या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 17 March 2014

पुस्तक ते संगणक (जुनाच माल)

जानेवारी २००८ च्या सामना बाळासाहेब ठाकरे वाढदिवस अंकात लिहिलेला हा लेख.
हा लेख लिहिण्यासाठी विषय, प्रोत्साहन आणि बहुमूल्य सुधारणा ज्यांनी सुचवल्या ते श्रावण मोडक मात्र आज नाहीत..

"अगं 'मृत्युंजय' गायब आहे सध्या लायब्ररीतून. तो इंजिनियरिंगचा मुलगा वर्गणी आणि डिपॉझिट भरून पुस्तक घेऊन गेला तो परत द्यायला आलाच नाही. डिपॉझिट आणि वर्गणी मिळून १६० रुपयात दुपटीतिपटीचं पुस्तक ढापलं बघ मेल्याने." लायब्ररीकाकू तावातावाने सांगत होत्या.
वा वा, आमच्या काळी फक्त मैत्रिणींची मिल्स अँड बून, आर्ची, सिडने शेल्डन,आर्थर हॅली आणि लिंडा गुडमन ढापणारी तरुण पिढी आता मराठी पुस्तकं ढापून वाचण्याइतकी महत्त्वाची समजायला लागली? (पुस्तक ढापल्यामुळे स्वतःचा आर्थिक तोटा न झाल्याने)माझं यडपट मन अभिमानाने भरुन गेलं.
काळ बदललेला जाणवून 'काळ बदलला' म्हणे-म्हणेपर्यंत तो आणखी बदललेला आहे. 'ओह, कॅन ओन्ली अंडरस्टँड अँड स्पीक लि'लबीट. रिडींग इन मराठी इज टू हाय फॉर मी' वाल्या वर्गाबरोबरच 'आम्ही मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं पण त्यांच्यातली मराठी मरू नाही दिली. आमची मुलं उत्तम मराठी बोलतात आणि वाचनही करतात.' म्हणणारा वर्गही वाढत चालला. मध्यमवर्गाची आर्थिक पातळी सुधारली. पुस्तके 'ढापणे,रद्दीतून घेणे किंवा वाचनालयातून घेणे' या मार्गांनी मिळाली तरच घ्यायची ही मानसिकता बदलून दिवाणखान्यातील शेल्फात नव्याकोर्‍या शेल्डन, आयन रँड बरोबरच पु. लं,  गौरी देशपांडे, मेघना पेठे, व. पु. काळेही खांद्याला खांदा भिडवून उभे राहू लागले. क्रॉसवर्डमध्ये 'मराठी लिटरेचर' च्या विभागात जीन्स, टिशर्ट,स्कार्फ आणि हेल्मेटे रेंगाळताना दिसू लागली आहेत. विरोपांतून (म्हंजे साध्या मराठीत ईमेल !) 'गुड वन..मस्ट रिड' म्हणून व पु काळे,पु. ल. आणि मराठी कविताही मराठी जनांत फॉरवर्ड होत आहेत.
याचदरम्यान बहिस्त्रोतीकरण अर्थात आउटसोर्सिंग मुळे सातासमुद्रापार काही महिने/वर्षे/कायमचे जाणार्‍यांची संख्याही वाढली. परदेशातील राहणीमान, स्वछता, झगमग मिळाली पण मनात कुठेतरी आपल्या मुलखातली गंमतजंमत आठवू लागली. फॉरिनमधल्या कातरवेळी 'आत्ता भारतातल्या कातरवेळी आपण काय काय केलं असतं' ही आठवण मन कुरतडू लागली. (अर्थात भूतकाळात भारतातल्या कातरवेळी हेच मन 'श्या! कधी मिळणारे लाँगटर्म ऑनसाइट?यावेळी पण त्या यंडूगुंडूनेच पटकावली संधी. ' या विचारांनी कुरतडलं जात असेल हा भाग वेगळा!) लग्नानंतर परदेशी गेल्यावर तिथे नोकरी करण्याचा परवाना मिळेपर्यंत सुविद्य गृहिणींना, परदेशी नोकरीसाठी एकट्या गेलेल्या सड्याफटिंगांना आणि 'विवाहित ब्रह्मचार्‍यांना' फावला वेळ खायला उठू लागला. रसिक.कॉम सारख्या पुस्तक खरेदी साईट्सवर मराठी पुस्तकांना सातासमुद्रापार मागणी वाढली. भारतात आपल्या ख्याली खुशालीची नेहमी वाट पाहणार्‍या आई वडिलांशी इंग्रजी भाषेत पत्रापत्री करणे जरा विचित्र वाटू लागले. 'आई तुझ्या हातच्या एका पराठ्यावर इथले मार्केटातले हजार फ्रोजन पराठे ओवाळून टाकीन गं' मधली उत्कटता 'मॉम आय रियली मिस मेथी पराठा मेड बाय यु' मध्ये येत नाही म्हणून 'मिंग्लिश' ही नवी भाषा जन्माला आली. म्हणजे बघा, मराठी शब्दांचं आणि क्रियापदाचं इंग्रजी लिपीत स्पेलिंग करून इंग्रजी लिपीतून मराठी भाषा लिहायची. आता इंग्रजी आणि मराठीतल्या उच्चारांच्या फरकांमुळे कधीकधी वाचताना 'जेवण झाल्यावर तासभर पडलो आणि मग शॉपिंगला बाहेर पडलो' (Jevan zalyavar tasabhar padalo ani mag shopping la baher padalo) चे 'जेवण झाल्यावर तासभर पादलो आणि मग शॉपिंगला बाहेर पादलो' असा भीषण 'ध' चा 'मा' होतोच, पण 'गॉट टु कम्युनिकेट इन मराठी समहाऊ, मॅन! व्हॉट टु डू?'
या सगळ्यातूनच 'संगणकासाठी मराठी लिपी' चे शोध लागू लागले. शिवाजी फाँट, श्रिलिपी, सुलिपी ,सीडॅक ची आयलीप अशा अनेक लिप्यांनी संगणकावर मायमराठीत अक्षरे उमटवणे सोपे केले. सुरुवातीला या मराठी लिप्या वापरून संगणकावर लिहिणे मोठे कटकटीचे काम असे. काय अक्षर दाबले की काय उमटते याचा सराव व्हायला वेळ लागे. (भावाच्या लग्नपत्रिकेतला मजकूर सुलिपीत हौसेने स्वत: टंकलेखित करून त्यात योग्य ती अक्षरे न सापडल्याने चि. सौ कां मुग्धा चे 'मुगधा' फायनल लग्नपत्रिकेवरच पाहिल्यावर नातेवाईकांनी दिलेल्या कानपिचक्या अजून अस्मादिकांच्या मनात ताज्या आहेत!) शिवाय ही अक्षरे ज्या संगणकावर पाहायची तिथेही ते सॉफ्टवेअर असणे आवश्यक असे. अन्यथा श्रमाने टंकलेले मराठी शब्द दुसर्‍या संगणकावर गेल्यावर अगम्य चिन्हे बनून 'शब्दांच्या (आणि समजेच्या) पलीकडले' बनत. हा सावळागोंधळ टाळण्यासाठी काही वर्षांपूर्वी जवळजवळ सर्व मराठी वर्तमानपत्रांच्या वेबसाइट वर 'आमचा पेपर वाचण्यासाठी अमका तमका फाँट इन्स्टॉल करा' अशी सूचना असे. काही वर्तमानपत्रे आणि 'मराठी' साईट्स हा वाचकांचा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी मराठीत लिहून हे लिखाण चित्र(इमेज) स्वरूपात साईटवर टाकून स्वतः द्राविडी प्राणायाम करत असत.
'युनिकोड' फाँट ने हे सर्व उपद्व्याप कमी करून मराठी/ भारतीय/प्रादेशिक  लिप्या जगभर लिहिणे वाचणे सोपे करून क्रांती केली. आता कोणत्याही संगणकावरून युनिकोड वापरून मराठीत लिहिलेले लिखाण कोणत्याही आणि कुठल्याही देशातल्या संगणकावरून कोणतीही लिपी संगणकावर इन्स्टॉल करण्याची गरज न लागता वाचता येऊ लागले. बरहा,शनीपार फाँट, ओंकार जोशींची प्रादेशिक भाषा लिहिण्यासाठीची प्रणाली 'गमभन', शुभानन गांगल यांचे 'गांगल फाँट' असे अनेक पर्याय उपलब्ध झाले. गुगल आणि इतर काही विरोप (म्हंजे साध्या मराठीत इमेल !) सेवादात्यांनी अधिकाधिक इंग्लिशेतर भाषा त्यांच्या ईमेल वर दिसू शकतील अशी सुविधा केली. बरहा सारख्या प्रादेशिक भाषा टंकलेखन सॉफ्टवेअर्स मुळे विरोपावर(ईमेलवर), चाट वर आणि इतर सूचना, अहवालादी उपयोगांसाठी मराठीत लिहिणे सोपे झाले. युनिकोड आधारीत मराठी साहित्य, चर्चा, कविता, गझला इत्यादींना वाहिलेल्या मराठी साईट निघाल्या आणि साहित्यप्रेमी, पण महाराष्ट्राबाहेर,भारताबाहेर असल्याने मराठी वाचण्या-बोलण्यास दुरावलेल्या मंडळींची चंगळ झाली.
आज मायबोली.कॉम, मनोगत.कॉम, एम आर.उपक्रम.ऑर्ग, मराठीवर्ल्ड.कॉम,सुरेशभट.इन, मराठीगझल.कॉम, साधासोपा.कॉम आणि अशा अनेक दर्जेदार मराठी साईट वर शेकडो/हजारो मराठीप्रेमी हौशी लेखक-वाचक विचारांची देवाणघेवाण करत आहेत. इंटरनेटवर गेम खेळणे, चाट करणे आणि ऑर्कुटबरोबरच काहीतरी लिखाण वाचन करणे, चर्चा करणे, माहिती मिळवणे आणि देणे,आपला वेळ सृजनशील लिखाणात घालवणे त्यांना जास्त आवडते आहे. तसेच मराठी वृत्तपत्रे आणि मराठी संकेतस्थळांचे(म्हंजे आपल्या साध्या मराठीत 'साईट्स' चे) संगणकीय दिवाळी अंक निघत आहेत. मराठीच्या ओढीने आजवर कधीही न भेटलेले देशोदेशीचे मराठी जन एकमेकांचे मित्र बनत आहेत. परस्परस्नेहाची, आपुलकीची, सौदार्हाची नाती जोडत आहेत. कोण्या ऑस्ट्रेलियातल्या देशपांडेबाईंनी इंटरनेटावर लिहिलेली बिर्याणीची पाककृती अमेरिकेतल्या पाटिलबाई करून कुटुंबाला खाऊ घालत आहेत..भारतातल्या खरेकाकांच्या संगणकाला लागलेला व्हायरस जपानातल्या गोरेकाकांच्या सल्ल्याने दूर होतो आहे. भारतातून चव्हाणकाका सिंगापूरमधल्या पवारांशी 'गांधी की गोडसे','रामसेतू वाचवा की कोसळवा' या विषयांवर तावातावाने इंटरनेटावर वाद घालत आहेत..अमेरिकेतून फलाणा, जर्मनीतून अमका, इंग्लंडातून तमका, भारतातून ढमका अशी देशोदेशीची मंडळी ऑनलाईन दिवाळी अंक, मराठी विकिपीडिया ज्ञानकोशावर माहिती चढवणे, ऑनलाईन मराठी शब्दकोशास हातभार लावणे अशा विधायक कामांसाठी एकत्र येऊ लागली आहेत. समान ठिकाणी असलेली पण एकमेकांना ओळखत नसलेली मंडळी ओळखीची होऊन भेटीगाठी वाढवत आहेत. 'मराठीपण' या एकमेव दुव्याच्या ओढीने मराठी माणसे एकत्र येत आहेत. तांत्रिक ज्ञान असलेली मंडळी तांत्रिक विषयांवर मराठी लिखाण करत आहेत. इतिहासावर मराठीत लिखाण करत आहेत. ज्ञानी माणसांच्या ज्ञानाचा फायदा सर्वांना मिळतो आहे.मोकळेपणाने शंका, विचार, राजकीय आणि सामाजिक विषयांवर मतांची आणि प्रश्नांची देवाणघेवाण होते आहे. (जागतिकीकरण जागतिकीकरण म्हणतात ते हेच का रे दादा ???)  
मराठी आणि संगणकाचा मेळ आपल्याला जास्त प्रगल्भ करत आहे. इंटरनेटावर आज ज्ञानेश्वरी, गीताई, महाभारतासारख्या महान कलाकृतीही मराठीत उपलब्ध आहेत. आपल्या संस्कृतीविषयी, वेदांविषयी, पुराणांविषयी माहिती मिळवणे सहजसाध्य झाले आहे. एक 'लाडके' वर्तमानपत्र घरी विकत घेऊन इतर 'दोडकी' वर्तमानपत्रे संगणकावर वाचणे शक्य झाले आहे. मराठी संगणकावर लिहिणे सोपे झाल्यापासून मराठी माणसांच्या घोळक्यात समविचारी न भेटल्याने एकटेपण वाटणारे भारतीय कर्मचारी,इंटरनेटशी नुकतीच तोंडओळख झालेले मध्यमवयीन आणि वृद्धही मराठीत लिहिण्याची सोय झाल्याने संगणक आणि इंटरनेटला अधिक आपलं मानून त्यावर लिहू वाचू लागले. एखादा प्रेमी आपल्या प्रेयसीला मराठीत कविता लिहून ईमेलवर पाठवू लागला..एखादा ज्येष्ठ नागरिक दुसर्‍या गावी/देशी गेलेल्या आपल्या सवंगड्याचे चार ओळीतले मराठी ईमेल वाचून हरखू लागला.. एखादी गृहिणी पटकन इंटरनेट चाळून एखादी अवघड पाककृती करताना आलेल्या शंकांचे निरसन करून घेऊ लागली. मराठी पाककृतीच्या इंटरनेट उपलब्धतेमुळे 'ऍसफोटेडा','फेनुग्रीक','सिनामन' या भीषण शब्दांचे अर्थ जाणून न घेताही तिला हिंग मेथ्या दालचिनीची प्रमाणं ठरवता येऊ लागली. सलग ९-१० तास काम करून कंटाळलेला एखादा अभियंता अशाच रात्री अपरात्री कचेरीत काम करत असलेल्या मित्राशी मराठीत  चाट करून कामात औटघटकेचा विरंगुळा घेऊ लागला..आणि संगणकीय मराठी बघता बघता तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलं.
'ब्लॉग' अर्थातच स्वतःची इंटरनेटवरील रोजनिशी ही सेवा गूगल(ब्लॉगर), याहू(याहू ३६० डिग्री),वर्डप्रेस या संस्थांनी मोफत पुरवणे चालू केले आणि हौशी लेखकांनी आपापल्या मनातल्या भावना, लिखाण, कथा, कविता आपल्या स्वतः:च्या रोजनिशीवर उतरवणे सुरू केले. आजमितीस मराठी ब्लॉग चाळाल तर विनोद, कथा, पाककृती, माहिती, तंत्र, मराठी साहित्य, कविता,प्रेक्षणीय स्थळे,फलज्योतिष अशा विविध विषयांवर मराठीत लिखाण करणारे हौशी लेखक आढळतील. आणि 'कातरवेळी मन उदास होतंय..काहीच सुचत नाहीये..काय करू?' अशा मनातल्या भावना मांडणारेही. ब्लॉग आणि मराठी संकेतस्थळांना पिढ्यांमधली दरी कमी करून सर्वांना ज्ञानाच्या,विचारांच्या आणि साहित्याच्या देवाणघेवाणीच्या समान पातळीवर आणले आहे. ब्लॉगावर लिहीणार्‍यांना एकमेकांचे ब्लॉग वाचण्यासाठी मराठी ब्लॉगांची यादी करणार्‍या मराठीब्लॉग.नेट सारख्या साईटही आहेत.
या सगळ्यांत छापील माध्यम  हळूहळू मरणार अशीही भीती काहीजण व्यक्त करत आहेत. पण आजही मराठी पुस्तके हौसेने वाचणारे, मराठी साहित्यावर मनापासून प्रेम करणारे वाचक आहेत. इंटरनेटवर आवर्जून वाचलेल्या चांगल्या पुस्तकाबद्दल लिहिणारे, दुर्मिळ पुस्तके दुकानोदुकानी शोध घेऊन मिळवणारे आहेत. आणि सातासमुद्रापार मराठी पुस्तके इंटरनेटवरून विकत घेऊन मराठीशी नाळ कायम ठेवणारेही आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि छापील माध्यम या दोघांचेही आपापले फायदे तोटे आहेत. अवघडत अवघडत एका कुशीवर झोपून आपलं आवडतं पुस्तक वाचता वाचता अलगद झोपेच्या कुशीत जाण्यातली मजा संगणकावर डोळ्याला ताण देत खुर्चीवर बसून ऑनलाईन पुस्तक वाचण्यात नाही. एखाद्या जिवलगाला आवडते पुस्तक भेट देण्यातली लज्जत ईमेलवरून आवडते पुस्तक ऑनलाईन पाठवण्यात नाही..ग्रंथालयात बरेच दिवस नजर ठेवून आपल्या आवडत्या दिवाळी अंकावर झडप घालण्यातली रंगत ऑनलाईन दिवाळी अंक वाचण्यात नाही..छापील माध्यम आणि संगणकीय माध्यम हे परस्परस्पर्धक नसून परस्परपूरक आहेत आणि असाव्यात.  इंटरनेटवरचे पुस्तक असो वा हाडामांसाचे(किंबहुना, शाई-कागदाचे) छापील पुस्तक असो, जोवर रसिक गुणग्राहक वाचनछंदी मराठी जनता आहे तोवर मराठीला मरण नाही हेच खरे! कविवर्य भटांना स्मरून,
| "आमुच्या मनामनात दंगते मराठी
   आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
   आमुच्या नसानसात नाचते मराठी
   आमुच्या रगारगात रंगते मराठी" |
-अनुराधा कुलकर्णी
(anuradha.kulkarni@gmail.com)
 

1 comment:

K P said...

छान. तुमचे इतर लेखही चाळले. तुमच्यात एक धमाल विनोदी लेखक आहे. तो जागा आहेच. त्याला आता कधीच झोपवू नका.
शुभेच्छा.