या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Showing posts with label HR. Show all posts
Showing posts with label HR. Show all posts

Friday, 2 March 2007

धनलाभाचा हंगाम

एप्रिल महिना उजाडतो. चैत्र महिन्याच्या आरंभाबरोबरच उन्हाळ्याची चाहूल लागते..बाजारात आंबे येतात..कोकीळा कुहूकुहू गायला लागतात..उसाच्या रसाच्या टपऱ्या वाढतात..विद्यार्थी अभ्यासाला लागतात..बँका व हिशोब खाती मान मोडून आर्थिक नववर्षाच्या गोळाबेरजेला लागतात..आणि माझ्यासारख्या अनेक 'बुद्धिजीवी'(??)लोकांचे हात धनलाभाच्या प्रतीक्षेत खाजू लागतात.

एप्रिल मे म्हणजे गुणगणनेचा आणि पगारवाढीचा महिना. किती वाढ मिळेल बरं? आयकरात काय फरक पडेल?काय घ्यायचं? आता राहणी पण सुधारायची बरं का. रेबॅनचा चष्मा, लीच्या विजारी, ऍलन सोली चे शर्ट, वूडलँडचे किंवा लीकूपरचे बूट, छान छान बांधणी सिल्कची एखादी साडी..नवीन चकाचक पेप गाडी..
मन आकाशात भरारी घ्यायला लागतं आणि पूर्वतयारी म्हणून आमची स्वारी साहेबाच्या खोलीत तरंगत तरंगत जाते. साहेब सरसावून बसलेलेच. ठराविक काळात मुस्लिमांची हाज यात्रेला झुंबड उडावी तशी गुणगणनेच्या काळात अनेक भक्तांची वर्दळ कचेरीत झेलायची साहेबांना सवय आहे.

साहेबः 'या.बसा.'मीः (तत्कालिन वेळेप्रमाणे गुड मॉर्निंग/आफ्टरनून घालते.)
(थोडी फार हि हि हू हू झाल्यानंतर दोघे एकमेकांचा अजमास घेतो. साहेब समोर असलेली कागदपत्रे हाताखाली घालत बसला आहे. तो ती वाचत नाही हे दोघांनाही माहितीय, कारण कागदपत्रे ही बाहेरच्या लोकांना पटवण्यासाठी(आणि गटवण्यासाठी) बनवली गेलेली माहितीपत्रके आहेत आणि ती कचेरीच्या आतली माणसं फारच नाईलाज झाला तरच वाचायला हाती घेतात.)
साहेबः (चष्म्याखालून बघत)'मग, काय काम काढलंत?'
मीः 'हॅ,हॅ,हॅ, साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे. प्रोजेक्टस चांगली पूर्ण केली. गोऱ्या साहेबाकडून स्तुतीपत्रेही मिळाली. यावेळी जरा चांगली पगार वाढ पाहिजे होती.(हुश्श!बोलले एकदाची!)
'साहेबः (विचारमग्न चेहरा करतो. तितक्यात फोन खणखणतो‌.पलिकडच्याशी 'इन्व्हॉइस' आणि 'ऑफर' हे शब्द बऱ्याचदा आणून हुज्जत घालून होते. मी टेबलावरच्या वस्तू, सिगारेटचे पाकिट, चष्मा न्याहाळत मनात मुद्द्यांची उजळणी करते.)
साहेबः 'हं, काय म्हणत होतात?'मीः 'साहेब, आपल्याला तर माहितीच आहे.महागाई किती वाढलीय?पुण्यातली कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती वाढलीय. यावेळी जरा बरी पगारवाढ अपेक्षित आहे कारण यावेळी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलीय.'
साहेबः 'हूं.. पगारवाढीत काय ठेवलंय? शेवटी मानसिक समाधान महत्वाचं.'(साहेब अध्यात्मात शिरले.)
मीः 'पण मानसिक समाधान आणि मोटिव्हेशन दोन्ही नाही, कारण बाहेरच्यापेक्षा पगार आपल्याकडे खूपच कमी आहेत.(जिंकू किंवा मरू! जिंकू किंवा मरू!)
' साहेबः 'आम्ही एक मोठी संघटना आहे. हे झकपक ऑफिस, इथल्या सोयी, मी हे सर्व ओव्हरहेड्स आहेत. अशा वेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य दिलंच पाहिजे. पुढच्या वर्षी बघू.
'मीः 'पण साहेब, सहकार्य मागच्या वेळी पण दिलं होतं. त्यावेळी पण असंच सांगितलं गेलं होतं आणि फक्त ९ टक्के वाढ दिली होती.'
साहेबः 'भूतकाळात शिरू नका हो. हा चुकीचा ऍटीट्यूड आहे.आपल्याला सर्वांना कंपनीच्या प्रगतीसाठी झटायचं आहे.मी किंवा तुम्ही गौण आहोत.आपण सर्व टीम आहोत आणि देअर इज नो 'आय' इन टीम.'(साहेब भिंतीवरील तक्त्यासारखंच बोलतायत!)
मीः (मुद्दा नही छोडेंगे!बचेंगे तो और भी लडेंगे!)'पण साहेब, टीम बनते कशाने? टीमच्या हिश्श्यांनीच ना? मग टीमचे हिस्से जर कौटुंबिक समस्यांमध्ये गंजले तर ते चांगले काम कसं देऊ शकणार?'
साहेबः 'हे पहा, 'कमी' आणि 'जास्त' या सापेक्ष कल्पना आहेत. त्यांच्या व्याख्या आपणच ठरवायच्या असतात.'(साहेब आईस्टाइनच्या सापेक्षतावाद सिद्धान्तांत शिरले होते.)
मीः (तुम सापेक्ष तर हम सवाई सापेक्ष!)'पण साहेब, आम्ही ढीग या व्याख्या स्वतः ठरवून स्वतः समाधानी राहायचं ठरवलं तरी बाह्य जग आम्हाला या व्याख्या ठरवू देत नाही. जगायला पैसा लागतो.'
साहेबः 'नुसतं पैसा पैसा करून काय होणार आहे?अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पैशाने खरेदी होत नाहीत. आपल्या कंपनीचं नाव बघा, आपल्याला मिळणाऱ्या रजा बघा. इथे मिळणारं खाणं बघा. पैसा नश्वर आहे. आज आहे उद्या नाही. भौतिक सुखांपेक्षा मनःशांती महत्वाची.ती आम्ही देतो.'(साहेब भौतिकतावादात शिरले!)
मीः (आता प्राण गेला तरी बेहत्तर! दहा टक्क्यापेक्षा जास्त पगारवाढ मिळवूनच बाहेर पडणार!)
'पण साहेब, व्यवहारात जगायला पैसा लागतो. समजा उद्या मी घर खरेदी करायला गेले तर बिल्डरला हे नाही सांगू शकत की बाबा, आमच्या कंपनीत मानसिक समाधान जास्त मिळतं त्यामुळे तू ६०% कॅश आणि उरलेले मानसिक समाधान घे.'
साहेबः (आता पारा चढत चालला आहे)'हे पाहा, आम्ही कंपनी चालवतो. आम्ही कामं करून घेतो आणि त्या बदल्यात पैसे देतो. तुम्ही त्यातून घर खरेदी करता का जहाज का विमान त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही.'
मीः (टाचणी लागली तरी उत्साहाच्या फुग्यात अजून हवा आहेच)'पण साहेब, माझ्या अनुभवाच्या आणि पात्रतेच्या माणसाला बाहेर याहून दुप्पट पगार मिळतो.'
साहेबः 'हे हे बरोबर नाही हं! दुसऱ्यांबरोबर तुलना करू नका. जे लोक तुलना करतात त्यांच्याशी बोलणं पण बंद करा. आपली स्वतःची पात्रता आणि क्षमता याप्रमाणे वाढ मागायची असली तर मागा.'(नाही देणार जा! गेलीस उडत!)
मीः 'पण साहेब,तुलना नाही करायची हे म्हणायला ठीक आहे, प्रत्यक्षात प्रत्येकजण तुलना करत असतोच.निदान पात्रता आणि क्षमता याप्रमाणे तरी द्या.'(नही हटेंगे!नही हटेंगे!)
साहेबः 'कम्मॉन!व्यापकतेने विचार करा. आपल्यापुरता विचार करु नका. तुमच्या खात्याचा विचार करा, आपल्या कंपनीचा विचार करा.(देशाचा विचार करा इ.इ.)' (पोरी, मी तुझं बारसं जेवलो आहे. मला शिकवतेस?जाव,जाव पानी पिके आव!)
मीः (हळूहळू अवसान गळत आहे) 'साहेब जरा विचार करा हो.मला जगायला पैसा हवा. सध्याच्या पगारात चालणं शक्यच नाही.'
साहेबः (कंटाळा आला बुवा!रोजची सिगारेट मारायची वेळ झाली!)'बरं. आम्ही संबंधित खात्याशी विचारविनीमय करून ठरवू.'
मीः 'बरं साहेब,मी वाट पाहीन.वेळ दिल्याबद्दल आभार. आपला दिवस चांगला जाऊदे.' (माझा दिवस वाया गेला विचारात तरी तू आपला मजा कर लेका!)
साहेबः 'बरं. आभार आणि तुम्हालाही दिवस चांगला जावो.'

मी साहेबाच्या खोलीबाहेर जाते. अचानक आठवतं, 'हेच सर्व आपण मागच्या एप्रिलमध्ये बोललो होतो.' आणि हसू येतं. 'काय मिळवलं बोलून?मन मोकळं केल्याचं समाधान?साहेबाला उलट बोलल्याचा आनंद?परखड बोलून आपली बाजू मांडल्याचं आत्मिक समाधान? मागच्या वेळी नऊ टक्के मिळाले,यावेळी दहा टक्के मिळाले तर अर्धा अर्धा टक्का पगारवाढीत वाढ होऊन दहा वर्षांनी स्वतःचं घर नक्की बांधशील!' आता उरलं ते चातकाप्रमाणे पुढच्या पगाराची वाट पाहणं. शेवटी काय,आपण निमित्तमात्र. कर्ता करविता तो आहे. पगार काय वाढ काय, घर काय, सर्वच नश्वर आहे. आत्मा फक्त अमर आहे. (पार्ट टाइम प्रवचनकारशिप कर यार!थोडा पैसा तर सुटेल! )

(वि. सू.- या लेखातील साहेब व 'मी' ही पात्रे पूर्णतया काल्पनिक आहेत व त्यांचे दैनंदिन जीवनातील पात्रांशी किंवा घटनांशी साम्य हा निव्वळ योगायोग मानावा.'मी' ला नाव नाही. अस्तित्व नाही. त्याला आहे तो फक्त कर्मचारी क्रमांक!)
-अनुराधा कुलकर्णी

तात्पर्यकथाः दोन गाढवे

(इमेलमधून आलेली कथा. मूळ लेखक अज्ञात.)

कोणे एके काळी एका धोब्याकडे दोन गाढवे होतीः गाढव क आणि गाढव ख. दोघांना सारखाच भार वाहून न्यायचा होता. क ने विचार केला की आपण मालकाला प्रभावित करु. म्हणून क ने जास्त ओझे वहायला सुरुवात केली. मालक खूष झाला आणि त्याने ख कडून पण जास्त ओझे वाहण्याची अपेक्षा करायला सुरुवात केली. ख जास्त ओझे वाहू शकला नाही. म्हणून मालकाने त्याला मारले.

त्या दिवशी ख क ला रडत म्हणाला, 'तू असं का करतोस? आपण दोघंही पूर्वीइतकं ओझं वाहून मजेत राहू.'
पण क ने ऐकलं नाही. क ने आता जास्त आणखी ओझं घेऊन धावायला सुरुवात केली. मालक क वर खूष झाला आणि ख असं का करत नाही म्हणून ख वर रागावला. असेच काही दिवस गेले. मालक ख वर खूप चिडला होता. एक दिवस जास्त ओझं वाहत नाही म्हणून त्याला मालकाने मारुन मारुन ख मरुन गेला.

क आता आनंदी झाला कारण आता त्याचा एकाधिकार होता. पण मालकाने क चे कर्तृत्व पाहून त्याला ख चं पण ओझं द्यायला सुरुवात केली. आणि त्याला ते घेऊन धावावं पण लागत होतं. असे काही दिवस गेल्यावर क ची पाठ दुखायला लागली. इतकं ओझं त्याला झेपेनासं झालं. मालक क वर पण चिडला आणि मालकाने क ला एक दिवस मारुन मारुन क पण मेला.

मालक नव्या गाढवांच्या शोधात निघाला!
तात्पर्येः
१. अशा मालकांनी शक्यतो गाढवं स्वस्त मिळतील अशा जागी वास्तव्य करावे.
२. हाताखालील प्रत्येक सहकाऱ्याला सारखी वागणूक द्यावी आणि प्रत्येकाची कुवत समान मानावी.
३. ओझे बरोबरीने वहावे व आपल्या मालकापुढे जास्त प्रभाव पाडण्यासाठी अतिशहाणपण करु नये.
४. आपला सहकारी संकटात असेल तर त्यात आनंद मानू नये.
५. अतिकष्ट करु नये, हुशारीने काम करावे.
६. गाढवांनी आपली संघटना स्थापन करुन मालकांवर नजर ठेवावी.
७. मालकाने गाढवांच्या कामाचा 'टाईम स्टडी' करुन जास्तीत जास्त फायदा मिळेल अशाप्रकारे गाढवांचे ओझे व वेग ठरवण्यासाठी समिती नेमावी.
८. गाढवांनी कायद्याचे पूर्ण ज्ञान मिळवून मालकावर 'हॅरासमेंट चार्ज' लावावे.
९. एका गाढवाने शक्यतो आपल्या अगदी जवळच्या नात्यातले गाढव असेल तिथे काम करणे पसंत करावे,म्हणजे स्पर्धा सौम्य होईल.
१०. मालकाने योग्य 'मॅनपॉवर सर्च' सल्लागार कचेरीला कंत्राट देऊन जास्तीत जास्त ओझं वाहू शकणारी 'क्वालिटी' गाढवं निवडावी.
११. जगात गाढवांना तोटा नाही, तस्मात् मालकांनो, आपल्या फायद्याचं बघा,गाढवांचा विचार करु नका.
(हेच नियम कंपन्या आणि त्यातले कर्मचारी यांना लावून बघा बरं!!हल्ली जास्तीत जास्त गाढवं मिळवून त्यांना राबवणंच चालू आहे सगळ्या कंपन्यांचं.)
-अनुराधा कुलकर्णी

तात्पर्यकथाः काचेचा पेला

(ही कथा कधीतरी कोणाच्या तरी तोंडून ऐकली आहे. मूळ कोणाची आहे ते माहिती नाही.)

नोकरीसाठी मुलाखत चालू होती. समोर असलेल्या उमेदवारांच्या समूहाला साहेबांनी विचारलेः 'हा माझ्या हातात काचेचा पेला आहे. हा मी फोडला तर किती तुकडे होतील?' अनेकांनी अनेक उत्तरे दिली.
कोणी म्हणाले, 'ते पेला किती उंचीवरुन टाकला आणि कोणत्या जमिनीवर टाकला त्यावर अवलंबून आहे.'
कोणी म्हणाले, 'बरोबर २३५ तुकडे होतील.'
कोणी म्हणाले, 'तुकडे होणार नाहीत. पेला अभंग काचेचा आहे.'
कोणी म्हणाले, 'सांगता येत नाही. इनसफिशियंट डाटा.'
कोणी म्हणाले, 'मला एक दिवसाचा वेळ द्या.'
कोणी म्हणाले, 'असंख्य'

एका उमेदवाराने 'मी जरा वेगळ्या प्रकारे उत्तर देऊ का' म्हणून परवानगी घेतली. आणि पेला उचलून जोरात जमिनीवर टाकून दिला. 'बघा, आता खाली आहेत तितके तुकडे होतील.'
हा उमेदवार नोकरीसाठी निवडला गेला.

तात्पर्येः
१. नोकरीच्या मुलाखतीला अभ्यास करण्यात जास्त वेळ घालवू नये. कराव्या लागणाऱ्या कामाचा आणि त्या पदासाठी मुलाखतीत विचारलेल्या असंबद्ध प्रश्नांचा बऱ्याचदा कमी संबंध असतो.
२. बसून आणि मिटींगा घेऊन तर्ककुतर्क करण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीत जाऊन प्रश्नाला भिडावे.
३. मुलाखतीच्या ठिकाणी भारी आणि चांगले काचेचे पेले ठेऊ नयेत.
४. दुसऱ्याच्या किंमती चीजवस्तूच्या नुकसानाची पर्वा न करता आपल्याला हवं ते करणारे जगात पुढे जातात.
५. हा प्रयोग पुढच्या वेळी परत हाच प्रश्न विचारुन करु नये. उमेदवार बरेच असतात आणि तितके काचेचे पेले फुटून वाया जाणं परवडत नाही.
६. कचेरीत साफसफाई करणाऱ्या शिपाईवर्गाने आपल्या हक्कांबद्दल सतर्क रहावे. एकदा सफाई केल्यावर कोणी पेला फोडून कचरा केल्यास तो फोडणाऱ्याला स्वच्छ करायला सांगावा.
-अनुराधा कुलकर्णी