या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Showing posts with label ghost. Show all posts
Showing posts with label ghost. Show all posts

Monday, 12 March 2007

हवी आहेत: भूते

जाहीरात:एका भूतकथाप्रेमी वाचकाला हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते.
पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य.(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी काही/सर्व बाबींत सवलत देण्यात येईल.)
संपर्क: मी अनु

चमकलात का जाहीरात वाचून? काय करावे हो, पूर्वी सारखी खानदानी भूते राहीली नाहीत आता..म्हणून जाहीरात द्यावी लागते..प्रेमकथा सर्वत्र आहेत, रहस्यकथा सर्वत्र आहेत, पण भूतकथा मात्र हल्ली वाचायलाच मिळत नाहीत..लहानपणापासून भूतकथा आणि भूतचित्रपटांचे मला जबरदस्त आकर्षण. रात्री उशिरापर्यंत बैठकीच्या खोलीत भूतकथा( नारायण धारप लिखीत) वाचून मग आता झोपण्याच्या खोलीत न घाबरता कसे जायचे?मग पॅसेजचा दिवा लावून बैठकीच्या खोलीतील दिवा घालवून पळत पळत पॅसेजमधे जायचे..आता स्वयंपाकघरातल्या अंधारात न पाहता पळत पळत झोपण्याच्या खोलीत जाऊन एक मंद दिवा लावून पॅसेज मधे परत यायचे..पॅसेज मधला दिवा घालवून पळत पळत झोपण्याच्या खोलीतला मंद दिवा घालवून डोक्यावरुन पांघरुण घेऊन गुडुप्प झोपून जायचे.

आमच्या लहानपणी 'झी' 'स्टार' इ.इ. बाळांचा जन्म झाला नव्हता. दूरदर्शन हा एकमेव वाली. आणि मग मंगळवारी रात्री ९ ला लागणारी 'किले का रहस्य' मालिका श्वास रोखून पहायची. पण 'किले का रहस्य' ने शेवटी हे एक कटकारस्थान आहे असे दाखवून भूत संकल्पनेचा बट्ट्याबोळ केला. नंतर 'झी' वाहीनीवर बराच गाजावाजा करुन 'द झी हॉरर शो' आला. त्याचा पहिला भाग 'दस्तक' डोळे बंद ठेवून मधून मधून उघडून('आई, भूत अचानक दारामागून आलं कि मला सांग.नंतर मी डोळे उघडते.') पाहीला. 'भूते' हि केवळ स्मशान आणि कब्रस्तान यापुरती मर्यादीत न राहता कपाटातही (कपाट उघडल्यावर हात पुढे करुन नायिकेचा गळा दाबण्यासाठी)असतात आणि खाण्याच्या बशीवर नुसते मुंडके(स्वत:चे) पण ठेवू शकतात हा शोध लागला. मग काही महिने कपाट उघडताना आधी हळूच एक इंच उघडायचे..मग एकदम वेगाने पूर्ण उघडून वेगाने मागे सरायचे..आणि कपाटात कोणी नाही याची खात्री करुन मग पुढे सरकायचे.. (भूताला चकवण्यासाठी हा उपद्व्याप बरे का!)

रामसे बंधूंचा 'विराना' चित्रपट आणि इव्हील डेथ:भाग १ व २(३ अगदीच पुळचट होता..) यानी भूताना मानाचे स्थान मिळवून दिले. इव्हील डेथ पाहून झाल्यावर पलंग खिडकीपाशी होता तो सरकवला. त्या काळात एकदा थोड्या झाडीयुक्त प्रदेशातून घरी परत येत असताना झाडामागून लघुशंका करुन परत येणार्‍या पांढर्‍या सदर्‍यातल्या माणसाला मी असली सॉलीड घाबरले होते ना!! अशावेळी मी हळूच पाय पाहून घेते उलटे आहेत का. ती माझ्यादृष्टीने विश्वसनीय चाचणी असते. रामसे पटांत'अमावस्या' आणि कुत्रे रडताना आणि नायिका रात्री गाणे गुणगुणत आंघोळहौदात शिरली कि भूताचा सन्माननीय प्रवेश कथानकात होणार हे माहीती असायचे.. पण 'जुनून' चित्रपटाने 'पौर्णिमा' आणि 'वाघभूत' यांचा परस्परसंबंध जोडून 'अमावस्येला भूत येते' या रामसेबंधू गुरुसूत्राला दणदणीत हादरा दिला. (हा हंत हंत! वो भूत भूत हि क्या, जो अमावस कि रात ना आये??)

'झी हॉरर शो' हळूहळू 'हास्यमालिका' बनू लागला. यंत्रमानवासारखी चालणारी आणि भितीदायक न दिसता मतिमंद दिसणारी भूते येऊ लागली.आता सोनी वाहीनी वर 'आहट' मालिका आली. 'आहट' नेही अपेक्षा खूप वाढवल्या पहिल्या भागात मुंडकेविरहीत तरुण मुलीचे भूत दाखवून. पण नंतर 'आहट' पण विज्ञानमालिका आणि रहस्यमालिका प्रकाराकडे झुकायला लागले आपले 'भूतमालिका' पद सोडून.

मला आतापर्यंत आवडलेले एव्हरग्रीन भूत म्हणजे ड्रॅक्युला. अहाहा.. काय ते सुळे..काय ते त्याचे पांढरे डोळे.काय त्याचे 'एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ' या उदात्त धोरणाने जास्तीत जास्त माणसांचे रक्त शोषून त्याना ड्रॅक्युला पंथाची दिक्षा देण्याचे सत्कार्य!! ड्रॅक्युला कल्पनेवर आधारीत कथा नारायण धारपानी लिहीली ती 'लुचाई'. तीही घाबरवण्याच्या चाचणीत १०० पैकी १०० मिळवून गेली. ड्रॅक्युला ने ड्रॅक्युला बनवलेले पूर्ण गाव, आणि शेवटी त्या गावात उरलेला एकटा नायक आणी एक लहान मुलगा, जे दिवसा गावाला आग लावून रात्र होण्याच्या आत तिथून बाहेर पडतात. तुम्हीपण अवश्य वाचा मिळाल्यास.

नारायण धारपानी काही अप्रतिम भूतकथा दिल्या, पण हल्ली त्यांच्या कथा 'सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा संघर्ष' आणि 'समर्थानी ध्यान करुन दिव्य आत्म्याना आवाहन केले आणि त्या आत्म्यांनी दुष्ट शक्तींचा नायनाट केला' अशा सौम्य बनल्या आहेत. (नारायण धारपांच्या चाहत्यानी या वाक्यासाठी मला क्षमा करावी.)

इथे आंग्ल ग्रंथालयात स्टिफन किंग चे 'पेट सिमेट्री' वाचले आणि मला शोध लागला कि आहट चा एक भाग 'कॉपी टू कॉपी माशी टू माशी' आहे त्या कथेचा. योगायोगाने एका रविवारी रात्री ११ वाजता झोप येत नाही म्हणून वेडे खोके लावले तर त्याच कथेचा चित्रपट लागला होता. मग काय...'रविवार रात्र' 'उद्या लवकर उठायचे आहे' 'रात्री भिती वाटल्यास इथे कोणी नाही' वगैरे सर्व विसरुन तो पूर्ण पाहीला. कथा 'माणसे जिवंत करण्याची शक्ती असलेल्या दफनभूमीवर' आधारीत. मग रात्री परत घाबरणे आणि गायत्रीमंत्र.. इथे आल्यावर एकदा अशीच फिरत फिरत(दिवसा) किरिस्ताव स्मशानभूमीत जाऊन आले 'कब्रस्तान' प्रत्यक्ष बघण्यासाठी. 'किरिस्ताव' भूत भेटले तरी मी हिंदू असल्याने ते माझ्यापेक्षा त्याच्या धर्माच्या आणि त्याची मातृभाषा कळणार्‍या माणसाला जास्त पसंत करेल हि माझी कल्पना. पण ते कब्रस्तान कमी आणि बाग जास्त वाटत होती. पेन्शनर जोडपी आणि तुरळक प्रेमीयुगुले तिथे फिरत होती. झाडे फुले नीट निगा राखून सुंदर ठेवली होती. पण सौंदर्य असले तरी तिथे खिन्नता होती एकप्रकारची.

ड्रॅक्युला हे किरीस्ताव भूत जबरदस्त असले तरी आपल्याकडची भूतेही कमी नाहीत. 'गिरा' हे समुद्रकिनार्‍यावरील भूत(गिर्‍याची शेंडी कापून कपाटात ठेवली कि तो ती परत मिळवण्यासाठी आपल्याला हवे ते देतो.),मुंजा,वेताळ,हडळ,ब्रम्हराक्षस इ.इ. आपल्याकडची भूतेही प्रसिद्ध आहेत.

माझ्यासारखेच अनेक भूतकथाप्रेमी इथे असतील ना? मी त्याना(आणि भूतकथा अ-प्रेमीनापण) आवाहन करते आहे ऐकीव/वाचलेल्या भूतकथा आपापल्या अनुदिन्यांवर आणण्याचे.. भूताला जात/धर्म/लिंग/वय/देश यांचे बंधन नाही. फक्त घाबरवण्याचे काम त्याला नीट करता आले पाहीजे हि एकच अट आहे. मग, देता ना तुम्हाला माहीती असलेल्या जबरदस्त भूतकथा? मी वाट पाहीन.'घाबरा आणि घाबरवा' हेच आमचे ब्रीदवाक्य!!
-आपली(सरळ पाय असलेली)अनु

मंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत

मंत्री सुहासराव देशमुखांनी जेव्हा ती जुनी हवेली विकत घेतली तेव्हा जवळजवळ सर्वांनी त्यांना मूर्खात काढले. ती जागा झपाटलेली आहे हे सर्वज्ञात होते. खुद्द हवेलीचा मालक आणि उमराव घराण्याचा शेवटचा वारस पण त्यांना याबाबतीत धोक्याचा इशारा देऊन गेला होता.
'वारसाहक्क असूनही या हवेलीत आम्ही कधीच राहिलेलो नाहिये. अनेक वर्षांपूर्वी माझी चुलत आजी म्हणजेच विलासपूर संस्थानाच्या सरदाराची पत्नी इथे मुक्कामाला होती. ती कपडे बदलत असताना तिच्या खांद्यावर एका सापळ्याने मागून हात ठेवले. किंचाळून ती बेशुद्ध पडली. या धक्क्यातून ती कधीच सावरली नाही. आमच्या परिवारातल्या बऱ्याच लोकांनी उमरावसाहेबांचं भूत प्रत्यक्ष पाहिलंय. त्या प्रसंगानंतर हवेलीत रहायला नोकरचाकर पण तयार नव्हते.' शेवटचे उमरावसाहेब सांगत होते.

'माफ करा उमरावसाहेब, पण आपण सर्व एकविसाव्या शतकात वावरणारे सुशिक्षित लोक आहोत. माझा या गोष्टींवर काडीचाही विश्वास नाही.' मंत्रीसाहेब म्हणाले.
'तुमच्यासारखे तथाकथित सुधारक लोक भूताचं अस्तित्व मानायला तयार नसले तरी भूत किंवा अमानवी शक्ती जगात अस्तित्वात आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि उमरावसाहेबांचं भूत जवळजवळ तीन शतकं त्या हवेलीत आहे. मरणापूर्वी ते कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला दिसतंच.' शेवटचे उमरावसाहेब जरा परखडपणेच म्हणाले.

'भूत नावाची गोष्ट जगात नाही. आणि हा निसर्गाचा नियम आहे. तो तुमच्या गावापुरता आणि हवेलीपुरता बदलणारा नाही.' मंत्रीसाहेब त्यांचे प्रसिद्ध मंत्रीछाप हास्य करत म्हणाले.

'मंत्रीसाहेब हे लक्षात ठेवा कि ही मुंबई नाही. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या जगात अस्तित्वातच नाहीत असं समजू नका. ठिक आहे, तुम्हाला भूताबरोबर राहणं मंजूर असेल तर अवश्य त्या हवेलीत रहा, पण नंतर म्हणू नका कि मी सांगितलं नाही.' शेवटचे उमरावसाहेब निर्वाणीच्या स्वरात म्हणाले.

अशाप्रकारे काही दिवसांनी मंत्रीसाहेब आपल्या कुटुंबासह हवेलीत दाखल झाले. मंत्रीसाहेबांच्या पत्नी सौ वत्सलाबाई देशमुख या मध्यमवयाकडे झुकणाऱ्या आणि चेहऱ्यावर अजूनही तारुण्यातल्या सौंदर्याच्या खुणा बाळगून होत्या. वत्सलाबाईंचा उत्साह या वयातही सळसळता होता. थोरला मुलगा जितेश एक देखणा तरुण होता. नृत्यात प्रवीण होताच आणि आता तो रुपेरी पडद्यावर जाण्याच्या दृष्टीने हालचाली करत होता. मुलगी अमिता हुशार आणि चित्रकलेत चांगली होती. सर्वात धाकटी जुळी मुलं होती मितेश आणि रितेश,त्यांना त्यांच्या खोडकर स्वभावामुळे सर्व राहू केतू म्हणायचे.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात ते सर्व हवेलीपाशी पोहचले. त्यांचं स्वागत करायला हवेलीची जुनी नोकराणी चंदा होती. चंदाने त्या सर्वाना अदबीने आत नेले. दिवाणखान्यात चहा तयार होता. वत्सलाबाई फिरुन खोली पाहत होत्या.
अचानक त्या थबकल्या. 'चंदा, बघ इथे कसलातरी लालसर डाग पडला आहे.'
'हो इथे रक्त सांडलं होतं.'- चंदा
'भयंकर. पण मला माझ्या नव्या घरात रक्ताचा डाग नकोय आणि तो आताच्या आता गेला पाहिजे.' -वत्सलाबाई.'
हा डाग असा जात नाही. १५७५ मधे याच जागी उमरावसाहेबांनी त्यांच्या पत्नीचा खून केला. हा रक्ताचा डाग तेव्हापासून आहे आणि तो जात नाही. हा डाग पहायला जवळच्या गावातली लोकं पण येतात.'
जितेश पुढे आला. 'हॅ, काहीतरीच. असा कसा जात नाही?आता लायझॉलने जरा पुसला कि जाईल.'
'नाही, हा डाग पुसायचा प्रयत्न केला तर अनर्थ होईल.' चंदा म्हणाली आणि घाबरुन त्याच्याकडे पाहतच राहिली. जितेशने तितक्यात सामानातून उचकून लायझॉलची बाटली बाहेर काढली आणि तो ते त्या डागावर टाकून जोरजोरात घासत होता. काही मिनीटात डाग नाहिसा झाला.
'बघ, मी म्हटलं होतं ना, लायझॉलने डाग जाणारच.' जितेश म्हणाला. तितक्यात जोरात वीज कडाडली. चंदा घाबरुन बेशुद्ध पडली.

'आता हिचं काय करायचं गं आई?' जमिनीवर पडलेल्या चंदाकडे पाहत जितेश म्हणाला.
'हिचं काय? पगारातून बेशुद्ध पडलेल्या वेळेचे पैसे कापायचे. परत बेशुद्ध पडणार नाही.' वत्सलाबाई म्हणाल्या. आणि चंदा पटकन शुद्धीवर आली. चंदाने पुष्कळ संगायचा प्रयत्न केला कि इथे भूत आहे, पण जितेश आणि वत्सलाबाईंनी तिला समजावून झोपायला पाठवले आणि दोघे आराम करायला आपापल्या खोल्यांकडे गेले. दिवस सुरळीतपणे पार पडला.

रात्रभर विजा कडाडत होत्या. सकाळी ते सर्व उठले आणि पाहतात तर रक्ताचा डाग परत त्याच जागी होता. खुद्द मंत्रीमहाशयांनी रात्री नीट कडीकुलपं लावली होती. देशमुख कुटुंबाची भूताच्या अस्तित्व नसण्याबद्दलची ठाम मते डळमळत होती...

त्या रात्री मंत्रीसाहेबाना एका विचित्र आवाजाने जाग आली. त्यांनी उशाशी ठेवलेली चाळिशी लावली आणि ते जिन्यावर आले. आणि ...
त्यांच्यासमोर उमरावसाहेबांचे भूत उभे होते. त्याचे डोळे लाल निखाऱ्यांसारखे चमकत होते. कपडे राजेशाही पण जुने होते. आणि त्याच्या हातात जुनाट गंज लागलेल्या जड साखळ्या होत्या, त्या करकरत होत्या.
मंत्रीसाहेब म्हणाले, 'हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते, माझ्या घरात मी तुम्हाला असा अपरात्री फिरुन आमची झोपमोड करु देणार नाही. आणि तुम्हाला फिरायची इतकी हौसच असेल तर हे कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइल साखळ्याना लावा म्हणजे त्या असा आवाज करणार नाहीत.' आणि मंत्रीसाहेब शांतपणे ती कॅस्ट्ऱॉल इंजिन ऑइलची बाटली जमिनीवर ठेऊन परत झोपायला निघून गेले.

भूत काही क्षण संतापाने थरथरत उभं राहिलं आणि ती बाटली लाथाडून जिन्यावरुन उतरु लागलं. त्याच्या अंगातून हिरवा प्रकाश येत होता. भूत जिन्याच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं आणि तितक्यात......
जिन्यावर राहू केतू अवतरले आणि त्यांनी मोठी उशी भूतावर नेम धरुन फेकून मारली!! उमरावसाहेबांचं भूत बावचळलं आणि आपली अदृश्य व्हायची कला आठवत अदृश्य झालं. घर परत शांत झालं आणि राहू केतू झोपायला निघून गेले..

आपल्या गुप्त खोलीत येऊन भूताने सुटकेचा निश्वास सोडला आणि ते ताळ्यावर येऊ लागलं. भूताच्या ३०० वर्षांच्या उजळ कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला असा नामुश्कीचा प्रसंग आणि अपमान सहन करावा लागला होता. भूताच्या डोळ्यासमोरुन त्याचे ३०० वर्षातले कर्तृत्व सरकून गेले..

कधीकाळी विलासपूरची सरदारपत्नी भूताला पाहून किंचाळून बेशुद्ध पडली होती.. कधीकाळी एका आचाऱ्याने आत्महत्या केली होती स्वयंपाकघराच्या खिडकीवर टकटक करणारा हिरवा हात बघून.. कधीकाळी घरी आलेली एक श्रीमंत पाहुणी रात्री खुर्चीत एका सांगाड्याला बसलेलं पाहून सहा महिने अंथरुणाला खिळून होती.. घरातली प्रत्येक मोलकरिण पडद्यामागे भूताला पाहून नोकरी सोडून पळून गेली होती..भूताला हे सर्व सन्मान आठवले. 'घाबरवणं हीदेखील एक कला आहे' यावर भूताचा विश्वास होता आणि या कलेची जोपासना भूताने मेहनतीने आणि चिकाटीने ३०० वर्षे करुन या कलेत प्राविण्य मिळवलं होतं.. त्यासाठी निरनिराळ्या वेशभूषा अभ्यासपूर्वक केल्या होत्या..

आणि आज हे पाच दिडशहाणे मुंबईकर त्याच्या कर्तृत्वाला लायझॉलने धुवून त्याच्या अंगावर उशा फेकून मारत होते. भूत भयंकर संतापले. आजवरच्या इतिहासात कोणत्याच भूताला इतकी अपमानास्पद वागणूक नव्हती मिळाली. या अपमानाचा सूड घ्यायचाच हा निर्धार करुन भूत आराम करु लागलं.
सकाळी गप्पांत प्रमुख विषय हाच होता. कॅस्टऱॉल इंजिन ऑइलची देणगी भूताने अव्हेरल्यामुळे मंत्रीमहाशय चिडले होते. राहू केतू उशीचा प्रसंग रंगवून सांगत होते. मंत्रीमहाशय हसू दाबत म्हणाले, 'कितीही झालं तरी ते भूत ३०० वर्षं इथे राहतं आहे. त्याच्यावर उशा फेकून मारणं हे चांगले संस्कार नाहीत. अर्थात, त्याला जर कॅस्ट्रॉल ऑइलचा वापर करायचा नसेल तर आमचा नाईलाज आहे आणि आम्हाला त्याच्या गंजलेल्या साखळ्या हिसकावून घ्याव्या लागतील. किती आवाज येतो!!' आणि सर्वजण खो खो हसू लागले.

तो आठवडा तसा शांततेत गेला आणि काहीही विशेष प्रसंग घडला नाही. पण तो जमिनीवरचा डाग मात्र रोज पुसला तरी रोज परत अवतरत होता. आणि डागाचा बदलणारा रंग पण विचीत्रच होता. एक दिवस डाग विटकरी, एक दिवस पिवळा, एक दिवस नारिंगी, एक दिवस जांभळा. आणि शुक्रवारी तर चक्क पोपटी रंगाचा डाग होता!! डागाचा बदलता रंग देशमुख कुटुंबाचा चेष्टेचा विषय बनला होता. पण अमिता मात्र आता तो डाग पाहून अस्वथ होत होती..ज्या दिवशी डागाचा रंग हिरवा झाला त्यादिवशी ती खूपच अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती.

रविवारी रात्री अचानक 'धडाड!!' आवाजाने सर्व जागे झाले. बघतात तर काय, जिन्याच्या कोपऱ्यात ठेवलेला लोखंडी पुतळा खाली पडला होता आणि पुतळ्याला ठेचकाळलेलं भूत कळवळून गुडघा दाबत खुर्चीवर बसलं होतं. ही संधी साधून राहू केतू त्यांच्या गलोली घेऊन आले आणि त्यांनी भूतावर खड्यांचा वर्षाव केला. तितक्यात मंत्रीमहोदय जुनं पिस्तुल घेऊन आले आणि भूतावर ते रोखत गरजले, 'हँडस् अप!!' भूत चिडून जाऊ लागलं. जाता जाता जितेशच्या हातातली मेणबत्ती विझवायला ते विसरलं नाही.
जिन्यावर सुरक्षित जागी आल्यावर भूताने ठरवलं कि आज आपल्या सुप्रसिद्ध रौद्र हास्याचा पहिला प्रयोग करायचा यांना घाबरवायला. हे हास्य घाबरवण्याच्या परिक्षेत नेहमी हमखास यशस्वी ठरलं होतं. एका उमरावाचा काळा विग हे हास्य ऐकून पांढरा झाला होता. भूताने जास्तीत जास्त आवाज वाढवून एक भयानक रौद्र हास्य केलं.

इतक्यात खोलीचं दार उघडून वत्सलाबाई डोळे चोळत बाहेर आल्या आणि त्रासिक आवाजात म्हणाल्या, 'तुमची तब्येत खराब झालेली दिसतेय. पोटात वायू आहे आणि डोकं पण ठिकाणावर नाही.अपचन वगैरे झालं असेल तर हे इनो फ़्रुटसॉल्ट पाण्यातून घ्या आणि झोपा. असा रात्री अपरात्री दंगा करु नका. हे सभ्य माणसाचं घर आहे.' भूत परत अंगातून हिरवा प्रकाश सोडून आपली एखादी भितीदायक वेशभूषा घेणार तितक्यात जिन्यावर पावलांचे आवाज ऐकू आले आणि ते घाबरुन राहू केतूच्या हातात परत सापडण्याआधी अदृश्य झालं..

परत काही दिवस भूताने फरशीवरच्या डागाव्यतीरिक्त आपलं अस्तित्व दाखवलं नाही. पण भूत आता जबरदस्त आणि भक्कम योजना आखत होतं. मुख्य बदला त्याला जितेश आणि राहू केतूवर घ्यायचा होता. जितेशने त्या डागाचा लायझॉल फासून रोज अपमान केला होता. 'एकदा या मुलांना घाबरवलं कि आपलं काम आपोआप होईल.' भूताने विचार केला. राहू केतूंचे पलंग एकमेकांशेजारी थोडं अंतर ठेऊन होते. दोन पलंगाच्या मधोमध हिरव्या रंगाचं भयानक प्रेत बनून काही मिनीटं उभं राहिलं तरी घाबरवण्याचं काम फत्ते होणार होतं.त्या दोघांची दातखीळ बसणार होती... अमिताशी भूताचं जास्त शत्रुत्व नसल्याने तिला जास्त घाबरवायचं नाही असं भूताने ठरवलं. तिला काय, थोडेफार पडदे वगैरे हलवून आणि रात्री विकटहास्य करुन पण घाबरवता येईल.

रात्री सर्वत्र निजानीज झाली. आणि भूत कामगिरीवर बाहेर निघालं. वादळी वारं होतं.. बाहेर घुबडाच्या घुत्कारण्याचा आवाज येत होता..

भूत जिन्यापाशी आले आणि..

भूताच्या समोर एक भयंकर आकृती उभी होती. तिचा चेहरा पांढराफटक, अंग पांढरंफटक आणि चेहऱ्यावर भयंकर हास्य थिजलेलं होतं. डोळे लालभडक होते. त्या आकृतीच्या छातीवर काही शब्द कोरलेले होते, पण भूताने ते वाचण्याचे वेडे धाडस केले नाही. 'भूत पाहणे' हा भितीदायक अनुभव भूताला नविन असल्याने ते किंचाळून तिथून पळून गेलं आणि धापा टाकत आपल्या खोलीत पोहचलं.

सारी रात्र भूताने जीव मुठीत धरुन आपल्या खोलीत काढली. पहाट होता होता भूताने धीर करुन परत त्या भूतापाशी जाण्याचा विचार केला. 'एक से दो भले' या नात्याने त्या भूताशी मैत्री करुन आपली शक्ती वाढवता येईल या विचारात भूत जिन्यापाशी पोहचलं आणि..

रात्री भूताने पाहिलेल्या त्या भूताची रया गेल्यासारखी वाटत होती. ते कोपऱ्यात मुरगळून पडलं होतं. भूताने धावत जाऊन त्या भूताला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या भूताचं डोकं घरंगळून फुटलं..गुंडाळलेला पांढरा पडदा पडला आणि स्वयंपाकघरातला उंच झाडू त्यातून प्रकट झाला. शेजारी कागद चुरगळून पडला होता. त्याच्यावर लिहीलं होतं '१००% आयएसआय मार्क ओरिजिनल भूत. नकलांपासून सावधान.'

भूताने रागाने किंकाळी फोडली. राहू केतूने झाडूला कापड गुंडाळून भूताला हातोहात मूर्ख बनवलं होतं. 'या खानदानाचा सत्यनाश करेन!!!' डोळे गरागरा फिरवत भूताने भूतांच्या गाईडमधे वर्णिलेली मुद्रा करुन प्रतिज्ञा केली. आणि ते त्याच्या शवपेटीत झोपायला गेलं, कारण सकाळ व्हायची भयप्रद चिन्हं दिसू लागली होती..

दुसऱ्या दिवशी भूताला खूप थकवा आला होता. एकंदरीतच मागच्या महिन्यातील घटना आणि मानसिक ताण यामुळे त्याची प्रकृती खालावलीच होती. पुढचे पाच दिवस भूताने लोळून काढले. त्याचे फरशीवरचा डाग बनवण्याचे काम पण त्याने आता सोडून दिले होते. 'रोज लायझॉलमधे फरशीला बुडवणारे हे क्षुद्र जीव तो डाग मिळवण्याच्या लायकीचेच नाहीत.' भूत पडल्या पडल्या विचार करत होते. पण असं पडून किती दिवस राहणार? किमान आठवड्यातून दोनदा घरात वावरुन लोकांना घाबरवणं हे भूताचं कर्तव्य होतं. पण ती खोडकर कार्टी नाही म्हटलं तरी त्याला घाबरवून जात होती.

पुढचे तीन आठवडे भूत कर्तव्यपूर्तीसाठी रात्री हवेलीत फिरले. पण त्याने पूर्ण सावधगिरी बाळगली होती. चपला काढून त्या हातात घेउन ते चाले आणि साखळ्यांनाही त्याने कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल लावून व्यवस्थित आवाजरहित केले होते. पण इतकं करुनही राहूकेतूंनी एक दिवस जिन्याच्या दोन्ही बाजूना दोरी ताणून बांधून ठेवली आणि भूताने पायऱ्यांवरुन गडगडत सपशेल लोटांगण घातले. खाली ठेवलेल्या अमूल बटरच्या लादीवरुन जोरात घसरुन लंगडत लंगडत भूत खोलीत पोहचले. सूडाच्या आगीने ते जळत होते. शेवटी भूताने अनेक बक्षिसं मिळवलेला आपला 'बिनशिऱ्या' हा पोशाख काढला.
रात्री सर्व झोपल्याची खात्री करुन भूताने आपली वेशभूषा केली. राहू केतूंच्या खोलीचे दार त्याने हलकेच उघडले आणि ..

दारावर ठेवलेला पाण्याचा भरलेला जग भूताच्या अंगावर उपडा झाला आणि ते नखशिखांत भिजले. समोरुन त्याला राहू केतूंचे पोट धरधरुन हास्य ऐकू आले. आणि भूत मागल्या पावली पळाले.
भूताची प्रकृती फारच ढासळली होती. गळ्याला मफलर बांधून ते दिवसरात्र खोलीत पडून राहायचे.

त्या दिवशी अमिता घरी उशिरा आली आणि लपतछपत मागच्या जिन्याने घरात शिरली. भूताच्या खोलीवरुन जात असताना तिने पाहिले कि दार उघडे होते. आत पडलेले भूत फारच अशक्त आणि दयनीय दिसत होते. अधूनमधून ते सांधेदुखीमुळे कण्हत होते. अमिताला दया आली. ती खोलीत शिरली.
'तुमची अवस्था बघून मला वाईट वाटतं. पण घाबरु नका, उद्या माझे भाऊ बाहेर जाणार आहेत आणि पूर्ण दिवस तुम्हाला कोणाचीच भिती नाही. पण हेही खरं कि तुम्ही जर नीट वागला असतात तर कोणीच तुम्हाला त्रास दिला नसता.'
भूताचा आवाज चढला. 'मूर्ख मुली, 'मी नीट वागायचं'?? मी नीटच वागतो आहे.हे सर्व प्रकरण सुरु तुझ्या त्या लायझॉलवाल्या भावाने केलं. आणि ती दोन नतद्रष्ट कार्टी, त्यांना मोठ्या माणसाशी, सॉरी भूताशी कसं वागायचं ते संस्कारच नाहीत. मुंबईची आगाऊ बिघडलेली पोरं!!'

'कोण बिघडलं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही तो भिकारडा फरशीवरचा डाग रंगवायला माझ्या रंगपेटीतले रंग चोरता. आधी सर्व लाल रंगाच्या छटा चोरल्यात. मला आता सूर्योद्याचे देखावे रंगवता येत नाहीत. नंतर पिवळा.जांभळा..शेवटचा पोपटी रंगसुद्धा चोरलात. आता माझ्याकडे फक्त पांढरा आणि काळा उरलेत. काय हा मूर्खपणा? हिरव्या रंगाचं रक्त पाहिलंय का कुणी? आणि रोज रक्ताचा डाग ताजा ठेवण्याची इतकीच हौस आहे तर माझे रंग का चोरता? खरं रक्त आणता नाही येत तुम्हाला?' अमिताने चिडून सरबत्ती सुरु केली.

भूत जरा वरमले. 'मी तरी काय करणार? आजकाल रक्त मिळणं किती कठिण झालं आहे. तुझ्या त्या आगाऊ भावाने लायझॉल वापरुन मला आव्हान दिलं म्हणून मला हे सर्व करावं लागलं.'

'तुम्ही या घरातून निघून जा. आम्ही आता इथे राहतो. वाटलं तर मुंबईत जा. तिथे लोक भूत बघायला आणि घरी ठेवायला कितीही पैसे द्यायला तयार होतील. देव दूध पितो म्हणून त्यांनी कितीतरी दूध आणि वेळ वाया घालवला होता. भूतासाठी तर अजून वेडे होतील.'

'आता या उतारवयात मला कुठेही जायचं नाही. मुंबईत तर मुळीच नाही.'
'ठिक आहे, मी राहूकेतूंना अजून एक आठवडा सुटी घेऊन घरी रहायला सांगते.'
'नाही, थांब अमिता, असं नको करुस. मी खूप थकलो आअहे. मला आता शांत झोप हवी आहे पण तीपण मिळत नाही. तीनशे वर्षांपासून मी जागा आहे आणि आता मला विश्रांती हवी आहे.'
'बिचारं भूत!! तुम्ही झोपू शकत नाही का?'

'एक जागा आहे जिथे मला शांत झोप लागेल. तिथे तारे असतील आणि देवदूत गाणं गात असतील. मी आजपर्यंत खूप पापं केली आहेत. जोपर्यंत कोणी निर्मळ मनाने मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा करत नाही आणि माझ्यासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करत नाही तोपर्यंत मला मुक्ती नाही.' भूताचे डोळे पाणावले.
भूताची अवस्था बघून अमिताच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, 'मी प्रार्थना करेन तुमच्यासाठी.' आणि ती डोळे मिटून पुटपुटली,'हे परमेश्वरा,यांना यांची पापं माफ कर. त्यांनी भरपूर फळं भोगली आहेत तीनशे वर्षे. आता त्यांना तुझ्या दारी आश्रय दे.'

आणि भूत हळूहळू विरळ होऊ लागलं. 'मुली, तुझे असंख्य आभार!' असं म्हणून ते नाहीसं झालं.
वत्सलाबाई अमिताला घरभर शोधत होत्या. शोधत शोधत त्या रिकाम्या खोलीत आल्या, तर अमिता डोळे मिटून बसली होती. आणि शेजारी चिमूटभर राख पडली होती. उमरावसाहेबांच्या भूताला अखेर मुक्ती मिळाली होती.....


-समाप्त-
(ऑस्कर वाइल्डच्या 'कँटरव्हिलेज घोस्ट' चे मराठीकरण)
-अनुराधा कुलकर्णी

Tuesday, 6 March 2007

जा. भू. म.(जागतिक भूत महासभा)

मुळात 'कशांलां तें जागतिक नि फागतिक? आपलां हिंदुस्थान बरा नि आंपण बरें' ही ब्रह्मराक्षसाची ठाम भूमिका होती. 'कुठली कोण ती किरीस्तावी भुतं बोलवायची नि आपल्या पंगतीलां बसवायची???ती मनुष्यमांस आणि मच्छी खाणांर..मद्य पिणांर..बुटं घालून मेजाखुर्च्यांवर बसणांर..घोर भ्रष्टाकार!!'

'आऊटसोर्सिंगचं युग आहे. पुढे मागे आपल्याला परदेशात सेटल व्हायला त्यांची गरज पडेलच.इथे भारतात माणसं एक एक फूट जागा तीन तीन हजाराला विकतायत. जंगलं नाहीशी होतायत. जी बाकी आहेत तिथे परदेशी माणसं अर्ध्या चड्ड्या घालून गळ्यात क्यामेरे लटकवत फिरतायत. गावांचे गावपण नष्ट होते आहे. ओसाड जुने वाडे आणि बंगले औषधालाही राहिले नाहीत. भूतांना भेडसावणारे भयाकारी मानवी गायक जोरजोरात गात आहेत 'झलक दिखलाँ जाँ'..मानवजातीच्या वेडेपणामुळे आपल्या भूतजगतावर आणिबाणीचा प्रसंग आहे. गरज आहे ती समस्त भूतजमातीने जात धर्म लिंग देश यांचे भेद विसरुन एकत्र व्हायची.गरज आहे ती या दिवसाच्या रखरखीत उजेडाचा नि:पात करुन एक नवी अंधारी रात्र आणण्याची.' मुंजा स्वत:ला 'या बोअर काकालोकांतला एकमेव नवतरुण' समजत असे. आतापण त्याने प्रभावी भाषण करुन सभेचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला.

'काय बोल्ला रे त्यो चिरकूट?' गिरा शेंडी चाचपत देवचाराला म्हणाला. गिऱ्याला 'ग्रामिन भागातील पर्तिनिधी' म्हणून बोलावलं असलं तरी सभेला येण्यामागचा त्याचा निम्मा उद्देश 'ग्रामिन भागातील म्हैला पर्तिनिधी' म्हणून बोलावलेल्या टंच हडळीशी ओळख वाढवणे हा होता. आताचं भाषण पण नेहमीप्रमाणे त्याच्या शेंडीवरुन गेलं होतं.
'तुका कांय करुक आंसां? गप ऱ्हंव!!' देवचार खेकसला. ब्रह्मराक्षसाच्या वक्तव्यामुळे मध्यरात्री जा.भू.म. च्या मधल्या सुट्टीत 'शुद्ध शाकाहारीं वरणभात,तूंप आणिं बटाट्यांची भाजी पुरी' हा भीषण पांचट आहार खावा लागणार याबद्दल खात्री होऊन त्याचा 'मूड' नुकताच कोकणात फिरायला गेला होता.

'पन म्यां काय म्हंतो, आपन बोलिवनं धाडूच त्या फ़्वारीनच्या मंडलींना. आन् त्यंच्याकडनं वर्गनी पन घीऊ हजार हजार रुपे.' खवीस अधिकारवाणीने म्हणाला.
'रुपये नाही हो काका. त्यांच्याकडे येन, डॉलर, युरो,दिनार अशी वेगळी चलनं असतात.' मुंज्याने 'शायनिंग' मारायची संधी सोडली नाही.
'ए प्वारा! उगी मधीमधी मधीमधी पचपच करायची न्हाय, त्वांड फोडीन ,सांगून ठेवतो!' खवीसाने बाह्या सरसावल्या. मुंजा मनातून घाबरला.

वेताळ पुढे सरसावला. 'आपला बहुमुल्य वेळ परस्परात लाथाळ्यात जातो आहे. रात्र सरते आहे. आता एक तासात उजाडेल. त्याच्या आधी जा.भू.म. चा आराखडा, मेनू,बजेट सगळं ठरवायचं आहे. बाहेरगावच्या भूतांना रस्त्यांवर वर्दळ सुरु होण्यापूर्वी आपापल्या झाडांवर जायचं आहे. सदस्यांना विनंती की त्यांनी कृपया आपल्या भूतकीला आव्हान देऊन मिळून मिसळून रहावे.'
'ओ आबा! तुमी मधी पडू नका हां! ह्यो आमचा प्रायवेट मामला हाय!म्या काय त्यो शामळू विक्रम न्हाय 'बरोबर उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाची शंभर शकलं होतील' ह्ये गपगुमान आयकून घ्येनारा.केसं पिकल्याली दिसतात म्हनून सबूरीनं सांगतो तुमास्नी.आनि आखाड्याच्या गोष्टी कोनाला आयकवून दाखिवता? या एकदा आखाड्यात, नाय तंगडं मोडून हातात दिलं तर जिनगीभर सरळ पायानं फिरंन!' खवीस हमरीतुमरीवर आला.

वेताळ वैतागला. 'पहा ब्रह्मराक्षसराव. हे असं आहे. ही आजच्या पिढीची भूतं कशी उर्मट झाली आहेत. वयानं मोठ्या भूतांचा आदर ठेवण्याची काही पद्धत आहे की नाही?आमच्या वेळी असं नव्हतं हो.आजच्या या जगात भूतकी म्हणून काही चीज राहिलीच नाही बघा.'

हडळ जांभया देत होती तिने केसाचा शेपटा पुढे घेतला आणि शेजारी बसलेल्या सटवाईच्या कानात कुजबुजली, 'या बया! काय ही पुरुष मानसं! फुकाची भांडत बसल्यात आन् तरी म्हंतात बाईमानसाची जात भांडखोर.'
'त्यांना जिवंत व्हऊदे तिकडं! तू कोनतं लुगडं नेसनार सभेला? म्या ह्येंना पैठनी घ्याया सांगनार हाय.' सटवाई तोंडातली मशेरी सांभाळत म्हणाली.
'शी! दिज विलेज पीपल!! आय डोंट वाँट टू बी विथ देम! हाउ एम्बॅरेसिंग!' कैदाशिणबाई नाक मुरडत पुटपुटल्या आणि त्यांनी पर्समधून छोटीशी रक्ताची डबी काढून आरशात बघून पटकन लिपस्टीक ठाकठीक केली.

'कृपया शांतता राखा.परदेशाचे प्रतिनीधी म्हणून ड्रॅक्युला आणि सौ. ड्रॅक्युला यांना बोलावण्याचा आमचे ज्येष्ठ सदस्य वेताळ यांचा प्रस्ताव मी अध्यक्ष या नात्याने मान्य करतो आहे.मेनू ठरवण्यासाठी एक समिती नेमून कैदाशिणबाईंना त्याची पूर्ण जबाबदारी सोपवली गेली आहे.तसेच वर्गणीची रक्कम ठरवण्यासाठी आणि गोळा करण्याची जबाबदारी मी खवीसरावांकडे सोपवतो.आता राहिला प्रश्न महासभेसाठी कोणती रात्र ठरवायची हा. तसं म्हटलं तर कोणतीही अमावस्येची शुभरात्र चालेल.'
ब्रह्मराक्षस अधिकारवाणीने म्हणाला.

गिरा शेंडीला पीळ देत पुटपुटला 'ए अध्यक्षभौ! सगल्याला समित्या केल्या तर तू सोता काय काम करनार?'
'हांव सांगतंय तुका, सगली वशिल्याची तट्टं आसां! तुका न् माका काय काम ना!' देवचार चिडून म्हणाला.दिवस उजाडण्याची लक्षणं दिसू लागल्याने तो झोपेने पेंगुळला होता.

अखेर सर्वपित्री अमावस्येची रात्र सर्वानुमते ठरली. ड्रॅक्युलारावांना सहकुटुंब आमंत्रण रवाना झालं.
'आता त्या दाताड्याला विमानतळावर आणायला कोण जाणार?'
'मी जातो. मला चांगलं इंग्लिश येतं. मी फोकाटेचा 'पाच रात्रीत फाडफाड इंग्लिश' चा कोर्स केला आहे.'

संध्याकाळचा गजर लावून लवकर उठून मुंजा विमानतळावर गेला. ड्रॅक्युला आणि ड्रॅक्युलीणबाई समोर आल्याच विमान उतरल्या उतरल्या.
'हेय! इश बिन ड्रॅक्युला. वी गेट एस इनन?' ड्रॅक्युला म्हणाला.
'हाय, हाउ आर यु,ग्लॅड टू मीट यू' आदी आंग्ल वाक्ये सफाईदारपणे पाठ करुन गेलेल्या मुंजाची विकेट उडाली. 'बोंबला! हा गोरा मूळचा हंगेरीचा आहे नाही का? आता जर्मन कोण बोलणार? आणि हा वेडा काय बोलतो कसं कळणार?'
'इंग्लिश,इंग्लिश!' मुंजा धापा टाकत म्हणाला.
'आक्जो! एंग्लिश स्प्राखं? ओ, आय स्पीक आइनबिसीयन एंग्लिश. अबर आय ट्राय.'
गोऱ्या पाहुण्याशी फाडफाड इंग्रजीत गप्पा मारुन सर्व भूतांवर 'इंपो' टाकण्याच्या मुंजाच्या स्वप्नाला टाचणी लागली. तो न बोलता ड्रॅक्युला दांपत्याला सभेच्या ओसाड वाड्यात घेऊन आला.

ड्रॅक्युलीणबाईंनी खास शिवलेला काळा चिमुकला पाठरहित गाऊन बघून हडळीने नाक उडवलं.
'या बया!! ही गोरी बाय काय चिंधूकं घालून आलीया? समदी पाट उघडी. शोभतं का' बाप्याभूतांसमूऱ?
कैदाशिणबाई खास सभेसाठी शिवलेला काळाकुट्ट शरारा घालून आल्या होत्या. पण सगळी भूतपुरुषमंडळी ड्रॅक्युलीणबाईकडेच बघत होती. खंत मनात लपवून कैदाशिणबाई ड्रॅक्युलीणबाईला कपड्याकडे इशारा करुनम्हणाल्या, 'युवर ड्रेस इज व्हेरी नाईस.' (पुढेमागे 'मेड इन परदेश' रक्ताच्या लिपस्टीक आणि अस्सल मनुष्यचामड्याच्या उलट्या चपला हिच्याकडून मागवता येतील ही दूरदृष्टी त्या ठेवून होत्या.)
'ओह! इश डांकं डीर!' ड्रॅक्युलीणबाई शुभ्र लांबसडक दात विचकत म्हणाली.

'येडीच दिसते बया! कापडाचं कवतिक केलं तर 'इश्श' म्हनून दीराचा इषय काढती!दीराशी लफडं हाय का बयेचं?' सटवाई हडळीच्या कानात कुजबुजली. सटवाईच्या लालभडक पैठणीची शान पण ड्रॅक्युलीणबाईच्या तुटपुंज्या पोशाखाने गेल्याने ती नाराज होती.

ड्रॅक्युला पिण्याच्या इतमामाकडे घुटमळत होता. 'आय विल लाईक रेड वाईन बिफोर इटींग.'
खवीस 'तळे राखी तो पाणी चाखी' या न्यायाने सर्व पेये स्वत:च्या घशाखाली उतरवून बघत होता.
'ए फ्वारीन! नो रेड वाईन! हिथं फकस्त ताक, रगत आनि हातभट्टी मिळंल. ' तो म्हणाला.
'व्हॉट इस्त हाटबाटी?'
'हातभट्टी म्हंजी विंग्लीश्मधी ह्यांड ओव्हन! ' खवीसाने आपल्या महान आंग्लभाषेने ड्रॅक्युलाला बुचकळ्यात पाडलं.
ड्रॅक्युलाने निमूटपणे आपल्या पिशवीतून आणलेली घरच्या रक्ताची छोटी बाटली तोंडाला लावली.

वेताळ भाषण करु लागला. ('नाहीतरी आजोबा एरवी पण उपदेशाचे डोसच पाजत फिरत असतात. आणि वेगळ्या भाषणाची काय गरज आहे?' मुंजा शेजारी बसलेल्या ब्रह्मसमंधाला म्हणाला.)
'आज आपला भूतसमाज शोषित आहे, पीडीत आहे,दिशाहीन आहे. मानवजातीकडून त्यांची पिळवणूक होते आहे. मांत्रिकवाद वाढत जाऊन भूतांचं अस्तित्व धोक्यात आहे.जंगलं नष्ट होत चालली आहेत.मानवजातीतील नारायण धारप, रत्नाकर मतकरी सारखे रक्तपिपासू लेखक आपल्या मनोरंजनासाठी भूतांना विनामूल्य राबवत आहेत. त्यांनी 'भूतकाळ' हा शब्द आपल्या भाषेत वापरुन भूतांचा बहुमूल्य वेळ कित्येकदा वाया घालवला आहे. प्लँचेटसारखे पोरकट प्रकार करुन भूतांना बोलावून उगीचच प्रश्न विचारुन त्यांचा मानसिक छळ केला आहे. आज आपण प्रतिज्ञा करुया की या अन्यायाचा शक्य तितका प्रतिकार करु.हा अज्ञानाचा प्रकाश दूर होऊन ज्ञानाचा अंध:कार पसरवू.'

वेताळाचे भाषण चालू असतानाच एक अनाहूत पाहुणा दारात आला. त्याची भेदक नजर सर्वांवरुन फिरत होती. काय होते त्याच्यात काय माहिती, त्याच्या डोळ्यात पाहिले की भूतांच्या काळजात एक अनामिक भीती दाटत होती.
'तुमच्याकडे आमंत्रणपत्र आहे का?' मुंज्याने घाबरत घाबरत विचारले.
पाहुणा घोगऱ्या आवाजात म्हणाला, 'मला आमंत्रणाची गरज पडत नाही.जिथे जिथे भूतं तिथे मी.भूतांशी माझा फार जवळचा संबंध आहे.'
वेताळाने आवंढा गिळत विचारलं, 'पण तुम्ही आहात तरी कोण?'

गडगडाटी हास्य करत पाहुण्याने आपले सरळ पाय दाखवले आणि म्हणाला, 'मी रामसे.' आणि त्याने खिशातून चलतचित्र कॅमेरा काढला. हडळ किंचाळून बेशुद्ध पडली. आणि सर्व भूतं जिवानिशी पळत सुटली आणि अशाप्रकारे काहीही ठराव संमत न होता दारुणरित्या जा. भू. म. बरखास्त झाली!!

(समाप्त)
-अनुराधा कुलकर्णी