या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Showing posts with label timepass. Show all posts
Showing posts with label timepass. Show all posts

Monday, 31 December 2007

जज्जाची कोठी

'नॉसफेरातु' उर्फ 'ड्रॅक्युला' लिहीणार्‍या (ज्या 'ड्रॅक्युला' संकल्पनेचा हॉलीवूड आणि आपल्या रामसे भयपटांनीही भरपूर वापर केला) ब्रॅम स्टोकर च्या 'द जज्जेस हाउस' चे भाषांतर/रुपांतर करण्याचा हा एक प्रयत्न.

जज्जाची कोठी

Saturday, 16 June 2007

गाथा माझ्या गझलेची

गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या जिनगानीवर!" वगैरे धमक्या मन सारखं देऊ लागलं आणि मी ठरवलं. "बास! आता एक तरी गझल लिहील्याशिवाय मी केस बांधणार नाही!"(ती द्रौपदी नाही का, दु:शासनाच्या रक्ताने केस बांधायला मिळेपर्यंत केस मोकळेच सोडते तसे.)

गझल लिहीण्यातली पहिली पायरी म्हणजे थोडे उर्दू येणे. आमचे उर्दू म्हणजे 'मोहब्बत' आणि 'कयामत' यापेक्षा वेगळे असलेले सगळे शब्द सारखेच वाटणारी. त्यात बाकी काफिया, मतला, मक्ता, नुक्ता, रदिफ़,अलामत, सानी मिसरा, उला मिसरा,तरही,शेर,जमीन हे अगम्य शब्द वाचून उच्चारापुरते माहिती होते. 'गझलेची बाराखडी' वाचायला घेतली. आणि
"गझलेतला प्रत्येक शेर ही स्वतंत्र अभिव्यक्ती असते, पण पूर्ण गझल वाचली असता त्यातून एकच अर्थ व्यक्त झाला पाहिजे." या नियमापाशी आमचं घोडं अडखळून खिंकाळलं. हा हा म्हणजे, 'हिरण्यकश्यपूला मार, पण दिवसाही नाही, रात्रीही नाही, घरातही नाही आणि बाहेर नाही' असा पेच झाला. पण तरीही गझलनामक हिरण्यकश्यपूला हरवण्याची प्रतिज्ञा केली.

काफिया आणि रदिफ़ यांच्याबद्दल वाचलं, पण तरीही थोडा गोंधळ राहिलाच. प्रत्येक समान ओळीतले शेवटचे दोन शब्द, त्यातला शेवटचा शब्द रदिफ़ आणि त्याच्या आधीचा काफिया असा काहीसा अंदाज बांधला. पण मग तीन शब्द लयीत असले तर शेवटून तिसऱ्याला काय म्हणायचं?प्री काफिया?? जाऊदे ना चक्रमादित्य! इथे शेवटच्या शब्दाचं काय, अक्षराचं यमक सांभाळताना फेफे उडते आणि निघालीय बया तीन शब्दांचं यमक सांभाळायला. मी दोन शब्दांचं यमक बनवायचं ठरवून नियम पुढे वाचायला घेतले.
"गझलेच्या शेवटच्या शेरात गझलकाराचं नाव काहीजणं लिहीतात." ही कल्पना मात्र मला फार आवडली. माझी ही गझल पिढ्यानुपिढ्या काव्यप्रेमी मंडळी गुणगुणणार, त्यांच्या ओठी प्रत्येकदा गझल गुणगुणताना आपलं नाव येणार ही कल्पना मनाला फारच गुदगुल्या करायला लागली. माझं नाव "कनकलतिका","प्रियदर्शिनी","विजयालक्ष्मी","अपराजिता", असं मालगाडीसारखं लांबलचक नसून लहानसं 'अनु' आहे याचा मला अभिमान वाटू लागला.

आता गझल बनवायची म्हणजे वृत्त हवे. तिथेही उजेडच होता. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा ।' म्हणजेच भुजंगप्रयात, 'वदनि कवळ घेता ।', 'शुक्रता ऽऽ रा ऽऽ मंदवा ऽऽऽ रा ऽ' म्हणजेच देवप्रिया सोडून बाकी सर्वच मंडळी जरा अनोळखी होती. भुजंगप्रयातात काहीतरी करायचं ठरवून पुढे वाचू लागले. आता गझल लिहायची म्हणजे विषय हवाच.
लोकप्रिय झालेले गझलेचे विषय हे असे:
१. प्रेम
२. प्रेमभंग
३. विरह
४. मद्य
५. जीवनाचा कंटाळा
मला नक्की कोणत्या विषयाची कास धरावी कळत नव्हतं. म्हणून विषय सावकाशीने ठरवायचं ठरवून लिहायला अस्तन्या सावरल्या. आधी टिपणवहीत काही शब्दांच्या जोड्या लिहून पाहिल्या. दोन शब्दांचा काफिया? काय बरं घ्यावा? शेवटी 'आहे' किंवा 'नाही' या शब्दांचं शेपूट लावलं की एक शब्द निश्चित झाला. आता राहिला शेवटून दुसरा शब्द. तो सहा वेळा जुळवायचा. (मी ज्या ज्या गझला वाचल्या त्यात पहिल्या शेरात दोन्ही ओळीत आणि बाकी उरलेल्या शेरात दुसऱ्या ओळीत काफिया होता. आणि गझल लिहायची म्हणजे कमीत कमी पाच शेर हवे असेही वाचल्याचे आठवत होते.) मी काफियांची यादी करायला घेतली. तशी मी जरा याद्या, तक्ते करण्याकडे जास्त कल असलेली आहे. अभियांत्रिकी परीक्षेत माहिती असलेल्या तुटपुंज्या चार ओळी उत्तरात नीट तक्ते पाडून, खाली रेघा मारुन लिहील्या की त्या सपाट लिहीण्यापेक्षा जास्त मार्क मिळतात या गाढ श्रद्धेतून हा रोग बळावला असावा.

"अमुक तमुक (काहीतरी अक्षर) रडा आहे" असा काफिया घ्यायचे ठरवले. 'कोरडा आहे', 'ओरडा आहे' इथवर ठीक होतं, पण पुढे डोक्यातून 'थेरडा आहे', (शॅमॅलिऑन)'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये निघायला लागल्यावर घाबरुन रद्द करुन टाकले.
"अमुक तमुक (काहीतरी अक्षर)रते आहे" अशा काफियावर आले. पण परत 'करते आहे','भरते आहे','मरते आहे','झुरते आहे','पुरते आहे','घोरते आहे','धरते आहे' याच्या आधीच्या अमुक तमुक जागा भरायला भयंकर त्रास व्हायला लागला. 'मी प्रेम करते आहे, मी तोय भरते आहे','मी खूप घोरते आहे','मी प्रेत पुरते आहे' वगैरे काहीतरी पाट्या टाकल्या असत्या तर प्रतिभावान गझलाकारांनी शाब्दिक बाण मारुन मारुन मलाच पुरायला कमी केलं नसतं.

आपण बापडे 'अमुक तमुक नाही' चा काफिया अजमावून बघुयात.
ह्म्म.."अमुक तमुक रवा नाही".. 'गारवा नाही','थोरवा नाही','मारवा नाही','गुरवा नाही' छ्या! काहीही सुचत नाही पुढे. आपल्याच भाषेतील शब्दांनी गरजेच्या वेळी असा दगा द्यावा? कोण हा दैवदुर्विलास? बरं. 'अमुक तमुक व नाही' कसं वाटतं? 'गाव नाही, पाव नाही, भाव नाही, पाव नाही, साव नाही, राव नाही, शेव नाही, पेव नाही, नाव नाही.' जबरा! किती सुचले. पण पाहिले तर यातले बरेच 'व नाही' एका गझलेत आधीच राबवले होते. जाऊ दे. आता आपण थेट ओळच लिहायला बसू.

"जीव माझा अंतरी या फारसा नाही" लिहीलं आणि पाठ थोपटायला आपला हात जास्त मागे जाणार नाही याची खंत वाटली. ठरलं तर मग. 'अमुक तमुक रसा नाही' असा काफिया. पण मला भूक लागल्याने सारखा 'अनारसा नाही', 'आमरसा नाही' च आठवत होतं. हाकून हाकून 'फारसा नाही', 'वारसा नाही', 'आमरसा नाही' इतकंच आठवत होतं. आता प्रोसेस म्हणजे प्रोसेस. 'रेफर टू डॉक्युमेंट' ची इतकी सवय झालेली की सवतः म्हणून काही सुचायलाच तयार नाही. शेवटी उघडला मोल्सवर्थ शब्दकोष आणि 'रसा' शेवटी असलेले शब्द हुडकले. आणि सगळे 'रसा नाही' असलेल्या ओळी मधे मधे भरल्या. मग त्यांच्या आधीच्या ओळी(यात यमक बिमक पाळायचं नसल्याने त्या जरा सोप्या होत्या.) भरुन काढल्या आणि ही अप्रतिम (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'टुकार!टुकार!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन)गझल जन्माला घातली. (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'पाडली! पाडली!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन) माझी ही 'कलाकुत्री' तुमच्या पुढे सादर करते:

"जीव माझा अंतरी या फारसा नाही
आज का न्याहाळला मी आरसा नाही

का मला नाकारले केवळ धनासाठी
(कर्तृत्व माझे,हा पिढ्यांचा वारसा नाही)

प्रेम छोट्याश्या नशेचे मद्य का आहे?
प्रेमकैफाची तुला त्या सुधारसा नाही

ते किती आले नि गेले मोजणी नाही
खूप शोध शोधून तुझा अंगारसा नाही

"अनु" म्हणे ही वेदना तर रोजची आहे
बामचा खोका अता बेवारसा नाही"

कोणाला गझल लिहायची शिकायची असल्यास मला व्यक्तीगत निरोप करावा आणि फी जमा करावी.
-अनु
--------------------------------------------------------------------------------
(डिसक्लेमर: कोणाही गझलकाराचा/गझलेचा/गझला ज्यांच्या खरोखर मनापासून स्त्रवतात त्यांचा अवमान करण्याचा उद्देश अजिबात नाही.माझ्यासारखा तांत्रिक माणूस गझल करायचा प्रयत्न कसा करेल याचा हा कल्पनाविलास आहे.तसेच यातील गझलेची बाराखडी या उल्लेखाबद्दल कविवर्यांची मनापासून क्षमा मागते.तसेच या लेखाचे शशांक यांच्या 'माझी साहित्यविषयक महात्वाकांक्षा' या लेखाशी असलेले साम्य हा योगायोग समजावा.)

Monday, 12 March 2007

हवी आहेत: भूते

जाहीरात:एका भूतकथाप्रेमी वाचकाला हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते.
पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य.(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी काही/सर्व बाबींत सवलत देण्यात येईल.)
संपर्क: मी अनु

चमकलात का जाहीरात वाचून? काय करावे हो, पूर्वी सारखी खानदानी भूते राहीली नाहीत आता..म्हणून जाहीरात द्यावी लागते..प्रेमकथा सर्वत्र आहेत, रहस्यकथा सर्वत्र आहेत, पण भूतकथा मात्र हल्ली वाचायलाच मिळत नाहीत..लहानपणापासून भूतकथा आणि भूतचित्रपटांचे मला जबरदस्त आकर्षण. रात्री उशिरापर्यंत बैठकीच्या खोलीत भूतकथा( नारायण धारप लिखीत) वाचून मग आता झोपण्याच्या खोलीत न घाबरता कसे जायचे?मग पॅसेजचा दिवा लावून बैठकीच्या खोलीतील दिवा घालवून पळत पळत पॅसेजमधे जायचे..आता स्वयंपाकघरातल्या अंधारात न पाहता पळत पळत झोपण्याच्या खोलीत जाऊन एक मंद दिवा लावून पॅसेज मधे परत यायचे..पॅसेज मधला दिवा घालवून पळत पळत झोपण्याच्या खोलीतला मंद दिवा घालवून डोक्यावरुन पांघरुण घेऊन गुडुप्प झोपून जायचे.

आमच्या लहानपणी 'झी' 'स्टार' इ.इ. बाळांचा जन्म झाला नव्हता. दूरदर्शन हा एकमेव वाली. आणि मग मंगळवारी रात्री ९ ला लागणारी 'किले का रहस्य' मालिका श्वास रोखून पहायची. पण 'किले का रहस्य' ने शेवटी हे एक कटकारस्थान आहे असे दाखवून भूत संकल्पनेचा बट्ट्याबोळ केला. नंतर 'झी' वाहीनीवर बराच गाजावाजा करुन 'द झी हॉरर शो' आला. त्याचा पहिला भाग 'दस्तक' डोळे बंद ठेवून मधून मधून उघडून('आई, भूत अचानक दारामागून आलं कि मला सांग.नंतर मी डोळे उघडते.') पाहीला. 'भूते' हि केवळ स्मशान आणि कब्रस्तान यापुरती मर्यादीत न राहता कपाटातही (कपाट उघडल्यावर हात पुढे करुन नायिकेचा गळा दाबण्यासाठी)असतात आणि खाण्याच्या बशीवर नुसते मुंडके(स्वत:चे) पण ठेवू शकतात हा शोध लागला. मग काही महिने कपाट उघडताना आधी हळूच एक इंच उघडायचे..मग एकदम वेगाने पूर्ण उघडून वेगाने मागे सरायचे..आणि कपाटात कोणी नाही याची खात्री करुन मग पुढे सरकायचे.. (भूताला चकवण्यासाठी हा उपद्व्याप बरे का!)

रामसे बंधूंचा 'विराना' चित्रपट आणि इव्हील डेथ:भाग १ व २(३ अगदीच पुळचट होता..) यानी भूताना मानाचे स्थान मिळवून दिले. इव्हील डेथ पाहून झाल्यावर पलंग खिडकीपाशी होता तो सरकवला. त्या काळात एकदा थोड्या झाडीयुक्त प्रदेशातून घरी परत येत असताना झाडामागून लघुशंका करुन परत येणार्‍या पांढर्‍या सदर्‍यातल्या माणसाला मी असली सॉलीड घाबरले होते ना!! अशावेळी मी हळूच पाय पाहून घेते उलटे आहेत का. ती माझ्यादृष्टीने विश्वसनीय चाचणी असते. रामसे पटांत'अमावस्या' आणि कुत्रे रडताना आणि नायिका रात्री गाणे गुणगुणत आंघोळहौदात शिरली कि भूताचा सन्माननीय प्रवेश कथानकात होणार हे माहीती असायचे.. पण 'जुनून' चित्रपटाने 'पौर्णिमा' आणि 'वाघभूत' यांचा परस्परसंबंध जोडून 'अमावस्येला भूत येते' या रामसेबंधू गुरुसूत्राला दणदणीत हादरा दिला. (हा हंत हंत! वो भूत भूत हि क्या, जो अमावस कि रात ना आये??)

'झी हॉरर शो' हळूहळू 'हास्यमालिका' बनू लागला. यंत्रमानवासारखी चालणारी आणि भितीदायक न दिसता मतिमंद दिसणारी भूते येऊ लागली.आता सोनी वाहीनी वर 'आहट' मालिका आली. 'आहट' नेही अपेक्षा खूप वाढवल्या पहिल्या भागात मुंडकेविरहीत तरुण मुलीचे भूत दाखवून. पण नंतर 'आहट' पण विज्ञानमालिका आणि रहस्यमालिका प्रकाराकडे झुकायला लागले आपले 'भूतमालिका' पद सोडून.

मला आतापर्यंत आवडलेले एव्हरग्रीन भूत म्हणजे ड्रॅक्युला. अहाहा.. काय ते सुळे..काय ते त्याचे पांढरे डोळे.काय त्याचे 'एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ' या उदात्त धोरणाने जास्तीत जास्त माणसांचे रक्त शोषून त्याना ड्रॅक्युला पंथाची दिक्षा देण्याचे सत्कार्य!! ड्रॅक्युला कल्पनेवर आधारीत कथा नारायण धारपानी लिहीली ती 'लुचाई'. तीही घाबरवण्याच्या चाचणीत १०० पैकी १०० मिळवून गेली. ड्रॅक्युला ने ड्रॅक्युला बनवलेले पूर्ण गाव, आणि शेवटी त्या गावात उरलेला एकटा नायक आणी एक लहान मुलगा, जे दिवसा गावाला आग लावून रात्र होण्याच्या आत तिथून बाहेर पडतात. तुम्हीपण अवश्य वाचा मिळाल्यास.

नारायण धारपानी काही अप्रतिम भूतकथा दिल्या, पण हल्ली त्यांच्या कथा 'सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा संघर्ष' आणि 'समर्थानी ध्यान करुन दिव्य आत्म्याना आवाहन केले आणि त्या आत्म्यांनी दुष्ट शक्तींचा नायनाट केला' अशा सौम्य बनल्या आहेत. (नारायण धारपांच्या चाहत्यानी या वाक्यासाठी मला क्षमा करावी.)

इथे आंग्ल ग्रंथालयात स्टिफन किंग चे 'पेट सिमेट्री' वाचले आणि मला शोध लागला कि आहट चा एक भाग 'कॉपी टू कॉपी माशी टू माशी' आहे त्या कथेचा. योगायोगाने एका रविवारी रात्री ११ वाजता झोप येत नाही म्हणून वेडे खोके लावले तर त्याच कथेचा चित्रपट लागला होता. मग काय...'रविवार रात्र' 'उद्या लवकर उठायचे आहे' 'रात्री भिती वाटल्यास इथे कोणी नाही' वगैरे सर्व विसरुन तो पूर्ण पाहीला. कथा 'माणसे जिवंत करण्याची शक्ती असलेल्या दफनभूमीवर' आधारीत. मग रात्री परत घाबरणे आणि गायत्रीमंत्र.. इथे आल्यावर एकदा अशीच फिरत फिरत(दिवसा) किरिस्ताव स्मशानभूमीत जाऊन आले 'कब्रस्तान' प्रत्यक्ष बघण्यासाठी. 'किरिस्ताव' भूत भेटले तरी मी हिंदू असल्याने ते माझ्यापेक्षा त्याच्या धर्माच्या आणि त्याची मातृभाषा कळणार्‍या माणसाला जास्त पसंत करेल हि माझी कल्पना. पण ते कब्रस्तान कमी आणि बाग जास्त वाटत होती. पेन्शनर जोडपी आणि तुरळक प्रेमीयुगुले तिथे फिरत होती. झाडे फुले नीट निगा राखून सुंदर ठेवली होती. पण सौंदर्य असले तरी तिथे खिन्नता होती एकप्रकारची.

ड्रॅक्युला हे किरीस्ताव भूत जबरदस्त असले तरी आपल्याकडची भूतेही कमी नाहीत. 'गिरा' हे समुद्रकिनार्‍यावरील भूत(गिर्‍याची शेंडी कापून कपाटात ठेवली कि तो ती परत मिळवण्यासाठी आपल्याला हवे ते देतो.),मुंजा,वेताळ,हडळ,ब्रम्हराक्षस इ.इ. आपल्याकडची भूतेही प्रसिद्ध आहेत.

माझ्यासारखेच अनेक भूतकथाप्रेमी इथे असतील ना? मी त्याना(आणि भूतकथा अ-प्रेमीनापण) आवाहन करते आहे ऐकीव/वाचलेल्या भूतकथा आपापल्या अनुदिन्यांवर आणण्याचे.. भूताला जात/धर्म/लिंग/वय/देश यांचे बंधन नाही. फक्त घाबरवण्याचे काम त्याला नीट करता आले पाहीजे हि एकच अट आहे. मग, देता ना तुम्हाला माहीती असलेल्या जबरदस्त भूतकथा? मी वाट पाहीन.'घाबरा आणि घाबरवा' हेच आमचे ब्रीदवाक्य!!
-आपली(सरळ पाय असलेली)अनु