या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 10 June 2013

गोंधळलेली 'अनु'दिनी..

डिसक्लेमरे:
१. या लेखात मुद्दामच पात्रे 'नवरा/बायको/बाळ' अशी आहेत आणि नामोल्लेख नाहीत कारण घडणार्‍या घटना कोणाच्याही घरात घडतील इतक्या साधारण आहेत.
२. यातील नवरा बायकोचे वाद काल्पनीक आहेत व याचे एखाद्या खर्‍या नवरा बायकोच्या खर्‍या वादाशी साम्य आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा.
३. शुद्धलेखन चिकीत्सा केलेली नाही त्यामुळे अशुद्ध शब्द कनवाळूपणे डोळ्याआड व मनाआड करावे.

भल्या पहाटे ७
नवरा/बाप हळूच उठून आपल्या दुसर्‍या बायकोपाशी गेला व मॉडेमचे बटण दाबून त्याने बायकोला चालू केले.दुसर्‍या बायकोला काल झोपताना गप्प न केल्याने तिने चालू होताना 'टॅडँग' असा मोठा आवाज ऐकवला व पहिल्या बायकोने झोपेतून उठून एक जळजळीत कटाक्ष टाकला. 'हे करु नकोस, बाळ उठेल, दुसर्‍या खोलीतले बाथरूम वापर, नाहीतर बाळ उठेल' इ.इ. धमकीवजा विनंत्यांची नवरा/बापाला चांगलीच सवय होती. 'श्वास घेऊ नकोस, बाळ उठेल' हा फतवा अजून न निघाल्याबद्दल नवरा/बाप रोज मनातल्या मनात 'आमंत्रित सम्मान्नीय पाहुण्याणचे मी मनपूर्वक अशे आभार मानतो आनि शाल आणि पुष्पगुच्छ देवूण या ठीकाणी सत्कार करतो' असे भाषण रोज सकाळी करत असे.

भल्या पहाटे ७.२०
आई/बायको उठून स्वयंपाकघरात गेली आणि कणिक आणि दूध बाहेर काढून कुकर लावून दात घासू लागली. भाज्यांमध्ये फक्त लाल भोपळा आहे..लाल भोपळ्याला नवरा/बाप आणि बाळ/मुलगी स्वीकारतील की तुच्छ कटाक्ष टाकून रडवतील? मागच्याच वेळी 'सगळ्या भाज्या तू खायला पाहीजेस' यावर नवरा/बापाने 'मग तू चरचरीत फोडणीतला लसूण माझ्यासमोर चावून खाल्ला पाहीजेस' हा बूमरँग टाकल्याने आई/बायकोने तात्पुरता तह पत्कारला होता. बायको/आईने खुनशी हास्य करुन भोपळा किसून थालीपीठाचे पीठ मळले आणि भोपळ्याच्या सालांचे पुरावे नष्ट केले.

सकाळी ८
'ओट' खोक्यातून काढून ते भाजून शिजवले. कितीही मसाले टाका, कितीही नव्या पाककृती करा, 'आपण भिजवलेला बारीक केलेला पुठ्ठा खातो आहे' ही भावना मनातून जात का नाही? बायको/आईचा आवडता नाश्ता, चहा आणि पाव बटर, हल्ली अपराधीपणाच्या झालरीबरोबरच येत असे. 'जाऊदे शनीवारी पाव बटर खाऊ' म्हणून भिजवलेला पुठ्ठा घशाखाली ढकलला गेला.'गाडीको पेट्रोल चाहिये, शेल हो या इंडीयन ऑयल, की फरक पैंदा??' म्हणून पोळ्या करायला घेतल्या. तितक्यात बाळ उठल्याने सर्व 'आहे तसे' सोडून बायको/आई धावत सुटली.

सकाळी ८.४५
'काय रे हे? जर बाळ एक कप दूध प्यायला अर्धा तास लावणार असेल तर का द्यायचे? स्पोक च्या पुस्तकात म्हटलंय की लहान मुलांना स्वतःच्या इच्छेने खाऊ द्या, मागे लागू नका.'
'तुझ्या पुस्तकातल्या स्पोक ला म्हणावं, रात्री बाळ कमी खाऊन भुकेमुळे चिडचीड करायला लागलं की स्पोक आजोबा आणि आजी येऊदे हां दोन पर्यंत जागायला.तू नवर्‍याऐवजी एखाद्या पुस्तकाशी लग्न करायचं होतंस ना!'
'जिवंत नाहीत, नाहीतर आणले असते हो मी त्यांना! तसेही स्पोक आजींना सकाळी उठून पोळी भाजीचा डबा बनवून नाश्ता बनवून लाल भोपळे आणि कार्ली न खाणार्‍या नाकझाड्या माणसासाठी बटाट्याची भाजी बनवायला लागत नसेल.' बायको/आईने एक सीमेपार षटकार लागावला.
'माणसं डोळ्याने बघत नसली तरी त्यांना चवीवरून पदार्थात घातलेल्या भाज्या कळू शकतात.त्यामुळे भाज्या न खाणार्‍या माणसांबद्दल बोलताना जरा जपून.' नवरा/बापाने बायको/आईला त्रिफळाचित केले.
तितक्यात बाळाने 'आई बाबा असे वेड्यासारखे का वागतात' याचा विचार करत नकळत दूध संपवून देव्हार्‍यातले हळदीकुंकू पांढर्‍या टीशर्टावर सांडले आणि बायको/आईचे 'मला माहित आहे तुला माझे वाचन आवडत नाही ते. त्याला मुळात आवड लागते.' इ.इ. तेजस्वी उद्गार घश्यातच राहिले.

सकाळी १०.२०
नेहमीचा तुळशी गवती चहा घातलेला चहा बनवून बायको/आई दहा मिनीटे शांत बसली. चहाचा एक घुटका घेऊन मनात 'कित्ती छान झालाय! कसं जमतं हो तुम्हाला सगळं काम सांभाळून असा मस्त चहा करायला?' इ.इ. सुखद संवाद झाले. 'स्वतःला प्रत्येक छोट्या यशाबद्दल शाबासकी द्या' हा मूलमंत्र वाचल्यावर बायको मनात प्रत्येक चांगल्या झालेल्या गोष्टीबद्दल स्वतःला एक 'कुडोस' देऊन टाकत असे. (कुडोस हे ऑफीसातील चांगल्या कामाबद्दल केलेल्या बक्षीसाचे नाव. 'कुडोस' मिळालेले वैतागून 'हे काचेचे तुकडे देऊन काय होणार||पैसे द्या||' आणि तो न मिळालेले 'मेला एक कुडोससुद्धा कस्सा तो मिळाला नाही, व्यर्थ माझे जीवन||परमेश्वरा बघ रे बाबा||' हे राग न थकता आळवत असतात.)

सकाळी १०.३०
शाळेची बस यायला ३ मिनीटे आहेत आणि बाळ 'बहामा बेटावर सुट्टीवर स्वीमिंगपुलात पडून श्यांपेनचे घुटके घेणार्‍या पर्यटकासारखे' निवांत बसून धिरड्याचा २ मिलीमीटर व्यासाचा घास करुन खातंय आणि मीच स्वत: खाणार म्हणून हटून बसलंय.. नेहमीप्रमाणे बायको/आईचा संताप अनावर होतो आणि ती चार पाच दीर्घ श्वास घेऊन ताळ्यावर येऊन बाळाला अर्धे धिरडे भरवण्यात यशस्वी होते.पळत पळत बसला शोधायला जावे तर आज बसऐवजी मारूतीचे मोठे वाहन आले आहे.लहानपणापासून चित्रपटांत मारुतीचा वापर फक्त माणसे पळवताना होताना पाहून आई/बायकोच्या मनावर विपरीत परीणाम झाला आहे. त्यामुळे ती घाबरते. 'गाडीतल्या मावश्या तरी ओळखीच्या आहेत का बघून घे.' एका मोठ्या मुलाची अनुभवी आई कानात कुजबुजते. बायको/आई बाळाला मारुतीत सोडून मारुती नजरेआड गेल्यावर भरधाव वेगाने दुचाकी हाकते.
'मूर्खच आहेस. पाठलाग करुन काय होणार? खरंच तसं काही असेल तर लोक तुला पाहून फक्त सावध होतील.'
'मग काय करु? ऐनवेळी 'मला या गाडीत मूल पाठवायचं नाही असं म्हणून 'सायको, पॅरॅनॉईड मॉम'' बनू? नवरा/बाप इथे असता तर तो म्हणालाच असता 'माणसांवर विश्वास ठेवायला शिक.''
'पॅरॅनॉईड पालक आणि बेसावध पालक यातला सुवर्णमध्य साधायला शिक.'
मनातल्या मनात बराच वाद संवाद करत बायको/आई मारुतीच्या मागे किंवा पुढे राहते आणि शाळेसमोरच्या दुकानात तांदूळगहू विकत घेत मारुतीची वाट पाहत बसते.

सकाळी ११.००
ऑफीसच्या गेटावर पिशव्या तपासणारी वॉचमनीण गव्हाची पिशवी बघून हसते.बायको/आई पण हसून सांगते की रात्री घरी जायला उशिर होणार आहे तोपर्यंत दुकाने बंद होतात.
ऑफीस च्या प्रसाधनगृहात दोन्ही बाजूच्या आरशात बघून केस विंचरणार्‍या सुंदर्‍यांची भाऊ(बहीण)गर्दी झाली आहे.
'काय गं, आज तुलापण उशिर झाला?'
'काल घेतलेला ड्रेस शिंप्याकडे दिला. खांदे वर उचलून पाहिजेत, बाह्या एक इंच कमी करायच्या आहेत,सलवारीला असलेल्या जरीच्या पट्ट्या काढून कुर्त्याच्या दोन्ही शिवणींना लावायच्या आहेत, ओढणीची रुंदी कमी क....'
बायको/आई आ वासून बघतच बसली. 'माझा शिंपी अगदी साधासुधा कपडा शिवताना बिघडवतो आणि हिचा शिंपी इतके सगळे बदल काही गोंधळ न घालता करणारे??धन्य आहे..'
'अगं पण हे सगळे गुण आधीच असलेला ड्रेस का नाही विकत घेतलास? मायकेल अँजेलो ने सिस्टीन चॅपेल चं काम करताना ते सारखे बिघडत होतं तर सर्व छत उखडून सगलं काम नव्याने केलं.' नको त्या ठिकाणी नको ती विकीपिडीयाजन्य उदाहरणे देणं हा आई/बायकोचा एक महत्वाचा दुर्गुण होता.
'मायकेल अँजेलो ने घेतलाय का कला डिझाईन स्टुडीयोचा दोन हजाराचा ड्रेस? मी दिलेयत ना पैसे? मग मला ठरवूदेत.'
बायको/आईने मनात 'पॉइंट व्हॅलीड' म्हणून विषय 'केस कित्ती गळतात नं हल्ली?' या सर्वमान्य मुद्द्याकडे वळवला.

दुपारी २.३०
'द सेकन्ड प्रपोजल साउन्डस गुड, गो अहेड अँड कीप मी पोस्टेड अनुराडा.'
आपल्या सुंदर नक्षत्रनावाचा असा 'राडा' झालेला बघून बायको/आई कळवळली आणि तिने मनातल्या मनात साहेबाला बाकावर उभं करुन 'हं, दहावेळा म्हण आता. 'धृष्टद्युम्न मल्हारबा हरदनहळ्ळीकर'. ल नाही ळ ..ळ.. हात पुढे कर.' म्हणून वचपा काढला.
खोलीच्या बाहेरच्या काचेतून पुढची बैठक असलेली मुले 'कॉन्फरन्स रुम छोडकर चले जाव' चे इशारे करतच होती.त्यांना विनम्रपणे फोनमधले घड्याळ,संगणकातले घड्याळ आणि मोबाईलमधले घड्याळ दाखवून तीन मिनीटे मिळवण्यात बायको/आई यशस्वी होते.

दुपारी ४.४५
'कंपनीला माकडांची एकनिष्ठा नकोय, 'मी वाघ आहे आणि तरीही एकनिष्ठ आहे' वाले वाघ हवेयत.'
कंपूतील ताजा 'यम्बीये' विद्वान सांगत होता.
आता विचार करणं आलं ना? (डोक्याला सवय तरी आहे का विचार करण्याची?)
१. मी माकड की वाघ?
२. समोरचा अमका माकड की वाघ?
३. तो अमका स्वतःला वाघ समजतो पण तो माकड आहे वाटतं..
४. तो वाघ आहे पण बिचार्‍याला माहितीच नाही. अजून लेकाचा माकडाच्या पिंजर्‍यात आहे..
५. सगळे वाघ पाळून त्यांना भूक भागवायला काय देत असतील? वाघाच्या डायट प्लॅन मधे माकड बसतं का?
६. थोडी गाढवं चालतील का?
७. वाघ वाढले की रिंगमास्तर वाढतात का?
विचारांच्या कल्लोळातून निघून बायको/आई बेचव पोह्यांकडे वळली.

संध्याकाळी ८.१५
'एक माणिकचंद देना गुप्ताजी.'
'भैया, गुटखा पर बॅन है ना? आप क्यों रखते है?' बायको/आईला नको त्या प्रकरणांत नाक खुपसण्याची भारी सवय.
'लोग मांगते है, हम रखते है..लोग खरीदना बंद करे हम रखना बंद कर देंगे.'
हे बरंय..
उद्या पाव डझन बंदूका आणून ठेव सांगितलं तरी 'भाभी, परसो नया फ्रेस स्टॉक आनेवाला है, आपको पसंद आ ही जायेगा' म्हणून आणून ठेवतील.घरातून निघाल्यावर शंभर पावलं दूर असलेली आणि दुकानात भाज्यांपासून विदेशी चॉकलेट-अत्तरांपर्यंत सर्व ठेवणारी आणि त्यामुळे आपल्याला प्रिय असलेली ही माणसं कायदे किती आणि कसे वाकवतात? त्यामुळे नकळत समाजावर होणारे परीणाम काय?देशाची नैतिकता खालावली म्हणताना आपण या खालावलेल्या नैतकतेत खारीचा वाटा टाकतो का? 'अतिक्रमण वाईट, पण फुटपाथावर बसणारा ताजी भाजी देणारा नेहमीचा भाजीवाला गेला नाही पाहिजे, तो पोलीसाला पैसे देऊन टिकू दे.'
'वाहतूकीचे नियम गुंडाळून ठेवणारे नालायक आहेत. एकेकाला बडवून काढलं पाहिजे. पण मी फक्त दोन किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी शंभर मीटरच उलट्या बाजूने जाते.ते चालतं.'
असे किती 'दुसरा चोर, पण आपण फक्त न विचारता उधार घेतो' वाले मिळून हा देश बनतो?
बायको/आईने मनावर बुरशीसारखे पसरु पाहणारे गंभीर विचार झटकून रात्रीच्या भाजीची 'प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन' बनवायला चालू केली.

रात्री १०.००
'किती कपडे? मी कपडे धुवायला टाकते, कपडे वाळत टाकते, कपडे आवरते, कपड्यांच्या घड्या करते. माझं आयुष्य हा एक विटलेला कपडा आहे.' बायको/आई 'रात्रीचे दमलेले उजडे चमन' या प्रोफाईलात प्रवेश करती झाली. अशा वेळी काहीही बोललं तरी ते दारुगोळ्यावर ठिणगी या रुपाचं असणार हे नवरा/बाप आता पुरता जाणून होता.
'सगळे कपडे तुझे आणि बाळाचे आहेत. मी बापडा माझा माझा स्वतःचे शर्ट वेगळे मशिनला लावत असतो.'
'हेच, हेच ते! 'आपलं घर' म्हणून गोष्टी करायला नकोत का?' मुद्दे संपल्यावर वापरायचे बायको/आईचे काही ठरावीक 'जोकर' पत्ते आहेत. ते कुठल्याही ठिकाणी विशेष संदर्भाची चिंता न करता बिनधास्तपणे वापरता येतात.

रात्री ११.४५
'पण त्यांनी युट्युबवर लिहीलं आहे की हा व्हिडीओ पाहून बाळं शांत आणि लगेच झोपतात.'
'त्यांनी फक्त कुंभकर्णाच्या बाळांवर मर्यादीत प्रयोग केला असावा.'
उलाला उलाला, नाक्का मुक्का, गंगनम स्टाइल, टायटॅनिक, नीज माझ्या नंदलाला या व्यापक कक्षेतल्या चित्रफीती पाहून बाळ झोपतं आणि बायको/आई व नवरा/बाप सुटकेचा नि:श्वास टाकून झोपतात. आजच्या दिवसाला त्यांनी यशस्वीपणे शिंगावर घेतलेलं असतं..

(समाप्तः व्हॅलिडीटी १२ तास.)

9 comments:

Anonymous said...

:) खुसखुशीत.

रेग्युलर लिखते चलो...

Nikhil said...

hey where were you?
khoop divsani kahitari changla vachayla milala...Please keep posting, your blogs and articles are awesome and refreshing...:)

-Nikhil

Vidya Bhutkar said...

I wasnt sure if this was your blog. :) Its been so long. Nice to see your post and as usual funny and refreshing and just scene to scene copyin my house. :) Keep writing and posting.
Vidya.

Chinmay 'भारद्वाज' said...

Good see you back! :)

निशा............ said...

फार्फार पुर्वी म्हणजे मला ब्लॉग नामक वस्तू अस्तित्वात असल्यचा सुगावा सुद्धा लागला नव्हता, तेव्हा तुमच्या "एका प्रोग्रॅमरची अनुदिनी" या लेखाचे स्क्रिनशॉट्स मला इमेलने आले होते - त्यात लेखकाचे ब्लॉग चे नाव-गाव-फळ-फूल नव्हते. लेखन शैली मस्त असल्याने आणि कुठेतरी स्वत:ला त्यात पाहिल्याने भयंकर आवडले आणि अर्थात मी सुद्धा तो लेख भक्तीभावाने नंतर माझ्या ओळखीच्या सर्वांना धाडला. तुम्हाला कल्पना पण नसेल इतका तो लेख तेव्हा इमेल फॉरवर्ड म्हणून तेजीत होता.
नंतर जेव्हा हा ब्लॉग सापडला पण तोवर इकडे सामसूम होती, तुम्ही बहुदा खाजगी आयुष्यात बिझी झाला असाल.

पण परवा परत इकडे सहज चाळल्र आता परत नवीन काहीतरी बघून बरे वाटले.

Unknown said...

Hello,

I really enjoyed reading your blog, very funny, but meaningful. (me he marathit lihila asta, pan mala marathi madhe type karta yet nahi.)
I would appreciate a chance to speak to you regarding your blogging experiences. this is for the purpose of academic research.

Kindly reply to me on ashwini.falnikar@gmail.com

Will let you know more about me and my project. Couldn't find your ID on your blog, hence this comment.

Would appreciate a chance to speak to you. Looking fwd!

Anonymous said...

mastach please keep writing

Unknown said...

मस्त...अप्रतिम! नुस्त्या गुदगुल्या!!!

Unknown said...

मस्त...अप्रतिम! नुस्त्या गुदगुल्या!!!