या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Showing posts with label lifestyle. Show all posts
Showing posts with label lifestyle. Show all posts

Monday, 5 March 2007

अभ्यासाचं भिजत घोंगडं

धाप्प!!!रात्रीच्या नीरव शांततेत आवाज घुमला आणि मी दचकून जागी झाले. अर्धा किलो वजनाचं 'पॉइंटर्स इन सी' वेडंवाकडं मुरगळून हातातून खाली पडलं होतं. अभ्यासाचं पुस्तक पडून वाचताना दहा मिनीटात 'नीरव शांतता' 'रव अशांतता' बनते आणि त्यात माझ्या घोरण्याचे 'खूऽऽ श्यू ऽऽ' किंवा तत्सम उच्चार वातावरणात घुमतात असं आसपासची मंडळी म्हणातात पण मी तिकडे लक्ष देत नाही बाई. माझ्यासारख्या सुंदर(??) बायका कधी घोरतात का?

नोकरीसाठी बनवलेल्या व्यक्तीगत माहितीपत्रकाला (याला हल्लीच्या 'ट्रेंड लँग्वेजमधे' 'रेस्युमे' म्हणतात बरं!) मुद्रीत करताना अचानक शोध लागतो, 'अरे, इथे 'स्किलसेट' सदरात एकच ओळ भरते आहे. चांगली नाही दिसत. तीन ओळी तरी भरायला हव्यात बुवा' आणि मग मनात तयार होतो एक दृढनिश्चय. 'ठरलं तर. आजपासून अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. कचेरीत जेवण लवकर उरकून संगणकावर अभ्यास. घरी कुकर लावल्यावर वीस मिनीटं अभ्यास. रात्री जेवणानंतर २ तास अभ्यास. सहा महिन्यात 'रेस्युमे' मध्ये घाऊक प्रमाणात स्किलसेट भरती झालेच पाहिजेत!'

अभ्यासाबाबत असे अनेक दृढनिश्चय मी नेहमी करते हो. अभियांत्रिकी शिक्षणात सुद्धा परिक्षांच्या वेळी सर्व वीर रात्री बारापर्यंत एक एक करुन गळायचे पण अस्मादिकांचा दृढनिश्चय तसाच्या तसा. 'आज रात्री फुल नाईट मारायची, पहाटे सहा पर्यंत विषय पूर्ण, मग १ तास झोपायचं आणि पुढे पेपराची घंटा वाजेपर्यंत चांगली उजळणी.' म्हणून वसतीगृहात खुर्ची अंगणात घेऊन एक उशी टेकायला, एक लाकडाचा तक्ता खाली धरायला, एखादं दिड दोन किलो वजनाचं पुस्तक, लागल्यास शेजारी रफ वही, पेन,पेन्सिल अश्या जय्यत तयारीनिशी पेपराच्या आदल्या दिवशी अभ्यासाचा श्रीगणेशा होई. बारा वाजेपर्यंत मैत्रिणी, जेवण, कालच्या पेपराबद्दल प्रत्येकीचा अंदाज, गप्पांच्या ओघात एखाद्या 'वर्ग-अबंधू' चा निघालेला विषय इ.इ. होई. बारा वाजता मन अभ्यासाच्या स्फूर्तीने भरून जाई. 'चला आता झकास चहा पिऊन तोंड धुवून सुरुवात. उद्याच्या पेपरात किमान पाच पुरवण्या तरी लिहीणार.'

थोडा वेळ अभ्यास कर, पाय मोकळे करुन ये, भूक लागली म्हणून '२ मिनीट शेवया' बनवून खाणे असं करत दोन वाजले की 'आता आत जाऊन पडून वाचूया. मन शांत आणि आरामात असताना अभ्यास चांगला होतो.' म्हणून सर्व चंबूगबाळे खोलीत नेलं जाई. खाटेशेजारी पाणी, दोन पुस्तके, आडवं पडून पोटावर एक गलेलठ्ठ पुस्तक अशा थाटात 'आरामात अभ्यास' सुरु होई. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पाळला जाऊन अर्ध्या तासात पुस्तक पोटावर १८० अंशात आडवं आणि आमची स्वारी पऱ्यांच्या राज्यात जाई. आता एखाद्या परीने 'फायबर ऑप्टीक्स' पुस्तकासारखा लाल वायरींचं चित्र असलेला झगा घातला आहे किंवा दुसऱ्या परीच्या हातात पुरवण्यांचा आणि ट्वाईनच्या दोऱ्यांचा गठ्ठा आहे असं कधीकधी वाटायचं, पण स्वप्नातच 'हॅ! काहीतरी काय? हे स्वप्न आहे. इथल्या गोष्टी खऱ्या नसतात काही!' म्हणून 'आराम' चालू रहायचा.

हा हा म्हणता शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीच्या भवसागरात हातपाय मारायला सुरुवात केली. वाटलं, आता अभ्यास बिभ्यास नाही. छान कधीही गोष्टीची पुस्तकं वाचावी. काम काय, कचेरीत वरिष्ठ शिकवतीलच. पण कसचं काय? 'हे नविन तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे. हे माहितीपत्रक. नीट अभ्यास करुन कसं वापरायचं वगैरे शिकून घ्या आणि उद्या मी तुमच्याकडून शिकून घेईन.' आता साहेब शिकणार म्हटल्यावर 'गुंडाळणे' वगैरे बाजूला ठेऊन झक्कत आणि सखोल अभ्यास करणं आलं. पुढे पुढे शिकणंही कमी झालं, पण स्वतःच्याच शिकण्याच्या गरजा वाढत गेल्या. 'जग पुढे चाललं आहे. जर या स्पर्धेत मागे रहायचं नसेल तर ज्ञान कायम अद्यावत हवं' म्हणून सी ++ शिका, अमकं शिका, तमकं शिका ची कधी न संपणारी शर्यत सुरु झाली. सोबत घरी 'पुरणपोळी शिका,लोणची शिकून घ्या,भरलं वांगं आमच्या पद्धतीने शिकून घ्या,दगड न बनवता ईडलीसारखी ईडली घरी बनवायला शिका,कधी कडक न होणाऱ्या मऊसूत पोळ्या शिका' इ.इ. 'अद्ययावतीकरण' प्रकार होतेच.

तरीही दृढनिश्चय म्हणजे दृढनिश्चय!! मग कपाटात वरच्या खणात ठेवलेले गठ्ठे बाहेर निघतात. अभ्यासात सर्वात महत्वाची पायरी म्हणजे पुस्तकांना कव्हरं घालणे आणि खुणा करायला पेन्सिल शोधणे. हा 'शोधणं' प्रकार जादूगाराच्या खिशातल्या रिबनीसारखा लांबत जातो. 'कव्हरं घालायला पुरुषमंडळींची गुळगुळीत गाड्यांची मासिकं शोधा, वर घालायला प्लॅस्टीकसाठी कालची किराण्यातली गव्हाची मोठी प्लॅ. पि. कातरा.(आता यात बऱ्याच उपशाखा येतात. ते बेपिशवी गहू परत ठेवायला रिकामा डबा शोधणे, कात्री शोधणे,डब्यात टाकता सांडलेले गहू हलक्या हाताने उचलून वेगळे ठेवणे), नंतर चिकटपट्टी शोधा. (चिकटपट्टी मिळते, पण तिचे सर्व कपडे निघून गुंडाळीला फक्त शेवटचा पांढरा कागद शिल्लक असतो.),स्टॅपलरच्या पिना शोधा, त्या नेहमीप्रमाने संपलेल्या असतातच. मग जुन्या कव्हराच्या पिना हलक्या हाताने काढून हाताच्या कारागिरीने त्या नविन कव्हरात खुपसणे' इ.इ.

रात्री उशीवर पडून पुस्तक हातात घेणार तोच.. 'चॅलेंज २००६! अगर आप चाहते है की मै जीत जाऊ तो प्लीज प्लीज प्लीज वोट किजीये, टाईप किजीये ए बी सी और एस.एम.एस. किजीये ७५७५ पर' वाला गीत कार्यक्रम सुरु होतो. आणि पुस्तक घेऊन मोर्चा बाहेर जातो. 'बघू तरी सुनित जिंकतो का इंद्रजीत!' म्हणून हिरीरीने पैजा लावल्या जातात. अभ्यासाचं घोंगडं भिजत पडलेलं असतं.

शनिवारी सकाळी सकाळी लवकर चहा इ. आवरुन निवांत 'जावा-शेंग लियांग' हातात घ्यावं तितक्यात दारावरची घंटी शुभवर्तमान घेऊन येते, 'ताई, लक्ष्मी ३ दिवस येनार न्हाय तिचा बा आजारी हाय.' झालं!! आता बसा भांडी घासत आणि धुणी धूत. जाऊदे, बाहेर जेवायला जाऊ आणि लवकर घरी येऊन अभ्यास करु. म्हणून नट्टापट्टा करायला घ्यावं तितक्यात नात्यातल्या कोण्यातरी चिंगीच्या बहिणीच्या वहिनीच्या नणंदेचा दूरध्वनी येतो, 'आता स्वारगेटात आहे. हे आणि मुलं पण आहेत. दहा मिनीटात घरी येतो.' 'मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस' ही म्हण चुकली बरं का! 'वूमन प्रपोजेस, रिलेटिव्ह डिस्पोजेस' अशी नविन म्हण बनवायला हवी.

भांडी, गप्पा, आईसस्क्रीम, गॉसिप,हाहा हीही हूहू संपून टाटा केल्यावर अस्मादिकांची स्वारी बिछान्यावर पडते. अरे, दाराला दुधाची पिशवी नाही लावली, सकाळी मनी येऊन पळवेल. अशी अनेक कामं आठवणीने केली जातात. अभ्यासाचं घोंगडं शेजारी भिजत पडलेलं असतं.

कचेरीत दिवस असाच चहापाणी, मिटींगा, यात सरत जातो. संध्याकाळी घरी येताना समोर मोठ्या पाटीवर 'माटे क्लासेस' ची जाहिरात दिसते आणि आठवतं, 'अरे, अभ्यासाचं पुस्तक कचेरीतच राहिलं आता घरी बसा टाळ कुटत.' त्या रात्री 'आर्ची कॉमिक्स' 'वपु' आणि 'पुल' खाटेवर ढिगारा करुन उभे राहतात आणि त्यांचा एक एक करुन फडशा पाडला जातो. बारा वाजतात पण डोळ्यावर झोपेचा टिप्पूस नाही! (पण मी म्हणते, नोकरी मुलाखतीत 'तुमचे आवडते पुस्तक आणी त्यातली गोष्ट' यावर का नाही विचारत?सी जावा काय, एकदा संगणकावर बसलं की बोटातून आपोआप टपकतंच की!!)

अशा प्रकारे अभ्यासाचं घोंगडं भिजत पडलं आहे. पण मी म्हणजे काय, दृढनिश्चय केला की यूं यूं शिकेन! फक्त आर्ची,वपु,पुल,चॅलेंज २००६,चिंगीच्या बहीणीच्या वहिनीची नणंद,लक्ष्मी यांना तेवढी कल्पना देऊन सावरुन घ्यायला सांगा म्हणजे अभ्यास फत्ते झालाच!!
-अनुराधा कुलकर्णी

Thursday, 1 March 2007

बैठे कामःआराम की हराम?

नमस्कार. आम्ही माहिती तंत्रज्ञानातील आणि इतर संगणकीय बैठ्या क्षेत्रातील 'बुद्धिजीवी' वीर. आमचं डोकं आणि संगणकाच्या कळफलकावरील बोटे या दोनच काय त्या 'चालणाऱ्या' गोष्टी. हातही खूप चालतीलच असं नाही. 'ctrl A','कॉपी','कट','पेस्ट' ही वरदाने आम्ही जेव्हा संधी मिळेल तेव्हा वापरतोच.

आम्ही 'बुद्धिजीवी' म्हणे. डोकं चालवणे(किंवा कधीकधी तसं दाखवणे) या श्रमाच्या मोबदल्यात आम्हाला सर्व काही बसल्या जागी हवं असतं. चहा कॉफी यंत्र, फोन,वातानुकूलन,शक्यतो सर्व संगणकावर,जे नाईलाजाने कागदोपत्री ठेवावे लागते त्यासाठी बसल्या जागी हात लांबवून घेता येतील किंवा चार पावलांवर असतील अशी फायलींची कपाटे. पलीकडे बसलेल्या मित्राकडे पण आम्ही चालत जात नाही. आमची 'एक्झिक्यूटीव्ह' खुर्ची बसूनच सरकवत जातो. नोकरी बघतानाच कार्यालयाला जायला लिफ्ट आहे ना हे पाहून घेतो. पार्किंगपर्यंत आणि पार्किंगपासून कचेरीपर्यंत चालावं लागतं म्हणून आम्ही किती कुरकुरतो. संध्याकाळी घरी यायच्या ऐवजी रात्रीच घरी येतो. एकदा आलो घरी की कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडेपण जात नाही. कापलेली भाजीच घरी मागवतो. खूपच उशीर झाला तर पोळ्या पण विकतच आणतो. किंवा ना, शक्यतो बाहेरुन येतानाच कचेरीतून संध्याकाळचा नाश्ता खाऊन येतो, म्हणजे घरी आल्यावर खिचडी टाकली की झालं.

हातात आम्ही थोडा जास्त पैसा खेळवतो आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवणारी यंत्रे खरेदी करण्यात करतो. वॉशिंग मशिन पाहिजेच. मिक्सर, ज्यूसर, रिमोट वाला टीव्ही आणि रिमोट वालाच प्लेयर..'कमीत कमी श्रम आणि सोप्यात सोपं' हे आमचं ब्रीदवाक्य आहे.
तसे आम्ही श्रमही करतो, पण डोक्याचेच. तासनतास खुर्चीवर बसतो, पण वेडेवाकडे रेलून. पाठीच्या कण्याला ताठ राहण्याची सवयच नाही. तासनतास संगणकाच्या पडद्याकडे डोळे तारवटून बघत बसतो. मग थकवा घालवायला सिगारेट किंवा चहा कॉफी मारतो, नाहीतर बाहेर मिळेल ते चिप्स वगैरे चमचमीत खाद्य चरत बसतो. रविवारी कधीकधी साहेबांबरोबर ओल्या पार्ट्या करतो. कचेरीतही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मलई कोफ्ता किंवा पिझ्झा बर्गर वडापाव चापतो. जर पिझ्झा किंवा बर्गर खाल्लं तर पाण्याऐवजी कोक पेप्सी ढोसतो. कामाच्या भरात आम्ही जेवणाच्या वेळा चुकवतो आणि मग वडापाव किंवा डोसा यावर वेळ मारून नेतो. कामात चिडचिड झाली तरी वरवर हसतो. आणि ताणाने डोकं दुखत असलं तरी 'शो मस्ट गो ऑन' म्हणून गोळी घेऊन परत कामाला लागतो..

वर्षानुवर्ष अशी जातात. आम्ही 'तरुण आहे तोपर्यंत लाईफ उपभोगा' म्हणून अनियमित दिनक्रम आणि सवयी नियमित चालूच ठेवतो. पण हल्ली चुकून माकून दोन जिने चढावे लागले तर दम का लागतो असं आम्हाला कोडं पडतं. वयोमानानुसार थकूनही आमचे आई वडील आमच्यापेक्षा जास्त उत्साही आणि काटक असतात. आम्ही मात्र क्वचित पर्वतीच्या पायऱ्या चढायलाही नकार देतो आणि ज्या मंदिराच्या नाकाशी पार्किंग असेल तिथे जाऊन दर्शन घेऊन येतो..पाठ का दुखते आणि पोट का सुटतं म्हणून आम्ही तज्ज्ञ लोकांकडे जातो. सल्ले आणि औषधांसाठी पैसे ओततो. केस जरा जास्तच गळतात हल्ली, म्हणून महागडी औषधं आणि तेलं सुरू करतो. पण जीवनशैली मात्र बदलत नाही. 'पर्यायच नाही.' असं म्हणून आपण पर्याय शोधत बसत नाही.

अशीच आणखी काही वर्षं जातात..तिशी पस्तिशीतच बीपी, हार्ट आणि डायबिटीस सर्वच हात धुऊन मागे लागतं. कमावलेले पैसे तपासण्या आणि दवाखान्यांकडे वाहू लागतात. डॉक्टरच खडसावून सांगतात आणि हजार पथ्यं देतात. योगा, प्राणायाम, चुंबकचिकीत्सा, रेकी.. जो जो जे जे काही सांगेल ते आम्ही अजमावून बघतो. 'सिगारेटी पीत नाही, जरा जास्त बिस्कीटं खाल्ली तर बिघडलं कुठे?' असे युक्तिवाद स्वतःशीच करत बसतो. 'इतरांसारखे आपण आपल्या वयाचे दिसत नाही' म्हणून खंत वाटते.. आपलेच आधीचे फोटो पाहून आपण उसासे सोडतो. त्यातल्या त्यात उपाय म्हणून बाजारात कुठलंसं अँटी रिंकल क्रीम शोधतो..पण आपलं काही चुकतं असं आपल्याला मुळी वाटतच नाही. कारण आपल्याकडे 'पर्यायच नसतो.'

खरंतर आम्ही ठरवलं तर तिशी पस्तीशी येण्याआधीच या सर्वांवर उपाय शोधू शकतो. अगदी सर्वच नाही तरी होणारं अर्धं नुकसान तरी टाळू शकतो. खरंतर आम्हीमधला कोणीही 'मी' हे उपाय जास्त कष्ट न घेताही करू शकतो.

१. एक्झिक्यूटीव्ह खुर्चीची उंची व्यवस्थित करून ठेवणे व त्यावर ताठ बसणे.
२. वेळी अवेळी चहा कॉफीवर पर्याय शोधणे. सरबत किंवा काही नसल्यास घरुन लिंबू घेऊन जाऊन लिंबू पाणी.
३. दुपारच्या जेवणात जड भाज्या कमीत कमी व कोशिंबीरी जास्त.
४. रोज जास्तीत जास्त पाणी पिणे.
५. लिफ्टऐवजी जिने चढणे.
६. आठवड्यातून एकदोनदा बाथरुमची फरशी घासणे.
७. घरात जास्तीत जास्त वेळा आतबाहेर करणे.
८. ओल्या पार्ट्यांत कोक पेप्सी दारू ऐवजी फळांचे रस पिणे.
९. सकाळच्या नाश्त्यात तेलकट खाण्याऐवजी पोळी, कच्चे तेल दाण्याची चटणी किंवा सॅण्डविच खाणे.
१०. मित्रांबरोबर सिगारेट किंवा चहा कॉफी या मार्गाने वेळ घालवण्याऐवजी त्यांना फिरत फिरत गप्पा मारण्यास प्रवृत्त करणे.
११. जितक्यादा शक्य आहे तितक्यादा कचेरीत डोळे पाण्याने धुणे.
१२. राग, ताण मनात न ठेवता ताबडतोब चांगल्या मित्राला/मैत्रिणीला बोलून मन हलके करणे आणी त्यांनाही तसे करण्यास प्रवृत्त करणे.
१३. काम करताना चिप्स चरण्याऐवजी चणे किंवा राजगिऱ्याच्या चिक्कीवर चरणे.
१४. दुचाकी/चौचाकी चालवत असताना सिग्नलवर पायांचे, खांद्याचे आणि मानेचे व्यायाम करणे. लोक जरा विचित्र नजरेने बघतात, पण त्यांनाही विचित्र गोष्टी बघण्याची सवय आहेच. काल नाही का, हिरवे आणि लाल केस रंगवलेली कॉलेज तरुणी बघत होते..
१५. रोज किमान एकदा तरी खरंखुरं खळखळून हसणे.
१६. कडू, तुरट या चवींना खाण्यातून बाजूला ठेवू नये. आज कारल्याची भाजी आहे म्हणून लोणच्याशी पोळी खाऊन भागवू नये.

आम्ही 'बैठे' आणि बुद्धिजीवी लोक. पण मनात आणलं तर आम्ही पण उतारवयापर्यंत काटक आणि निरोगी राहू शकतो. फक्त इच्छा हवी.. देवाने जे बहुमोल शरीर आपल्याला जन्म देताना दिलं आहे ते शक्य तितकी कमीत कमी मोडतोड करून त्याच्यापर्यंत पोहचवायचं आहे ना आपल्याला सर्वांना?

(लेखातील 'आम्ही' ही कोणी एक जमात किंवा समूह नसून ती एक प्रवृत्ती आहे. आणि जास्त वैद्यकीय ज्ञान नसलेल्या एका साध्यासुध्या 'मी' चे हे त्यावर शोधून काढलेले उपाय आहेत. त्यात नवीन काही सापडेलच, किंवा चुका नसतीलच, असा 'मी' चा दावा नाही.)
-अनुराधा कुलकर्णी