या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Sunday 3 May 2015

खुलभर दुधाने भरलेला गाभारा

कोणे एके काळी एक राजा होता. राजाचे दोन तीन देव युरोप आणि अमेरिका खंडात होते. देवांची राजावर कृपा होती. राजाला भरभरुन काम मिळाले. त्याची भरभराट झाली. राज्यात समृद्धी नांदू लागली. आता राजाला देवांचा नवस फेडायला पूर्ण गाभारा ईतर राजांपेक्षा कमी वेळात दुधाने भरायचा होता. राजाने प्रजेला हुकूम दिला की दोन दिवसात गाभारा दुधाने भरला पाहिजे. प्रजेची घाई झाली. बर्‍याच जणांनी पोरं बाळं उपाशी ठेवली आणि सगळं दूध गाभार्‍यात नेऊन ओतलं. काही जणांनी पोरा बाळांना दूध पाजलं, स्वतः प्यायलं आणि उरलेल्या दूधात भरपूर पाणी घालून ते दूध गाभार्‍यात ओतलं. काही जणांनी मोठ्ठ्या भांड्यात एक कपभर दूध ओतून ते भांडं बराच वेळ ओतायचं नाटक केलं. राज्यात एक म्हातारी होती. म्हातारी गरीब होती आणि कामांनी नेहमीच थकलेली असायची. म्हातारीपुढे मोठा प्रश्न पडला. पोरं बाळं लहान होती.घरात दूधाची गरज भुकेजलेल्या पोरांना होती, म्हातार्‍या-कोतार्‍या आजार्‍यांना होती. प्रजेची पातेलीच्या पातेली दूध रिचवूनही गाभारा काही भरत नव्हता.

एका पहाटे म्हातारीने स्वच्छ स्नान केले. देवाची डोळ्यात पाणी आणून मनोभावे प्रार्थना केली. "परमेश्वरा, तुला सर्व माहिती आहे. घरात दूधाची गरज आहे. माझी लाज राख. अपराध पोटात घे. घरात पुरेसं दूध आल्यावर तुला नक्की वाहेन." म्हातारीने पोरा बाळांना दूध पाजले, घरातल्या आजार्‍यांना दूध दिले. घर सुखी आणि समाधानी पाहून म्हातारी निघाली. तिने मनोभावे श्रद्धेने आणि एकाग्रतेने उरलेले खुलभर चांगले दूध गाभार्‍यात देवाला अर्पण केले. आणि काय आश्चर्य!! गाभारा दुधाने पूर्ण भरुन गेला. म्हातारीची पोरं बाळं समाधानी राहिली तशी तुमची आमची रहो, तिच्या खुलभर दुधाने गाभारा भरला तसा तुमच्या आमच्या श्रद्धेने आणि खर्‍या भावनेने अर्पण केलेल्या खुलभर दुधाने भरो ही सदिच्छा व्यक्त करुन साता उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

(श्रावणी सोमवारची ही जुनी कहाणी नक्कीच थोडी टेंपर्ड आहे. खर्‍या परीस्थितीतः
१. राजा दयाळू होता आणि प्रजेने दूध अर्पण करुनही गाभारा भरत नाही पाहून त्याने रातोरात दूध आणून गाभार्‍यात ओतले.
२. राजाने दुधात पाणी घालून मोठं भांडं गाभार्‍यात ओतणार्‍यांचा विशेष सत्कार केला आणि म्हातारीला "पुरेश्या समर्पणाने देवाची कर्तव्ये न केल्याबद्दल" दुसर्‍या राज्यात हाकलून दिलं.
३. राजा चांगला होता आणि त्याने म्हातारीला सर्वांसमोर शिक्षा करुन खाजगीत सांगितलं की शिक्षा करणं हा त्याचा नाईलाज आहे पण म्हातारीची श्रद्धा भक्ती त्याला माहित आहे.
४. राजा चांगला होता आणि त्याने देवांची विशेष प्रार्थना करुन त्यांना "चुकलं माकलं पोटात घ्या आणि गरीब प्रजेची व्यथा समजून घ्या" सांगितलं पण दुसर्‍या एका राजाने राज्यावर आक्रमण करुन या राजाला मांडलिक बनवलं आणि राज्यात गाभारा सोडून बाकी कुठेही दूध दिसता कामा नये असा कडक कायदा केला.)

1 comment:

Anonymous said...

mast. Parat regular lihayala lagaya baddal abhinandan.
Shilpa