या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Showing posts with label pune. Show all posts
Showing posts with label pune. Show all posts

Friday, 29 February 2008

मी, ऋतू आणि कोटमंडळी


ऋतूंच्या बदलाची चाहूल कशामुळे लागते? आकाशात दाटलेले काळे ढग? पाचूचे दागिने घालून नटलेली झाडं घेऊन येणारा पावसाळा? की धुक्याची शाल लेऊन येणारा गुलाबी थंडीचा हिवाळा? संध्याकाळचा लालभडक सूर्य?की कुत्र्यासारखं ल्याहा ल्याहा करत सारखं पाणी प्यायला लावणारा रखरखीत पिवळा उन्हाळा? (| व्यत्यय | .इथे आमचा आलंकारिक शब्दांचा कोटा खल्लास, सामान्य शब्दांसह पुढे चालू!)
नाय बा! आम्हाला ऋतूबदलांची चाहूल लागते ती अशी:
१. फुटलेल्या जलवाहिनीत नाचणारी उघडी नागडी(लहान!) मुले वर्तमानपत्रात पहिल्या पानावरः उन्हाळा.(ही जलवाहिनीत भिजणारी पोरं मी गेली काही वर्षं पेपरात पाहतेय. कधी वाटतं हे पेपरवाले मुद्दाम जलवाहिनी फोडून सभोवतालच्या पोरांना त्यात नाचायला लावून फोटो पाडतात किंवा एकच जपून ठेवलेला फोटो दरवर्षी छापतात!)
२. पहिल्या पानावर रेनकोट घालून जाणारी तीन शाळकरी मुले: पावसाळा. (ही मुले बर्‍याचदा तीनच का असतात अशीही शंका येते..)
३. पहिल्या पानावर एखाद्या स्वेटरांच्या दुकानातली गर्दी: हिवाळा. (पेपरात 'पुणेकर थंडीने गारठले/तापमानाचा पारा ७ अंशावर' असा मथळा वाचला की मगच मला हुडहुडी भरून थंडी वाजते बुवा. त्याच्या आधी नाही.)


ऋतूबदलाबरोबर लगेच कपडेप्रकार बदलण्याचं अगत्य आणि महत्त्व पुण्यात आल्यावरच पटायला लागलं. दंडापर्यंतचे पांढरे हातमोजे, चादरीइतका लांबरुंद रुमाल कपाळावरून कानामागून गुंडाळून परत पुढे आणून नाकावरून गुंडाळून मागे नेऊन गाठ मारलेला, उघड्या राहिलेल्या डोळ्यांवर गॉगल, पायात बूटमोजे इतका सरंजाम असल्यावर उन्हाळ्याची काही बिशाद आहे का आत घुसण्याची? राजघराण्यातल्या स्त्रियांचं नखही आम जनतेच्या दृष्टीस पडू नये त्याप्रमाणे अशा नखशिखान्त झाकलेल्या आपल्याच बायकोला नवराही ओळखू शकत नाही. बर्‍याचदा यात कोपराऐवजी मनगटापर्यंतचे हातमोजे आणि वर सनकोट हा माफक बदल असतो. ढगळ पांढर्‍या रंगाचा आणि वर बहुतेकदा फुलं असलेला (ही फुलं तीन धुण्यात धूसर होतात.) 'सनकोट' या ऐटबाज नावाने विकला जाणारा हा डगला फक्त प्रवासातच घालण्याच्या लायकीचा असतो.जाड हातमोजे आधी घातल्यावर पिशवीतली दुचाकीची किल्ली पटकन हाताला न लागणं, चादर/रुमालाची सफाईदार गाठ न मारता येणं या प्रात्यक्षिक अडचणीमुळे आधी किल्ली काढा, मग रुमाल बांधा, मग हातमोजे घाला हा क्रम चोख पाळावा लागतोच. या गदारोळात शिरस्त्राण हा प्रकार असेल तर गोंधळाला आणखी चार चांद लागतात. दुचाक्यांच्या पोटात शिरस्त्राण न मावणे, शिरस्त्राणासाठीचे कुलूप बसवून घेतल्यास चोरांनी कुलूप कापून कुलपासह शिरस्त्राण पळवणे, रुमाल सोडण्यापुरते हे शिरस्त्राण गाडीवर टेकवल्यावर ते धप्पकन खाली पडून त्याला पोचा पडणे, शिरस्त्राण काढल्यावर घरुन प्रयत्नपूर्वक वळवून आणलेल्या केसांचं भजं झालेलं असणे,काचेवर पावसाचं पाणी ओघळल्यावर आसपासचा रस्ता पाणी पडलेल्या चित्रासारखा दिसणे, शिरस्त्राणाच्या आत रुमाल बांधल्यावर आसपासच्या गाड्यांचे भोंगे ऐकू न येणे या अनुभवातून बर्‍याच (आळशी) बायका 'हेल्मेट' पेक्षा 'हेल मेट' जास्त पसंत करतात. चादर उर्फ रुमाल मात्र खूप फायदेशीर पडतो. (प्रसंगी केस न विंचरता तसेच अस्ताव्यस्त रुमालात बांधून हपिसात वेणीफणी करता येते.) सिग्नलला परिणामांचा विचार न करता तोंड झाकून भरपूर भांडणं करता येतात. एखाद्या हेअरबॅन्डवाल्या नवतरुणाला बघून हसू आलं तरी ते रुमालामुळे कोणाला दिसत नाही. 'केस वाढवून कोणीही लुंगासुंगा स्वत:ला जॉन अब्राहम समजायला लागलाय!' असे शेरे मागे बसलेल्या नायिकेवर सिग्नल तोडून इंपो टाकणार्‍यावर मारता येतात.

हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्‍याच चुरगळलेल्या सदर्‍यावर स्वेटर चढवला होता. वातानुकूलन बंद आणि तरी मी स्वेटर काढत नाही हे पाहून समोर बसणार्‍या घाम पुसत असलेल्या प्रोग्रॅमर भैय्याने विचारलंच, 'यहां बर्फ गिर रही है क्या?तुमको ठंड लग रही है? ' अशा वेळी मी 'थोडा बुखार जैसा लग रहा है' वगैरे ठोकून देते. हपिसात न जाण्यासाठी 'आजारी' पडायला 'बुखार जैसा लगना' हा अत्युत्तम आजार आहे.

मला हवा तसा आखूडशिंगी बहुदुधी रेनकोट मात्र मला अजून गवसला नाही. दर पावसाळ्याला 'यावेळी एकदम सगळ्यांच्या थोबाडीत मारेल असा जबरा रेनकोट विकत घेऊ' म्हणत काहीतरी वेगळंच परिधान रेनकोट म्हणून वापरलं जातं. बाबांचा शेरलॉक होम्सच्या कोटासारखा दिसणारा रेनकोट एक वर्षं वापरला. तो घातला की मला एकदम लंडनला पोहचल्यासारखं वाटायचं. फक्त तोंडात एका पायपाची कमी. पण हा रेनकोट पायापर्यंत यायचा. आणि बाह्या दुमडाव्या लागायच्या. रेनकोट विकत घ्यायचा म्हटलं की आमच्या कल्पना 'चालबाज मधल्या श्रीदेवीच्या रेनकोटासारखाच रेनकोट' याखाली जायच्याच नाहीत. 'सुंदर,देखणा,दणकट,टिकाऊ,कमीत कमी किमतीचा,जास्त दुकानं न शोधता' असा सर्वगुणसंपन्न रेनकोट न मिळाल्याने गेली पाच वर्षे अस्मादिक घरातल्या इतर मंडळींचे जादा असलेले रेनकोट वापरत आले आहेत.


रेनकोटाचा उपयोग कितपत हाही एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे. जे गुडघ्यापर्यंत येणारे रेनकोट बाजारात मिळतात त्यांची सर्व बटणे लावून गाडीवर बसता येत नाही, लावल्यास कोट ताणला जातो, शेवटची दोन बटणे न लावता बसल्यास पाय उघडे राहून विजारी भिजतात. (या भिजण्यात निव्वळ पाणी नसून ज्या खड्ड्यातून दुचाकी जाते त्यातले गढूळ पाणी, पुढच्या गाड्या व शेजारच्या (स्वतःच्या प्यासिंजराला 'परदानशीन' करून शेजारच्या चालकावर उंच पाणी उडवणार्‍या) रिक्षांनी उडवलेला ठिपकेदार चिखल या द्रव्यांचा समावेश असतो.) यावर 'रेनकोट उलटा घालून त्याची मागे बटणे लावून गाडीवर बसणे' हा उपाय मी पहिल्यांदा पुण्यातच पाहिला. यावर उपाय म्हणून बर्‍याच स्त्रिया पुरुषी थाटाचा सदरा विजार वाला रेनकोट घेऊन आपल्या साड्या किंवा पंजाबी पोशाख सदरा व विजारीत कोंबतात. हाही प्रकार करून झाला. पण याने कपड्यांच्या इस्त्रीला बरीच इजा पोहचते असं दिसून आलं.

या सगळ्यातून मला रस्त्यावर काहीजणींचा पाहिलेला स्कर्ट टॉप रेनकोट हा उत्तम उपाय वाटला. जाऊन स्कर्ट टॉप वाला रेनकोट धडाक्यात घेऊन आले. आता हा माझा नवा नवा रेनकोट लोकांनी पाहावा म्हणून तरी मुसळधार पाऊस पडू दे असं मला वाटायला लागलं. पण अशा या स्कर्ट रेनकोटाच्या स्कर्टला चेन किंवा पूर्ण उघडायला बटणे असावी हा मुद्दा मात्र विसरला गेला होता.. भिजलेला रेनकोटाचा स्कर्ट काढताना त्यावर स्वतःच्याच बुटाचे ठसे उमटून तो आतून खराब होतो असं दिसलं आणि उत्साह जरा कमी झाला. त्यात सारखी काढघाल करून रेनकोटाचा स्कर्ट फाटला. दु:खी मनाने मी यावर्षी रेनकोट न घ्यायचं ठरवलं. पुढच्या वर्षी एकदम खलास भारीपैकी रेनकोट घेईन असा पण केला आहे.

नवरोबांनी त्यांचा जुन्या रेनकोटाची विजार फाटल्याने एक कामचलाऊ झूल(जो प्रकार घेतला तो इतका मोठा आहे की त्याला रेन'कोट' न म्हणता झूल, डगला, कफनी असं काहीतरी म्हणणं जास्त योग्य ठरेल.) विकत घेतली. 'तुझं ते माझं' या न्यायाने मी ती झूल वापरायला सुरुवात पण केली. भल्यामोठ्या प्लॅस्टिकच्या दोन बाजू एकमेकांना शिवून फक्त बाह्यांचा आणि डोक्याचा भाग न शिवता मोकळा ठेवून बनवलेला हा प्रकार एखाद्या चादरीसारखा अंगावरही पांघरता येतो इतका ऐसपैस आहे. त्यात दोन मी आणि दीड नवरा सहज बसतो.

ही झूल इतकी मोठी होती(आहे!) की ती घातल्यावर साडी सावरल्यासारखी झूल नीट सावरून दुचाकीवर बसावं लागे. लोकांच्या ओढण्या आणि पदर मागच्या चाकात अडकतात, माझा रेनकोट मागच्या चाकात अडकण्याचा धोका होता. शिवाय वारं प्यायल्यावर हा रेनकोट फुगून मी 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' मधल्या भोपळ्यासारखी आणि वारं प्यायलेलं नसताना पांढरे पंखवाल्या बॅटमॅन सारखी दिसत होते. शिवाय टोपी पण जरा ऐसपैस असल्याने 'रेनकोट के आड से...रस्तोंका..दिदार अधूरा...रहता है..... ' असं गाणं म्हणायची पाळी आली होती. टोपी आड आल्याने बाजूला पाहता न आल्याने दुर्वांकुर चौकाऐवजी हत्ती गणपती चौकात वळून बराच लांबचा वळसा घेऊन गंतव्य स्थानाकडे जाणं अशा काही माफक चुका नेहमीच्या होत्या. गलबताच्या शिडात भरलेल्या वार्‍याने गलबत एखाद्या दिशेला वळावं तसं आमचं वार्‍याने भरलेलं रेनकोटाचं शिड घेऊन स्कूटीरुपी गलबत एखाद्या चुकीच्या दिशेने वळण्याची शक्यताही कधीकधी संभवते. बर्‍याचदा जोराचा पाऊस पडून दुचाकी थांबवून रेनकोट नामक जंजाळात शिरावं आणि दुचाकी चालवायला लागावं तर एका फर्लांगावर लख्ख ऊन पडलेलं असतं. इतकं करुन मेलं जास्त पाऊस आला की कोणत्याही कोटाच्या गळ्यातून आत कपड्यांवर पाण्याची गळती होऊन भिजायचं ते भिजायचं. फक्त 'रेनकोट घालून/छत्री घेऊन भिजलो, नुसते नाही' हे आत्मिक समाधान तेवढं गाठीशी. (जे आत्मिक समाधान आलिशान चित्रपटगृहात वीस रुपये टिच्चून फोडणीच्या लाह्या खाण्यात असतं तेच हे. एरवी कोपर्‍यावरच्या दुकानात याच लाह्या आठदहा रुपयाला मिळतात. तुम्ही कधी आलिशान चित्रपटगृहात बसून घरुन आणलेल्या पोळ्या आणि गवारीची भाजी हळूच खाल्ली आहे का? मी खाल्ली आहे. '(आम्ही आतले पदार्थ सोन्याच्या भावाने विकले तरी)बाहेरचे खाद्यपदार्थ आत आणू नयेत' अशा चित्रपटगृहांवरच्या पाट्यांना आणि रखवालदाराला गंडवल्याचं आत्मिक समाधान मिळतं.)

पुढच्या वर्षी मी एखादा 'डिझायनर सर्व ऋतूत चालणारा' कोट घेणार आहे. कापड आणि आतून बटणं लावून प्लॅस्टिकचं अस्तर. उन्हाळ्यात अस्तर काढून नुसतं कापडवाला सनकोट, पावसाळ्यात अस्तर कापडाच्या वर लावून रेनकोट, आणि हिवाळ्यात प्लॅस्टिक आत लावून थंडीसंरक्षक स्वेटर! कसं? तुमच्या ओळखीचा आहे का कोणी 'रेनकोट डिझायनर'?

-समाप्त-
(अनुराधा कुलकर्णी)

Thursday, 8 March 2007

(रोज २)थरारक प्रवास

"चिर्रर्र ऽऽ!!! बाजूऽऽ!!" 'आपल्याच बापाचा रस्ता. वाहने येत असली म्हणून काय? थांबतील मी जाईपर्यंत. ' म्हणून आरामात रस्ता ओलांडणारा एक माणूस. विद्युतघट संपल्यामुळे घसा बसलेल्या दमेकऱ्यासारखा कष्टाने वाजणारा अनुच्या दुचाकीचा भोंगा. कानात कुजबुजल्यासारखा हळूच 'चिर्र ऽऽ' किंवा 'पिर्र ऽऽ' आवाज करणारा हा भोंगा ऐकू जाणार कोणाला? म्हणून लगेच 'बाजू ऽऽ' हा मानवी भोंगा पण अनुने वाजवला आणि दुचाकीचा गतिरोधक करकचून दाबला. महान माणूस विजयी हास्य करत मंदगतीने रस्ता ओलांडून गेला. "xxxxxx!! तुझ्या बापाचा रस्ता काय रे नालायका?" अनुने मनातल्या मनात जोरात एक शिवी देऊन घेतली आणि दुचाकीचा गतिवर्धक पिळला.

रोज संध्याकाळी तोच रस्ता. तीच तुंबलेली रहदारी. 'जीवाची काळजी घ्यायला तो खुदा बसलेला आहेच. हाणा बिनधास्त वेडीवाकडी गाडी.' या महान विचारसरणीचे पुणेरी दुचाकी, त्रिचाकी आणि चौचाकीकर...पाऊस बदाबदा कोसळतोय. रस्त्यावर 'वॉटर पार्क' मधल्या पाण्याच्या घसरगुंडीसारखे घोटाभर पाणी. 'दुचाकीला सर्दी होऊन तिने भर रहदारीत संप पुकारला तर' या विचाराने टरकीफाय झालेली अनु. तितक्यात वाहतूक दिवा लाल झाला आणि रहदारी थांबली. दिवा लाल झाला तरी 'वाहतूकमामा कुठे दिसत नाहीयेत. जाऊ पटकन' म्हणून एक बाईकस्वार सुर्रकन पुढे पसार होतो. बाकी थांबलेले दुचाकीस्वार द्विधा. 'उगाच थांबलो ईमानदारीत. गेलो असतो पटकन.'

वाहतूकदिवा लाल असताना १-२ मिनीटात मासिके विकणारा पोऱ्या धावत आला. 'कसं चालत असेल बाई बिचाऱ्याचं..किती कठिण इतक्या कमी वेळात विकणं. आणि एखादा पैसे न देता पुढे गेला तर. घेऊन टाकावं का एखादं 'भारत आज'' असे कनवाळू विचार अनुच्या मनात यायला लागले. पोऱ्याने 'हिच्याकडे आंग्ल मासिक विकत घेऊन वाचण्याइतके पैसे असतील का' हा मूक अंदाज घेतला आणि तो पळत शेजारच्या 'होंडा शहर' वाल्यापाशी जाऊन मासिके फडकाऊ लागला.

लाल दिवा हिरवा व्हायला २० सेकंद.. मागच्या सर्व गाड्यांचे भोंगे वाजू लागतात आणि १५ सेकंद अजून उरली असूनही पुढच्या रांगेतले स्वार भरधाव सुटतात. एकाच दुचाकीवर स्वार ३ चहासदरे आणि उलट्या टोप्याधारी तरुण भोंगा वाजवत नागमोडी रस्ता काढत पुढे जातात. 'बिनदास आगे जानेका भिडू. जादा सोचनेका नही. रुल्स तो बेवकूफ लोग फॉलो करते है!! ऐसा झेंडू के माफिक रुलसे गाडी चलायेगा तो पार्टीमे लेट हो जायेगा!!' मागचा तरुण पुढच्या टोपीधारी सारथ्याला सांगत होता. 'आपली महागडी गाडी आणि मुलगा जोरात गाडी हाणतो म्हणून आईबापाच्या जीवाला लागलेला घोर याची या मुलांना कधीच काळजी नसेल? किती दिवस चुका करुन वाचणार? एक अपघात एक दिवस सगळ्याची वाट लावेल.' अनुचे पोक्त विचार.

डावीकडे वळायचं आहे, पण इतक्या गर्दीतून बाजू बदलणार कधी? दुचाकीला आरसे नाहीत. नुसता वळणदर्शक दिवा मिचकावत वळावे तर मागचे सर्व चालक समजूतदार असतीलच असं पण नाही. म्हणून अनु चांगली २ वळणं आधीपासूनच डाव्या बाजूला येते. पण आधीच्या २ वळणांवर वळणाऱ्याना अनुची ही दूरदृष्टी मंजूर नाही.. 'वळायचं नाही तर साईड ब्लॉक का करता' म्हणून तणतणून एक काका टक्कर टाळून वळतात.

घर जवळ येत आहे. आता बस ४ किमी आणि २ वळणं. अनुचा वेग नकळत वाढतो. तितक्यात दुचाकी 'माझं पोट रिकामं होतंय, मी बंद पडणार' म्हणून इशारा देते. आता आली का पंचाईत. रस्त्याच्या मधून बाजूला अचानक जावं लागणार. अनु हात वर करुन मागच्यांना इशारा देऊ पाहते. (तो इशारा अनु सोडून कोणालाच समजत नाही.) हळूहळू अनु दुचाकी बाजूला घेते. आसपासचे स्वार 'काय चक्रम बाई आहे' म्हणून पुढे जातात..आता दुचाकी तिच्या पक्क्या पायांवर लावून लाथ मारायच्या दांड्याला लाथा मारुन अनु दुचाकीला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करते. शेवटचा रामबाण उपाय!! बजाजच्या दुचाकीप्रमाणे तिला कलती करणे. (असं केल्याने नक्की काय होतं हो?) रामबाण उपाय लागू पडतो आणि दुचाकी सुरु होते.
आता ते आडबाजूचं वळण. समोरुन गाड्या सुसाट वेगाने.. वळण लवकर दिसतच नाही. पण हा बिकटमार्ग पत्करुन १ किमी इंधनबचत होते. अनुसारखाच विचार करणाऱ्या २ दुचाकीस्वार काकू वळायला लागतात. समोरुन वेगाने जाणाऱ्या तरुणाला त्या मानेने 'आम्ही आधी जाणार' खुणावतात. तरुण त्या खुणेचा 'तू जा आम्ही थांबतो' असा सोयीस्कर अर्थ काढतो. आणि मग.. एक टक्कर. तरुणाच्या गाडीचा दिवा आणि काकूंच्या गाडीचे कंबरडे धारातिर्थी पडते आणि एक सुंदर भांडण सुरु होते. पण अनुला ते बघायला वेळ नाही. भांडणामुळे मोकळ्या झालेल्या रस्त्यावर तिला वळायचे आहे.

आता शेवटचं बिबवेवाडी वळण. भाजी घेणाऱ्या बायका, आईचा हात धरुन फिरायला निघालेली देवाघरची फुले, संध्याकाळचा फेरफटका करणारी आजोबामंडळी,मैत्रिणींबरोबर फिरणारी प्रेक्षणीय स्थळं, गाड्या उभ्या करुन मित्रांबरोबर पक्षीनिरीक्षणार्थ थांबलेली तरुण मंडळी यातून आट्यापाट्या खेळत अनु घरी येते.
'युद्धभूमीवर लढणारे सैनिक धोक्यात खरे, पण आपण रोज दोनदा रहदारीत दुचाकी चालवून आपला जीव कितपत सुरक्षित आहे? जीवन नश्वर आहे. आत्मा अमर आहे. आणि पुण्याचे वाहनचालकच आपल्या जीवनाचे कर्तेधर्ते परमेश्वर आहेत.' हा विरक्त विचार करुन अनु भाज्या चिरायला घेते....

(वि‌. सू. पुणेरी वाचकांना यात अतिशयोक्ती वाटल्यास हलकेच घ्यावे. आणि हा लेख केवळ निखळ विनोदार्थ लिहीला आहे. कोणालाही दुखावण्याचा हेतू मुळीच नाही.)
-अनुराधा कुलकर्णी

Friday, 2 March 2007

रस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास

नाववर्णनसंभाव्य धोके
उलटा गतिरोधकआपला नेहमीचा गतिरोधक असतो ना, त्याला (घट्ट सदरा उलटा करुन काढतो तसे) उलटा केल्यावर हा अंतर्वक्र खड्डा तयार होतो.गतिरोधकावर कधीकधी(म्हणजे मंत्रीमहाशयांचा दौरा होण्याच्या आदल्या दिवशी)चांगले रंगवलेले पट्टे असतात आणि ते दुरुन दिसतातही. पण अंतर्वक्र गतिरोधकावर झेब्रा पट्टे काढणार कसे? 'हा झेंडू मनुष्य इतका सावकाश का जातोय' म्हणून आपण भरवेगात त्याला मागे टाकावे आणि पुढे असलेल्या अंतर्वक्र गतिरोधकाने मणक्यापर्यंत हादरा द्यावा..(पुढचा मनुष्य मूर्ख म्हणून सावकाश जात नव्हता!!) त्यात मनपाने हा गतिरोधक सपाट करण्याच्या दृष्टीने त्यात दगडे अथवा वाळू भरली असली तर दुधात साखर!!खड्डा,खड्ड्यात गेल्यावर त्यातल्या भरावावरुन घसरणे आणि अणकुचीदार दगडांनी दुचाकीच्या रबरचक्राला गुदगुल्या करणे हे रोमांचक अनुभव एकत्र घ्या.
टेंगूळाच्या प्रेमात पडलेला खड्डाक्लियरेसीलच्या जाहिरातीत दाखवतात तसा टेण्या मुरुम(पिंपल हो!) रस्त्याच्या त्वचेवर. आणि या मुरुमाच्या प्रेमात पडून 'मी तुझ्या शेजारी तुला चिकटून बसणार' या हट्टाने खेटलेला खड्डा.नृत्य करणारी रमणी कमरेत लवावी तसा आपल्या पुढचा सारथी अचानक दुचाकी कमरेत लववून हा खड्डा टाळतो. आणि बावरलेले आपण या सारथ्याला (आणि संभाव्य भांडणाला) टाळण्यासाठी करकचून दुचाकीचा गतिअवरोधक दाबतो. 'पुढच्या टेंगळावरुन दुचाकी चढत नाहीये' हा अनुभव घेऊन आपण गति वाढवतो आणि अलगद पुढच्या खड्ड्यात जाऊन पोटातले पाणी आणि आतडी हलल्याचा अनुभव घेतो..
विवर'रस्त्यावर एखादी छोटी उल्का पडली असावी का' अशी शंका निर्माण करणारा गोल आणि खोल खड्डा. या खड्ड्याला सामोरे जाण्याचा एकच उपायः गति कमीतकमी ठेऊन निधड्या छातीने खड्ड्यात जाणे व खड्ड्याच्या अंताला आल्यावर गति वाढवून त्यातून बाहेर येणे.पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यावर हा प्रयोग करु नये. विवर हे अर्ध्या चाकाच्या उंचीइतके असेल किंवा दूरध्वनीच्या कामासाठी खोदलेला महाखड्डाही असेल. (सावधान!पुढे खड्डा आहे! ची पाटी आपण पडल्यानंतर पाण्यात पडलेली पाहून उपयोग नाही.)
पराग खड्डाखड्डे मे खड्डा, पराग खड्डा! मोठ्या व्यासाच्या खड्ड्यात असलेला लहानसा खड्डा.खड्ड्यात पण जायचे, खड्ड्यात गेल्यावर परत लहान खड्डा टाळण्यासाठी हातपाय पण हलवायचे,(हातपाय म्हणजे दुचाकीचे हो! आपले हातपाय हलवून काय उपयोग?) म्हणजे जरा मंद डोक्याला जास्तच ताण झाला. अर्थात दुचाकी दुसऱ्याची असल्यास किंवा दुचाकीचा विमा उतरवला असल्यास घाला बेधडक हर हर महादेव!! म्हणून खड्ड्यात!!
-अनुराधा कुलकर्णी