या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 12 September 2016

शेरलॉक होम्स साकारणारा शापित यक्ष

१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला आज २१ वर्षं होतील.अजूनही रामानंद सागर महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
 
आर्थर कॉनन डॉयल च्या या पात्राने अनेक निर्मात्या दिग्दर्शकांना आव्हान दिले.शेरलॉक होम्स स्टेज आणि मोठ्या छोट्या पडद्यावर अनेकांनी साकारला.यात सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवलेले सादरीकरण ग्रॅनडा टेलिव्हिजन च्या शेरलॉक होम्स चे.प्रचंड खर्च, मेहनत आणि पूर्वतयारीनिशी ग्रॅनडा ने शेरलॉक होम्स आणि वॊटसन चा व्हीक्टॉरियन इंग्लंड चा काळ जिवंत केला.त्या घोडागाड्या, ब्रॉअम(छोटी घोडागाडी),वीज नसल्याने मेणबत्त्या आणि कंदील हातात घेऊन सर्वत्र फिरणारी माणसं,बारीक कमरेच्या पेल्पम(वेस्ट लाईन ला पूर्ण कपड्याच्या रंगाची उठावदार झालर असलेली ड्रेस किंवा स्कर्ट टॉप ची फॅशन) ड्रेस आणि डोक्यावर फुलांची हॅट किंवा बॉनेट वाल्या 'संकटातल्या सुंदऱ्या'(डॅम्सेल इन डिस्ट्रेस),शहरात रेशमी अस्तरवाली उंच टॉप हॅट आणि गावाकडे गेल्यावर डिअर स्टॅकर कॅप घालणारी आणि सर्वत्र वेस्टकोट, खिश्यात सोनेरी पॉकेट वॊच,वर लांब फ्रॉक कोट मध्ये फिरणारी माणसं हे सर्व बघायला खूप रोचक आहे.त्या काळातल्या वाफेची इंजिनं आणि प्रत्येक कुपेला स्टेशनवरून चढण्यासाठी स्वतंत्र दार असलेल्या आगगाड्या,काळ्या ड्रेस वर पांढरा ऍप्रन बांधून टोपीसदृश स्कार्फ चे दोन पट्टे केसावरून मागे सोडलेल्या पार्लरमेड,मोठी मोठी ऐसपैस लॉन्स असलेली घरं हे सर्व पाहून 'एकदा तरी त्या काळात जन्माला येऊन इंग्लंड ला जायला पाहिजे होतं राव' असं नक्की वाटून जातं.
ग्रॅनडा टेलिव्हिजन्स निर्मित शेरलॉक होम्स सर्वात आधी पाहिला तो कॉलेजात असताना हिस्टरी चॅनल वर हिंदी डबिंग सह.कोणीतरी हल्ला करणार या भीतीत होम्स कडे आलेल्या गृहस्थाने पूर्ण कथा सांगितल्यावर त्याच्याकडे रोखून बघून थंड शांतपणे 'मुझे सच बताईये'(टेल मी द ट्रुथ) म्हणून त्याने खरी गोष्ट सांगितल्याशिवाय त्याला कोणतीहि मदत न करणारा होम्स.आणि तेव्हा पासून आणि कोणताही माणूस होम्स म्हणून पाहणे डोळ्याला पटणारच नाही.मन ही मन मैने उसको अपना होम्स मान लिया.
आर्थर कॉनन डॉयल ने साकारलेला हा 'प्रायव्हेट कन्सल्टिंग डिटेक्टिव्ह' त्याच्या पुस्तकामध्ये दिसतो तो असा: कृष, काटक, थोड्या पांढरट निस्तेज त्वचेचा(अर्थातच कामाच्या नादात जेवणाखाणाच्या आणि झोपेच्या वेळा कधीच पाळत नसल्याने),भेदक नजरेचा,थोड्या मोठ्या कपाळाचा,सरळ टोकदार नाकाचा आणि कोरीव चेहऱ्यामोहऱ्याचा. सिडनी पॅगेट ने डॉयल च्या कथांसाठी काढलेली चित्रं असा दिसणारा होम्स दाखवतात.हा होम्स जिवंत होतो तो शेरलॉक होम्स च्या जेरेमी ब्रेट ने साकारलेल्या, विशेषतः पहिल्या सीझन मधल्या भागातल्या होम्स ला पाहिल्यावर.जेरेमी ब्रेट चे शेवटी वळलेले पोपटनाक,कायम टापटीप असलेले वेगवेगळ्या रंगाचे वेस्टकोट आणि फ्रॉक कोटस,क्षणात परत गंभीर चेहरा धारण करणारी त्याची प्रसिद्ध 'नॅनोसेकंड स्माईल्स',रेखीव आणि सगळीकडे समान मांस असलेला देखणा चेहरा,प्रचंड चपळ हालचाली(जेरेमी ब्रेट ची एका भागात सोफ्याच्या पाठीवरून वॅटसन ला परत बोलावून आणायला मारलेली उडी पाहिली तरी पटतं की तो या भूमिकेत अक्षरशः झोकून द्यायचा.),ते फ्रॉक कोट फलकारून बाजूला करून मग एखाद्या स्टुलावर बसणं,केस डोळे मिटून ऐकत असताना मध्येच डोळे उघडून एखाद्या सुंदरीला 'प्रे कंटीन्यू' सांगणं(म्हणजे तशी आधीपासून ती कंटीन्यूअसच बडबडत असते, श्वास घ्यायला थांबते त्या वेळात हा शहाणा हे वाक्य म्हणतो),चालत्या घोडागाडीत उडी मारून बसणं,बॉक्सिंग ची एक विशिष्ठ लकब,कोण्या गुंडाशी अचानक मारामारी करावी लागून नेहमी जेलने चप्प बसवलेले केस विस्कटलेले हे सर्व पाहणं हा नितांत आनंद आहे.याला पाहिलं की मग मला भारतातल्या नायकांना रक्ताने पत्र लिहिणाऱ्या किंवा एकदा पाहायला मिळावं घरात चोरासारखं घुसून मग अटक करवून घेणाऱ्या फॅन्स च्या कथा अती वाटत नाहीत.ज्या काळात जगला त्या काळात हा प्राणी पण फॅन्स ना याच उत्कटतेने आवडत असेल.

जेरेमी ने शेरलॉक च्या भूमिके साठी प्रचंड मेहनत घेतली.६ किलो वजन कमी केलं आणि केसही वाढवले.शेरलॉक होम्स चे एपिसोड हे जवळ जवळ १००% डॉयलच्या मूळ कथेशी प्रामाणिक असावेत हा त्याचा आग्रह असायचा.शेरलॉक नक्की कसा होता,अमुक प्रसंगी तो कसा वागला असता,त्याच्या मनात एखाद्या प्रसंगाच्या वेळी काय विचार असतील,त्याचा डॉयल ने न लिहिलेला भूतकाळ कसा असू शकेल यावर जेरेमी सतत विचार करायचा.शेरलॉक चं वागणं बोलणं सवयी यावर त्याने ७७ पानी बेकर स्ट्रीट जर्नल बनवलं होतं.सेट वरील इतर लोक दुपारच्या जेवणासाठी गेल्यावर पण जेरेमी बेकर स्ट्रीट जर्नल चा अभ्यास करत असायचा.निव्वळ शेरलॉक चं पात्रच नाही, तर व्हीक्टॉरियन लंडन कसं असेल याबाबत जेरेमीने बरंच वाचन केलं.एपिसोड लिहिणाऱ्यानी पण बरेच कष्ट करून डॉयल च्या लिखाणात जरा कंटाळवाण्या वाटणाऱ्या जागा मूळ लिखाणाशी जास्त फारकत ना घेता रंगतदार बनवल्या.ग्रॅनडा च्या संपूर्ण टीम ची मेहनत म्हणजे हे शेरलॉक चे भाग, ज्यांना आजही चॅनेल्स कडून मागणी आहे.मनमोकळ्या दिलखुलास जेरेमी साठी असा एकलकोंडा,कमी बोलणारा,अलिप्त होम्स रंगवायचा म्हणजे एक मोठं कसोटीचं काम होतं.पण जेरेमीने असा होम्स नुसता उभाच नाही केला, तर त्यात स्वतःच्या काही विशिष्ठ लकबी टाकून तो डायनॅमिक आणि आकर्षक बनवला.स्पेकल्ड बँड, ग्रीक इंटरप्रीतर,कॉपर बीचेस,नॉरवूड बिल्डर,मुसग्रेव रिच्युअल हे काही अतिशय सुंदर एपिसोड.
एका उच्च कुटुंबातून आलेल्या पीटर जेरेमी हगीन्स ला अभिनयाची आवड कॉलेज पासून होतीच.लहानपणापासून डिसलेक्सीया आणि बोलण्यातला दोष(आर नीट उच्चारता न येणे) या आजारांबरोबर राहून पण जेरेमी कॉलेज मध्ये गायकांमध्ये होता.अभिनयात येताना 'या क्षेत्रात जाऊन कुटुंबाचं नाव लावून खराब करू नकोस' अशी वडिलांची भूमिका असल्याने स्टेज वर त्याने हगीन्स सोडून आपल्या सुटाचं लेबल आणि शिंप्याचं आडनाव असलेलं 'ब्रेट' नावामागे लावलं आणि तेच शेवटपर्यंत टिकवलं.२५ व्या वर्षी ऍना मेस्सी शी लग्न, आणि मुलगा डेव्हिड लहान असतानाच २९ व्या वर्षी डिव्होर्स घेऊन गॅरी बॉण्ड बरोबर समलिंगी संबंध, परत १९७६ मध्ये जोन विल्सन शी लग्न अश्या अनेक उलथापालथी त्याच्या व्यक्तिगत जीवनात चालू होत्या.शेरलॉक होम्स साठी नाव नक्की झालं तेव्हा जेरेमी आधीच एक यशस्वी अभिनेता होता.अनेक नाटकं आणि 'माय फेअर लेडी' सारख्या भूमिकेची प्रसिद्धी त्याच्या नावावर जमा होती.पण शेरलॉक होम्स हाती घेतल्यापासून 'शेरलॉक म्हणजे जेरेमी आणि जेरेमी म्हणजे शेरलॉक' असं समीकरण नक्की झालं.
१९८५ मध्ये शेरलॉक होम्स चे चित्रीकरण जोरात चालू असताना फक्त नऊ वर्षांच्या प्रेमळ संसारानंतर जोन कॅन्सर ने वारली.जोन वर जेरेमीचं प्रचंड प्रेम होतं.त्यांचे विचार पण जुळायचे.जोन च्या मृत्यू नंतर जेरेमी मानसिक दृष्ट्या कोसळला.आधीपासून असलेल्या बायपोलर डिसऑर्डर ने उग्र स्वरूप धारण केलं.प्रचंड प्रमाणात मूड चे चढ उतार,उदासी याबद्दल त्याला उपचार घ्यावे लागले.१९८७ मध्ये परत शेरलॉक होम्स च्या चित्रीकरणासाठी तयार झाला तेव्हा तो बायपोलर डिसऑर्डर च्या उपचारासाठी लिथियम वर होता.त्याने त्याच्या वजनात खूप वाढ झाली.पूर्वीचा सोफ्यावरून उडी मारून दाराकडे धावत जाणारा देखणा चपळ होम्स जाऊन आता बऱ्याच मंदावलेल्या हालचाली आणि वाढलेलं वजन घेऊन फिरणारा होम्स दिसायला लागला.लिथियम मुळे वजन वाढतच गेलं.एकदा खिन्नतेच्या भरात त्याने स्वतः स्वतःचे केस कात्रीने वेडेवाकडे कापून टाकले.बायपोलर डिसऑर्डर ची माहिती माध्यमांपर्यंत जाऊ दिली नव्हती, त्यामुळे माध्यमांनी या जाड आणि मंद झालेल्या नव्या सीझन्स मधल्या होम्स वर टीका चालू केली.सिगारेट पिणे दिवसाला ६० सिगारेट पर्यंत गेले.या सगळ्यात शेरलॉक होम्स चं चित्रीकरण चालू होतंच.जेरेमी ऑक्सीजन सिलिंडर घेऊन व्हील चेअर वरून सेट वर यायचा.योगायोगाने डाईंग डिटेक्टिव्ह या भागाच्या चित्रिकरणा दरम्यान जेरेमीचं हृदय काही काळ बंद पडलं होतं.त्याच्या आजाराची नीट माहिती असलेला कोणीही मनुष्य या वाढलेल्या वजनाच्या मंद जेरेमीच्या एपिसोडस चा तिरस्कार करू शकणार नाही.लिथियम चालू ठेवलं तर वजन वाढतं,फुफ्फुसात पाणी भरतं, आणि लिथियम बंद केलं तर मॅनिक डिप्रेशन परत नव्या दमाने डोकं वर काढतं अश्या पेचात डॉक्टर मंडळी सापडली होती.जेरेमी एकदा सॅनिटोरियम मध्ये असताना काही पापाराझी पत्रकार मंडळी त्याला हॉस्पीटल मध्ये चोरून घुसून 'तुम्ही एडस होऊन मरता आहात का' विचारुन गेली.या सगळ्यांशी लढत १२ सप्टेंबर १९९५ ला जेरेमी ने झोपेतच हृदय निकामी होऊन जगाचा निरोप घेतला.

शेरलॉक होम्स चाहत्यांसाठी मात्र जेरेमी कायम जिवंत आहे.अजूनही जेरेमी ब्रेट चा शेरलॉक सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांकडून तितकाच समरसून पाहिला जातो.जेरेमी चं त्याच्या सुंदर क्लायंटस ना स्पर्श करून त्यांच्या व्यवसायाबद्दल अंदाज व्यक्त करणं असूदे,त्याची केस विस्कटून आणि चेहऱ्यावर धूळ चोपडून केलेली माळी,प्लंबर ची वेशांतरे, किंवा त्याची र थोडा खेचण्याची लकब, सुंदर योग्य खर्जातला स्पष्ट आवाज असूदे, ब्रिटिश ऍसेन्ट आणि थोडासा स्वतःचा 'ब्रेटीश' ऍसेंट वापरून 'ब्रोज' ला 'ब्राज्ज' म्हणणे असूदे, स्पेकल्ड बँड मध्ये विषारी मण्यार येण्याची वाट पाहत अंधारात थरथरत्या हाताने उभा होम्स असूदे,जेरेमीला ला परत परत बघताना त्याचे चाहते कधीच थकत नाहीत, आणि त्यातला एक तरी कळवळून 'जेरेमी आता या काळात हवा होता राव!मरायला नको होता हा माणूस!' अश्या भावना व्यक्त करतोच.
जेरेमी, जिथे कुठे असशील आणि हे कोणत्यातरी दिव्य जाणीवेने वाचू ऐकू शकत असशील तर:
धन्यवाद दोस्ता, तुझ्यामुळे आवडता शेरलॉक होम्स इतका चांगला बघायला मिळाला,देव तुझं भलं करो!!मिस यु अ लॉट..
-अनुराधा कुलकर्णी

(डिसक्लेमरः यात टाकलेली चित्रे कॉपीला प्रतिबंधित नसली तरी फ्रीवेअरही नाहीत.जेरेमीची फ्रीवेअर चित्रं शोधायचा प्रयत्न केला पण मिळाली नाही.चित्रं नाही टाकायची म्हटलं तर जेरेमीचा लेख आणी फोटो नाहीत??? जेरेमीला भेटून जेरेमीची स्वतः छायाचित्रं काढून इथे टाकण्याचे म्या पामराचे अहोभाग्य असते तर इथे लेख लिहीत बसले असते का?तर, मुद्दा हा की चित्रांवर कोणी हरकत घेतल्यास ती सखेद आणि माफीसह काढून टाकली जातील.)

1 comment:

Nikhil said...

Amazingly written, never meet Homes like this before :)

Please continue your blog, we are waiting to read more from you. :)

-Nikhil.