या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

समस्त वाचक/लेखक/कवी/मित्रमैत्रिणी/परीचित/कुटुंबीय/प्रियजन/शत्रू यांस आंग्ल नववर्ष २००८ च्या शुभेच्छा !!

(प्रिय वाचकहो, आपणास ही नम्र विनंती की आपणास या अनुदिनीवरील एखादे लिखाण आवडल्यास अनुदिनीचा पत्ता इतरांना द्यावा /लिखाणांची पी डी एफ पाने उतरवून घेऊन ती पाठवावी/प्रत्येक लेखाखालील पत्राच्या चिन्हावर क्लिक करुन दुवा ईपत्राने पाठवण्याच्या सुविधेचा वापर करावा.मूळ लिखाणकर्त्याचे नाव उडवून लिखाण इमेलद्वारे फॉरवर्ड करणे/वाटणे शक्यतो टाळा.)
धन्यवाद.

Friday, 29 February 2008

मी, ऋतू आणि कोटमंडळी


ऋतूंच्या बदलाची चाहूल कशामुळे लागते? आकाशात दाटलेले काळे ढग? पाचूचे दागिने घालून नटलेली झाडं घेऊन येणारा पावसाळा? की धुक्याची शाल लेऊन येणारा गुलाबी थंडीचा हिवाळा? संध्याकाळचा लालभडक सूर्य?की कुत्र्यासारखं ल्याहा ल्याहा करत सारखं पाणी प्यायला लावणारा रखरखीत पिवळा उन्हाळा? (| व्यत्यय | .इथे आमचा आलंकारिक शब्दांचा कोटा खल्लास, सामान्य शब्दांसह पुढे चालू!)
नाय बा! आम्हाला ऋतूबदलांची चाहूल लागते ती अशी:
१. फुटलेल्या जलवाहिनीत नाचणारी उघडी नागडी(लहान!) मुले वर्तमानपत्रात पहिल्या पानावरः उन्हाळा.(ही जलवाहिनीत भिजणारी पोरं मी गेली काही वर्षं पेपरात पाहतेय. कधी वाटतं हे पेपरवाले मुद्दाम जलवाहिनी फोडून सभोवतालच्या पोरांना त्यात नाचायला लावून फोटो पाडतात किंवा एकच जपून ठेवलेला फोटो दरवर्षी छापतात!)
२. पहिल्या पानावर रेनकोट घालून जाणारी तीन शाळकरी मुले: पावसाळा. (ही मुले बर्‍याचदा तीनच का असतात अशीही शंका येते..)
३. पहिल्या पानावर एखाद्या स्वेटरांच्या दुकानातली गर्दी: हिवाळा. (पेपरात 'पुणेकर थंडीने गारठले/तापमानाचा पारा ७ अंशावर' असा मथळा वाचला की मगच मला हुडहुडी भरून थंडी वाजते बुवा. त्याच्या आधी नाही.)


ऋतूबदलाबरोबर लगेच कपडेप्रकार बदलण्याचं अगत्य आणि महत्त्व पुण्यात आल्यावरच पटायला लागलं. दंडापर्यंतचे पांढरे हातमोजे, चादरीइतका लांबरुंद रुमाल कपाळावरून कानामागून गुंडाळून परत पुढे आणून नाकावरून गुंडाळून मागे नेऊन गाठ मारलेला, उघड्या राहिलेल्या डोळ्यांवर गॉगल, पायात बूटमोजे इतका सरंजाम असल्यावर उन्हाळ्याची काही बिशाद आहे का आत घुसण्याची? राजघराण्यातल्या स्त्रियांचं नखही आम जनतेच्या दृष्टीस पडू नये त्याप्रमाणे अशा नखशिखान्त झाकलेल्या आपल्याच बायकोला नवराही ओळखू शकत नाही. बर्‍याचदा यात कोपराऐवजी मनगटापर्यंतचे हातमोजे आणि वर सनकोट हा माफक बदल असतो. ढगळ पांढर्‍या रंगाचा आणि वर बहुतेकदा फुलं असलेला (ही फुलं तीन धुण्यात धूसर होतात.) 'सनकोट' या ऐटबाज नावाने विकला जाणारा हा डगला फक्त प्रवासातच घालण्याच्या लायकीचा असतो.जाड हातमोजे आधी घातल्यावर पिशवीतली दुचाकीची किल्ली पटकन हाताला न लागणं, चादर/रुमालाची सफाईदार गाठ न मारता येणं या प्रात्यक्षिक अडचणीमुळे आधी किल्ली काढा, मग रुमाल बांधा, मग हातमोजे घाला हा क्रम चोख पाळावा लागतोच. या गदारोळात शिरस्त्राण हा प्रकार असेल तर गोंधळाला आणखी चार चांद लागतात. दुचाक्यांच्या पोटात शिरस्त्राण न मावणे, शिरस्त्राणासाठीचे कुलूप बसवून घेतल्यास चोरांनी कुलूप कापून कुलपासह शिरस्त्राण पळवणे, रुमाल सोडण्यापुरते हे शिरस्त्राण गाडीवर टेकवल्यावर ते धप्पकन खाली पडून त्याला पोचा पडणे, शिरस्त्राण काढल्यावर घरुन प्रयत्नपूर्वक वळवून आणलेल्या केसांचं भजं झालेलं असणे,काचेवर पावसाचं पाणी ओघळल्यावर आसपासचा रस्ता पाणी पडलेल्या चित्रासारखा दिसणे, शिरस्त्राणाच्या आत रुमाल बांधल्यावर आसपासच्या गाड्यांचे भोंगे ऐकू न येणे या अनुभवातून बर्‍याच (आळशी) बायका 'हेल्मेट' पेक्षा 'हेल मेट' जास्त पसंत करतात. चादर उर्फ रुमाल मात्र खूप फायदेशीर पडतो. (प्रसंगी केस न विंचरता तसेच अस्ताव्यस्त रुमालात बांधून हपिसात वेणीफणी करता येते.) सिग्नलला परिणामांचा विचार न करता तोंड झाकून भरपूर भांडणं करता येतात. एखाद्या हेअरबॅन्डवाल्या नवतरुणाला बघून हसू आलं तरी ते रुमालामुळे कोणाला दिसत नाही. 'केस वाढवून कोणीही लुंगासुंगा स्वत:ला जॉन अब्राहम समजायला लागलाय!' असे शेरे मागे बसलेल्या नायिकेवर सिग्नल तोडून इंपो टाकणार्‍यावर मारता येतात.

हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्‍याच चुरगळलेल्या सदर्‍यावर स्वेटर चढवला होता. वातानुकूलन बंद आणि तरी मी स्वेटर काढत नाही हे पाहून समोर बसणार्‍या घाम पुसत असलेल्या प्रोग्रॅमर भैय्याने विचारलंच, 'यहां बर्फ गिर रही है क्या?तुमको ठंड लग रही है? ' अशा वेळी मी 'थोडा बुखार जैसा लग रहा है' वगैरे ठोकून देते. हपिसात न जाण्यासाठी 'आजारी' पडायला 'बुखार जैसा लगना' हा अत्युत्तम आजार आहे.

मला हवा तसा आखूडशिंगी बहुदुधी रेनकोट मात्र मला अजून गवसला नाही. दर पावसाळ्याला 'यावेळी एकदम सगळ्यांच्या थोबाडीत मारेल असा जबरा रेनकोट विकत घेऊ' म्हणत काहीतरी वेगळंच परिधान रेनकोट म्हणून वापरलं जातं. बाबांचा शेरलॉक होम्सच्या कोटासारखा दिसणारा रेनकोट एक वर्षं वापरला. तो घातला की मला एकदम लंडनला पोहचल्यासारखं वाटायचं. फक्त तोंडात एका पायपाची कमी. पण हा रेनकोट पायापर्यंत यायचा. आणि बाह्या दुमडाव्या लागायच्या. रेनकोट विकत घ्यायचा म्हटलं की आमच्या कल्पना 'चालबाज मधल्या श्रीदेवीच्या रेनकोटासारखाच रेनकोट' याखाली जायच्याच नाहीत. 'सुंदर,देखणा,दणकट,टिकाऊ,कमीत कमी किमतीचा,जास्त दुकानं न शोधता' असा सर्वगुणसंपन्न रेनकोट न मिळाल्याने गेली पाच वर्षे अस्मादिक घरातल्या इतर मंडळींचे जादा असलेले रेनकोट वापरत आले आहेत.


रेनकोटाचा उपयोग कितपत हाही एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे. जे गुडघ्यापर्यंत येणारे रेनकोट बाजारात मिळतात त्यांची सर्व बटणे लावून गाडीवर बसता येत नाही, लावल्यास कोट ताणला जातो, शेवटची दोन बटणे न लावता बसल्यास पाय उघडे राहून विजारी भिजतात. (या भिजण्यात निव्वळ पाणी नसून ज्या खड्ड्यातून दुचाकी जाते त्यातले गढूळ पाणी, पुढच्या गाड्या व शेजारच्या (स्वतःच्या प्यासिंजराला 'परदानशीन' करून शेजारच्या चालकावर उंच पाणी उडवणार्‍या) रिक्षांनी उडवलेला ठिपकेदार चिखल या द्रव्यांचा समावेश असतो.) यावर 'रेनकोट उलटा घालून त्याची मागे बटणे लावून गाडीवर बसणे' हा उपाय मी पहिल्यांदा पुण्यातच पाहिला. यावर उपाय म्हणून बर्‍याच स्त्रिया पुरुषी थाटाचा सदरा विजार वाला रेनकोट घेऊन आपल्या साड्या किंवा पंजाबी पोशाख सदरा व विजारीत कोंबतात. हाही प्रकार करून झाला. पण याने कपड्यांच्या इस्त्रीला बरीच इजा पोहचते असं दिसून आलं.

या सगळ्यातून मला रस्त्यावर काहीजणींचा पाहिलेला स्कर्ट टॉप रेनकोट हा उत्तम उपाय वाटला. जाऊन स्कर्ट टॉप वाला रेनकोट धडाक्यात घेऊन आले. आता हा माझा नवा नवा रेनकोट लोकांनी पाहावा म्हणून तरी मुसळधार पाऊस पडू दे असं मला वाटायला लागलं. पण अशा या स्कर्ट रेनकोटाच्या स्कर्टला चेन किंवा पूर्ण उघडायला बटणे असावी हा मुद्दा मात्र विसरला गेला होता.. भिजलेला रेनकोटाचा स्कर्ट काढताना त्यावर स्वतःच्याच बुटाचे ठसे उमटून तो आतून खराब होतो असं दिसलं आणि उत्साह जरा कमी झाला. त्यात सारखी काढघाल करून रेनकोटाचा स्कर्ट फाटला. दु:खी मनाने मी यावर्षी रेनकोट न घ्यायचं ठरवलं. पुढच्या वर्षी एकदम खलास भारीपैकी रेनकोट घेईन असा पण केला आहे.

नवरोबांनी त्यांचा जुन्या रेनकोटाची विजार फाटल्याने एक कामचलाऊ झूल(जो प्रकार घेतला तो इतका मोठा आहे की त्याला रेन'कोट' न म्हणता झूल, डगला, कफनी असं काहीतरी म्हणणं जास्त योग्य ठरेल.) विकत घेतली. 'तुझं ते माझं' या न्यायाने मी ती झूल वापरायला सुरुवात पण केली. भल्यामोठ्या प्लॅस्टिकच्या दोन बाजू एकमेकांना शिवून फक्त बाह्यांचा आणि डोक्याचा भाग न शिवता मोकळा ठेवून बनवलेला हा प्रकार एखाद्या चादरीसारखा अंगावरही पांघरता येतो इतका ऐसपैस आहे. त्यात दोन मी आणि दीड नवरा सहज बसतो.

ही झूल इतकी मोठी होती(आहे!) की ती घातल्यावर साडी सावरल्यासारखी झूल नीट सावरून दुचाकीवर बसावं लागे. लोकांच्या ओढण्या आणि पदर मागच्या चाकात अडकतात, माझा रेनकोट मागच्या चाकात अडकण्याचा धोका होता. शिवाय वारं प्यायल्यावर हा रेनकोट फुगून मी 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' मधल्या भोपळ्यासारखी आणि वारं प्यायलेलं नसताना पांढरे पंखवाल्या बॅटमॅन सारखी दिसत होते. शिवाय टोपी पण जरा ऐसपैस असल्याने 'रेनकोट के आड से...रस्तोंका..दिदार अधूरा...रहता है..... ' असं गाणं म्हणायची पाळी आली होती. टोपी आड आल्याने बाजूला पाहता न आल्याने दुर्वांकुर चौकाऐवजी हत्ती गणपती चौकात वळून बराच लांबचा वळसा घेऊन गंतव्य स्थानाकडे जाणं अशा काही माफक चुका नेहमीच्या होत्या. गलबताच्या शिडात भरलेल्या वार्‍याने गलबत एखाद्या दिशेला वळावं तसं आमचं वार्‍याने भरलेलं रेनकोटाचं शिड घेऊन स्कूटीरुपी गलबत एखाद्या चुकीच्या दिशेने वळण्याची शक्यताही कधीकधी संभवते. बर्‍याचदा जोराचा पाऊस पडून दुचाकी थांबवून रेनकोट नामक जंजाळात शिरावं आणि दुचाकी चालवायला लागावं तर एका फर्लांगावर लख्ख ऊन पडलेलं असतं. इतकं करुन मेलं जास्त पाऊस आला की कोणत्याही कोटाच्या गळ्यातून आत कपड्यांवर पाण्याची गळती होऊन भिजायचं ते भिजायचं. फक्त 'रेनकोट घालून/छत्री घेऊन भिजलो, नुसते नाही' हे आत्मिक समाधान तेवढं गाठीशी. (जे आत्मिक समाधान आलिशान चित्रपटगृहात वीस रुपये टिच्चून फोडणीच्या लाह्या खाण्यात असतं तेच हे. एरवी कोपर्‍यावरच्या दुकानात याच लाह्या आठदहा रुपयाला मिळतात. तुम्ही कधी आलिशान चित्रपटगृहात बसून घरुन आणलेल्या पोळ्या आणि गवारीची भाजी हळूच खाल्ली आहे का? मी खाल्ली आहे. '(आम्ही आतले पदार्थ सोन्याच्या भावाने विकले तरी)बाहेरचे खाद्यपदार्थ आत आणू नयेत' अशा चित्रपटगृहांवरच्या पाट्यांना आणि रखवालदाराला गंडवल्याचं आत्मिक समाधान मिळतं.)

पुढच्या वर्षी मी एखादा 'डिझायनर सर्व ऋतूत चालणारा' कोट घेणार आहे. कापड आणि आतून बटणं लावून प्लॅस्टिकचं अस्तर. उन्हाळ्यात अस्तर काढून नुसतं कापडवाला सनकोट, पावसाळ्यात अस्तर कापडाच्या वर लावून रेनकोट, आणि हिवाळ्यात प्लॅस्टिक आत लावून थंडीसंरक्षक स्वेटर! कसं? तुमच्या ओळखीचा आहे का कोणी 'रेनकोट डिझायनर'?

-समाप्त-
(अनुराधा कुलकर्णी)

Monday, 31 December 2007

जज्जाची कोठी

'नॉसफेरातु' उर्फ 'ड्रॅक्युला' लिहीणार्‍या (ज्या 'ड्रॅक्युला' संकल्पनेचा हॉलीवूड आणि आपल्या रामसे भयपटांनीही भरपूर वापर केला) ब्रॅम स्टोकर च्या 'द जज्जेस हाउस' चे भाषांतर/रुपांतर करण्याचा हा एक प्रयत्न.

जज्जाची कोठी

Tuesday, 27 November 2007

गोपालकाला: एक आगळावेगळा चित्रपट

'
नुने बनवलेला चित्रपटांचा लगदा' उर्फ ए. बी. सी. एल. आता सादर करीत आहोत आमचा आगामी, चाकोरीबाहेरच्या, मनोरंजक, अप्रतिम, मनातल्या अनेक भावतरंगाचा वेध घेणार्‍या,सर्व प्रकारच्या तांत्रिक करामतींनी खच्चून भरलेल्या इ.इ. असा चित्रपटः 'गोपालकाला'. हा चित्रपट शोले, दि. दु. ले.जा. ,धू१, धू२, ल. र. मु. भा. आदी चित्रपटांचा उच्चांक मोडेल अशी आमची पुरेपूर खात्री आहे. चित्रपटाची कथा ही अशी:

सुरुवात एका रम्य खेड्यात. इथे आपला नायक 'गोपाल' जंगलात एका दगडावर बसून मग्न होऊन जत्रेतली फुग्याची पिपाणी वाजवतो आहे. (नायकांनी वाजवण्याची चावून चावून चोथा झालेली पावा, बासरी, गिटार, व्हायोलिन,पेटी इ. वाद्ये आम्ही मुद्दामच टाळली आहेत.) शेजारी बसून एक गाढवीण आणि एक कावळा धुंदपणे ऐकत आहेत. इतक्यात आकाशातून मंगळावर जाणार्‍या एका अंतराळयानातून एक कॅमेरा कावळ्याच्या डोक्यावर पडतो आणि कावळा मरतो. हा कावळा 'इच्छाधारी कावळा' म्हणजेच कावळ्याचे रूप घेतलेला यक्ष असतो आणि तो गाढवीणीच्या रूपात असलेल्या यक्षिणीबरोबर 'म्युझिक हिअरिंग' करत असतानाच हा व्यत्यय आलेला असतो. त्यामुळे मरताना तो चिडून शाप देतो की अंतराळयानातल्या मनुष्याला पण आपल्या प्रियजनाशी असाच विरह सहन करावा लागेल. आपला नायकही संतप्त होतो आणि प्रतिज्ञा करतो की 'जोपर्यंत मी या अंतराळयानातल्या व्यक्तीचा बदला घेत नाही तोपर्यंत मी या भूतलावर कोणत्याही पिपाणीला हात लावणार नाही'. आता पडद्यावर लाल हिरव्या पिवळ्या अक्षरात आणि मराठी, हिंदी, इंग्लिश, बंगाली, गुजराती, काश्मिरी, तुळू, उर्दू,तमिळ, तेलुगू,कन्नड या भाषांत 'गोपालकाला' नाव धावत असते आणि वर कावळे उडत असतात,खाली गाढवे धावत असतात. या नावांच्या आणि कावळ्या-गाढवांच्या ऍनिमेशनसाठी आम्ही खास हॉलिवूडहून पाच तंत्रज्ञ बोलावले आहेत.

दृश्यबदल. आता कॅमेरा आधी आकाशातला ठिपका दाखवतो..मग ठिपका मोठा मोठा होत होत अंतराळयान दिसते..मग त्याचा आतला भाग. इथे आपल्या नायिकेचा कथानकात प्रवेश. तिने अंतराळात जाण्यासाठी विशेष कापडाचा मिनीस्कर्ट आणि लहानसे झबले घातले आहे. 'तुझा अंतराळयानातला एखादा फोटो पाठव' असे तिच्या प्रिय 'डॅडी'नी सांगितल्याने ती कॅमेरा व्यवस्थित आपोआप फोटो निघेल अशा सेटिंगवर लावून समोर उभी असते तितक्यात जोराची हवा येते, अंतराळयान तिरके होते आणि कॅमेरा खिडकीतून खाली पडतो..कॅमेर्‍याशिवाय मंगळावर जाऊन उपयोग नाही म्हणून ती यान फिरवून परत अमेरिकेत वळते..

इथे नायक परत आपल्या झोपडीवजा घरी जातो. त्याची माँ शिवणयंत्रावर काहीतरी शिवत बसलेली असते. तिला गोपाळ सांगतो की 'आई, मला अमेरिकेत जायचं आहे.' माँ बरं म्हणते आणि कपडे शिवायला लागते.गोपाल झोपल्यावर माँ देवापाशी उभी राहते. देवाला म्हणते, 'देवा, मी आजपर्यंत तुझ्याकडे जे मागितलं त्यातलं काहीच तू अजून दिलेलं नाहीयेस.मागच्या वेळी माझ्या पोराला पल्सर फटफटी घ्यायला पैसे हवे होते तेव्हापण तू दिले नाहीस. आयपॉड घ्यायचा होता तेव्हापण दिले नाहीस. पण आज जर तू माझ्या लेकाला अमेरिकेला जाण्यासाठी पैसे मिळवून दिले नाहीस तर माझा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आणि मी नास्तिक बनेन. बोल देतोस पैसे का करू धर्मांतर?? बोल!बोल!' प्रत्येक 'बोल' बरोबर देवाची मूर्ती उभी आडवी थरथरतेय..बाहेर विजा चमकतायत.ढग गडगडतायत..आणि अचानक मूर्तीच्या हातातून माँच्या डोक्यावर 'पुणे सेंट्रल' या भव्य दुकानातले किमतीचे लेबल पडते. विजा इ. थांबतात. माँ रात्रभर जागून एकदम सुंदर कपडे शिवते आणि सकाळी ते 'पुणे सेंट्रल' ला विकते आणि गोपालला नोटांची चळत हातात देते. ती म्हणते, 'जा बाळा, परदेशात जाऊन आपल्या देशाचं नाव उज्ज्वल कर आणि येताना माझ्यासाठी चांगलंसं 'ऍलो व्हेरा मसाज क्रीम' आणि चॉकलेटं पण घेऊन ये!' नायक पाया पडून घरातून निघतो.

आपला हा अर्धे धोतर,बंडी आणि गाठोडे वाला नायक विमानात बसतो आणि विमान उडते. एका गोर्‍या हवाई सुंदरीकडे हा ऊसाचा रस मागतो आणि त्यांचे भांडण होते. पण वाटेत विमानाच्या पंखाला छिद्र पडते आणि गोपाल आपले लाखेचे कडे वितळवून ते बुजवतो आणि विमान वाचवतो. हवाई सुंदरी त्याच्या प्रेमात पडते. नायक अमेरिकेत उतरतो आणि चार पाच माणसांना पत्ता विचारून 'मासा' (मराठी एरो स्पेस असोसिएशन) पाशी येतो. तिथे त्याला गेटावरून आत सोडत नाहीत. पण नायक पिझ्झावाल्या पोर्‍याचे रूप घेऊन आत घुसतो आणि एका खोलीत जातो. ती खोली असते 'मासा' च्या प्रमुखांची. गोपालला पाहून ते आनंदाने त्याला मिठी मारतात. पाच वर्षापूर्वी ते भारतात आले असताना जंगलात त्यांच्यावर वाघाने हल्ला केलेला असतो आणि आपल्या गोपालने पिपाणी वाजवून वाघाला झोपवून त्यांचा जीव वाचवलेला असतो. गोपालला लगेच मासात नोकरी मिळते आणि त्याला योगायोगाने नायिकेबरोबर मंगळावर पाठवले जाते. अंतराळयानात गप्पा मारता मारता गोपालला कळते की आपल्या सूडाचे 'टार्गेट' हीच आहे. म्हणून तो नायिकेला अंतराळयानातून ढकलून देण्याचा प्रयत्न करतो. नायिका खिडकीला लटकते आणि त्याला आपण कॅमेरा मुद्दाम नाही टाकला हे समजावते. गोपाल आपले मन बदलून तिला आत घेतो. ते मंगळावर उतरतात आणि यानातलं पेट्रोल संपून ते तिकडे अडकतात. पाऊस पडायला लागतो आणि नायिका पावसात भिजून गाणं म्हणते. 'आय नो माय गोपाल इज काला, बट आय लव्ह हिम बिकॉज ही इज दिलवाला, मंगलपर हमारे प्यार को लगा है ताला, पहनादो मुझे हिरोंकी माला, आय हॅड अ क्रश ऑन धोतरवाला, जोइये नथी हमे पेट्रोल टँकरवाला'(गाण्यात हिंदी व इंग्रजीबरोबरच 'धोतर' हा मराठी शब्दही वापरून आम्ही महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान दाखवला आहे. तसेच दोन गुजराती शब्द वापरुन गुज्जू बांधवांनाही चित्रपट आपला वाटेल अशी व्यवस्था केली आहे. या गाण्यासाठी आम्ही २ कोटी रुपये खर्च केला आहे. अंतराळपोशाखातल्या शंभर सुंदर विदेशी नृत्यांगना मंगळावर साल्सा नाचताना दाखवल्या आहेत. चित्रपटातील हे महत्त्वाचे गाणे आणि शीर्षकगीत आहे आणि हे खूप गाजणार आहे.) पाऊस संपल्यावर नायिका अंतराळयानातले सीटकव्हर पांघरून आपला ओला झालेला अंतराळपोशाख काढून वाळत टाकते. आणि मग मंगळावर रात्र होते. शेजारी नायकाचा अंतराळपोशाख पडला आहे.पृथ्वीवरून नेलेला बॅटरीवर चालणारा दिवा लुकलुकत राहतो. (पुढचे दर्शकांच्या कल्पनाशक्तीवर सोडले आहे.आम्हाला 'इश्श/अव्वा' दृश्ये दाखवून चित्रपटाचा बाल प्रेक्षकवर्ग गमवायचा नाहीय.)

दृष्यबदल. नायकाची आई रस्त्यावरून डोक्यावरून कपड्यांचे गाठोडे घेऊन 'पुणे सेंट्रल'कडे जात आहे. इतक्यात एक गाढवीण(आठवा चित्रपटाची सुरुवात!) भरधाव धावत येते आणि 'माँ' ला खाली पाडते. 'माँ' ची दृष्टी आणि स्मृती दोन्ही जातात. मोटारीतून कपडे खरेदीसाठी पुणे सेंट्रलला जात असलेली हवाई सुंदरी 'माँ' ला वाचवते आणि घरी आणते. ती 'माँ' ची खूप सेवा करते. डोक्यावरच्या तापाच्या घड्या रात्रभर जागून बदलत असते. (कृपया 'गाढवीणीने लाथ मारल्यावर ताप येतो का' असे मूर्खासारखे प्रश्न डोक्यात आणू नये. ताप येतो. शंका असेल तर स्वतः गाढविणीकडून लाथ मारवून घ्या.) हवाई सुंदरी स्वतःची सोन्याची साखळी विकून ऑपरेशन करवून नायकाच्या आईची दृष्टी परत आणवते.योगायोगाने दवाखान्यातून घरी येताना रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून नायकाच्या आईच्या डोक्याला लागते आणि स्मृतीपण परत येते. नायकाची आई आपली सून म्हणून हवाई सुंदरीला पसंत करते. हवाई सुंदरीला पण पिपाणी वाजवणार्‍या नायकाचा फोटो पाहून 'हा चालेल' याची खात्री पटते. आणि ती तिच्या मागे घुटमळणार्‍या पायलटला बाणेदारपणे नकार देऊन नायकाच्या घरीच राहायला जाते.

चिडून हा पायलट हवाई सुंदरी आणि एक अंतराळयान चोरून मंगळावर निघून जातो. मंगळावर एका बाजूला गोपाल आणि आपली नायिका.. दुसर्‍या बाजूला पायलट आणि तोंडात बोळा घातलेला असतानाही 'ऑ जॉ रे मॉय तेरी रॉह मे तॉडॉपती हॉ व्हेन ऑर यू गाँइंग टू किस मी' (आम्ही सर्वच गाणी बहुभाषीय ठेवली आहेत, यायोगे आम्हाला परदेशी प्रेक्षकवर्गही लाभेल.)असे विरहगीत म्हणणारी हवाई सुंदरी.

इथे 'मासा' मध्ये गदारोळ झालेला आहे. पेट्रोलपंपांचा बेमुदत संप असल्याने पेट्रोल लवकर पाठवणे शक्य नाही. तितक्यात यांना व्हिडीओफोनवर मंगळावरचा पायलट दिसतो. त्याने हवाई सुंदरीला सोडण्याच्या बदल्यात पेट्रोल आणि दोन कोटी डॉलर्स मागितलेले असतात. 'मासा' प्रमुख ते द्यायचे कबूल करतात. सर्वजण त्यांना विरोध करतात. इथे चित्रपट भूतकाळात जातो: (आणि चित्रे रंगीत ऐवजी 'श्वेत-श्याम' उर्फ ब्लॅक अँड व्हाईट होतात..)

'मासा' प्रमुख तरुण असतानाची गोष्ट. त्यांचं एका स्वित्झरलँडच्या तरुणीवर प्रेम असतं. (आम्ही स्वित्झरलँड मधे एक बाग भाड्यानेच घेऊन ठेवली आहे. दरवेळी चित्रपटात माफक बदल करून तीच दाखवतो.) आणि ते लग्न करणार असतात. स्वि. तरुणी 'माँ.' बनणार असते. तितक्यात लग्नमंडपात असतानाच त्यांना हपिसातून फोन येतो आणि चंद्रावर जावे लागते. वाटेत पहिल्यांदाच चंद्रावर जात असल्याने ते वाट चुकून शुक्रावर जातात. तिथून परत वळून त्यांना चंद्रावर जावे लागल्याने परत यायला उशीर होतो. मधल्या काळात तरुणी 'माँ' बनून तिला एक मुलगी झाली आहे. (सुज्ञ दर्शकांनी ओळखलंच असेल की तीच ही हवाई सुंदरी.) आणि तरुणीचे आई वडील तिचे दुसर्‍या तरुणाशी लग्न लावून द्यायला बघतात. ती 'मासा' च्या विमानाखाली जीव देते. आणि मासा प्रमुख दु:खी होऊन एका मराठी मुलीबरोबर लग्न करतात आणि ती लहान मुलगी दत्तक घेतात. ही मुलगी मोठेपणी हवाई सुंदरी होते. तीच ही!! (इथे चित्रपट परत रंगीत होतो.)

दरम्यान आपण आपले नायक नायिका जे मंगळावर अडकले आहेत त्यांच्याकडे वळू. नायिका नायकाला आपण 'माँ' बनणार असल्याची बातमी देते. नायक आपल्या आईला फोन करून ही बातमी कळवतो. (कृपया मंगळावर फोन जोडणी कोणी दिली वगैरे असंबद्ध प्रश्न विचारू नयेत. आमचा चित्रपट प्रगत आहे.) आई त्याला हवाई सुंदरीशीच तू लग्न कर 'नही तो मै तेरा लाया क्रीम नही लगाउंगी' अशी धमकी देते. गोपाल मोठ्या पेचप्रसंगात पडतो. नायिका हे संभाषण ऐकते आणि हवाई सुंदरीच्या ताब्यात नायकाला देण्याचं ठरवून स्वतः त्याग करते. नायकाचा गैरसमज घडवून आणण्यासाठी ती अचानक समोर आलेल्या पायलटला मिठी मारते आणि त्याच्यावर प्रेम असून मूलही त्याचंच आहे असं जाहीर करते. नायक दु:खी होऊन दाढी वाढवतो आणि मंगळावरच फिरायला जातो. नायिका आधी तिनेच मिठी मारलेल्या पायलटाला ढकलून देते आणि त्याला सांगते की तिने नाटक केलं होतं. कुठूनसा तरी एक कावळा अचानक उडत येऊन अंतराळयानातल्या टेपरेकॉर्डरच्या बटणावर बसतो आणि नायिकेचे संभाषण टेप होते. आता हा कावळा उडत उडत नायकाकडे जातो आणि त्याला चोची मारून मारून अंतराळयानात आणतो आणि ते संभाषण ऐकवतो. पण उशीर झालेला असतो. पायलटाने आता नायिकेला पण पळवलेले असते.

दृश्यबदल. 'मासा'मध्ये आपल्या मुलाची चौकशी करत गोपालची 'माँ' येते आणि तिला तिथून अपमान करून बाहेर काढलं जातं. ती एका खिडकीसमोरून जात असताना तिच्या कानावर पेट्रोलची समस्या पडते. 'माँ' आत जाऊन त्यांना पेट्रोल ऐवजी समोर झाडूवाला वापरत असलेलं फिनेल घालून अंतराळयान चालवून बघण्याचा सल्ला देते. आणि अंतराळयान चालतं. सर्वजण माँ ची स्तुती करत असतात आणि परत चित्रपट भूतकाळात नेऊन आपल्याला दाखवलं जातं की 'माँ' अमेरिकेत शास्त्रज्ञ होती. आणि तिच्या बरोबरच्या शास्त्रज्ञाने तिच्यावर चोरीचा खोटा आळ आणून अमेरिकेतून हद्दपार करवले. म्हणून भारतात येऊन (तेव्हा 'माँ' नसलेली)'माँ' चरीतार्थ चालवण्यासाठी कपडे शिवायला लागली. तिचे लग्न एका शिंप्याशी झाले आणि त्यांना गोपाल नामक (सध्याचा महान पिपाणीवादक) मुलगा झाला.

फिनेलची टाकी मंगळावर पाठवली जाते.पायलट मुसक्या बांधलेली नायिका आणि हवाई सुंदरी यांच्यासह पृथ्वीवर जायला निघतो. गोपाल आणि त्याची हाणामारी होते. गोपाल खाली पडतो. पायलट त्याला गोळी मारतो पण मध्येच हवाई सुंदरी येते आणि गोळ्या स्वतःवर झेलते. मरता मरता ती तिच्याजवळची पिपाणी नायकाला देते नायक आपल्या प्रतिज्ञेमुळे नकार देतो आणि तिला प्रतिज्ञा सांगतो. ती त्याला त्यातला 'भूतलावर' हा शब्द सांगून मंगळावर पिपाणी वाजवायला हरकत नाही असे सांगते आणि मरते. गोपाल पटकन पिपाणी वाजवून पायलटला झोपवतो. नायक नायिका सुखरूप पृथ्वीवर येतात आणि लग्न करतात. झालेले मूल हुबेहूब कावळ्यासारखे दिसते आणि यक्षाची नायिकेला शापातून मुक्त केल्याची आकाशवाणी होते. पायलटचा प्रेमभंग होऊन तो कायमचा शुक्रावर निघून जातो.

नायिकेबरोबर आणि गाढवीण व छोट्या गाढवाबरोबर जंगलात पिपाणी वाजवणार्‍या नायकावर चित्रपट संपतो. चित्रपटाच्या शेवटी आम्ही एक भन्नाट आयटम साँग घेतले आहे.(असे साँग ठेवले म्हणजे लोक चित्रपट संपल्यावर उठताना दाराशी चेंगराचेंगरी करत नाहीत.) यात नायक (डोक्याला हेअरबँड लावून), नायिका(नेहमीप्रमाणे कमीत कमी कपडे घालून आणि निळे केस रंगवून), कावळा(विवस्त्र), गाढवीण(विवस्त्र), नायकाची आई(जीन्स कुर्ता घालून), 'मासा' प्रमुख(लो वेस्ट जीन्स आणि टिशर्ट मधे), हवाई सुंदरी(आखूड घागरा चोळी घालून), पायलट(वेणी घालून), नायिकेचे वडील(चित्रपटात त्यांना अगदी कमी वाव असल्याने रागावून) हे सर्वजण डिस्कोत नाचत आहेत. आणि मग श्रेयनामावली इ.इ. या गाण्याच्या सुरुवातीला आम्ही येशू ख्रिस्त,अल्ला व दत्तगुरुंविषयी एक आक्षेपार्ह दृष्य टाकले आहे आणि चित्रपट संपल्यावर चित्रपट गृहातील जुन्या खुर्च्यांची मोडतोड करण्यासाठी भाड्याने गुंड ठेवले आहेत. 'आक्षेपार्ह दृष्य खरेच आक्षेपार्ह आहे का' याविषयी 'परसों तक' या बातमी वाहिनीवर शुक्रवारी दिवसभर सेन्सॉर बोर्डाचे चार सदस्य चर्चा करणार आहेत.

या चित्रपटाने देशभक्ती, तंत्रज्ञान, भूतदया, प्रेम, रसायनशास्त्र, संगीत, रहस्य, मराठी अस्मिता, पुण्याचे खड्डे, अमेरिकेत स्थायिक भारतीय,आंतरजातीय विवाह,विमानात दिली जाणारी पेये,मॉल्सचे वाढते महत्त्व,कुमारी मातृत्व,जगासमोरील इंधनसमस्या,दत्तकविधी,सेन्सॉर बोर्डाची तत्त्वे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर उहापोह केला आहे. चित्रपट पटकन लोकप्रिय होण्यासाठी प्रत्येक खेळाला 'लकी ड्रॉ' ठेवून विजेत्यांना चित्रपटातील मुख्य कलाकार असलेल्या कावळा व गाढवीणीबरोबर एक पूर्ण दिवस घालवण्याची सुवर्णसंधी देणार आहोत. ऑस्कर आणि 'कॅनेस फिल्म फेस्टीव्हल' ची तिकीटं आम्ही आधीच काढून ठेवली आहेत. आता फक्त येत्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याचीच वाट पाहत आहोत.

ता. क.: गोपालकाला हा चित्रपट मूळचा एका टांझानियन चित्रपटावरुन तंतोतंत उचललेला आहे अशा वावड्या आमचे काही विरोधक चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच उठवत आहेत. आमचे नाणे खणखणीत असल्याने आम्हाला या अफवांचे खंडन करायचे नाही, आणि 'आम्ही फक्त रशियन चित्रपटच उचलतो' हे माहिती असलेल्या आमच्या प्रेक्षकवर्गाला आमच्या शुद्ध चारित्र्याबद्दल शंका अजिबात येणार नाही हे आम्ही जाणतो.

-समाप्त-
(अनुराधा कुलकर्णी)

Tuesday, 6 November 2007

ग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय!

९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्‍याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.आता नंबर दाबून दाबून मेंदूला थकवा आला आहे.)
'हॅलो वेलकम टु एअरटेल. हाउ कॅन आय हेल्प यु?'
(अरे चांडाळा,मराठीसाठी इतके आकडे मूर्ख म्हणून दाबले का लेका मी?)
'डु यु नो मराठी?'
'नो मॅम, आय कॅन ओन्ली अंडरस्टँड लिटल बिट ऑफ इट.कान्ट स्पीक.'
(अरे फुल्या फुल्या फुल्या, चुल्लूभर पानीमे डूब मर! मला इंग्रजी कामापुरती येत असली तरी इंग्रजीत कचाकचा भांडता येत नाही ना रे.त्याला मातृभाषाच बरी.'ओ, काय सर्व्हिस देता का झx मारता?' चा आवेश आंग्लभाषेत आणता येणारे का मला?)

पुढचा संवाद आंग्लभाषेतलाच,पण मूळ भांडणाची नीट मजा मिळावी म्हणून मराठीत देत आहे.
'मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक.मला आताच एस एम एस आला की मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस दिल्याबद्दल आम्ही तुमच्या शिलकीतून १५ रु. कापून घेत आहोत.'
'थांबा मॅडम, मी चेक करतो, होल्ड ऑन.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो'
(परत 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन')
'हॅलो'
'यस मॅम, आम्ही शोधले. ती सर्व्हिस रिक्वेस्ट तुम्हीच दिली आहे.'
'मी एअरटेल प्रीपेड घेतल्यापासूनच्या तीन वर्षात कधीही अशी सर्व्हिस रिक्वेस्ट दिलेली नाही.'
'पण आमची सिस्टम म्हणते की तुम्ही तशी रिक्वेस्ट दिली.'
(च्या xxx ! तुझी सिस्टम घाल चुलीत मेल्या.)
'अहो पण मी तशी रिक्वेस्ट कधीच नाही केली, तसा फोन नाही केला, अशी सर्व्हिस हवी का विचारण्यार्‍या फोनला हो उत्तर नाही दिले, आणि असा एस एम एस नाही केला, आणि अशा एस एम एस ला उत्तरही नाही दिले.'
(मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकली नाहीत, मी ती उचलणार नाही.)
'हे बघा मॅडम, आमच्या सिस्टम मधे स्पष्ट दिसतं आहे की तुम्ही अशी रिक्वेस्ट केली होती.'
'मी पण स्पष्ट सांगते आहे की मी अशी रिक्वेस्ट कधीच नाही केली. ही तुमच्या सिस्टमची चूक आहे.'
'हे पहा मॅडम, याबाबतीत मी काहीच करु शकत नाही.'
'तुम्ही म्हणता ना मी रिक्वेस्ट दिली, मग ती कोणत्या तारखेला आणि कोणत्या स्वरुपात दिली याची माहिती द्या.'
'सॉरी मॅडम, ही माहिती आम्ही डिसक्लोज करु शकत नाही.'
(अरे चोरा! आमची माहिती बरी विचारुन घेतोस फोन केल्या केल्या..आणि स्वतः माहिती देताना मात्र प्रायव्हसी पॉलीसी होय?)
'हे बघा, मी स्पष्ट सांगते आहे की अशी सर्व्हिस मी कधीच मागितली नाही आणि ती रद्द करा.आणि मला १५ रु. परत द्या.'
'सॉरी मॅडम. १५ रु. तर परत मिळणार नाहीत.तुम्ही ५११ ला 'एम सी ए कॅन्सल' असा एस एम एस करुन कॅन्सल ची रिक्वेस्ट टाका.'
(वा हे बरं आहे. तुम्ही नको त्या सर्व्हिस न विचारता द्या..रद्द करताना मात्र आम्हालाच तसदी द्या.तुम्ही कचरा करा, आम्ही झाडू मारतो.)
'नक्की रद्द होईल का?'
'असं करा मॅडम, तुम्ही चोवीस तासांनी परत फोन करुन ती कॅन्सल झाल्याचं कन्फर्मेशन घ्या.'
(घेते रे..करते काय न घेऊन?पैसे माझेच जाणार ना दर महिन्याला? चूक माझी नसली तरी मला ती सुधारायला तडफडायला पाहिजेच.)
एम सी ए कॅन्सल..५११..सेंड.
'युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड इन नेक्स्ट ट्वेंटी फोर अवर्स.'
(अय्या! कित्ती छान! खरंच ना पण?)

२४ तासांनी.
९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्‍याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.)
'हॅलो.'
'मी असा असा एम सी ए कॅन्सल चा एस एम एस केला. आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सेवा खरंच कॅन्सल झालीय का?'
'थांबा हं मॅडम. मी चेक करते.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, ती सर्व्हिस अजून तरी कॅन्सल झालेली नाही, पण चोवीस तासात नक्की कॅन्सल होईल.'
'नक्की होईल का? की चोवीस तासांनी परत हेच म्हणणार?'
'नही, तुम्ही कॅन्सल रिक्वेस्ट टाकली आहे ना? नक्की कॅन्सल होईल.'

दुसरा महिना:
'रुपीज १५ डिडक्टेड फ्रॉम युवर अकाउंट. थँक यु फॉर युजिंग एअरटेल मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस.'
९८९००९८९००..
ब्लाब्लाब्ला..१ दाबा..२ दाबा..३ दाबा..
'हॅलो, मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक. मी मागच्या महिन्यात मिस्ड कॉल सर्व्हिस कॅन्सल चा एस एम एस केला होता आणि तुमच्या ग्राहक सेवेला फोन पण केला होता. त्यांनी सांगितले की ती रद्द होईल पण झाली नाही. या महिन्यात परत १५ रु.गेले.'
'थांबा हं मॅडम.मी चेक करतो.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, तुम्ही परत एकदा एस एम एस करा.'
'पण यावेळी नक्की रद्द होईल ना? आणि मागच्या वेळी रद्द होईल असे छातीठोकपणे सांगणारी तुमची प्रतीनिधी आता कुठे आहे?'
'आता हे काही मी सांगू शकत नाही.पण तुम्ही ५११ ला एस एम एस करा आणि चोवीस तासांनी एकदा फोन करा.'
परत एकदा एम सी ए कॅन्सल..

तिसरा महिना:
'१५ रु गेले आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस वापरल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.'
(का? का? माझ्याच बाबतीत असं का?)
९८९००९८९००
'१ दाबा..२ दाबा..३ दाबा..७ दाबा..९ दाबा..'
'हॅलो ब्ला ब्ला ब्ला.फोन केला होता...ब्ला ब्ला ब्ला... अजून कॅन्सल झाली नाही. तुमचे लोक काय करतात? आणि एस एम एस करण्याशिवाय रद्द करण्याचा दुसरा मार्ग नाही का? आणि रद्द झाल्याचा किंवा न झाल्याचा एस एम एस का येत नाही? युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड विदीन २४ अवर्स असा एस एम एस दर महिन्याला येऊनही काहीच का होत नाही? असं किती महिने चालणार?प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी मला '२४ तासात नक्की रद्द होणार बघा' असं सांगून कटवणार.'
'हे पहा मॅडम. मागच्या महिन्यात तुम्हाला कोणी अटेंड केलं आणि काय सांगितलं ते मला माहिती नाही.'
'बाई निशा होती आणि पहिल्या वेळी अटेंड करणारा बाबा आसिफ होता'
'बरं. यावेळी तुम्ही एस एम एस करा. नक्की कॅन्सल होईल.'
यावेळी वैतागात बदल म्हणून कस्टमर सर्व्हिस ला ई पत्र पाठवले.
यांत्रिक उत्तरः 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'
(ऑटो रिप्लाय..पलिकडचा माणूस इमेल वाचत नसला तरी त्याच्याकडून प्रोग्रामने पाठवलेले उत्तर मिळणार. 'एअरटेलकडून मला स्पर्धेत ताजमहाल बक्षिस मिळालाय. बक्षिस घ्यायला कधी येऊ?' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.' उत्तर आणि 'हराxxx! हे मेल जो वाचेल त्याच्या नानाची टांग! मर मेल्या!' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'. उत्तर पाठवणार्‍या प्रोग्रामला तुमच्या अडचणींशी, आनंदाशी, दु:खाशी काही सोयरसुतक नाही.शिव्या दिल्या तर रागही नाही.आणि आतापर्यंत पाठवलेल्या ३ ईपत्रांना ऑटो रिप्लाय नंतर मानवी रिप्लायही नाही.ईपत्रे आपोआप 'स्पॅम फोल्डर' मध्ये पण जात असावीत एखाद्या प्रोग्रामने.हाय काय नि नाय काय! कोण तो वेडा सारखा तक्रारीची ईमेल करतोय? घर थंडीत बांधा रे त्याचं! यालाच 'विज्ञान: एक शाप' म्हणत असावेत काय?)

६ वा महिना..
'ब्ला ब्ला ब्ला..१५ रु गेले..कॅन्सल नाही झाली...'
'बरं. तुम्ही असं करा, यावेळी एम सी ए नो पाठवून बघा.'
एम सी ए नो.. ५११..
'हॅलो..ब्ला ब्ला..ब्ला..नाही झाले कॅन्सल..मेसेज फेल.'
'हे कोणी सांगितले? तुम्ही एम सी कॅन्सलच पाठवा.'
एम सी ए कॅन्सल.. ५११.. एमसीएकॅन्सल..५११..' 'एम सी ए नो'.. एमसीएनो..५११..२४ तासात रिक्वेस्ट प्रोसेस केली जाईल..'
'नक्की कॅन्सल होईल मॅडम.'
(कोण निर्बुद्ध xxxx गणंग घेतले आहेत रे कस्टमर सर्व्हिस मध्ये? दरवेळी 'अगदी नक्की' वाली आश्वासने देतात..दरवेळी काही करत नाहीत. मार्चमध्ये निशाशी बोलले, एप्रिल मध्ये आसिफशी बोलले,मे मध्ये सुरेशशी बोलले, जून मध्ये सिम्रनशी बोलले, आता अजून कोणकोण आहात ते या फोनवर. बोलून घ्या माझ्याशी.कॉल सेंटर मध्ये अमेरिकेतल्या माणसाशी मकरंदला मॅक होऊन आणि सविताला सॅली होऊन बोलावे लागते तसा कोणी विदेशी आयझॅक माझ्याशी आसिफ बनून बोलत नाहीये ना? का दरवेळी एकच आसिफ आणि एकच निशा वेगवेगळी माणसं बनून बोलत आहात?)

हा किस्सा गेले ७ महिना चालू आहे. दरवेळी 'एम सी ए कॅन्सल', 'एम सी ए नो' टु ५११..'नक्की रद्द होणार' ची आश्वासने.. 'कस्टमर सर्व्हिस' 'कस्टमर केअर' या गोंडस नावाखाली वावरणार्‍या या निर्बुद्ध अज्ञाताशी लढा देताना अस्मादिकांच्या तलवारी बोथट झाल्या आहेत. 'ग्राहक मंच' इ. माहित्या वाचून 'काही तरी केलं पाहिजे बुवा!' अशी स्फूर्ती येऊन दुसर्‍या क्षणी 'नको बाबा कोर्टाची पायरी!' म्हणून कच खाणे. 'काय बावळट आहेस. आयडीया सिमकार्ड घे.' ला 'मला फोन नंबर शक्यतो बदलायचा नाही' हे उत्तर, 'शंकरशेट रोड ला व्हेगा सेंटर ला जाऊन झापून या' वर 'व्हेगा सेंटर मध्ये जाऊन काचा फोडण्याची' स्वप्ने पाहणे, परत 'कस्टमर सर्व्हिस चे फोन व्हेगा सेंटरहून येतात की दुसरी कडून की बंगलोर की चेन्नईहून?' या अज्ञात शत्रूच्या ठिकाणाबाबतच्या शंकेने तलवारी गळून पडणे..
'जाऊदे मेलं. १५ गुणिले १२ म्हणजे १८० रु. जाऊदेत. पण हा दर वेळी मनस्ताप नको. हे पॅकेज संपल्यावर सरळ पोस्टपेड करुन टाकू नंबर तोच ठेवून.' असा भेकड विचार..
माझ्याकडे काय पुरावा आहे? ही माणसे 'मीच रिक्वेस्ट दिली' म्हणतात. मी कधीही कोणत्याही स्वरुपात दिली नाही हे मला माहिती आहे. पण माझ्याकडे मी ती दिली नाही याचे काय पुरावे आहेत? त्यांच्याकडे मी दिली याची काय पुरावे आहेत? असले तर सांगत का नाहियेत? हा काही स्कॅम आहे का? यात पूर्ण एअरटेल आणि एअरटेल ची डाटाबेस सिस्टम सामिल आहे का? दाद मागू कुठे? हे लचांड माझ्या मागे का लागावे? आता हे निस्तरायला कोणाला पकडावे? हे चोर एस एम एस पाठवूनही काहीच करत नाहीत हे कोणाला सांगावे?

'बसल्या जागी फोन करुन कामे होतात' हे सुख देणार्‍या ग्राहक सेवा खरंच सेवा आहेत का? काम नाही झाले तर प्रत्यक्ष अद्वातद्वा वचने देणार्‍या माणसांचे गळे पकडता येत नाहीत हा तोटा नाही का? समोरचा माणूस प्रत्येक वेळी वेगवेगळा असल्याने चुकीची माहिती देणार्‍याला ओळखता येत नाही हा तोटा नाही का? दरवेळी ऐकणारा माणूस वेगळा असल्याने आपले पूर्ण चर्‍हाट परत ऐकवावे लागणे हा तोटा नाही काय? 'बिचारे शिफ्ट मध्ये काम करणारे कॉल सेंटरवाले' अशी आश्वासने ड्रगच्या धुंदीत देऊन विसरुन जात असावेत का? पण सगळ्या ग्राहक सेवा अशा नसतात. सगळ्याच कॉल सेंटरमध्ये अनाचार चालत नाहीत..त्यांच्या आपल्या समस्या असतात..पण मग मला दर महिन्याला खोटखोटं सांगून पुढच्या महिन्यात १५ रु. जाईपर्यंत स्वस्थ का बसवतात?

कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी बरेचदा 'बाय हुक ऑर क्रुक' ने मोठे होणार्‍या या मोबाईल कंपन्यांबद्दल थोडी शंका येतेच. 'फटिचर, तू इतना सोचता क्यूं है रे?' असं म्हणून स्वतःला गप्प बसवते झालं.

(हा फक्त एक अनुभव आहे.'साहित्य' वगैरे नाही.त्यामुळे यात साहित्यिक मूल्ये दिसणार नाहीत.कोण रे ते 'कधी दिसली होती आधी तरी' म्हणतंय?आंग्लभाषेचा जास्त प्रभाव किंवा काही आक्षेपार्ह शिव्या आढळण्याची शक्यता.शुद्धलेखनाबाबत चुभूदेघे.)

Thursday, 25 October 2007

धन्नो आणि बसंती

'शाणी माझी बाई ती.. अजून फक्त थोडंसंच चाल ना..आलंच बघ समोर.'-बसंती.
'थोडंसंच चाल काय? मी तुला कँपातच सांगत होते मला भूक लागली आहे म्हणून. चांगला समोर होता पंप. पण तुलाच 'स्पीड' पेट्रोल भरुन लकी ड्रॉ कुपन भरायचं होतं म्हणून तू मला इतकं दूर आणलंस. आता मी नाही जा!मी इथेच थांबणार.'-धन्नो.
'अगं सोनू, माफ कर मला. परत असं नाही करणार. पण आता चल ना अर्धा किमी. पुढे आहे चढ.
आणि तुला तर माहितीच आहे व्यायामाच्या बाबतीत मी किती फासफुस आहे ते? मॉर्निंग वॉक पण तुला घेउनच करते. मी कशी जाणार तुला चढावर ओढून घेउन?चल ना गं.'-काकुळतीला येउन बसंती.
'माझा पण नाईलाज आहे. पुढच्या वेळी तू शहाणी होशील आणि असं करणार नाहीस याची खात्री आहे
मला.'-धन्नो

बसंतीने(नसलेला) पदर बांधला आणि ती धन्नोला आधार देऊन चढ चढायला लागली. धन्नोचं पण बरोबरच होतं एका प्रकारे. बसंती तिला रोज पुण्याच्या खड्ड्यांवरुन नेउन धन्नोची हाडं खिळखिळी करते.तिला रोज आंघोळ घालत नाही. चांगलं पेट्रोल खाऊ घालत नाही. धन्नोचा फुटलेला आरसा पण बदलत नाही. केवळ इमानदारी आणि मैत्रीपोटी धन्नोनं तरी किती सहन करायचं?

कधीकाळी धन्नो सशक्त आणि सुंदर होती. नितळ काळी कांती, चमकते आरसे, स्टीलचे चमचमते पैंजण..पण त्यावेळी बसंती 'गरम रक्ताची,स्वतःला स्मार्ट समजणारी' इ.इ. तरुणी होती. वेगाच्या हव्यासापोटी आणि नियमांच्या अज्ञानापोटी स्वतःबरोबर धन्नोला रस्त्यावर भिरकवायला पण ती मागेपुढे पाहत नसे. श्रम सोसून आणि उन्हातान्हात फिरुन धन्नोच्या सौंदर्याला उतरती कळा लागली. प्रकृती ढासळायला लागली. बसंतीला आता धन्नोचा खूप लळा लागला होता. ती धन्नोला घेतल्याशिवाय कुठेही जात नसे. कधी व्यक्त केलं नाही तरी तिचा खूप जीव होता धन्नोवर. पण धन्नोमधे आता ती धडाडी आणि तंदुरुस्ती उरली नव्हती. आला दिवस ती कशीबशी रेटत होती.

'सिग्नल मोठा आहे १२० सेकंदाचा. तुला बंद करुन ठेवते.'- बसंती.
'नको गं बाई! मी चालते आहे तोवर चालते आहे. एकदा बसले कि बसले. परतपरत उठबस झेपत नाही
आता जिवाला.'-धन्नो.
'हॅ, असं कसं? पेट्रोल किती जातं? आणि प्रदूषण? काही नाही. घाबरु नकोस. मी आहे ना! तुला सगळं झेपेल. माझ्यावर विश्वास ठेव.'-बसंती.
सिग्नल संपला. बसंतीने धन्नोची वादी पिरगाळून कळ दाबली. पण धन्नोचा विद्युतघट पण संपलेला. मग
धन्नोला हलकीशी पायखळी मारली. पण ती काही उठेना.
'धन्नो, उठ ना! बघ मागचे लोक भोंगे वाजवतायत. थोडी चाल, मग मी तुला बाजूला घेऊन विश्रांती देते.'
'नाही गं. आता हा देह विसावणार तो कायमचाच एखाद्या गॅरेजवाल्याकडे किंवा भंगारवाल्याकडे. तू मला
विकून टाक आणि नवी सखी बघ.'
'धन्नो, असं नको ना बोलूस! मला कसंतरी वाटतं. तू बरी होणार आहेस. मान्य आहे मी चुका केल्या आणि त्याची फळं तुला भोगावी लागत आहेत. पण तू बरी होशील. मी तुला नेईन एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे.
पगार होऊ दे फक्त या महिन्याचा.'

'कशाला ठेवलंय हे भंगार?कायम काही न काही तक्रारी. आता चालती आहे तोपर्यंत बायबॅकमधे दिली तर थोडे तरी सुटतील. नवी 'पेप' घेउन टाकू.'-वीरु.
बसंतीने हळूच धन्नोकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. धन्नोच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. वीरु पण धन्नोचं खूप करायचा. तिला वेळोवेळी वैद्याकडे घेऊन जाणं, तिचं खाणं पिणं पाहणं..पण आज वीरुलाच असं बोलताना पाहून धन्नोला धरणीच्या पोटात गडप व्हावंसं वाटलं.
'अरे चालते आहे तोपर्यंत चालवू. कशाला नवा खर्च? मी हिलाच नव्यासारखी बनवीन. मग ती चांगली
वागेल.'-बसंती.

'डॉक्टर, माझी धन्नो होईल ना हो बरी?हल्ली वयाप्रमाणे तिला जास्त चालवत नाही. गुडघेदुखी आहे.
अधूनमधून चक्कर येते. खाणं पचत आणि अंगी लागत नाही.'
'मी काहीच सांगू शकत नाही.पण आता तिचं जास्त आयुष्य नाही उरलं. सरळ नवीन घेऊन टाका ही
देऊन.'-डॉक्टर.
'मी कितीही खर्च करीन हिच्यावर. पण हिला पहिल्यासारखी तरुण पहायची इच्छा आहे. किती खर्च येइल
सांगा ऑपरेशनला?'-बसंती.
'म्हणजे बघा, आरसे लागतील, बॅटरी बदलावी लागेल, बॉडीला क्रॅक गेला आहे ते बदलावं लागेल, टायर
जुने झाले आहेत ते बदललेले सेफ राहतील. म्हणजे पूर्ण मिळून बघा, ४००० मधे काम होईल.'-डॉक्टर.
'बरं मी तुम्हाला पावसाळ्यानंतर सांगेन. चल गं धन्नो.'

'चार हजार!! भावना वगैरे ठिक आहे पण आज हिला चार हजाराला विकली तर नवी चकाचक पेप येईल.'बसंती विचार करत होती.
'मूर्ख! आपल्या माणसाचं ऑपरेशन करावं लागलं तर महाग आहे म्हणून त्याला असंच मरायला सोडशील का?त्यापेक्षा बसंती तुला भेटलीच नसती तर बरं. तुझ्यामुळे तिच्यावर ही पाळी आली आहे. आणि तू खुशाल तिला टाकून नवी सखी करणार?' बसंतीने स्वतःलाच झापलं.
'पण मग दरवेळी दुरुस्तीला पैसे आणायचे कुठून?'
'आण कुठूनही, पण जिने तुला गेली ५ वर्ष साथ दिली तिला असं कृतघ्नपणे वाऱ्यावर सोडू नकोस.'

झालेल्या उपचारांनी दमून धन्नो शांतपणे पाय रेटत घराकडे चालली होती. बसंतीने तिला कुरवाळलं . 'नाही गं सोने, मी कुठ्ठे टाकणार नाही तुला! मी तुला संभाळीन. तुला बरं करेन. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुझी साथ देईन.'
धन्नो आनंदाने खुदकन हसली आणि फुरफुरली. 'आता कितीही आजार झाले तरी मी आनंदाने तुझी शेवटपर्यंत सेवा करेन आणि तुझ्या पायाशी प्राण सोडेन.' आणि ती परत नव्या उत्साहाने चालू लागली.
(हा लेख सर्वप्रथम मनोगत डॉट कॉम वर प्रकाशित.(ब्लॉग एकदम झोपलेला होता बरेच दिवस म्हून ही जुनीच दारू तळघरातून काढून नव्या गिल्लासात ओतली.))

एपिलॉगः
काळ बदलला. चैनी गरजा बनल्या. बसंतीही पूर्वीइतकी भावूक राहिली नाही. तिने नुकतीच धन्नोला घोड्यांच्या सौदागाराला सात हजाराला विकून नवी 'लैला' विकत घेतली आहे. तरीही धन्नो आज जिथे कुठे आहे तिला हा लेख सदिच्छांसह समर्पित.

Monday, 8 October 2007

स्वामी: जी ए कुलकर्णी

बर्‍याच दिवसात ही अनुदिनी लिहीण्यास सूर गवसला नव्हता. पण ट्युलिपने खो दिल्यावर आता 'आलिया ब्लॉगासि असावे सादर!'
आवडती पुस्तके, आवडते उतारे भरपूर आहेत. (पण ती वाचनालयात शोधून त्यातले उतारे टंकण्याच्या आळशीपणामुळे नेटावरच आयतं काही मिळतंय का शोधलं.एक आवडती कथा, पूर्ण नव्हे, पण त्यातला काही भाग नेटावर मिळाला.)

'स्वामी'. जी. ए. कुलकर्णींची एक समर्थ कथा. माणसाला जगायला किती जागा आणि किती वस्तू लागतात? 'देवा सोडव रे बाबा या त्रासातून' असं त्राग्याने बरेचदा म्हटलं तरी खरंच सर्व समस्यांपासून, व्यक्तींपासून सुटका मिळाली तर ती सुटका सहन होते का? असे अनेक प्रश्न निर्माण करणारी. गावात एकटा पडलेला एक मनुष्य 'आता पुढे काय' या विचारात असताना त्याला एक महंत भेटतो. महंताचे त्यांच्या मठात येण्याचे निमंत्रण हा एकला प्रवासी स्वीकारतो. मठात त्याची चांगली सरबराई होते. रेशमी वस्त्रे, गरम पाणी, चांदीच्या पेल्यातून दूध आणि फळे. 'असे विलासी आयुष्य सहज मिळणार असेल तर जन्मभर येथे राहायची आपली तयारी आहे' असा विचार करणार्‍या या प्रवाश्याला हे माहिती नाही की जन्मभर इथेच आयुष्य काढायचं प्राक्तन त्याच्या समोर आहे. महंत बोलताना त्यांच्या आद्य गुरुंचा मोठ्या आदराने उल्लेख करतात. स्वामींच्या मृत्यूनंतर पीठ रिकामे आहे आणि एकशे आठ दिवसांच्या आत नव्या स्वामींचा शोध करणे आवश्यक आहे. 'पण अमुक एक माणूस तुमच्या स्वामींचा अवतार बनायला योग्य आहे' हे कसे कळते? प्रवासी कुतूहलाने विचारतो. 'जुन्या स्वामींच्या आसनावर बसून अशा अवतारी पुरुषाने बोट वर केले तर त्याच्या बोटातून बेलाचे त्रिदल उगवते.'

प्रवाश्याला याबाबत कुतूहल वाटते आणि अविश्वासही. त्याला बर्‍याच पायर्‍या उतरुन एका अत्यंत अरुंद जागी स्वामींच्या आसनाजवळ एकट्याने नेले जाते. आणि बाहेरुन दरवाजा कायमचा बंद केला जातो! 'पूर्वीच्या स्वामींप्रमाणेच' पूर्ण आयुष्य त्याला आता या खोल भुयारात, अरुंद जागेत काढायचे असते. बाहेरच्या जगाशी संपर्क नाही, फक्त योग्य त्या वेळांना जेवणाचे ताट आत सरकवले जाणार आणि भुयारातून वर आणलेल्या हवेच्या नळ्यांमुळे श्वासोश्च्वासाला हवा मिळणार. आपण वाचून सुन्न होतो. शुद्ध फसवणूक आहे ही! पण महंताकडे मात्र कारणमिमांसाही असते. (तीही आपल्याला पटत नाही.) कथा श्वास रोखून पुढे वाचल्याशिवाय राहवतच नाही. त्याच 'स्वामी' कथेतला हा एक उतारा(माफ करा, उतारा जरा जास्त लांबला आहे, पण या कथेतील अगदी छोटासा भाग महत्त्वाचा म्हणून इथे देऊन बाकी भाग वगळणे जमतच नाही, कारण प्रत्येकच उतारा महत्त्वाचा वाटतो. कथा प्रत्यक्षच मिळवून नक्की वाचा. संग्रह- पिंगळावेळ, कथेचे नाव 'स्वामी'.):


या नंतर मी पुढचा खो या व्यक्तींना देते आहे:
अदिती
कोहम
राहुल फाटक
अत्यानंदराव
पूनम

(माफ करा हं, बरेच दिवस या आंतरजालीय खो खो च्या खेळाशी संपर्क नव्हता, त्यामुळे कोणाला दुसर्‍यांदा खो गेला असल्यास दुर्लक्ष करावे.)
- (बैठे खेळ प्रेमी) अनु.

Tuesday, 26 June 2007

एकावर एक मोफत

जीवनाचा डाव अजुनि मांडते आहे
जिंकू पुन्हा हार म्हणुनि मानते आहे

भूतकाळाच्या चुका विसरून आता
हास्य करुनि आसवांना मारते आहे

रात्र काळोखी इथे पुरणार मी
वाट पाहत त्या उषेची जागते आहे

शल्य बाहेरी जगाची मी झुगारून
शांत संसारात माझ्या नांदते आहे

जगाने आता बनविले कोडगे,
प्रेत पूर्वीच्या 'अनु'चे जाळते आहे..
-------------------------------------------------------------------
(बोला राव, वाचून डोळ्यात 'करुणेणे' अश्रू आले की नाही? आता जरा अश्रू पुसून दात विचकूया:)

चेसचा मी डाव अजुनि मांडते आहे
मीच खेळोनि चुकीचे भांडते आहे

'कासवाचे' खोकडे विसरून पुन्हा
जागुनि मी डास आता मारते आहे

भात इतकुसा कसा पुरणार त्याला
संपवून तो वाट त्याची पाहते आहे

'सात फेरे' ची मजा 'हिस्टरी'त नाही
हातुनि रीमोट मीपण हिसकते आहे

टॉम आणिक जेरीला त्या पाहताना
गॅसवरती दूध 'राधा' जाळते आहे..
-------------------------------------------------------------------
-अनु (जी. एम. घाऊक+भावुक गझल उत्पादन व विक्री).

Saturday, 16 June 2007

गाथा माझ्या गझलेची

गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या जिनगानीवर!" वगैरे धमक्या मन सारखं देऊ लागलं आणि मी ठरवलं. "बास! आता एक तरी गझल लिहील्याशिवाय मी केस बांधणार नाही!"(ती द्रौपदी नाही का, दु:शासनाच्या रक्ताने केस बांधायला मिळेपर्यंत केस मोकळेच सोडते तसे.)

गझल लिहीण्यातली पहिली पायरी म्हणजे थोडे उर्दू येणे. आमचे उर्दू म्हणजे 'मोहब्बत' आणि 'कयामत' यापेक्षा वेगळे असलेले सगळे शब्द सारखेच वाटणारी. त्यात बाकी काफिया, मतला, मक्ता, नुक्ता, रदिफ़,अलामत, सानी मिसरा, उला मिसरा,तरही,शेर,जमीन हे अगम्य शब्द वाचून उच्चारापुरते माहिती होते. 'गझलेची बाराखडी' वाचायला घेतली. आणि
"गझलेतला प्रत्येक शेर ही स्वतंत्र अभिव्यक्ती असते, पण पूर्ण गझल वाचली असता त्यातून एकच अर्थ व्यक्त झाला पाहिजे." या नियमापाशी आमचं घोडं अडखळून खिंकाळलं. हा हा म्हणजे, 'हिरण्यकश्यपूला मार, पण दिवसाही नाही, रात्रीही नाही, घरातही नाही आणि बाहेर नाही' असा पेच झाला. पण तरीही गझलनामक हिरण्यकश्यपूला हरवण्याची प्रतिज्ञा केली.

काफिया आणि रदिफ़ यांच्याबद्दल वाचलं, पण तरीही थोडा गोंधळ राहिलाच. प्रत्येक समान ओळीतले शेवटचे दोन शब्द, त्यातला शेवटचा शब्द रदिफ़ आणि त्याच्या आधीचा काफिया असा काहीसा अंदाज बांधला. पण मग तीन शब्द लयीत असले तर शेवटून तिसऱ्याला काय म्हणायचं?प्री काफिया?? जाऊदे ना चक्रमादित्य! इथे शेवटच्या शब्दाचं काय, अक्षराचं यमक सांभाळताना फेफे उडते आणि निघालीय बया तीन शब्दांचं यमक सांभाळायला. मी दोन शब्दांचं यमक बनवायचं ठरवून नियम पुढे वाचायला घेतले.
"गझलेच्या शेवटच्या शेरात गझलकाराचं नाव काहीजणं लिहीतात." ही कल्पना मात्र मला फार आवडली. माझी ही गझल पिढ्यानुपिढ्या काव्यप्रेमी मंडळी गुणगुणणार, त्यांच्या ओठी प्रत्येकदा गझल गुणगुणताना आपलं नाव येणार ही कल्पना मनाला फारच गुदगुल्या करायला लागली. माझं नाव "कनकलतिका","प्रियदर्शिनी","विजयालक्ष्मी","अपराजिता", असं मालगाडीसारखं लांबलचक नसून लहानसं 'अनु' आहे याचा मला अभिमान वाटू लागला.

आता गझल बनवायची म्हणजे वृत्त हवे. तिथेही उजेडच होता. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा ।' म्हणजेच भुजंगप्रयात, 'वदनि कवळ घेता ।', 'शुक्रता ऽऽ रा ऽऽ मंदवा ऽऽऽ रा ऽ' म्हणजेच देवप्रिया सोडून बाकी सर्वच मंडळी जरा अनोळखी होती. भुजंगप्रयातात काहीतरी करायचं ठरवून पुढे वाचू लागले. आता गझल लिहायची म्हणजे विषय हवाच.
लोकप्रिय झालेले गझलेचे विषय हे असे:
१. प्रेम
२. प्रेमभंग
३. विरह
४. मद्य
५. जीवनाचा कंटाळा
मला नक्की कोणत्या विषयाची कास धरावी कळत नव्हतं. म्हणून विषय सावकाशीने ठरवायचं ठरवून लिहायला अस्तन्या सावरल्या. आधी टिपणवहीत काही शब्दांच्या जोड्या लिहून पाहिल्या. दोन शब्दांचा काफिया? काय बरं घ्यावा? शेवटी 'आहे' किंवा 'नाही' या शब्दांचं शेपूट लावलं की एक शब्द निश्चित झाला. आता राहिला शेवटून दुसरा शब्द. तो सहा वेळा जुळवायचा. (मी ज्या ज्या गझला वाचल्या त्यात पहिल्या शेरात दोन्ही ओळीत आणि बाकी उरलेल्या शेरात दुसऱ्या ओळीत काफिया होता. आणि गझल लिहायची म्हणजे कमीत कमी पाच शेर हवे असेही वाचल्याचे आठवत होते.) मी काफियांची यादी करायला घेतली. तशी मी जरा याद्या, तक्ते करण्याकडे जास्त कल असलेली आहे. अभियांत्रिकी परीक्षेत माहिती असलेल्या तुटपुंज्या चार ओळी उत्तरात नीट तक्ते पाडून, खाली रेघा मारुन लिहील्या की त्या सपाट लिहीण्यापेक्षा जास्त मार्क मिळतात या गाढ श्रद्धेतून हा रोग बळावला असावा.

"अमुक तमुक (काहीतरी अक्षर) रडा आहे" असा काफिया घ्यायचे ठरवले. 'कोरडा आहे', 'ओरडा आहे' इथवर ठीक होतं, पण पुढे डोक्यातून 'थेरडा आहे', (शॅमॅलिऑन)'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये निघायला लागल्यावर घाबरुन रद्द करुन टाकले.
"अमुक तमुक (काहीतरी अक्षर)रते आहे" अशा काफियावर आले. पण परत 'करते आहे','भरते आहे','मरते आहे','झुरते आहे','पुरते आहे','घोरते आहे','धरते आहे' याच्या आधीच्या अमुक तमुक जागा भरायला भयंकर त्रास व्हायला लागला. 'मी प्रेम करते आहे, मी तोय भरते आहे','मी खूप घोरते आहे','मी प्रेत पुरते आहे' वगैरे काहीतरी पाट्या टाकल्या असत्या तर प्रतिभावान गझलाकारांनी शाब्दिक बाण मारुन मारुन मलाच पुरायला कमी केलं नसतं.

आपण बापडे 'अमुक तमुक नाही' चा काफिया अजमावून बघुयात.
ह्म्म.."अमुक तमुक रवा नाही".. 'गारवा नाही','थोरवा नाही','मारवा नाही','गुरवा नाही' छ्या! काहीही सुचत नाही पुढे. आपल्याच भाषेतील शब्दांनी गरजेच्या वेळी असा दगा द्यावा? कोण हा दैवदुर्विलास? बरं. 'अमुक तमुक व नाही' कसं वाटतं? 'गाव नाही, पाव नाही, भाव नाही, पाव नाही, साव नाही, राव नाही, शेव नाही, पेव नाही, नाव नाही.' जबरा! किती सुचले. पण पाहिले तर यातले बरेच 'व नाही' एका गझलेत आधीच राबवले होते. जाऊ दे. आता आपण थेट ओळच लिहायला बसू.

"जीव माझा अंतरी या फारसा नाही" लिहीलं आणि पाठ थोपटायला आपला हात जास्त मागे जाणार नाही याची खंत वाटली. ठरलं तर मग. 'अमुक तमुक रसा नाही' असा काफिया. पण मला भूक लागल्याने सारखा 'अनारसा नाही', 'आमरसा नाही' च आठवत होतं. हाकून हाकून 'फारसा नाही', 'वारसा नाही', 'आमरसा नाही' इतकंच आठवत होतं. आता प्रोसेस म्हणजे प्रोसेस. 'रेफर टू डॉक्युमेंट' ची इतकी सवय झालेली की सवतः म्हणून काही सुचायलाच तयार नाही. शेवटी उघडला मोल्सवर्थ शब्दकोष आणि 'रसा' शेवटी असलेले शब्द हुडकले. आणि सगळे 'रसा नाही' असलेल्या ओळी मधे मधे भरल्या. मग त्यांच्या आधीच्या ओळी(यात यमक बिमक पाळायचं नसल्याने त्या जरा सोप्या होत्या.) भरुन काढल्या आणि ही अप्रतिम (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'टुकार!टुकार!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन)गझल जन्माला घातली. (काही छिद्रान्वेषी मंडळी मागून 'पाडली! पाडली!' ओरडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन) माझी ही 'कलाकुत्री' तुमच्या पुढे सादर करते:

"जीव माझा अंतरी या फारसा नाही
आज का न्याहाळला मी आरसा नाही

का मला नाकारले केवळ धनासाठी
(कर्तृत्व माझे,हा पिढ्यांचा वारसा नाही)

प्रेम छोट्याश्या नशेचे मद्य का आहे?
प्रेमकैफाची तुला त्या सुधारसा नाही

ते किती आले नि गेले मोजणी नाही
खूप शोध शोधून तुझा अंगारसा नाही

"अनु" म्हणे ही वेदना तर रोजची आहे
बामचा खोका अता बेवारसा नाही"

कोणाला गझल लिहायची शिकायची असल्यास मला व्यक्तीगत निरोप करावा आणि फी जमा करावी.
-अनु
--------------------------------------------------------------------------------
(डिसक्लेमर: कोणाही गझलकाराचा/गझलेचा/गझला ज्यांच्या खरोखर मनापासून स्त्रवतात त्यांचा अवमान करण्याचा उद्देश अजिबात नाही.माझ्यासारखा तांत्रिक माणूस गझल करायचा प्रयत्न कसा करेल याचा हा कल्पनाविलास आहे.तसेच यातील गझलेची बाराखडी या उल्लेखाबद्दल कविवर्यांची मनापासून क्षमा मागते.तसेच या लेखाचे शशांक यांच्या 'माझी साहित्यविषयक महात्वाकांक्षा' या लेखाशी असलेले साम्य हा योगायोग समजावा.)

Wednesday, 9 May 2007

काय वाट्टेल ते होईल!

पुस्तक : काय वाट्टेल ते होईल!
लेखक : पु.ल.देशपांडे
माहिती :मूळ जॉर्ज व हेलन पापाश्विली यांच्या 'एनिथिंग कॅन हॅपन' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
--------------------------------------------------------------

अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची आत्मकथा.

जॉर्जियामधल्या लहानश्या खेड्यातून फक्त पडेल ते काम करण्याची तयारी आणि जगण्याचा उत्साह एवढंच भांडवल घेऊन एका ग्रीक बोटीने जॉर्जी आयव्होनिच अमेरिकेत प्रवेशतो. किनाऱ्यावर पोहचण्याआधीच या माणसाने खाण्यापिण्यात आपल्याजवळ असलेले तुटपुंजे पैसे संपवलेले. बोटीत शिरलेला एक टोप्या विकणारा जॉर्जीची नवीकोरी रशियन फरटोपी घेऊन त्याला बदल्यात एक डॉलर आणि दुसरी 'अस्सल अमेरिकन' टोपी देतो. 'अमेरिकेत गुजराण होण्याइतका पैसा' असल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी नाही. पण नोटांचे एक बंडल भाड्याने देणारा त्यांच्यातलाच एक माणूस जॉर्जी ला भेटतो आणि हे नोटांचे बंडल दाखवून झाल्यावर परतीच्या बोलीवर एक डॉलर भाड्याने घेऊन जॉर्जी अमेरिकेत प्रवेश करतो आणि अमेरिकेत आल्याआल्या परदेशी असल्याचा पुरावा असलेला आपला पासपोर्ट फाडून टाकतो.

जॉर्जीचा अमेरिकेतील मार्ग खडतर आहे. त्याची आपल्या देशात वाखाणली गेलेली कौशल्ये, म्हणजे तलवारींना धार लावणे आणि चाबकाच्या चामडी मुठींवर नक्षीकाम करणे, यांना अमेरिकेत स्थान नाही. मित्र झुराबेगच्या मदतीने त्याला एका उपाहारगृहात बश्या-ग्लासे विसळायची नोकरी मिळते. पण पहिल्याच दिवशी धांदरटपणाने सर्व ग्लास फुटल्याने मालकीण त्याला नोकरीवरून जायला सांगते. ती निघताना त्याला देणार असलेले पाच डॉलरही जॉर्जी बाणेदारपणे नाकारतो. 'मी काम केलंच नाही तर पैसे कशाला घेऊ' म्हणून तो परत रिकाम्या पोटी आणि रिकाम्या खिशाने बाहेर पडतो. रात्री बाकावर झोपलेला असताना त्याच्यासमोर बंद पडलेली एका अमेरिकनाची गाडी तो चालू करून देतो आणि हा मनुष्य त्याला त्याच्या गॅरेजात नोकरी देतो.

जॉर्जीच्या या आत्मचरित्रात त्याने अनेक नोकऱ्या धरलेल्या आणि सोडलेल्या दाखवलेल्या आहेत. हा माणूस कोणत्याही अडचणीने आणि अपयशाने खचला नाही. जॉर्जीला गॅरेजात नोकरी देणारा माणूस काही कारणाने त्याच्या गावी निघून गेला. मग जॉर्जीने प्लॅस्टरचे साचे बनवणाऱ्या छोट्या कंपनीत नोकरी धरली. ही नोकरी सुटण्याची कथा मोठी मजेशीर. जॉर्जीच्या शब्दातच सांगायचं झालं तर 'पेंटरसाहेबांनी मला उंटाचा ठसा करायला सांगितला. हा उंट अगदीच गायीसारखा दिसत होता. हे असलं येडंबिद्रं जनावर बनवायची मला अगदीच शरम वाटायला लागली. म्हणून मी इकडेतिकडे अदलाबदल करून त्याला जरा उंटांत आणायला गेलो. पेंटरसाहेबांनी हे पाहिलं. आपण लंडन, प्यारीस, ड्रेसडेन या गावांतल्या शाळांतून चित्रकलेचं शिक्षण कसं घेतलं हे सांगायला सुरुवात केली. आता जाताजाता माझा प्वाइंट इतकाच होता की या गावांत उंट राहत असल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. झालं! आम्हाला तिथूनही नारळ मिळाला.' पुढे जॉर्जीची एका गोंदाच्या कारखान्यात नोकरी, तिथून इंग्रजी येत नसल्याने त्याला मिळालेला डच्चू, नंतर एका लाँड्रीत मिळालेली,विशेष न आवडणारी पण पोटापुरते देणारी नोकरी अशा अनेक नोकऱ्या धरसोड करून जॉर्जी शहरेही बदलत राहतो.

स्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर पण बहुतेकदा शक्यतो सत्याची कास धरणारा जॉर्जी आयव्होनिच मनाला भिडतो. जॉर्जीला पोट भरण्यासाठी नोकरीची गरज आहे. पण त्यासाठी त्याला दुसऱ्याचे पाय ओढायचे नाहीत.संपावर गेलेल्या कामगारांना 'काम तुमच्याशिवाय चालू आहे' हे दाखवून जेरीस आणण्यासाठी जॉर्जीला आणि इतर मोजक्या परदेशी माणसांना मिस्टर ब्लॅक नावाचा कारखानदार जवळजवळ दुप्पट रोजावर ठेवतो. इंग्रजी न कळणाऱ्या जॉर्जीला हे आपल्या रशियन सहकाऱ्यांकडून नंतर कळते.'मी स्वखुशीने नोकरी सोडून जात आहे' असे पत्र साहेबाकडून मागायला तो साहेबाकडे जातो. साहेब त्याला 'संपवाले बाहेर गेल्यावर तुला मारतील' अशी भीती दाखवतो. जॉर्जीचे त्यावर उत्तर 'एखाद्याची मी बायको चोरली..पैसे, पोरं चोरली तर तो मला रस्त्यात थांबवून जाब विचारेल. पण एखाद्याची चाकरीच चोरली तर हे सगळंच चोरल्यासारखं आहे. तो मला बडवेल नाही तर काय करेल? मर्द असला तर असंच करेल.'

फुले तोडत नसतानाही मित्रांनी फुले तोडली आणि हा फुले हातात घेऊन उभा म्हणून जॉर्जीला शिपाई पकडतो आणि कोर्टात बोलावणं येतं. इतर कामगार मित्र एक दिवसाचा पगार बुडेल म्हणून कोर्टात न जाता दंड पाठवून देण्याचा सल्ला देत असतानाही 'मी गुन्हा केलेला नसताना केला का म्हणू' म्हणून जॉर्जी कोर्टात जातो.जज्जाने विचारल्यावर पाठ केलेलं एकमेव इंग्रजी वाक्य पण चुकीचं बोलतो. 'नाकबूल,युवर ऑनेस्टी!' म्हणतो. जज्जाने 'जॉर्जियात असताना कोणाचा खून, चोरी वगैरे केली आहे का?' 'खून ना, शेकड्याने केलेत. नंतर मोजणं पण सोडून दिलं' असं बेधडक उत्तर देतो. आणि जज्ज बुचकळ्यांत पडल्यावर 'कामच होतं आपलं,साहेब. दिसला जर्मन की घाल गोळी. सैन्यात होतो मी.' असे सांगतो. जॉर्जी प्रामाणिक आहे.लाच देऊन गोष्टी गुंडाळण्याऐवजी तो पैसे गेले तरी बेहत्तर, पण स्वतःचं निरपराधीत्व पटवून देण्याला जास्त महत्त्व देतो.

मूळ इंग्रजी पुस्तक अद्याप वाचायचा योग आला नाही, पण पु. लं. ची भाषा इतकी खुमासदार आहे की हे अनुवादीत पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतेच. "आनाबाईशी बोलणं म्हणजे भिजल्या स्पंजाशी बोलण्यागत. जरा दाबलं की पाणी!" लग्नाच्या मेजवानीत मुसे(डेझर्ट) आणू म्हटल्यावर "मुसे बिसे ठीक आहे. मी कबाब करीन(मला वाटलं मुसे म्हणजे हरणासारखं काही तरी असेल.)" दोन बुटांना पॉलिशसाठी दोन पोरं बोलावणाऱ्या मिस्टर ब्लॅकला बघून "बरं झालं हा आठ पायाचा कोळी नाही,नाहीतर पायाशी पालिशवाल्या पोरांची पलटणच बसवावी लागली असती" "ल्यूबा तर आपलंच शेपूट आपणच तुडवलेल्या मांजरीसारखी फुसफुसत होती",जॉनकाकाच्या अंत्यसभेत "लोकांनी त्याच्या गुणाची वर्णनं करणारी भाषणं केली‍. जॉनकाकाला त्याची गरजच नव्हती.त्याने केलेली सत्कृत्यं त्याच्या पेटीभोवती जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर ठळक अक्षरात लिहिलेली होती.त्यांच्या मेणबत्तीच्या प्रकाशात चमकणाऱ्या आसवांच्या हिऱ्यात तोलली जात होती" हे वर्णन, "आम्हाला त्यांच्या विशाल टेबला भोवती बसण्याचा मान मिळाला आहे. हे विशाल टेबल म्हणजे अमेरिका. खूप वर्षं आम्ही त्या विशाल टेबला भोवती गोळा होऊन आमचा जो जो पाहुणचार ते करतायत त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करीत आहो. चांगले पाहुणे म्हणून राहण्याचा आमचा प्रयत्न आहे." ही चालिकोची आणि इतर परदेशी माणसांची अमेरिकेविषयी कृतज्ञता ही सर्व वाक्ये मनाला भिडून आपल्याच मनातलं काहीतरी आपल्यापुढे आणून जातात. जॉर्जी अमेरिकन मुलीशी लग्न करायला निघतो तेव्हा त्याच्या इतर मित्रांनी त्याला दिलेले सावधगिरीचे इशारे, "अमेरिकन मुली बोजट(बजेट) बाळगतात. म्हणजे तुला काही खर्च करण्यापूर्वी त्यात मांडून ठेवावं लागतं लग्न झाल्यापासून सहा महिन्यात नुसत्या शरमेनेच खतम होशील! आणि तुझी मर्तिकाची पेटी उचलणाऱ्यांना पण जेवण मिळेल असं समजतोस? छट! फार फार तर एक कप चहा!" आणि यावर जॉनकाकाचे समजूत घालणे "त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे. जी काही नुकसानी व्हायची ती झाली आहे.फिकीर करू नकोस, बिजो बेट्या! वीस वर्षं आपली तुपली दोस्ती आहे. इथून तुटणार नाही." जॉर्जी हा माणसातला आणि माणूसवेडा माणूस आहे. "प्रत्येक कुटुंबात एक आजी हवी.त्याशिवाय घराला शोभा नाही." हे लग्न ठरल्यानंतर त्याचे आजेसासूबद्दलचे उद्गार अगदी आपल्या संस्कृतीतलेच वाटतात.

पैसे कमावायला जोडधंदा म्हणून कातड्यासाठी सोनेरी कोल्हा कोल्ही पाळणे, 'खिंकाली' बनवून विकणे,अधेमधे शोध लावणे, शेती करणे,जॉनकाकाचा सँडविच चा धंदा चालवणे, भंगारवाल्याचं दुकान काढणे असे अनेक उद्योग जॉर्जी करताना दिसतो. हा माणूस हरहुन्नरी आहे. आपल्या धडपड्या आणि सव्तःची पर्वा न करता इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तो कधीकधी अडचणीत सुद्धा सापडतो. डिट्रॉय शहरात सट्टेबाजारामुळे मंदी आल्यावर स्वतःची नोकरी शाबूत असूनही "इतर पोराबाळांच्या धन्यांच्या नोकऱ्या सुटलेल्या पाहून मला माझी नोकरी टिकवून धरणं पटेना.मीही सोडली." म्हणून तो भंगाराचे दुकान चालू करतो.त्याची घरमालकीण आनाबाई तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना सोबत म्हणून जॉर्जीलापण शहर सोडून कॅलिफोर्नियाला यायला विनवते.आनाबाईचे वडील जॉर्जीला विश्रांती देण्यासाठी थोडावेळ ट्रक चालवतात तेही ट्रक गाळात रुतवून जॉर्जीला आणखीच अडचणीत आणतात. रेड इंडियन लोकांकडून ट्रक बाहेर काढून घेण्याच्या प्रयत्नात जॉर्जी असताना ते रेड इंडियन म्हणून त्यांच्याशी आनाबाई आणि कुटुंबीय फटकून वागतात. वाटेत प्रवासखर्चाचे पैसे कमी पडल्यावर सामान विकून सगळे पुढे जाण्याचा सल्ला नाकारून जॉर्जी आणि नादुरुस्त सामानाच्या ट्रकला एकटे सोडून इतर मंडळी पुढे निघतात. इतरांमुळे आलेल्या अडचणींवर मात करत आणि तरीही कोणाविषयी मनात कटुता न ठेवता परत इतरांना मदत करत जॉर्जीची जीवनाची वाटचाल चालू आहे.

'जॉनकाका' हेही एक आगळं पात्र. ऐंशी पंचाऐंशी वर्षाच्या आसपास वय असलेला हा रशियन एक कुशल स्वयंपाकी आहे. पण त्याला पैशाची हाव नाही. एक छोटं उपाहारगृह चालवून आणि बऱ्याच गरजू माणसांना फुकटात जेवू घालून आधार देणं ही त्याची हौस.जॉर्जीला ब्लाडिओस्टॉकमध्ये योगायोगानेच भेटलेला हा म्हातारा त्याच्या रुक्ष उमेदवारीत थोडी रंगत आणतो.अमेरिकेतही जॉनकाका आलाय म्हटल्यावर जॉर्जी त्याच्या शहरात जाऊन सर्व हॉटेलं बघून त्याला शोधून काढतो. जॉनकाका जॉर्जीच्या लग्नातही त्याला भरघोस आहेर आणि मदत करतो. चांकोसारखा अर्धवट माणूस जवळ बाळगतो. कारण चांकोला जगानं वेडा ठरवलं, दगडं मारली तरी "जग सर्वांसाठी आहे" या तत्त्वाने जॉनकाका त्याला आपल्या हाताशी घेतो.मरणाच्या काही दिवस आधी जॉनकाका धंदा विकून आलेल्या पैशातून सर्व मित्रांना किंमती भेटवस्तू घेण्याच्या उपद्व्यापात असतो. सँडविचचा धंदा जॉर्जीला सांभाळायला देऊन तो आजारी मित्र बोरीसला पाहायला निघून जातो. धंदा तोट्यात चालत असल्याचं जॉर्जीने कळवल्यावरही "येईल त्या किमतीला विकून टाका. धंदा परत उभा करता येईल पण बोरीससारखा मित्र परत नाही मिळणार" असे कळवून धंद्यावरही पाणी सोडतो."पेट्रोग्राडला आयुष्य इथल्यासारखं भरभर जात नाही" म्हणून मोठ्या शहरात आचारी बनणं टाळून छोट्याश्या शहरातच आपली खाणावळ चालवतो. जॉर्जीची बायको हेलेना हिला लग्नानंतर निरोप देताना तिच्या कानात "जॉर्जियन माणसाला वाढत असशील तर त्याच्या पानात भरपूर वाढ. तेव्हा कुठे त्याला ते बेताचं वाटेल" असा सल्ला देतो.

हेलेना ,जॉर्जीची बायकोही एका परदेशी माणसाशी लग्न करून संसारात जुळवून घेणारी. त्याच्या मित्रांचा आणि आल्यागेल्यांचा अगत्याने पाहुणचार करणारी. हुशार आणि नवीन चालीरीती शिकण्यासाठी उत्सुक असलेली. आणि विशेष म्हणजे "अमेरिकन मुलीशी लग्न करणं म्हणजे मोठी आफत पत्करणं" हा जॉर्जीच्या मित्रांचा ग्रह आपल्या अगत्यशीलतेने खोटा ठरवणारी. जॉर्जीला तिच्याविषयी वाटणारा अभिमान पुस्तकाच्या पानापानातून जाणवतो.

पुस्तकातले काही प्रसंग मजेशीर आहेत. भटारखान्यातून फुगणाऱ्या पावाच्या कणकेला बसमधल्या बाईने घाबरून रशियन माणसाने बाळगलेला बाँबगोळा समजणे, जॉर्जीने जुन्या बॅटरीतले शीसे वितळवून ते चाकाच्या सांध्यात ओतून दुसऱ्या मोठ्या गाडीचे चाक आपल्या ट्रकाला बसवणे, जमिनीच्या व्यवहारात जॉर्जीला फसवणाऱ्या दलालाला झापून पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या मित्रांनी दलालाच्या भाषणाने प्रभावित होऊन स्वतःही जमिनीसाठी नाव नोंदवणे,उकाड्यात फक्त अर्ध्या चड्डीवर घड्याळ दुरुस्त करत असलेल्या जॉर्जीने शेजारीणबाई आलेली पाहून मोठ्या घड्याळात लपणे आणि घरातल्या वस्तू तिला कौतुकाने दाखवताना हेलेनने त्याच घड्याळाचे दार उघडून दाखवणे,चांकोने पाव डॉलरच्या सँडविचच्या काही खोक्यात एक एक डॉलर लपवून ठेवून विक्री वाढवणे,'बेथलेम' चा उच्चार फोनवर नीट न सांगितल्याने हेलेनच्या मैत्रिणीने जवळपासच्या सर्व गावांत जाऊन पाहणे, इलारियनचा नर्व्हस ब्रेक डाउन मारामारी केल्यावर बरा होणे इ.इ.

पुस्तकाविषयी आणखी एक विशेष म्हणजे मूळ पुस्तकातील कोट्यांचे शब्दशः भाषांतर न करता समांतर मराठी शब्दप्रयोगांतून विनोदनिर्मिती. जॉर्जी लहानपणी पाण्यात पाहिलेल्या राक्षसांच्या(?) कवट्यांविषयी सांगत असताना मिस्टर मॉकेट त्याला विचारतात: "मग तुम्ही यावर एखादा प्रबंध नाही लिहिला?" जॉर्जीला "प्रबंध" शब्द न कळून "मी कशाला त्यांना प्रतिबंध करू" असे विचारतो. पुस्तकातली खाद्यपदार्थाची नावे आणि वर्णनेही रुचकर आहेत. '(खिमा भरलेल्या करंजीसारखी)खिंकाली','अंड्याची कचोरी उर्फ पिरोष्की','नऊ थराचा बकरीच्या लोण्याचा स्कापोर्सेला केक','लसणाच्या चटणीबरोबर कबाब','चाचोबिली(टॉमेटोत शिजवलेले मटन)','मर्तिकाचा मसालेदार शिलापुलाव','संत्र्याचा रस आणि व्हिस्कीची बनवलेली 'बायलो'','अंड्याचं लोणचं','अनेस्पेंदाल','लिंबाच्या फोडी तोंडात ठेवून भाजलेला कलमाकी मासा','गाभोळीचं लोणचं','बेशे(उकडलेल्या मुळ्या घालून बनवलेली सागुती)','चुचकेला म्हणजेच पाकात घोळवून ओवलेली द्राक्षांची माळ' या पदार्थांबद्दल कुतूहल चाळवतं. तसेच "नमस्कार! युद्धात शत्रूपुढे तुमचा सदैव विजय असो!" हा एका जॉर्जियनाने दुसऱ्या जॉर्जियनाला केलेला रामरामही मजेशीर वाटतो.

शेती न जमल्याची जॉर्जीची कबुली पण प्रांजळ आहे."धरती ओळखते" म्हणून मेहनतीला मागेपुढे न पाहता भरपूर खपून स्वतः केलेली टॉमेटोची शेती वादळ आणि दलालांच्या व्यवहारांमुळे तोट्यात जाते तेव्हा असं का याचा विचार करताना जॉर्जी म्हणतो, "स्वतःच्या जमिनीवर आपल्या दोन हातांनी राबणाऱ्याला शेतीवर भाकरी मिळवता येऊ नये?शक्य नाही.तसं असेल तर या जगाची सुरुवातच कशी झाली? दुसरं एखादं कारण असेल.पण कोणतं कारण??" "फक्त हौस आणि दुय्यम धंदा म्हणून सुकलेली फळफळावळ आणि मोरांचं संगोपन एवढंच केलं नव्हतं" या शब्दात त्याचं शेतीच्या प्रयोगांबद्दलचं वर्णनच पुरेसं बोलकं आहे.

या साऱ्या अनुभवांतूनच जॉर्जीला अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर आलेला आणि अनेक वर्षे अमेरिकेत राहून कायम असलेला अनुभव पक्का होत जातो. "अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं.काहीही होईल.काय वाट्टेल ते होईल."

जॉर्जीचं आत्मचरित्र अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या आणि स्थायिक झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास रंगतदारपणे रेखाटतं. पु. लं. च्याच प्रस्तावनेतील शब्दात सांगायचं तर-
"सर्वांनी एकत्र बसून जेवावे, खावे,प्यावे,क्षुद्र भेदाभेद विसरावे,आनंदात राहावे या प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो.दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत. हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणाऱ्यांसाठी केले आहे."

दुसऱ्या देशात त्या देशाबद्दल काहीही माहिती नसताना व भाषाही येत नसताना येऊन आपला जम बसवणाऱ्या या हिकमती जॉर्जियन माणसाची कथा सर्वांनी अवश्य वाचावी अशी वाटते.

(अनुराधा कुलकर्णी)

Wednesday, 11 April 2007

मृत्यूशय्येवर होम्स

इथे चिकटवायला कंटाळा आला.हा भाग माझ्या जिओसिटीज च्या पानावर पहा.

Tuesday, 3 April 2007

आवराआवरीचा क्रॉनिक आजार

रविवारचा सुंदर दिवस. सकाळचे ८.३०. 'टॅडॅडँग टॅडॅडँग'(आम्ही 'वेध भविष्याचे' ला त्याच्या संगीतावरुन हे नाव दिले आहे) ला अजून अर्धा तास वेळ आहे. बाहेर बदाबदा पाऊस पडतो आहे. कोणाच्याही आतेमामेभावाचं, भाच्याचं लग्न नाहीये. कोणीही विमा एजंट योजना समजवायला येणार नाहीये. कोणीही आपल्या नुकत्या झालेल्या परदेशदौऱ्याचे फोटो दाखवायला घरी येणार नाहीये. किंवा कोणीही घरी बोलावले नाहीये. नवऱ्याच्या चुलतमावसबहीण चिंगीचे मावसकाका पुण्यात चक्कर टाकून रविवारी घरी भेट देऊन जाणार नाहीयेत. आणि अशावेळी आतापर्यंत दबून राहिलेला आवराआवरीचा आजार डोकं वर काढतो.

सुरुवात होते ती कपड्याच्या कपाटापासून. 'शी, किती पसरलंय! आवरायलाच पाहिजे.' मग त्वेषाने सर्व कपडे खणातून खाली जमीनीवर भिरकावले जातात. नवरा पलंगावर आडवातिडवा लोळत पेपर वाचत असतो. तो घाबरुन उठतो. त्याच्यापुढे पुढचे दोन तास आवराआवर आणि 'वर चढून हे काढ, ते ठेव' चं भीषण आज्ञापालन दिसायला लागतं. 'आता हे काय काढलंस? घड्या तर होत्या ना कपड्यांच्या? मग का सगळे खाली टाकलेस? मुळात दर आठवड्याला कपडे अस्ताव्यस्त होतातच कसे? मिसमॅनेजमेंट.'
'बाबा रे, एकतर शांत पेपर वाच नाहीतर मला मदत कर.तुझे कपडे हँगरला असतात. तुला काय कळणार बायकी कपड्यांच्या रचारचीतल्या यातना? मी आज कपडे व्यवस्थित लावल्याशिवाय 'टॅडॅडँग टॅडॅडँग' बघणार नाहीये.तूच माझी रास बघून ठेव.'
'मी मदत करणार नाही. मी रचलेलं काही तुला पटत नाही. तुझं तू आवर, काय वाट्टेल तो गोंधळ घाल. मी बाहेर पेपर वाचतो.' नवऱ्याचे रणांगणातून पलायन.

लहानपणी आईला कपड्यांचं कपाट आवरताना बघायचे तेव्हा मी विचारायचे, 'आई, आपण जर एका खोलीत चार पाच मोठ्या दोऱ्या टांगल्या आणि कपडे कायम त्या दोऱ्यांवर ठेवले तर? घड्या करायचा आणि कपडे आवरायचा सवालच नाही!'
'इथे शहरात घरात माणसांना रहायला खोल्या मिळत नाहीत आणि तू कपड्यांना एका खोलीची गोष्ट करतेस. उद्या म्हणशील धुतलेली भांडी लावूच नकोस,एक मोठ्ठी टोपली आणून त्यातच धुऊन त्यातच राहूदे.'
'हो मी पुढे तेच सांगणार होते तुला.'
'महान आहेस. मोठी झालीस की कळेल हं तुला! आता मला काम करु देत.'

आता बायकांचे कपडे म्हणजे कसे विविधरंगी, विविधआकारी आणि सुळसुळीत. साहजिकच कपड्यांचा रचलेला बुरुज रोज खणातून कपडे ओढून काढताना ढासळणार. ढासळलेला बुरुज रोज तात्पुरता उभा राहणार. शेवटी एक अवस्था अशी येणार की बुरुज नुसती हवा लागली तरी ढासळेल. म्हणजे बुरुज परत दोन तास खर्च करुन नीट बांधणं आलं.

कपड्यांनंतर समोरचं अस्ताव्यस्त पसरलेलं टेबल भेडसावायला लागतं. नाहीतरी चार दिवसापूर्वी आलेलं बँकेचं चेकबुक शोधायचं असतं. त्यामुळे हेही काम 'आधी लगीन कोंडाण्याचं' मध्ये जातं. कागदं भसाभसा उपसली जातात.
'अरे आत ये आणि मला सांग तुझ्या कागदातलं काय काय फेकायचं आहे ते.'
'सध्या माझ्या कपाटात कोंब. मी पुढच्याच्या पुढच्या शनिवारी कपाट आवरणार आहे तेव्हा बघीन.' (नवरा 'शॉर्ट टर्म प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍप्रोच' चा उपयोग करुन पेपरवाचनातील व्यत्यय टाळतो.)
'आत ये आणि मला माळ्याच्या कपाटातल्या माझ्या अभ्यासाच्या जुन्या फायली काढून दे.'
'माळ्याचं कपाट' म्हटल्यावर नवऱ्याला काम टाळताही येत नाही कारण ते 'उंची' मुळे कायम त्याच्या वाट्याला गेलेलं.
'हे काय गं? सगळा पसारा एकाच दिवशी काढायलाच पाहिजे का? टेबल पुढच्या रविवारी आवरलं तर नाही का चालणार? आणि अजून किती कागदं गादीखाली दडपणार?गादीला आलेल्या टेंगळांनी पाठ दुखते. अशाने एक दिवस गादीखाली सर्व कागदं जाऊन आपण टेबलावर झोपायची वेळ येईल.'
'ते गादीखालचं मी आवरणार आहे पुढच्या रविवारी‌. सध्या राहूदेत.'

मग पुढे टप्प्याटप्प्याने 'सखू येईपर्यंत स्वयंपाकघरातलं शेल्फ आवरणे', 'फ्रिज साफ करणे' 'बाहेरचे रद्दीचे कपाट आवरणे' ही कामं वेळापत्रकावर येतात. आजार गंभीर स्वरुप धारण करु लागतो..
'मी केस कापून आणि वडे घेऊन येतो. तुझ्या आवरा आवरीत लवकर काही पोटात जाईल असं वाटत नाही.'
'अर्धा तास थांब आणि मी कपाटातली सॉर्टेड रद्दी देते ती घेऊन जा‌. सॉर्टेड रद्दीचे दोनचार रुपये जास्त मिळतील.'
'त्याच्यासाठी थांबलो तर न्हावी बंद होईल.रविवारी फक्त ३ तास उघडा असतो.' असं म्हणून नवऱ्याचे गनिमी काव्याने घराबाहेर प्रयाण.

तरी बरं का, हे शेल्फ एक महिन्यापूर्वी नव्हतं. तेव्हा इथल्या वस्तू कुठे असतील बरं? आता तर त्यांना दुसरी जागा पण नाही. वस्तू अशा जादूने द्याल तितकी सगळी जागा कशी व्यापतात?आता काढलेल्या वस्तू कुठे ठेवायच्या?हां, सध्या माळ्यावर टाकू. नंतर बघता येईल. म्हणून सर्व वस्तू माळ्यावर दडपल्या जातात.चादरी वॉशिंग मशिनात टाकून साबण आणायला न्हाणीघरात जावं तर न्हाणीघराच्या कपाटातून चार साबण आणि एक टूथपेस्ट आत्महत्या करते..देवा रे! मुळात इतके साबण शिल्लक राहतातच कसे? या घरातले लोक आंघोळ करतात की नाही?

'स्वयंपाकघर आवराआवरी' हा सर्वात भीषण प्रकार. घाई म्हणून, गरज लागेल म्हणून वेळोवेळी घेतलेल्या आणि जपलेल्या अनेक वस्तू आणि त्यांच्यामुळे होणारी अडथळ्याची शर्यत.'आवरायला कशापासून सुरु करायचं' हा सर्वात मोठा प्रश्न असतो. रांगत रांगत मी ओट्याखालच्या अरुंद जागेत जाते.
'जपून हं ढोले! तिथे अडकशील!'
'कळलं! इतकी विशाल झालेली नाही अजून मी.'
ओट्याखालचा संसार बघून मला भंगारवाल्याचा दुकानात आल्याचा भास होतो. तिथे नारळ, प्लॅस्टीकच्या पिशव्या, पोळपाट, विळी, मिक्सरचे खोके यांच्या गर्दीत जमिन दिसतच नसते. जरा अंधाराचा अंदाज घेऊन शोधाशोध करते तोच एक प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा मनोरा खाली कोसळतो. कोकाकोला, कधीकाळचे कोकम सरबत, मँगोला, बिस्लेरी अशा अनंत बाटल्या.
'काय हे? काहीतरी अडगळ जमा करुन ठेवत असतेस'
'इतके वाटते तर दर आठवड्याला कोकाकोला पित नको जाऊस.'
'बाटल्या मी फेकत असतो पिऊन. तू परत साबण घालून धुवून का ठेवतेस?'
'असू दे. पाहुणे आले की त्यांना जाताना पाणी न्यायला लागतात.'
'पण तोपर्यंत त्या १८५७ च्या बंडातल्या काळातल्या दिसतात ना! परवा ते काका धूळ जमलेली जुनाट बाटली बघून घाबरुन 'मी प्रवासात पाणी पित नाही' म्हणून तसेच निघाले ना!'
'असू देत. मला त्या अर्ध्या कापून त्यात फुलं ठेवायला लागतात'
'किती भिकार दिसतात अर्ध्या कापलेल्या बाटलीत ठेवलेली फुलं. त्या दिवशी अशीच कोपऱ्यात फळीवर ठेवलेली बाटली भर रात्री माझ्या डोक्यात पडून झोपेतून दचकून उठलो. बघतो तर डोक्यावर निशीगंधाची फुलं. बनियानवर पाणी आणि गादीवर चेपलेली कापलेली बाटली. यापुढे फुलं फळीवर अजिबात ठेवायची नाहीत. वाटलं तर फुलं गादीवर ठेव बहुमानाने. मी बापडा त्या ४ बाय ५ इंचाच्या फळीवर झोपतो. शेवटी काय, फुलं महत्वाची. नवरे काय, पैशाला पासरी मिळतात.'
अजिबात समजतच नाही या माणसांना! आता बाटल्या फेकायच्या आणि मग लागल्या की प्रवासात पाण्याच्या बाटल्यांना पंधरा पंधरा रुपये टिचवायचे. मी पण बाटल्या निमूट एका पिशवीत ठेवून कचऱ्याजवळ ठेवते. (नंतर गुपचूप परत ओट्याखाली!)

तितक्यात सासूबाई येतात. 'त्या श्रीखंडाच्या रिकाम्या डब्या फेकू नका हं! मला लागतात फराळ द्यायला.'
फ्रिजच्या आवरणाची लक्तरे झालेली. 'ए थांब ते फेकू नको! मी त्याचे चांगले भाग कापून शिवून मायक्रोवेव्हचे कपडे बनवणार आहे.'
'पण बाजारातून एक मायक्रोवेव्हचं कव्हर विकत आणायला प्रॉब्लेम काय आहे?'
'कशाला आणि खर्च?'

फ्रिजमधे सोड्याच्या बाटल्या, १८५७ मधील आले पाचक, कोकम सरबत, कधीकाळी केलेली मिरचीची चटणी, सॉसेस यांच्यासमोर मी हतबुद्ध होऊन खाली बसते. दुपार काय, संध्याकाळपर्यंत पण हा शीत डोंगर साफ व्हायचा नाही. मनाचा हिय्या करुन आधी भाजीच्या कप्प्यावरची काच धुवायला ओट्यावर टेकून ठेवते. दुसऱ्याक्षणी काच उभ्याची आडवी होऊन ओट्यावरील चहाच्या कपाचा मोरीत ढकलून खिमा करते.
'कुठे म्हणून न्यायची सोय नाही तुला. कायम फोडाफोडी. चांगले सहा एका रंगाचे कप फळीवर बघवतच नाहीत का तुला?'
'कप ओट्यावर कोणी ठेवला ते आठव.फळीवर ठेवला असतास तर हे असं झालं नसतं!'
'हो हो! तुम्ही कायम शहाणे. आम्ही मूर्ख. आधीच रविवारची अर्धी दुपार गेलीच आहे, उरलेली छान भांडणात घालवू.आता पुढच्या रविवारी ऑफिसात गेलो तर मला दोष नाही द्यायचा.' नवरा बाडबिस्तरा आवरुन संगणकाकडे मोर्चा वळवतो.

'हे काय? इस्त्रीला द्यायच्या कपड्यात माझा बनियान?उद्या फडकीही द्याल हो इस्त्रीला.' (अरे बापरे!काल कपडे घाईघाईत दांडीवरुन काढून न बघताच टाकले..)
'हो. आम्ही लंगोट्या पण देऊ इस्त्रीला. तुला काय करायचंय? स्वतः कधी काढतोस का कपडे?डोन्ट हाक शेळ्या सिटींग ऑन ऊंट.'
'आँ?? मी कपडे काढण्याचा इथे काय संबंध?'
'शब्दशः विनोद करुन वात नको आणूस रे. स्वतः दांडीवर वाळत टाकलेले कपडे दांडीवरुन काढतोस का? असं मी म्हणत होते.जा बाबा, तुझं काम कर. इथलं आवरलं की मी बोलावते जेवायला.'

समोरचे फ्रिजमधील ब्रम्हांड बघून आता आवराआवरीचा उत्साह जरा ओसरायला लागतो. मग धपाधप ओल्या फडक्याने पुसून १८५७ मधले सर्व पदार्थ तसेच्या तसे ठेवून मी फ्रिज बंद करते. ओटा आवरण्यासाठी ओट्यावरील दिसतील ती सर्व भांडी, तांब्याचा जग, पाण्याची टाकी सर्व धुवायला टाकते.
'अरे पण सखू आली का नाही अजून?'
तितक्यात बेल वाजते. 'सखूने पाठाव्लं. ती आजारी हाय. आज येनार नाय.'

'अरे देवा! आधी सांगायचं नाही का रे?आम्ही बाकी कामं जरा कमी केली असती..'
आता पुढे भांडी, मग यंत्रात धुणी..मग झाडू..माझ्या डोळ्यापुढे अंधार पसरतो.
सगळं आवरतं एकदाचं.
'हुश्श! यापुढे मी कमीत कमी पाच रविवार तरी काहीही आवरा आवरी करणार नाही.'
'तू काही करुच नकोस. पुढच्या रविवारी मी माझं कपाट आणि फायली आवरणार आहे. तू फक्त तिथे बसून काय काय कुठे कुठे ठेवायचं ते वेगळं काढ.'
(वाचवा!वाचवा! आवराआवरीचा आजार परत बळावला!)

(हा लेख सर्वप्रथम २००६ मधे मनोगत डॉट कॉमवर प्रकाशित.)

Monday, 19 March 2007

एका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय?

आजचा दिवसच जरा 'मनहूस' दिसतोय. सकाळी सकाळी माझी आवडती गुलाबी केसांची (केस गुलाबी नाही हो, पिन गुलाबी.) पिन तुटली. नंतर 'अनुपस्थितीत आलेल्या भ्रमणध्वनीच्या सूचनेसाठी'(याला आंग्लभाषेत 'मिस्ड कॉल ऍलर्ट' म्हणतात.) पंधरा रुपये भ्रमणध्वनीच्या शिलकीतून हकनाक कटले. 'हवादूरध्वनी' च्या ग्राहक सेवेतील महान मनुष्याने दुरुत्तरे केली. आणि सर्वात वाईट म्हणजे तीन महिन्यापूर्वी पाठवलेल्या आणि काल पाठवलेल्या अशा दोन्ही प्रोग्राममध्ये ढेकूण (बग) निघाले.

तरी मी काल विचार करतच होते. दिलेल्या वेळेच्या दोन दिवस आधी प्रोग्राम,चाचण्या(टेस्टिंग) आणि कागदोपत्री(डॉक्युमेंटेशन),आणि सुपूर्तीकरण(सबमिशन) पण पूर्ण? कही मै सपने मे तो नही? मुंग्यांनी मेरुपर्वत तर नाही ना गिळला??वडवानलाने समुद्र तर नाही ना प्यायला?? बाजारात फ्लॉवर दोन रुपये किलो तर नाही ना झाला?

मी आपल्या कुत्र्याची (कुर्त्याची हो! या आजच्या हतबल अवस्थेत थोडी शब्दांची उलटापालट होणार‌.समजून घ्या.) नसलेली कॉलर ताठ करत आसपासच्या कामं पूर्ण न झालेल्या क्षूद्र मानवांकडे अभिमानाने पाहत होते. मी 'पुढची नोकरी मायक्रोसॉफ्ट किंवा सन किंवा बोरलँडमध्ये करावी. ती मंडळी नक्की लाल पायघड्या पांघरुन आपली वाट पाहत असतील' अशी मनाला गुदगुल्या करणारी स्वप्नं बघत होते. तितक्यात ईपत्रपेटीत प्रोग्राममधल्या चुका दाखवणारा संदेश आला.

'तुझा प्रोग्राम दहा वेळा सलग वापरल्यावर त्याच्या निकालातील संख्या वाढतात' (स्वगत: अरे अजाण टेस्टर बालका, दहा महिने पैसे बँकेत ठेवल्यावर तुझे पैसे नाही का वाढत?),
'प्रोग्राममधील एकके(युनिटस) सलग तीन वेळा बदलल्यावर निकाल शून्य येतो'(स्वगतः चालायचंच! शेवटी एक ब्रह्म हे सत्य आणि बाकी जीवन, पैसा,प्रोग्राम हे सर्व मायाच आहे ना? मग या मायावी गणिताचं उत्तर शून्य आलं तर बिघडलं कुठे?)
ही बारीक निरीक्षणे वाचून मी मनातल्या मनात टेस्टरला म्हटले, 'मान गये! आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोको.' निमूटपणे आंतरजालाची मोहवणारी खिडकी बंद करुन मी कामाला लागले.

दोन तासात बगचा फडशा पाडून टेस्टरच्या पुढे प्रोग्राम टाकून मी आनंदाने आंतरजालाची खिडकी उघडली. तितक्यात टेस्टर आला. (याला कागद घेऊन येताना पाहून हल्ली माझ्या काळजाचे ठोके (वेगळ्या अर्थाने) चुकतात!) 'आता ते सर्व नीट आहे पण चुकीचे आकडे गणिताला दिल्यावर 'चूक' असा संदेश येत नाही.'(स्वगत: नका ना रे देऊ माझ्या भोळ्या भाबड्या प्रोग्रामला चुकीचे आकडे!) अरे बापरे! हे मी काय केले? आधीचा गोंधळ बरा होता की! मी परत (नसलेला) पदर खोचून कामाला लागले. आता टेस्टरने आनंदाने कालहरणार्थ(टाइमपाससाठी) आंतरजालाची खिडकी उघडली.

अजूनही आशा आहे! शुक्रवारची संध्याकाळ आनंदाने लवकर घरी जाऊन घालवेन.. मी इ-सकाळ, वीकीपिडीया आणि जीमेलकडे भरकटणारा मेंदू परत मुसक्या बांधून प्रोग्रामकडे खेचून आणला आणि परत दिड तासात बगचा नि:पात करुन चेंडू परत टेस्टरकडे टाकला. जरा हुश्श करत बुट काढून खुर्चीवर मांडी घालते तोच तो (दुष्ट!) परत आला.
'आता ते सर्व ठिक आहे, पण मुद्रणआज्ञा(प्रिंट कमांड) दिल्यावर प्रोग्राम लटकतो आणि प्रिंट होत नाही.' (स्वगत: कदाचित या कचेरीतील आलतूफालतू कागदांचे मुद्रण करुन कागदे वाया जाऊ नयेत ही 'श्रींची इच्छा' तर नाही ना?? तितकीच समुद्रात एक ओंजळ कागदबचत!)

आता मात्र मला जोरजोरात रडावेसे वाटत होते. यावेळी प्रोग्राममध्ये चांगल्या निबंध लिहील्यासारख्या टिप्पणी लिहील्या, प्रोग्राम लिहीताना जागी राहिले, काळजी पण घेतली, तरी हे असे का व्हावे? माझ्या (बिनडोक) मनाने चारपाच संभाव्य पर्याय माझ्यापुढे टाकले.
१. सकाळी दुचाकीपुढून मांजर आडवी गेली तेव्हा दुचाकी पाच चाकं मागे घेतली नाही!
२. रस्त्यावर उतरुन टाकलेले लिंबू ओलांडले!
३. कोणीतरी मागून हाक मारली.
४. दृष्ट लागली.
५. नविन प्रकल्प सुरु करताना संगणकापुढे नारळ फोडला नाही!
६. चाचण्या(टेस्टिंग) अमावस्येच्या दिवशी केले!
७. माझ्या संगणकाखाली हितशत्रूंनी मंतरलेले लिंबू ठेवले आहे.
८. ए मूर्ख बावळट! कामाला लाग! काहीतरी अकलेचे तारे तोडू नकोस!
९. बिनडोक प्राणी! शेणाच्या गोवऱ्या थाप जा घरी जाऊन!

उद्विग्न मनाने मी 'लिंबू चहा' घ्यायला कॉफीयंत्राकडे गेले. 'दलाल' या पडेल चित्रपटातील 'ठहरे हुवे पानी मे ऽऽ कंकर न मार सावरी ऽऽ दिल मे हलचल सी मच जायेगी बावरी ऽऽ' हे गाणं राहून राहून आठवत होतं. (विशेष सूचना: मराठी गीतप्रेमींनी 'शांत सागरामध्ये कशास उठविलीस वादळे ऽऽ' आठवून घ्यावे आणि आंग्लभाषाप्रेमींनी 'लेट द स्लीपींग डॉग्स लाय' ही म्हण आठवून घ्यावी!) का बरं हे असं? ही 'लर्निंग फेज' कुठवर चालणार? 'अनुभवाने शहाणपण येते' म्हणावं तर दरवेळी वेगवेगळेच अनुभव. कधी जर्मन भाषेने दिलेली धोबीपछाड तर कधी कच्च्या यांत्रिकी ज्ञानाने वाढवलेल्या चुका तर कधी गणितच कच्चं. 'ढेकूणरहित' प्रोग्राम पहिल्या झटक्यात कधी बनणार? मनच लागत नाहीये. काय करावं?मला मन रमवायला सोयीचे पर्याय आठवू लागले:

१. मीताशी 'अमक्याशी तमकीचं लफडं' या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करावी.
२. टेस्टरला कॉफीतून झोपेचे औषध द्यावे!
३. संध्याकाळसाठी अर्धा किलो गवार आताच घेऊन गुप्ततेने कॉंफरन्स रुममध्ये निवडावी!
४. पळून जाऊन स्विटझरलँडला जाऊन मधमाश्या पाळाव्यात. (सोबतीला 'दिल चाहता है' मधला सैफ आहेच!)

'लिंबू चहा' चे घुटके घेऊन फाटके मोजे काढून पर्समध्ये कोंबल्यावर मनाला परत तरतरी आली. 'वेडे, प्रोग्राममधल्या बग्स पासून नोकरी बदलून किंवा गुंडाळागुंडाळी करुन पळ काढशील, जीवनातल्या 'बग्स' चं काय करणार आहेस? ही लढाई तुला लढायलाच पाहिजे, पळपुटा बाजीराव बनून नाही, तर पराक्रमी महादजी शिंदे बनून!' असा काहीसा (बळंच) उदात्त विचार करुन नव्या दमाने 'ढेकणांशी' लढाई सुरु केली!
-अनुराधा कुलकर्णी

Friday, 16 March 2007

विरक्त मन vs आसक्त मन


बघता बघता आठवडाअंत आला..
अनु atm मधून ५ युरो (जास्त नाही बरे का.. हातात जास्त ठेवले कि खर्च होतात..) काढून रस्ता ओलांडून सुपरमार्केट मधे जाते. आता आठवडाखरेदी हि अगदी साधी बाब. पण कंजूस अनुच्या दृष्टीने ती तिच्या आसक्त आणि विरक्त मनाची boxing!!

अनु सामानाच्या ढिगातून पुढे जात जात पहिले पावाचे पुडके घेते. (पाव वादातीत.दोन्ही मने खूश.)आता चॉकलेटच्या कप्प्यापाशी आल्यावर तिचे पाय थबकतात..ती एक 'मेड इन स्विटझरलँड' चॉकलेट उचलते..
विरक्त मन: "ठेव ते खाली!!!जिभेचे चोचले नुसते..दातांतील खड्डे मोठे मोठे होत आहेत.तरी चॉकलेट्चा मोह सुटत नाही.."
आसक्त मन: "हे रे काय? मागच्या आठवड्यात पण तू हेच म्हणाला होतास. एका चॉकलेट्ने असा कितीसा फरक पडणार आहे?"
विरक्त मन: "आता चल पुढे. जर सर्व खरेदी करुन पैसे उरले तर घे ते."

अनु जड हाताने चॉकलेट ठेवते आणि पुढे सरकते. परत मागे वळून चॉकलेट्कडे डोळे भरुन पहाते. आता चिप्स कडे आल्यावर ती परत लहान चिप्स चे खोके उचलते. दाताचा मुद्दा नसल्याने विरक्त मन गप्प बसते. आता येतो सौंदर्यप्रसाधनाचा कप्पा..इथे किमती पाहून दोन्ही मने गुपचूप..

मग शीत पिझ्झा,आईसक्रीम इ.इ. 'जंक फूड' चे शीतकपाट येते.
विरक्त मन: "त्या कपाटाला वळसा घालून ईमानदारीत पुढे चल. इथे पोषक तत्व वाले काहीच नाही. "
आसक्त मन: "नुसते बघायला काय प्रॉब्लेम आहे? किमतीचा अंदाज येतो आणि दुस-या दुकानात गेल्यावर तुलनात्मक अभ्यास करता येतो."
विरक्त मन: "मला चांगला माहीती आहे रे तुझा 'तुलनात्मक अभ्यास..'!"

तरी अनु शीतकपाटापाशी येते.. थोडाफार 'तुलनात्मक अभ्यास' करते. ("अरेच्च्या..या देशाचे सगळेच वेगळे..भारतात स्वस्त गोष्टी इथे महाग आणि भारतात महाग वस्तू थोड्या स्वस्त.१ लिटर चॉकलेट आईसक्रीम ५५ रु. म्हणजे स्वस्त आहे.")

पिझ्झा कप्प्यात अनुसाठी जास्त प्रेक्षणीय काही नसते. कारण प्रत्येक पिझ्झ्यात 'सलामी' आणि 'चिकन' किंवा 'मासा' असतो. पण अनुला एक मार्गारीटा पिझ्झा सापडतो फक्त टॉमेटो असलेला..अनु तो उचलते..
आसक्त मन: "पिझ्झा चालेल. एक वेळचे जेवण बनवणे वाचेल. "
विरक्त मन: "तुझ्याकडे ओव्हन नाही तो शीत पिझ्झा गरम करायला. आठवते ना, मागच्या वेळी तू तव्यावर गरम केला होतास आणि खालून कोळसा झालेला आणि वर गोठलेले टॉमेटो असलेला पिझ्झा खाल्ला होतास ते?आणि तो तव्यावर उलटण्याच्या प्रयत्नात शेगडीवर वितळलेले चीज सांडले होतेस आणि ते पेटले होते ते?उगीच नसते उद्योग. पिझ्झा पाहिजे तर तयार पिझ्झा खा. चल पुढे."
आसक्त मन: "हूं, म्हणे 'तयार पिझ्झा खा.'. एका पिझ्झ्याला ३ युरो ७० सेंट देऊ??३ युरो ७० सेंट मधे २ तास चॅटींग, ४ स्विस चॉकलेटे, ५ चिप्स ची पाकिटे येतील. "
विरक्त मन: "यावर शीत पिझ्झा हा उपाय नाही. दुसरे काहीतरी शोध."

मग अनु शीत कपाटातला 'काळे जंगल केक' प्रेमाने उचलते.
विरक्त मन: "ढोले, दिवसभर संगणकासमोर बसून असतेस. घरी आल्यावर खाणे पिणे करुन लोळत असतेस.आणि तरी १ cm जाड क्रीम असलेला केक खायचा आहे?केवढ्या कॅलरीज..केवढे कॉलेस्टेरॉल..केवढे गोड?अशाने भारतात जाईपर्यंत पाय फुटलेल्या लाडू सारखी दिसायला लागशील.. अजिबात घ्यायचा नाही तो केक..ठेव आधी खाली!!!!"

आसक्त मन: "(रडकुंडीला येऊन) हे रे काय? ३ आठवडे मी एकदातरी खाल्ला का हा केक? आणि क्रीम मधे थोडीफार पोषकतत्वे आहेतच ना? आज एकदा घेऊ दे ना रे मला....परत २ महिने नाही मागणार.."
विरक्त मन: "किमत पाहीलीस का? २ युरो २० सेंट मधे दुसरे काहीतरी छान आणि पोषक घे.आता चल पुढे. तुझी आताची असाइनमेंट पूर्ण झाली कि घे हं.."

आता येते शीत भाज्यांचे कपाट. इथे दोन्ही मने नाके मुरडतात. भाज्या कशा, ताज्या ताज्या हव्यात..तरी अनु 'फ़्रोझन स्पिनॅच' चे खोके उचलते..
विरक्त मन: "वेडे, कधी २५ वर्षाच्या आयुष्यात पालक आवडीने खाल्लास का, ते इथे 'फ़्रोझन स्पिनॅच' खाणार आहेस? उगाच घेशील, आणि भाजी चांगली नाही लागली कि फेकून देशील?नको उगीच हातोडे. "
आसक्त मन: "हे मात्र १००% बरोबर हां..पालक खाईन याबद्दल मलापण शंकाच होती. चल जाऊया पुढे. "
मग दुधाच्या कप्प्यापाशी येउन अनु एक दुधाचे खोके उचलते.(निर्वीवाद. जीवनावश्यक आणि 'चहावश्यक' वस्तू.)दुधाशेजारीच नुडल्स चा कप्पा. आता इथे डोळ्याला ताण देऊन अनु पाकिटामागचे 'झुटाटेन'(ingredients) वाचून 'शाकाहारी' कि मांसाहारी ची खात्री करण्याचा प्रयत्न करते. पण नेहमीप्रमाणे ५ मोठी मोठी जर्मन नावे वाचून अनुची 'नुडलेच्छा' संपते आणि ती पुढे सरकते..juices च्या कप्प्यातून 'ऑरांजनझाफ्ट' उचलते आंबट असले तरी.(वादातीत..C vitamin..)

आता आली ताज्या भाज्यांची पाळी. भाज्या कप्प्यात अनुला सर्व अनोळखी चेहरे दिसतात.. मग ओळखीचा फ़्लॉवर आणि कोबी दिसली कि अनुला आनंद होतो..आता वरच्या जर्मन पाट्यांतून 'एकास एक संगती' करुन 'कोणाचे नाव काय' हा खेळ..(अरेच्च्या, 'शँपेनन' म्हणजे मशरुम्स होय?मग महागड्या मद्याला काय 'कुत्र्याच्या छत्र्या' म्हणतात कि काय हे जर्मन लोक??? )

आसक्त मन: "काय?? १ युरो ५० सेंटला एक फ़्लॉवर?? हे म्हणजे अगदी टू मच हां...माझ्या ५० सेंटच्या चॉकलेट्ला मात्र नाके मुरडतोस.. एका फ्लॉवरची भाजी खाऊन काय मोठी पोषकतत्वे मिळवणार आहेस?"
विरक्त मन: "ओके..ओके..तेरी भी नही और मेरी भी नही..फ्लॉवर पुढच्या आठवड्यात..या आठवड्यात ५ दिवस कांदा बटाटा, बटाटा कांदा, बटाटा बटाटा, दमालू, कांदा बटाटा विथ व्हेज कोल्हापुरी मसाला खाऊ.." मग अनु ४ किलो बटाट्याची पिशवी 'वादातीत' उचलते.. आणि ४ टॉमेटोची पिशवी.

फळांचा कप्पा..इथे पण सर्व चेहरे अनोळखी..आणि नवीन नवीन जर्मन शोध.. (अगोबाई, 'ट्राउबेन' म्हणजे आपली द्राक्षे होय? मला माहीतीच नव्हते..महाग आहेत हि पण..)मग आंबा दिसतो.
विरक्त मन: "काय?? ५० रु ला एक आंबा, तो पण बेचव ब्राझिल चा आंबा?? या आंब्याला आंबा म्हणणे हा आंब्याचा अपमान आहे. जाऊदे. चल पुढे."

आता खरेदी संपवून अनु पैसे द्यायला रांगेत उभी राहते.
आसक्त मन:(रडत रडत) "हे रे काय? नुसते पाव दुध कांदा टॉमेटो घेऊन बाहेर पडायचे? काहीतरी विरंगुळा नको का जीवाला आठवडाअंत म्हणून?शी.हाऊ बोअरींग...ये भी कोई जिंदगी हुई??"
विरक्त मन: "बरे, बरे, रडू नकोस, उद्या आगगाडीने तालुक्याच्या गावात जाऊन भारतीय दुकानातून ७० सेंट चे एक कार्ले आणि १ युरोला मूठभर भेंड्या घेऊ..आता सध्या ३० सेंट वाले स्वस्त चॉकलेट उचल आणि शांत बस. उगाच उधळपट्टीकडे वळवू नकोस मला. "


मग अनु पैसे देते..आणि जड मनाने पिशव्या घेऊन रस्ता ओलांडते.. असाच (एक दिवस एक कार्ले आणि एक दिवस भेंडी खाऊन) आठवडा जातो.. परत आठवडाअंत येतो.. परत अनु atm मधून ५ युरो(जास्त नाही बरे का.. हातात जास्त ठेवले कि खर्च होतात..) काढून रस्ता ओलांडून सुपरमार्केट मधे जाते........आसक्त आणि विरक्त मनाची लढाई परत चालू होते!!!!!!!!

-अनुराधा कुलकर्णी
(हा 'अनु'भव सर्वप्रथम २००५ साली मनोगत डॉट कॉमवर प्रकाशित.सध्या वास्तव्य भारतातच आहे.)

Wednesday, 14 March 2007

रंगांशी जडले नाते!

मला माहिती आहे, हे 'भव्यदिव्य' शीर्षक वाचून तुम्ही 'अरे वा, अनु चित्रं पण काढते वाटतं?' म्हणून उत्सुकतेने हा लेख वाचायला घेणार. (म्हणूनच हे शीर्षक दिलं! हॅ हॅ हॅ!) पण माझं नातं जडलं आहे ते चित्रांच्या रंगांशी नाही, तर कपड्यांच्या रंगांशी.

सातवीत असताना आमच्या शाळेचा गणवेष बदलला.म्हणजे, पूर्ण नाही बदलला, वरच्या गडद निळ्या बाहीरहित झग्याच्या आत घालण्याच्या शर्टाचा रंग पांढरा होता, तो पुढच्या आठवड्यापासून आकाशी झाला. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, 'अगं आपली पांढऱ्या कपड्यांना घालायची नीळ असते ना, ती जास्त घालून शर्ट त्यात बुडवून ठेवायचा. आपोआप आकाशी होतो.' दुसऱ्या दिवशी न्हाणीघरात माझा प्रयोग सुरु झाला. ते चौकोनी पाकिट मिळतं ना नीळीचं, ते ओतलं आणि भिजवला शर्ट.

पिकासोच्या थोबाडीत मारेल, असं जबरी ऍबस्ट्रॅक्ट निळं रंगकाम झालं होतं शर्टावर. निळाशार, आकाशी, फिका आकाशी, अगदी फिका आकाशी अशा सर्व छटा त्या बिचाऱ्या सदऱ्यावर एकवटल्या. शिवाय निळीची बोटं भिंतीला लागून भिंतीवर अगम्य लिप्या उमटल्या त्या वेगळ्याच. मातेने नुकतंच बालमानसशात्राचं एक पुस्तक वाचलेलं असल्याने तिने प्रचंड सहिष्णुतेने तो निळा पसारा परत पांढरा केला. नाहीतरी 'कार्टी जरा जास्तच प्रयोगशील आहे. अगदी तिच्या बाबांवर गेली आहे' हे आईचं मनातलं मत होतं. कुंडीतल्या झाडाला पाण्याऐवजी बर्फ टाकणे, बाहुलीचे केस कापून ते वाढावे म्हणून तिच्या डोक्याला महाभृंगराज तेल लावणे, गरम वाफाळता चहा स्ट्रॉने पिणे,नवी वही केल्यावर 'जुनी वही आता चांगली दिसत नाही' म्हणून जुन्या वहीतलं सर्व लिखाण परत नवीन वहीत उतरवणे इ.इ. माझ्या पराक्रमांचा अनुभव तिला होताच.

पुढे अकरावीत गेल्यावर गणवेषाच्या पांढऱ्या शर्टावर प्रयोगशाळेत काहीतरी सांडलं. पांढऱ्या शर्टावर एक पिवळट डाग पडला. तो जाईनाच कशानेही. म्हणून काही दिवस त्याला पांढऱ्या खडूने रंगवून पाहिला. तितक्यात आमच्या इमारतीत 'फॅब्रिक पेंटींग' च्या नवीन लाटेत घरात आलेले रंग मिळाले. योग्य तो पांढरा रंग शोधून त्या डागावर लावला आणि 'दाग? ढुंढते रह जाओगे!' झालं. पण दुसऱ्या दिवशी इस्त्री करताना त्या डागाने आत्मार्पण करुन स्वत:बरोबर खालच्या कापडाला सुद्धा नेलं. चक्क गोल डागाच्या ऐवजी गोल छिद्र.

पुढे महाविद्यालयात गेल्यावर गणवेष नाही म्हणून मी खूष. वसतिगृहात असताना एकदा केसांना मेंदी लावली. मैत्रिणीशी गप्पा मारत असताना जाणवलं की मागे वाळत घातलेला श्रीलंकन मुलीचा पांढराशुभ्र टीशर्ट पण मेंदीची खूण अंगावर बाळगून आहे. वेळीच कळल्यामुळे तो धुतला आणि रंग गेला.

पण दुसऱ्या वसतिगृहात गेल्यावर रंगाशी माझं नातं जास्तच घट्ट होत गेलं. एकदा निरोप आला की हिमानी नावाच्या 'लय डेंजर रॅगिंग मास्टर' मुलीने मला खोलीत बोलावलंय. गेले. तिने मला दोरीपाशी नेलं.
'अनु, ये क्या है?'
'आपका टीशर्ट, दीदी.' (आम्ही नवागत असल्याने ज्येष्ठ मुलींना 'दिदी' आणि ज्येष्ठ मुलांना 'भैया/सर'(ज्याला जे चालेल ते) म्हणावे लागे.)
'उसपर क्या है?'
'रंग.'
'किसका है?'
'मेरे ड्रेसका.'
'गुड. अभी के अभी धोकर निकालो, अगर नही निकला तो मुझे बिलकुल ऐसा नया टीशर्ट लाकर दो.'

बादली आणि साबण घेऊन आमची स्वारी न्हाणीघरात. 'व्हाय मी?' हे असे घोर दैवदुर्विलास माझ्याच वाट्याला का यावे? नारींगी रंगाचा तो कपडा मुद्दाम वेगळा भिजवून वेगळा धुतला, तर वाऱ्याने उडून त्याचा रंग शेजारच्या दोरीवरच्या पांढऱ्याभडक(म्हणजे, पांढऱ्याशुभ्र हो! जर इतर रंगाना 'भडक' ही पदवी द्यायची तर पांढऱ्या रंगातील जास्त्तीत जास्त शुभ्र छटेला 'पांढराभडक' म्हणायला हरकत काय आहे?) टीशर्टालाच लागावा?? आणि तोही हिमानीचा टीशर्ट?

स्टोव्हचे रॉकेल, साबण, १०० रु. किलोवाला 'लय भारी' साबणचुरा सगळं लावून पाहिलं. पण नारींगी रंग काही त्या टीशर्टाला सोडेचना. 'नवीन घेऊन देऊ' म्हणून मी खिसापाकीट चाचपायला जाणार तितक्यात शेजारी ठेवलेली 'मेडीक्लोर' ची बाटली दिसली. पाणी शुद्ध करण्यासाठी नुकत्याच माझ्या खोलीसाथिदारीणीने नवी नवी बाटली आणली होती. मेडीक्लोरचे तीन थेंब पाणी शुद्ध करायला पुरत असतील, पण त्या शर्टावर पसरलेले डाग काढायला मला अख्खी बाटली लागली! 'नव्या शर्टाचं एका बाटलीवर निभावलं' म्हणून बाटली पुन्हा विकत आणली. यावेळी रंगांशी असलेलं माझं घट्ट नातं बघून मी स्वत: साठी एक जादा बाटली आणून ठेवली होती.

एका सहलीला माझ्या परममैत्रिणीने हौसेने घालायला तिचा पांढराशुभ्र आणि वर विटकरी लोगो असलेला टीशर्ट दिला. तिला मी तो धुवून परत देणार होते. 'यावेळी रंग लावायचा नाही, नाही, नाही, नाही' असं घोकत मी तो काळजीपूर्वक धुतला. आसपास काही पांढरं वस्त्र वाळत न घातलेली एक एकांतातली दोरी निवडली. शर्ट पिळून निथळायला नळावर ठेवला होता तो घ्यायला गेले आणि .. हाय दैवा! नळावर एका रंगाऱ्याने हातपाय धुतले होते तेव्हा नळाला लागलेला निळा रंग आता अतिव प्रेमाने पांढऱ्या टीशर्टाला चिकटला होता! यावेळी 'मेडीक्लोर है ना..' असं म्हणून मी निवांतपणे तो परत धुवायला घेतला. पण मेडीक्लोरचा रंग काढायचा गुण शर्टावरील विटकरी लोगोला चांगलाच नडला. मैत्रीण 'जाऊ दे गं, त्यात काय??' म्हणून सोडून देण्याइतकी चांगली मैत्रीण होती आणि आजही आहे, पण त्या विटलेल्या विटकरी लोगोने माझ्या हृदयावर केलेली जखम आजतागायत तशीच आहे. (हे असं काहीतरी उदात्त भावनाप्रधान वाक्य अधूनमधून टाकायचं असतं म्हणे बालपणीच्या आठवणीत.)

अशा एका परीक्षेनंतरच्या सुट्टीत आमच्या घरी बाटीक व बांधणीची लाट आली होती. रंग उत्साहाने आणले होते.यावेळी मात्र रंगाशी जडलेलं नातं मी घट्ट केलं. फॅशन रस्त्यावरुन चाळीस रुपयात आणलेल्या शर्टाचा बळी देऊन त्याचा रंग आकाशीचा गडद हिरवा केला. 'हेय! समथिंग डिफरंट अबाउट धिस शेड!' या मैत्रीणमंडळीच्या चाणाक्ष नजरेला 'फॅशन स्ट्रीटचा आहे' हे नरो वा कुंजरो वा उत्तर देऊन टाळलं.माझा कपड्याचा चॉइस 'जरा घाटी टाइप्स'(आता सुधारला आहे हो मी!) असतो असे त्यांचे वादातीत मत असल्याने विषय आणि पुढे गेला नाही.

'कुछ कुछ होता है' चित्रपटानंतर पांढऱ्याशुभ्र सलवार कुडत्यावर लाल बांधणीची ओढणी ही नवीन फॅशनलाट आली. यावेळी मी सावध होते. नळ तपासला, कपडे वेगळे धुतले, काळजीपूर्वक वेगळ्या दोरीवर वाळत घातले. पण नियती इथेही खदखदून हसत होती!! (उदात्त वाक्य-२). आमच्या वरच्या बिऱ्हाडातल्या यंडुगुंडू बाईच्या लहान मुलीच्या वाळत घातलेल्या परकर पोलक्याचा रंग टपकून बरोबर पांढऱ्या कुर्त्यावर पडला. आता मी सावध होऊन पांढरेशुभ्र कपडे विकत घेणे आणि पांढरेशुभ्र कपडे वापरणाऱ्यांची संगत शक्यतो टाळली.

लग्न झाल्यावर कपडे भिजत घातलेले असताना आपला गडद पोशाख बाजूला वेगळा ठेवला. पण काही परोपकारी कुटुंबघटकांनी 'विसरली असेल घाईत' म्हणून तो परत टबात टाकला. 'रंगाख्यान' मागील पानावरुन पुढे चालू!! समस्त पुरुषमंडळींच्या पांढऱ्याशुभ्र बनियानला निळा रंग! पुन:श्च मेडीक्लोर..

हल्ली मी गडद/फिकट रंगाचे कपडे धुवायला टाकताना स्वत:ला खालील प्रश्न विचारुन मगच धुते:
१. बादलीत इतर कोणाचा पांढरा कपडा आहे का?
२. बादलीत इतर कोणाचा गडद कपडा आहे का?
३. नळाला काही लागलं आहे का?
४. कामवालीच्या ओल्या साडीचा रंग जाऊन कपड्याला लागण्याची शक्यता आहे का?
५. वरच्या मजल्यावरील मंडळींनी आज काय वाळत टाकले आहे?
७. 'कपड्याचा रंग जाणार नाही' अशी १००% खात्री असलेल्या कपड्यावरच्या विणकामाचा रंग जाईल का?
८. मेडीक्लोर जवळच्या दुकानात उपलब्ध आहे का?

पण तरीही एखादी दुचाकीवरुन पांढरेशुभ्र कपडे घालून चाललेली सुंदर ललना पाहिली की मन परत कळवळतं..परत एकदा दुकानातला पांढराशुभ्र पोशाख हौसेने घेतला जातो.. आणि रंगांशी जडलेलं माझं नातं परत कधीतरी घट्ट होतं!


-अनुराधा कुलकर्णी

Monday, 12 March 2007

नाही राहिले शेंग चवळीची..

"हाय! केवढ्या दिवसाने भेटतेयस? आणि तब्येत पण बरीच सुधारलेली दिसतेय..काही आनंदाची बातमी वगैरे नाही ना?" -नीतू.
(अनु मनातल्या मनात कळवळते..'हा' वार तिच्या गुटगुटीत बाह्यरुपाखालील सडसडीत काळजावर खो ऽऽऽल रुततो.)
"नाही गं! बैठी नोकरी, नाश्ता जेवण देणारी कचेरी आणि पंधरवड्याला हॉटेलाची वारी याचे परीणाम. जरा नोकरीचं व्यवस्थित झालं कि मनावर घ्यायचं आहे बारीक व्हायचं."-अनु.

घरी जाऊन परत दर्पणाला प्रश्नः सांग दर्पणा, 'जाडी' नाही ना रे मी?"
दर्पणः(जिवाच्या भितीने घाबरत घाबरत)-"नाही गं..फक्त अजून ३ इंच उंच पाहिजे होतीस. म्हणजे उंचीला वजन अगदी चपखल झालं असतं.."

अनु(शिंप्याला)-"आणि हे पहा, फिटिंग नीट करा. ढगळ शिवू नका मागच्या वेळसारखा."
शिंपी(मूर्तीमंत रामशास्त्री प्रभुणेंचा स्पष्टवक्तेपणा अंगी बाळगणारा)-"अहो ताई,तुम्हाला शोभणार नाही म्हणून जरा सैलच शिवतो हो. नंतर घट्ट झाला कि 'कसा शिवला?' म्हणून तुम्ही परत शिंप्याला शिव्या घालणार."

"नाही आज जरा कमीच खाते.गुलाबजाम पण आहे खाण्यात.ते अजून खूप खूप उष्मांक होणार."-अनु. "खा गं.आज भाजी कधी नव्हे ती चांगली आहे. आणि ढोले, खाणं कमी करण्यापेक्षा जरा हालचाल कर.काम करतेस कि नाही काही घरी?"-इति मैत्रिण.
"काय हे? इतकी कसरत करुन घालावी लागते तर घालू नकोस ही जीन्स. आपण नविन मोठी साइझ घेऊ."-आशू.
"अजिबात नाही.मोठी जीन्स विकत घेणं ही हार आहे. मी बारीक होणार आणि हीच जीन्स घालणार." "अगं पण श्वास रोखून पोट आत ओढून धरलं तरच तुला ती आता घालता येतेय. तू आणखी ८ तास पोट आत ओढून धरणार? आणि दुपारी जेवल्यावर काय करणार?"-(तर्कशुद्ध)आशू.
"नाही मी उद्यापासून सकाळी बिल्डिंगला ४ फेऱ्या मारणार. आल्यावर अर्ध्या तासाने मधपाणी पिणार आणि मग थोडा प्राणायाम करणार रोज."

'सकाळ' उजाडते. घड्याळाचा गजर तत्परतेने वाजतो. "जाऊदे. झोप पण महत्वाची त्वचेच्या आरोग्यासाठी. त्यापेक्षा कोशिंबीरी जास्त खाऊया."
असं म्हणून अनु साखरझोपेचा पवित्र उपक्रम चालू ठेवते.
'कोशिंबीरी' खाण्याची वेळ येते. "हे काय? नुसता कांदा?कांदा खाऊन दुपारभर तोंड उचकून सहकाऱ्यांशी बोलू कशी?जाऊदे. आज भात रद्द करु. पोळ्या २ खाऊ. भाजी आज मस्त झालीय पनीरची म्हणतात. खाऊया.आज बसने आधीच्या स्टॉपवर उतरुन चालत जाऊया."

'आधीचा स्टॉप' आला. "नको बाई इतकं चालायला. आधीच थकवा आलाय.वर घरी जाऊन स्वयंपाक करायचाय.उतरुया जवळच्या स्टॉपवरच. वाटलं तर रात्री चालू जेवण झाल्यावर."
'जेवण झाल्यावर'- "जाऊदे बाई. आता झोप आली. उद्या परत लवकर उठायचंय.झोपून टाकूया."

अशा प्रकारे अनु 'गुटगुटीत बांधा.थोडी बारीक असती तर चाललं असतं' या सदरात मोडणं चालू ठेवते. आणि 'जास्त लठ्ठ माणसांबरोबर वावरणे' हा रामबाण उपाय अवलंबते. (बिरबलाची गोष्ट. रेष न पुसता लहान करायची आहे? तिच्याशेजारी मोठी रेष काढा.)

फर्ग्युसन रस्ता. कॉलेज तरुणींनी फुललेला. अद्ययावत जीन्स. स्कर्ट. अलाण्या सिनेमातल्या फलाण्या नायिकेसारखा पंजाबी पोषाख. नाना तऱ्हा.
"मलापण पाहिजे असे कपडे. पण आधी बारीक व्हायचं.ठरलं तर. उद्यापासून सकाळी बिल्डिंगला ४ फेऱ्या. आल्यावर अर्ध्या तासाने मधपाणी पिणार आणि मग थोडा प्राणायाम रोज. "
अनु 'निश्चय' करते आणि पोट आत घेऊन आत्मविश्वासाने चालायला लागते.
-अनुराधा कुलकर्णी

वीज

२ जानेवारी २००१.
'सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह' मधील नेहमीसारखीच एक सकाळ. नववर्षाचा धिंगाणा घालून कालची सुट्टी पण (सकाळी आठवडाभरचे कपडे धुवून, केसांना दही/मेंदी/कोरफड लावून धुवून त्यांना चिमटे इ.इ. लावून) आणि 'मनोरंजन' मधे पिक्चर टाकून, उरलेल्या वेळात पलंगावर लोळत 'काल इ.एम. च्या तासाला तो ना, तिच्याकडे सारखा बघत होता.तिला पण माहिती आहे, पण माहिती नसल्यासारखं दाखवते' अशा टिपीकल 'बायकी' गप्पांमधे मजेत गेली होती. आणि आज परत कॉलेजे सुरळीतपणे सुरु झाली होती.

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा 'बांगड्या दिवस' होता. अभियांत्रिकीचा 'जुळे दिवस'. साहजिकच खोल्याखोल्यांतून चकरा टाकून उधार उसनवार चालू होती.
'सुन, तेरा वो ग्रीन बांधनीका ड्रेस देगी क्या? मुझे और दिपाको ट्विन्स डे मे काँबीनेशन करनेका है. और अपर्णाको बोल ना उसका चष्मा देने. वैसे भी कम नंबरका है. दिपा तो -२ का चष्मा निकालकर मेरे साथ घूम नही सकती.'
'अरे यार, ग्रीन ड्रेस तो मै देती हूं, मगर मुझे प्लीज धोकर वापस मत देना. तूने पिछली बार मेरा जीन्स और टॉप धोया था तो टॉप का पूरा कलर जीन्स पे लगा था. और अपर्णाके मूडपर है वो चष्मा देगी या नही. वो पार्टीमे फिशपाँड पडा था वो तूने डाला उसको पता चल गया है.'
'ओके, मै ड्रेस धोती नही, लेकीन ड्रायक्लिन के पैसे तो तुझे लेने पडेंगे. अभी अपर्णा से चष्मा मांगने मे पॉइंट नही. छोड, मै देख लूंगी.'

'शी,काय ते केसांना सारखे रोलर लावून बसलेली असतेस? आधीच तुला हालचालीचा कंटाळा. त्यात रोलर लावल्यावर केसही न हलवता बाहुलीसारखी १ तास बसतेस. मला बघवत नाही.'
'मीच बसते ना? तुला काय त्रास होतो? आणि केस नाही वळवले तर आठवडाभर आणखी भूत दिसेन.' 'बाई माझे, रोलर लावून आणि ते काढल्यावर हाताने मिशांचे आकडे वळवावे तसे केस दिवसभर वळवून ते चांगले दिसतात असं तुला कोणी सांगितलं? अशाने तुला मुलं चिडवतील हां.'

'ताई, तुझ्या हिरव्या निळ्या बांगड्या देतेस? तृप्तीला हव्या आहेत. ती विचारायला आली होती पण तू विनूताईकडे होतीस. तिला माझा हिरवा आणि वर निळे आरसावर्क असलेला ड्रेस खूप आवडला. ती तो घालणार आहे आज.'
'हो गं, पण तू काय घालशील?'
'मी परवाच तपकीरी ड्रेससाठी बांगड्या आणल्या मयूर बझारमधून. पुढे माझ्या तपकिरी साडीवर पण होतील १४ फेब ला.'

'स्वाती, तुझ्याऐवजी मी जाऊ आंघोळीला? आम्हाला आज लवकर जायचं आहे कॉलेजला. आणि नयनाचा ड्रेस आणला आहे तो इस्त्री करत होते म्हणून वेळ पण झालाय.'
'जा.लवकर ये. ए...ए... तृप्ती , थांब. मी बादलीत रॉड लावला आहे तो बंद नको करुस.बाहेरच्या कॉमन प्लगपॉइंटला आधीच रांगेत ६ बादल्या आहेत.'
'बरं. लगेच येते.तू तोपर्यंत इस्त्री कर.'
'नाही आता नाही करता येणार. रेक्टर मॅडम राउंडवर आल्या आहेत. आपण बल्बच्या पॉइंटमधून काढलेलं कनेक्शन पाहिलं तर कनेक्शन पण जाईल आणि इस्त्रीपण.'

तृप्तीने निळी ओढणी आणि बांगड्या काढून ठेवल्या आणि ती बादली घेऊन पळाली. पळता पळता पायलच्या खोलीत डोकावली. 'पायल, इस्त्री लपव पटकन. मॅडम २ खोली अलिकडे आहेत. आणि परवाचं माझं असाइनमेंट तुझ्याकडे आहे ते आताच बॅगेत घालून ठेव.'
'हो गं, तू पळ लवकर. आणि नट्टापट्टा करण्यात उशिर करु नकोस. आज तरी वेळेवर ११.५ ला निघायचं आपण.' गाणं गुणगुणत तृप्ती आंघोळीला गेली.

'नयना, वर कसलातरी आवाज येतोय. काय झालं? परत भांडण झालं का?'
'माहित नाही गं. नाहीतरी वरच्या फ़्लोरच्या मुली सारख्या दंगा करतच असतात.'
'शी, आज अभ्यासाचा मूडच येत नाहीये. पण आज मॅडम नविन धडा सुरु करणार म्हणजे प्रश्न विचारणार. आणि धिंगाणा तरी केवढा?जाऊदे,जाता जाता विनीला विचारुन फंडे पक्के करेन.'

'नयना, नयना............'
'काय गं मने?किती जोरात ओरडतेस? ताई अभ्यास करतेय ना?'
'नयना, वर ये लवकर, तृप्ती केव्हाची आंघोळीला गेलीय, दारच उघडत नाहीये. आम्ही दारावर थापा मारल्या, ओरडलो, पण ती ऐकतच नाहीये.'
'झोपली कि काय दिपकच्या स्वप्नात रंगून?'
दारापाशी आता मोठी गर्दी झाली होती. 'तृप्ती, दार उघड. तुला ऐकू येतंय का?'
'स्वाती, कितीला गेली ही आंघोळीला?'
'अर्धा पाउण तास झाला असेल.मी तिला सांगितलं लवकर ये. माझं पाणी तापलं असेल आता.'
'ओ माय गॉड, रॉड त्या आतल्या पॉइंटला लावला होता?दगडूकाका, लवकर जाऊन मेन स्विच बंद करा. स्वाती तुझ्या रबरी चप्पल घालून ये.'
'बापरे, परवाच कोणीतरी सांगत होतं. बटण बंद करुन पण ट्यूबलाइट चालू होता.तेव्हाच कंप्लेंट केली होती कि अर्थिंग बरोबर नाही म्हणून.'
'पोरींनो, पुरावे नसताना भलतं काहीतरी बडबडू नका. मी शिडी आणतो.'
'दगडूकाका, हातोडी पण आणा. आपल्याला दार तोडावं लागेल. आता जवळजवळ १ तास होत आला.'

शिडी आली. दगडूकाका शिडीवर चढणार तितक्यात स्वाती म्हणाली, 'थांबा काका, मी चढते.'
'संभाळून. पडताल तर आमच्या डोक्याला अजून ताप.'
विनी दिपाच्या कानात पुटपुटली, 'ती कोणत्या अवस्थेत असेल माहिती नाही. म्हणून दगडूकाका नको शिडीवर चढून बघायला.'

'काका, ती दाराला टेकून डोळे बंद करुन पडली आहे. आपण तिच्या डोक्याच्या विरुद्ध बाजूने दार फोडूया.'
बाकी शिपाई पण आले होते. दार तुटत होतं. स्वाती आता रडायला लागली होती.
'मी कशाला तिला आंघोळीला जाऊ दिलं?'
'थांबा गं, त्यांना आधी दार तर फोडू दे. आता जे झालंय त्यावर चर्चा नको.'

दार एकदाचं फोडलं. तृप्तीला बाहेर काढलं. पाण्याची बादली भरलेली होती. बादलीत रॉड होता. पण बटण बंद होतं. स्वातीने पटकन चपला काढून रॉडचा प्लग काढला.

'तृप्ती, उठ. आज बँगल्स डे आहे ना? उठ ना. बघ दिपक वाट पाहत असेल कॉलेजात.'
'श्वास चालतोय.तृप्ती, उठ ना..ताई, बघ ना..अंग पण गरम आहे.'
'काका रिक्षा बोलवा लवकर. राधेय हॉस्पीटलमधे जाऊ जवळच्या.'
'पैसे लागतील ना गं? तुझ्याकडे किती आहेत? मी ३०० घेतले आहेत.'
'माझ्याकडे ५०० आहेत. पमीकडे पण असतील.आपण पण जाऊया हॉस्पीटलमधे त्यांच्याबरोबर. नंतर सरांना सांगता येईल लेक्चरला उशिर का झाला ते.'

'राधेय हॉस्पीटल' शोधत रिक्षा गल्लीबोळातून भटकत होती. हॉस्पीटल मिळाले. तृप्तीला रिक्षात ठेऊन दोन मुली गेल्या. 'काय झालं आहे?'
'माहिती नाही डॉक्टर,आंघोळीला गेली आणि नंतर अशी मिळाली.प्लीज लवकर ऍडमिट करुन घ्या. आमच्याकडे पैसे पण आहेत आता.'
'पैशाचा प्रश्न नाही. ही पोलीस केस आहे. तिने आत्महत्या पण केली असेल, कोणी तिला मारलं पण असेल. आम्ही ही केस घेऊ शकत नाही.'
अपर्णा बाहेरुन ऐकत होती ती उसळली, 'xxxxx!! तृप्ती जिवंत आहे अजून. कसे बोलतात हे लोक? म्हणे 'आत्महत्या केली असेल'!!!'
'अपर्णा हळू बोल. इथे आपला पाय दगडाखाली अडकला आहे.'
स्वाती धपाधप चालत बाहेर आली. 'चौकातून उजवीकडे वळून दोन गल्ल्या सोडून सरकारी हॉस्पीटल आहे. चला लवकर.'

'डॉक्टर, लवकर ऍडमिट करा. आम्ही राधेयमधे गेलो होतो. आधीच उशिर झाला आहे.'
'उशिर झाला तरी आम्हाला तर आमच्या प्रोसेस प्रमाणे काम करावंच लागणार ना?' त्या तिथे स्ट्रेचरवर ठेवा.

तृप्तीला स्ट्रेचरवर ठेवलं. नर्स येउन चादर घालून गेली. 'शी, असे काय वागतायेत हे लोक? बघ ना, तिच्या डोक्यावरुन चादर घातली आहे. अजून तर त्यांनी तपासलं पण नाहीये.तृप्ती, लवकर बरी हो ना!'
'सॉरी, हिचा जीव गेलेला आहे काही मिनीटापूर्वी. तुम्ही आता इतर पोस्ट्मार्टेम वगैरे साठी काउंटरवर चौकशी करा.'

बाहेर उभ्या घोळक्याने पण हे वाक्य ऐकलं. 'मरण' हा शब्द इतक्या जवळून सर्वांनी पहिल्यांदाच पाहिला होता.तृप्ती शांत झोपल्यासारखी दिसत होती.अगदी कालपरवा तर हिला पार्टीत नाचताना पाहिलं होतं. १८ जानेवारीला १९ वर्षं पूर्ण होण्याआधीच तिची जीवनरेषा संपली होती.

'मंगळवार, ता. २ जा.२००१. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणारी कु. तृप्ती पाटील ही विद्यार्थिनी आज वसतीगृहाच्या बाथरुममधे हिटिंग रॉडचा झटका बसून मृतावस्थेत सापडली. मृत्यूचे कारण विजेचे उपकरण हाताळताना झालेली बेपर्वाई हे असावे असे पाहणी करायला आलेल्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या अधिकाऱ्याने आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितले.'
(-बराचसा भाग सत्यघटनेवर आधारीत.)
-अनुराधा कुलकर्णी

हवी आहेत: भूते

जाहीरात:एका भूतकथाप्रेमी वाचकाला हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते.
पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य.(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी काही/सर्व बाबींत सवलत देण्यात येईल.)
संपर्क: मी अनु

चमकलात का जाहीरात वाचून? काय करावे हो, पूर्वी सारखी खानदानी भूते राहीली नाहीत आता..म्हणून जाहीरात द्यावी लागते..प्रेमकथा सर्वत्र आहेत, रहस्यकथा सर्वत्र आहेत, पण भूतकथा मात्र हल्ली वाचायलाच मिळत नाहीत..लहानपणापासून भूतकथा आणि भूतचित्रपटांचे मला जबरदस्त आकर्षण. रात्री उशिरापर्यंत बैठकीच्या खोलीत भूतकथा( नारायण धारप लिखीत) वाचून मग आता झोपण्याच्या खोलीत न घाबरता कसे जायचे?मग पॅसेजचा दिवा लावून बैठकीच्या खोलीतील दिवा घालवून पळत पळत पॅसेजमधे जायचे..आता स्वयंपाकघरातल्या अंधारात न पाहता पळत पळत झोपण्याच्या खोलीत जाऊन एक मंद दिवा लावून पॅसेज मधे परत यायचे..पॅसेज मधला दिवा घालवून पळत पळत झोपण्याच्या खोलीतला मंद दिवा घालवून डोक्यावरुन पांघरुण घेऊन गुडुप्प झोपून जायचे.

आमच्या लहानपणी 'झी' 'स्टार' इ.इ. बाळांचा जन्म झाला नव्हता. दूरदर्शन हा एकमेव वाली. आणि मग मंगळवारी रात्री ९ ला लागणारी 'किले का रहस्य' मालिका श्वास रोखून पहायची. पण 'किले का रहस्य' ने शेवटी हे एक कटकारस्थान आहे असे दाखवून भूत संकल्पनेचा बट्ट्याबोळ केला. नंतर 'झी' वाहीनीवर बराच गाजावाजा करुन 'द झी हॉरर शो' आला. त्याचा पहिला भाग 'दस्तक' डोळे बंद ठेवून मधून मधून उघडून('आई, भूत अचानक दारामागून आलं कि मला सांग.नंतर मी डोळे उघडते.') पाहीला. 'भूते' हि केवळ स्मशान आणि कब्रस्तान यापुरती मर्यादीत न राहता कपाटातही (कपाट उघडल्यावर हात पुढे करुन नायिकेचा गळा दाबण्यासाठी)असतात आणि खाण्याच्या बशीवर नुसते मुंडके(स्वत:चे) पण ठेवू शकतात हा शोध लागला. मग काही महिने कपाट उघडताना आधी हळूच एक इंच उघडायचे..मग एकदम वेगाने पूर्ण उघडून वेगाने मागे सरायचे..आणि कपाटात कोणी नाही याची खात्री करुन मग पुढे सरकायचे.. (भूताला चकवण्यासाठी हा उपद्व्याप बरे का!)

रामसे बंधूंचा 'विराना' चित्रपट आणि इव्हील डेथ:भाग १ व २(३ अगदीच पुळचट होता..) यानी भूताना मानाचे स्थान मिळवून दिले. इव्हील डेथ पाहून झाल्यावर पलंग खिडकीपाशी होता तो सरकवला. त्या काळात एकदा थोड्या झाडीयुक्त प्रदेशातून घरी परत येत असताना झाडामागून लघुशंका करुन परत येणार्‍या पांढर्‍या सदर्‍यातल्या माणसाला मी असली सॉलीड घाबरले होते ना!! अशावेळी मी हळूच पाय पाहून घेते उलटे आहेत का. ती माझ्यादृष्टीने विश्वसनीय चाचणी असते. रामसे पटांत'अमावस्या' आणि कुत्रे रडताना आणि नायिका रात्री गाणे गुणगुणत आंघोळहौदात शिरली कि भूताचा सन्माननीय प्रवेश कथानकात होणार हे माहीती असायचे.. पण 'जुनून' चित्रपटाने 'पौर्णिमा' आणि 'वाघभूत' यांचा परस्परसंबंध जोडून 'अमावस्येला भूत येते' या रामसेबंधू गुरुसूत्राला दणदणीत हादरा दिला. (हा हंत हंत! वो भूत भूत हि क्या, जो अमावस कि रात ना आये??)

'झी हॉरर शो' हळूहळू 'हास्यमालिका' बनू लागला. यंत्रमानवासारखी चालणारी आणि भितीदायक न दिसता मतिमंद दिसणारी भूते येऊ लागली.आता सोनी वाहीनी वर 'आहट' मालिका आली. 'आहट' नेही अपेक्षा खूप वाढवल्या पहिल्या भागात मुंडकेविरहीत तरुण मुलीचे भूत दाखवून. पण नंतर 'आहट' पण विज्ञानमालिका आणि रहस्यमालिका प्रकाराकडे झुकायला लागले आपले 'भूतमालिका' पद सोडून.

मला आतापर्यंत आवडलेले एव्हरग्रीन भूत म्हणजे ड्रॅक्युला. अहाहा.. काय ते सुळे..काय ते त्याचे पांढरे डोळे.काय त्याचे 'एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ' या उदात्त धोरणाने जास्तीत जास्त माणसांचे रक्त शोषून त्याना ड्रॅक्युला पंथाची दिक्षा देण्याचे सत्कार्य!! ड्रॅक्युला कल्पनेवर आधारीत कथा नारायण धारपानी लिहीली ती 'लुचाई'. तीही घाबरवण्याच्या चाचणीत १०० पैकी १०० मिळवून गेली. ड्रॅक्युला ने ड्रॅक्युला बनवलेले पूर्ण गाव, आणि शेवटी त्या गावात उरलेला एकटा नायक आणी एक लहान मुलगा, जे दिवसा गावाला आग लावून रात्र होण्याच्या आत तिथून बाहेर पडतात. तुम्हीपण अवश्य वाचा मिळाल्यास.

नारायण धारपानी काही अप्रतिम भूतकथा दिल्या, पण हल्ली त्यांच्या कथा 'सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा संघर्ष' आणि 'समर्थानी ध्यान करुन दिव्य आत्म्याना आवाहन केले आणि त्या आत्म्यांनी दुष्ट शक्तींचा नायनाट केला' अशा सौम्य बनल्या आहेत. (नारायण धारपांच्या चाहत्यानी या वाक्यासाठी मला क्षमा करावी.)

इथे आंग्ल ग्रंथालयात स्टिफन किंग चे 'पेट सिमेट्री' वाचले आणि मला शोध लागला कि आहट चा एक भाग 'कॉपी टू कॉपी माशी टू माशी' आहे त्या कथेचा. योगायोगाने एका रविवारी रात्री ११ वाजता झोप येत नाही म्हणून वेडे खोके लावले तर त्याच कथेचा चित्रपट लागला होता. मग काय...'रविवार रात्र' 'उद्या लवकर उठायचे आहे' 'रात्री भिती वाटल्यास इथे कोणी नाही' वगैरे सर्व विसरुन तो पूर्ण पाहीला. कथा 'माणसे जिवंत करण्याची शक्ती असलेल्या दफनभूमीवर' आधारीत. मग रात्री परत घाबरणे आणि गायत्रीमंत्र.. इथे आल्यावर एकदा अशीच फिरत फिरत(दिवसा) किरिस्ताव स्मशानभूमीत जाऊन आले 'कब्रस्तान' प्रत्यक्ष बघण्यासाठी. 'किरिस्ताव' भूत भेटले तरी मी हिंदू असल्याने ते माझ्यापेक्षा त्याच्या धर्माच्या आणि त्याची मातृभाषा कळणार्‍या माणसाला जास्त पसंत करेल हि माझी कल्पना. पण ते कब्रस्तान कमी आणि बाग जास्त वाटत होती. पेन्शनर जोडपी आणि तुरळक प्रेमीयुगुले तिथे फिरत होती. झाडे फुले नीट निगा राखून सुंदर ठेवली होती. पण सौंदर्य असले तरी तिथे खिन्नता होती एकप्रकारची.

ड्रॅक्युला हे किरीस्ताव भूत जबरदस्त असले तरी आपल्याकडची भूतेही कमी नाहीत. 'गिरा' हे समुद्रकिनार्‍यावरील भूत(गिर्‍याची शेंडी कापून कपाटात ठेवली कि तो ती परत मिळवण्यासाठी आपल्याला हवे ते देतो.),मुंजा,वेताळ,हडळ,ब्रम्हराक्षस इ.इ. आपल्याकडची भूतेही प्रसिद्ध आहेत.

माझ्यासारखेच अनेक भूतकथाप्रेमी इथे असतील ना? मी त्याना(आणि भूतकथा अ-प्रेमीनापण) आवाहन करते आहे ऐकीव/वाचलेल्या भूतकथा आपापल्या अनुदिन्यांवर आणण्याचे.. भूताला जात/धर्म/लिंग/वय/देश यांचे बंधन नाही. फक्त घाबरवण्याचे काम त्याला नीट करता आले पाहीजे हि एकच अट आहे. मग, देता ना तुम्हाला माहीती असलेल्या जबरदस्त भूतकथा? मी वाट पाहीन.'घाबरा आणि घाबरवा' हेच आमचे ब्रीदवाक्य!!
-आपली(सरळ पाय असलेली)अनु

मी,नोकरी,वि.म. आणि औ.म.

गेल्या चार वर्षात काही नोकरीविषयक मुलाखती दिल्या. पहिल्या काही मुलाखतींनंतर प्रत्येक मुलाखतीच्या वेळी माझ्या विनोदी मनाचं औपचारीक मनाबरोबर द्वंद्व चालू असतं. आपण जागा वाचवण्यासाठी यापुढे या दोन मनांचा उल्लेख 'वि.म.' आणि औ.म. करुयात. हां, तर अशीच एक मुलाखत आता सुरु होणार आहे.

मुलाखत्याः या. या.बसा. (मी आत येते.खुर्ची सरकवून बसताना टेबलावरचे सुशोभित कापड ओढले जाऊन काही कागद खाली पडतात.मुलाखत्या आणि मी या संयुक्त प्रयत्नांनी टेबलावरील कापड व कागद परत मूळ जागी स्थानापन्न होतात.)

वि.मः 'कुठ्ठे म्हणून न्यायची सोय नाही. केलीस ना इथे पण पाडापाडी? घरी कप आणि बरण्या फोडतेस ते पुरे नाही का झालं?'

मुलाखत्याः 'हं, मला तुमच्याबद्दल सांगा.'
औ.मः 'मी अनु. इत्यादी.इ.इ.इ....'

वि.मः 'अरे, तुझ्यासमोर कागद आहे ना? मग वाच ना.कशाला बोलायला लावून तुझा आणि माझा वेळ घालवतोस?'

मुलाखत्याः 'बरं, मला सांगा, तुम्ही ही आताची नोकरी का बदलू इच्छीता?'
औ.मः 'सध्याची नोकरी आणि लोक खूप चांगले आहेत, पण मला आणखी नवनविन आव्हानात्मक कामे करण्याची संधी हवी.'

वि.मः 'त्याचं काय झालं, जुन्या नोकरीत चांगला पगार मिळवणं हे आव्हानात्मक काम आहे.या बढतीला पण खिरापत मिळाल्यावर म्हटलं जरा इकडेतिकडे गळ टाकायला घ्यावे.'

मुलाखत्याः 'आमच्याकडची नोकरी लगेच सोडणार नाही कशावरुन?'
औ.मः 'मला चांगले काम करायला मिळाल्यास मला जास्तीत जास्त काळ तुमच्या इथे घालवायला आवडेल.नोकऱ्या सारख्या बदलत राहणे हा माझाही स्वभाव नाही.'

'वि.मः 'अरे मनुष्या, जरी कोणी तुमच्याकडची नोकरी मिळवून ती एका दिवसात सोडणार असलं तरी हा प्रश्न विचारुन त्याचे खरे उत्तर मिळणार आहे का?'

मुलाखत्याः 'पुढच्या पाच वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता?'
औ.मः 'पुढच्या पाच वर्षात मी स्वतःला आपले ज्ञान वाढवून एका गटाचे नेतृत्व करताना आणि कचेरीच्या हिताच्या दृष्टीने नविन नविन योजना आखताना पाहते.इ.इ..'

वि.मः 'अभ्यासाशी संबंधित प्रश्न केव्हा विचारणार आहेस?आता हे प्रश्न थांबवले नाहीस तर मी पुढच्या पाच मिनीटात स्वतःला इथून बाहेर पाहिन हं!'
(तितक्यात चहा येतो. मुलाखत्या चहा पितो. मी जरा इकडेतिकडे पाहून कचेरीची ऐपत आणि पगाराचा भावी आकडा यांचा अंदाज घेते.मुलाखत्या अधूनमधून चष्म्याखालून पाहत असतो.)

मुलाखत्याः 'हं,तुम्हाला सध्याच्या नोकरीत किती पगार मिळतो?'
औ.मः 'सर्व सुविधा धरुन .. लाख प्रती वर्ष इ.इ.इ..'

वि.मः 'असे धोतराच्या निरीला हात घालणारे प्रश्न काय विचारतोस सायबा?चांगला पगार असता तर उगाच का अर्धी रजा घेऊन तुझ्या मुलाखतीला आले असते?'

मुलाखत्याः 'तुमची किती पगाराची अपेक्षा आहे?'
औ.मः 'पैशापेक्षा मी अव्हानात्मक कामाला जास्त महत्व देते. पण माझा अनुभव आणि ज्ञान यावरुन .. लाख प्रतीवर्ष अपेक्षित आहेत. इ.इ.इ...'

वि.मः 'काय साहेब असले प्रश्न विचारुन गरिबाला धर्मसंकटात टाकता?जास्त सांगितले तर तुम्ही माझ्या अनुभवावर बोट ठेऊन आम्ही देतो ते कसे योग्य हे पटवत बसाल.कमी सांगितले तर तुम्ही जे देणार होतात ते बदलून कमी पैशात सौदा पटवणार..'

मुलाखत्याः 'आमच्या कचेरीत नोकरी करावी असे तुम्हाला का वाटते? '
औ.मः 'मला तुमच्या कचेरीत केले जाणारे काम आव्हानात्मक वाटते इ.इ.इ...'

वि.मः 'त्याचं काय आहे, आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतलीच आहे तर हातासरशी ठिकाणं जवळ असलेल्या २ मुलाखती देऊन टाकाव्यात म्हणून आले रे तुझ्याकडे.आणि तसंही सोनी वर्ल्डच्या दुकानात कॅमेरा पण दुरुस्तीला टाकायचा होता कोपऱ्यावर.'

मुलाखत्याः 'तुमचा नवरा पुण्यातली नोकरी बदलून बंगलोरला गेला तर?'
औ.मः 'तसे होणार नाही. पुणे ही आमची कर्मभूमी आहे इ.इ.इ...'

वि.मः 'आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते..अशा टाईपाचे अजून किती प्रश्न विचारणार आहेस रे बाबा?तू आणि तुझी कचेरी तरी आजन्म/आमरण पुण्यात राहणार आहे का? गीतेत म्हटलंच आहे ,मानवी जीवन क्षणभंगुर आहे..एक ब्रह्म हे सत्य आहे.. बाकी सर्व नोकरी , ठिकाण, नवरा इ.इ. माया आहे(अरे तू तो सेंटी और फिलो हो गई रे अनु!)

'मुलाखत्याः 'किती दिवसात आमच्या कचेरीत येणार?'
औ.मः '१ महिना'

वि.मः 'माझ्या वहिनीची मावसभावजय चिंगीचं लग्न आणि यांच्या मावशीच्या आतेबहिणीच्या सुनेची मंगळागौर झाल्यावर!!'

मुलाखत्याः 'पण आम्हाला तर उद्यापासून येणारं माणूस पाहिजे आहे!'
औ.मः 'मला सध्याचं काम आवरुन यायला १ महिना लागेलच तरी मी तीन आठवड्यात यायचा प्रयत्न करेन इ.इ.इ...'

वि.मः 'वा रे शहाण्या, मी मागू का तुला उद्याच्या उद्या महिन्याचा आगाऊ पगार?आज म्हणतोस उद्यापासून या..उद्या दुसऱ्या कोणाला म्हणशील आता जुन्या नोकरीतून बाडबिस्तरा आवरुन १५ मिनीटात असेल तसे पळत या..'

मुलाखत्याः 'ठिक आहे. आम्ही तुम्हाला २ दिवसात कळवू.'
औ.मः'आनंद झाला तुम्हाला भेटून.'

वि.मः 'दोन तासांपासून पिळतो आहेस लेका, एक कप चहा दिला असतास तर जास्त आनंद झाला असता..'


(अनुराधा कुलकर्णी)

मंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत

मंत्री सुहासराव देशमुखांनी जेव्हा ती जुनी हवेली विकत घेतली तेव्हा जवळजवळ सर्वांनी त्यांना मूर्खात काढले. ती जागा झपाटलेली आहे हे सर्वज्ञात होते. खुद्द हवेलीचा मालक आणि उमराव घराण्याचा शेवटचा वारस पण त्यांना याबाबतीत धोक्याचा इशारा देऊन गेला होता.
'वारसाहक्क असूनही या हवेलीत आम्ही कधीच राहिलेलो नाहिये. अनेक वर्षांपूर्वी माझी चुलत आजी म्हणजेच विलासपूर संस्थानाच्या सरदाराची पत्नी इथे मुक्कामाला होती. ती कपडे बदलत असताना तिच्या खांद्यावर एका सापळ्याने मागून हात ठेवले. किंचाळून ती बेशुद्ध पडली. या धक्क्यातून ती कधीच सावरली नाही. आमच्या परिवारातल्या बऱ्याच लोकांनी उमरावसाहेबांचं भूत प्रत्यक्ष पाहिलंय. त्या प्रसंगानंतर हवेलीत रहायला नोकरचाकर पण तयार नव्हते.' शेवटचे उमरावसाहेब सांगत होते.

'माफ करा उमरावसाहेब, पण आपण सर्व एकविसाव्या शतकात वावरणारे सुशिक्षित लोक आहोत. माझा या गोष्टींवर काडीचाही विश्वास नाही.' मंत्रीसाहेब म्हणाले.
'तुमच्यासारखे तथाकथित सुधारक लोक भूताचं अस्तित्व मानायला तयार नसले तरी भूत किंवा अमानवी शक्ती जगात अस्तित्वात आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि उमरावसाहेबांचं भूत जवळजवळ तीन शतकं त्या हवेलीत आहे. मरणापूर्वी ते कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दिसतंच.' शेवटचे उमरावसाहेब जरा परखडपणेच म्हणाले.

'भूत नावाची गोष्ट जगात नाही. आणि हा निसर्गाचा नियम आहे. तो तुमच्या गावापुरता आणि हवेलीपुरता बदलणारा नाही.' मंत्रीसाहेब त्यांचे प्रसिद्ध मंत्रीछाप हास्य करत म्हणाले.

'मंत्रीसाहेब हे लक्षात ठेवा कि ही मुंबई नाही. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या जगात अस्तित्वातच नाहीत असं समजू नका. ठिक आहे, तुम्हाला भूताबरोबर राहणं मंजूर असेल तर अवश्य त्या हवेलीत रहा, पण नंतर म्हणू नका कि मी सांगितलं नाही.' शेवटचे उमरावसाहेब निर्वाणीच्या स्वरात म्हणाले.

अशाप्रकारे काही दिवसांनी मंत्रीसाहेब आपल्या कुटुंबासह हवेलीत दाखल झाले. मंत्रीसाहेबांच्या पत्नी सौ वत्सलाबाई देशमुख या मध्यमवयाकडे झुकणाऱ्या आणि चेहऱ्यावर अजूनही तारुण्यातल्या सौंदर्याच्या खुणा बाळगून होत्या. वत्सलाबाईंचा उत्साह या वयातही सळसळता होता. थोरला मुलगा जितेश एक देखणा तरुण होता. नृत्यात प्रवीण होताच आणि आता तो रुपेरी पडद्यावर जाण्याच्या दृष्टीने हालचाली करत होता. मुलगी अमिता हुशार आणि चित्रकलेत चांगली होती. सर्वात धाकटी जुळी मुलं होती मितेश आणि रितेश,त्यांना त्यांच्या खोडकर स्वभावामुळे सर्व राहू केतू म्हणायचे.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात ते सर्व हवेलीपाशी पोहचले. त्यांचं स्वागत करायला हवेलीची जुनी नोकराणी चंदा होती. चंदाने त्या सर्वाना अदबीने आत नेले. दिवाणखान्यात चहा तयार होता. वत्सलाबाई फिरुन खोली पाहत होत्या.
अचानक त्या थबकल्या. 'चंदा, बघ इथे कसलातरी लालसर डाग पडला आहे.'
'हो इथे रक्त सांडलं होतं.'- चंदा
'भयंकर. पण मला माझ्या नव्या घरात रक्ताचा डाग नकोय आणि तो आताच्या आता गेला पाहिजे.' -वत्सलाबाई.'
हा डाग असा जात नाही. १५७५ मधे याच जागी उमरावसाहेबांनी त्यांच्या पत्नीचा खून केला. हा रक्ताचा डाग तेव्हापासून आहे आणि तो जात नाही. हा डाग पहायला जवळच्या गावातली लोकं पण येतात.'
जितेश पुढे आला. 'हॅ, काहीतरीच. असा कसा जात नाही?आता लायझॉलने जरा पुसला कि जाईल.'
'नाही, हा डाग पुसायचा प्रयत्न केला तर अनर्थ होईल.' चंदा म्हणाली आणि घाबरुन त्याच्याकडे पाहतच राहिली. जितेशने तितक्यात सामानातून उचकून लायझॉलची बाटली बाहेर काढली आणि तो ते त्या डागावर टाकून जोरजोरात घासत होता. काही मिनीटात डाग नाहिसा झाला.
'बघ, मी म्हटलं होतं ना, लायझॉलने डाग जाणारच.' जितेश म्हणाला. तितक्यात जोरात वीज कडाडली. चंदा घाबरुन बेशुद्ध पडली.

'आता हिचं काय करायचं गं आई?' जमिनीवर पडलेल्या चंदाकडे पाहत जितेश म्हणाला.
'हिचं काय? पगारातून बेशुद्ध पडलेल्या वेळेचे पैसे कापायचे. परत बेशुद्ध पडणार नाही.' वत्सलाबाई म्हणाल्या. आणि चंदा पटकन शुद्धीवर आली. चंदाने पुष्कळ संगायचा प्रयत्न केला कि इथे भूत आहे, पण जितेश आणि वत्सलाबाईंनी तिला समजावून झोपायला पाठवले आणि दोघे आराम करायला आपापल्या खोल्यांकडे गेले. दिवस सुरळीतपणे पार पडला.

रात्रभर विजा कडाडत होत्या. सकाळी ते सर्व उठले आणि पाहतात तर रक्ताचा डाग परत त्याच जागी होता. खुद्द मंत्रीमहाशयांनी रात्री नीट कडीकुलपं लावली होती. देशमुख कुटुंबाची भूताच्या अस्तित्व नसण्याबद्दलची ठाम मते डळमळत होती...

त्या रात्री मंत्रीसाहेबाना एका विचित्र आवाजाने जाग आली. त्यांनी उशाशी ठेवलेली चाळिशी लावली आणि ते जिन्यावर आले. आणि ...
त्यांच्यासमोर उमरावसाहेबांचे भूत उभे होते. त्याचे डोळे लाल निखाऱ्यांसारखे चमकत होते. कपडे राजेशाही पण जुने होते. आणि त्याच्या हातात जुनाट गंज लागलेल्या जड साखळ्या होत्या, त्या करकरत होत्या.
मंत्रीसाहेब म्हणाले, 'हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते, माझ्या घरात मी तुम्हाला असा अपरात्री फिरुन आमची झोपमोड करु देणार नाही. आणि तुम्हाला फिरायची इतकी हौसच असेल तर हे कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइल साखळ्याना लावा म्हणजे त्या असा आवाज करणार नाहीत.' आणि मंत्रीसाहेब शांतपणे ती कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइलची बाटली जमिनीवर ठेऊन परत झोपायला निघून गेले.

भूत काही क्षण संतापाने थरथरत उभं राहिलं आणि ती बाटली लाथाडून जिन्यावरुन उतरु लागलं. त्याच्या अंगातून हिरवा प्रकाश येत होता. भूत जिन्याच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं आणि तितक्यात......
जिन्यावर राहू केतू अवतरले आणि त्यांनी मोठी उशी भूतावर नेम धरुन फेकून मारली!! उमरावसाहेबांचं भूत बावचळलं आणि आपली अदृश्य व्हायची कला आठवत अदृश्य झालं. घर परत शांत झालं आणि राहू केतू झोपायला निघून गेले..

आपल्या गुप्त खोलीत येऊन भूताने सुटकेचा निश्वास सोडला आणि ते ताळ्यावर येऊ लागलं. भूताच्या ३०० वर्षांच्या उजळ कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला असा नामुश्कीचा प्रसंग आणि अपमान सहन करावा लागला होता. भूताच्या डोळ्यासमोरुन त्याचे ३०० वर्षातले कर्तृत्व सरकून गेले..

कधीकाळी विलासपूरची सरदारपत्नी भूताला पाहून किंचाळून बेशुद्ध पडली होती.. कधीकाळी एका आचाऱ्याने आत्महत्या केली होती स्वयंपाकघराच्या खिडकीवर टकटक करणारा हिरवा हात बघून.. कधीकाळी घरी आलेली एक श्रीमंत पाहुणी रात्री खुर्चीत एका सांगाड्याला बसलेलं पाहून सहा महिने अंथरुणाला खिळून होती.. घरातली प्रत्येक मोलकरिण पडद्यामागे भूताला पाहून नोकरी सोडून पळून गेली होती..भूताला हे सर्व सन्मान आठवले. 'घाबरवणं हीदेखील एक कला आहे' यावर भूताचा विश्वास होता आणि या कलेची जोपासना भूताने मेहनतीने आणि चिकाटीने ३०० वर्षे करुन या कलेत प्राविण्य मिळवलं होतं.. त्यासाठी निरनिराळ्या वेशभूषा अभ्यासपूर्वक केल्या होत्या..

आणि आज हे पाच दिडशहाणे मुंबईकर त्याच्या कर्तृत्वाला लायझॉलने धुवून त्याच्या अंगावर उशा फेकून मारत होते. भूत भयंकर संतापले. आजवरच्या इतिहासात कोणत्याच भूताला इतकी अपमानास्पद वागणूक नव्हती मिळाली. या अपमानाचा सूड घ्यायचाच हा निर्धार करुन भूत आराम करु लागलं.
सकाळी गप्पांत प्रमुख विषय हाच होता. कॅस्टऱॉल इंजिन ऑइलची देणगी भूताने अव्हेरल्यामुळे मंत्रीमहाशय चिडले होते. राहू केतू उशीचा प्रसंग रंगवून सांगत होते. मंत्रीमहाशय हसू दाबत म्हणाले, 'कितीही झालं तरी ते भूत ३०० वर्षं इथे राहतं आहे. त्याच्यावर उशा फेकून मारणं हे चांगले संस्कार नाहीत. अर्थात, त्याला जर कॅस्ट्रॉल ऑइलचा वापर करायचा नसेल तर आमचा नाईलाज आहे आणि आम्हाला त्याच्या गंजलेल्या साखळ्या हिसकावून घ्याव्या लागतील. किती आवाज येतो!!' आणि सर्वजण खो खो हसू लागले.

तो आठवडा तसा शांततेत गेला आणि काहीही विशेष प्रसंग घडला नाही. पण तो जमिनीवरचा डाग मात्र रोज पुसला तरी रोज परत अवतरत होता. आणि डागाचा बदलणारा रंग पण विचीत्रच होता. एक दिवस डाग विटकरी, एक दिवस पिवळा, एक दिवस नारिंगी, एक दिवस जांभळा. आणि शुक्रवारी तर चक्क पोपटी रंगाचा डाग होता!! डागाचा बदलता रंग देशमुख कुटुंबाचा चेष्टेचा विषय बनला होता. पण अमिता मात्र आता तो डाग पाहून अस्वथ होत होती..ज्या दिवशी डागाचा रंग हिरवा झाला त्यादिवशी ती खूपच अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती.

रविवारी रात्री अचानक 'धडाड!!' आवाजाने सर्व जागे झाले. बघतात तर काय, जिन्याच्या कोपऱ्यात ठेवलेला लोखंडी पुतळा खाली पडला होता आणि पुतळ्याला ठेचकाळलेलं भूत कळवळून गुडघा दाबत खुर्चीवर बसलं होतं. ही संधी साधून राहू केतू त्यांच्या गलोली घेऊन आले आणि त्यांनी भूतावर खड्यांचा वर्षाव केला. तितक्यात मंत्रीमहोदय जुनं पिस्तुल घेऊन आले आणि भूतावर ते रोखत गरजले, 'हँडस् अप!!' भूत चिडून जाऊ लागलं. जाता जाता जितेशच्या हातातली मेणबत्ती विझवायला ते विसरलं नाही.
जिन्यावर सुरक्षित जागी आल्यावर भूताने ठरवलं कि आज आपल्या सुप्रसिद्ध रौद्र हास्याचा पहिला प्रयोग करायचा यांना घाबरवायला. हे हास्य घाबरवण्याच्या परिक्षेत नेहमी हमखास यशस्वी ठरलं होतं. एका उमरावाचा काळा विग हे हास्य ऐकून पांढरा झाला होता. भूताने जास्तीत जास्त आवाज वाढवून एक भयानक रौद्र हास्य केलं.

इतक्यात खोलीचं दार उघडून वत्सलाबाई डोळे चोळत बाहेर आल्या आणि त्रासिक आवाजात म्हणाल्या, 'तुमची तब्येत खराब झालेली दिसतेय. पोटात वायू आहे आणि डोकं पण ठिकाणावर नाही.अपचन वगैरे झालं असेल तर हे इनो फ़्रुटसॉल्ट पाण्यातून घ्या आणि झोपा. असा रात्री अपरात्री दंगा करु नका. हे सभ्य माणसाचं घर आहे.' भूत परत अंगातून हिरवा प्रकाश सोडून आपली एखादी भितीदायक वेशभूषा घेणार तितक्यात जिन्यावर पावलांचे आवाज ऐकू आले आणि ते घाबरुन राहू केतूच्या हातात परत सापडण्याआधी अदृश्य झालं..

परत काही दिवस भूताने फरशीवरच्या डागाव्यतीरिक्त आपलं अस्तित्व दाखवलं नाही. पण भूत आता जबरदस्त आणि भक्कम योजना आखत होतं. मुख्य बदला त्याला जितेश आणि राहू केतूवर घ्यायचा होता. जितेशने त्या डागाचा लायझॉल फासून रोज अपमान केला होता. 'एकदा या मुलांना घाबरवलं कि आपलं काम आपोआप होईल.' भूताने विचार केला. राहू केतूंचे पलंग एकमेकांशेजारी थोडं अंतर ठेऊन होते. दोन पलंगाच्या मधोमध हिरव्या रंगाचं भयानक प्रेत बनून काही मिनीटं उभं राहिलं तरी घाबरवण्याचं काम फत्ते होणार होतं.त्या दोघांची दातखीळ बसणार होती... अमिताशी भूताचं जास्त शत्रुत्व नसल्याने तिला जास्त घाबरवायचं नाही असं भूताने ठरवलं. तिला काय, थोडेफार पडदे वगैरे हलवून आणि रात्री विकटहास्य करुन पण घाबरवता येईल.

रात्री सर्वत्र निजानीज झाली. आणि भूत कामगिरीवर बाहेर निघालं. वादळी वारं होतं.. बाहेर घुबडाच्या घुत्कारण्याचा आवाज येत होता..

भूत जिन्यापाशी आले आणि..

भूताच्या समोर एक भयंकर आकृती उभी होती. तिचा चेहरा पांढराफटक, अंग पांढरंफटक आणि चेहऱ्यावर भयंकर हास्य थिजलेलं होतं. डोळे लालभडक होते. त्या आकृतीच्या छातीवर काही शब्द कोरलेले होते, पण भूताने ते वाचण्याचे वेडे धाडस केले नाही. 'भूत पाहणे' हा भितीदायक अनुभव भूताला नविन असल्याने ते किंचाळून तिथून पळून गेलं आणि धापा टाकत आपल्या खोलीत पोहचलं.

सारी रात्र भूताने जीव मुठीत धरुन आपल्या खोलीत काढली. पहाट होता होता भूताने धीर करुन परत त्या भूतापाशी जाण्याचा विचार केला. 'एक से दो भले' या नात्याने त्या भूताशी मैत्री करुन आपली शक्ती वाढवता येईल या विचारात भूत जिन्यापाशी पोहचलं आणि..

रात्री भूताने पाहिलेल्या त्या भूताची रया गेल्यासारखी वाटत होती. ते कोपऱ्यात मुरगळून पडलं होतं. भूताने धावत जाऊन त्या भूताला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या भूताचं डोकं घरंगळून फुटलं..गुंडाळलेला पांढरा पडदा पडला आणि स्वयंपाकघरातला उंच झाडू त्यातून प्रकट झाला. शेजारी कागद चुरगळून पडला होता. त्याच्यावर लिहीलं होतं '१००% आयएसआय मार्क ओरिजिनल भूत. नकलांपासून सावधान.'

भूताने रागाने किंकाळी फोडली. राहू केतूने झाडूला कापड गुंडाळून भूताला हातोहात मूर्ख बनवलं होतं. 'या खानदानाचा सत्यनाश करेन!!!' डोळे गरागरा फिरवत भूताने भूतांच्या गाईडमधे वर्णिलेली मुद्रा करुन प्रतिज्ञा केली. आणि ते त्याच्या शवपेटीत झोपायला गेलं, कारण सकाळ व्हायची भयप्रद चिन्हं दिसू लागली होती..

दुसऱ्या दिवशी भूताला खूप थकवा आला होता. एकंदरीतच मागच्या महिन्यातील घटना आणि मानसिक ताण यामुळे त्याची प्रकृती खालावलीच होती. पुढचे पाच दिवस भूताने लोळून काढले. त्याचे फरशीवरचा डाग बनवण्याचे काम पण त्याने आता सोडून दिले होते. 'रोज लायझॉलमधे फरशीला बुडवणारे हे क्षुद्र जीव तो डाग मिळवण्याच्या लायकीचेच नाहीत.' भूत पडल्या पडल्या विचार करत होते. पण असं पडून किती दिवस राहणार? किमान आठवड्यातून दोनदा घरात वावरुन लोकांना घाबरवणं हे भूताचं कर्तव्य होतं. पण ती खोडकर कार्टी नाही म्हटलं तरी त्याला घाबरवून जात होती.

पुढचे तीन आठवडे भूत कर्तव्यपूर्तीसाठी रात्री हवेलीत फिरले. पण त्याने पूर्ण सावधगिरी बाळगली होती. चपला काढून त्या हातात घेउन ते चाले आणि साखळ्यांनाही त्याने कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल लावून व्यवस्थित आवाजरहित केले होते. पण इतकं करुनही राहूकेतूंनी एक दिवस जिन्याच्या दोन्ही बाजूना दोरी ताणून बांधून ठेवली आणि भूताने पायऱ्यांवरुन गडगडत सपशेल लोटांगण घातले. खाली ठेवलेल्या अमूल बटरच्या लादीवरुन जोरात घसरुन लंगडत लंगडत भूत खोलीत पोहचले. सूडाच्या आगीने ते जळत होते. शेवटी भूताने अनेक बक्षिसं मिळवलेला आपला 'बिनशिऱ्या' हा पोशाख काढला.
रात्री सर्व झोपल्याची खात्री करुन भूताने आपली वेशभूषा केली. राहू केतूंच्या खोलीचे दार त्याने हलकेच उघडले आणि ..

दारावर ठेवलेला पाण्याचा भरलेला जग भूताच्या अंगावर उपडा झाला आणि ते नखशिखांत भिजले. समोरुन त्याला राहू केतूंचे पोट धरधरुन हास्य ऐकू आले. आणि भूत मागल्या पावली पळाले.
भूताची प्रकृती फारच ढासळली होती. गळ्याला मफलर बांधून ते दिवसरात्र खोलीत पडून राहायचे.

त्या दिवशी अमिता घरी उशिरा आली आणि लपतछपत मागच्या जिन्याने घरात शिरली. भूताच्या खोलीवरुन जात असताना तिने पाहिले कि दार उघडे होते. आत पडलेले भूत फारच अशक्त आणि दयनीय दिसत होते. अधूनमधून ते सांधेदुखीमुळे कण्हत होते. अमिताला दया आली. ती खोलीत शिरली.
'तुमची अवस्था बघून मला वाईट वाटतं. पण घाबरु नका, उद्या माझे भाऊ बाहेर जाणार आहेत आणि पूर्ण दिवस तुम्हाला कोणाचीच भिती नाही. पण हेही खरं कि तुम्ही जर नीट वागला असतात तर कोणीच तुम्हाला त्रास दिला नसता.'
भूताचा आवाज चढला. 'मूर्ख मुली, 'मी नीट वागायचं'?? मी नीटच वागतो आहे.हे सर्व प्रकरण सुरु तुझ्या त्या लायझॉलवाल्या भावाने केलं. आणि ती दोन नतद्रष्ट कार्टी, त्यांना मोठ्या माणसाशी, सॉरी भूताशी कसं वागायचं ते संस्कारच नाहीत. मुंबईची आगाऊ बिघडलेली पोरं!!'

'कोण बिघडलं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही तो भिकारडा फरशीवरचा डाग रंगवायला माझ्या रंगपेटीतले रंग चोरता. आधी सर्व लाल रंगाच्या छटा चोरल्यात. मला आता सूर्योद्याचे देखावे रंगवता येत नाहीत. नंतर पिवळा.जांभळा..शेवटचा पोपटी रंगसुद्धा चोरलात. आता माझ्याकडे फक्त पांढरा आणि काळा उरलेत. काय हा मूर्खपणा? हिरव्या रंगाचं रक्त पाहिलंय का कुणी? आणि रोज रक्ताचा डाग ताजा ठेवण्याची इतकीच हौस आहे तर माझे रंग का चोरता? खरं रक्त आणता नाही येत तुम्हाला?' अमिताने चिडून सरबत्ती सुरु केली.

भूत जरा वरमले. 'मी तरी काय करणार? आजकाल रक्त मिळणं किती कठिण झालं आहे. तुझ्या त्या आगाऊ भावाने लायझॉल वापरुन मला आव्हान दिलं म्हणून मला हे सर्व करावं लागलं.'

'तुम्ही या घरातून निघून जा. आम्ही आता इथे राहतो. वाटलं तर मुंबईत जा. तिथे लोक भूत बघायला आणि घरी ठेवायला कितीही पैसे द्यायला तयार होतील. देव दूध पितो म्हणून त्यांनी कितीतरी दूध आणि वेळ वाया घालवला होता. भूतासाठी तर अजून वेडे होतील.'

'आता या उतारवयात मला कुठेही जायचं नाही. मुंबईत तर मुळीच नाही.'
'ठिक आहे, मी राहूकेतूंना अजून एक आठवडा सुटी घेऊन घरी रहायला सांगते.'
'नाही, थांब अमिता, असं नको करुस. मी खूप थकलो आअहे. मला आता शांत झोप हवी आहे पण तीपण मिळत नाही. तीनशे वर्षांपासून मी जागा आहे आणि आता मला विश्रांती हवी आहे.'
'बिचारं भूत!! तुम्ही झोपू शकत नाही का?'

'एक जागा आहे जिथे मला शांत झोप लागेल. तिथे तारे असतील आणि देवदूत गाणं गात असतील. मी आजपर्यंत खूप पापं केली आहेत. जोपर्यंत कोणी निर्मळ मनाने मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा करत नाही आणि माझ्यासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करत नाही तोपर्यंत मला मुक्ती नाही.' भूताचे डोळे पाणावले.
भूताची अवस्था बघून अमिताच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, 'मी प्रार्थना करेन तुमच्यासाठी.' आणि ती डोळे मिटून पुटपुटली,'हे परमेश्वरा,यांना यांची पापं माफ कर. त्यांनी भरपूर फळं भोगली आहेत तीनशे वर्षे. आता त्यांना तुझ्या दारी आश्रय दे.'

आणि भूत हळूहळू विरळ होऊ लागलं. 'मुली, तुझे असंख्य आभार!' असं म्हणून ते नाहीसं झालं.
वत्सलाबाई अमिताला घरभर शोधत होत्या. शोधत शोधत त्या रिकाम्या खोलीत आल्या, तर अमिता डोळे मिटून बसली होती. आणि शेजारी चिमूटभर राख पडली होती. उमरावसाहेबांच्या भूताला अखेर मुक्ती मिळाली होती.....


-समाप्त-
(ऑस्कर वाइल्डच्या 'कँटरव्हिलेज घोस्ट' चे मराठीकरण)
-अनुराधा कुलकर्णी

होम्स कथाः अंतिम लढत

खूप जड अंतःकरणाने आज मी माझ्या प्रिय मित्राचा, होम्सचा हा शेवटचा वृत्तांत लिहितो आहे. स्कार्लेटच्या प्रकरणापासून माझा आणि होम्सचा आलेला संपर्क, आम्ही एकत्र पाहिलेल्या अनेक घटना, केलेली काही साहसे हे लिहूनच खरं तर मी थांबलो असतो. ज्या अप्रिय घटनेने माझ्या जीवनात ही कायमची पोकळी निर्माण केली आहे, ती तुम्हाला वर्णन करुन सांगण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं मला वाटत होतं. पण आज कर्नल मॉरीयार्टी अनेक लिखाणांतून आपल्या भावाचं गात असलेलं गुणगान पाहून मला खरी गोष्ट जगापुढे मांडण्याखेरीज गत्यंतरच नाही.. प्रा. मॉरीयार्टी आणि होम्समध्ये नक्की काय झालं ते या प्रसंगाला जवळून पाहिलेला साक्षीदार म्हणून सांगण्याची जबाबदारी मला घ्यावीच लागेल.

माझ्या लग्नामुळे, आणि माझ्या खाजगी डॉक्टरीमुळे होम्सचा आणि माझा संपर्क आणि येणंजाणं पूर्वीइतकं राहिलं नव्हतं. म्हणजे, अजूनही त्याला काही केसच्या संदर्भात माझी मदत लागली तर तो येत असे, पण भेटी आधीच्या मानाने तुरळकच झाल्या होत्या. १८९० मध्ये तर माझ्या माहितीत आणि माझा संबंध आलेल्या त्याच्या तीनच केस होत्या. त्यावर्षी मी वर्तमानपत्रात वाचलं की फ्रेंच शासनाने त्याला एका महत्वाच्या केससाठी नियुक्त केलं आहे. आणि नॅरबोन आणि नाईम्समधून आलेल्या त्याच्या पत्रांवरुन मला वाटलं की त्याचा फ्रान्समधील मुक्काम लांबेल. त्यामुळे एप्रिलच्या संध्याकाळी तो माझ्या दवाखान्यात आला तेव्हा मला खरं म्हणायचं तर जरा आश्चर्यच वाटलं. आणि तो खूप निस्तेज आणि पूर्वीपेक्षा जास्त हडकुळा वाटत होता.

'हो, मी हल्ली जरा जास्तच दगदग करतोय.' माझी नजर आणि नजरेतले भाव ओळखूनच तो म्हणाला. 'थांब हं, मी जरा खिडक्या बंद करुन घेतो.' माझ्या वाचनाच्या टेबलावर जो काही थोडाफार प्रकाश पडत होता तो त्या खिडकीमुळेच. पण होम्स वळसा घालून पलीकडे गेला आणि त्याने खिडक्या घट्ट बंद करुन घेतल्या. 'तुला कशाची तरी भिती वाटते आहे.' मी म्हणालो.
'अं, हो, बरोबर आहे.'
'पण कसली?'
'बंदुकींची.'
'म्हणजे, होम्स, काय झालंय तरी काय?'
'वॅटसन, तू मला आता बऱ्यापैकी ओळखतोस आणि तुला माहीत आहे की थोड्याथोडक्याने हातपाय गाळणारा मी नाही. पण हेही खरं की धोका आहे हे स्पष्ट दिसत असताना उगाच जीव धाडसात घालवणं याला मी हिंमत नाही, मूर्खपणा समजतो. काडेपेटी आहे का रे?' त्याने सिगारेट शिलगावली आणि त्या धुराने नवीन संजीवनी मिळाल्यासारखा तो जरा शांत होऊन विसावला.
'जरा उशिरा आलो आहे,तुला त्रास तर नाही दिला ना? आणि हो, मी जाताना तुझ्या मागच्या कुंपणावरुन उडी मारुन गेलो तर तुला चालेल ना?'
'पण नक्की झालंय तरी काय?' आश्चर्यचकित मी.

होम्सने आपले हाताचे पंजे दाखवले. त्याच्या बोटाच्या पेरांना जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होतं.
'मी काहीतरी कल्पना करुन उगाच घाबरत नाहीये, तुला कळलंच असेल. मला जी शंका आहे ती माझ्या हातांच्या जखमांइतकीच खरी आहे. बरं मला सांग, मिसेस वॅटसन कुठे आहे?'
'ती काही दिवस गावाला गेलीय.'
'म्हणजे तू एकटा आहेस?'
'हो.'
'मग आता मी तुला जास्त हक्काने विचारु शकतो की तू माझ्या बरोबर एक आठवडा मध्य युरोपात येशील का?'
'पण कुठे?' मी गोंधळून विचारलं.
'कुठेही. मला सगळं सारखंच आहे.'

खरोखर आज होम्सची सगळी वागणूकच बुचकळ्यात पाडणारी होती. निरर्थक सुट्ट्या घेऊन भटकणाऱ्यांपैकी होम्स कधीच नव्हता. आणि आज त्याच्या फिकट चेहऱ्यावरचे भाव मला सांगत होते की तो कसल्यातरी जबरदस्त ताणाखाली आहे. होम्सने माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न वाचले असावेत. तो सरसावून बसला आणि मला सांगायला लागला. 'तू कधी प्राध्यापक मॉरीयार्टीचं नाव ऐकलं आहेस?नसशीलच.'
'नाही'
'अत्यंत हुशार आणि धूर्त माणूस आहे. गुन्ह्यांच्या यादीत त्याचं नाव सर्वात वरती आहे. आणि विशेष गोष्ट अशी की त्याच्याबद्दल जास्त कोणाला काही माहीत नाही. खरं सांगतो वॅटसन, मी जर मॉरीयार्टीला पकडवून या समाजाला त्याच्यासारख्या गुन्हेगारांपासून मुक्त करु शकलो तर तो मी माझ्या कारकीर्दीत गोवलेला सन्मानाचा शिरपेच समजेन आणि त्याच्यानंतर एखाद्या निरुपद्रवी धंद्यात शिरेन. तुला म्हणून सांगतो वॅटसन, फ्रान्स आणि स्कँडीनेव्हीयन राजघराण्याच्या मदतीसाठी मी ज्या शोधकार्यात होतो त्याने माझ्यासमोर खूप वेगळी गुपिते उघडली. आता माझ्यापुढे एकच पर्याय होताः सर्व शोधकार्य सोडून देऊन माझ्या रसायनशास्त्राच्या संशोधनाकडे वळणे किंवा सर्व कळूनही शांत बसून राहणे. पण मॉरीयार्टीसारखा समाजकंटक आणि धोकाद&