या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Tuesday 15 March 2016

'नीडफुल थिंग्ज'-पुस्तक

(स्टिफन किंग च्या पुस्तकांचा परीचय विकीपीडियावर वाचल्यावर 'श्या, काही भूतंबितं नीट नाहीत' म्हणून वाचायचं बाजूला ठेवलेलं हे पुस्तक ३ वर्षापूर्वी वाचलं आणि त्याची किंमत कळली. प्रत्यक्ष भूतं वगैरे न दाखवता माणसाच्या मनात भीती निर्माण करणं यात स्टिफन किंग इज अ किंग.)

'डिल विथ द डेव्हिल'/'सैतानाशी सौदा' ही संकल्पना ऐकलीय का तुम्ही? एखादा सौदा 'टु गुड टु बी ट्रु' वाटतोय. स्वतः अगदी कमी किंमत देऊन हवी ती भारी वस्तू/भरपूर सवलत मिळतेय, त्या बदल्यात द्यावं लागणारं मोल अगदीच कमी आहे.अशावेळी तुम्ही जरा थांबून विचार केलाच असेल ना, की यात नक्की काय आहे? इतकं स्वस्तात देणं दुकानदाराला कसं परवडणार आहे? जी किंमत आपल्याला एकदम छोटीशी वाटतेय ती प्रत्यक्षात खूप मोठी आहे का? 'सैतानाशी सौदा' ही अशीच काहीशी कल्पना. सैतानाला तुमची मर्मस्थळं, तुमच्या गरजा,तुमच्या भावना हे सगळं माहिती आहे. त्याने जो प्रस्ताव तुमच्या पुढे मांडलाय तो तुम्हाला फायद्याचाच आहे, ती गोष्ट तुम्ही वर्षानुवर्षं शोधत आहात.आणि एकदा सौदा मान्य केल्यावर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मागे सरु शकत नाही. हा सैतान एक हातचलाखी करणारा फसवणारा ठक पण आहे. त्याने जी वस्तू तुम्हाला भारी म्हणून विकली आहे ती प्रत्यक्षात एक कम अस्सल स्वस्त हिणकस वस्तू आहे.खूप कमी जण थांबून विचार करुन सैतानाला कणखरपणे 'सौदा करायचा नाही' सांगत असतील, बाकी सगळे नंतर आयुष्यभर सैतानाने दिलेल्या भौतिक्/अभौतिक वस्तूंचं मोल फेडत बसणारे..

एक लहानसं शहर.यात राहणार्‍या लोकांचे एकमेकांशी हेवे दावे, भांडणं आहेत,प्रत्येकाच्या मनात काहीतरी मिळवू न शकल्याची बोच आहे.पण तरीही लोक ही भांडणं टोकाला न नेता जास्त हमरीतुमरीचे प्रसंग टाळत शांतपणे जगत आहेत.लहानश्या शिवणाच्या दुकानात काम करणारी एक शांत मुलगी-हिने आपला छळ करणार्‍या नवर्‍याला भोसकलंय, पण ते गोष्टी अगदीच टोकाला गेल्यावर.एरवी ती पॉलीकडे आपलं काम अगदी चोख करते आणि पॉलीने पण तिच्यावर पूर्ण विश्वास टाकलाय. पॉली- हिच्याही भूतकाळात एक खूप मोठी घटना आहे.कदाचित हयाच घटनेचा मानसिक आघात, त्यात स्वतःचा दोष असल्याची बोच तिच्या हातांना वर्षानुवर्षं असलेल्या असह्य संधीवाताच्या वेदनांच्या रुपात बाहेर पडलीय. या वेदना इतक्या असह्य आहेत की त्या जाण्यासाठी ती काहीही करेल.अ‍ॅलन- याचा सुखी संसार काही वर्षापूर्वी विखुरलाय जेव्हा एक दिवस याची बायको लहान मुलाला घेऊन बाहेर पडली आणि तिची कार अपघातात झाडावर आपटून दोघे दगावले.अ‍ॅलन कामात मन गुंतवत असला तरी त्याच्या मनात 'त्या दिवशी नक्की काय झालं होतं' हे निष्फळ कोडं सोडवण्याची इच्छा आहे.असे इथे अनेक लोक, ज्यांचे दुसर्‍याशी व्यक्तीगत हेवेदावे,स्वतःच्या पूर्ण न झालेल्या इच्छा आहेत.गावात दोन वेगवेगळ्या पंथाचे धर्मगुरु आहेत, ज्यांचे अनुयायी कायम एकमेकांशी भांडण्याची संधी शोधत आहेत.हा सगळा दारुगोळा गच्च भरुन तयार आहे आणि एका ठिणगीची वाट पाहतोय.

या ठिकाणी एक दिवस आला एक दुकानदार.त्याचं दुकान 'नीडफुल थिंग्ज' हे त्या ठिकाणच्या इतर दुकानांच्या तुलनेत खूपच झकपक.लोक दुकान बाहेरुन बघून गेले, पण 'हा काहीतरी महागाच्या फुकटच्या निरुपयोगी वस्तू गळ्यात मारेल' या भावनेने गावातले लोक दुकानात जाणार नाहीत म्हणत आहेत.लहान मुलं ही कायम अशा स्वतःला मागे ओढणार्‍या भावनांपासून लांब असतात.असाच एक दहा-अकरा वर्षाचा मुलगा ब्रायन 'बघून तरी येऊ, आईला सांगता येईल दुकानात काय आहे ते, तिला जायचं आहे पण ती इतक्या लवकर त्या दुकानात जाणार नाही.' म्हणून दुकानात शिरतो.दुकानदार भेदक डोळ्याचा, पण अत्यंत लाघवी बोलणारा मनुष्य.ब्रायनला कधीपासून हवं असलेलं सँडी कुफॅक्स या खेळाडूचं कार्ड हा दुकानदार त्याला त्याच्याकडे असलेल्या पैशात, म्हणजे प्रत्यक्ष किमतीच्या अगदीच कमीत देऊ करतो: अट एकच. ब्रायनने कार्डाची किंनत दोन भागात चुकती करायची- त्याच्याकडे असलेले अगदी थोडे पैसे आणि एक प्रँक्/खोडी.त्याला फारशी ओळखीची पण नाही अशी एक पोलीश बाई आहे, तिच्या घरातल्या धुतलेल्या चादरींवर चिखल टाकून यायचा.तिच्या घरात मोठीमोठी दगडं टाकायची, या दगडांना चिठ्ठ्या लावलेल्या असणार.ब्रायन सँडी कुफॅक्स चं कार्ड बघून पुढे काहीही विचार करुच शकत नाही. तो या सौद्याला 'हो' म्हणतो.असंच हळूहळू सगळंच शहर या दुकानदाराकडून हव्या त्या सुंदर वस्तू अगदी कमी किमतीत घेऊन जातं.सौदा एकावेळी एकाच गिर्‍हाईकाबरोबर होतो.या सौद्याच्या वेळी दुसरं गिर्‍हाईक दुकानात नसेल असे योगायोग नेहमीच घडवून आणले जातात.असाच एक दारुड्या येतो आणि त्याला हवी असलेली अगदी महाग आणि दुर्मीळ कोल्ह्याची शेपटी घेऊन जातो. त्याला पण ही अगदी स्वस्तात पडलीय- किमत त्याच्याकडे असलेले थोडेफार पैसे आणि एक प्रँक.शिवणाच्या दुकानात काम करणार्‍या मुलीचा आयुष्यातला एकमेव सोबती- तिचा छान निरुपद्रवी कुत्रा तिच्या घरात घुसून मारुन टाकायचा.या दुकानदाराने लोकांना वस्तू ज्या खोड्यांच्या बदल्यात विकलेल्या आहेत त्या खोड्या ज्याच्याशी करायच्या आहेत तो माणूस गिर्‍हाईकाच्या प्रत्यक्ष ओळखीचा नाही.शिवणाच्या दुकानातली मुलगी आणि पोलीश बाई यांचं जुनं हाडवैर आहे, पोलीश बाईला कुत्रा आवडत नाही आणि शिवणाच्या दुकानातल्या मुलीला या बाईचा स्वभाव आणि ती कुत्र्याबद्दल देत असलेल्या सारख्या धमक्या.

आतापर्यंत कळलं असेलच- "आपला एक हाडवैरी आहे. त्याने अजून जास्त काही केलेलं नाही तोपर्यंत आपण गप्प बसलोय.पण एक दिवस त्याने उठून हद्दच केली.आपला प्रिय कुत्रा मारुन टाकला.आपण आता गप्प बसू का?
आपला एक हाडवैरी आहे, तसा तो आतापर्यंत माझ्या वाटेला जात नाही पण आज त्याने हद्दच केली.माझ्या स्वच्छ धुतलेल्या चादरींवर चिखल टाकला.घरात दगडं मारुन माझा मायक्रोवेव्ह आणि टिव्ही फोडला.मी कशी गप्प राहीन?"

शहरात हे घटनाचक्र सुरु झालं ब्रायनच्या सौद्याने, सौद्याची किंमत पैसे आणि एक खोडी, ज्यामुळे एक पोलीश बाई आणि शिवणाच्या दुकानात काम करणारी मुलगी परस्परांचं हाडवैर एकमेकींचा जीव घेऊनच संपवतात.असेच अनेक हाडवैरी एकमेकांविरुद्ध भडकवले जातात- प्रत्येकाने सैतानाकडून आपल्याला हवी असलेली भारी वस्तू आपल्याकडचे पैसे आणि एक खोडी असा मोबदला देऊन विकत घेतली आहे.हे विष वणव्याच्या वेगाने पसरतंय.लोक एकमेकांचे जीव घेतायत.सैतानाच्या जाळ्यात अजून न अडकलेली दोनच माणसं आहेत- अ‍ॅलन आणि पॉली.पण सैतान त्यांना हव्या असलेल्या वस्तूंचं आमिष देऊन त्यांना त्या जवळचे पैसे आणि एक खोडी या मोबदल्यात घ्यायला लावेल का?ब्रायन 'आपण हे दुष्ट चक्र सुरु करुन दोन जीव घेतले' ही बोच कोणाला काही न सांगता मनात ठेवू शकेल का? हे असं कुठवर चालत राहील? सैतानाचा सौदा नाकारणारा आणि त्याला आव्हान देणारा कोणी बहाद्दर असेल का?

हे सगळं वाचा प्रत्यक्ष पुस्तकातच.
'नीडफुल थिंग्ज'
लेखक स्टिफन किंग

-अनुराधा कुलकर्णी

No comments: