या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 12 March 2007

मंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत

मंत्री सुहासराव देशमुखांनी जेव्हा ती जुनी हवेली विकत घेतली तेव्हा जवळजवळ सर्वांनी त्यांना मूर्खात काढले. ती जागा झपाटलेली आहे हे सर्वज्ञात होते. खुद्द हवेलीचा मालक आणि उमराव घराण्याचा शेवटचा वारस पण त्यांना याबाबतीत धोक्याचा इशारा देऊन गेला होता.
'वारसाहक्क असूनही या हवेलीत आम्ही कधीच राहिलेलो नाहिये. अनेक वर्षांपूर्वी माझी चुलत आजी म्हणजेच विलासपूर संस्थानाच्या सरदाराची पत्नी इथे मुक्कामाला होती. ती कपडे बदलत असताना तिच्या खांद्यावर एका सापळ्याने मागून हात ठेवले. किंचाळून ती बेशुद्ध पडली. या धक्क्यातून ती कधीच सावरली नाही. आमच्या परिवारातल्या बऱ्याच लोकांनी उमरावसाहेबांचं भूत प्रत्यक्ष पाहिलंय. त्या प्रसंगानंतर हवेलीत रहायला नोकरचाकर पण तयार नव्हते.' शेवटचे उमरावसाहेब सांगत होते.

'माफ करा उमरावसाहेब, पण आपण सर्व एकविसाव्या शतकात वावरणारे सुशिक्षित लोक आहोत. माझा या गोष्टींवर काडीचाही विश्वास नाही.' मंत्रीसाहेब म्हणाले.
'तुमच्यासारखे तथाकथित सुधारक लोक भूताचं अस्तित्व मानायला तयार नसले तरी भूत किंवा अमानवी शक्ती जगात अस्तित्वात आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि उमरावसाहेबांचं भूत जवळजवळ तीन शतकं त्या हवेलीत आहे. मरणापूर्वी ते कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दिसतंच.' शेवटचे उमरावसाहेब जरा परखडपणेच म्हणाले.

'भूत नावाची गोष्ट जगात नाही. आणि हा निसर्गाचा नियम आहे. तो तुमच्या गावापुरता आणि हवेलीपुरता बदलणारा नाही.' मंत्रीसाहेब त्यांचे प्रसिद्ध मंत्रीछाप हास्य करत म्हणाले.

'मंत्रीसाहेब हे लक्षात ठेवा कि ही मुंबई नाही. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या जगात अस्तित्वातच नाहीत असं समजू नका. ठिक आहे, तुम्हाला भूताबरोबर राहणं मंजूर असेल तर अवश्य त्या हवेलीत रहा, पण नंतर म्हणू नका कि मी सांगितलं नाही.' शेवटचे उमरावसाहेब निर्वाणीच्या स्वरात म्हणाले.

अशाप्रकारे काही दिवसांनी मंत्रीसाहेब आपल्या कुटुंबासह हवेलीत दाखल झाले. मंत्रीसाहेबांच्या पत्नी सौ वत्सलाबाई देशमुख या मध्यमवयाकडे झुकणाऱ्या आणि चेहऱ्यावर अजूनही तारुण्यातल्या सौंदर्याच्या खुणा बाळगून होत्या. वत्सलाबाईंचा उत्साह या वयातही सळसळता होता. थोरला मुलगा जितेश एक देखणा तरुण होता. नृत्यात प्रवीण होताच आणि आता तो रुपेरी पडद्यावर जाण्याच्या दृष्टीने हालचाली करत होता. मुलगी अमिता हुशार आणि चित्रकलेत चांगली होती. सर्वात धाकटी जुळी मुलं होती मितेश आणि रितेश,त्यांना त्यांच्या खोडकर स्वभावामुळे सर्व राहू केतू म्हणायचे.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात ते सर्व हवेलीपाशी पोहचले. त्यांचं स्वागत करायला हवेलीची जुनी नोकराणी चंदा होती. चंदाने त्या सर्वाना अदबीने आत नेले. दिवाणखान्यात चहा तयार होता. वत्सलाबाई फिरुन खोली पाहत होत्या.
अचानक त्या थबकल्या. 'चंदा, बघ इथे कसलातरी लालसर डाग पडला आहे.'
'हो इथे रक्त सांडलं होतं.'- चंदा
'भयंकर. पण मला माझ्या नव्या घरात रक्ताचा डाग नकोय आणि तो आताच्या आता गेला पाहिजे.' -वत्सलाबाई.'
हा डाग असा जात नाही. १५७५ मधे याच जागी उमरावसाहेबांनी त्यांच्या पत्नीचा खून केला. हा रक्ताचा डाग तेव्हापासून आहे आणि तो जात नाही. हा डाग पहायला जवळच्या गावातली लोकं पण येतात.'
जितेश पुढे आला. 'हॅ, काहीतरीच. असा कसा जात नाही?आता लायझॉलने जरा पुसला कि जाईल.'
'नाही, हा डाग पुसायचा प्रयत्न केला तर अनर्थ होईल.' चंदा म्हणाली आणि घाबरुन त्याच्याकडे पाहतच राहिली. जितेशने तितक्यात सामानातून उचकून लायझॉलची बाटली बाहेर काढली आणि तो ते त्या डागावर टाकून जोरजोरात घासत होता. काही मिनीटात डाग नाहिसा झाला.
'बघ, मी म्हटलं होतं ना, लायझॉलने डाग जाणारच.' जितेश म्हणाला. तितक्यात जोरात वीज कडाडली. चंदा घाबरुन बेशुद्ध पडली.

'आता हिचं काय करायचं गं आई?' जमिनीवर पडलेल्या चंदाकडे पाहत जितेश म्हणाला.
'हिचं काय? पगारातून बेशुद्ध पडलेल्या वेळेचे पैसे कापायचे. परत बेशुद्ध पडणार नाही.' वत्सलाबाई म्हणाल्या. आणि चंदा पटकन शुद्धीवर आली. चंदाने पुष्कळ संगायचा प्रयत्न केला कि इथे भूत आहे, पण जितेश आणि वत्सलाबाईंनी तिला समजावून झोपायला पाठवले आणि दोघे आराम करायला आपापल्या खोल्यांकडे गेले. दिवस सुरळीतपणे पार पडला.

रात्रभर विजा कडाडत होत्या. सकाळी ते सर्व उठले आणि पाहतात तर रक्ताचा डाग परत त्याच जागी होता. खुद्द मंत्रीमहाशयांनी रात्री नीट कडीकुलपं लावली होती. देशमुख कुटुंबाची भूताच्या अस्तित्व नसण्याबद्दलची ठाम मते डळमळत होती...

त्या रात्री मंत्रीसाहेबाना एका विचित्र आवाजाने जाग आली. त्यांनी उशाशी ठेवलेली चाळिशी लावली आणि ते जिन्यावर आले. आणि ...
त्यांच्यासमोर उमरावसाहेबांचे भूत उभे होते. त्याचे डोळे लाल निखाऱ्यांसारखे चमकत होते. कपडे राजेशाही पण जुने होते. आणि त्याच्या हातात जुनाट गंज लागलेल्या जड साखळ्या होत्या, त्या करकरत होत्या.
मंत्रीसाहेब म्हणाले, 'हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते, माझ्या घरात मी तुम्हाला असा अपरात्री फिरुन आमची झोपमोड करु देणार नाही. आणि तुम्हाला फिरायची इतकी हौसच असेल तर हे कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइल साखळ्याना लावा म्हणजे त्या असा आवाज करणार नाहीत.' आणि मंत्रीसाहेब शांतपणे ती कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइलची बाटली जमिनीवर ठेऊन परत झोपायला निघून गेले.

भूत काही क्षण संतापाने थरथरत उभं राहिलं आणि ती बाटली लाथाडून जिन्यावरुन उतरु लागलं. त्याच्या अंगातून हिरवा प्रकाश येत होता. भूत जिन्याच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं आणि तितक्यात......
जिन्यावर राहू केतू अवतरले आणि त्यांनी मोठी उशी भूतावर नेम धरुन फेकून मारली!! उमरावसाहेबांचं भूत बावचळलं आणि आपली अदृश्य व्हायची कला आठवत अदृश्य झालं. घर परत शांत झालं आणि राहू केतू झोपायला निघून गेले..

आपल्या गुप्त खोलीत येऊन भूताने सुटकेचा निश्वास सोडला आणि ते ताळ्यावर येऊ लागलं. भूताच्या ३०० वर्षांच्या उजळ कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला असा नामुश्कीचा प्रसंग आणि अपमान सहन करावा लागला होता. भूताच्या डोळ्यासमोरुन त्याचे ३०० वर्षातले कर्तृत्व सरकून गेले..

कधीकाळी विलासपूरची सरदारपत्नी भूताला पाहून किंचाळून बेशुद्ध पडली होती.. कधीकाळी एका आचाऱ्याने आत्महत्या केली होती स्वयंपाकघराच्या खिडकीवर टकटक करणारा हिरवा हात बघून.. कधीकाळी घरी आलेली एक श्रीमंत पाहुणी रात्री खुर्चीत एका सांगाड्याला बसलेलं पाहून सहा महिने अंथरुणाला खिळून होती.. घरातली प्रत्येक मोलकरिण पडद्यामागे भूताला पाहून नोकरी सोडून पळून गेली होती..भूताला हे सर्व सन्मान आठवले. 'घाबरवणं हीदेखील एक कला आहे' यावर भूताचा विश्वास होता आणि या कलेची जोपासना भूताने मेहनतीने आणि चिकाटीने ३०० वर्षे करुन या कलेत प्राविण्य मिळवलं होतं.. त्यासाठी निरनिराळ्या वेशभूषा अभ्यासपूर्वक केल्या होत्या..

आणि आज हे पाच दिडशहाणे मुंबईकर त्याच्या कर्तृत्वाला लायझॉलने धुवून त्याच्या अंगावर उशा फेकून मारत होते. भूत भयंकर संतापले. आजवरच्या इतिहासात कोणत्याच भूताला इतकी अपमानास्पद वागणूक नव्हती मिळाली. या अपमानाचा सूड घ्यायचाच हा निर्धार करुन भूत आराम करु लागलं.
सकाळी गप्पांत प्रमुख विषय हाच होता. कॅस्टऱॉल इंजिन ऑइलची देणगी भूताने अव्हेरल्यामुळे मंत्रीमहाशय चिडले होते. राहू केतू उशीचा प्रसंग रंगवून सांगत होते. मंत्रीमहाशय हसू दाबत म्हणाले, 'कितीही झालं तरी ते भूत ३०० वर्षं इथे राहतं आहे. त्याच्यावर उशा फेकून मारणं हे चांगले संस्कार नाहीत. अर्थात, त्याला जर कॅस्ट्रॉल ऑइलचा वापर करायचा नसेल तर आमचा नाईलाज आहे आणि आम्हाला त्याच्या गंजलेल्या साखळ्या हिसकावून घ्याव्या लागतील. किती आवाज येतो!!' आणि सर्वजण खो खो हसू लागले.

तो आठवडा तसा शांततेत गेला आणि काहीही विशेष प्रसंग घडला नाही. पण तो जमिनीवरचा डाग मात्र रोज पुसला तरी रोज परत अवतरत होता. आणि डागाचा बदलणारा रंग पण विचीत्रच होता. एक दिवस डाग विटकरी, एक दिवस पिवळा, एक दिवस नारिंगी, एक दिवस जांभळा. आणि शुक्रवारी तर चक्क पोपटी रंगाचा डाग होता!! डागाचा बदलता रंग देशमुख कुटुंबाचा चेष्टेचा विषय बनला होता. पण अमिता मात्र आता तो डाग पाहून अस्वथ होत होती..ज्या दिवशी डागाचा रंग हिरवा झाला त्यादिवशी ती खूपच अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती.

रविवारी रात्री अचानक 'धडाड!!' आवाजाने सर्व जागे झाले. बघतात तर काय, जिन्याच्या कोपऱ्यात ठेवलेला लोखंडी पुतळा खाली पडला होता आणि पुतळ्याला ठेचकाळलेलं भूत कळवळून गुडघा दाबत खुर्चीवर बसलं होतं. ही संधी साधून राहू केतू त्यांच्या गलोली घेऊन आले आणि त्यांनी भूतावर खड्यांचा वर्षाव केला. तितक्यात मंत्रीमहोदय जुनं पिस्तुल घेऊन आले आणि भूतावर ते रोखत गरजले, 'हँडस् अप!!' भूत चिडून जाऊ लागलं. जाता जाता जितेशच्या हातातली मेणबत्ती विझवायला ते विसरलं नाही.
जिन्यावर सुरक्षित जागी आल्यावर भूताने ठरवलं कि आज आपल्या सुप्रसिद्ध रौद्र हास्याचा पहिला प्रयोग करायचा यांना घाबरवायला. हे हास्य घाबरवण्याच्या परिक्षेत नेहमी हमखास यशस्वी ठरलं होतं. एका उमरावाचा काळा विग हे हास्य ऐकून पांढरा झाला होता. भूताने जास्तीत जास्त आवाज वाढवून एक भयानक रौद्र हास्य केलं.

इतक्यात खोलीचं दार उघडून वत्सलाबाई डोळे चोळत बाहेर आल्या आणि त्रासिक आवाजात म्हणाल्या, 'तुमची तब्येत खराब झालेली दिसतेय. पोटात वायू आहे आणि डोकं पण ठिकाणावर नाही.अपचन वगैरे झालं असेल तर हे इनो फ़्रुटसॉल्ट पाण्यातून घ्या आणि झोपा. असा रात्री अपरात्री दंगा करु नका. हे सभ्य माणसाचं घर आहे.' भूत परत अंगातून हिरवा प्रकाश सोडून आपली एखादी भितीदायक वेशभूषा घेणार तितक्यात जिन्यावर पावलांचे आवाज ऐकू आले आणि ते घाबरुन राहू केतूच्या हातात परत सापडण्याआधी अदृश्य झालं..

परत काही दिवस भूताने फरशीवरच्या डागाव्यतीरिक्त आपलं अस्तित्व दाखवलं नाही. पण भूत आता जबरदस्त आणि भक्कम योजना आखत होतं. मुख्य बदला त्याला जितेश आणि राहू केतूवर घ्यायचा होता. जितेशने त्या डागाचा लायझॉल फासून रोज अपमान केला होता. 'एकदा या मुलांना घाबरवलं कि आपलं काम आपोआप होईल.' भूताने विचार केला. राहू केतूंचे पलंग एकमेकांशेजारी थोडं अंतर ठेऊन होते. दोन पलंगाच्या मधोमध हिरव्या रंगाचं भयानक प्रेत बनून काही मिनीटं उभं राहिलं तरी घाबरवण्याचं काम फत्ते होणार होतं.त्या दोघांची दातखीळ बसणार होती... अमिताशी भूताचं जास्त शत्रुत्व नसल्याने तिला जास्त घाबरवायचं नाही असं भूताने ठरवलं. तिला काय, थोडेफार पडदे वगैरे हलवून आणि रात्री विकटहास्य करुन पण घाबरवता येईल.

रात्री सर्वत्र निजानीज झाली. आणि भूत कामगिरीवर बाहेर निघालं. वादळी वारं होतं.. बाहेर घुबडाच्या घुत्कारण्याचा आवाज येत होता..

भूत जिन्यापाशी आले आणि..

भूताच्या समोर एक भयंकर आकृती उभी होती. तिचा चेहरा पांढराफटक, अंग पांढरंफटक आणि चेहऱ्यावर भयंकर हास्य थिजलेलं होतं. डोळे लालभडक होते. त्या आकृतीच्या छातीवर काही शब्द कोरलेले होते, पण भूताने ते वाचण्याचे वेडे धाडस केले नाही. 'भूत पाहणे' हा भितीदायक अनुभव भूताला नविन असल्याने ते किंचाळून तिथून पळून गेलं आणि धापा टाकत आपल्या खोलीत पोहचलं.

सारी रात्र भूताने जीव मुठीत धरुन आपल्या खोलीत काढली. पहाट होता होता भूताने धीर करुन परत त्या भूतापाशी जाण्याचा विचार केला. 'एक से दो भले' या नात्याने त्या भूताशी मैत्री करुन आपली शक्ती वाढवता येईल या विचारात भूत जिन्यापाशी पोहचलं आणि..

रात्री भूताने पाहिलेल्या त्या भूताची रया गेल्यासारखी वाटत होती. ते कोपऱ्यात मुरगळून पडलं होतं. भूताने धावत जाऊन त्या भूताला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या भूताचं डोकं घरंगळून फुटलं..गुंडाळलेला पांढरा पडदा पडला आणि स्वयंपाकघरातला उंच झाडू त्यातून प्रकट झाला. शेजारी कागद चुरगळून पडला होता. त्याच्यावर लिहीलं होतं '१००% आयएसआय मार्क ओरिजिनल भूत. नकलांपासून सावधान.'

भूताने रागाने किंकाळी फोडली. राहू केतूने झाडूला कापड गुंडाळून भूताला हातोहात मूर्ख बनवलं होतं. 'या खानदानाचा सत्यनाश करेन!!!' डोळे गरागरा फिरवत भूताने भूतांच्या गाईडमधे वर्णिलेली मुद्रा करुन प्रतिज्ञा केली. आणि ते त्याच्या शवपेटीत झोपायला गेलं, कारण सकाळ व्हायची भयप्रद चिन्हं दिसू लागली होती..

दुसऱ्या दिवशी भूताला खूप थकवा आला होता. एकंदरीतच मागच्या महिन्यातील घटना आणि मानसिक ताण यामुळे त्याची प्रकृती खालावलीच होती. पुढचे पाच दिवस भूताने लोळून काढले. त्याचे फरशीवरचा डाग बनवण्याचे काम पण त्याने आता सोडून दिले होते. 'रोज लायझॉलमधे फरशीला बुडवणारे हे क्षुद्र जीव तो डाग मिळवण्याच्या लायकीचेच नाहीत.' भूत पडल्या पडल्या विचार करत होते. पण असं पडून किती दिवस राहणार? किमान आठवड्यातून दोनदा घरात वावरुन लोकांना घाबरवणं हे भूताचं कर्तव्य होतं. पण ती खोडकर कार्टी नाही म्हटलं तरी त्याला घाबरवून जात होती.

पुढचे तीन आठवडे भूत कर्तव्यपूर्तीसाठी रात्री हवेलीत फिरले. पण त्याने पूर्ण सावधगिरी बाळगली होती. चपला काढून त्या हातात घेउन ते चाले आणि साखळ्यांनाही त्याने कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल लावून व्यवस्थित आवाजरहित केले होते. पण इतकं करुनही राहूकेतूंनी एक दिवस जिन्याच्या दोन्ही बाजूना दोरी ताणून बांधून ठेवली आणि भूताने पायऱ्यांवरुन गडगडत सपशेल लोटांगण घातले. खाली ठेवलेल्या अमूल बटरच्या लादीवरुन जोरात घसरुन लंगडत लंगडत भूत खोलीत पोहचले. सूडाच्या आगीने ते जळत होते. शेवटी भूताने अनेक बक्षिसं मिळवलेला आपला 'बिनशिऱ्या' हा पोशाख काढला.
रात्री सर्व झोपल्याची खात्री करुन भूताने आपली वेशभूषा केली. राहू केतूंच्या खोलीचे दार त्याने हलकेच उघडले आणि ..

दारावर ठेवलेला पाण्याचा भरलेला जग भूताच्या अंगावर उपडा झाला आणि ते नखशिखांत भिजले. समोरुन त्याला राहू केतूंचे पोट धरधरुन हास्य ऐकू आले. आणि भूत मागल्या पावली पळाले.
भूताची प्रकृती फारच ढासळली होती. गळ्याला मफलर बांधून ते दिवसरात्र खोलीत पडून राहायचे.

त्या दिवशी अमिता घरी उशिरा आली आणि लपतछपत मागच्या जिन्याने घरात शिरली. भूताच्या खोलीवरुन जात असताना तिने पाहिले कि दार उघडे होते. आत पडलेले भूत फारच अशक्त आणि दयनीय दिसत होते. अधूनमधून ते सांधेदुखीमुळे कण्हत होते. अमिताला दया आली. ती खोलीत शिरली.
'तुमची अवस्था बघून मला वाईट वाटतं. पण घाबरु नका, उद्या माझे भाऊ बाहेर जाणार आहेत आणि पूर्ण दिवस तुम्हाला कोणाचीच भिती नाही. पण हेही खरं कि तुम्ही जर नीट वागला असतात तर कोणीच तुम्हाला त्रास दिला नसता.'
भूताचा आवाज चढला. 'मूर्ख मुली, 'मी नीट वागायचं'?? मी नीटच वागतो आहे.हे सर्व प्रकरण सुरु तुझ्या त्या लायझॉलवाल्या भावाने केलं. आणि ती दोन नतद्रष्ट कार्टी, त्यांना मोठ्या माणसाशी, सॉरी भूताशी कसं वागायचं ते संस्कारच नाहीत. मुंबईची आगाऊ बिघडलेली पोरं!!'

'कोण बिघडलं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही तो भिकारडा फरशीवरचा डाग रंगवायला माझ्या रंगपेटीतले रंग चोरता. आधी सर्व लाल रंगाच्या छटा चोरल्यात. मला आता सूर्योद्याचे देखावे रंगवता येत नाहीत. नंतर पिवळा.जांभळा..शेवटचा पोपटी रंगसुद्धा चोरलात. आता माझ्याकडे फक्त पांढरा आणि काळा उरलेत. काय हा मूर्खपणा? हिरव्या रंगाचं रक्त पाहिलंय का कुणी? आणि रोज रक्ताचा डाग ताजा ठेवण्याची इतकीच हौस आहे तर माझे रंग का चोरता? खरं रक्त आणता नाही येत तुम्हाला?' अमिताने चिडून सरबत्ती सुरु केली.

भूत जरा वरमले. 'मी तरी काय करणार? आजकाल रक्त मिळणं किती कठिण झालं आहे. तुझ्या त्या आगाऊ भावाने लायझॉल वापरुन मला आव्हान दिलं म्हणून मला हे सर्व करावं लागलं.'

'तुम्ही या घरातून निघून जा. आम्ही आता इथे राहतो. वाटलं तर मुंबईत जा. तिथे लोक भूत बघायला आणि घरी ठेवायला कितीही पैसे द्यायला तयार होतील. देव दूध पितो म्हणून त्यांनी कितीतरी दूध आणि वेळ वाया घालवला होता. भूतासाठी तर अजून वेडे होतील.'

'आता या उतारवयात मला कुठेही जायचं नाही. मुंबईत तर मुळीच नाही.'
'ठिक आहे, मी राहूकेतूंना अजून एक आठवडा सुटी घेऊन घरी रहायला सांगते.'
'नाही, थांब अमिता, असं नको करुस. मी खूप थकलो आअहे. मला आता शांत झोप हवी आहे पण तीपण मिळत नाही. तीनशे वर्षांपासून मी जागा आहे आणि आता मला विश्रांती हवी आहे.'
'बिचारं भूत!! तुम्ही झोपू शकत नाही का?'

'एक जागा आहे जिथे मला शांत झोप लागेल. तिथे तारे असतील आणि देवदूत गाणं गात असतील. मी आजपर्यंत खूप पापं केली आहेत. जोपर्यंत कोणी निर्मळ मनाने मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा करत नाही आणि माझ्यासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करत नाही तोपर्यंत मला मुक्ती नाही.' भूताचे डोळे पाणावले.
भूताची अवस्था बघून अमिताच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, 'मी प्रार्थना करेन तुमच्यासाठी.' आणि ती डोळे मिटून पुटपुटली,'हे परमेश्वरा,यांना यांची पापं माफ कर. त्यांनी भरपूर फळं भोगली आहेत तीनशे वर्षे. आता त्यांना तुझ्या दारी आश्रय दे.'

आणि भूत हळूहळू विरळ होऊ लागलं. 'मुली, तुझे असंख्य आभार!' असं म्हणून ते नाहीसं झालं.
वत्सलाबाई अमिताला घरभर शोधत होत्या. शोधत शोधत त्या रिकाम्या खोलीत आल्या, तर अमिता डोळे मिटून बसली होती. आणि शेजारी चिमूटभर राख पडली होती. उमरावसाहेबांच्या भूताला अखेर मुक्ती मिळाली होती.....


-समाप्त-
(ऑस्कर वाइल्डच्या 'कँटरव्हिलेज घोस्ट' चे मराठीकरण)
-अनुराधा कुलकर्णी

7 comments:

Anonymous said...

Apratim!!!!

Anonymous said...

छानच आहे. Pretty good translation.

Anonymous said...

very good!!!

Jagdish Deshmukh said...

anuu tu asech lihit ja, mi nehami moklya velet tuza blog vachto ani itarana hi sangto

veryy goog go on...

Anonymous said...

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया.... अनु अनुवाद ठीक आहे. पण आणखी चांगला करत आला असता. असो. आणि हो, मराठीत "नोकराणी" नाही म्हणायचे, मोलकरीण म्हणायचे. माहित नाही का तुला. असो, तुझा प्रयत्न चांगला होता. आणखी चांगले लिखाण तुझ्याकडून अपेक्षित आहे.

rj_900 said...

मुर्ख बनवता का लोकांना? ही नाना पाटेकर च्या short film ची story आहे

अनु said...

पुष्पराज,
इतकी स्नाईड कमेंट का बरे? या पोस्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे ऑस्कर वाइल्ड च्या कँटरव्हिले घोस्ट चे यथाशक्ती मराठीकरण/रुपांतर आहे.मूळ इंग्लिश कथेची लिंकही दिली आहे.नाना पाटेकर भूत असलेला फक्त पक पक पकाक हा पिक्चर मला माहिती आहे, तोही पूर्ण पाहिलेला नाही.तुम्ही कोणता पिक्चर म्हणताय हे मला कळत नाहीये.
माझी मूळ मनोगत.कॉम वरील पोस्ट २००५-६ च्या दरम्यान ची असेल.लिंक देऊ शकते.नाना पाटेकर चा पिक्चर कधी आला वगैरे खोदकाम करण्यात मला इंटरेस्ट नाही.त्या पिक्चर ची कथा लिहीणार्‍याने कँटरव्हिले घोस्ट वाचली असेल इतका एकच अंदाज बांधू शकते.
बाय द वे या ब्लॉग वर लिहीलेल्या सर्व पोस्ट कोणत्याही इमेल्/व्हॉटसप्/साईट वरुन कोणीतरी दुसर्‍या कोणाच्या नावावर वाचल्या असतील तरी त्या पूर्णपणे माझ्याच आहेत याचे पुरावे, मूळ पोस्ट पब्लिश केल्याच्या लिंक, ड्राफ्ट्,डेट टाईम माझ्याकडे आहेत.
मी मूर्ख बनवतेय असा दावा असेल तर लेट्स टेक द चॅलेंज.