या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Friday, 2 March 2007

धनलाभाचा हंगाम

एप्रिल महिना उजाडतो. चैत्र महिन्याच्या आरंभाबरोबरच उन्हाळ्याची चाहूल लागते..बाजारात आंबे येतात..कोकीळा कुहूकुहू गायला लागतात..उसाच्या रसाच्या टपऱ्या वाढतात..विद्यार्थी अभ्यासाला लागतात..बँका व हिशोब खाती मान मोडून आर्थिक नववर्षाच्या गोळाबेरजेला लागतात..आणि माझ्यासारख्या अनेक 'बुद्धिजीवी'(??)लोकांचे हात धनलाभाच्या प्रतीक्षेत खाजू लागतात.

एप्रिल मे म्हणजे गुणगणनेचा आणि पगारवाढीचा महिना. किती वाढ मिळेल बरं? आयकरात काय फरक पडेल?काय घ्यायचं? आता राहणी पण सुधारायची बरं का. रेबॅनचा चष्मा, लीच्या विजारी, ऍलन सोली चे शर्ट, वूडलँडचे किंवा लीकूपरचे बूट, छान छान बांधणी सिल्कची एखादी साडी..नवीन चकाचक पेप गाडी..
मन आकाशात भरारी घ्यायला लागतं आणि पूर्वतयारी म्हणून आमची स्वारी साहेबाच्या खोलीत तरंगत तरंगत जाते. साहेब सरसावून बसलेलेच. ठराविक काळात मुस्लिमांची हाज यात्रेला झुंबड उडावी तशी गुणगणनेच्या काळात अनेक भक्तांची वर्दळ कचेरीत झेलायची साहेबांना सवय आहे.

साहेबः 'या.बसा.'मीः (तत्कालिन वेळेप्रमाणे गुड मॉर्निंग/आफ्टरनून घालते.)
(थोडी फार हि हि हू हू झाल्यानंतर दोघे एकमेकांचा अजमास घेतो. साहेब समोर असलेली कागदपत्रे हाताखाली घालत बसला आहे. तो ती वाचत नाही हे दोघांनाही माहितीय, कारण कागदपत्रे ही बाहेरच्या लोकांना पटवण्यासाठी(आणि गटवण्यासाठी) बनवली गेलेली माहितीपत्रके आहेत आणि ती कचेरीच्या आतली माणसं फारच नाईलाज झाला तरच वाचायला हाती घेतात.)
साहेबः (चष्म्याखालून बघत)'मग, काय काम काढलंत?'
मीः 'हॅ,हॅ,हॅ, साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे. प्रोजेक्टस चांगली पूर्ण केली. गोऱ्या साहेबाकडून स्तुतीपत्रेही मिळाली. यावेळी जरा चांगली पगार वाढ पाहिजे होती.(हुश्श!बोलले एकदाची!)
'साहेबः (विचारमग्न चेहरा करतो. तितक्यात फोन खणखणतो‌.पलिकडच्याशी 'इन्व्हॉइस' आणि 'ऑफर' हे शब्द बऱ्याचदा आणून हुज्जत घालून होते. मी टेबलावरच्या वस्तू, सिगारेटचे पाकिट, चष्मा न्याहाळत मनात मुद्द्यांची उजळणी करते.)
साहेबः 'हं, काय म्हणत होतात?'मीः 'साहेब, आपल्याला तर माहितीच आहे.महागाई किती वाढलीय?पुण्यातली कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती वाढलीय. यावेळी जरा बरी पगारवाढ अपेक्षित आहे कारण यावेळी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलीय.'
साहेबः 'हूं.. पगारवाढीत काय ठेवलंय? शेवटी मानसिक समाधान महत्वाचं.'(साहेब अध्यात्मात शिरले.)
मीः 'पण मानसिक समाधान आणि मोटिव्हेशन दोन्ही नाही, कारण बाहेरच्यापेक्षा पगार आपल्याकडे खूपच कमी आहेत.(जिंकू किंवा मरू! जिंकू किंवा मरू!)
' साहेबः 'आम्ही एक मोठी संघटना आहे. हे झकपक ऑफिस, इथल्या सोयी, मी हे सर्व ओव्हरहेड्स आहेत. अशा वेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य दिलंच पाहिजे. पुढच्या वर्षी बघू.
'मीः 'पण साहेब, सहकार्य मागच्या वेळी पण दिलं होतं. त्यावेळी पण असंच सांगितलं गेलं होतं आणि फक्त ९ टक्के वाढ दिली होती.'
साहेबः 'भूतकाळात शिरू नका हो. हा चुकीचा ऍटीट्यूड आहे.आपल्याला सर्वांना कंपनीच्या प्रगतीसाठी झटायचं आहे.मी किंवा तुम्ही गौण आहोत.आपण सर्व टीम आहोत आणि देअर इज नो 'आय' इन टीम.'(साहेब भिंतीवरील तक्त्यासारखंच बोलतायत!)
मीः (मुद्दा नही छोडेंगे!बचेंगे तो और भी लडेंगे!)'पण साहेब, टीम बनते कशाने? टीमच्या हिश्श्यांनीच ना? मग टीमचे हिस्से जर कौटुंबिक समस्यांमध्ये गंजले तर ते चांगले काम कसं देऊ शकणार?'
साहेबः 'हे पहा, 'कमी' आणि 'जास्त' या सापेक्ष कल्पना आहेत. त्यांच्या व्याख्या आपणच ठरवायच्या असतात.'(साहेब आईस्टाइनच्या सापेक्षतावाद सिद्धान्तांत शिरले होते.)
मीः (तुम सापेक्ष तर हम सवाई सापेक्ष!)'पण साहेब, आम्ही ढीग या व्याख्या स्वतः ठरवून स्वतः समाधानी राहायचं ठरवलं तरी बाह्य जग आम्हाला या व्याख्या ठरवू देत नाही. जगायला पैसा लागतो.'
साहेबः 'नुसतं पैसा पैसा करून काय होणार आहे?अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पैशाने खरेदी होत नाहीत. आपल्या कंपनीचं नाव बघा, आपल्याला मिळणाऱ्या रजा बघा. इथे मिळणारं खाणं बघा. पैसा नश्वर आहे. आज आहे उद्या नाही. भौतिक सुखांपेक्षा मनःशांती महत्वाची.ती आम्ही देतो.'(साहेब भौतिकतावादात शिरले!)
मीः (आता प्राण गेला तरी बेहत्तर! दहा टक्क्यापेक्षा जास्त पगारवाढ मिळवूनच बाहेर पडणार!)
'पण साहेब, व्यवहारात जगायला पैसा लागतो. समजा उद्या मी घर खरेदी करायला गेले तर बिल्डरला हे नाही सांगू शकत की बाबा, आमच्या कंपनीत मानसिक समाधान जास्त मिळतं त्यामुळे तू ६०% कॅश आणि उरलेले मानसिक समाधान घे.'
साहेबः (आता पारा चढत चालला आहे)'हे पाहा, आम्ही कंपनी चालवतो. आम्ही कामं करून घेतो आणि त्या बदल्यात पैसे देतो. तुम्ही त्यातून घर खरेदी करता का जहाज का विमान त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही.'
मीः (टाचणी लागली तरी उत्साहाच्या फुग्यात अजून हवा आहेच)'पण साहेब, माझ्या अनुभवाच्या आणि पात्रतेच्या माणसाला बाहेर याहून दुप्पट पगार मिळतो.'
साहेबः 'हे हे बरोबर नाही हं! दुसऱ्यांबरोबर तुलना करू नका. जे लोक तुलना करतात त्यांच्याशी बोलणं पण बंद करा. आपली स्वतःची पात्रता आणि क्षमता याप्रमाणे वाढ मागायची असली तर मागा.'(नाही देणार जा! गेलीस उडत!)
मीः 'पण साहेब,तुलना नाही करायची हे म्हणायला ठीक आहे, प्रत्यक्षात प्रत्येकजण तुलना करत असतोच.निदान पात्रता आणि क्षमता याप्रमाणे तरी द्या.'(नही हटेंगे!नही हटेंगे!)
साहेबः 'कम्मॉन!व्यापकतेने विचार करा. आपल्यापुरता विचार करु नका. तुमच्या खात्याचा विचार करा, आपल्या कंपनीचा विचार करा.(देशाचा विचार करा इ.इ.)' (पोरी, मी तुझं बारसं जेवलो आहे. मला शिकवतेस?जाव,जाव पानी पिके आव!)
मीः (हळूहळू अवसान गळत आहे) 'साहेब जरा विचार करा हो.मला जगायला पैसा हवा. सध्याच्या पगारात चालणं शक्यच नाही.'
साहेबः (कंटाळा आला बुवा!रोजची सिगारेट मारायची वेळ झाली!)'बरं. आम्ही संबंधित खात्याशी विचारविनीमय करून ठरवू.'
मीः 'बरं साहेब,मी वाट पाहीन.वेळ दिल्याबद्दल आभार. आपला दिवस चांगला जाऊदे.' (माझा दिवस वाया गेला विचारात तरी तू आपला मजा कर लेका!)
साहेबः 'बरं. आभार आणि तुम्हालाही दिवस चांगला जावो.'

मी साहेबाच्या खोलीबाहेर जाते. अचानक आठवतं, 'हेच सर्व आपण मागच्या एप्रिलमध्ये बोललो होतो.' आणि हसू येतं. 'काय मिळवलं बोलून?मन मोकळं केल्याचं समाधान?साहेबाला उलट बोलल्याचा आनंद?परखड बोलून आपली बाजू मांडल्याचं आत्मिक समाधान? मागच्या वेळी नऊ टक्के मिळाले,यावेळी दहा टक्के मिळाले तर अर्धा अर्धा टक्का पगारवाढीत वाढ होऊन दहा वर्षांनी स्वतःचं घर नक्की बांधशील!' आता उरलं ते चातकाप्रमाणे पुढच्या पगाराची वाट पाहणं. शेवटी काय,आपण निमित्तमात्र. कर्ता करविता तो आहे. पगार काय वाढ काय, घर काय, सर्वच नश्वर आहे. आत्मा फक्त अमर आहे. (पार्ट टाइम प्रवचनकारशिप कर यार!थोडा पैसा तर सुटेल! )

(वि. सू.- या लेखातील साहेब व 'मी' ही पात्रे पूर्णतया काल्पनिक आहेत व त्यांचे दैनंदिन जीवनातील पात्रांशी किंवा घटनांशी साम्य हा निव्वळ योगायोग मानावा.'मी' ला नाव नाही. अस्तित्व नाही. त्याला आहे तो फक्त कर्मचारी क्रमांक!)
-अनुराधा कुलकर्णी

7 comments:

Vidya Bhutkar said...

मी सोमवारीच हे सगळं बोलून आलेय आणि साहेबांनी नेहमीप्रमाणे 'प्रयत्न' करण्याचा शब्द दिला आहे. :-(( I hate them all. जाऊ दे, कोण कुणाला काय सांगणार. :-)

-विद्या.

Abhijit Bathe said...

ठराविक काळात मुस्लिमांची हाज यात्रेला झुंबड उडावी तशी गुणगणनेच्या काळात अनेक भक्तांची वर्दळ कचेरीत झेलायची साहेबांना सवय आहे. - Classic!
The comic parts are awesome!
I wonder - werent you ever discouraged that such good posts never got the replies they deserved?

Sneha Kulkarni said...

Anu, mast aahe. Shevti mansik samdhan mahatvhach.. commentchi apeksha ka kara? :D neways thanks for commenting on my post!

Anonymous said...

Its really good!
: RISHIKESH C

mad-z said...

अनु. हा असा चांगला ब्लॉग आजतोवर माझ्या नजरेपासनं लपून राहिला याचं दुख्ख. असो.

एकूण annual appraisal हा प्रकार सगळीकडे सारखा आणि तसेच "साहेब"ही सारखेच. एकूण माझ्या कंपनीत मी HR ला suggest केलंय .. म्हटलं प्रोसेस बदला .. objectives - review - appraisal - review - letters .. या क्रमात "letters" च्या आधी "साहेबाशी हुज्जत" हे ही घुसडा .. आणि त्या साठी guidelines म्हणून template ही बनवा. एक FAQ तयार करा ज्यात appraisee विचारील त्या सार्या प्रश्नाची ऊत्तरं द्या. आणि खाली लिहा, should you have any other questions than above, then please talk to your manager. :)

तसं पहाता .. इतकं डायरेक्ट संभाषण आजकाल कुठं होत नाही, पण शेवट सगळीकडे सारखाच. नोकरीमधनं नाहीतरी वर्षाच्या शेवटी साहेबाला कसा मोकळा बोलून दाखवला याचं "मानसीक समाधान" तरी प्रत्येकजण उपभोगतोच. कदाचीत तेच appraisal process चं ऑब्जेक्टीव्ह असेल :)

prashant phalle said...

Tuzya boss ne vachylay ka he ???

Giri said...

Khupach chan. Sadhya sadhya prasnganna farch chan pane phulavtes tu!