या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Wednesday 3 October 2018

स्टिकरयातनानुभव

चांगली 2 ऑक्टोबर ची सुट्टी, दुपारी आराम करायची संधी सोडून आम्ही तिघे हातात कटर, ओट्यावरचे पाणी ढकलायचा झाडू,शेजारून उसनी घेतलेली कोणत्या तरी दुकानात फुकट मिळालेली मापन पट्टी घेऊन फ्रीज ला भिडलो होतो.

हा विषय चालू झाला तो 'फ्रीज पेंट करावा की त्याला स्टिकर लावावा' या ऑनलाइन घडलेल्या चर्चेवरून.कोणीतरी दिलेल्या अमेझॉन च्या लिंक वर सुंदर सुंदर फ्रीज स्टिकर बघायला मिळाले.एकावर लिंबू, दुसऱ्यावर स्ट्रॉबेरी, तिसऱ्यावर कॉफीबिया, चौथ्यावर पाणी आणि त्यात विहार करणारे हंस,पाचव्यावर जंगल अशी मोहक खैरात होती.

'पण स्टिकर का?नवा घेऊ शकतो ना फ्रीज? 13 वर्षं झाली याला.'
'शू, असं बोलायचं नाही.त्या बिचाऱ्याने ऐकलं तर त्याला कसं वाटेल?आपली स्कुटी आपण 11 वर्षं आणि 50000 किलोमीटर चालवून 12000 मध्ये विकली.आपली कार आपण 9 वर्षं चालवून विकली.फ्रीज आणि वॉशिंग मशीन 2005 चं आहे.किमान 2020 पर्यंत तरी चालवायला नको का?परत मिळतात का अशी यंत्रं?काय करायचेत स्टील चे दरवाजे नि 2 भाज्यांचे ड्रॉवर?आतलं यंत्र 4 वर्षात बिनकामी झालं तर?फ्रीज बदलायचा नाही.जोवर त्याला दारं जोडलेली आहेत आणि वस्तू गार होतात तोवर तर अजिबात नाही म्हणजे नाही.स्टिकर ने फ्रेश लूक येईल.'
'उंची मोजणारा हत्ती विसरलीस का?'

इथे डोळ्यासमोर लाटा येऊन मन फ्लॅशबॅक मध्ये गेलं.
5 वर्षांपूर्वी असाच हौसेने उंची मोजणारा हत्ती स्टिकर ऑनलाइन मागवला होता.हत्ती, उंचीच्या खुणा,भोवती 5 उडणारे पक्षी,हिरवळ आणि 1 झाड असा सेट फोटोत दिसत होता.
आता सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसांचा असा समज होईल की हे सगळं एक किंवा दोन प्लॅस्टिक शीट च्या पार्श्वभूमीवर काढलेलं असेल आणि माणसाला भिंतीवर 2 आयताकृती कागद एकाखाली एक चिकटवायचे असतील.तसा विचार करत असाल तर तुम्ही अज्ञ आहात.त्या सेट मध्ये 75 तुकडे होते.हत्तीचे 7 तुकडे(कसे ते आता आठवत नाही, सोंड एक तुकडा, ढु एक तुकडा,पोट 3 तुकडे, पाय 2 तुकडे असे काही गणित होते.),इंचाचे 8 तुकडे, पक्षी 5 तुकडे,प्रत्येक पक्ष्याभोवती हिरवळ 5 तुकडे असा जगव्यापी सरंजाम.आता काही छिद्रान्वेषी मंडळी म्हणतील की यांची बेरीज 75 होतच नाही मुळी.75 तुकडे चिकटवल्यावर परत बरोबर बेरीज पण करेन अशी अपेक्षा असेल तर ती मानवी हक्कांची पायमल्ली आहे.

तर हत्तीची सोंड जमिनी पासून 115 सेंटीमीटर वर येत नाही हे प्रथमदर्शनी कॉमन सेन्स ने जाणवणे, मग आधी सेंटीमीटर खुणा पट्टीने मोजून योग्य जागी चिकटवणे, मग हत्तीचं पोट तिरकं न करता,पोट एकमेकांवर येऊ न देता,पोटात फट न पाडता 3 तुकडे नीट जोडून टाके घालणे(सॉरी हात फिरवणे),हत्तीचे पाय जमिनीपासून 5 इंच वर जोडणे, हत्तीला शिंक येऊन सोंडेतून पक्षी बाहेर पडल्या सारखे पक्षी चिकटवणे,प्रत्येक पक्षी भोवती हिरवळ चिकटवणे,नंतर शेवटच्या पक्ष्याची हिरवळ दाराबाहेर गेल्याने अर्धी कापणे हे सर्व गणित एका नवरा नावाच्या प्राण्याला करावं लागलं तर यावरून किंचित भांडणं होऊन पुढचे काही दिवस स्वप्नात उंची मोजणारा हत्ती दिसणे साहजिक आहे.काही माहितगार शॉपिंगबाज व्यक्तीना मी त्या हत्तीखाली कळवळून लिहिलेला रिव्ह्यू पण सापडेल ज्यात 'हत्तीसारखा जड प्राणी जमिनीपासून 5 इंच वर लटकावत ठेवावा ही मूर्ख कल्पना कोणाची?' वगैरे अर्थाची जळजळीत वाक्य वाचायला मिळतील.

लाटा परत.बॅक फ्रॉम फ्लॅशबॅक.
'यावेळी उंची मोजणाऱ्या हत्ती सारखं नाही होणार.एकच स्टिकर असेल.'
'ठीक आहे.मागव, पण यावेळी नीट प्लॅन करून लावायचा स्टिकर.'

तर मी कॉफीबिन, पाण्यात पोहणारे हंस वगैरे कडे वळले.स्वस्त पण होते.पण कोणत्याही कंपनीचे मालक मेले हिंजवडीत किंवा सौदागर मध्ये डिलिव्हरी करत नव्हते.हिंजवडीत डिलिव्हरी नाही???(इथे धक्का बसलेल्या चेहऱ्यावर 3 वेळा कॅमेरा आणि ढाण असे 3 दा पार्श्वसंगीत.) 'अरे तुमच्या सारख्यानी असं केलं तर मोठ्या मोठ्या कंपनीत 10 तास काढणाऱ्या, नंतर रोज 3 तास हिंजवडीतून आपल्या हडपसरी किंवा कोथरुडी निवासात पोहचायला काढणाऱ्या, आयुष्यात लागणाऱ्या रुमालापासून चड्डीपासून ते डायपर पर्यंत सर्व गोष्टी ऑनलाइन विकत घेणाऱ्या लोकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं?कोणाच्या?(प्रतिध्वनी)' स्वगत आटोपतं घेऊन आधी एरिया डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या शोधल्या.त्या कंपन्या फ्रीज स्टिकर विकतात का ते पाहिलं.एक कंपनी विकत होती, पण फारच विविधरंगी डिझाइन होतं.ते चिकटवल्यावर फ्रीज उत्तरेकडच्या रंगपंचमीत रस्त्यावर सापडल्या सारखा दिसणार होता.पण कंपनी डिलिव्हरी देत होती.'हातात सापडलेला एक पक्षी रानात लांब असलेल्या 2 पक्ष्यांपेक्षा नेहमी बरा' ही म्हण आठवून पटकन मागवून टाकले.

स्टिकर आला.तो 5 फुटी फ्रीज चा नसून 8 फुटी पूर्ण दरवाज्याचा आहे.पण 'जे का दूरच्या दारी| तेथे करी सामानी डिलिव्हरी| तोचि साधू ओळखावा| पैसा तेथेचि द्यावा||' म्हणून हा मोठा वालाच चालवून घेणार होतो.आधी ती प्रचंड गुंडाळी सोडवताच येईना.डिझाईन कसं आहे बघू म्हणून उलगडायला जावे आणि कागद सटकून मांडीवर आपटावा असं झाल्यावर 2 मेम्बराना 2 टोकावर बसवून कागद उलगडला.डिझाईन फारच भयाण रंगीबेरंगी होतं.नारायण धारप भयकथा वाचलेल्याना त्यात अमूर्त घातकपणाचा निर्यास सोडणारे अमानवी आकार आणि बाकी आम जनतेला पिकासो आणि व्हॅन गॉग वगैरे मंडळींची नवचित्रं दिसत होती.

'तुला सांगत होतो.ही कामं प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायची असतात.वॉलपेपर्स चिकटवणारे वगैरे.'
'पण मग ते प्रोफेशनल बनेपर्यंत त्यांनी किती वॉलपेपर ची नासाडी केली असेल?'
'एकही नाही.जेव्हा हातावर पोट असतं तेव्हा त्या हातांना चुका करण्याचा अधिकारच नसतो.लहानपणापासून आयुष्याच्या तव्यावर बोटं पोळत ते कामाच्या सुंदर भाकऱ्या बनवत असतात.'
(स्वगत: अरे देवा!! हा प्राणी किती सेंटी मारतो!! खरंच फ्रीज ला रंग देणाऱ्या कडे सोडणं परवडलं असतं.)

फ्रीज ची मापं घेण्याचं काम ज्या मेंबर ला दिलं होतं तो लांबी इंचात, रुंदी सेंटीमीटर मध्ये लिहून गोंधळ वाढवत होता.एकंदर ती मापं वापरून कागदावर खुणा केल्यावर ही फ्रीज ची नसून सिग्नल च्या खोक्याची मापं बनतायत असा शोध लागला.मग पेपर कापण्यापूर्वी परत एकदा मापं घेऊन खुणा केल्या.

फ्रीज वर तो स्टिकर चिकटवणं हे एक वेगळंच अग्निदिव्य.तो स्टिकर कागद काढल्या काढल्या चारुदत्ताला भेटणाऱ्या वसंतसेनेच्या आतुरतेने जे समोर दिसेल त्याला चिकटतो.मग एका मेम्बर ने गुंडाळी धरणे.दुसऱ्याने उभं राहून कागद उलगडणे. तिसऱ्या मेंबर ने मध्ये मध्ये नाचत सूचना देणे, हे सर्व झाल्यावर हा कागद चिकटवून झाला.उभं राहून अभिमानाने त्याच्याकडे बघताना जाणवलं की या कागदावर 'माय नेम इज केशव पुट्टी, बिर्ला व्हाइट वॉल पुट्टी करे पपडी की छुट्टी' जाहिरातीतल्या भिंतीसारखे असंख्य फुगे आले आहेत.यापेक्षा उंची मोजणारा हत्ती बरा होता की.निदान बिघडला तर 75 पैकी एक तुकडा बिघडत होता.इथे म्हणजे एकच एक मोठा स्टिकर. 'चुकीला माफी नाही.'

'थांब थांब.लाकडी उलथनं आण. आणि काच साफ करायचा मोठा मॉप.'
आता आम्ही लाकडी उलथनं, मॉप यांनी तो स्टिकर सपाट करून करून त्यात राहिलेले हवेचे फुगे एकमेकांना चिकटवणं, मग तो मोठा झालेला फुगा अजून दाबून ढकलत कडेला नेऊन त्यातली हवा काढणं हे काम करायला लागलो.या प्रोसेस मध्ये कधीकधी फुगा दबून कागदालाच सुरकुती पडते आणि तो '6 साईन्स ऑफ एजिंग' घालवणाऱ्या क्रीम मधल्या बाईच्या क्रीम लावण्या आधीच्या थोबाडासारखा दिसायला लागतो.

'अरे, आपण सगळ्या फुग्याना टाचणी ने भोक पाडुया का? सगळी हवा जाईल.'
'आणि पेपर भोकं भोकं वाला दिसेल.'
'मग आता काय बेनेडिक्ट कंबरबॅच च्या चेहऱ्यासारखा गुळगुळीत दिसतोय का पेपर?'
'उंची मोजणारा हत्ती मी पूर्ण लावला होता.आता ब्रश ने फुगे घालवायची आयडिया माझी आहे.फ्रीज च्या उरलेल्या 2 भिंतींना स्टिकर तू एकटी लावणार आहेस.अत्यंत पुअर प्लॅनिंग आहे तुझं.'
'मी रंग द्यायचं म्हणत होते.रंग देऊ नको म्हणणारा तू आहेस.उरलेल्या 2 भिंतींसाठी सपोर्ट देणं ही तुझी नैतिक जबाबदारी आहे.'
'माझी नैतिकता तू नवा फ्रीज घ्यायला नाही म्हटलं तिथेच पळून गेली.आता तू आणि तुझे स्टिकर काय वाटेल तो गोंधळ घाला.'

त्यामुळे आता फ्रीज ला 1 फुगेवाली रंगीत भिंत आणि 2 पांढऱ्या मळकट भिंती आहेत.त्यातली एक उद्या रंगीत फुगेवाली होईल.येताय का खालून पेपर धरायला?

3 comments:

Anonymous said...

ashakya hasale :) :)

A Kulkarni said...

Maze bhintila lavalele sticker athavale!! Pharach bhari lihila ahes, Anu!

Anamika said...

Bharrriiiiiiii...pu la Deshpande nantar pahilyannda nikhal vinodi likhan vachala....pustak kadhala tar pahila copy mala