या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 5 March 2007

धूम-२


परवाच धूम-२ (दुसऱ्यांदा) पाहिला. हल्ली एकाच छताखाली ३-४ गृहे असलेल्या चित्रपटगृहांची तिकीटे मिळणे,त्यांच्या किमती आणि स्वतःचा आणि बाकीच्यांचा वेळ याचा मेळ जमवून चित्रपटगृहात चित्रपट बघणे म्हणजे एक दुर्मिळ योग असतो. तर या दुर्मिळ योगाला चित्रपटही साजेसा असावा म्हणून आधी भरपूर पेपरांत समीक्षा वाचून जायचं. चित्रपट आवडला तर छानच, जरा सुमार असला तर चित्रपट गृहात योग्य ठिकाणी दंगा करुन स्वतःचे आणि दुसऱ्यांचे मनोरंजन करणे, आणि अगदीच सुमार असला तर मिळालेल्या निवांत वेळेचा सदुपयोग करुन एखादी झोप काढणे असा आमचा 'गाजराची पुंगी' बेत असतो.

नेहमीप्रमाणे निघायला उशीर होऊन आम्ही आत आपापल्या जागांवर बसलो. पडद्यावर एक परदेशी गाडी आणि परदेशी वाळवंट! (आँ?चित्रपटगृह क्रमांक चुकून एखाद्या फिरंगी चित्रपटाला तर नाही ना आलो??ते हॉलिवूड चित्रपट बित्रपट आम्हाला कळत नाहीत बुवा. 'मॅट्रिक्स' पाहून आम्ही भंजाळून शेवटच्या अर्ध्या तासात झोपून गेलो. पण 'मॅट्रिक्स' आवडला/कळला नाही असं म्हणणं ओल्ड फ्याशन्ड मानलं जात असल्याने आजवर तुम्हाला बोललो नव्हतो.) मग त्या गाडीत एक फिरंगी राणी आणि राणीचा मुकुट बघून कळलं की आता हा मुकुट चोरी होणार आहे आणि आपण धूम-२ लाच आलो आहे. तितक्यात आकाशात एक हॅलिकॉप्टर आणि त्यातून ह्रितिकची उडी. ह्रितिकने काहीही केलं तरी ते त्याच्या उंची आणि रोमन योद्ध्याच्या देखण्या चेहऱ्याला शोभून दिसतं या हल्लीच्या नियमाप्रमाणे आम्ही मनातल्या मनात 'खल्लास एंट्री!!' म्हणून उद्गारतो. आता ह्रितिक गाडीत जाऊन राणीचा वेष धारण करुन राणीचा मुकुट चोरतो. (पण राणी हे असे असे गुलाबी कपडे घालणार आहे(किंवा ते मध्येच प्रवासात बदलणार नाहीये) हे ह्रितिकला कळलं कसं? राणीने ह्रितिकला दूरध्वनी करुन सांगितलं असावं बहुधा.) मग आगगाडीच्या टपावर एक चित्तथरारक मारामारी आणि मग दृष्य बदलून चित्रपटाची नावं आणि 'धूम मचा ले..' गाणं. ह्रितिकच्या अंगात हाडं आहेत की नाहीत ही शंका यावी इतका लवचिकपणे आणि सुंदर नाचतो. (गाण्यातली त्याची लो वेस्ट जीन्स आणि मळका बनियान पाहून कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य उद्गारले 'झालं! आता तरुण कारट्यांमध्ये असा मळका बनियान आणि खाली आलेली फाटकी जीन्स घालायची लाट येणार!')

आता दृष्य पालट आणि जय दीक्षित आणि अलीची गुंडांबरोबर चित्तथरारक झुंज. वाटेत दुचाकी थांबवून आम्ही भाजीवाल्याकडे भेंडी आणि कोथिंबीर घेऊन घरी यावं तसं अभिषेक गतिमान बोटस्कूटरीने उडी मारुन दुसऱ्या बोटीवर जाता जाता वाटेत हातासरशी तीन गुंडांना अचूक गोळ्या घालतो. आणि मग दृष्यपालट आणि तोकड्या कपड्यातली रिम्मी सेन. (त्याला 'तोकडे' कपडे म्हणत नाहीत हे चित्रपटातील उरलेल्या दोन नायिका अजून न आल्याने कळलं नव्हतं.) अभिषेकला त्याचा बायकोने 'प्रकरण' करुन दाखवायचं आव्हान दिल्याने आम्ही चाणाक्षपणे ओळखलं की आता दुसऱ्या नायिकेचा कथानकात प्रवेश.
दृष्यपालट आणि विपाशाचा प्रवेश. पोलीसीण असलेल्या विपाशाचे कपडे बघून थिएटरात शिट्ट्या उमटल्या. (वेडीच आहेत बारावीची मुलं पण! जर अशा देखण्या पोलीसीणी असतील तर उगाच परीक्षा देऊन इंजिनियरिंग मेडिकलला जायचे उपद्व्याप कोण करत बसेल? अहाहा! लोक पोलीस बनायलाच १-२ लाख देणग्या देतील आणि मोठ्यामोठ्या रांगा लावतील.) उदय चोप्रा आणि अभिषेकचा अभिनय चांगला आहे. अभिषेक आणि विपाशा जुने वर्गमित्र निघतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी एका माजी विद्यार्थ्यांच्या पार्टीत जातात. परत एकदा ए. सी. पी. विपाशाचा पोट दाखवणारा नारिंगी पोषाख आणि ए. सी. पी. अभिषेकचा निळ्या फुलाफुलांचा सदरा, सब इन्स्पेक्टर उदय चोप्राचा मखमली कोट पाहून आम्ही मनातल्या मनात आमच्या बिबवेवाडी पोलीस चौकीतील पोलिसाला त्याच्या सखूबरोबर आणि सब इन्स्पेक्टर पांडूबरोबर अशा पार्टीत जाताना पाहिलं आणि मनोमन खडबडून जागे झालो. बाकी अभिषेक पोलिसाच्या भूमिकेत खूप चांगला शोभून दिसतो. दिसण्यात आणि हावभावात अगदी बापावर गेला आहे. (कोणत्याही क्षणी विपाशाला उंच खुर्चीवर बसवून दमदार आवाजात 'चॉलिये! ऑप और हम खेलते है .... धूम - द्विती ऽऽ य!' म्हणेल असे वाटते.)

ह्रितिकची दुसरी चोरी. आता इथे वस्तुसंग्रहालयातील हिरा चोरुन हा झाडूवाला बनून बाहेर जात असतो. मग पोलिसाने हटकल्यावर हा बरोबर गटाराच्या झाकणावर उभा राहून बुटाची कळ दाबून ऍसिडने गटाराचे झाकण वितळवून कापून सर्वांच्या डोळ्यादेखत गायब होतो. (ते आम्ही दहावीच्या परीक्षेत शिकलेलं 'आम्लराज' की कायसंसं वापरत असेल का?) आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या फवाऱ्यावरून बाहेर निघतो. म्हणजे, एका मिनिटात गटाराच्या एका बाजूला खाली गायब होऊन, पाण्याबरोबर वाहून दुसऱ्या बाजूला निघता निघता याने कपडे आणि वृद्ध झाडूवाल्याचा मुखवटा इ. सर्व बदलून पण ठेवले की हो! काय मल्टीप्रोसेसिंग आहे! काय टाइम डिव्हिजन मल्टीप्लेक्सिंग आहे! (नाहीतर आम्ही! साधे दात घासता घासता दुधाकडे बघायचं असलं तरी चूळ भरेपर्यंत डोळ्यादेखत दूध उतू गेलेलं असतं.)

पुढे जुनागढच्या चोरीमध्ये ऐश्वर्या उर्फ 'सुनहरी' चा कथानकात प्रवेश होतो. ऐश्वर्याची उभं राहण्याची लकब, कपडे यातून बऱ्यापैकी 'लारा क्रॉफ्ट' आठवते. (जास्त फिरंगी नायिका माहिती नाहीत हो आम्हाला! तुम्हाला दुसरी कोणी आठवून घ्यायची असल्यास आमची परवानगी आहे.) ही सुनहरी आर्यनला (म्हणजे ह्रितिक उर्फ 'ए' ला) चोरीत भागीदारीची ऑफर देते. आणि मग 'क्रेझी किया रे' गाणं गाते. त्यात 'ए' चोर परत वेशांतर करुन आलेला असतो त्याच्याभोवती नकळत घुटमळते. (पण त्याला ओळखत नाही.) मग गाणं झाल्यावर ना, पाऊस पडत असतो. आणि 'ए' बास्केटबॉल खेळत असतो. 'ए' ची आणि ऐश्वर्याची पावसात बास्केटबॉलमध्ये जुगलबंदी होते. आणि 'ए' भागीदारी कबूल करतो. आणि पुढच्या दृष्यात जय दिक्षित आणि सुनहरी चित्रपट पाहताना भेटतात आणि आपल्याला कळतं की सुनहरी ही पोलिसाचा माणूस('पोलिसाची बाई' हा शब्दप्रयोग वापरला तर तुम्ही मारणार नाही ना?) आहे. (पोलीस जय दीक्षित बेटा भाग्यवान! त्याला पोलीसिणी मिळतात विपाशासारख्या स्फोटक. आणि चोर/खबरे मिळतात ते ऐश्वर्यासारखे सुंदर! ललिताजींसारखं म्हणावंसं वाटतं, 'पोलीसकी गणवेशकी की खरीदारी मे ही समझदारी है.') इथे आर्यन उर्फ चोर पण भेटून सुनहरीला आपण दोघे पुढच्या चोरीसाठी ब्राझीलला जात असल्याची खबर देतो. (नाहीतर आम्ही! १ आठवडा युरोप दौरा मिळाला तर आधीचा एक आठवडा व्हिसा ऑफिसला चकरा टाक, कुठे बॅग खरेदी कर, पटकन हाताशी असावं म्हणून इंस्टंट खिचडी मिक्स बनव, शेजारच्या काकूंना दारातल्या मांजरीला दूध घालायला सांग इ. उद्योग करत बसतो. हाय काय नि नाय काय! असं पटकन उठायचं आणि ब्राझीलला जायचं.)

ब्राझीलला म्हणे विपाशाची रंगीबेरंगी चिंध्या परिधान करणारी जुळी बहीण 'मोनाली बोस' आहे. जय दीक्षित आणि अली तिच्याकडे मुक्काम करतात. अलीचं आणि मोनालीचं सूत जुळतं. आणि गाणी गाणे, पार्ट्यांत जाणे, समुद्रकिनाऱ्यावर बागडणे करुन उरलेल्या फावल्या वेळात जय आणि अली आर्यनचा तपास करतात. यादरम्यान आर्यन सुनहरीला चोरी संबंधित ट्रेनिंग देत असतो. (उदा. डोंगराच्या कड्यावरुन उडी मारणे, केस हडळीसारखे मोकळे न सोडता वरती बांधणे,बर्गर न खाता सॅलड खाणे आणि इतर काही.फॉर डिटेल्स रेफर टू धूम द्वितीय. अर्थात इतके ट्रेनिंग होऊनही चोरी बऱ्यापैकी साध्या पद्धतीनेच करतात.)

जोक्स अपार्ट, या ब्राझीलच्या भागात सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे ह्रितिक ऐश्वर्याच्या प्रेमात पडण्याच्या वेळचं पार्श्वसंगीत. आणि अर्थात अली आणि जय दीक्षिताचा अभिनय. ह्रितिक आणि ऐश्वर्या जोडी म्हणून देखणे दिसतात. फक्त डोळ्यातील आणि रंगातील साम्यामुळे कधीकधी भाऊ बहीण वाटतात. चित्रपट संपायला पाऊण तास असताना (त्यावेळी माझे पॉपकॉर्न संपल्यामुळे मला बरोबर लक्षात आहे!) ह्रितिकला कळतं की ऐश्वर्या उर्फ सुनहरी पोलिसांची खबरी आहे. पण तोपर्यंत ते प्रेमात पडलेले असतात. मग ते एका वस्तुसंग्रहालयातून जुनी सोन्याची नाणी चोरी करतात. आणि मग बराच वेळ मोटरसायकलींवरचा पाठलाग. यात अभिषेक आणि उदय चोप्रा बाइक चालवता चालवता बाजूला उभे राहून गोळ्या झाडतात. पण ह्रितिक आणि ऐश्वर्या त्यांना हुलकावणी देऊन अजून एका लपवलेल्या बाइकपाशी येतात आणि दोन बाइकवर बसून वेगवेगळ्या दिशांना जातात. मग अभिषेक ह्रितिकचा आणि उदय ऐश्वर्याचा पाठलाग करतात. शेवटी एका कड्याच्या टोकावर अभिषेक ह्रितिकला आणि उदय ऐश्वर्याला पकडतात. ह्रितिक भावपूर्ण आवाजात विचारतो, 'क्या कोई किसीसे इतना प्यार कर सकता है की उसकी जान लेले?' (म्हणजे, तो एकदा भावपूर्ण आवाजात विचारतो. अभिषेक लक्ष देत नाही. म्हणून दुसऱ्यांदा भावपूर्ण आवाजात विचारतो आणि ऐश्वर्या त्याला तीन गोळ्या घालून दरीत पाडते.) अभिषेक वैतागून ऐश्वर्याला सोडून देतो.

सहा महिन्यांनी फिजी बेटांवर एका हॉटेलात ह्रितिक आणि ऐश्वर्या दिसतात. अभिषेक तिथेही येतो. पण त्यांना सोडून देतो. आणि आर्यनही चोरी बिरी सोडून सर्व चोरीचा माल अभिषेकच्या हवाली करतो. इथे चित्रपट संपतो. (नशीब! मला आपली उगीचच मध्यमवर्गीय भिती वाटत होती की आर्यन फिजीला सापडलाच नाही तर अभिषेकचा साहेब अभिषेकचा फिजीचा प्रवासखर्च रद्द करतो की काय!)

आता गंमत अशी की हा ह्रितिक म्हणे वेषांतर करुन चोऱ्या करत असतो. आणि तेही कायम योग्य अंदाजाने. म्हणजे बघा, सुरुवातीला मुंबईच्या चोरीच्या वेळी ह्रितिक पाण्यातून वस्तुसंग्रहालयाची फरशी कापून संग्रहालयाच्या प्रसाधनगृहात येतो, रंग लावतो, आणि इतके करेपर्यंत प्रसाधनगृहात दुसरं कोणीच येत नाही. (प्रसाधनगृहे दोन आहेत? की रखवालदारांनी 'अभी आर्यन साब चोरी करनेवाला हय वो इधर मेकप करनेवाला हय, दुसरे फ्लोअरपर जाव' म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यांना हाकलले आहे?) ह्रितिक पोलिसांपासून पळत असतो स्केटिंग करुन. म्हणजे स्केटिंग करुन तो बाइकच्या पुढे जातो, आणी वर असणारं हॅलिकॉप्टर पण त्याला गाठू शकत नाही. पळून पळून तो बरोबर 'शुगर फ्री' च्या मॅराथॉनपाशी येतो आणि आपला काळा कोट काढून आत असलेल्या 'शुगर फ्री' लिहीलेल्या सदऱ्यासहित त्यांच्यात मिसळून पोलीसांना गुंगारा देतो. (पण शुगर फ्री वाल्यांनी ह्रितिकला सांगून ठेवलेलं असतं का, की बाबा, आम्ही इथे इथे पळत असू, तू असा असा टिशर्ट घालून बरोबर या वेळी आम्हाला भेट.)आणि शेवटी पण ह्रितिक आणि ऐश्वर्या पळून पळून शेवटी बरोब्बर ठेवलेल्या दुसऱ्या मोटरसायकलीपाशीच येतात.

अशा अनेक तार्किक शंका डोक्यात घेऊन आम्ही चित्रपटगृहातून बाहेर पडलो. पण डोकं बाजूला ठेवून हिंदी चित्रपट बघायचे असतात असे म्हणून आमच्या मित्र मैत्रिण मंडळाने आम्हाला झापलं. एकंदरीत कथेत लॉजिक नसले तरी यशस्वी कलाकार, बाइक, हॅलिकॉप्टर, कपडेबचत करणाऱ्या स्फोटक नायिका,बीटस वाली गाणी, ह्रितिकचे नाच आणि चांगले चित्रीकरण यावर धूम-२ धूम माजवेल बहुधा! धूम -१ आम्ही ४-५ दा बघून पाठ केला होता. त्यात इतक्या लॉजिकल शंका आल्या नाहीत खऱ्या. जर दिवारमधल्या शशी कपूर आणि अमिताभ सारखं 'धूम -२' ने 'धूम -१' ला विचारलं, 'आज मेरे पास ह्रितिकके नाच है, गानेमे जादा अंग्रेजी शब्द है, कम कपडोमे ऐश्वर्या है, कम कपडोमे विपाशा है, सुरुवातके पाच मिनीटमे रीम्मी सेन है, हॅलिकॉप्टर है, पॅराशूट है, परदेशी आगगाडी है..तुम्हारे पास क्या है?????' तर धूम -१ शांतपणे म्हणेल, 'मेरे पास.... स्टोरी है!!' असं वाटतं.
(हे आपलं साध्यासुध्या दर्शकाच्या नजरेने परीक्षण. वाचून खऱ्या चित्रपटाचा अंदाज येईलच असा आमचा दावा नाही.)
-अनुराधा कुलकर्णी

6 comments:

श्रद्धा कोतवाल said...

अनु, लिहिण्याची शैली मस्त आहे तुझी. सगळे पोस्ट्स वाचून काढले. छान आहे सगळंच लिखाण!

ashley said...

anu,
mastch likhan ahe
superub!

Unknown said...

hi anu,
tuze likhan khooooop prabhavshali aahe.keep it up.do well.

Abhijit Bathe said...

Last comment -
'मेरे पास.... स्टोरी है!!'

wow.
thats what makes ur blog so special.
you always have a story.
i hope u never have to 'look' for one.

over and out.

a Sane man said...

awesome!!!

prashant phalle said...

CHANCH.......
ekhadya avakhal [kon mahanoty re khadoos]lahan mulachya buddhine lihilay...
Bhai maja aa gaya !!!