमचे वेडेपण देते. त्यानेही सहज विचारतो असं दाखवून मूळीचे काम आणि किती वेळात होते इ. माहिती काढून घेतली होती. माझी पाठ वळल्यावर थोडी पूड त्याने चोरली आणि मी आफ्रिकेला जात असल्याची संधी पाहून त्यांच्यावर वापरली. कारण त्याला एकट्याला त्या इस्टेटीचा वारस बनायचं होतं. मी परत आलो आणि ब्रेंडाला बघितलं त्याक्षणी मला कळलं की ही लक्षणं कशाची आहेत.'

'मी काय करणार होतो?पोलीसांनी माझ्यावर विश्वास नसताच ठेवला.म्हणून मी तुमच्यापाशी आलो होतो, तुम्हाला अंदाज येऊन तुम्ही माग घ्याल या आशेने. पण तुम्हीही माझी निराशा केलीत.मला ब्रेंडाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता.म्हणून मी त्याला रात्री खाली बोलावलं. त्याला त्याने काय केलं ते सांगितलं. तो घाबरला. मी त्याला सांगितलं की मी स्वतः ब्रेंडाच्या खूनाचा न्याय करणार आहे. आणि मी त्याच्यावर पिस्तूल रोखून दिव्याभोवती पूड रचली. दिवा पेटवला आणि खिडकीबाहेर उभा राहिलो. अक्षरशः काही मिनीटात तो मेला.भयंकर प्रकारे. पण मला काही वाटलं नाही,कारण माझ्या ब्रेंडानेही मरताना त्याच यातना भोगल्या होत्या. ही अशी माझी कथा आहे. होम्स, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करु शकता.'
होम्स काही क्षण शांत बसून राहिला.
'मला हे सर्व सांगण्याआधी तुमचे काय बेत होते?'
'मी आफ्रिकेत परत जाणार होतो. माझं संशोधन अर्धंच पूर्ण झालं आहे.'होम्स म्हणाला, 'मग निश्चिंतपणे जा आणि उरलेलं अर्धं पूर्ण करा.मी तरी तुम्हाला अडवणार नाही.'


लिऑन अभिवादन करुन गंभीरपणे निघून गेला.
'चल वॅटसन, एखादा 'बिनविषारी' धूर आपल्यासाठी निश्चीतच चांगला आहे सध्या.'होम्स म्हणाला,'मला शंका तेव्हाच आली जेव्हा मी मॉर्टीमरच्या खिडकीवर ती लाल माती पाहिली.चला, आपणही हे प्रकरण विसरुन जायला हरकत नाही.'
(-डेव्हिल्स फूटचा स्वैर अनुवाद.)
अनुराधा कुलकर्णी

3 comments:

Anonymous said...

Tujha naav sagalikade kasa barobar basata. :-) 'Anu'dini,'Anu'vaad.
:-D

-Vidya

Anonymous said...

किती वर्षांनी होम्सची कथा वाचली!!! खूऽऽप छान वाटलं. धन्यवाद!!!!

Vaishali Hinge said...

मी मोठी fan आहे होम्सची!
कंटाळा आला की त्याच्या कथा वाचणे हा रोजचा दिनक्रमाचा भाग आहे माझ्या..
सु.न्दर अनुवाद केलाय...