आम्ही आणि उपकरणे
"मला सांग, जर एखादी 67 रुपयांची वस्तू 2 वर्षं वापरून कोणाच्या हातून तुटली तर किती इश्यू करायचा?"
समोरचा प्राणी एकदम कनवाळू मोड मध्ये होता.
"अजिबात ओरडू नये.मुलं निरागस असतात.कधीकधी होतात खराब त्यांच्या हातून वस्तू.मोटर स्किल्स तयार होत असतात."
अचानक याला वेगळाच संशय आला आणि त्याच्या भुवया वर गेल्या.
"आता काय तोडलंस तू? तुला गप्प बसवतच नाही का?"
"अरे मी मुद्दाम नाही केलं.कोबीचं थालीपीठ लावायचंय ना, आपला दोरी ओढायचा चॉपर कोबी बारीक करायला वापरत होते.जरा जास्त भरला गेला आणि दोरी किंचित जोरात ओढली गेली."
"किंचित? मी बघत होतो मीटिंग चालू असताना.नुसती दात ओठ खाऊन खसाखसा ओढत होतीस दोरी.मुळात कोबी ही काय दोरी चॉपर ने कापायची गोष्ट आहे?"
"मला मानसिक स्ट्रेस आहे आज गोडा मसाला करायचाय म्हणून.म्हणून पटापट आवरत होते.67 रुपयांचा चॉपर मोडला म्हणून इतके शालजोडीतले नको."
"काल पण गोडा मसाला बनवायचा म्हणून नुसती खिचडी केली.आज गोडा मसाला बनवायचा म्हणून नुसती थालिपीठं. गोड्या मसाल्याचा स्ट्रेस अजून किती दिवस कॅश करणार बाई तुम्ही?"
हा प्राणी स्वयंपाकघरात बसून ऑफिसचं काम करतो.त्यामुळे त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असतं.'पुरूषजातीवर अन्याय' वगैरे नाही.5जी ची सर्वात चांगली रेंज डायनिंग टेबलावर येते.राऊटर लावणाऱ्या ने हे एक बरं केलं.आता मला कुकर, गॅस वरचं दूध बंद करायला लक्षात ठेवावं लागतच नाही.
थालीपीठ कमी पडल्याने धिरडं करण्याचा बेत ठरला.आमचे साहेब धिरडी माझ्या पेक्षा चांगली मऊ लुसलुशीत करतात.त्यामुळे ते काम आऊटसोर्स करून मोबाईल बघायला घेतला.तेवढ्यात स्वयंपाकघरातून मोठा आवाज आला.एकदा मोबाईल मध्ये डोकं खुपसलं की समोर 3 रिष्टर स्केल चा भूकंप झाला तरी काढायचं नाही असा माझा नेम आहे.त्यामुळे शांतपणे मोबाईल चं काम आवरून स्वयंपाक घरात गेले.
"हे काय?तव्याचं हँडल कसं निघालं?"
"मी जरा संजीव कपूर सारखं फ्राईंग पॅन मध्ये धिरडं उंच उडवत होतो.तर हँडल चा स्क्रू निघून तवाच हवेत उंच उडाला."
"एकमेव जरा बरा नॉनस्टिक तवा होता तो.त्याला पण जायबंदी करून ठेवला."
"इथे इतका मोठा नवरा अपघातातून वाचला त्याचं काही नाही.माझ्या डोक्यावर पडला असता गरम तवा."
"गॅस वर पडून ग्लास टॉप पण फुटू शकला असता.अरे हो,लागलं नाही ना तुला?"
अश्या अजून काही छोट्या मोठ्या घटना घडून जेवण सुखरूप पार पडलं.आता आम्ही घरच्या चक्कीवर गोडा मसाला करणार.
ही चक्की आणल्या पासून मिक्स पीठाचा, दळलेल्या कॉफीचा,ओट च्या भाजणीचा, आयत्या लाडू मिक्स चा बिझनेस करण्याचं स्वप्न आम्ही खूप वेळा बघतो.घरकाआटा. कॉम आणि गिरणीवाला.कॉम,चक्कीवाला.कॉम,दळण. कॉम अशी डोमेन नेम पण बघून ठेवलीत.या सगळ्या स्वप्नांची फायनल स्टेज 'माहेर किंवा लोकप्रभा मासिकात वीणा पाटील मॅडम सारखा सूट बूट वाला टेबल खुर्चीत बसून फोटो' ही असते.(मेलं आम्ही स्वप्नात पण फोर्ब्स मॅगझीन मध्ये किंवा इकॉनॉमिक्स टाईम्स जात नाही.)जरबेरा लावून मासिकात सूटबूटवाला फोटो, पाणी वाचवायचं गॅजेट बनवून मा.सू. वा.फो., घरच्या घरी हेल्मेट होल्डर बनवून मा.सू. वा.फो. अशी या स्वप्नाची अनेक प्रती रूपं आहेत.प्रत्यक्षात आम्ही 'सोफ्यावर बसून लोळणे' सोडून बाकी कोणतंही व्हेंचर एकमताने करत नाही.
मी मसाला साहित्य एक एक करून भाजायला घेतलं.सगळं भाजून झाल्यावर चक्कीपाशी गेले आणि हळद कुटायचं वेगळं एक्सटेन्शन चक्कीला जोडलं.आणि एकदम कॉम्प्युटर हँग व्हावा तशी हँग झाले.
"अरे जरा मला बघून सांग ना.मसाला कुठून आता टाकायचा आणि कुटलेला मसाला कुठून बाहेर येणार ते?"
"गोडा मसाला यात करू नकोस.माझं ऐक. मिक्सरमध्ये वाट."
"माझे श्रम कमी झालेले नकोच असतात तुला.मला सांग बाकी सगळं मी करते. तू बस ते दळण ऐकत."
'ते दळण' हा वेगळाच किस्सा आहे.साहेब आवडलेलं गाणं रिपीट मध्ये 12 वेळा ऐकतात.लग्न नवं असताना जगजीत ची 'तेरे आने की जब खबर बहकी, तेरी खुशबू से सारा घर महके' ही गझल मी सतत 20 वेळा ऐकली.अजूनही ती गझल कोणी लावली की मी केस उपटत किंचाळत वस्तू फेकायला चालू करते असा आजूबाजूच्यांचा वृत्तांत आहे.त्यात त्या इन्स्ट्रुमेंटल सीडी.फक्त संगीत हा फक्त लिफ्ट मध्ये किंवा 5 स्टार हॉटेल मध्ये खाता खाता मंद आवाजात ऐकायचा प्रकार आहे असं माझं परखड मत आहे.चांगले शब्द हवेत.नाहीतर व्हाईल(1) मध्ये अखंड अडकलेल्या प्रोग्राम सारखं मन अखंड ते संगीत संपायची वाट पाहत बसतं. लिफ्ट मध्ये अडकून राहिल्या सारखं.
साहेबांना ऐकू न गेल्याने तरातरा जाऊन इन्स्ट्रुमेंटल बंद केलं.
"माझं इन्स्ट्रुमेंटल बंद का केलं?"
"आवाज मोठा होता.मला त्रास होतो."
"मग आवाज लहान करायचा.बंद का केलं?"
"आवाज वालं बटन बिघडलंय.मागच्या वेळी कमी केला होता तेव्हा सोसायटीत ऐकू जाईल इतका मोठा झाला होता. मला येत नाही याचा आवाज कमी करता."
"मग इलेक्ट्रॉनिक अँड रेडिओ इंजिनिअर म्हणवून घेऊ नये स्वतःला."
"तुला येतं का, टूल कटिंग मशीन किंवा लेथ मशीन स्वतः बनवता? मग बोलू नये."
अश्या माफक प्रेमळ संवादानंतर जगजीत सिंग ऐकणारा प्राणी चक्की बघायला आला.चक्की नवी असताना उत्साहाने आम्ही यात मिरपूड, दालचिनी पूड, कॉफी पूड, काळे राळे गोरे राळे मिक्स चे भाकरी पीठ असे बरेच प्रयोग केले.सगळ्या प्रयोगाचा पुढचा भाग 'दालचिनी फ्लेवर कणिक' 'कॉफी फ्लेवर भाकरी पीठ' 'मिरपूड फ्लेवर बेसन' असा आहे हे अनुभवल्यावर आम्ही शहाण्या बाळासारखे त्यात ज्वारी गहू बेसन पीठच बनवायला लागलो.दारूचं व्यसन असलेल्या माणसाने कधीतरी रीलॅप्स व्हावं तसं आज कातरवेळी गोडा मसाला चक्कीत बनवण्याची लहर आली होती.
आमची चक्की चालू केल्यावर त्यात धान्य पडेपर्यंत 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा' या प्रसिद्ध गाण्याची धून अव्याहत वाजवत राहते.आमचीच चक्की ती.विचार न करता अंदाधुंद कामं करायचे धडे नाही देणार तर काय.
चक्कीत मसाल्याचे भाजलेले पदार्थ टाकल्यावर 1 मिनिट चालून ती बंद पडली आणि परत 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा' चा जप करायला लागली.मग तिला गप्प करून उघडलं.तर ब्लेड वर काही बारीक झालेले मसाले काही आख्खे मसाले तसेच.परत शांतपणे ग्लोव्हज घालून ब्लेड चे बारीक न झालेले मसाले काढून चक्की चालू करून फीड केले.पण आज फारच हट्टीपणा करायला लागली.एखाद्या हट्टी बाळाला प्रेमाने छोटे छोटे घास भरवत जेवू घालावं तसं प्रेमाने तिला मूठ मूठ आख्खा मसाला हळूहळू खाऊ घातला.पण मूठ जरा मोठी केली की ती शहाणी परत 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा' म्हणून सत्याग्रह चालू करायची.
"मॅन्युअल आण. वाचूया."
"हे घे."
"यात कुठे लिहिलांय की गोडा मसाला होईल म्हणून?"
"त्यात 'हळद, सुकी मिरची वगैरे' लिहिलंय. ते वगैरे म्हणजे गोडा मसाला."
"महान आहेस बाई तू.इतक्या वेळात मिक्सरमध्ये चार वेळा करून झाला असता."
"म्हणजे तेच.बायकोने घाम गाळत मिक्सर पाशी उभं राहावं."
"मग आता आपण दोघेही घाम गाळत मसाला करणार, त्यानंतर ब्लेड साफ करणार, त्यानंतर जमीन साफ करणार."
भाजलेलं आणि ब्लेडने बारीक तेलकट झालेलं खोबरं आणि मसाल्यातली ती कडक टगी वेलची यांनी घात केला होता.त्या वेलची चे 3 दाणे एकत्र आले की चक्की लगेच बंद पडून "सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा" म्हणून नाचायला लागायची.शिवाय आता पुढच्या 2 बॅच 'गोडा मसाला फ्लेवर भाकरी' खावी लागणार होती.हे सगळं नाटक सकाळी 9 चे कॉल चालू झाल्यावर आवरता आलं नसतं त्यामुळे तातडीचं व्हॅक्युम क्लिनिंग पण लागणार होतं.
नेहमीचा व्हॅक्युम क्लिनर चालू केल्यावर मोठा घुरर आवाज करून बंद पडला.
"तू वापरला होतास ना शेवटी?"
"मी वापरला.त्याची पिशवी भरल्याने तो ओव्हरलोड झाला.आता पिशवी रिकामी करून पण चालत नाही.तू गेली 3 वर्षं पिशवी रिकामी का नाही केली?"
इथे पडद्यावर लाटा येऊन माझं मन फ्लॅशबॅक मध्ये.
3 वर्षांपूर्वी मला ट्रॉली मागे व्हॅक्युम क्लिनिंग करताना आत पाल ओढल्याचा भास झाला.त्यामुळे तो बरेच दिवस त्याच्या नळीत बोळा कोंबून ठेवला होता पाल मरावी म्हणून.आणि पिशवी रिकामी केलीच नाही.
"तुला पाल दिसली का रे पिशवी रिकामी करताना?"
"मी दुर्बीण लाऊन कचऱ्याची पिशवी बघत नाही."
आता ढोलू ची मदत लागणारच होती.ढोलू म्हणजे बाबांचा 40 वर्षं जुना पहिला अवजड व्हॅक्युम क्लिनर देऊन घेतलेला वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लिनर.हा मोठा आवाज करून आणि 15 मिनिटात 4 बाय 4 फूट ची जागा एकदम स्वच्छ करतो.आपण पाणी टाकायचं.मग थोडी जमीन खराट्याने कोपऱ्यात स्वच्छ घासायची. आणि मग हा पाणी ओढून जमीन स्वच्छ करतो.तो गोल गोल फिरून नाचणारा आणि स्वच्छ करणारा रुम्बा घेतलेला नाही.आमच्या कडचा कांद्याची सालं, तुटलेले क्रेयॉन, चिंध्या,कागद असा बहुगुणी कचरा बघून तो फेफरे येऊन पडेल.ढोलू ला घाई केलेली चालत नाही.शांतपणे काम घ्यावं लागतं.
ढोलू चालू केला आणि तिथे सोसायटी ग्रुपवर वेगळेच ताशे चालू झाले.'लॉकडाऊन मे कुलकर्णी के घर कार्पेन्तर को परमिशन कैसे दिया' म्हणून पलीकडचा प्रेम भक्त भांडायला लागला.या शहाण्याचं नाव 'प्रेम भगत' आहे आणि हा कचाकचा दिवसभर सोसायटी ग्रुपवर वाद घालत असतो.
"बघ आता तो फडया निवडुंग चालू झाला ग्रुपवर त्याला समजवावं लागेल."
"त्याला ढोलू चा फोटो काढून पाठव.म्हणावं याचा आवाज आहे."
"पण आता ढोलू ला काढायची गरज होती का?टिचभर काम नि गावभर आवाज."(अश्या यमकातल्या म्हणी ही यांच्या मातोश्रींची लिगसी.)
"ढोलू बद्दल वाकडं बोललेलं आवडणार नाही.सांगून ठेवते.बाबांची आठवण आहे ती."
"बाबांची आठवण 500 रुपयात विकून तू ढोलू घेतलास.इतकंच असतं तर तो 40 वर्षं जुना व्हॅक्युम क्लिनर प्रेमाने वापरला असतास."
"माझा चांगला चालणारा व्हॅक्युम क्लिनर तू ओव्हरलोड केलास.त्यामुळे ढोलू ला त्रास द्यावा लागला."
"इतक्यात 4 वेळा झाडू पोछा करून झाला असता."
"4 वेळा कोणी?मीच ना?मग मला ठरवुदे झाडू पोछा करायचा की ढोलू ला वापरायचा ते.माय हाऊस माय टूल्स."
घरातला तिसरा छोटा प्राणी गॅलरीत आराम खुर्चीत कँडी क्रश खेळणाऱ्या चौथ्या प्राण्याकडे गेला.
"आजी, आई बाबा खूप वेळ वादावादी करतायत. घरात वेगळाच वास आहे कुकिंग सारखा.सगळीकडे पसारा आहे.तू ये ना."
"ते गेली अनेक वर्षं वादावादी करतायत.त्यापेक्षा तूच ये.आपण कँडी क्रश खेळू."
-अनुराधा कुलकर्णी
No comments:
Post a Comment