मी, ऋतू आणि कोटमंडळी
ऋतूंच्या बदलाची चाहूल कशामुळे लागते? आकाशात दाटलेले काळे ढग? पाचूचे दागिने घालून नटलेली झाडं घेऊन येणारा पावसाळा? की धुक्याची शाल लेऊन येणारा गुलाबी थंडीचा हिवाळा? संध्याकाळचा लालभडक सूर्य?की कुत्र्यासारखं ल्याहा ल्याहा करत सारखं पाणी प्यायला लावणारा रखरखीत पिवळा उन्हाळा? (| व्यत्यय | .इथे आमचा आलंकारिक शब्दांचा कोटा खल्लास, सामान्य शब्दांसह पुढे चालू!)
नाय बा! आम्हाला ऋतूबदलांची चाहूल लागते ती अशी:
१. फुटलेल्या जलवाहिनीत नाचणारी उघडी नागडी(लहान!) मुले वर्तमानपत्रात पहिल्या पानावरः उन्हाळा.(ही जलवाहिनीत भिजणारी पोरं मी गेली काही वर्षं पेपरात पाहतेय. कधी वाटतं हे पेपरवाले मुद्दाम जलवाहिनी फोडून सभोवतालच्या पोरांना त्यात नाचायला लावून फोटो पाडतात किंवा एकच जपून ठेवलेला फोटो दरवर्षी छापतात!)
२. पहिल्या पानावर रेनकोट घालून जाणारी तीन शाळकरी मुले: पावसाळा. (ही मुले बर्याचदा तीनच का असतात अशीही शंका येते..)
३. पहिल्या पानावर एखाद्या स्वेटरांच्या दुकानातली गर्दी: हिवाळा. (पेपरात 'पुणेकर थंडीने गारठले/तापमानाचा पारा ७ अंशावर' असा मथळा वाचला की मगच मला हुडहुडी भरून थंडी वाजते बुवा. त्याच्या आधी नाही.)
ऋतूबदलाबरोबर लगेच कपडेप्रकार बदलण्याचं अगत्य आणि महत्त्व पुण्यात आल्यावरच पटायला लागलं. दंडापर्यंतचे पांढरे हातमोजे, चादरीइतका लांबरुंद रुमाल कपाळावरून कानामागून गुंडाळून परत पुढे आणून नाकावरून गुंडाळून मागे नेऊन गाठ मारलेला, उघड्या राहिलेल्या डोळ्यांवर गॉगल, पायात बूटमोजे इतका सरंजाम असल्यावर उन्हाळ्याची काही बिशाद आहे का आत घुसण्याची? राजघराण्यातल्या स्त्रियांचं नखही आम जनतेच्या दृष्टीस पडू नये त्याप्रमाणे अशा नखशिखान्त झाकलेल्या आपल्याच बायकोला नवराही ओळखू शकत नाही. बर्याचदा यात कोपराऐवजी मनगटापर्यंतचे हातमोजे आणि वर सनकोट हा माफक बदल असतो. ढगळ पांढर्या रंगाचा आणि वर बहुतेकदा फुलं असलेला (ही फुलं तीन धुण्यात धूसर होतात.) 'सनकोट' या ऐटबाज नावाने विकला जाणारा हा डगला फक्त प्रवासातच घालण्याच्या लायकीचा असतो.जाड हातमोजे आधी घातल्यावर पिशवीतली दुचाकीची किल्ली पटकन हाताला न लागणं, चादर/रुमालाची सफाईदार गाठ न मारता येणं या प्रात्यक्षिक अडचणीमुळे आधी किल्ली काढा, मग रुमाल बांधा, मग हातमोजे घाला हा क्रम चोख पाळावा लागतोच. या गदारोळात शिरस्त्राण हा प्रकार असेल तर गोंधळाला आणखी चार चांद लागतात. दुचाक्यांच्या पोटात शिरस्त्राण न मावणे, शिरस्त्राणासाठीचे कुलूप बसवून घेतल्यास चोरांनी कुलूप कापून कुलपासह शिरस्त्राण पळवणे, रुमाल सोडण्यापुरते हे शिरस्त्राण गाडीवर टेकवल्यावर ते धप्पकन खाली पडून त्याला पोचा पडणे, शिरस्त्राण काढल्यावर घरुन प्रयत्नपूर्वक वळवून आणलेल्या केसांचं भजं झालेलं असणे,काचेवर पावसाचं पाणी ओघळल्यावर आसपासचा रस्ता पाणी पडलेल्या चित्रासारखा दिसणे, शिरस्त्राणाच्या आत रुमाल बांधल्यावर आसपासच्या गाड्यांचे भोंगे ऐकू न येणे या अनुभवातून बर्याच (आळशी) बायका 'हेल्मेट' पेक्षा 'हेल मेट' जास्त पसंत करतात. चादर उर्फ रुमाल मात्र खूप फायदेशीर पडतो. (प्रसंगी केस न विंचरता तसेच अस्ताव्यस्त रुमालात बांधून हपिसात वेणीफणी करता येते.) सिग्नलला परिणामांचा विचार न करता तोंड झाकून भरपूर भांडणं करता येतात. एखाद्या हेअरबॅन्डवाल्या नवतरुणाला बघून हसू आलं तरी ते रुमालामुळे कोणाला दिसत नाही. 'केस वाढवून कोणीही लुंगासुंगा स्वत:ला जॉन अब्राहम समजायला लागलाय!' असे शेरे मागे बसलेल्या नायिकेवर सिग्नल तोडून इंपो टाकणार्यावर मारता येतात.
हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्याच चुरगळलेल्या सदर्यावर स्वेटर चढवला होता. वातानुकूलन बंद आणि तरी मी स्वेटर काढत नाही हे पाहून समोर बसणार्या घाम पुसत असलेल्या प्रोग्रॅमर भैय्याने विचारलंच, 'यहां बर्फ गिर रही है क्या?तुमको ठंड लग रही है? ' अशा वेळी मी 'थोडा बुखार जैसा लग रहा है' वगैरे ठोकून देते. हपिसात न जाण्यासाठी 'आजारी' पडायला 'बुखार जैसा लगना' हा अत्युत्तम आजार आहे.
मला हवा तसा आखूडशिंगी बहुदुधी रेनकोट मात्र मला अजून गवसला नाही. दर पावसाळ्याला 'यावेळी एकदम सगळ्यांच्या थोबाडीत मारेल असा जबरा रेनकोट विकत घेऊ' म्हणत काहीतरी वेगळंच परिधान रेनकोट म्हणून वापरलं जातं. बाबांचा शेरलॉक होम्सच्या कोटासारखा दिसणारा रेनकोट एक वर्षं वापरला. तो घातला की मला एकदम लंडनला पोहचल्यासारखं वाटायचं. फक्त तोंडात एका पायपाची कमी. पण हा रेनकोट पायापर्यंत यायचा. आणि बाह्या दुमडाव्या लागायच्या. रेनकोट विकत घ्यायचा म्हटलं की आमच्या कल्पना 'चालबाज मधल्या श्रीदेवीच्या रेनकोटासारखाच रेनकोट' याखाली जायच्याच नाहीत. 'सुंदर,देखणा,दणकट,टिकाऊ,कमीत कमी किमतीचा,जास्त दुकानं न शोधता' असा सर्वगुणसंपन्न रेनकोट न मिळाल्याने गेली पाच वर्षे अस्मादिक घरातल्या इतर मंडळींचे जादा असलेले रेनकोट वापरत आले आहेत.
रेनकोटाचा उपयोग कितपत हाही एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे. जे गुडघ्यापर्यंत येणारे रेनकोट बाजारात मिळतात त्यांची सर्व बटणे लावून गाडीवर बसता येत नाही, लावल्यास कोट ताणला जातो, शेवटची दोन बटणे न लावता बसल्यास पाय उघडे राहून विजारी भिजतात. (या भिजण्यात निव्वळ पाणी नसून ज्या खड्ड्यातून दुचाकी जाते त्यातले गढूळ पाणी, पुढच्या गाड्या व शेजारच्या (स्वतःच्या प्यासिंजराला 'परदानशीन' करून शेजारच्या चालकावर उंच पाणी उडवणार्या) रिक्षांनी उडवलेला ठिपकेदार चिखल या द्रव्यांचा समावेश असतो.) यावर 'रेनकोट उलटा घालून त्याची मागे बटणे लावून गाडीवर बसणे' हा उपाय मी पहिल्यांदा पुण्यातच पाहिला. यावर उपाय म्हणून बर्याच स्त्रिया पुरुषी थाटाचा सदरा विजार वाला रेनकोट घेऊन आपल्या साड्या किंवा पंजाबी पोशाख सदरा व विजारीत कोंबतात. हाही प्रकार करून झाला. पण याने कपड्यांच्या इस्त्रीला बरीच इजा पोहचते असं दिसून आलं.
या सगळ्यातून मला रस्त्यावर काहीजणींचा पाहिलेला स्कर्ट टॉप रेनकोट हा उत्तम उपाय वाटला. जाऊन स्कर्ट टॉप वाला रेनकोट धडाक्यात घेऊन आले. आता हा माझा नवा नवा रेनकोट लोकांनी पाहावा म्हणून तरी मुसळधार पाऊस पडू दे असं मला वाटायला लागलं. पण अशा या स्कर्ट रेनकोटाच्या स्कर्टला चेन किंवा पूर्ण उघडायला बटणे असावी हा मुद्दा मात्र विसरला गेला होता.. भिजलेला रेनकोटाचा स्कर्ट काढताना त्यावर स्वतःच्याच बुटाचे ठसे उमटून तो आतून खराब होतो असं दिसलं आणि उत्साह जरा कमी झाला. त्यात सारखी काढघाल करून रेनकोटाचा स्कर्ट फाटला. दु:खी मनाने मी यावर्षी रेनकोट न घ्यायचं ठरवलं. पुढच्या वर्षी एकदम खलास भारीपैकी रेनकोट घेईन असा पण केला आहे.
नवरोबांनी त्यांचा जुन्या रेनकोटाची विजार फाटल्याने एक कामचलाऊ झूल(जो प्रकार घेतला तो इतका मोठा आहे की त्याला रेन'कोट' न म्हणता झूल, डगला, कफनी असं काहीतरी म्हणणं जास्त योग्य ठरेल.) विकत घेतली. 'तुझं ते माझं' या न्यायाने मी ती झूल वापरायला सुरुवात पण केली. भल्यामोठ्या प्लॅस्टिकच्या दोन बाजू एकमेकांना शिवून फक्त बाह्यांचा आणि डोक्याचा भाग न शिवता मोकळा ठेवून बनवलेला हा प्रकार एखाद्या चादरीसारखा अंगावरही पांघरता येतो इतका ऐसपैस आहे. त्यात दोन मी आणि दीड नवरा सहज बसतो.
ही झूल इतकी मोठी होती(आहे!) की ती घातल्यावर साडी सावरल्यासारखी झूल नीट सावरून दुचाकीवर बसावं लागे. लोकांच्या ओढण्या आणि पदर मागच्या चाकात अडकतात, माझा रेनकोट मागच्या चाकात अडकण्याचा धोका होता. शिवाय वारं प्यायल्यावर हा रेनकोट फुगून मी 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' मधल्या भोपळ्यासारखी आणि वारं प्यायलेलं नसताना पांढरे पंखवाल्या बॅटमॅन सारखी दिसत होते. शिवाय टोपी पण जरा ऐसपैस असल्याने 'रेनकोट के आड से...रस्तोंका..दिदार अधूरा...रहता है..... ' असं गाणं म्हणायची पाळी आली होती. टोपी आड आल्याने बाजूला पाहता न आल्याने दुर्वांकुर चौकाऐवजी हत्ती गणपती चौकात वळून बराच लांबचा वळसा घेऊन गंतव्य स्थानाकडे जाणं अशा काही माफक चुका नेहमीच्या होत्या. गलबताच्या शिडात भरलेल्या वार्याने गलबत एखाद्या दिशेला वळावं तसं आमचं वार्याने भरलेलं रेनकोटाचं शिड घेऊन स्कूटीरुपी गलबत एखाद्या चुकीच्या दिशेने वळण्याची शक्यताही कधीकधी संभवते. बर्याचदा जोराचा पाऊस पडून दुचाकी थांबवून रेनकोट नामक जंजाळात शिरावं आणि दुचाकी चालवायला लागावं तर एका फर्लांगावर लख्ख ऊन पडलेलं असतं. इतकं करुन मेलं जास्त पाऊस आला की कोणत्याही कोटाच्या गळ्यातून आत कपड्यांवर पाण्याची गळती होऊन भिजायचं ते भिजायचं. फक्त 'रेनकोट घालून/छत्री घेऊन भिजलो, नुसते नाही' हे आत्मिक समाधान तेवढं गाठीशी. (जे आत्मिक समाधान आलिशान चित्रपटगृहात वीस रुपये टिच्चून फोडणीच्या लाह्या खाण्यात असतं तेच हे. एरवी कोपर्यावरच्या दुकानात याच लाह्या आठदहा रुपयाला मिळतात. तुम्ही कधी आलिशान चित्रपटगृहात बसून घरुन आणलेल्या पोळ्या आणि गवारीची भाजी हळूच खाल्ली आहे का? मी खाल्ली आहे. '(आम्ही आतले पदार्थ सोन्याच्या भावाने विकले तरी)बाहेरचे खाद्यपदार्थ आत आणू नयेत' अशा चित्रपटगृहांवरच्या पाट्यांना आणि रखवालदाराला गंडवल्याचं आत्मिक समाधान मिळतं.)
पुढच्या वर्षी मी एखादा 'डिझायनर सर्व ऋतूत चालणारा' कोट घेणार आहे. कापड आणि आतून बटणं लावून प्लॅस्टिकचं अस्तर. उन्हाळ्यात अस्तर काढून नुसतं कापडवाला सनकोट, पावसाळ्यात अस्तर कापडाच्या वर लावून रेनकोट, आणि हिवाळ्यात प्लॅस्टिक आत लावून थंडीसंरक्षक स्वेटर! कसं? तुमच्या ओळखीचा आहे का कोणी 'रेनकोट डिझायनर'?
-समाप्त-
(अनुराधा कुलकर्णी)
23 comments:
कसलं धमाल लिहिता तुम्ही! गवारीची भाजी आणि पोळी... ऑफिसातले लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहताहेत मी एकटीच हसत असल्यामुळे.
आत्मिक समाधान, दीड नवरा, बुखारजैसा लगना, ऑफिसात वेणीफणी.... वाह्यात सुंदर. :))))))
मस्त. सगळे संदर्भ अगदी चपखल आहेत. मी माझ्या मित्राबरोबर दुचाकीवरून जाताना दर आठवड्याला एक-दोन ललनांना त्यांच्या ओढणीचा 'इजाजत' होण्यापासून वाचवत असू. :-)
far bhari !! tumche saglech lekh mast astat !!!
अनु, मंगला गोडबोले तुझा गालगुच्चा घेताना दिसल्या तर नवल नाही पोरी!! :)
while(1) {
LOL
}
ha. ha. pu. va. :D
surekh... mala ya vyatarikta shab nahi sapdat
धमालच रे....या पुढे कुठली ही झुल घातलेली मुलगी दिसली की मी हळुच आवाज देऊन बघणार ;)
किती ऋतूंच्या नंतर आपण नविन पोष्ट लिहीलीत ?
khup sundar lekh aahe .
apratim lekh.!
paNyatla hand-ball foto sollid! mala pan asa ek foto kadhaychay.
HI ,
Increase your revenue 100% of your blog bye converting into free website.
Convert your blog "yourname.blogspot.com" to www.yourname.com completely free.
Become proud owner of the (.com) own site .
we provide you free website+ free web hosting + list of your choice of
scripts like(blog scripts,CMS scripts, forums scripts and may scripts)
all the above services are absolutely free.
You can also start earning money from your blog by referring your friends.
Please visit www.hyperwebenable.com for more info.
regards
www.hyperwebenable.com
Your blog rates among the best ones I've come across. Have read a lot of blogs - philosophy, poetry, current matters what not is there, but quality humor is the most difficult to find. So very few seem to have the ability.
I am a Sherlock Holmes fan. Most of the Holmes stories have already been translated into Marathi by Bh. Ra. Bhagwat and Bhalba Kelkar. I know it would be hard to keep hands off Holmes and Dr. Watson, but would love to read more of your own writings.
खी खी खी ..!!
फारंच मस्त लिहिलय... लय आवडलं
चांगला रेनकोट घेण्यासाठी ३ वेळा रमेश डाइंग ला जाउन तिथल्या गर्दीला घाबरून परत आलोय ..!!
मी पुण्यातल्या सगळ्याच गाडीवान स्त्री-वर्गाला टरकून असतो पण एवढी सगळी अवधानं सांभाळायची म्हणजे गाडीकडे लक्ष कमीचं असणार हे कोडं Blog वाचून चटकन सुटलं :))
असो ..!!
लेख अतिशय छान होता... मनापासून आवडला!!
baryach mahinyaat navin kahi lihile nahis.. kahitari yevun de ata. :)
Really Nice Blog!!
http://mimarathicha.blogspot.com
Where have you disappeared? When is the new post coming?
प्रिय ब्लोगर ,
तुझा मराठी ब्लोग वाचुन खुप छान वाटलं..
खुप उत्तम प्रतीच लिखण तु तुझ्या ब्लोग मध्ये केलं आहेस..
परंतू हे लिखाण जस्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणही महत्वाच आहे..
त्याबद्दल मी थोड माझ्या ब्लोग मध्ये लिहिल आहे..
त्याची तुला नक्कीच मदत होइल..
चल..पुन्हा भेटुच ब्लोग मधून..
मझ्या ब्लोग वर नक्की ये..
http://pune-marathi-blog.blogspot.com/
नविन काहीच लिहायच नाही असा निश्चय वैगरे केला आहेत काय ?
आपल्या गैरहाजीरीने मराठी्ब्लॉगविश्वाची फार मो्ठी हानी झाली आहे
मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!
दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!
आपला,
अनिरुद्ध देवधर
मस्त!!
नवीन कधी लिहींणार.
१ नंबर आहे.
देव करो अन तुम्ही अशाच लिहीत राहोत.
Ekdum zakkas... baryach divsanantar asa kahi vachayla miLala...
Post a Comment