या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Thursday, 15 February 2007

माझा पिवळेपणाकडे प्रवास -३

(यापूर्वी वाचा: खालचा भाग २)

खोली मिळवली आणि गाठोडं घेऊन आमची स्वारी पलंगावर स्थानापन्न झाली. वा! खोली स्वच्छ आहे , आणि खोलीतल्या दूरचित्रवाणीसंचावर झी कॅफे , पोगो सह सर्व वाहिन्या आहेत . स्वयंपाक करायचा नाहीये , दूध तापवायचं नाहीये , कपडे घड्या करायचे नाहीयेत ,आवरा आवरी करायची नाहिये.. खाली ग्रंथालयात बरीच पुस्तकं आहेत.. ते सलाईनचं आणि काविळीचं लचांड सोडलं तर बाकी इथे एखादा आठवडा रहायला तसं जास्त त्रास होणार नाही बहुतेक. (चक्रम, ते लचांड नसतं तर इथे कशाला आली असतीस?) डॉ . बाई म्हणाल्याच होत्या ' तसे पण हल्लीचे दवाखाने म्हणजे थ्री स्टार हॉटेलंच असतात. '
निळा गणवेषधारी 'बहीण' उर्फ सिस्टर आली. 'तुम्ही कपडे बदलून घ्या आणि मग डॉ. येतील चेकिंगला.''पण माझा पेशंटचा ड्रेस कुठे आहे?''तुम्हाला पेशंट युनिफॉर्म नाही. स्वत:चेच कपडे बदला.'(हे काय? युनिफॉर्म पण नाही? नशिब, मी दोन तीन कपडे आणले. नाहीतर पेशंटचा ड्रेस आहे म्हणून एकच कपडा आणणार होते. हे काय पण? आमच्या पैशाचा मोबदला मिळालाच पाहिजे!!)
जरा सामान ठेवाठेवी होते न होते तोच एक नुकताच ताजा ताजा पास झालेला डॉ. आला. मी कोपऱ्यात दूरचित्रवाणीच्या रिमोटशी खेळत होते. सासर व माहेर काही आत काही बाहेर उभे बसलेले होते. बालडॉक्टराने खोलीत येऊन इकडेतिकडे जमलेल्या जनतेकडे पाहिलं आणि विचारलं , 'पेशंट कोण आहे?' (अरे, मी इतकी जेन्युइन आजारी पडले तरी चेहऱ्यावरुन ठणठणीतच दिसते की काय? असं असेल तर कचेरीवाल्यांचा विश्वास बसणं कठीण आहे बाबा. मला जरा चेहऱ्यावर आजारपण आणायला पाहिजे.) बालडॉक्टराने 'खाली बघा, वर बघा, श्वास घ्या, श्वास सोडा,पाठमोरे व्हा, परत श्वास घ्या, परत सोडा' इ.इ. तपासणी केली आणि म्हणाला , 'तुमचे मुख्य डॉ. उद्या सकाळी १० वाजता येतील. तयार रहा.' आणि तो गेला. या सर्व गोंधळात माहेर, सासर आणि खुद्द पेशंटचे सर्वांचेच जेवण राहून गेले होते. सासर जेवायला गेले. माहेर पण थोडावेळ थांबून घरी गेले. आणि नवरोबा रात्री सोबत करायला थांबले. हे एक म्हणजे जरा कंटाळवाणेच आहे बुवा. म्हणजे मला सोबत म्हणून कोणातरी एकाचा वेळ जाणार. आणि ते पण बाकी कामं सांभाळून धावपळ. नवरोबाची बिचाऱ्याची जास्तीत जास्त ओढाताण. माझा 'पडू आजारी मौज वाटे भारी' ताप थोडा उतरला.
पहिले सलाईन लावले. माझ्या 'व्हेन्स सापडत नाहीत.पातळ आहेत.'(हाहाहा..गुटगुटीत माणसाच्या व्हेन्स पातळ कशा बुवा?) असं बहिणाबाई त्यांच्या हाताखालच्या 'भावा' ला सांगत होत्या.(अशा त्या सापडल्या नाहीत की कधीकधी दोन तीन ठिकाणी 'टुचुक' करुन शोधाव्या लागतात.)'सलाईन' हा एक अत्यंत कंटाळवाणा प्रकार. स्वतःच्याच हाताला टोचणी लावून घेऊन वर बाटलीतून हळूहळू टपक टपक गळणारा द्राव पाहत बसायचा. लवकर लवकर संपावं म्हणून द्रावाचा वेग वाढवल्यास थंडी वाजते. त्यात या द्रावात पिवळ्या रंगाचं जीवनसत्व इंजेक्शन असल्यामुळे वेळ अंमळ जास्तच लागत होता. वर येता येताच जी ए कुलकर्णींचं 'काजळमाया' आणलं होतं.जरा अवघडूनच सलाईन नसलेल्या हातासरशी 'विदूषक' कथा वाचून काढली.(खोलीसाठी भरलेल्या पैशाचा मोबदला हवा ना! दिवसाला दोन या दराने एका आठवड्यात १२-१४ पुस्तकं वाचून झाली तरच पैसे वसूल!) एक वाजता झोपले. 'उद्या काही ऑफीस नाही. मनसोक्त लोळू' असं ठरवलं.
पहाटे सहाच्या ठोक्याला दार वाजले. नवऱ्याने झोपेतच दार उघडले. 'भाऊ' येऊन रक्तदाब घेऊन गेला. (माझा झोपेत वैतागून विचार: रक्तदाब भल्या पहाटे सहाला? का बरं? नंतर रक्त अंगातून निघून फिरायला किंवा ऑफिसला वगैरे जातं की काय?)परत झोपलो, तर परत दार वाजले. खोली झाडपूस झाली. अरेच्च्या, म्हणजे 'हॉस्पिटल इज नॉट थ्री स्टार हॉटेल' बरं का. इथेपण सकाळी लवकर उठावं लागणार! मग नवरोबा घरी गेले आणि बाबांची पेशंटवर 'ड्यूटी' सुरू झाली. 'पाट्यांचे शहर' या लौकिकाला जागून माझ्या खोलीत पण भरपूर पाट्या होत्या. 'या खोलीला खिडकी उघडी ठेवता येत नाही म्हणून आम्ही वातानुकूलन पुरवत आहोत तसेच या खोलीचा दर इतर खोल्यांपेक्षा ५० रू. कमी आहे' ही ('५० रू. कमी' मुळे जरा सुखकारक) पाटी, 'कमोड कसा वापरावा' याचे माहितीपत्रक, 'रूम सर्व्हिस' च्या (खाण्याचे दर महाग असल्याने जरा दु:खकारक) अटी, 'नळाला सूर्याने गरम होणारे पाणी आहे. ते फक्त ९.३० पर्यंतच येईल.' ही 'हॉस्पिटलात आलात म्हणून आंघोळ दिवसातून केव्हाही करायची ही टंगळमंगळ चालणार नाही बरं का!' असे अप्रत्यक्षरित्या बजावणारी पाटी, न्हाणी व कमोड स्वच्छतेच्या तपासण्या व त्यावर तीन जणांच्या रोज सह्या असलेला तक्ता यांचे वाचन झाले. आंघोळीला आत गेले. 'सूर्याने गरम होणारे पाणी' सोडले. पण ते काही गरम झाले नाही.म्हणून बाबांना सांगून 'बहिण'/'भाऊ' यांना बोलावणारी घंटा वाजववली. एक भाऊ खोलीत डोकावून 'पाणी पाच मिनीटं सोडून ठेवा, मग गरम येईल' सांगून गेला. पुन:श्च दहा मिनीटे पाणी सोडून ठेवले. पण गरम पाणी आलेच नाही. परत घंटा वाजववली. मग एक बहिण आली. मग तिने एका 'मावशी' ला पाठवले. मावशीने बादली घेऊन जाऊन विस्तवावर पाणी तापवून आणून दिले.
'सुबह हो गयी मामू..मामू..ए मा ऽऽ मू ऽऽ' तर हा असा माझा 'खोली नं. ४३९ ऍडमिट' कँपचा पहिला दिवस सुरू झाला! आता फक्त कचेरीतल्या लोकांनी बघून जायचाच अवकाश, 'अनुला काविळ झाली' ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असती आणि माझ्या आजारपणाला चार चांद लागले असते.पण अजून तर त्यांना माहितीच नाही! ते समजतात की शुक्रवारची सुट्टी घेऊन अनु ठणठणीत होऊन सोमवारी कामावर हजर!
(अनुराधा कुलकर्णी )

1 comment:

Tatyaa.. said...

अनु,
मस्तच लिहिले आहेस. ;)
मी हल्ली मनोगतावर लिहायचं बंद केलं आहे, म्हणून इथे तुझ्या ब्लॊगवर येऊन दाद दिली.

तू चांगलं लिहितेस, असंच लेखन सुरू ठेव.

-तात्या.