या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Friday, 10 April 2020

इगो मसाज देणारी सौंदर्यवारी

(या लेखात पार्लर किंवा कोणत्याही व्यावसायिकाची बदनामी नाही.त्यांचे कौशल्य, त्यांच्या पुढच्या अडचणी आणि आव्हानं याची पूर्ण कल्पना आहे.)
"काय काय करायचंय?"
"पूर्ण हात अर्धेपाय भुवया पेडी हेअरकट आणि फेशियल." मी उडपी हॉटेल मधल्या सारखा मेनू वाचून दाखवला.
"आमच्याकडे ना, हिरे मोती आणि पोवळं पावडर घातलेल्या फेशियल ची ऑफर आहे.फक्त 2000 मध्ये."
(स्वगत: अगं सुंदरी, मी लग्नानंतर पहिल्यांदाच स्वतःच्या डोंबल्यावर इतके पैसे एका वेळी ओतणार आहे.ते पण वार्षिक वर्गणीत फुकट असलेले पैसे पॅकेज डिस्काऊंट मध्ये वसूल करायला.हिऱ्याची पावडर मी लग्नाच्या फेशियल मध्ये पण लावली नव्हती थोबाडाला.फेशियल झाल्यावर 'काय सुंदर मुलगी आहे आरश्यात' पासून 'बाई तश्या सुसंस्कृत व नीटनेटक्या दिसतायत' असं आरश्याला म्हणण्याच्या स्टेज ला चेहऱ्याला कोणतेही हिरे मोती प्लॅटिनम लावता आलेय मी.आज मला पाहिजे ती पावडर फासू दे तोंडावर.अजिबात प्रेशराईज करायचं नाही.)
"नाही मला हर्बल लव्हेंडरच पाहीजेय."
(स्वगत: निश्चयाचा महामेरू|| सकल जगासी आधारू|| तयाचे आठवावे रूप|| निर्धार दाखवावा खूप||)
"पण मॅडम डायमंड ने खूप छान रिझल्ट मिळतील."
"मला रोजच्या साठी पाहीजेय.डायमंड फंक्शन च्या आधी करेन."
(स्वगत: होत आलं.आता अजून थोडं लावून धरलं की झालं.थोडा ताण सहन कर.)
सुंदरीने भात्यातून पुढचा बाण काढला.
"मॅम लव्हेंडर चे किट्स संपलेत.जास्त जात नाही ना.सगळे डायमंड च घेतात."
(स्वगत: अगं ढमे!! दर वेळी कमी किमतीचं बरं संपलेलं असतं.पुढच्या वेळी मीच घेऊन येईन.पार्लर वर काय 'बाहेरचे सौंदर्यपदार्थ आणू नये' अशी पुण्याच्या खानावळी सारखी पाटी नाही.बस मग ओरडत!)
"मी पॅकेज घेतलं आहे.त्याच्या वर खर्च करणार नाही.त्यात बसेल ते चांगलं फेशियल सुचवा किंवा डायमंड फेशियल पॅकेज मध्ये बसवून द्या."
(स्वगत: मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं टाकली नाहीत.मी हिरे मोती पोवळं उचलणार नाही.)
"मॅम ओथ्री फेशियल थोडं महाग आहे पण मी बोलून बघते.तुम्ही पॅकेज मधलं पेडी कॅन्सल करून हे बसवू आपण."
ओथ्री च्या वाटाघाटी पूर्ण करून रोब घालायला खोलीत गेले.नेहमी प्रमाणेच 'कॅमेरे दिसतायत का' वगैरे शोध झाला.(आता कॅमेरे काय लावायचे असले तर लोक 'कॅमेरा' अशी पाटी लावून बाण दाखवून त्याचं भिंग दिसेल असा प्लांट करणार आहेत का?)
लग्नघरामध्ये 50 बायका एका वऱ्हाड खोलीत मेकअप, चेंजिंग, फिडिंग,चहा पिणे असा गोंधळ घालत असताना, दार उघडं असताना, त्यातून दर 3 मिनिटाला एक पुरुष नावाचा मोठा किंवा मुलगा नावाचा लहान प्राणी दर 45 अंशात शक्यतो गोंधळून सभ्यपणे लांब इकडे तिकडे बघत काहीतरी मागायला येत असतो अश्या ठिकाणी मोठा कुर्ता डोक्यात घालून पाठमोरं ब्लाउज/परकर बदलणाऱ्या अनुभवी शूरवीर बाया चेंजिंग रूम मध्ये कॅमेरा काय, उघड्या मैदानावर काचेच्या भिंती असल्या तरी बिचकणार नाहीत. आणि तरीही समजा आपण आलोच कोणत्या बिचाऱ्या कॅमेऱ्यात तर आरश्यात दात विचकून बघणे,पॅन्ट पोटावरुन वर खेचणे वगैरे बावळटलीला करून आपला व्हिडीओ रिजेक्ट करवायचा असतोय.आता काय ते इरोटीक फिरोटीक बघणारे, असं काही वेडं बागडं बघून काय करणारेत.(जाऊद्या, नको त्या भलत्या विचारांच्या गल्ल्यात जायला.एखादा बाई आरश्यात पिवळे दात विचकताना बघून टर्न ऑन होणारा पर्व्ह असायचाही जगात, कोणी पाहिलंय?)
सुंदरी सौंदर्य संवर्धन चालू करते.
"खूप टॅनिंग झालंय हाताला.तुम्ही हॅन्डकॅटा विथ डीटॅन अँड टोनिंग घ्यायला पाहिजे होतं."
"फंक्शन च्या आधी.ही रुटीन ट्रीटमेंट आहे."
"तुम्हाला रोज चांगलं दिसावंसं नाही का वाटत?"
"मला फंक्शन आधीच चांगलं दिसायला आवडतं.म्हणजे लोकांना फरक पटकन कळतो."
वाचायला म्हणून रेट कार्ड हाती घेतलं."केस कापणे" हा सर्वात स्वस्त प्रकार वगळता बाकी प्रकरणं अनेक हजारात जात होती.आपल्या केसाला हायलाईट नावाची झेब्रा रंगरंगोटी नुसती नाही करता येणार.त्याच्या आधी कॅनव्हास काळा पांढरा आहे तो 'कौआ काला' करायला ग्लोबल कलर करावं लागेल.जाऊदे बापडं.तेही पमी च्या लग्नापूर्वी करू.आता काय गरज नाही. 'हेअर स्ट्रेटनिंग' हा प्रकार 6000 ला असल्याचं वाचून आपले केस अत्यंत सरळ आहेत हे आठवून जीव दणकन भांड्यात पडतो.
लहानपणी हे केस कुरळे करायला काय काय नाही केलं.रोलर लावून झोपणे,धातूचा ब्रश गॅसवर गरम करून केसाला गुंडाळणे, लोकल मध्ये मिळणारी प्लॅस्टिक ची 'आरारो करने वाली जुनागड वाली' ची हेअरस्टाईल करणारी क्लिप डोक्याला लावून त्यात केस सर्व दिशानी वेडेवाकडे कोंबून वाफ घेणे.रात्रभर ओल्या केसांच्या वेण्या घालून झोपणे, प्रेमाने काळजी म्हणून अंडी,दूध,दही, निवडुंग,मेंदी,केळं, स्ट्रॉबेरी, काळीमिरी, लवंग, मुलतानी मिट्टी,हळद,दालचिनी, कांदे, टॉमेटो,जायफळ काय काय म्हणून थोबाड आणि केसाला लावायचं सोडलं नाही.आता केसच सोडून चाललेत ते सोडा.अजून 10 वर्षात काहीतरी गॅजेट येईल.हेल्मेट मध्ये ठेवून बटन दाबलं की पाहिजे तितके केस उगवतील.तोपर्यंत आपल्या डोक्यावर असलेले 4 केस टिकवणे.
विचारांची तंद्री अचानक कोणीतरी सुई भोसकायला लागल्याने भंग झाली.सुंदरीने ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड काढायला आकडा वाली सुई नाक आणि कपाळावर टोचायला चालू केली होती.अजून पोलिसांना थर्ड डिग्री ला वापरायला ही पद्धत कशी नाही दिसली काय माहीत.तरी परवाच "चपळ कोळश्याचा मुखवटा" (ऍक्टिव्ह चारकोल फेस मास्क) वापरून पण इतके काळे आणि पांढरे हेड होते.कोळश्याचा मुखवटा चढवल्यावर तो पूर्ण वाळेपर्यंत आणि उपटून काढता येईपर्यंत थांबावे.नाहीतर तो धुवायला प्रचंड पाणी लागते."जा अपना मूह काला कर.आज से तू हमारे लिये मर गयी" हे फक्त पिक्चरमध्येच ठीक.खरंच मुह काला केलं तर पाण्याचं बिल भरूनच फेस यायचा तोंडाला.
टोचण समारोह संपल्यावर ओथ्री फेस पॅक मुळे चेहऱ्याला शांती लाभली.सुंदरी होती छानच दिसायला.काम पण छान करत होती.ही चेहऱ्याला ओथ्री लावत असेल की हिरेमोती?हॉटेल मालक जेवायला दुसऱ्या हॉटेल मध्ये जातो तशी ही दुसऱ्या पार्लर ला जात असेल का?हिचं लग्न झालंय का?(स्वगत आवरतं घेतलं.नात्यातल्या सर्व मुलांची लग्न झालीत.आता ज्यांची झाली नाहीत ते मोठे होईपर्यंत 'लग्न' हा प्रकार बहुतेक म्युझियम मध्येच वाचायला मिळेल.)
आता थोबाड धुवून बाहेर जाऊन हेअर कट करायला एक काळे, सोनेरी आणि प्लॅटिनम केस रंगवलेला सुंदरा होता त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले."पुरुष बायकांचे हेअरकट बायकांपेक्षा चांगले करतात" ही स्त्रियांमध्ये पसरलेली "क्रिकेट मॅच च्या वेळी अमका बसला की हमखास भारताची टीम हरते" याच्या तोडीची अंधश्रद्धा आहे.कारण यु नो...पुरुषाच्या नजरेतून बाईला कोणते केस सुंदर दिसतील याचा आढावा वगैरे वगैरे...आता या तिरंगी प्राण्यापुढे सकाळपासून 100 बाया येऊन केस कापून,सरळ करून,वाकडे तिकडे करून नि रंगवून गेल्यात.त्यातल्या निम्म्या त्याच्या ताई काकू मावशी अक्का आणि उरलेला दुर्मिळ टक्का अप्राप्य इंग्लिश बोलणारा आणि आयफोन सोडून कुठेही नजर ढळू न देणारा स्वर्गीय सुंदर समूह आहे.
हा तिरंगकेशी मुलगा समोर स्त्री, अस्वल,मांजर,कुत्रे,लँगुर माकड,फर ची पर्स काहीही बसलं तरी तितक्याच निर्विकार मनाने केस कापतोय.सध्या याच्या समोर एक टोकदार दाढी वाला मुलगा आहे.याने मोहक(नाही नाही मोहॉक) मध्ये थोड्या स्टेप्स सांगून एक बराच सेटिंग लागणारा कट सांगितला आहे.शिवाय दाढी ट्रिम वगैरे.सध्या हा त्या स्टेप वाल्या मोहक प्रकाराने पूर्वीच्या काळी ते केसा सारखा दिसणारा जिरेटोप घालणारे सैनिक दिसायचे तसा किंवा ड्रॅगन च्या पाठीसारखा दिसतोय.काय ही मुलं..यांचे काका मामा गुळगुळीत दाढी आणि कमी केस स्पाईक्स वगैरे घेऊन वय लपवतायत आणि ही 16 का 20 ची मुलं चार मुलांचे बाप दिसतायत अश्या दाढ्या वगैरे ठेवुन.हे लोक मोठे होतील तेव्हा फॅशन काय असेल?2 वेण्या वगैरे?आंबाडा झाला, हेअरबँड झाला, शेंडी झाली.आता खोपा,झुल्याची वेणी, आणि फ्रेंच प्लेट वेणी राहिलीय.झाला एकदाचा बाब्याचा नट्टापट्टा.
"मॅडम लास्ट टाइम कुठे कापले होते केस? फारच वेडेवाकडे आणि फेज आऊट झालेत." तिरंगकेशी माझ्या केसांकडे वळलाय.
"तुम्हीच कापले होते.फोटो पण काढला होता छान सेट झालेत म्हणून."
मी मख्खपणे तिरंगी प्राण्याचा वडा करते.
"ओहो हो का, मला आठवलंच नाही.तसे व्यवस्थित आहे.ट्रिम केला की छान दिसेल शेप."
(ग्लोबल कलर आणि हायलाईट करावे का?नको इतके हजार एका महिन्यात केसांवर वसूल व्हायला रपंझेल सारखे मोठे केस लागतील.आणि परत दीड महिने आणि 10 शाम्पू नंतर आहेच काळा वांगी कलर पांढरा तिरंगी कारभार.जाऊदे नंतर बघू.)
तिरंगी प्राणी केसाला बरेच सिरम, क्लिपा लावून केस छान कापून वळवून देतो.हेअरकट आणि सेट केलेले केस पार्लर च्या आरश्यात जितके सुंदर दिसतात तितके पार्लर बाहेर येऊन 2 पावलं चाललं तरी टिकत नाहीत.त्यामुळे हा लूक फोटोबंद करणे आलेच.पब्लिक ला पुरावा म्हणून दाखवता येतो 'केला तेव्हा असा दिसायचा कट' म्हणून.बाकी केस धुतल्यावर किंवा स्कार्फ बांधल्यावर परत 'वेडेवाकडे केस वाढलेली वेडी बै' लूक आहेच.
आयब्रो साठी परत सुंदरी आली.मी अजून पार्लर मध्ये आयब्रो करून देणारा एकही पुरुष पाहिला नाहीय.कदाचित मायनिंग इंजिनियरिंग ला बाया घेत नाहीत तसं आयब्रो कॉलेज ला पुरुष घेत नसतील.
"कश्या करायच्यात?"
"अगदी फक्त रेषेबाहेरचे केस कमी करायचेत.पातळ नको.वर टोक नको."
सगळ्या बायकांना आयब्रो करायच्या असतात, पण 'आयब्रो केल्या' असं समोरच्याला जाणवू द्यायचं नसतं.खारी बिस्किटाला तुपामुळे ज्याप्रकारे मस्त चव येते, पण त्यातलं तुपाचं अस्तित्व जाणवत नाही त्याप्रमाणे आयब्रो हा 'केल्यात दिसू नये, पण चेहऱ्यात रेखीव बदल जाणवावा' असा छुपा प्रकार आहे.
आता हा "केस उपटा पण किसिको कानोकान खबर ना हो" वाला प्रकार प्रत्यक्ष अंमलात आणायला अत्यंत कठीण असल्याने सुंदरी मनात वैतागून जोरात किंचाळते पण आपले प्रयत्न चालू ठेवते.शेवटी 'इथून एक केस जास्त, उजव्याचा दोन केस कमी' असं करत स्टारट्रेक का वर्ल्ड मधल्या स्पोक सारखा तो पॉईंट येतोच.मी निश्चयाने या पॉईंट वरून नांगर फिरवून गोल ऐवजी सपाट आयब्रो निवडते.आणि एकदाचा हा प्रकार पूर्ण होतो.
तर अश्या प्रकारे पॅकेज चे पैसे वसूल झाले आहेत.पण पार्लर मधून बाहेर पडल्यावर मूळ नग मनातून बराच सुखावला असला तरी बाहेरून जवळजवळ सारखाच दिसतोय.अगदी 'पुरी ते परी' वाला फरक पडलेला नाहीये.कदाचित 'किती फरक पडला' पेक्षा 'स्वतःची काळजी घ्यायला महिन्यात इतके तास आणि पैसे खर्च केले' हा इगो मसाजच चेहऱ्यावर जास्त चमक आणत असावा!
-अनुराधा कुलकर्णी

3 comments:

Madhuri Kulkarni said...

खरंच मजेशीर असतो हा अनुभव. गम्मत वाटली वाचून. छान लिहिता तुम्ही.

Anonymous said...

mast :) 'वेडेवाकडे केस वाढलेली वेडी बै' लूक ek no !!!!

Unknown said...

वेडेवाकडे केस वाढलेली वेडी बै' लूक :)
2 varsh zali, liha na kahi tari new