या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Friday, 10 April 2020

इगो मसाज देणारी सौंदर्यवारी

(या लेखात पार्लर किंवा कोणत्याही व्यावसायिकाची बदनामी नाही.त्यांचे कौशल्य, त्यांच्या पुढच्या अडचणी आणि आव्हानं याची पूर्ण कल्पना आहे.)
"काय काय करायचंय?"
"पूर्ण हात अर्धेपाय भुवया पेडी हेअरकट आणि फेशियल." मी उडपी हॉटेल मधल्या सारखा मेनू वाचून दाखवला.
"आमच्याकडे ना, हिरे मोती आणि पोवळं पावडर घातलेल्या फेशियल ची ऑफर आहे.फक्त 2000 मध्ये."
(स्वगत: अगं सुंदरी, मी लग्नानंतर पहिल्यांदाच स्वतःच्या डोंबल्यावर इतके पैसे एका वेळी ओतणार आहे.ते पण वार्षिक वर्गणीत फुकट असलेले पैसे पॅकेज डिस्काऊंट मध्ये वसूल करायला.हिऱ्याची पावडर मी लग्नाच्या फेशियल मध्ये पण लावली नव्हती थोबाडाला.फेशियल झाल्यावर 'काय सुंदर मुलगी आहे आरश्यात' पासून 'बाई तश्या सुसंस्कृत व नीटनेटक्या दिसतायत' असं आरश्याला म्हणण्याच्या स्टेज ला चेहऱ्याला कोणतेही हिरे मोती प्लॅटिनम लावता आलेय मी.आज मला पाहिजे ती पावडर फासू दे तोंडावर.अजिबात प्रेशराईज करायचं नाही.)
"नाही मला हर्बल लव्हेंडरच पाहीजेय."
(स्वगत: निश्चयाचा महामेरू|| सकल जगासी आधारू|| तयाचे आठवावे रूप|| निर्धार दाखवावा खूप||)
"पण मॅडम डायमंड ने खूप छान रिझल्ट मिळतील."
"मला रोजच्या साठी पाहीजेय.डायमंड फंक्शन च्या आधी करेन."
(स्वगत: होत आलं.आता अजून थोडं लावून धरलं की झालं.थोडा ताण सहन कर.)
सुंदरीने भात्यातून पुढचा बाण काढला.
"मॅम लव्हेंडर चे किट्स संपलेत.जास्त जात नाही ना.सगळे डायमंड च घेतात."
(स्वगत: अगं ढमे!! दर वेळी कमी किमतीचं बरं संपलेलं असतं.पुढच्या वेळी मीच घेऊन येईन.पार्लर वर काय 'बाहेरचे सौंदर्यपदार्थ आणू नये' अशी पुण्याच्या खानावळी सारखी पाटी नाही.बस मग ओरडत!)
"मी पॅकेज घेतलं आहे.त्याच्या वर खर्च करणार नाही.त्यात बसेल ते चांगलं फेशियल सुचवा किंवा डायमंड फेशियल पॅकेज मध्ये बसवून द्या."
(स्वगत: मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं टाकली नाहीत.मी हिरे मोती पोवळं उचलणार नाही.)
"मॅम ओथ्री फेशियल थोडं महाग आहे पण मी बोलून बघते.तुम्ही पॅकेज मधलं पेडी कॅन्सल करून हे बसवू आपण."
ओथ्री च्या वाटाघाटी पूर्ण करून रोब घालायला खोलीत गेले.नेहमी प्रमाणेच 'कॅमेरे दिसतायत का' वगैरे शोध झाला.(आता कॅमेरे काय लावायचे असले तर लोक 'कॅमेरा' अशी पाटी लावून बाण दाखवून त्याचं भिंग दिसेल असा प्लांट करणार आहेत का?)
लग्नघरामध्ये 50 बायका एका वऱ्हाड खोलीत मेकअप, चेंजिंग, फिडिंग,चहा पिणे असा गोंधळ घालत असताना, दार उघडं असताना, त्यातून दर 3 मिनिटाला एक पुरुष नावाचा मोठा किंवा मुलगा नावाचा लहान प्राणी दर 45 अंशात शक्यतो गोंधळून सभ्यपणे लांब इकडे तिकडे बघत काहीतरी मागायला येत असतो अश्या ठिकाणी मोठा कुर्ता डोक्यात घालून पाठमोरं ब्लाउज/परकर बदलणाऱ्या अनुभवी शूरवीर बाया चेंजिंग रूम मध्ये कॅमेरा काय, उघड्या मैदानावर काचेच्या भिंती असल्या तरी बिचकणार नाहीत. आणि तरीही समजा आपण आलोच कोणत्या बिचाऱ्या कॅमेऱ्यात तर आरश्यात दात विचकून बघणे,पॅन्ट पोटावरुन वर खेचणे वगैरे बावळटलीला करून आपला व्हिडीओ रिजेक्ट करवायचा असतोय.आता काय ते इरोटीक फिरोटीक बघणारे, असं काही वेडं बागडं बघून काय करणारेत.(जाऊद्या, नको त्या भलत्या विचारांच्या गल्ल्यात जायला.एखादा बाई आरश्यात पिवळे दात विचकताना बघून टर्न ऑन होणारा पर्व्ह असायचाही जगात, कोणी पाहिलंय?)
सुंदरी सौंदर्य संवर्धन चालू करते.
"खूप टॅनिंग झालंय हाताला.तुम्ही हॅन्डकॅटा विथ डीटॅन अँड टोनिंग घ्यायला पाहिजे होतं."
"फंक्शन च्या आधी.ही रुटीन ट्रीटमेंट आहे."
"तुम्हाला रोज चांगलं दिसावंसं नाही का वाटत?"
"मला फंक्शन आधीच चांगलं दिसायला आवडतं.म्हणजे लोकांना फरक पटकन कळतो."
वाचायला म्हणून रेट कार्ड हाती घेतलं."केस कापणे" हा सर्वात स्वस्त प्रकार वगळता बाकी प्रकरणं अनेक हजारात जात होती.आपल्या केसाला हायलाईट नावाची झेब्रा रंगरंगोटी नुसती नाही करता येणार.त्याच्या आधी कॅनव्हास काळा पांढरा आहे तो 'कौआ काला' करायला ग्लोबल कलर करावं लागेल.जाऊदे बापडं.तेही पमी च्या लग्नापूर्वी करू.आता काय गरज नाही. 'हेअर स्ट्रेटनिंग' हा प्रकार 6000 ला असल्याचं वाचून आपले केस अत्यंत सरळ आहेत हे आठवून जीव दणकन भांड्यात पडतो.
लहानपणी हे केस कुरळे करायला काय काय नाही केलं.रोलर लावून झोपणे,धातूचा ब्रश गॅसवर गरम करून केसाला गुंडाळणे, लोकल मध्ये मिळणारी प्लॅस्टिक ची 'आरारो करने वाली जुनागड वाली' ची हेअरस्टाईल करणारी क्लिप डोक्याला लावून त्यात केस सर्व दिशानी वेडेवाकडे कोंबून वाफ घेणे.रात्रभर ओल्या केसांच्या वेण्या घालून झोपणे, प्रेमाने काळजी म्हणून अंडी,दूध,दही, निवडुंग,मेंदी,केळं, स्ट्रॉबेरी, काळीमिरी, लवंग, मुलतानी मिट्टी,हळद,दालचिनी, कांदे, टॉमेटो,जायफळ काय काय म्हणून थोबाड आणि केसाला लावायचं सोडलं नाही.आता केसच सोडून चाललेत ते सोडा.अजून 10 वर्षात काहीतरी गॅजेट येईल.हेल्मेट मध्ये ठेवून बटन दाबलं की पाहिजे तितके केस उगवतील.तोपर्यंत आपल्या डोक्यावर असलेले 4 केस टिकवणे.
विचारांची तंद्री अचानक कोणीतरी सुई भोसकायला लागल्याने भंग झाली.सुंदरीने ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड काढायला आकडा वाली सुई नाक आणि कपाळावर टोचायला चालू केली होती.अजून पोलिसांना थर्ड डिग्री ला वापरायला ही पद्धत कशी नाही दिसली काय माहीत.तरी परवाच "चपळ कोळश्याचा मुखवटा" (ऍक्टिव्ह चारकोल फेस मास्क) वापरून पण इतके काळे आणि पांढरे हेड होते.कोळश्याचा मुखवटा चढवल्यावर तो पूर्ण वाळेपर्यंत आणि उपटून काढता येईपर्यंत थांबावे.नाहीतर तो धुवायला प्रचंड पाणी लागते."जा अपना मूह काला कर.आज से तू हमारे लिये मर गयी" हे फक्त पिक्चरमध्येच ठीक.खरंच मुह काला केलं तर पाण्याचं बिल भरूनच फेस यायचा तोंडाला.
टोचण समारोह संपल्यावर ओथ्री फेस पॅक मुळे चेहऱ्याला शांती लाभली.सुंदरी होती छानच दिसायला.काम पण छान करत होती.ही चेहऱ्याला ओथ्री लावत असेल की हिरेमोती?हॉटेल मालक जेवायला दुसऱ्या हॉटेल मध्ये जातो तशी ही दुसऱ्या पार्लर ला जात असेल का?हिचं लग्न झालंय का?(स्वगत आवरतं घेतलं.नात्यातल्या सर्व मुलांची लग्न झालीत.आता ज्यांची झाली नाहीत ते मोठे होईपर्यंत 'लग्न' हा प्रकार बहुतेक म्युझियम मध्येच वाचायला मिळेल.)
आता थोबाड धुवून बाहेर जाऊन हेअर कट करायला एक काळे, सोनेरी आणि प्लॅटिनम केस रंगवलेला सुंदरा होता त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले."पुरुष बायकांचे हेअरकट बायकांपेक्षा चांगले करतात" ही स्त्रियांमध्ये पसरलेली "क्रिकेट मॅच च्या वेळी अमका बसला की हमखास भारताची टीम हरते" याच्या तोडीची अंधश्रद्धा आहे.कारण यु नो...पुरुषाच्या नजरेतून बाईला कोणते केस सुंदर दिसतील याचा आढावा वगैरे वगैरे...आता या तिरंगी प्राण्यापुढे सकाळपासून 100 बाया येऊन केस कापून,सरळ करून,वाकडे तिकडे करून नि रंगवून गेल्यात.त्यातल्या निम्म्या त्याच्या ताई काकू मावशी अक्का आणि उरलेला दुर्मिळ टक्का अप्राप्य इंग्लिश बोलणारा आणि आयफोन सोडून कुठेही नजर ढळू न देणारा स्वर्गीय सुंदर समूह आहे.
हा तिरंगकेशी मुलगा समोर स्त्री, अस्वल,मांजर,कुत्रे,लँगुर माकड,फर ची पर्स काहीही बसलं तरी तितक्याच निर्विकार मनाने केस कापतोय.सध्या याच्या समोर एक टोकदार दाढी वाला मुलगा आहे.याने मोहक(नाही नाही मोहॉक) मध्ये थोड्या स्टेप्स सांगून एक बराच सेटिंग लागणारा कट सांगितला आहे.शिवाय दाढी ट्रिम वगैरे.सध्या हा त्या स्टेप वाल्या मोहक प्रकाराने पूर्वीच्या काळी ते केसा सारखा दिसणारा जिरेटोप घालणारे सैनिक दिसायचे तसा किंवा ड्रॅगन च्या पाठीसारखा दिसतोय.काय ही मुलं..यांचे काका मामा गुळगुळीत दाढी आणि कमी केस स्पाईक्स वगैरे घेऊन वय लपवतायत आणि ही 16 का 20 ची मुलं चार मुलांचे बाप दिसतायत अश्या दाढ्या वगैरे ठेवुन.हे लोक मोठे होतील तेव्हा फॅशन काय असेल?2 वेण्या वगैरे?आंबाडा झाला, हेअरबँड झाला, शेंडी झाली.आता खोपा,झुल्याची वेणी, आणि फ्रेंच प्लेट वेणी राहिलीय.झाला एकदाचा बाब्याचा नट्टापट्टा.
"मॅडम लास्ट टाइम कुठे कापले होते केस? फारच वेडेवाकडे आणि फेज आऊट झालेत." तिरंगकेशी माझ्या केसांकडे वळलाय.
"तुम्हीच कापले होते.फोटो पण काढला होता छान सेट झालेत म्हणून."
मी मख्खपणे तिरंगी प्राण्याचा वडा करते.
"ओहो हो का, मला आठवलंच नाही.तसे व्यवस्थित आहे.ट्रिम केला की छान दिसेल शेप."
(ग्लोबल कलर आणि हायलाईट करावे का?नको इतके हजार एका महिन्यात केसांवर वसूल व्हायला रपंझेल सारखे मोठे केस लागतील.आणि परत दीड महिने आणि 10 शाम्पू नंतर आहेच काळा वांगी कलर पांढरा तिरंगी कारभार.जाऊदे नंतर बघू.)
तिरंगी प्राणी केसाला बरेच सिरम, क्लिपा लावून केस छान कापून वळवून देतो.हेअरकट आणि सेट केलेले केस पार्लर च्या आरश्यात जितके सुंदर दिसतात तितके पार्लर बाहेर येऊन 2 पावलं चाललं तरी टिकत नाहीत.त्यामुळे हा लूक फोटोबंद करणे आलेच.पब्लिक ला पुरावा म्हणून दाखवता येतो 'केला तेव्हा असा दिसायचा कट' म्हणून.बाकी केस धुतल्यावर किंवा स्कार्फ बांधल्यावर परत 'वेडेवाकडे केस वाढलेली वेडी बै' लूक आहेच.
आयब्रो साठी परत सुंदरी आली.मी अजून पार्लर मध्ये आयब्रो करून देणारा एकही पुरुष पाहिला नाहीय.कदाचित मायनिंग इंजिनियरिंग ला बाया घेत नाहीत तसं आयब्रो कॉलेज ला पुरुष घेत नसतील.
"कश्या करायच्यात?"
"अगदी फक्त रेषेबाहेरचे केस कमी करायचेत.पातळ नको.वर टोक नको."
सगळ्या बायकांना आयब्रो करायच्या असतात, पण 'आयब्रो केल्या' असं समोरच्याला जाणवू द्यायचं नसतं.खारी बिस्किटाला तुपामुळे ज्याप्रकारे मस्त चव येते, पण त्यातलं तुपाचं अस्तित्व जाणवत नाही त्याप्रमाणे आयब्रो हा 'केल्यात दिसू नये, पण चेहऱ्यात रेखीव बदल जाणवावा' असा छुपा प्रकार आहे.
आता हा "केस उपटा पण किसिको कानोकान खबर ना हो" वाला प्रकार प्रत्यक्ष अंमलात आणायला अत्यंत कठीण असल्याने सुंदरी मनात वैतागून जोरात किंचाळते पण आपले प्रयत्न चालू ठेवते.शेवटी 'इथून एक केस जास्त, उजव्याचा दोन केस कमी' असं करत स्टारट्रेक का वर्ल्ड मधल्या स्पोक सारखा तो पॉईंट येतोच.मी निश्चयाने या पॉईंट वरून नांगर फिरवून गोल ऐवजी सपाट आयब्रो निवडते.आणि एकदाचा हा प्रकार पूर्ण होतो.
तर अश्या प्रकारे पॅकेज चे पैसे वसूल झाले आहेत.पण पार्लर मधून बाहेर पडल्यावर मूळ नग मनातून बराच सुखावला असला तरी बाहेरून जवळजवळ सारखाच दिसतोय.अगदी 'पुरी ते परी' वाला फरक पडलेला नाहीये.कदाचित 'किती फरक पडला' पेक्षा 'स्वतःची काळजी घ्यायला महिन्यात इतके तास आणि पैसे खर्च केले' हा इगो मसाजच चेहऱ्यावर जास्त चमक आणत असावा!
-अनुराधा कुलकर्णी

Tuesday, 22 January 2019

हस्तव्यवसाय: एक दहशतीचे साम्राज्य

मुलांच्या सहामाही परीक्षा संपलेल्या असतात.आपल्या मनात 'ते नवं पार्लर कसं आहे बघून येऊया' किंवा 'अमक्या पोराच्या बड्डे पार्टीला पोराला सोडून मस्त मॉल मध्ये (मुलाच्या)बापाबरोबर फिरुया' असे विचार घोळत असतात.बापांच्या मनात 'चला ऑफिसातून घरी लवकर येऊन मस्त मॅच बघू' इ. विचार घोळत असतात.इतक्यात शाळेतून ती नोटीस येते आणि नियती खदखदून हसते!

"कचऱ्यातून कलानिर्मिती.तुमच्या मुलांबरोबर दळणवळणाची साधने आणि शहर या विषयावर हस्तव्यवसाय म्हणून एक 3डी मॉडेल बनवून परवाच्या उद्या सकाळी शाळेत पाठवा.रोल नंबर 1 ते 15 ने हवेतील दळणवळण,16 ते 30 ने पाण्यातील दळणवळण आणि 30 पासून पुढच्यानी रस्त्यावरील दळणवळण बनवून आणावे.सूचना: मॉडेल चालते असले पाहिजे."

आणि पालकांच्या स्वप्नांचे फुलपाखरू होऊन जमिनीवर लोळायला लागते.मूल '5 मिनिट क्राफ्ट' चे फेसबुक व्हिडीओ दाखवून दर क्षणाला आपल्या कल्पना मिग विमान,राफाल, बोईंग 737,अंतराळयान,पेगासस घोड्याचा उडता रथ या रेंज मध्ये झपाट्याने बदलत असते.'5 मिनिट क्राफ्ट व्हिडीओ बघून आपण केलेल्या वस्तू त्या व्हिडीओ मधल्या सारख्याच बनतील' ही 'सरकार बदलेल आणि सगळं काही मस्त होईल' याच्या खालोखाल जगात पसरलेली मोठी अंधश्रद्धा आहे. मुलाला 5 मिनिट क्राफ्ट च्या गुलाबी आकाशातून जमिनीवर आणेपर्यंत आपल्या मावसजावेच्या नणंदेच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचे बारसे दूरगावी आहे आणि त्याला आपल्याला उद्या एका दिवसात जाऊन यायचे आहे असा शोध लागतो.म्हणजे राहिला 1 दिवस.1 दिवसात कचऱ्यातून कला बनवायला चांगला न चेपलेला,न मळलेला स्वच्छ कचरा घरात हवा.

आजूबाजूच्या दुकानांवर आजूबाजूच्या सोसायटीतल्या पालकांची धाड पडते.आपण 'सुरणाचे फायटर प्लेन','मक्याचे जेट विमान' वगैरे अकल्पनिय विचार करत असताना मूल अचानक 'आई माझ्या ग्रुप ला रोल नंबर प्रमाणे रोडवेज ट्रान्सपोर्ट आहे' जाहीर करतं आणि अमूल ताक किंवा फ्रुटी च्या खोक्यांची आगगाडी बनवण्याचा प्लॅन जाहीर करतं.आपण 'त्यात काय मोठं' म्हणून 2 अमूल ताक,2 फ्रुटी आणि प्रोटीन म्हणून उलट्या उभ्या जॉन अब्राहम ची जाहिरात असलेलं सोफिट सोया मिल्क खरेदी करतो.नियती इथे पण खदखदून हसत असते.(या नियतीचे एकदा दात पाडायला हवेत.)

बारश्याला जात असताना मन भूतकाळात जातं.आपण गृहकृत्यदक्ष वगैरे नसताना प्रि स्कुल होमवर्क म्हणून बटनांचं कासव, लोकरीच्या अनेक रंगाच्या तुकड्याचा कागदावर ससा,पेन्सिल शेव्हीन्ग चं घुबड,भेंडीचे ठसे काढून फुलांचा गुच्छ,कापसाचा पांढरा हत्ती(शाळा वाल्यांची समयसूचकता..त्या वर्षी फी वाढवल्याने तसेही ते पालकांसाठी पांढरा हत्तीच झालेले असतात.),बांगड्यांचं बदक, रिबन ची राजकन्या असे अनेक गड सर केलेले असतात.घराबाहेरच्या व्हरायटी वाल्या कडून त्याच्या कडची सगळ्या रंग आणि साईझ ची सगळी बटणं विकत घेऊन नंतर दुकानात बटणं घ्यायला आलेल्या पालकांचा पोपट करणे,चालू वर्षाचे फुलांचे कॅलेंडर फाडून कागदावर निसर्ग बनवणे,नवऱ्याच्या घड्याळाच्या खोक्यातून बुडाचे पांढरे सॅटिन उचकटून कागदावर त्याचा राणीचा फ्रॉक बनवणे, ऑफिसात केक कापल्यास त्या खालची चंदेरी कागद चिकटवलेले वर्तुळ साबणाने धुवून घरी आणून त्यावर मंडल डिझाइन काढणे वगैरे कला कौशल्ये पालकांच्या अंगी येत जातात.

शाळेच्या पालकांच्या व्हॉटसप ग्रुप वर सर्वांचे हताश उदगार चालूच असतात.अगदी 'सारखे क्राफ्ट प्रोजेक्ट देते' म्हणून शाळा बदलण्यापर्यंत टोकाला जाऊन होते.तितक्यात तमक्या आय सी एस ई बोर्ड च्या शाळेत 7 वी च्या मुलांना प्रोजेक्ट म्हणून एक अंकी इंग्लिश संगीत नाटक लिहायला आणि ऍक्ट करायला सांगितले हे ऐकून 'नाय नाय, सी बी एस ई कित्ती छान, मुलांना किती मस्त काय काय करायला सांगतात' वर गाडी येते.

इथे पमीच्या वहिनीच्या बहिणीच्या मुलाचं बारसं आवरून आपण घरी उशिरा येतो.दुसऱ्या दिवशी सुट्टी असते आणि सकाळ पासून घरात आगगाडीचे वारे वाहायला लागतात.फ्रुटीच्या टेट्रा पॅक मध्ये थेंबभर राहिलेले फ्रुटी जिभेने चाटणे, मग मांडीवर पॅक झटकून पॅन्ट ला फ्रुटीचे डाग पाडणे वगैरे प्रकार करून होतात.एकदाचे डबे रिकामे करून त्याला चार्ट पेपर चिकटवून होतात.आता खिडक्या.खिडक्या करायला टूल बॉक्स मधले कटर घ्यावे तर ते आपणच ऑफिसात 'दिलशेपड इकोफ्रेंडली कंदील' स्पर्धेला नेलेलं असतं आणि ते टीम मधल्या चमन च्या मित्राने कुरियर चं पार्सल कापायला नेलेलं असतं.

मग सुरीने कॅन च्या खिडक्या भोसकणे चालू होते.'कचऱ्यातून कला' आपल्या 'सुट्टीचा कचरा' करणार आहे हा अंदाज आता आलेला असतो.'2 तासात पूर्ण करून उरलेल्या वेळात आराम' चे 'रात्री झोपेपर्यंत संपले पाहीजे' होत असते.जेरीस येऊन आगगाडी ची कार बनवून विषय संपवून टाकावा किंवा फक्त इंजिन बनवून 'बाकी गाडी पुढच्या स्टेशनला आहे' सांगणे असे पर्याय मनात येतात.पण आता छोट्या कलाकारांना आगगाडी चढलेली असते.खिडक्या बनवून डबे जमिनीवर ठेवल्यावर 'डबे चाकावर असतात' या शाश्वत सत्याची अनुभूती होऊन पांढरी झाकणे शोधली जातात.घरातल्या चिंच सॉस,शेझवान सॉस च्या बाटल्या उघड्या बोडक्या डोक्याने फिरायला लागतात.गाडीला 16 चाकं लागणार आणि आपल्याकडे कशी बशी 12 झाकणं आहेत असा शोध लागतो.मग मोठ्या डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी अमूल ताक होते ते) 4 चाकं आणि लहान डब्याना(म्हणजे मागच्या जन्मी फ्रुटी होते ते) 2 चाकं लावायची ठरतात.'टेबलावरचं करकटक आण'म्हटल्यावर लहान कलाकार रेड्याने ज्ञानेश्वराकडे बघावं तसे आ वासुन बघत बसतात.मग 'कंपास आण' सांगावं तर प्लास्टिक चा फक्त पेन्सिली असलेला कंपास आणून दिला जातो.शेवटी उठून कर्कटक घेऊन आल्यावर चाकांची हिंसा करणे चालू होते.

चाकांना भोसकताना हिरोला वाचवायला पुढे आलेल्या साईड हिरोईन सारखा सोफा मध्ये येणे वगैरे माफक गोंधळ होऊन सर्व चाकांना भोकं पाडून होतात.चाकात लाकडी बार्बेक्यू स्टिक खुपसून व्हील शाफ्ट बनतो.चाक आणि व्हीलशाफ्ट च्या जोडावर वर केक च्या आयसिंग सारखं बदाबदा फेव्हीकोल ओतून सगळी चाकं वाळायला ठेवली जातात.आपण चाकं नसलेली बुलेट ट्रेन बनवायला हवी होती ही पश्चातबुद्धी होते.

चाकं लावून झाल्यावर ज्या गरीब डब्याना दोनच चाकं मिळालीत ते टपकन एका बाजूला तिरके होतायत असा शोध लागतो.मग त्या डब्याला खालून अजून जखमा करून त्यात दोन लाकडी बार्बेक्यू स्टिक चे तुकडे आधाराला घालून डबे उभे होतात.(इथे आपण रेल्वे च्या कारखान्यात इंजिनिअर नसल्याबद्दल नवरा ईश्वराचे आभार मानतो.)

या सगळ्या दैवी लीला करताना सामान्य मनुष्य बनून जेवण बनवणे, जेवणे,लहान कलाकार नाचाच्या क्लास ला सोडणे,पडदे धुणे,कपडे इस्त्री ला देणे अशी भूतलावरची सामान्य कामं पण करावी लागतात.आता पेप्सी चा टिन जांभळे इंजिन बनतो आणि आपल्याला 'इंजिनाला पण चाकं लागतात' असा शोध लागतो.सुदैवाने शेजाऱ्यांनी जपून ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांची झाकणं कामी येतात आणि निदान इंजिनाला तरी चार चाकं मिळण्याचं सौभाग्य लाभतं.

आता डबे एकमेकांना जोडणे.परत एकदा डब्यांच्या बाजू भसाभस भोसकल्या जातात.दिवार च्या अमिताभ ला गोळी मारण्याच्या जागेवर 786 चा बिल्ला असावा तसं या बाजूना टेट्रा पॅक बंद करताना एकावर एक आलेले 4 थर असतात.त्यामुळे डब्याचे कपलिंग बनवणे हे एक बिकट काम होऊन बसते.शेवटी भोक पाडून,त्यात सुतळी ओवून,सुतळी खिडकीतून बाहेर काढून त्याला बबल रॅप चा तुकडा बांधून सुतळी पक्की केली जाते.लहान कलाकार घरी नाहीत हे दुर्मिळ क्षण एकांतात एकमेकांबरोबर न घालवता सुतळ्या आणि सुऱ्या आणि फेव्हीकोल बरोबर घालवल्याबद्दल मनात 2 उसासे सोडले जातात.

"मी आगगाडी बनवली.आता रूळ तू बनव" म्हणून विश्वामित्र स्टाईल 'इदं न मम' करून झोपायला जावे तर बाहेरून हाका ऐकू येतात.दोन्ही इंजिनियरानी आगगाडी च्या निम्म्या लांबीचा लोहमार्ग बनवलेला असतो.शेवटी 'लोहमार्ग वळवून वळवून' गाडी पुठ्ठ्यावर माववून चिकटपट्टयांनी चिकटवली जाते.तितक्यात दोन चाकं प्राण सोडतात.इथे ग्रुप वर अग्नीबाणापासून ते विराट नौकेपर्यंत भारी भारी मॉडेल चे फोटो येत असतात.मुलाचे क्राफ्ट हा आता पालकांच्या इभ्रतीचा प्रश्न झालेला असतो.मुलीच्या आईने,मावशीने भरतकाम विणकाम केलेली रेडिओ कव्हर बनवून मुलगी बघायला आलेल्याला 'आमच्या सुलुने बनवलंय हो सगळं' सांगावं तसं सगळे निरनिराळे कलेचे नमुने साजरे करत असतात.शेवटी 'पुढच्या वेळी गुगल करून सोपी वस्तू निवडायची आणि सगळी स्वतः बनवायची' म्हणून लहान कलाकाराला दम दिला जातो.आणि सकाळी एकदाचं पारिजातकाच्या फुलासारखं जपत ती आगगाडी शाळेच्या बसमध्ये चढते.

परत येताना 6वी 7 वी च्या मुलांचे पालक भेटतात त्यांना 'तुमची मुलं सगळं स्वतः करत असतील ना प्रोजेक्ट' असं विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक हताश हास्य येतं ज्यात अनुभवी पालकांना 'डोंबल!घंटा!!सगळं स्वतः म्हणे!!' असे उद्गार ऐकू येतात.

लहान मुलांनी पानातली पालेभाजी पूर्ण संपवतानाचा व्हिडीओ पाठवा,लहान मुलांनी स्वतः केलेला खेळण्याचा पसारा आवरण्याचा व्हिडीओ पाठवा अश्या स्पर्धा शाळा कधी ठेवणार बरं?
- अनुराधा कुलकर्णी

Saturday, 22 December 2018

हिंजवडी चावडी: ऐटीत आयटी

मांजर दिवसा अखेर मिटिंग रूम मध्ये बसला होता.'आज तू काय काय केलंस' असे प्रश्न विचारणं आणि त्याची एकापेक्षा एक सुरस चमत्कारिक उत्तरं ऐकणं हे त्याचं सध्याचं काम होतं.


खरंतर हे मांजर कष्टकरी, म्हणजेच प्रोग्रामर.दिवसभर एसीत घाम गाळावा, कोपऱ्यात बसून एकटं एकटं कीबोर्ड बडवावा, बाहेर आसमंतात भूकंप, वादळ, मोर्चा ,मिरवणूक,प्रलय काहीही असलं तरी आपण  आत 11 तास खुर्चीवर बसावं.दणादणा कीबोर्ड बडवावा, टकाटका क्लिक करून काम झाल्याचं मेल पाठवावं, आखडलेली पाठ सरळ करून घरी जाऊन दुधपोळी लहाऊन झोपावं असं सरळसोट काम.पण मांजराचे केस गळायला लागले, वजन आणि पोट वाढायला लागलं तसं वरच्या गलेलठ्ठ बोक्यांनी गुरगुरून त्याला आता मोठा झालास,गुरं हाकायला लाग असं सांगितलं.त्यामुळे मांजर आता काम न करता नुसतंच दिवसातून 4 मिटिंगमध्ये बडबड करतं.काम न करण्यापेक्षा काम करणं जास्त सोपं आहे हा दृष्टांत त्याला रोज होतो.अश्याच दिवसातल्या शेवटच्या बडबडीची ही मिटिंग.


"पक्या, तू आज काय केलंस?"
"आज काही जास्त केलं नाही.आयटी वाल्यानी मशीन फॉरमॅट करायला मागितलं मी दिलं."
जिच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे ती हिरॉईन भांडून कायमची परदेशी जावी तसं उत्कट दुःख मांजराच्या डोळ्यात तरळलं.


"अरे पण त्याच्यावर आपला टीम सर्व्हर होता.तो उद्या 10 जण वापरणार होते.तू देऊन टाकलं मशीन?असंच?काही बोलला नाहीस?"
"बोललो.मग त्या माणसाने तक्रार पोर्टल वर 'मला फॉरमॅट नाही करायचं' असा इश्यू उघडायला सांगितला.ते तक्रार पोर्टल उघडलं नाही.मग आयटीवाल्याने 'तक्रार संबंधित हेल्पलाईन' वर चॅट करायला सांगितलं.मग त्या चॅट सुंदरी ने गाऱ्हाणं पोर्टल वर जाऊन 'तक्रार पोर्टल चा दरवाजा माझ्यासाठी उघडा' असा इश्यू टाकायला सांगितला.गाऱ्हाणं पोर्टल 3 तास मेंटेनन्सधे होतं.इश्यू टाकल्यावर त्याला तुझं, प्रोजेक्ट मॅनेजर चं, आणि डायरेक्टर चं अप्रुव्हल लागेल.डायरेक्टर जपान मध्ये आहे.तो ऑफिसात आल्यावर त्याला सांगेन अप्रुव्हल दे म्हणून."
मांजर नव्याने आपल्या कंपनीतल्या लाल फीत कारभाराबद्दल खिन्न झालं.


"कधी होणार फॉरमॅट?"
"चहा पिऊन येतो आणि चालू करतो म्हणाला."
अचानक देश सोडून निघालेल्या हिरॉईनचं विमान लेट आहे कळल्यासारखं मांजर आणि त्याचे 2 सिनियर गुर्गे(म्हणजे कोंबडे नाही, विश्वासाचे भिडू ) आयटी वाल्याच्या बोळकांडीतल्या खोलीकडे धावले.


आयटीवाला साहेबराव(हे विशेषण नाहीये, त्याचं नाव साहेबराव लक्ष्मीप्रसाद रनडवले' असं भारदस्त आहे.प्रत्यक्षात हा प्राणी 2 वर्ष अनुभव वाला 42 किलो वजनाचा चिमुकला किरकोळ जीव आहे.याचं पूर्ण नाव इंग्लिश मध्ये  लिहून उभं केल्यास याच्या उंचीइतकंच होतं.) खुर्चीत रुतून बेनेडिक्ट चा पिक्चर बघत होता.याचे खुर्चीत रेललेले फोटो आरामात पहुडलेल्या शेषशायी विष्णू सारखे दिसतात.फक्त बेंबीतून कमळाऐवजी कंबरपट्ट्यातून हेडसेट हा एक फरक.कंपनीत नव्या आलेल्या माणसांसाठी हा खडतर तपश्चर्येने पावणारा देवच आहे.

"काये?"
"फॉरमॅट करू नका.आम्हाला पाहीजेय मशीन.सर्व्हर आहे त्याच्यावर."
"इश्यू टाका."
"वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे."
"डायरेक्टर चं अप्रुव्हल आणा."
"वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे."
"तात्काळ पोर्टल मध्ये शो स्टॉपर इश्यू टाका."
"वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे.तात्काळ पोर्टल ला प्रोजेक्ट मॅनेजर ऍक्सेस आहे."
"प्रोजेक्ट मॅनेजर ला सांगा इश्यू टाकायला."
"तो ट्रेनिंगं मध्ये आहे.तिथे ऑफिस मेल आणि नेटवर्क चालत नाही.वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे."


हेच मांजर 4 वर्षांपूर्वीचं पिल्लू असतं तर पहिल्या 2 वाक्यात नम्र आवाजात ओके म्हणून परत आलं असतं.पण पाठीत अनेक झाडूचे रट्टे बसल्याने मांजर आता निर्ढावलं होतं.इथे उभं राहून संभाषण लांबवल्यास आयटीवाला पिक्चर बघणं लवकर चालू व्हावं म्हणून मार्ग सुचवेल हे त्याला माहिती होतं.


"मॅनेजर,डायरेक्टर, माझा लीड,माझा मॅनेजर यांना सीसी ठेवून मेल करा.इश्यू टाकून ठेवा.मला स्क्रीनशॉट पाठवा.मी करतो.आणि पुढच्या वेळी असं करू नका."
मांजराचे गुर्गे मांजराकडे अतीव आदराने बघू लागले.आयटीवाला हा निश्चयाचा महामेरू "मी अप्रुव्हल शिवाय काम करतो" म्हणण्याइतका मऊ करणं शिकणं याच्या मोबदल्यात मांजराच्या अनेक फालतू व्हॉटसप जोक ना लोल पाठवणं आणि त्याला जागेवर जेवणाचं पार्सल आणून देणं अगदीच किरकोळ किंमत होती.


परत मिटिंग रूम मध्ये येऊन मोबाईल मध्ये खुपसलेली टाळकी वर आणायला 5 मिनिटं लागली.
"विश्या तू आज काय केलंस?"
"मी 2 मोठे बग सोडवले.तिसरा सोडवायला गेलो तर सॉफ्टवेअर थांबलं.वेळ जायला नको म्हणून आयटी वाल्याला विचारलं तर त्याने आपण ट्रायल व्हर्जन वापरतो म्हणून त्याच्या मॅनेजर ला सांगितलं.मग मॅनेजर ने ऑडिट मध्ये आपण ट्रायल व्हर्जन वापरून त्यापासून काहीतरी बनवून पैसे कमावतो हे कळेल म्हणून ते काढायला लावलं.आता ऑफिशियल लायसन्स मिळालं की काम चालू होईल.तसं पण आपण ऑफिशियल मिळाल्यावरच काम चालू करायला पाहिजे होतं.याकडे हायर मॅनेजमेंट ने लक्ष द्यायला हवं होतं.काहीही चाललंय इथे."


विश्या एका लहान आणि कुटुंबासारखं गोडीगुलाबीने सहकार्य करत कामं करणाऱ्या एका कंपनीतून जास्त पैसे मिळवायला या 10000 माणसांच्या कंपनीत 1 वर्षापूर्वी आलाय.गावातल्या दुधदुभतं,प्रेमळ माणसं असलेल्या मोठ्या वाड्यातून गर्दीच्या शहरात चाळीत नांदायला आलेल्या मुलीसारखा तो भंजाळलाय.त्याच्या मनाला बसलेला धक्का नोटपॅड घ्यायला मॅनेजर अप्रुव्हल लागतं हे ऐकून चालू झालाय तो अजून संपलाच नाही.'काहीही चाललंय इथे' हे वाक्य तो कामावर आल्यावर दिवसातून दोनदा तरी म्हणतोच.जग छान चालावं, प्रत्येकाने प्रत्येकाला कामं करायला मदत करावी, स्वतःवर असलेलं काम प्रत्येकाने नीट जबाबदारीने करावं,असं कुठेच मिळत नसेल तर तसं काम चालणाऱ्या कोणत्यातरी परदेशात आपण जावं आणि आयुष्यभर राहावं या स्वप्नावर हा चालतो.आठवड्यातून एकदा रस्त्यावर नियम न पाळणाऱ्या लोकांशी भांडण करतो.त्या भांडणाबद्दल मोठ्या फेसबुक पोस्ट लिहितो.स्वतःच्या गल्लीत पोहचायला चुकीच्या बाजूने कट मारणारे सगळे पंटर त्या पोस्ट ला लाईक करतात.


"विश्या बाळा लायसन्स मिळायला एक महिना लागतो आणि प्रोजेक्ट दीड महिन्याचा आहे म्हणून ट्रायल व्हर्जन टाकलं ना आपण?आयटीवाल्याना विचारायचे असतात का हे प्रश्न?आता रक्ताचा वास लागलेल्या व्हॅम्पायर सारखे ते सगळ्यांची मशीन चेक करतील बाबा.त्या शेजारच्या टीम मधला पंटर रजेवर गेलाय त्याला थोडे दिवस तुझ्या मशीन वर काम करतो सांग."


"निल्या तू काय केलंस दिवसभर?"
"3 बग, सिस्टम अपग्रेड,एक नवं इंस्टॉल."
मांजर निल्या कडे आदराने बघू लागले.हा टीम चा जुगाड भाई.तो कधीही अडचणी सांगत नसे.
"तू अपग्रेड एका दिवसात कसा केला?मागच्या वेळी आपल्याला 2 दिवस लागले होते."
"काल संध्याकाळी लावला, मग आयटी वाल्याला सांगितलं एकदा बघ म्हणून, मग रात्री 12 ला लॉंग ड्राईव्ह ला आलो होतो तेव्हा येऊन पुढचा भाग लावला, आणि सकाळी 10 ला फिनिश."
"आयटी वाल्याला तू बघ म्हणून सांगितलं?"
"तो भिडू माझा सुट्टा फ्रेंड आहे.त्याला आठवड्यातून एकदोन वेळा मार्लबोरो घेऊन देतो त्याला.आम्ही पार्टी करतो महिन्यातून एकदा.सब सेट."


"सुन्या, तू इंटरव्ह्यू घेतले का?"
"हो.पमी पाटील बरी आहे म्हणून फीडबॅक दिलाय मी."
"तिच्यापेक्षा जास्त मार्क त्या मन्या ला मिळाले होते ना?"
"मन्या चांगलाच आहे.पण पमी ला टीम मध्ये घेणं ही दूरदृष्टी आहे."
"ऑ?"
"पमीचा नवरा आहे आयटी हेड विश्वनाथ पाटील."
सगळ्यांनी "हो हो, पमीच बरी.पमीलाच घेऊया" म्हणून एकमताने कल्ला केला.आता मिटिंग चा शेवट म्हणजेच भाषण देणे हा मांजराचा आवडता पार्ट आला.
"हे बघा, आयटी वाले अडवणार.कस्टमर ऐकणार नाही.मॅनेजर्स ऐकून पुढच्या कॉन्फरन्स ला जाताना विसरणार.इथे असणं, कामं चांगली होणं,कस्टमर ला पाहिजे ते पाहिजे त्या वेळात देणं ही आपली गरज आहे.आपल्याला त्याचा मोठा पगार मिळतो.कधी एका एक्सेल शीट मध्ये दोन ओळी लिहून आणि कधी शनिवार रविवार कुत्र्यासारखं काम करून.त्यात अडचणी येणार.मशीन क्रॅश होणार.लोक उद्दाम सारखे अडवणार.लायसन्स मिळणार नाहीत.10 ओळींचा प्रोग्राम कोणीही लिहिल.12 वीच्या हुशार मुलाला शिकवला तर तोही करेल.तो 10 ओळींचा प्रोग्रॅम लिहिण्या साठी लागणाऱ्या गोष्टी तयार करताना तुम्ही जे काही करता तो खरा एक्सपिरियन्स."


मांजर बोका बनायच्या योग्य मार्गावर आलं होतं!

-अनुराधा कुलकर्णी

Wednesday, 3 October 2018

स्टिकरयातनानुभव

चांगली 2 ऑक्टोबर ची सुट्टी, दुपारी आराम करायची संधी सोडून आम्ही तिघे हातात कटर, ओट्यावरचे पाणी ढकलायचा झाडू,शेजारून उसनी घेतलेली कोणत्या तरी दुकानात फुकट मिळालेली मापन पट्टी घेऊन फ्रीज ला भिडलो होतो.

हा विषय चालू झाला तो 'फ्रीज पेंट करावा की त्याला स्टिकर लावावा' या ऑनलाइन घडलेल्या चर्चेवरून.कोणीतरी दिलेल्या अमेझॉन च्या लिंक वर सुंदर सुंदर फ्रीज स्टिकर बघायला मिळाले.एकावर लिंबू, दुसऱ्यावर स्ट्रॉबेरी, तिसऱ्यावर कॉफीबिया, चौथ्यावर पाणी आणि त्यात विहार करणारे हंस,पाचव्यावर जंगल अशी मोहक खैरात होती.

'पण स्टिकर का?नवा घेऊ शकतो ना फ्रीज? 13 वर्षं झाली याला.'
'शू, असं बोलायचं नाही.त्या बिचाऱ्याने ऐकलं तर त्याला कसं वाटेल?आपली स्कुटी आपण 11 वर्षं आणि 50000 किलोमीटर चालवून 12000 मध्ये विकली.आपली कार आपण 9 वर्षं चालवून विकली.फ्रीज आणि वॉशिंग मशीन 2005 चं आहे.किमान 2020 पर्यंत तरी चालवायला नको का?परत मिळतात का अशी यंत्रं?काय करायचेत स्टील चे दरवाजे नि 2 भाज्यांचे ड्रॉवर?आतलं यंत्र 4 वर्षात बिनकामी झालं तर?फ्रीज बदलायचा नाही.जोवर त्याला दारं जोडलेली आहेत आणि वस्तू गार होतात तोवर तर अजिबात नाही म्हणजे नाही.स्टिकर ने फ्रेश लूक येईल.'
'उंची मोजणारा हत्ती विसरलीस का?'

इथे डोळ्यासमोर लाटा येऊन मन फ्लॅशबॅक मध्ये गेलं.
5 वर्षांपूर्वी असाच हौसेने उंची मोजणारा हत्ती स्टिकर ऑनलाइन मागवला होता.हत्ती, उंचीच्या खुणा,भोवती 5 उडणारे पक्षी,हिरवळ आणि 1 झाड असा सेट फोटोत दिसत होता.
आता सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसांचा असा समज होईल की हे सगळं एक किंवा दोन प्लॅस्टिक शीट च्या पार्श्वभूमीवर काढलेलं असेल आणि माणसाला भिंतीवर 2 आयताकृती कागद एकाखाली एक चिकटवायचे असतील.तसा विचार करत असाल तर तुम्ही अज्ञ आहात.त्या सेट मध्ये 75 तुकडे होते.हत्तीचे 7 तुकडे(कसे ते आता आठवत नाही, सोंड एक तुकडा, ढु एक तुकडा,पोट 3 तुकडे, पाय 2 तुकडे असे काही गणित होते.),इंचाचे 8 तुकडे, पक्षी 5 तुकडे,प्रत्येक पक्ष्याभोवती हिरवळ 5 तुकडे असा जगव्यापी सरंजाम.आता काही छिद्रान्वेषी मंडळी म्हणतील की यांची बेरीज 75 होतच नाही मुळी.75 तुकडे चिकटवल्यावर परत बरोबर बेरीज पण करेन अशी अपेक्षा असेल तर ती मानवी हक्कांची पायमल्ली आहे.

तर हत्तीची सोंड जमिनी पासून 115 सेंटीमीटर वर येत नाही हे प्रथमदर्शनी कॉमन सेन्स ने जाणवणे, मग आधी सेंटीमीटर खुणा पट्टीने मोजून योग्य जागी चिकटवणे, मग हत्तीचं पोट तिरकं न करता,पोट एकमेकांवर येऊ न देता,पोटात फट न पाडता 3 तुकडे नीट जोडून टाके घालणे(सॉरी हात फिरवणे),हत्तीचे पाय जमिनीपासून 5 इंच वर जोडणे, हत्तीला शिंक येऊन सोंडेतून पक्षी बाहेर पडल्या सारखे पक्षी चिकटवणे,प्रत्येक पक्षी भोवती हिरवळ चिकटवणे,नंतर शेवटच्या पक्ष्याची हिरवळ दाराबाहेर गेल्याने अर्धी कापणे हे सर्व गणित एका नवरा नावाच्या प्राण्याला करावं लागलं तर यावरून किंचित भांडणं होऊन पुढचे काही दिवस स्वप्नात उंची मोजणारा हत्ती दिसणे साहजिक आहे.काही माहितगार शॉपिंगबाज व्यक्तीना मी त्या हत्तीखाली कळवळून लिहिलेला रिव्ह्यू पण सापडेल ज्यात 'हत्तीसारखा जड प्राणी जमिनीपासून 5 इंच वर लटकावत ठेवावा ही मूर्ख कल्पना कोणाची?' वगैरे अर्थाची जळजळीत वाक्य वाचायला मिळतील.

लाटा परत.बॅक फ्रॉम फ्लॅशबॅक.
'यावेळी उंची मोजणाऱ्या हत्ती सारखं नाही होणार.एकच स्टिकर असेल.'
'ठीक आहे.मागव, पण यावेळी नीट प्लॅन करून लावायचा स्टिकर.'

तर मी कॉफीबिन, पाण्यात पोहणारे हंस वगैरे कडे वळले.स्वस्त पण होते.पण कोणत्याही कंपनीचे मालक मेले हिंजवडीत किंवा सौदागर मध्ये डिलिव्हरी करत नव्हते.हिंजवडीत डिलिव्हरी नाही???(इथे धक्का बसलेल्या चेहऱ्यावर 3 वेळा कॅमेरा आणि ढाण असे 3 दा पार्श्वसंगीत.) 'अरे तुमच्या सारख्यानी असं केलं तर मोठ्या मोठ्या कंपनीत 10 तास काढणाऱ्या, नंतर रोज 3 तास हिंजवडीतून आपल्या हडपसरी किंवा कोथरुडी निवासात पोहचायला काढणाऱ्या, आयुष्यात लागणाऱ्या रुमालापासून चड्डीपासून ते डायपर पर्यंत सर्व गोष्टी ऑनलाइन विकत घेणाऱ्या लोकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं?कोणाच्या?(प्रतिध्वनी)' स्वगत आटोपतं घेऊन आधी एरिया डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या शोधल्या.त्या कंपन्या फ्रीज स्टिकर विकतात का ते पाहिलं.एक कंपनी विकत होती, पण फारच विविधरंगी डिझाइन होतं.ते चिकटवल्यावर फ्रीज उत्तरेकडच्या रंगपंचमीत रस्त्यावर सापडल्या सारखा दिसणार होता.पण कंपनी डिलिव्हरी देत होती.'हातात सापडलेला एक पक्षी रानात लांब असलेल्या 2 पक्ष्यांपेक्षा नेहमी बरा' ही म्हण आठवून पटकन मागवून टाकले.

स्टिकर आला.तो 5 फुटी फ्रीज चा नसून 8 फुटी पूर्ण दरवाज्याचा आहे.पण 'जे का दूरच्या दारी| तेथे करी सामानी डिलिव्हरी| तोचि साधू ओळखावा| पैसा तेथेचि द्यावा||' म्हणून हा मोठा वालाच चालवून घेणार होतो.आधी ती प्रचंड गुंडाळी सोडवताच येईना.डिझाईन कसं आहे बघू म्हणून उलगडायला जावे आणि कागद सटकून मांडीवर आपटावा असं झाल्यावर 2 मेम्बराना 2 टोकावर बसवून कागद उलगडला.डिझाईन फारच भयाण रंगीबेरंगी होतं.नारायण धारप भयकथा वाचलेल्याना त्यात अमूर्त घातकपणाचा निर्यास सोडणारे अमानवी आकार आणि बाकी आम जनतेला पिकासो आणि व्हॅन गॉग वगैरे मंडळींची नवचित्रं दिसत होती.

'तुला सांगत होतो.ही कामं प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायची असतात.वॉलपेपर्स चिकटवणारे वगैरे.'
'पण मग ते प्रोफेशनल बनेपर्यंत त्यांनी किती वॉलपेपर ची नासाडी केली असेल?'
'एकही नाही.जेव्हा हातावर पोट असतं तेव्हा त्या हातांना चुका करण्याचा अधिकारच नसतो.लहानपणापासून आयुष्याच्या तव्यावर बोटं पोळत ते कामाच्या सुंदर भाकऱ्या बनवत असतात.'
(स्वगत: अरे देवा!! हा प्राणी किती सेंटी मारतो!! खरंच फ्रीज ला रंग देणाऱ्या कडे सोडणं परवडलं असतं.)

फ्रीज ची मापं घेण्याचं काम ज्या मेंबर ला दिलं होतं तो लांबी इंचात, रुंदी सेंटीमीटर मध्ये लिहून गोंधळ वाढवत होता.एकंदर ती मापं वापरून कागदावर खुणा केल्यावर ही फ्रीज ची नसून सिग्नल च्या खोक्याची मापं बनतायत असा शोध लागला.मग पेपर कापण्यापूर्वी परत एकदा मापं घेऊन खुणा केल्या.

फ्रीज वर तो स्टिकर चिकटवणं हे एक वेगळंच अग्निदिव्य.तो स्टिकर कागद काढल्या काढल्या चारुदत्ताला भेटणाऱ्या वसंतसेनेच्या आतुरतेने जे समोर दिसेल त्याला चिकटतो.मग एका मेम्बर ने गुंडाळी धरणे.दुसऱ्याने उभं राहून कागद उलगडणे. तिसऱ्या मेंबर ने मध्ये मध्ये नाचत सूचना देणे, हे सर्व झाल्यावर हा कागद चिकटवून झाला.उभं राहून अभिमानाने त्याच्याकडे बघताना जाणवलं की या कागदावर 'माय नेम इज केशव पुट्टी, बिर्ला व्हाइट वॉल पुट्टी करे पपडी की छुट्टी' जाहिरातीतल्या भिंतीसारखे असंख्य फुगे आले आहेत.यापेक्षा उंची मोजणारा हत्ती बरा होता की.निदान बिघडला तर 75 पैकी एक तुकडा बिघडत होता.इथे म्हणजे एकच एक मोठा स्टिकर. 'चुकीला माफी नाही.'

'थांब थांब.लाकडी उलथनं आण. आणि काच साफ करायचा मोठा मॉप.'
आता आम्ही लाकडी उलथनं, मॉप यांनी तो स्टिकर सपाट करून करून त्यात राहिलेले हवेचे फुगे एकमेकांना चिकटवणं, मग तो मोठा झालेला फुगा अजून दाबून ढकलत कडेला नेऊन त्यातली हवा काढणं हे काम करायला लागलो.या प्रोसेस मध्ये कधीकधी फुगा दबून कागदालाच सुरकुती पडते आणि तो '6 साईन्स ऑफ एजिंग' घालवणाऱ्या क्रीम मधल्या बाईच्या क्रीम लावण्या आधीच्या थोबाडासारखा दिसायला लागतो.

'अरे, आपण सगळ्या फुग्याना टाचणी ने भोक पाडुया का? सगळी हवा जाईल.'
'आणि पेपर भोकं भोकं वाला दिसेल.'
'मग आता काय बेनेडिक्ट कंबरबॅच च्या चेहऱ्यासारखा गुळगुळीत दिसतोय का पेपर?'
'उंची मोजणारा हत्ती मी पूर्ण लावला होता.आता ब्रश ने फुगे घालवायची आयडिया माझी आहे.फ्रीज च्या उरलेल्या 2 भिंतींना स्टिकर तू एकटी लावणार आहेस.अत्यंत पुअर प्लॅनिंग आहे तुझं.'
'मी रंग द्यायचं म्हणत होते.रंग देऊ नको म्हणणारा तू आहेस.उरलेल्या 2 भिंतींसाठी सपोर्ट देणं ही तुझी नैतिक जबाबदारी आहे.'
'माझी नैतिकता तू नवा फ्रीज घ्यायला नाही म्हटलं तिथेच पळून गेली.आता तू आणि तुझे स्टिकर काय वाटेल तो गोंधळ घाला.'

त्यामुळे आता फ्रीज ला 1 फुगेवाली रंगीत भिंत आणि 2 पांढऱ्या मळकट भिंती आहेत.त्यातली एक उद्या रंगीत फुगेवाली होईल.येताय का खालून पेपर धरायला?

Monday, 1 October 2018

सिवाजी..द बॉस्स

सुरुवातीलाच एक मनुष्य घोषणा देणाऱ्या प्रचंड जनसमुदायातून एका तुरुंगात जातो.शेजारचा तुरुंग वाला त्याला 'काय केलंस म्हणून तुरुंगात आलास' विचारत असतो.आपण नै का, शेजारी कोणी राहायला आलं की 'मूळचे कुठचे, इथे बदली झाली का, अमक्या गावचे का, शिवाजी पेठेशेजारी वाडा आहे त्या अमक्या काकांना ओळखत असाल' वगैरे हिस्टरी दारातच घेतो तसे.इथे आपला नायक सिवाजी 'लोगोका भला किया इसलीये जेल हुई' सांगतो. या सीन मध्ये सिवाजी ची तजेलदार त्वचा,व्यवस्थित ट्रिम केलेली फ्रेंच दाढी आणि नुकतेच कंडिशनर स्पा केलेले सुळसुळीत केस पाहून तो 'ब्युटी पार्लर का बिल नही दिया इसलीये जेल हुवा' सांगेल की काय अशी बऱ्याच प्रेक्षकांना शंका येते.
तर हा सिवाजी काही वर्षे अमेरिकेत राहून 200 कोटी रुपये जमा करून भारतात समाजकार्य करायला कायमचा आलेला असतोय.'अमेरिकेत 'सिस्टम सॉफ्टवेअर इंजिनीयर' म्हणून नोकरी करून लग्नायोग्य वयाचं असताना 200 कोटी रुपये कमावून भारतात परत येता येतं' ही अनिष्ट अभद्र अफवा पसरवल्याबद्दल अनेक कंपन्या मधून 1-2 वर्षं अमेरिकेत राहणारी आणि दिवस रात्र पाव, बटाटे, कांदे आणि अंडी खाऊन पैसे वाचवणारी लग्न वयाची मुलं अति संतप्त आहेत असं आमच्या आतल्या सूत्रांकडून कळतं.भारतात विमानतळावर उतरल्या उतरल्या 'हे काय, नोटांचं पोतं कुठेय?तो सिवाजी सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये काम करून 200 कोटी घरी घेऊन आला.तुला मेल्याला प्रोग्रामर असून साधे 2 कोटी घेऊन यायला जमेनात होय?आमचाच दाम खोटा' म्हणून आईबाप हताश डिसगस्टेड सुस्कारे टाकू लागले.
तर आता हा असा 200 कोटी घेऊन आलेला मुलगा भारतात येणार म्हटल्यावर लग्नी मुलींची रांग लागणं साहजिक.त्याही म्युझिक आल्बम च्या ऑडिशन ला आल्यासारख्या जीन्स ची शॉर्ट आणि आखूड शर्ट घालून सिवाजी च्या आईबापांवर भावी वधू म्हणून इम्पो टाकायला आलेल्या असतात.पण सिवाजी निग्रहाने सगळ्यांना 'मला भारतीय वधु आणि स्वागताला भारतीय संगीत पाहिजे' म्हणून सगळ्यांना कटवुन एकदम नदी किनारी गाणं म्हणायला जातो.या गाण्यात सिवाजी च्या बाजूचे नर्तक अनुक्रमे पोटावर सिंह, मडकं आणि रजनीकांत अशी चित्रं(3 कडवी 3 चित्रं) रंगवून नाचतात आणि सिवाजी (बहुतेक) चेन्नई मध्ये असूनही 'जहां लस्सी से स्वागत होगा' वगैरे गाणे म्हणतो ही बाब अती मनोरंजक आहे.सिवाजी अमेरिकेत किती वर्षं राहिला हा एक विचाराधीन विषय आहे.त्याला पाहून कोणीही त्याला 'आपका बच्चा कौनसे कॉलेज मे पढता है' असं न विचारता 'बेटा तुझे कैसी लडकी पसंद है' विचारतात.अश्या प्रकारचा समजूतदारपणा या देशात अपेक्षित आहे.200 कोटी जमवता जमवता होतं असं कधीकधी.
तर सिवाजी ला देशात ठिकठिकाणी मेडिकल कॉलेजेस काढून विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण द्यायचे असते.यासाठी 200 करोड अमेरिकेत दर महिन्याला पिगी बँकेत टाकून बाजूला ठेवलेले असतात.शिवाय उरलेले पैसे आधीच पाठवून विमानतळाच्या धावपट्टीइतके मोठे पोर्च असलेला बंगला आणि गावात जमीन पण घेतलेली असते.शिवाय या कॉलेज बांधकामाला परवानगी मिळावी म्हणून अधून मधून 4 कोटी, नंतर पूर्ण रकमेच्या 25% अशी लाच द्यावी लागते.(म्हणजे आधी 4 कोटी देऊन उरले 196 कोटी.पुढे नंतर लाच देताना 196 कोटी चे 25%, मग नंतर त्याच्या पुढच्याला लाच देताना (196*(१/४))/४ असे रिवाईज करून गणित करावे लागेल.हा हिशोब फारच गुंतागुंतीचा झाला.तो करायला लागू नये म्हणून या बिकट प्रसंगातून सिवाजी ला आदिशेषन नावाचा एक शत्रूरुप मित्र वाचवतो आणि बांधकामावर स्टे आणतो.
आता हे सर्व चालू असताना सिवाजी चे वधू संशोधन पण चालू असतेच.त्याला एक सुशील मुलगी मिळाल्यावर तो तिच्या घरी निवडणूक आयोग क्लर्क चे रूप घेऊन नायिकेला भोचक प्रश्न विचारणे, ती सेल्सगर्ल असलेल्या वाद्याच्या दुकानात जाऊन तोडफोड करणे वगैरे सभ्य उपाय करून मुलीचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करतो.त्याचे आईबापही 'काय बै या हल्लीच्या मुली, सोन्या सारखा मुलगा घरी येऊन मागणी घालतोय आणि या अश्या शिष्ठ सारख्या वागतात' असे भाव आणून त्याच्या बरोबर राहतात.सिवाजी मुलगी व कुटुंबियांना घरी बोलावून पार्टी देतो.यात बदक, खेकडा, कासव असे अनेक प्राणी शिजवून वाढून त्याने मुलीकडच्यांचे मन जिंकले.प्रत्यक्ष मुलीचे मन जिंकणे मात्र कठीण.म्हणून सिवाजी ने तिला आपली खोली, त्यात तिच्या साठी घेतलेल्या कपाटभर साड्या, घरी नेसायच्या कपाटभर साड्या, तिच्या प्रेग्नन्सी मध्ये लागणाऱ्या प्रोटीन पावडरी,मुलगा/मुलगी दोघांसाठी घेतलेले कपाटभर कपडे हे दाखवल्यावर तिची खात्री पटते की हाच बै आपला वर.हल्लीच्या मुलींप्रमाणे ती 'हे काय, अगदीच कशी बै रंगांची जाण नाही?मी इतक्या डार्क जांभळ्याच्या शेड वापरते का कधी?आणि एकही कॉटन चा कुर्ता नाही?जीन्स नाही?कसली म्हणून मेली मॉडर्न पणाची हौस नाही.चांगलं इंग्लंड चं स्थळ सांगून आलं होतं.पण नशीब मेलं या आर्थोडॉक्स लोकांशी बांधलं गेलेलं ना' म्हणून रुसून न बसता पटकन हो म्हणते.
पण प्लास्टिक बंदीच्या काळात सतत बदलणाऱ्या नियमांप्रमाणे नायिकेचे विचार सतत बदलत राहतात.परत भेटायला आल्यावर ती नायकाच्या हाताजवळ हात नेऊन 'तू माझ्या इतका गोरा नाहीस' सुचवते.सिवाजी अत्यंत समजूतदार माणूस असल्याने 'काय गं भवाने, माझ्या घरी बसून कासवाच्या पिल्लाचे कटलेट खाताना दिसला नाही होय माझा रंग' म्हणून न झापता पटकन घरी जाऊन 'रंग माझा वेगळा' म्हणायची तयारी चालू करतो.स्ट्रॉबेरी खाणे, मुलतानी मातीत आंघोळ करणे,बरेच लेप लावणे यानंतर तो आरस्पानी गोरा बनून आपले गोरे पाय व पोटऱ्या दिसतील अशी कॅप्रि पॅन्ट घालून नायिकेकडे परत जातो.गोरापान रजनीकांत बघायच्या कल्पनेने घाबरलेले प्रेक्षकांचे मन नायिकेच्या स्वप्नात गोरा, ब्लॉन्ड विग वाला रजनीकांत आणि ब्लॉन्ड विग वाली नायिका गाण्यात बघून 'वर्स्ट केस' ला तयार होतेच.नायिका प्रत्यक्षात अत्यंत साधी भोळी संस्कारी मुलगी असली तरी सर्व स्वप्न गीतात ती आपली मॉडर्न कपडे घालायची हौस भागवून घेते.स्वप्नं ही भौगोलिक मर्यादा बाळगत नसल्याने ग्रीक मुकुट घातलेला नायक, ईजिप्तीशियन कपडे घातलेली नायिका,पर्शियन बेलीनृत्य अशी बहू-सांस्कृतिक कॉम्बिनेशन आपल्याला 3 गाण्यात बघायला मिळतात.आता नायक बिचारा इतका गोरा झाला तरी हिला लग्न नाहीच करायचंय.
शेवटी नायक एका लोकल खाली जीव द्यायला निघतो.इथे लोकल चा वेग, डोंगरावर असलेली नायिका, सांध्यात अडकलेला पाय या सर्वातून शेवटी नायिकेचे प्रेम (आणि लाल ओढणी काढून लोकल च्या दिशेने नायकाच्या पुढे धावत जाणे.लोकल चालकाला एवढा मोठा ढळढळीत रजनीकांत बराच वेळ समोर उभा दिसला नाही तरी अचानक लाल ओढणी हलवत धावत आलेली नायिका दिसून गाडी थांबवता येणे यामुळे 'लाल रंगाची तरंगलांबी इतर रंगांपेक्षा जास्त असते आणि तो लांबून डोळ्याला दिसतो' हा भौतिकशास्त्रातील सिद्धांत नव्याने पक्का होतो) यामुळे नायकाचा जीव वाचतो आणि ती फायनली 'वाजी वाजी वाजी, मेरा जीवन है सिवाजी' असे गाणे म्हणून लग्नाला होकार देते.(लग्नात उखाणा म्हणून हेच गाणे गद्य रुपात म्हणता येईल.उगीच वेगळा बनवायला नको.'सामने की अलमारी मे चांदी की थाली, सिवाजी के बिना पुरी दुनिया को मै देती गाली' किंवा 'मंगल मंगल मंगल,खाऊं सिवाजी के हाथ का पोंगल' असा काहीतरी.)या गाण्यात सर्व नर्तकांच्या कपड्यात इतके रंग वापरले आहेत की लग्नाच्या वऱ्हाडाचा बस्ता नव्याने न बांधता हेच कपडे जरा नीट इस्त्री करून वापरावे असा बेत असावा.
आता लग्न आघाडी वर पूर्ण गॅरंटी मिळाल्यावर सिवाजी अनेक राजकारणी लोकांना मारून मारून सरळ करून त्यांचे पैसे काळ्याचे पांढरे करतो.ते कसे ते प्रत्यक्ष बघण्याची गोष्ट आहे.शिवाय तो सगळ्या दुर्गम भागात हेलिकॉप्टर ने जातो.तिथे उघडी नागडी(लहान) मुलं त्याचं स्वागत करतात.आणि हा देशात सगळीकडे सुबत्ता आणतो.
पण ज्योतिष्याने कुंडलीत मृत्यूयोग सांगितलेला असतो ते प्रोजेक्ट एकदा उरकून टाकणे भाग असते.त्यामुळे हा सिवाजी तुरुंगात असतो.तिथे आदीसेशन येऊन त्याला मार मार मारतो.आदिसेशन चे कपडे अति पांढरे शुभ्र आणि कितीही मारामारी केली तरी न मळणारे असतात.शिवाय सिवाजी ला मायक्रो लुंगी गुंडाळून मारायचं असल्याच्या खास प्रसंगा प्रित्यर्थ आदीसेशन ने लेग वॅक्सिंग केले असावे अशी दाट शंका आहे.दर्शकांनी प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी.
तर हा सिवाजी लाईव्ह फेज असलेल्या स्विच बोर्ड असलेल्या खोलीत सेशन कडून मार खातो.मग सेशन गेल्यावर पटकन स्विच बोर्ड उघडून स्वतःला वायरीने शॉक देऊन मारून टाकतो.आता खऱ्या खऱ्या मेलेल्या सिवाजी चा मृतदेह नेत असताना गाडी थांबते, आणि तो मृतदेह शेजारी थांबलेल्या मोठ्या वोल्वो च्या डिकीत ठेवला जातो, आणि मग ती वोल्वो अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन डॉक्टर लोक सिवाजी च्या बॉडी ला शॉक देऊन परत जिवंत करतात.
पण बाकी कोणाला हे कळतच नै.त्यांना वाटतं सिवाजी मेलाच. आणि एक नवाच एन आर आय अभिराम बच्चन येऊन (स्वतःच्या) टकलावर खारका मारत सगळा कारभार हातात घेतो.हा अभिराम बच्चन हेअरकट, ओव्हरकोट आणि मिश्या सिवाजी पेक्षा वेगळ्या बाळगत असल्याने भारतात कोणालाही ओळखू येत नाही.आणि सिवाजी ची कहाणी सुफळ संपूर्ण होते.
धड्याखालचे प्रश्न:
१. सिवाजी कोणता शाम्पू वापरतो?
२. विद्या भारती ला कोणत्या कोणत्या देशात नाचत असल्याची स्वप्नं पडतात?
3. सिवाजी चेन्नई मध्ये असून रोज फुलशर्ट,आत बनियान,वर सूट आणि टाय असे 3 लेयर वापरतो.त्याचा डिओड्रंट कोणता असेल?
4. आदी सेशन कडे पांढऱ्या कुरता लुंगीचे किती सेट आहेत?
5. आदी सेशन चे कपडे सर्फ एक्सेल ने धुतले जातात की एरियल ने?
6. अभिराम बच्चन अंगावर किती लेयर्स घालतो?
7. विद्या भारती चे स्वप्न गाण्यांमधले कपडे चेन्नई चा कोणता शिंपी शिवतो?
8. सिवाजी एकावेळी किती माणसे हात फिरवून हवेत उडवतो?
9. मे महिना आहे.(याचा गणिताशी काहीएक संबंध नाही पण विद्यार्थ्यांना गोंधळवायला जादा माहिती.)एक लोकल ताशी 120 किलोमीटर च्या वेगाने चेन्नई कडून बंगलोर कडे जाते आहे.एक सिवाजी ताशी 0 किलोमीटर च्या वेगाने लोकल कडे येतोय.एक विद्याभारती ताशी 10 किलोमीटर च्या वेगाने लोकल च्या दिशेने धावते आहे.वाऱ्याचा त्या दिवशी चा वेग ताशी 5 किलोमीटर आहे.तर विद्याभारती आणि लोकल एकमेकांना सिवाजी पासून किती अंतरावर भेटतील?

Wednesday, 29 August 2018

आमचे प्राणीजीवन

"टॉयलेट मध्ये गेलो, बघतो तर काय, कमोड शॉवर च्या नळावर सरडा!! थोडक्यात वाचलो."
या वाक्याला अपेक्षित 'हो का, अरे बापरे' न येता समोरचं नाक मुरडून समोरच्या कपाळावर आठी पडली.
"भलत्या शंका घेऊ नका.कमोड वर बसण्या आधीच दिसला सरडा, बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीच्या टॉयलेट मध्ये काम केले."
कपाळाच्या आठ्या विरून अपेक्षित 'अरे बापरे' आले.
"हे तर काहीच नै, त्या चीन का थायलंड मध्ये एकाच्या टॉयलेट मध्ये अजगर होता. चावला ना भलत्या जागी.टाके पडले."
सरड्या पासून बचावलेल्या वीराने मनात 'हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी केलं पाहिजे.भलत्या वेळी भलत्या दचकवणार्या बातम्या बघत असते" अशी खूणगाठ बांधली.
तितक्यात आतून एक पॉंडस पावडरीचा वास पदर फलकारत आला.
"सांभाळून रे बाबांनो.परवा त्या ए5 मधल्या बाईंनी खाली पूजेची फुलं घेताना झाडावर काळं कुट्ट लांबडं पाहिलं.अगदी हातापासून वीतभर अंतरावर.हे असं मोठं होतं आणि फूस फूस करत उडी मारून दुसऱ्या झाडावर गेलं.आता खूपच झालीत सोसायटीत लांबडी."
"लांबडं?"
"म्हणजे जनावर रे.सरपटणारं."
"ओह, साप म्हणायचंय का तुला?"
"घेतलं का शेवटी ते अभद्र नाव?नाव घेतलं तर लांबडं आपल्या मागे घरात येतं.लांबड्या लांबड्या इथे तुझं नाव नाही घेतलं त्या कोपऱ्यावरच्या कडुनिंबाने घेतलं, त्याला जाऊन चाव."
"हे असं म्हणून सापाला कसं कळेल?तो मराठी आहे का?आणि त्याला माहित आहे का आपलं दुसरं नाव लांबडं आहे ते?"
"परत तेच.लांबड्या लांबड्या इथे तुझं नाव नाही घेतलं त्या कोपऱ्यावरच्या कडुनिंबाने घेतलं, त्याला जाऊन चाव."
"तू घाबरू नको गं.त्या काकूंना जाड चष्मा आहे.नंबर वाढला असेल.काळी साप सुरळी मोठी होऊन दिसली असेल."
"करा चेष्टा.हे असे अनुभव प्रत्यक्ष आल्याशिवाय कळायचं नाही तुम्हाला."
परत एकदा सापाचं नाव येण्याआधीच साडी पदर फलकारत आणि चप्पल वाजवत फूस फूस वाला मोठा भुजंग पाहिलेल्या काकूंबरोबर फिरायला गेली.
"काहीही फेकतात काकू.असा या झाडावरून त्या झाडावर उडी मारणारा सुपरमॅन साप इतका जवळ येईपर्यंत दिसला नाही होय त्यांना?"
"असेल खरं.आपल्याला काय माहित?मी डिस्कव्हरी वर पाहिलंय.काळे साप नेहमी विषारी असतात.न्यूरो टॉक्सिन सोडतात.आणि विषारी साप ओळखायचं मुख्य चिन्ह म्हणजे त्यांच्या डोक्याच्या बाहुल्या टोकदार असतात, आणि बिन विषारी सापांच्या गोल."
(स्वागत: अरे देवा!!काही काळ हे चॅनल दिसणं बंद करावं.कसलं म्हणून नव्या माहितीचं इम्प्रेशन मारता येत नाही हिच्यावर.)
"म्हणजे साप चावायला आला की आधी "सापा सापा थांब थांब चेहरा वळव, मला तुझ्या डोळ्यात बघूदे" म्हणून डोळ्यात बघून बाहुल्या गोल असल्या तरच चावायला गो द्यायचा का त्याला?"
"एक मेली उपयोगी माहिती द्यायला गेले तर त्यात हजार खोड्या काढायच्या.सवयच आहे तुमच्या घराला आनुवंशिक."
(विषय घातक वळणावर जायला लागला.या वळणावर गेलेल्या गाडया उतारावर भरधाव वेगाने जाउन 'आज स्वयंपाक नाही' या दगडावर आपटतात याची कल्पना असल्याने सरड्यापासून वाचलेली पार्टी जीवाच्या आकांताने विषय बदलायचे चान्स शोधू लागली.)
"त्या मांजराने बाहेर शी करून ठेवलीय.आता ती अजून एका मांजराला घेऊन येते.हळूहळू आपल्या गॅलरीची सार्वजनिक मांजरहागणदारी होणार असं दिसतंय."
"मी काल दालचिनी आणि मिरी पावडर मिक्स करून ठेवली होती आणि पसरली होती.म्हणजे तिला एकदा शी ला बसल्यावर बुडाला जबरदस्त झोम्बलं की परत येणार नाही.उद्या मिरची पूड पण मिसळते."
"मांजर नेहमी जमिनीला बुड टेकूनच शी करेल हे बेसिक ऍझंप्शन चुकतंय असं वाटत नाही का?आणि पावडरीच्या लेयर कडे तोंड करून शी केली म्हणजे सगळंच गणित चुकलं."
"तू सोल्युशन दे.असलेल्या सोल्युशन मध्ये चुका काढू नकोस."
"ठीक आहे.तू पहाटे 4 पासून लक्ष ठेव. मांजर आली की चटकन गॅलरीचं कुलूप काढायचं, पटकन बाहेर जायचं आणि तिच्या कंबरेत मोठी कचकून लाथ घालायची."
"मी काय म्हणते, तुला गेले बरेच दिवस ब्राह्मप्रहरी उठून जॉगिंग ला जायचं होतं ना?तूच का नाही लक्ष ठेवुन पेकाटात लाथ घालत?"
"बरं ते जाऊदे.अजून एक आयडिया.मांजरीच्या नेहमीच्या शी ला उभं राहायच्या जागेवर थोडे लांब लांब 10 वेट सेन्सर लोडसेल लावायचे.त्यातल्या एखाद्यावर तिने पाय दिला की सेन्सर ऑपरेट होईल.मग एक स्विच ऑन होईल.मग वरती एक पाण्याची भरलेली बादली असेल ती तिच्या अंगावर रिकामी होईल."
"अरे महान माणसा, इतकी हाय फाय सेन्सर असेंम्बली आपण बनवून जागेवर लावेपर्यंत त्या मांजरीला 5 पिल्लं होऊन ती आईपार्जित शौचालयाचा वापर करायला लागतील.टॉम अँड जेरी बघणं कमी कर जरा."
"पेस्ट कंट्रोल करायलाच पाहीजेय."
"पेस्ट कंट्रोल ने शी करणारी मांजरं आणि साप कसे जातील?"
"परवा पाल होती बाथरूम मध्ये.मी मेले असते हार्ट ऍटॅक ने.त्या जवळच्या पेस्ट कंट्रोल वाल्याला फोन केला तर म्हणे आम्ही फक्त मुंग्या आणि झुरळं कव्हर करतो.पाली आणि कोळी आम्ही घेत नाही.मूर्ख माणूस.घरावर पाटी लावू का, पाली आणि कोळ्याना प्रवेश बंद म्हणून?"
"ती आता तुझ्या मागे भिंतीवर आहे ती तीच असेल.तशीच होती का दिसायला?"
(इथे एक मोठी किंकाळी आणि पळापळ होऊन एक पार्टी डायनिंग टेबल च्या खुर्चीवर चढते.)
"हाड, हाड.तिला पळव रे.हे बघ असं डिस्टर्ब न करता जायचं आणि हळूच मॉरटीन मारायचं.मग ती बेशुद्ध झाली की केर भरण्यात घेऊन अलगद बाहेर नेऊन टाकायचं."
"हाड?ती कुत्रा नाहीये.मी अजिबात पळवणार नाही.तू 'पाल मारणारा नवरा पाहिजे' असं लग्नाच्या अपेक्षांमध्ये लिहिलं नव्हतं.स्पेक्स क्लिअर हवीत.रोल्स रिस्पॉन्सीबलिटी क्लिअर हव्यात."
"अरे ती बघ तुझ्या नव्या वूडलॅन्ड च्या खोक्याकडे चाललीय."
(आता सरड्यापासून वाचलेली पार्टी किंकाळी फोडून पळापळ करते.)
"मी मॉरटीन आणतो.तू तोवर काठी वाजवून तिला दाराच्या दिशेला ढकल.मध्ये मध्ये कांची नारद राजाचा जप कर.आई म्हणाली त्याने धीर येतो."
"मला जमणार नाही.ती माझ्या अंगावर येईल.तू काठी वाजव, मग मी मॉरटीन देते ते मार.मग ती मेलीय कन्फर्म केलं की मी प्रेत उचलून बाहेर टाकेन."
आपल्या बद्दल चाललेलं इतकं अफाट प्लॅनिंग बघून पाल स्वतःच गहिवरून खिडकीतून बाहेर गेली.
तितक्यात दार धडाधड वाजवून छोटे पाय आणि खरचटलेले हात घरात येतात.
"आई मला जिंजर ने पंज्याने स्क्रॅच केलं."
"बापरे, आधी डेटॉल लावू.केवढं खोल ओरबाडलंय.तू त्या जिंजर पाशी कडमडायला गेलीस कशाला?तुला मी कालच सांगीतलं होतं कुत्री मांजरं त्यांच्या खूप जवळ गेलं की चिडतात."
"अगं मला लक्षात होतं.मी आधी जिंजर चा चेहरा वळवून नीट पाहिला.तो चेहरा शांत दिसत होता म्हणून तिला उचललं तर तिने जोरात शांत फेसनेच पंजा मारला."
"तुझ्या नानाने केलं होतं मांजरीचं फेस रिडींग.चला आता रेबीज इंजेक्शन घ्यायला.आणि 5 डोस पूर्ण झाले की मग पाहिजे तितक्या मांजरी कुत्रे उचलत बस."
-आमच्या घरातल्या सर्व 0,2,4,6 पायवाल्या प्राण्यांना समर्पित.

Friday, 22 June 2018

हिंजवडी चावडी: मिटिंग बिटिंग

"अरे पण तू केली होती ना मीटिंग रुम बुक?"
"केली होती.पण ती पलीकडच्या टीम ची परदेशी बाई 2 आठवडे तिथे बसणार आहे बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन.सो दुसरीकडे जावं लागेल."
"पण मग तू त्याना बदली रुम नाही मागितली का?"
"आपण रूट कॉज अनलिसिस मध्ये टाकलं होतं ना त्यांनी इन्फ्रा सेटअप लवकर दिला नाही म्हणून टोयोटाचा इश्यू उशिरा गेला..तेव्हापासून ते लोक असेच करतात."
"पेराल तेच उगवते" "मध पाहिजे असेल तर मधमाश्याच्या पोळ्यावर लाथ मारू नका" वगैरे जुन्या म्हणी नव्याने मांजराच्या डोळ्यासमोर तरळल्या. अचानक त्याच्या शेजारचा दुसऱ्या टीम चा भिडू बाळंतपणाच्या 5 दिवसाच्या रजेवर गेल्याचं त्याला आठवून त्याने झटपट त्याची आज रिकामी असणार असलेली मीटिंग रूम गाठली.'छोट्या लढाया जिंका, युद्ध आपोआप जिंकले जाईल' वगैरे इंग्लिश म्हण मनात बनवत मांजर आणि त्याचा टीम रुपी कळप मीटिंग रुमात शिरला.
काचेच्या दाराबाहेरून एक फोनवर बोलणारा गगनभेदी आवाज जवळ जवळ येत होता.
"अगं गुटखा नाही, सातारी जर्दा मागायचा कडक.एकदम किक येईल असा द्या म्हणून सांगायचं.नाही नाही, मशेरी भाजलेली असते.ती नाही चालणार."
मांजर आणि त्याचे टीम मेट्स दचकून बाहेर बघायला लागले.
"हां, घेतला ना, 111 मिळाला का, तो बेस्ट.आता नीट मगभर पाण्यात मिसळायचा, आणि न्हाव्याकडे केसांवर पाणी मारायचा स्प्रे असतो ना त्या बाटलीत टाकून झाडावर मारायचा.सगळी कीड गायब."
मांजर आणि टीम मेट्स नी सुटकेचा निःश्वास टाकून परत एक्सेल मध्ये डोकी खुपसली.या आमच्या टीम मधल्या पर्यावरणवादी ताई.या कोणत्या वस्तूंचा कश्यासाठी उपयोग करतील सांगता येत नाही.मायक्रोवेव्ह ने कँसर होतो ऐकल्यावर यांनी आपल्या जपानी उच्चतंत्र मायक्रोवेव्ह चं बरण्या ठेवायचं शेल्फ बनवलंय.यांच्या घरात गेल्यास खापरात केलेली पोळी मातीच्या ताटात वाढलेली ट्रक च्या टायर ने बनलेल्या मोढ्यावर बसून तुम्हाला खायला मिळेल.काच पण नै.काच पर्यावरणात 400 वर्षं राहते.त्यामुळे ताई दुकानावर जाऊन कडक किक येणारा सातारी जर्दा आणतात ही मानसिक किक टीम ने सहजपणे पचवली.
"आपण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायला पाहिजे.वेब सर्व्हिस लिहून काय कोणीही करेल.पण आपण यात मशीन लर्निंग इंटिग्रेट केले तर उद्या वेअरेबल डिव्हायसेस ला आपण बेस्ट प्रॉडक्ट असू."
गीक दादा म्हणाले.हे दादा रात्री 2 पर्यंत घरी वेगवेगळी ट्युटोरियल वाचतात.बस मध्ये कर्णयंत्र लावून लिंडा(या बाई खऱ्या नव्हेत,त्या एका अभ्यास आणि ऑनलाइन शिक्षण वेबसाईट चे नाव आहे) ची प्रवचने ऐकतात.हे कलियुगात असतात तेव्हा त्यांची कंपनी अजूनही त्रेता युगातल्या टेक्नॉलॉजी वापरत असते.त्यामुळे यात बदल घडवून आणण्यासाठी 'रामाने सोन्याचा हरीण आणायला जाताना कुटीच्या दरवाज्याला बायोमेट्रिक स्कॅनर व सीतेच्या नुपुरामध्ये gps ट्रॅकर लावून जावे' अशी व्यवस्था स्वतःच्या कामात ते नेहमीच करत असतात.पण त्यांच्या मांजराची सर्व वरची मांजरे रावण असल्याने त्यांना सीता पळवण्यात येणारे हे अडथळे मुळीच पसंत नसतात व ते 'त्रेता युगातील लक्ष्मणरेषा सध्या पुरे, तुझ्या आयडिया पुढच्या रिलीज ला वापरू' म्हणून गीक दादांना जमिनीवर आणतात.पण तरीही गीक दादा आपला अविरत अभ्यास चालूच ठेवतात.
"जरा विसावू या वळणावर" ताई वादळी वेगाने पर्स सहित आत शिरून खुर्चीत सांडल्या. ताईंना दीड वर्षाचे बाळ असल्याने आणि नवरा परदेशी असल्याने ताई बाळाचे आवरणे, सासू सासऱ्या साठी नाश्ता, जेवण,बाळाचे अमुक प्रमाणात तमुक व्हिटामिन, आयर्न,मॉलिब्डेनम आणि मेंडलेयेव्ह च्या सारणीतले सर्व धातू थोड्या थोड्या प्रमाणात देणारे भाजी पाला फळे फुले घातलेले बाळाचे 3 खाऊचे डबे बनवून येतात.घरी इतके केल्यावर ऑफिस हा औट घटकेचा जीवाला थंडावा वाटणे हे चकोर पक्ष्याला चंद्राचा आसरा वाटण्याइतकेच नैसर्गिक आहे.ताई नोकरी सोडून नवऱ्याघरी सातासमुद्री सुरक्षित पोहचण्याची वाट ऑफिसात आणि घरी सर्व चातकाप्रमाणे पाहत आहेत.
"सब मोह माया है" दादा चेहऱ्यावर मख्ख भाव आणून खुर्चीत मागे रेलून बसले होते.अमिताभ च्या 'सरकार' चे पोस्टर दादांना खुर्चीवर बसलेले पाहूनच सुचले अशी हापिसात वदंता आहे. हे दादा आधी मनुष्य प्राण्या प्रमाणे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे षड्रिपू बाळगून उत्साहाने कामावर चिकटले होते.पण त्यांच्या पहिल्या पगारवाढीला कुंडलीत रिसेशनयोग, दुसऱ्या वाढीला कंपनी मर्जरयोग, तिसऱ्या वाढीला टीम बदल योग आडवा आल्याने दादा "सब मॅच फिक्स है, क्या हार क्या जीत सब झूठ और फरेब का रिमिक्स है" भाव चेहऱ्यावर आणून काहीही नवी योजना कानावर पडण्या पूर्वी "नाही वर्क करणार हे" म्हणायला तोंड उघडून तयार असतात.
या सर्व रत्नांना दरबारी बाळगणारा हा मांजर जुन्या पिक्चर मधील नूतन,निरुपा रॉय, आणि बाकी अनेक तत्ववादी शाळामास्तरांच्या पतिव्रता आणि इंटर्व्हल पूर्वी गोळी लागून मरणाऱ्या बायकांप्रमाणे अमेरिका, फ्रान्स आणि भारत अश्या 3 भूतलावरील साहेबांना सांभाळत कोंड्याचा मांडा करून टीम चा संसार काटकसरीने चालवत असतो.मांजराने फ्रान्स च्या भल्या सकाळी त्यांना फोन करून समजून घेऊन आपल्या टीम ला कळवळून पटवलेले काम आणि कामाची पद्धत आणि त्यानुसार झालेले अर्धा दिवस काम भारतातले लोक घरी गेल्यावर अमेरिकेच्या लोकांनी कॉफी चे घोट मारत मिटिंग घेऊन केलेल्या चर्चा आणि बदलांमुळे दुसऱ्या दिवशी 15% निकामी झालेले असते.असं अनेक वेळा झाल्यावर मांजराला सर्व देशी विदेशी साहेबमनांचा अंदाज येऊन तो दारी आल्या पाहुण्यांना कोडरूपी पॅटिस वाढताना आता ओट्यापाशी दुसऱ्या अप्रोच च्या अभ्यासरूपी शिऱ्याची कच्ची तयारी करून ठेवतो.
"आज पासून आपल्या टीम मध्ये अजाईल वापरणार आहोत आपण."
"अजाईल?" (पर्यावरणवादी ताई अजून त्यांच्या घरातल्या झाडांवर जर्दा मारण्यातून मानसिक दृष्ट्या बाहेर पडलेल्या नाहीत.)
"अजाईल.आता आपण वॉटरफॉल मॉडेल वापरतो.काम स्पेसिफिकेशन, प्लानिंग, डिझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टिंग, मेंटेनन्स अश्या पायऱ्यावरून धबधब्यासारखं खाली कोसळतं. ते आता पाणवठयावर 5 नळ सोडून पाच बादल्या भरायला ठेवायच्या आणि एकत्र भरून न्यायच्या." (मांजर सध्या तो घेत असलेल्या अनेक अजाईल सेशन्स मुळे डोक्यात साठलेले बुडबुडे साबणाच्या फुग्याप्रमाणे भराभरा सोडायला लागला.)
"आणि या धबधब्यात दर अपरेजल सायकल ला कोणीतरी घसरून पडून दात पाडून घेतं."('सब मोह माया है' दादा पर्यावरण वादी ताईंच्या कानात कुजबुजले.)
"मेल पाठवायची नाहीत.सगळं रोज 15 मिनिटाच्या स्टँड अप मिटिंग मध्ये तमाम करायचं." ('मेल पाठवायची नाहीत' या वाक्याला गीक दादा सरसावून बसले.एरवी ते दिवसभरात हापिसात जास्तीत जास्त पाच वाक्यं बोलतात आणि बाकी मजकूर शेवटी eom(एन्ड ऑफ मेल) येणाऱ्या रिकाम्या मेल मध्ये विषयात एक लांबलचक वाक्य लिहितात.)
"आपण बसून घेऊया स्टँड अप मिटिंग.मला जास्त उभं राहिलं की चक्कर येते." ('जरा विसाऊ या वळणावर' ताई घरी 'बाळ सांभाळ, खाणं सांभाळ, इनलॉ सांभाळ,बाळ सांभाळ' वाला गरबा खेळत असल्याने हापिसात त्या जास्त हालचाल करत नाहीत.दीड इंच हिल वाले फॉर्मल शूज घातले असले तर कँटीनपर्यंत पण नाही.)
"मेल पाठवायला नको का?बाकी अजाईल बिजाईल चालूदे पण मॉम(मिनिट ऑफ मिटिंग) मेल पाहिजेत.नंतर लोक 'तुला हे सांगितलं तू केलं नाहीस मी तोंडी बोललो होतो' म्हणून भलत्या गोष्टींवर फटके टाकतात." ('सब मोह माया है' दादांच्या मनावर जुन्या जखमांचे व्रण अजून ताजेच आहेत.आयुष्यात प्रत्येकाशी घडलेल्या प्रत्येक संभाषणाचा आपल्याकडे मोबाईल स्क्रीनशॉट/रेकॉर्ड/साक्षीदार/मेल/एक्सेल यापैकी एका स्वरूपात लेखी पुरावा असलाच पाहिजे अश्या सावध पवित्र्याने हे वावरत असतात.मागे एकदा बायकोने सकाळी लाजत गोड बातमी सांगितल्यावर यांनी 'मला एक मेल टाकून ठेव.आय विल गेट बॅक टु यु ऑन धिस बाय eod टुडे.' म्हटल्याने घरात झालेली खडाजंगी अजूनही अधून मधून त्यांना टाचण्या टोचायला वापरली जाते ही गोष्ट वेगळी.)
"आपण अजाईल ला थोडं बदलून घेऊ.सध्या आपण फक्त नवीन आलेलं काम अजाईल ने करू.ऐन वेळी येणारी मेंटेनन्स कामं वॉटरफॉल ने करू." (मांजर नेहमी प्रमाणे टीम मधले सगळे अडथळ्याचे दगड जवळ आणून सेतू बांधण्यात बिझी.)
"मी डेव्ह ऑप प्रॅक्टिसेस वापरून परवा एक प्रोग्राम लिहिला होता.सगळ्या टीम ला पाठवला होता.तुम्ही कोणीच पाहिला नाही का?" (गीक दादा एप्स च्या ग्रहावर आलेल्या एकट्या प्रगत मनुष्यप्राण्याच्या भावना मनात बाळगत म्हणाले.)
"अरे बाबा तुला कितीदा सांगितलं असे प्रोग्राम वगैरे मेल वर पाठवत जाऊ नको? तुला माहीत आहे ना आपल्याकडे आयपी राईट्स ची किती बोंब होते?आपण एका खूप मोठ्या महागाच्या गोष्टीवर काम करतो.आपली लायसन्स लोक एक कोटी मध्ये विकत घेतात.आपल्याला आपल्या डोक्यातून जन्मलेल्या आणि कॉम्प्युटर वर उतरलेल्या 2 ओळी पण कंपनी बाहेर नेण्याची परवानगी नाही.आणि तू प्रायव्हेट आयडी वरून मेल पाठवतोयस.उद्या कोणा कॉम्पिटेटर ला गेला म्हणजे?"
(मांजर प्रेमळ असले तरी अत्यंत नियम प्रेमी आहे.कोणतेही वळण नसलेला एक सरळ वन वे रस्ता पुढे वेडा वाकडा वळत असला तरी त्यावर इंडिकेटर दाखवुनच जायचं या सवयीनं त्याने मागच्या बऱ्याच चक्रधारींच्या शिव्या खाल्ल्या आहेत.नियम म्हणजे नियम.वळलं म्हणजे इंडिकेटर.)
"आपला भला मोठा कोड बेस, सर्व्हर, डॉक्युमेंट इतकं असून आपल्याच्याने आपला कोड रन करताना घाम फुटतो, शत्रू टीचक्या 15 लाईन घेऊन काय करणार?अश्या शत्रूला तर आपल्या कंपनीने स्वतःकडे ठेवलं पाहिजे." (पर्यावरण प्रेमी ताई दुसऱ्या ताईंच्या कानात खिदळल्या.)
बाहेर एक माणूस नाकाला आठ्या घालून घड्याळ बघतोय.गीक दादांनी बाहेर येऊन 'काय' विचारलं.
"मी मुंबई ऑफिसहून आलोय.या रूम चं बुकिंग त्याने मला दिलंय तो पॅटरनिटी लिव्ह वर आहे.मी घरी फोन करून त्याचं बुकिंग माझ्या नावावर घेतलंय."
मिटिंग रूम ची 'झोपडपट्टी पुनर्वसन पर्यायी घर योजना' प्रमाणे होणारी परस्पर सौदेबाजी बघून मांजर कळवळला.पण 'नियम म्हणजे नियम.' त्यामुळे सगळ्यांनी मिटिंग गुंडाळायला घेतली.
"बाकी स्टेटस एक्सेल मध्ये टाका.तू उद्यापासून स्टँड अप मिटिंग ला रूम बुक कर रे.सकाळी कितीचा पण स्लॉट चालेल.पण ही खोली मिळायलाच पायजे.इथून आवाज जात नाही."
नेहमी प्रमाणेच स्टेटस पासून बरेच सांधे बदलून मिटिंग संपली.

Friday, 9 February 2018

गोळ्यांचा गोपालकाला: रामलीला

आपले ते साड़या विकणारे शहाडे आणि आठवले बंधू होते ना, तसे कोणे एके काळी सनेडा आणि रजाडी बंधू बंदुका विकायचे.फक्त फरक इतका की हे बंधू बंधू नसून हाडवैरी असतात.हे लोक इतक्या घाउक प्रमाणात बंदुका विकतात की घरी दुधीची भाजी बनवताना दूधी हवेत फेकून गोळी घालूनच तुकडे करत असावे.जुनी व नवी संस्कृती अर्थात मोबाईल ट्विटर इंटरनेट आणि घागरा ओढणी वाल्या स्त्रिया, मारवाडी चोळणे घातलेले पुरुष अश्या विविध मिलापातून कथा पुढे सरकत जाते.

या रजाडी आणि सनेडा बारदान्यात अनुक्रमे एक उमदा लग्नाचा मुलगा आणि एक सुंदर(आणि केव्हाही उठून लॅकमे फॅशन वीक ला चालायला जावे लागेल या तयारीत साजेसे उंचच उंच 5 मीटर घेर वाले घागरे आणि 70 सेंटीमीटर ब्लाउजपीस मध्ये शिंप्याने कौशल्याने शिवलेल्या सूक्ष्म चोळया घालून वावरणारी) मुलगी असते.

मुलगा बघू नये अश्या चित्रपटांचे पार्लर चालवत असतो.रजाडी लोक 'जुने ते सोने' या तत्वाला आचरून जगत असल्याने ते तसले चित्रपट युट्युब किंवा इंटरनेट किंवा पायरेटबे वरून न उतरवता व्यवस्थित राम च्या दुकानात जाऊन पैसे देऊन पाहतात.हा झाला राम च्या पोटापाण्याचा धंदा.लीलाचा पोटापाण्याचा उद्योग पिक्चर मध्ये अज्ञात आहे.राम-लीला अशी नावं मिळून रामलीला असे चित्रपटाचे नाव पडले.पुढचा चित्रपट 'दशावतारी' बनवायला हरकत नसावी.मुलाचं नाव 'दशा'(परशा सारखं) आणि मुलीचं नाव 'वतारी'(रामप्यारी सारखं).लीलाच्या ऊंची मुळे(आणि घागऱ्याच्या कापडा-शिलाई वर होणाऱ्या संभाव्य खर्चाच्या भीतीने) तिला स्थळं मिळत नाहीयेत.

राम आणि लीला एका समारंभात भेटतात, रंग आणि गरबा खेळतात.(इथे होळीसदृश सण आणि गुजराती गरबा एकत्र दाखवून संस्कृत्यांची एकात्मकता साधली आहे.)मग नंतर हे गुपचूप पणे लिलेच्या बाल्कनी वाल्या खोलीत भेटतात.आजूबाजूला बरेच मोर सारखे केकाटत(किंवा कवी भाषेत केकारव करत असतात.)या सज्जाच्या खाली एक तळे आहे.तळ्याच्या जवळ पाणी बदलण्याची काहीच व्यवस्था दिसून येत नाही.नगर पालिका अनेकदा डेंग्यूच्या अळ्या शोधायला पाणी तपासून गेली पण त्यांना दंड करता आलेला नाही.यावरून 'मोर डेंग्यूचे डास(पण) खातात' असा निष्कर्ष मनात धरायला हरकत नसावी.

राम आणि लीला चे प्रेम जमते.लोकांचे(दुष्मन जमाना) लक्ष नाही तोवर त्यांना निवांत भेटीचा वेळही मिळतो.पण एकंदरच टाईम मॅनेजमेंट च्या नावाने उजेड असल्याने हा सोन्याचा वेळ मंडळी 'यहां इशकयांव वहां ढिशक्याव' अशी व्योमगंगा वृत्तातली गीते रचण्यात आणि त्यावर भरपूर उडया मारायचा नाच कोरिओग्राफ करण्यात वाया घालवतात.

त्यामुळे जे व्हायचे तेच होते.'तुमची ताडमाड मुलगी आमच्या वाण्ड एरंडाच्या झाडाबरोबर फिरतेय' ही बातमी रजाडी सनेडा भाऊबंदकीत पसरून तू 4 गोळ्या मार मी 5 गोळ्या मारतो वाला खेळ चालू होतो.(यात इतक्या बंदुका आणि इतक्या गोळ्या खर्ची पडल्या आहेत की पुढची किमान 10 वर्षं सनेडा रजाडी बंदूक टपरी वर खरेदीला गेलेली गिर्हाईकं अविश्वासाने विचारतायत.'भैय्या ठीक से चेक करके दो, सेकंड हँड नही है ना' असे चार पाच वेळा विचारतायत.)इथे एक नोटपॅड घेऊन बसणे सोयीचे ठरेल.

कुटुंब: रजाडी
मयताचे नाव: माहीत नाही
मयताचे नाते: राम चा भाऊ
मयताचे नातेवाईक: एक बायको आणि एक मुलगा

कुटुंब: सनेडा
मयताचे नाव: माहीत नाही
मयताचे नाते: लीला चा भाऊ
मयताचे नातेवाईक: एक बायको.


Image credit: http://www.reshareit.com/atul-khatri-on-ram-leela/
Image will be removed if main image source objects to it being here.आता यापुढे रजाडी आणि सनेडा इतके एकमेकांच्या एरियात घुसून एकमेकांना इतक्या गोळ्यांनी मारतात की कोण कोणाला मारतेय हे आपल्याला कळणे अतिशय दुरापास्त होते.दोन्ही बाजूच्या वहिन्या काळ्या बॅकलेस चोळ्या घालून शत्रुपक्षाच्या हाती सापडून गोंधळ अजून वाढवतात.यात कधीतरी राम आणि लीला पळून जातात आणि लाकडी पलंग आणि अलमारी वगैरे विंटेज फर्निचर असलेल्या लॉज मध्ये थांबतात.इथे परत एकदा टाईम मॅनेजमेंट चा घोळ असल्याने हे लोक भांडतात.मग नंतर धूप जाळून ते पात्र उलट सुलट फिरवून नाच करतात.मग नंतर राम चे मित्र त्याला बोलावून घेतात आणि प्यायला बसवतात.लीला अजून धुपाचा धूर घालवण्यात आणि बेड वर काही राख ठिणग्या पडल्यात का याची शहानिशा करण्यात व्यस्त असल्याने राम ला फोन करून 'पहिल्या रात्री पण तेच.प्या पोट फुटेपर्यंत ते टोळभैरव जमा करून.माझंच नशीब मेलं असं.चांगला एन आर आय सांगून आला होता.पण पदरी पडलं पवित्र झालं.काय जे प्यायचं ते पिऊन निमूट घरी यायचं आणि झोपायचं.अजिबात बाकी कोणतीही अपेक्षा करायची नाही.' वगैरे झापण्याची संधी वाया घालवते.

समाजात राम सारखी बेजबाबदार लोकं आहेत.यांच्या सारखी लोकं कुकर मध्ये इडल्या तयार आणि नारळ संपला म्हणून बायकोने पटकन आणायला सांगितलेला असताना वाटेत 'तो सुन्या भेटला गं, बन मस्का खायला जाऊ म्हणाला.मग तिथे अचानक वश्या आणि मन्या पण भेटले.खूप गप्पा मारल्या' म्हणून 1 तासाने हात हलवत परत येऊन बायकोच्या शिव्या खातात.आपण काय करतोय, इडल्यांची अर्जन्सी काय, समाज(म्हणजे सासू सासरे) बायकोला काय म्हणतील कसली कसली म्हणून पर्वा नाही.यांच्याच मुळे परतलेल्या शेजवान इडल्यांचा शोध अगतिकतेतून लागला.व्हायचं तेच होतं.दारू पिऊन परत येईपर्यंत लीला गायब.

आता परत एकदा गोळ्या गोळ्या खेळ चालू.यात च आपण घरी आकाश कंदिलात लावायच्या दिव्याची लांब वायर कटर ने कापतो तशी सनेडा बाई लीला चे बोट अडकितत्याने कापून टाकते.आपणच मनात कळवळून 'थांब गं बाई.डाव्या हाताचं काप बोट.उजव्या हाताचं बोट कापून बिचारी पोरगी आयुष्यभर घागऱ्याच्या नाड्या बांधणे,नेलपेंट ची बाटली उघडणे, शेवटी गोळी मारून घेणे अशी कामं कशी निभावणार आहे?' म्हणतो.लीलाचं बोट कापलं म्हणून राम सुद्धा आपलं बोट कापून घेतो.इथे गांधारी सिनारिओ एका पुरुषाने निभावलेला दाखवुन फेमिनिझम चा समतोल साधला आहे.

मग अश्याच एका नाचाच्या कार्यक्रमात परत एकदा धूप पात्रे उलट सुलट फिरवून नाच करताना सिनियर सनेडा बाईंना गोळी लागते.एकंदर धूप पात्र नृत्य सनेडा कुटुंबियांसाठी अपशकुनी मानले जावे असा फतवा निघण्याची निकडीची गरज आहे.त्यामुळे लीला सनेडा बाईंची जागा (आणि पिकदाणी ) दोन्ही बळकावते आणि एका मारवाडी घेरदार अंगरखा वाल्या कझिन चा पोपट करते. या कझिन चे नाव राघू असावे अशी शंका घ्यायला बराच वाव आहे.पुढील काही दिवसात हा राघोबादादा 'समस्त रजाडी जमातीस (ध)मारावे' असा हुकूम काढून त्यावर लीला ची सही घेतो.लीला ने आमच्या सारखी दुकानात लकी ड्रॉ मध्ये फ्री क्रेडिट कार्ड चा फॉर्म भरून मग त्यावर 'कार्ड फ्री, फक्त 500 रु वर्षाला इन्श्युरन्स चार्जेस' वाली माती खाल्ली नसल्याने ती फॉर्म न वाचता सह्या करते.

मग नंतर राम व लीला एकांतात भेटून गहन चर्चा करतात.
"काय करायचं?जाम रिग्रेशन आलंय.क्लायंट आपलं ऐकत नाही आणि आपले प्रोग्रामर पण आपलं ऐकत नाहीत.सगळा डेडलॉक झालाय."
"चालतं रे.आपण हा प्रोजेक्ट स्क्रॅप करू.पुढच्या चित्रपटात नव्याने लॉन्च करु."
"अरे पण आपल्या सगळया प्रोजेक्ट टीम चं हेच होतंय.मराठी बनलो, मेवाडी बनलो, राजस्थानी बनलो तरी काही करून शेवटी टास्क फोर्स संपवून प्रोजेक्ट स्क्रॅप करावे लागतायत."
"हे बघ,सगळं काही गोड गोड कसं मिळेल?जितकं बिलिंग झालं त्यावर समाधान मानावं माणसाने.उद्या कोणी पाहिलाय?"

म्हणून राम लीला एकमेकांना गोळी मारून घेतात.इथे लोक कागद पेन घेऊन बसले आहेत.जरा घोळ आहे.
रामचे वजन m1 = 77 किलो
लिलाचे वजन m2 = 55 किलो
गोळीचा वेग = ताशी 2 किलोमीटर
संवेग p1 = m1 x v = 154
संवेग p2 = m2 x v = 110

संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत लक्षात घेता लीला भिंतिला आपटणे, राम थोडा मागे पडणे, किंवा बंदुकीचा रिकोईल येऊन लीलाची गोळी झुंबराला लागून पोपट होणे या शक्यता निर्माण होतात.शिवाय अगदी दोघांनी वेगवेगळ्या वेग वाल्या बंदुकिच्या गोळ्या निवडल्या तरी नंतर नीट हात धरुन सरळ रेषेत कडेला जाऊन स्लो मोशन मध्ये तळयात पडता येईल का हा प्रश्न उरतो.तळयात पडून डेंग्यू चे डास चावणे ही शक्यता ते दोघे पहाटे 3 ते 7 च्या दरम्यान मरत नसल्याने आपण बाजूला ठेवू.एकंदर अडचणी लक्षात घेता पुढील उपाय जास्त सोईचे वाटतात
1. दोघांनी हात धरुन तळयाकडे पाठ करून सरळ रेषेत ताठ उभे राहून समोर 2 नोकर उभे करून त्यांना 1,2,3,स्टार्ट म्हटल्यावर एका वेळी गोळ्या झाडायला सांगणे(पैसे आधी देऊन ठेवावे लागतील.नो कॅश ऑन डिलिव्हरी.)

2. दोघांनी मीठी मारून एकमेकांना झोपेच्या सुया गोळ्या म्हणून मारणे(फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले बिबट्या किंवा वळू ला मारतात त्या) आणि मग गोळीचा परिणाम होण्यापूर्वी लगेच हातात हात घेऊन पडणे.
दोघांना आत्महत्या करण्यात आलेल्या इतक्या अडचणीनच्या केस स्टडी नंतर सनेडा रजाडी 'नको बाबा ही लफडी, नीट मारामारी न करता धंदा पाणी चालू ठेवू' म्हणून एकत्र आली नसती तरच नवल!!
-अनुराधा कुलकर्णी

Tuesday, 23 January 2018

हम दिल दे चुके सनम

एक राजस्थान किंवा तत्सम वाळवंटी प्रदेश आहे.इथल्या बायका टिकल्या नक्षीकामाच्या गुजराती साड्या किंवा घागरे घालतात.मोठ्ठं दुमजली बंगला किंवा हवेली म्हणता येईल असं घर आहे.घराचा प्रमुख एक खूप म्हणजे खूपच फेमस गायक आहे.इंटरनेट चा जमाना नसताना पण त्याच्याकडे इटली मधून शिकायला विद्यार्थी येणं ही खूप म्हणजे खूपच कॉमन गोष्ट आहे.

या घरात विजेचे लाईट नसावे.सगळीकडे प्रकाशमान आणि भरपूर दिवे मेणबत्या आणि झुंबरे दिसतात.तसा यांच्या घराचा मूळ पोटापाण्याचा व्यवसाय हा रहस्यमय असला तरी घरात एक एनआरआय आहे, त्याने थोडीफार जमापुंजी आणलीच असेल.गायक महाराजही बरंच कमावत असावे.बाकी वेळ घरातली माणसं अखंडपणे डायनिंग टेबल वर बसून 7 कोर्स मिल खातात किंवा गच्चीत/ओसरीत बसून गाणी गातात आणि नाचतात.

घरातल्या वस्तूंसाठी एक मोठी सप्लाय चेन आहे.पण ती आपल्याला चित्रपटात दाखवली जात नाही.पडद्याना टिकल्या शिवून देणारा शिंपी, संध्याकाळी पूर्ण हवेली ची झुंबरं मेणबत्त्या आणि तेल टाकून तयार ठेवणारा नोकर, हवेली मधला कुकिंग आणि क्लिनिंग स्टाफ,सलमान खान च्या स्टे साठी इंडियन वॉर्डरोब पुरवणारा शिंपी,नाजूक टिकल्या आणि अति भडक रंगाचे रंग जाणारे कपडे नीट वेगवेगळ्या वाहत्या पाण्यात धुवून देणारी लॉंड्री आणि ड्रायक्लीन करून देणारी सर्व्हिस.घरात एक भरपूर पुस्तकं वाली लायब्ररी पण आहे.पण ती बरीच अंधारी असल्याने तिथे कोणी पुस्तकं वाचताना दिसत नाही.लायब्ररी चा मूळ वापर कॉन्फलिक्ट हँडलिंग साठी होतो.
कहाणी नायक व नायिका अनुक्रमे अखिल इटालियन उडया प्रतियोगिता आणि अखिल वाळवंटीय हुतुतु सामन्यात प्रावीण्य मिळवलेले असल्याने प्रत्येक साधी गोष्ट उडया मारणे,उलट सुलट पडणे अश्या मार्गाने करतात.एकंदर प्रदेश अति दुर्गम असल्याने नायिकेला आकाश कंदील आणायला आणि नायकाला एअरपोर्ट वरून गुरूच्या घरी यायला चालत पूर्ण वाळवंट ओलांडावे लागणे अपरिहार्य असते.(भर वाळवंटात रेशमी/जॉर्जेट/शिफॉन चा टिकल्या काम केलेला घागरा किंवा दुकानातल्या शोकेस मध्ये दिसणारे बंदगला जोधपुर घालून चालणे,धावणे, उडया मारणे विचारात घेतल्यास सप्लाय चेन मध्ये 'पुरे परिवार का डिओडरंट सप्लायर' हा महत्वाचा घटकही लक्षात घ्यावा.)

तर महाराजा, आपले इटालियन विद्यार्थी गुरु म्हाराजांच्या घरी पोचलेले आहेत.गुरुपत्नी आमच्या खानदानाशी कोणतेही दूरचे नाते बाळगून नसल्याने नवर्याची 'अहो, जरा इकडे या.कुठचा कोण पोरटा लगेच घरी कसा ठेवून घेता?इकडे आपली आगाव नंदू, तिच्या चार पाच बहिणी आणि मला आता नातं लक्षात नसलेल्या तरण्या ताठया तीन चार मुली आहेत राहायला.जरा म्हणजे जरा पाचपोच कसा बै नाही तुम्हाला?' अशी खोपच्यात घेऊन खरडपट्टी न काढता 'आलास, ये.पाहिजे तितका राहा.आमच्याकडे तसा पण खोखो आणि हाऊजी ला एक मेम्बर कमी पडतोय' या विशाल बाहूंनी त्याला घरात सामावून घेते.गुरु महाराज रेंट आणि फी बद्दल निर्वीकार पणे "50% अभी चाहिये, फर्स्ट सेशन के पहले.बाकी 50% पैसा 8 सेशन के बाद.पेटीएम नही चलेगा.क्रेडिट कार्ड पे 2% टॅक्स लगेंगा.ऑनलाइन ट्रांसफर,कार्ड चलेगा" वगैरे आमच्या कोपर्यावरच्या सी प्लस प्लस इंस्टीट्यूट च्या काउंसेलर सारखी मख्ख उत्तरं न देता "वेळ आल्यावर सांगेन" म्हणतात.इटालियन विद्यार्थि पण आमच्या सारखे "नाही नाही, आता अंदाजे एस्टिमेट पाहिजे.त्यानंतर मी ठरवतो" वगैरे दुरुत्तरे न करता ओके म्हणतो.

यापुढे एक अखंड आंधळी कोशिंबिर आहे.नंदू आणि इटालियन बंडू गाणी गाणे, खाणा खुणा, कोपरखळ्या, एकांतात भेटणे हे सर्व करत असूनही बुवा(बुवा कुक वाला बुवा नव्हे,हिन्दीतली आत्या!) सोडून कोणालाही त्यांच्यात काही असावे अशी शंका येत नाही. परत एकदा, ही मंडळी आमचे दुरचे नातेवाईक नसल्याने हे थोडे फार पटणेबल आहे.आमच्या कडे ना, बारीक लक्ष आणि शंकाच फार! आता समीर नंदूने दिलेला मधाचा चमचा 8 वेळा उडवून लावतो आणि 9 व्या वेळेला खातो या उत्कट सीन ला "शी, चिकट झाली असेल बैठक मधाने.पटपट ओल्या फडक्याने घासुन पुसली तर ठीक.नाहीतर लाल मुंग्या नक्की लागणार सकाळी" हा पीस ऑफ इन्फॉर्मेशन द्यायची गरज आहे का? त्या गोळ्यांची बरसात रामलीला पिक्चर च्या वेळी पण तेच. ती दीपिका प्रेमाने धुपाचे पात्र उलट सुलट फिरवून चांगला सिडक्टिव्ह नाच करतेय आणि आम्ही आपले श्वास रोखुन चुकुन एक ठिणगी किंवा धुपाची राख खाली पडून बेड शीट बाद होणार का हे विचार करत बसलोय !! हे नंदू आणि बंडू आमच्या कडे असते तर त्यांनी झुंबर पाडल्या पाडल्या आमच्या कडे किचन गॉसिप चे अड्डे पडले असते.

नन्दु आणि बंडू च्या प्रेमात भांडणेच फार.साहजिक आहे.बंडू हा आमच्या युरोपियन कष्टमरासारखा शब्द चाचपडणारा आणि नन्दु "मुद्द्यावर या लवकर, डोक्यावर हापटलायत काय, किती लाम्बड लावताय" वाली परखड.तर या भांडणा नंतर नंदू एक खुप वेगात धावाय पळायचा आणि बसफुगडी घालायचा नाच करते आणि वनराज भाऊ तिला पसंत करतात.इथे क्षणभर थांबुन आपण वनराज भौंच्या अति तीक्ष्ण तैल दृष्टि ला दाद देउया. तिचा नाच पाहिलेले बरेच लोक नंतर "सारखा डोळ्यासमोरुन एक मोठा आकाशी पटटा हालतोय" म्हणून डोळे चोळत होते असे ऐकणयात आले.वनराज भौंना हा आकाशी ऑब्जेक्ट धावणारा/नाचणारा मनुष्य प्राणी, सुंदर महिला आहे हे कळले म्हणजे डोळ्याचा शटर स्पीड केवढा असेल!!
PJZf_N.gif

चित्रपटात बराच वेळ हसणे नाचणे गाणे झाल्याने हा पिक्चर एका प्रसिद्ध लग्नाच्या कॅसेट ची नक्कल आहे ऐसे म्हणू नये म्हणून यानंतर नंदू ची बहिण पळून येणे, परत पळून जाणे आणि नंदू बंडू एकमेकांसोबत पकडले जाणे असा एक दुःखी पॅच आहे.यात नंदू झोकयावर बसून लहान मुले 'इथे लागलं, इथे लागलं' सांगतात तशी स्वतःच्या अंगाला बोटं लावून सांगते.आई सहनशील असल्याने "मूर्ख कुठची.थोडक्यात सांग काय काय झालंय ते." म्हणून न खेकसता नंदू च्या आत्मयाला बंडू ने स्पर्श केलाय हे समजून घेते.या सीन ला आपण महाराष्ट्र राज्यातील एका शहरात बरेच वर्ष राहिला असाल तर आपल्या डोळ्या समोर ही काल्पनिक पाटी तरळील:
"आत्मानंद मसाज आणि हेल्थ स्पा"
"आमच्या इथे प्रशिक्षित इटालियन डॉक्टरांकडून मसाज करुन मिळेल"
नुसते होल बॉडी: 500 रु
होल बॉडी विथ आत्मा टच : 700 रु
नुसता आत्मा टच विथ हॅंड लेग मसाज: ३०० रु

पण नंदू च्या आईबाबां कडे इतका सहिष्णु दृष्टिकोण नसल्याने ते वनराज शी लग्न लावून देतात.इटालियन बंडू कडे नंदू ला न भेटण्या ची गुरु दक्षिणा मागितल्याने बंडू बरीच पत्रं लिहून माहेरी इटली ला निघुन जातो.इथे आपण बंडू असतो तर "काय हो, जर मी हे असं केलं नसतं तर गुरु दक्षिणा म्हणून किती मागितले असते?" असं विचारुन आकड़ा मनाशी धरुन "अरे वा इतके वाचले" असा सुप्त विचार केला असता.

वनराज भाऊंच्या नशिबी पहिल्या पासून अपेक्षा भंग आहे. पण यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर च्या सकाळी पहाटे ४ वाजता पूजा ठेवणार्‍या आणि घड्याळाचा अलार्म लावून ठेवणार्‍या फॅमिलीचे अपराध कमी दंडनीय ठरत नाहीत. नंदू ने इथे २ राँग नंबर लावल्याचे स्पष्ट होते.
१. डोळ्यात जो प्यार बंडू साठी दाखवायचा तो चुकून निंबूडा गाण्याच्या वेळी वनराज ला दाखवणे. (आमचं पण होतं कधीकधी असं. हपिस कँटीन मध्ये कॉफी घेणार्‍या दुसर्‍याच चेक्स शर्ट वाल्या पाठमोर्‍या भिडूला आपला नेहमीचा लंच ग्रुप मधला मुलगा समजून मागून 'यो ब्रो' वगैरे काहीतरी सलाम टाकणे.)
२. शेवटी इतके व्याप ताप करुन, पैशे लुटले जाऊन, टिसीला फसवावे लागून ज्या पंटर ला फायनली भेटायला मिळाले त्याला डोळ्यातून प्यार न दाखवणं.

या गोंधळावरुन 'आंखो मे प्यार' या आयटम ला एखादा युनिक बार कोड लावता येईल का हा मुद्दा विचाराधीन आहे. ज्याचा बारकोड असेल त्याच्याच रिडर ने स्कॅन होऊन ग्रोसरी मॉल मधल्या सारखे 'बीप' वाजेल.
आता बंडू ला शोधायला नंदू आणि वनराज इटली ला येऊन धडकतात.इटली हा एका दिवसात आगगाड्यानी फिरून सर्व गावांचा खातमा करता येईल ऐसा देश असल्याने पत्ता, शहर का नाम वगैरे काही बरोबर ठेवले नाही तरी चालते.फोटो नसला तरी चालतो.

तश्यात आणि नंदू बाईना गोळी लागते.
साधारण प्रेक्षकाच्या मनातला संवाद असा:
"गोळी कुठे लागली?"
"मानेला"
"मग प्लास्टर आणि पट्टी हाताला का?"
"कसला शंकाखोर आहेस रे!!!ती पडताना हात आधी खाली आपटून फ्रेक्चर झाला असेल"
"पण मग गोळी ची जखम प्लास्टर च्या आधी कशी बरी झाली?मानेला अजिबात पट्टी का नाही?"

कार्टून फिल्म्स मध्ये एक महत्वाचा सिद्धांत आहे.कार्टून हवेत तरंगत असते.पण त्याने खाली पाहून त्याला खाली जमिन नाही कळल्याशिवाय ते पडत नाही.तसेच या चित्रपटाचा महत्वाचा सिद्धांत आहे. नंदू अगदी टुणटुणीत दिसते.चेहरा शांत(प्रेक्षकांना नंदू आवडत नसल्यास मख्ख म्हणू शकता) असतो.आणि कॅमेरा खाली जाऊन तिची जखम आपल्याला दिसली की मगच ती कपड्याच्या ढिगाच्या सर्वात खालचा कपडा ओढल्यावर ढीग कोसळतो तशी कोसळते.(आठवा इटलीत गोळी लागणे आणि भारतात नस कापून आत्महत्या आणि तळे खराब हे एका दगडात दोन पक्षी मारणे.)

तू इथे मी तिथे करत करत फायनली वनराज समीर आणि नंदू ची भेट होते.(एकन्दर एकमेकांचे फोन नंबर किंवा हॉटेल चे पत्ते लिहून घेण्याची सवय कोणीही अंगी लावून घेतलेली नाही.आधुनिक युगात या लोकांचे अवतार "माझे सिम कार्ड बदलले.मला सगळ्यांचा नंबर पाठवा" चे ईमेल दर सहा महिन्याने करणाऱ्या, तुमच्या लँडलाईन वर एस एम एस करणाऱ्या, वाईफ1 वाईफ2 वाईफ3 ने बायकोचे सर्व आजी माजी नंबर साठवणाऱ्यांच्या रूपाने पुनर्जन्म घेतात.)

नंदू आणि बंडू भेटतात आणि नंदू त्याला मंगळसूत्र दाखवते. आता नंदू ने प्रत्येक भांडणात "मला बघायला लोक येतील आणि मी लग्न करीन" अशी तम्बी दिलेली असताना बंडू ला इतका धक्का का बसावा हे प्रेक्षकाना कळत नाही.पण नंदू परत धावत पुलावर जाऊन वनराज ला दोन पैकी एक हात निवडायला सांगते.सुदैवाने वनराज चा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागून लग्न कायम राहते.(आता जनरल नवरा बायको ही गोष्ट पुढची किमान 5 वर्ष एकमेकांना बोलून दाखवून कडाकडा भांडतील.)
"तेव्हा पण लकी ड्रॉ काढायला लावून माझ्या बरोबर आलीस. दूसरी एखादी असती तर हॉल मध्ये वर गेलीच नसती.पण निखळ प्रेम नाहीच ना आमच्या नशिबि!!"
"उगीच ऐकवून दाखवू नकोस.तू मूर्खा सारखी त्या लोकांना लिफ्ट मागितल्याने हात मोडला माझा.मान पण मोडली."
"रडत बस नुसती.इतकं इटली ला फिरवून आणलं त्याचं काही नाहीच.तरी आई सांगत होती या मुलीचे नखरेच फार.नको करायला सोयरिक.बघायला गेलो होतो तेव्हा तरी धड सूधेपणाने चहा कांदेपोहे तरी करुन आणले होतेस का?"
"आणि तू मोठा गुणाचा पुतळा आहेस की नाही.मेल्या २ ओळी धड गाता नाही आल्या.सोपं गाणं घ्यायला काय झालं होतं? डायरेक्ट चिंगारीच.तू गाताना गाढव ओरडत होतं बाहेर.बाबा म्हणालेच या असुराच्या घरी तुझं कसं निभणार म्हणून."
वगैरे....वगैरे....अनेक वर्ष.

(हा माझा अति आवडता पिक्चर आहे.माझी दर वीकेंड हा टीव्ही वर पाहू शकण्याची तयारी सूर्यवंशम किंवा इंद्रा द टायगर किंवा मुम्बई की किरण बेदी दर वीकेंड ला पहाणाऱ्या भक्तांपेक्षा तसूभरहि कमी नाही.हे परीक्षण विनोदी आहे ऐसा दावा नाही.हे परीक्षण आहे ऐसा दावा नाही.या निमित्ताने चित्रपट चिरफाडिस वर आणावा हा एकमेव हेतू.)
hum dil_1409219308.gif

Monday, 4 December 2017

उजळणीशी हातमिळवणी

"अमिबा नाही!! मडीबा! म डी बा!! नेल्सन मंडेला ना प्रेमाने मडीबा म्हणत होते.अमिबा वेगळा.तो प्राणी असतो.मडीबा म्हणजे महात्मा सारखं पेट नेम."

सहामाही म्हणजे हाफ इयरली परीक्षा आणि हिंदी, सामुदायिक जीवन(हल्ली याला इ व्ही एस की कायसं म्हणातात) पेपराच्या आधी आलेली सुट्टी यामुळे उजळणी घेणं चालू होतं.

"तुमच्या मुलांबरोबर रोज किमान एक तास बसून अभ्यासात घालवा" अशी प्रेमळ सूचनायुक्त धमकी प्रत्येक मीटिंगला आणि डायरीत लिहिलेली आहे.आजूबाजूला 45 मुलांच्या वर्गाच्या मीटिंग ला आपल्या मुलांच्या उत्तरपत्रिका घेऊन प्रत्येक प्रश्न आणि त्याला मिळालेले मार्क याचा सखोल अभ्यास टीचर बरोबर करणारे सुजाण पालक आहेत.त्यात आपण "उद्या कोणता पेपर आहे, पुस्तक कसं दिसतं,रिव्हिजन शीट कधी दिल्या होत्या" वगैरे येडताक प्रश्न शाळेच्या व्हॉटसप ग्रुप वर विचारू नये यासाठी आपल्या मुलं विषयक ज्ञानाला थोडं तेलपाणी देणं फायदेशीर ठरतं.

पूर्वी कसं होतं ना, बिल्डिंग मध्ये एखाद्याना मुलं आहेत हे ती दहावी किंवा बारावी किंवा आयआयटी ला गेल्यावरच जाणवायचं.त्याच्या आधी ती स्वतः मोठी व्हायची.स्वतः अभ्यास करायची.स्वतः प्रगती पुस्तकं घरी घेऊन यायची आणि त्यावर लोक सह्या करायचे.आता मुलं मोठी होणे हा टप्पा फॉर्म साठीच्या रांगा, दर 3 महिन्याला टीचर बरोबर मीटिंग, आजी डे, आजोबा डे, बाबा डे,आई डे, स्पोर्ट डे,बस कमिटी शी भांडणं, दर अडीच महिन्यांनी परीक्षा असे अनेक उप टप्पे पार करत करत पुढे जातो.

आपण पाचवीत असताना 'दिवाली का चौथा दिन भाई ईज. उसको बहन भाईको आरती ओवालती है" असं दिवाळीच्या निबंधात लिहिल्याने हिंदी च्या बाईंनी वर्गात वाचून दाखवलेला निबंध, भाजीवाल्याशी रोज "पिशवी मत देना, वो छोटा छोटा गाव से आया हूवा गावरान टेढा मेढा ज्वारी देना, गोल गोल बडा बडा सुंदर दिखने वाला ज्वारी बिलकुल मत देना" असं किराणावाल्याला सांगणे, ऑफिसात लिफ्ट मध्ये येताना बिचकणार्या दोघांना "आ जाओ, आप लोग माव जाओगे" अशी हमी देणं या ज्ञानावर आपल्याला हिंदि ची चाळीस पानं उजळणी घ्यायची आहे हे वाचून उजाड मैदान, अथांग आकाश, आणि आकाशाकडे बघत माना फिरवत "का?का?का?का?" विचारणारा सचिन खेडेकर डोळ्यासमोर येतोच.

आपल्या वेळी कोण तो कमल नमन करायचा.अजय फणस बघायचा.आता 'किरन हिरन पकडता है'.(याचा बाप नक्कीच ते 42 किलोमीटर मॅराथॉन वाले महारथी असतात त्यातला असेल.) घोट्या पर्यंत असलेलं स्वच्छ पाणी आत आत जायला लागल्यावर खोल गाळाची दलदल बनावी तसं अ से अनार पासून पुढे 'इ की मात्रा,ई की मात्रा, उ की मात्रा,औ की मात्रा, ऋ के शब्द' येऊन भीती दाखवायला लागतात.चील म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देताना (काय बरं...पक्षी होता ना बहुतेक..की शिकार्याला म्हणतात..गुगल गुगल नवस करते वाट दाखव ) शेजारी बसलेलं "मॉम, चील म्हणजे चील ट्रे मधलं'" म्हटल्यावर आपल्याही मनात मागे "हम भी तेरे अधिक है कभी तू हम से आले मिल..जस्ट चील चील जस्ट चील.." गाणं चालू आहे असा शोध लागतो.त्याच्यापुढे बेल आली की लहानं "म्हणजे आपली डोअरबेल ना?" विचारतं.मग आपण "ते इंग्लिश, हिंदि मध्ये देवाला वाहायचा बेल" सांगतो.थोड्या वेळाने हिंदीत देवाला बेल वाहत नाहीत(नास्तिक कुठले!!!) आणि हा बेल म्हणजे आपला मराठीतला वेल आहे असा शोध लागतो."पुल म्हणजे स्विमिंग पुल ना?" असं विचारल्यावर "तो इंग्लिश पूल.हिंदी पुल म्हणजे ब्रिज.

हिंदी इंग्लिश वाले मेले एकाच पाणवठयावर पाणी भरायला येऊन एकमेकांची शब्दांची भांडीकुंडी उसनी का घेतात काय माहीत!!त्यात संस्कृत आजी कडून उसनी आणलेली जड भांडी वेगळीच. "तुम्ही जे वेलकम किंवा एंटरटेनमेंट वगैरे वात्रट मुव्हीज चवीने सारखे बघता त्यातली गाणी ऐकून जरा हिंदी शब्द शिका!!" म्हणून मनोरंजनात मल्टी टास्किंग केलं की सोसायटीत 15 ऑगस्ट ला कौतुकाने हातात माईक दिल्यावर हीच महान व्यक्तिमत्वे "इतनी जलदी कायको, तू बन जा मेरी बायको, शादी लंडन मे करेंगे हनिमून दुबई को" गाऊन आपल्याला शहिद करण्याचा धोका असतोच.

मुलांचा अभ्यास हा एक तर "असा सब्जेक्ट कुठे आहे मला?" या नवजात लेव्हल चा किंवा मग आजीला "आजी, तुला माहीत आहे का, आपली गॅलक्सी आणि शेजारची गॅलक्सी ची टक्कर होऊन सगळं डिस्ट्रॉय होणार आहे.त्याच्या आधी आपण केपलर2 नावाच्या गॅलक्सी वर राहायला जाऊ" असं सांगून हादरावायच्या युट्युबिय गुगलीय लेव्हल चा असतो.मधलं अधलं काही नाहीच!! "भैय्या नैय्या लाया" वाचून आपण त्या अगस्ती ऋषी बद्दल बोलत असतील समजावं तर कळतं की मूळ वाक्य भैय्या थैला लाया होतं आणि शेजारी पिशवी चं चित्र पण आहे!!! एक सारखा दिसणारा कोणताही शब्द कुठेही खुपसला आहे, चित्र बघणे, डोकं वापरणे वगैरे शी काही देणं घेणं नाही हे एक सूत्र कळलं की सगळं सोपं होतं.आता पुढे भैय्या नैय्या तैरा नीट वाचून आपल्या वर उपकार केले जातात.एकंदर हिंदी व्याकरण पुस्तिका लिहिणारा एका उसेन बोल्ट चा भाऊ आणि एखाद्या ऑलिम्पिक स्विमर चा मुलगा असावा!!नद्या काय पोहून जातात, हरणं काय पकडतात.आता पुढे ई की मात्रा मध्ये एखादा भैय्या दरिया तैरा आलं की मी सुखाने 4 फूट पाण्यात 1 आडवी लॅप मारून बाहेर यायला मोकळी.

त्यात आणि संस्कृत मधून आलेले शब्द घाबरवत असतात.कृपाण आणि कृषक आणि गृह ला हिंदीत क्रीपाण, क्रिषक आणि ग्रिह उच्चारायचं म्हणे.क्रीपाण चं चित्र छापणार्याने जरा माती खाल्ल्याने "ओह, क्रीपाण म्हणजे थ्रेड अँड निडल" ऐकून कृपाण खुपसून घेण्याची स्टेज मिस नाही करायची.

वाचणं आता चालू झाल्याने "बिझनेस" ला "बसिनेस" "बातो बातो मे " च्या सीडीला "बटन बटन मॅन" वाचणे, बजाज ला त्या लोगो मधल्या स्टॅयलिश अक्षरांमुळे बलाल वाचणे असे माफक अपघात होत राहतात.

मुलांशी इंग्लिश बोलत जा या सल्ल्याचा अवलंब करावा तर ती ते शाळेत कोळून पिऊन "ममा, नॉमेंडीक नाही न्यूमॅडीक म्हणायचं" वगैरे उपदेशामृत पाजतात.तरी बरं मला मॅलिंचोली आणि "रँडेझावस" हे शब्द बोलताना अजून ऐकले नाहीय आणि अजून ते कानावर गेलेले नाहीत."आजपासून मला ममा म्हणून ओळख दाखवू नको" म्हणून फतवा आलाच असता नाहीतर.

"दोन बोटाचं खरकटं धुवायला नळ चालू ठेवून पंचवीस शे लिटर पाणी वाया घालवू नकोस" म्हटलं की "पंचवीस म्हणजे इंग्लिश मध्ये किती" हा प्रश्न मख्ख पणे पाणी चालू ठेवून येतो.हिंदी चांगलं नाही म्हणावं तर चुकून "अपन ये करेंगे" म्हटलं की "तुला किती वेळा सांगायचं, अपन इज बॅड टपोरी लँग्वेज.यु शुड से हम ये करेंगे!" असा ज्ञानोपदेश आलाच.

एकदा या मुलांना अभ्यासात्मक दृष्टीने मेरे मेहबूब किंवा मुघले आझम वगैरे पिक्चर दाखवावे म्हणतेय!!येताय का बरोबर पोरे घेऊन?

अनुराधा कुलकर्णी