या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Saturday 16 June 2007

गाथा माझ्या गझलेची

गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या जिनगानीवर!" वगैरे धमक्या मन सारखं देऊ लागलं आणि मी ठरवलं. "बास! आता एक तरी गझल लिहील्याशिवाय मी केस बांधणार नाही!"(ती द्रौपदी नाही का, दु:शासनाच्या रक्ताने केस बांधायला मिळेपर्यंत केस मोकळेच सोडते तसे.)

गझल लिहीण्यातली पहिली पायरी म्हणजे थोडे उर्दू येणे. आमचे उर्दू म्हणजे 'मोहब्बत' आणि 'कयामत' यापेक्षा वेगळे असलेले सगळे शब्द सारखेच वाटणारी. त्यात बाकी काफिया, मतला, मक्ता, नुक्ता, रदिफ़,अलामत, सानी मिसरा, उला मिसरा,तरही,शेर,जमीन हे अगम्य शब्द वाचून उच्चारापुरते माहिती होते. 'गझलेची बाराखडी' वाचायला घेतली. आणि
"गझलेतला प्रत्येक शेर ही स्वतंत्र अभिव्यक्ती असते, पण पूर्ण गझल वाचली असता त्यातून एकच अर्थ व्यक्त झाला पाहिजे." या नियमापाशी आमचं घोडं अडखळून खिंकाळलं. हा हा म्हणजे, 'हिरण्यकश्यपूला मार, पण दिवसाही नाही, रात्रीही नाही, घरातही नाही आणि बाहेर नाही' असा पेच झाला. पण तरीही गझलनामक हिरण्यकश्यपूला हरवण्याची प्रतिज्ञा केली.

काफिया आणि रदिफ़ यांच्याबद्दल वाचलं, पण तरीही थोडा गोंधळ राहिलाच. प्रत्येक समान ओळीतले शेवटचे दोन शब्द, त्यातला शेवटचा शब्द रदिफ़ आणि त्याच्या आधीचा काफिया असा काहीसा अंदाज बांधला. पण मग तीन शब्द लयीत असले तर शेवटून तिसऱ्याला काय म्हणायचं?प्री काफिया?? जाऊदे ना चक्रमादित्य! इथे शेवटच्या शब्दाचं काय, अक्षराचं यमक सांभाळताना फेफे उडते आणि निघालीय बया तीन शब्दांचं यमक सांभाळायला. मी दोन शब्दांचं यमक बनवायचं ठरवून नियम पुढे वाचायला घेतले.
"गझलेच्या शेवटच्या शेरात गझलकाराचं नाव काहीजणं लिहीतात." ही कल्पना मात्र मला फार आवडली. माझी ही गझल पिढ्यानुपिढ्या काव्यप्रेमी मंडळी गुणगुणणार, त्यांच्या ओठी प्रत्येकदा गझल गुणगुणताना आपलं नाव येणार ही कल्पना मनाला फारच गुदगुल्या करायला लागली. माझं नाव "कनकलतिका","प्रियदर्शिनी","विजयालक्ष्मी","अपराजिता", असं मालगाडीसारखं लांबलचक नसून लहानसं 'अनु' आहे याचा मला अभिमान वाटू लागला.

आता गझल बनवायची म्हणजे वृत्त हवे. तिथेही उजेडच होता. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा ।' म्हणजेच भुजंगप्रयात, 'वदनि कवळ घेता ।', 'शुक्रता ऽऽ रा ऽऽ मंदवा ऽऽऽ रा ऽ' म्हणजेच देवप्रिया सोडून बाकी सर्वच मंडळी जरा अनोळखी होती. भुजंगप्रयातात काहीतरी करायचं ठरवून पुढे वाचू लागले. आता गझल लिहायची म्हणजे विषय हवाच.
लोकप्रिय झालेले गझलेचे विषय हे असे:
१. प्रेम
२. प्रेमभंग
३. विरह
४. मद्य
५. जीवनाचा कंटाळा
मला नक्की कोणत्या विषयाची कास धरावी कळत नव्हतं. म्हणून विषय सावकाशीने ठरवायचं ठरवून लिहायला अस्तन्या सावरल्या. आधी टिपणवहीत काही शब्दांच्या जोड्या लिहून पाहिल्या. दोन शब्दांचा काफिया? काय बरं घ्यावा? शेवटी 'आहे' किंवा 'नाही' या शब्दांचं शेपूट लावलं की एक शब्द निश्चित झाला. आता राहिला शेवटून दुसरा शब्द. तो सहा वेळा जुळवायचा. (मी ज्या ज्या गझला वाचल्या त्यात पहिल्या शेरात दोन्ही ओळीत आणि बाकी उरलेल्या शेरात दुसऱ्या ओळीत काफिया होता. आणि गझल लिहायची म्हणजे कमीत कमी पाच शेर हवे असेही वाचल्याचे आठवत होते.) मी काफियांची यादी करायला घेतली. तशी मी जरा याद्या, तक्ते करण्याकडे जास्त कल असलेली आहे. अभियांत्रिकी परीक्षेत माहिती असलेल्या तुटपुंज्या चार ओळी उत्तरात नीट तक्ते पाडून, खाली रेघा मारुन लिहील्या की त्या सपाट लिहीण्यापेक्षा जास्त मार्क मिळतात या गाढ श्रद्धेतून हा रोग बळावला असावा.

"अमुक तमुक (काहीतरी अक्षर) रडा आहे" असा काफिया घ्यायचे ठरवले. 'कोरडा आहे', 'ओरडा आहे' इथवर ठीक होतं, पण पुढे डोक्यातून 'थेरडा आहे', (शॅमॅलिऑन)'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये निघायला लागल्यावर घाबरुन रद्द करुन टाकले.
"अमुक तमुक (काहीतरी अक्षर)रते आहे" अशा काफियावर आले. पण परत 'करते आहे','भरते आहे','मरते आहे','झुरते आहे','पुरते आहे','घोरते आहे','धरते आहे' याच्या आधीच्या अमुक तमुक जागा भरायला भयंकर त्रास व्हायला लागला. 'मी प्रेम करते आहे, मी तोय भरते आहे','मी खूप घोरते आहे','मी प्रेत पुरते आहे' वगैरे काहीतरी पाट्या टाकल्या असत्या तर प्रतिभावान गझलाकारांनी शाब्दिक बाण मारुन मारुन मलाच पुरायला कमी केलं नसतं.

आपण बापडे 'अमुक तमुक नाही' चा काफिया अजमावून बघुयात.
ह्म्म.."अमुक तमुक रवा नाही".. 'गारवा नाही','थोरवा नाही','मारवा नाही','गुरवा नाही' छ्या! काहीही सुचत नाही पुढे. आपल्याच भाषेतील शब्दांनी गरजेच्या वेळी असा दगा द्यावा? कोण हा दैवदुर्विलास? बरं. 'अमुक तमुक व नाही' कसं वाटतं? 'गाव नाही, पाव नाही, भाव नाही, पाव नाही, साव नाही, राव नाही, शेव नाही, पेव नाही, नाव नाही.' जबरा! किती सुचले. पण पाहिले तर यातले बरेच 'व नाही' एका गझलेत आधीच राबवले होते. जाऊ दे. आता आपण थेट ओळच लिहायला बसू.

"जीव माझा अंतरी या फारसा नाही" लिहीलं आणि पाठ थोपटायला आपला हात जास्त मागे जाणार नाही याची खंत वाटली. ठरलं तर मग. 'अमुक तमुक रसा नाही' असा काफिया. पण मला भूक लागल्याने सारखा 'अनारसा नाही', 'आमरसा नाही' च आठवत होतं. हाकून हाकून 'फारसा नाही', 'वारसा नाही', 'आमरसा नाही' इतकंच आठवत होतं. आता प्रोसेस म्हणजे प्रोसेस. 'रेफर टू डॉक्युमेंट' ची इतकी सवय झालेली की सवतः म्हणून काही सुचायलाच तयार नाही. शेवटी उघडला मोल्सवर्थ शब्दकोष आणि 'रसा' शेवटी असलेले शब्द हुडकले. आणि सगळे 'रसा नाही' असलेल्या ओळी मधे मधे भरल्या. मग त्यांच्या आधीच्या ओळी(यात यमक बिमक पाळायचं नसल्याने त्या जरा सोप्या होत्या.) भरुन काढल्या आणि ही अप्रतिम (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'टुकार!टुकार!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन)गझल जन्माला घातली. (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'पाडली! पाडली!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन) माझी ही 'कलाकुत्री' तुमच्या पुढे सादर करते:

"जीव माझा अंतरी या फारसा नाही
आज का न्याहाळला मी आरसा नाही

का मला नाकारले केवळ धनासाठी
(कर्तृत्व माझे,हा पिढ्यांचा वारसा नाही)

प्रेम छोट्याश्या नशेचे मद्य का आहे?
प्रेमकैफाची तुला त्या सुधारसा नाही

ते किती आले नि गेले मोजणी नाही
खूप शोध शोधून तुझा अंगारसा नाही

"अनु" म्हणे ही वेदना तर रोजची आहे
बामचा खोका अता बेवारसा नाही"

कोणाला गझल लिहायची शिकायची असल्यास मला व्यक्तीगत निरोप करावा आणि फी जमा करावी.
-अनु
--------------------------------------------------------------------------------
(डिसक्लेमर: कोणाही गझलकाराचा/गझलेचा/गझला ज्यांच्या खरोखर मनापासून स्त्रवतात त्यांचा अवमान करण्याचा उद्देश अजिबात नाही.माझ्यासारखा तांत्रिक माणूस गझल करायचा प्रयत्न कसा करेल याचा हा कल्पनाविलास आहे.तसेच यातील गझलेची बाराखडी या उल्लेखाबद्दल कविवर्यांची मनापासून क्षमा मागते.तसेच या लेखाचे शशांक यांच्या 'माझी साहित्यविषयक महात्वाकांक्षा' या लेखाशी असलेले साम्य हा योगायोग समजावा.)

21 comments:

HAREKRISHNAJI said...

बहोत अच्छे ,हवा वाहवा क्या बात है,बहोत खुब
क्या कहना, क्या लिखना, क्या पढना, क्या सुनना और क्या सुनाना. माशाअल्ला, आप तो बहोत माहिर शाइरा है. आपकी शायरी बहोत ही जल्दी शुहरा-ए-आ़फाक़ (जगप्रसिद्ध) हो जायेगी इसमे कोइ तशकीक नही है.

(गजल ऐकल्यानंतर अशी तारीफ करायला लागते का हो ? )

कोई उम्मीद बर नही आती ।
कोइ सूरत ऩजर नही आती ॥१
मौत का एक दिन मुअय्यन है ।
नींद क्यूं रात भर नही आती ॥२
आगे आती थी हाले दिल पे हंसी ।
अब किसी बात पर नही आती ॥३
काबा किस मुंह से जाओगे "गालीब" ।
शर्म तुमको मगर नही आती ॥५

खर सांगु आपला लेख अप्रतीम आहे, आज मी खुप पोट धरुन हसलो.

आपण असेच लिहीत जाणे,
आम्ही असेच वाचत जातो.

कुछ तो पढ़ीए कि लोग केहते हैं
आज "गालीब" ग़ज़लसरा न हुआ.


सुरेख लेखाबद्द्ल तशक्कुर.

Meghana Bhuskute said...

भन्नाट. अफलातून. कायच्या काय चाबूक!!!!! लवकर लवकर लिही ना...

Sumedha said...

"'मी प्रेम करते आहे, मी तोय भरते आहे','मी खूप घोरते आहे','मी प्रेत पुरते आहे' वगैरे काहीतरी पाट्या टाकल्या असत्या तर प्रतिभावान गझलाकारांनी शाब्दिक बाण मारुन मारुन मलाच पुरायला कमी केलं नसतं."

ह.ह.पु.वा.

तुझी गज़ल मस्त आहे हं :)

कोहम said...

अनु" म्हणे ही वेदना तर रोजची आहे
बामचा खोका अता बेवारसा नाही"

Avadala.....bhausaheb patankaranche sher tu vachales ka? bahutek vachale asashil....nastil tar muddam vaach....far maja aahe tyat...

Unknown said...

सुरेख गज़ल. आणि लिखणहि सुरेख जमतय.माझ्या फ़ेवरिट मध्ये हा ब्लोग टाकलाय. जमल्यास http://manobhasha.blogspot.com/ वर माझा ब्लोग पहावा ही विनंति.

Kamini Phadnis Kembhavi said...

हा हा
गझल लिहितानचा अनु"भव मलाही लिहावासा वाटत होता ब-याच दिवसांपासून पण आमची गाडी चार ते सात ओळितच अडून बसते , काय करणार नुसत्या कविताच पाडायची सवय लागलीये ना :P

गझल जमलीये कि पण ते अंगारसा कळल नाही फक्त
:)

Yogesh said...

अजूहूहूहूनही खोखोखो ह्हहसत हाहाहा आआहेहेहेहे... :))

Anonymous said...

ग़ज़ल तर आवडलीच!

Samved said...

हसून हसून लोटपोट झालो. सहीच आहे. तशीही गजल मला थोडीशी depressing वाटते (तीव्र निषेध...कोण ओरडलं रे तिकडे?)पण तुझा blog वाचून मजा आली. जरा पट्पट पाड की blog

Shreya's Shop said...

अच्छा ! अशी पाडतात काय गजल ? बरे झाले कळले ते, चला लगे हाथो मी पण गजलेवर हाथ(लेखणी) साफ करून घेऊ म्हणते...

राफा said...

अमुक तमुक (काहीतरी अक्षर) रडा आहे" असा काफिया घ्यायचे ठरवले. >>> :))))) सही !

मस्त (नको.. नको.. स्वस्त, त्रस्त, फस्त सुचतंय !!!) अं.. बेफाम लिहीलयं ! :)

Kavs said...

Pharach chhan lihile ahe!! :) virakt vs. asakt man ani awara-awari che post vachun khup maja ali. And before I sound repeatative let me say that saglech posts phar chhan ahet. :)

सर्किट said...

haa..haa.. :-) jabaradasta lihila ahes. ani vinodi blog likhanaat tuza kuni haat dharu shakanar nahi yachi punha khatri zali. :)

gazal paaDaNyaache tuze "anu"bhav ani tyatun janmalela apatya atishay vachaneey aahe.

keep blogging.

अनु said...

आपल्या प्रतिसादांबद्दल आभार वाचक आणि लेखकहो.
'अंगारसा' हे पॅचवर्क आहे. शेवटी रसा वाले सगळे आठवणारे शब्द संपले होते म्हणून. 'मी इतकी मुले पाहिली पण तुझ्यात जो अंगार आहे, जी बात आहे ती दुसऱ्या कोणातही नाही' असा या ओळीचा अर्थ घ्यावा.

Anonymous said...

Nice post!! Humourous, and so rightly describes the sorry state of newly inspired(!) writers---like me!! hehe!!!

Anand Sarolkar said...

Gazal padane=Bundi pandane! kiti sopa kiti avaghad. jo padto fakt tyalach kalat.

Hilarious post!

Anonymous said...

लोग मजबूर हैं पत्थर तो उछालेंगे ज़रूर,

क्यों न शीशों से कहा जाये वो टूटा न करें !

Unknown said...

झकास!
गझल चांगलीच जमलीय, म्हणजे, झकास चक्क्याच चवदार श्रीखंड जमावं तसं. त्यात दर्द आहे आणि तो दूर करायला बाम ही आहे. क्या बात हॆ! मी तर ह्या लेखनाचा पंखाच (म्हणजे मराठीत फ्यान) झालोय. वेळ मिळाला तर पामराचं http://manobhasha.blogspot.com/
नजरेखालुन घाला.
नव्या लिखाणाची आतुरतेने वाट पाहतोय.

Sonal said...

just too gud.... काही शब्दच नाहीत.. मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त

Rama Mohan said...

Your blog link has been placed in my Indian bloggers list http://lifestyle-india.blogspot.com/.
Check it in generel category

http://lifestyle-india.blogspot.com/2007/09/list-of-indian-bloggers-with-different.html

Thank you
Mohan

Anonymous said...

sundar lekh aahe.tumhi khup sundar lihita.