या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Thursday, 25 October 2007

धन्नो आणि बसंती

'शाणी माझी बाई ती.. अजून फक्त थोडंसंच चाल ना..आलंच बघ समोर.'-बसंती.
'थोडंसंच चाल काय? मी तुला कँपातच सांगत होते मला भूक लागली आहे म्हणून. चांगला समोर होता पंप. पण तुलाच 'स्पीड' पेट्रोल भरुन लकी ड्रॉ कुपन भरायचं होतं म्हणून तू मला इतकं दूर आणलंस. आता मी नाही जा!मी इथेच थांबणार.'-धन्नो.
'अगं सोनू, माफ कर मला. परत असं नाही करणार. पण आता चल ना अर्धा किमी. पुढे आहे चढ.
आणि तुला तर माहितीच आहे व्यायामाच्या बाबतीत मी किती फासफुस आहे ते? मॉर्निंग वॉक पण तुला घेउनच करते. मी कशी जाणार तुला चढावर ओढून घेउन?चल ना गं.'-काकुळतीला येउन बसंती.
'माझा पण नाईलाज आहे. पुढच्या वेळी तू शहाणी होशील आणि असं करणार नाहीस याची खात्री आहे
मला.'-धन्नो

बसंतीने(नसलेला) पदर बांधला आणि ती धन्नोला आधार देऊन चढ चढायला लागली. धन्नोचं पण बरोबरच होतं एका प्रकारे. बसंती तिला रोज पुण्याच्या खड्ड्यांवरुन नेउन धन्नोची हाडं खिळखिळी करते.तिला रोज आंघोळ घालत नाही. चांगलं पेट्रोल खाऊ घालत नाही. धन्नोचा फुटलेला आरसा पण बदलत नाही. केवळ इमानदारी आणि मैत्रीपोटी धन्नोनं तरी किती सहन करायचं?

कधीकाळी धन्नो सशक्त आणि सुंदर होती. नितळ काळी कांती, चमकते आरसे, स्टीलचे चमचमते पैंजण..पण त्यावेळी बसंती 'गरम रक्ताची,स्वतःला स्मार्ट समजणारी' इ.इ. तरुणी होती. वेगाच्या हव्यासापोटी आणि नियमांच्या अज्ञानापोटी स्वतःबरोबर धन्नोला रस्त्यावर भिरकवायला पण ती मागेपुढे पाहत नसे. श्रम सोसून आणि उन्हातान्हात फिरुन धन्नोच्या सौंदर्याला उतरती कळा लागली. प्रकृती ढासळायला लागली. बसंतीला आता धन्नोचा खूप लळा लागला होता. ती धन्नोला घेतल्याशिवाय कुठेही जात नसे. कधी व्यक्त केलं नाही तरी तिचा खूप जीव होता धन्नोवर. पण धन्नोमधे आता ती धडाडी आणि तंदुरुस्ती उरली नव्हती. आला दिवस ती कशीबशी रेटत होती.

'सिग्नल मोठा आहे १२० सेकंदाचा. तुला बंद करुन ठेवते.'- बसंती.
'नको गं बाई! मी चालते आहे तोवर चालते आहे. एकदा बसले कि बसले. परतपरत उठबस झेपत नाही
आता जिवाला.'-धन्नो.
'हॅ, असं कसं? पेट्रोल किती जातं? आणि प्रदूषण? काही नाही. घाबरु नकोस. मी आहे ना! तुला सगळं झेपेल. माझ्यावर विश्वास ठेव.'-बसंती.
सिग्नल संपला. बसंतीने धन्नोची वादी पिरगाळून कळ दाबली. पण धन्नोचा विद्युतघट पण संपलेला. मग
धन्नोला हलकीशी पायखळी मारली. पण ती काही उठेना.
'धन्नो, उठ ना! बघ मागचे लोक भोंगे वाजवतायत. थोडी चाल, मग मी तुला बाजूला घेऊन विश्रांती देते.'
'नाही गं. आता हा देह विसावणार तो कायमचाच एखाद्या गॅरेजवाल्याकडे किंवा भंगारवाल्याकडे. तू मला
विकून टाक आणि नवी सखी बघ.'
'धन्नो, असं नको ना बोलूस! मला कसंतरी वाटतं. तू बरी होणार आहेस. मान्य आहे मी चुका केल्या आणि त्याची फळं तुला भोगावी लागत आहेत. पण तू बरी होशील. मी तुला नेईन एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे.
पगार होऊ दे फक्त या महिन्याचा.'

'कशाला ठेवलंय हे भंगार?कायम काही न काही तक्रारी. आता चालती आहे तोपर्यंत बायबॅकमधे दिली तर थोडे तरी सुटतील. नवी 'पेप' घेउन टाकू.'-वीरु.
बसंतीने हळूच धन्नोकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. धन्नोच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. वीरु पण धन्नोचं खूप करायचा. तिला वेळोवेळी वैद्याकडे घेऊन जाणं, तिचं खाणं पिणं पाहणं..पण आज वीरुलाच असं बोलताना पाहून धन्नोला धरणीच्या पोटात गडप व्हावंसं वाटलं.
'अरे चालते आहे तोपर्यंत चालवू. कशाला नवा खर्च? मी हिलाच नव्यासारखी बनवीन. मग ती चांगली
वागेल.'-बसंती.

'डॉक्टर, माझी धन्नो होईल ना हो बरी?हल्ली वयाप्रमाणे तिला जास्त चालवत नाही. गुडघेदुखी आहे.
अधूनमधून चक्कर येते. खाणं पचत आणि अंगी लागत नाही.'
'मी काहीच सांगू शकत नाही.पण आता तिचं जास्त आयुष्य नाही उरलं. सरळ नवीन घेऊन टाका ही
देऊन.'-डॉक्टर.
'मी कितीही खर्च करीन हिच्यावर. पण हिला पहिल्यासारखी तरुण पहायची इच्छा आहे. किती खर्च येइल
सांगा ऑपरेशनला?'-बसंती.
'म्हणजे बघा, आरसे लागतील, बॅटरी बदलावी लागेल, बॉडीला क्रॅक गेला आहे ते बदलावं लागेल, टायर
जुने झाले आहेत ते बदललेले सेफ राहतील. म्हणजे पूर्ण मिळून बघा, ४००० मधे काम होईल.'-डॉक्टर.
'बरं मी तुम्हाला पावसाळ्यानंतर सांगेन. चल गं धन्नो.'

'चार हजार!! भावना वगैरे ठिक आहे पण आज हिला चार हजाराला विकली तर नवी चकाचक पेप येईल.'बसंती विचार करत होती.
'मूर्ख! आपल्या माणसाचं ऑपरेशन करावं लागलं तर महाग आहे म्हणून त्याला असंच मरायला सोडशील का?त्यापेक्षा बसंती तुला भेटलीच नसती तर बरं. तुझ्यामुळे तिच्यावर ही पाळी आली आहे. आणि तू खुशाल तिला टाकून नवी सखी करणार?' बसंतीने स्वतःलाच झापलं.
'पण मग दरवेळी दुरुस्तीला पैसे आणायचे कुठून?'
'आण कुठूनही, पण जिने तुला गेली ५ वर्ष साथ दिली तिला असं कृतघ्नपणे वाऱ्यावर सोडू नकोस.'

झालेल्या उपचारांनी दमून धन्नो शांतपणे पाय रेटत घराकडे चालली होती. बसंतीने तिला कुरवाळलं . 'नाही गं सोने, मी कुठ्ठे टाकणार नाही तुला! मी तुला संभाळीन. तुला बरं करेन. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुझी साथ देईन.'
धन्नो आनंदाने खुदकन हसली आणि फुरफुरली. 'आता कितीही आजार झाले तरी मी आनंदाने तुझी शेवटपर्यंत सेवा करेन आणि तुझ्या पायाशी प्राण सोडेन.' आणि ती परत नव्या उत्साहाने चालू लागली.
(हा लेख सर्वप्रथम मनोगत डॉट कॉम वर प्रकाशित.(ब्लॉग एकदम झोपलेला होता बरेच दिवस म्हून ही जुनीच दारू तळघरातून काढून नव्या गिल्लासात ओतली.))

एपिलॉगः
काळ बदलला. चैनी गरजा बनल्या. बसंतीही पूर्वीइतकी भावूक राहिली नाही. तिने नुकतीच धन्नोला घोड्यांच्या सौदागाराला सात हजाराला विकून नवी 'लैला' विकत घेतली आहे. तरीही धन्नो आज जिथे कुठे आहे तिला हा लेख सदिच्छांसह समर्पित.

18 comments:

hemant_surat said...

धन्नो, बसंती आणि वीरु, मनातले शोले चांगलेच पेटलेले दिसताहेत. पेटते राहू द्यात. आम्ही या शोलेंच्या शेकोटीवर आमच्या मनाची, चांगल्या articles ची पोळी भाजून घेवू.

Anand Sarolkar said...

Mastch lihila ahe!

Devidas Deshpande said...

very fantastic article. it shows some old elements in your writings. I liked the way you related the vehicles with the characters in Sholay. Sahi aahe.

स्नेहल said...

mast ch lihila aahes anu :) ekadam wegali style....awadal :)

Voice Artist Vikas Shukla विकासवाणी यूट्यूब चॅनल said...

I read your blog regularly. I think you are 'varas' of Mangala Godbole. Why you prefer only Electronic media ? These articles should be published in Print media also.

सर्किट said...

farach sundar post aahe. :-) the best dose to start a working day! ajunahi taLagharat kahi asel tar ota ki gillassaat.. daaru jevadhi juni asel titaki chav ajun changali lagate bagha.. :-D

Raj said...

मला वाटले शोलेचा एकच रिमेक झाला होता, हा दुसरा माहित नव्हता :)

लेख छान झाला आहे.

कोहम said...

bhale shabbas.....

अनु said...

प्रतिसादांबद्दल (या आणि आधीच्याही लेखांवरच्या) आभार वाचकहो.
मंगला गोडबोले या माझ्या आवडत्या लेखिका. खास करुन एखाद्या लेखभर निर्विष विनोदाने सभोवतालच्या समाजाच्या फिरक्या घेऊन शेवटात एखादे हृदयस्पर्शी सत्य सांगणे. (शिरीष कणेकर म्हणतात तसे, विनोदी लेखांचा शेवट थोडा कारुण्याची किनार असलेला असला तर लज्जत अधिक वाढते.) मं. गो. यांच्यासारखे सुंदर लिहायला मला जमते असा अतिशयोक्त दावा मी करणार नाही, मी अजून के. जी यत्तेतच आहे. पण लिखाणावर कळत नकळत त्यांची छाप पडते बर्‍याचदा हे मात्र खरे.माझे लिखाण वाचून तुम्हाला त्यांच्या शैलीची आठवण येण्याइतपत बरं मी लिहू शकले याचे समाधान आहे.
छापील पुस्तकाचे म्हणाल तर लोक इ-मिडीयावर माझे लिखाण प्रेमाने(आणि सहनशीलतेने) वाचतात, पण पुस्तक छापल्यावर 'विकत घेऊन हौसेने' वाचतील असे अजून तरी वाटत नाही. (हा विनय वगैरे नाही.) बघू.अजून ५-१० वर्षे लिहीत राहिले तर घाबरत घाबरत पुस्तक छापायचा प्रयत्न करेनही कदाचित!
कळावे,
असाच लोभ असावा ही विनंती.
- (लोभी)अनु

a Sane man said...

too good!!!...sahiye!!!

TheKing said...

Chal dhanno, teri izzat ka sawaal hai.. ha dialogue aata repeat honar nahi mhanaje!

So in short dhanno geli and tichabarobar tichi itarana adchanit ananari izzat pan geli!

Lol...

Anonymous said...

aha...dhano mast ekadam..!

Unknown said...

I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.

Yogesh said...

mast :)
haa vachanat ala navata...

HAREKRISHNAJI said...

nice post and how sad to part away with Dhanno.

I have been using my Yamaha RX100 for last 16 years, I share the same feelings. Last 1-2 years I have hardly used it and now after reading this post , I am thinking of disposing it and buying a new one.

ऍडी जोशी said...

लेख चांगला आहे. धन्नो विकलीत हे ऐकून दुःख झाले. माझी पहिली बायको जेव्हा मला अक्सिडेंट नंतर विकावी लागली तेव्हा असाच दुःखी झालो होतो. असो. तुमचा लेख वाचून पुन्हा तिची आठवण आली.

Chetan DK said...

भन्नाट कल्पना
आधुनिक धन्नो खरचं आवडली.

Anonymous said...

Anu, scooty che barech lafde aahet, ektar pickup nahi, mileage jaast aahe khare pan toh wachlela paisa maintenance madhye jato...

Hero Honda chee pleasure (teech tee Priyanka y z chopra la gheun kadhlelee advertise) chhaan gaadi aahe.

Activa che engine aani fiber chee body tya mule gaadi zakas aahe....

aani scooty navre lokanna chhotee padte, pan Pleasure gadee navre lok chalvu shaktat... so sunday la tuzya navryala pathvu shaktes kama karayla