या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday, 12 March 2007

होम्स कथाः अंतिम लढत

खूप जड अंतःकरणाने आज मी माझ्या प्रिय मित्राचा, होम्सचा हा शेवटचा वृत्तांत लिहितो आहे. स्कार्लेटच्या प्रकरणापासून माझा आणि होम्सचा आलेला संपर्क, आम्ही एकत्र पाहिलेल्या अनेक घटना, केलेली काही साहसे हे लिहूनच खरं तर मी थांबलो असतो. ज्या अप्रिय घटनेने माझ्या जीवनात ही कायमची पोकळी निर्माण केली आहे, ती तुम्हाला वर्णन करुन सांगण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं मला वाटत होतं. पण आज कर्नल मॉरीयार्टी अनेक लिखाणांतून आपल्या भावाचं गात असलेलं गुणगान पाहून मला खरी गोष्ट जगापुढे मांडण्याखेरीज गत्यंतरच नाही.. प्रा. मॉरीयार्टी आणि होम्समध्ये नक्की काय झालं ते या प्रसंगाला जवळून पाहिलेला साक्षीदार म्हणून सांगण्याची जबाबदारी मला घ्यावीच लागेल.

माझ्या लग्नामुळे, आणि माझ्या खाजगी डॉक्टरीमुळे होम्सचा आणि माझा संपर्क आणि येणंजाणं पूर्वीइतकं राहिलं नव्हतं. म्हणजे, अजूनही त्याला काही केसच्या संदर्भात माझी मदत लागली तर तो येत असे, पण भेटी आधीच्या मानाने तुरळकच झाल्या होत्या. १८९० मध्ये तर माझ्या माहितीत आणि माझा संबंध आलेल्या त्याच्या तीनच केस होत्या. त्यावर्षी मी वर्तमानपत्रात वाचलं की फ्रेंच शासनाने त्याला एका महत्वाच्या केससाठी नियुक्त केलं आहे. आणि नॅरबोन आणि नाईम्समधून आलेल्या त्याच्या पत्रांवरुन मला वाटलं की त्याचा फ्रान्समधील मुक्काम लांबेल. त्यामुळे एप्रिलच्या संध्याकाळी तो माझ्या दवाखान्यात आला तेव्हा मला खरं म्हणायचं तर जरा आश्चर्यच वाटलं. आणि तो खूप निस्तेज आणि पूर्वीपेक्षा जास्त हडकुळा वाटत होता.

'हो, मी हल्ली जरा जास्तच दगदग करतोय.' माझी नजर आणि नजरेतले भाव ओळखूनच तो म्हणाला. 'थांब हं, मी जरा खिडक्या बंद करुन घेतो.' माझ्या वाचनाच्या टेबलावर जो काही थोडाफार प्रकाश पडत होता तो त्या खिडकीमुळेच. पण होम्स वळसा घालून पलीकडे गेला आणि त्याने खिडक्या घट्ट बंद करुन घेतल्या. 'तुला कशाची तरी भिती वाटते आहे.' मी म्हणालो.
'अं, हो, बरोबर आहे.'
'पण कसली?'
'बंदुकींची.'
'म्हणजे, होम्स, काय झालंय तरी काय?'
'वॅटसन, तू मला आता बऱ्यापैकी ओळखतोस आणि तुला माहीत आहे की थोड्याथोडक्याने हातपाय गाळणारा मी नाही. पण हेही खरं की धोका आहे हे स्पष्ट दिसत असताना उगाच जीव धाडसात घालवणं याला मी हिंमत नाही, मूर्खपणा समजतो. काडेपेटी आहे का रे?' त्याने सिगारेट शिलगावली आणि त्या धुराने नवीन संजीवनी मिळाल्यासारखा तो जरा शांत होऊन विसावला.
'जरा उशिरा आलो आहे,तुला त्रास तर नाही दिला ना? आणि हो, मी जाताना तुझ्या मागच्या कुंपणावरुन उडी मारुन गेलो तर तुला चालेल ना?'
'पण नक्की झालंय तरी काय?' आश्चर्यचकित मी.

होम्सने आपले हाताचे पंजे दाखवले. त्याच्या बोटाच्या पेरांना जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होतं.
'मी काहीतरी कल्पना करुन उगाच घाबरत नाहीये, तुला कळलंच असेल. मला जी शंका आहे ती माझ्या हातांच्या जखमांइतकीच खरी आहे. बरं मला सांग, मिसेस वॅटसन कुठे आहे?'
'ती काही दिवस गावाला गेलीय.'
'म्हणजे तू एकटा आहेस?'
'हो.'
'मग आता मी तुला जास्त हक्काने विचारु शकतो की तू माझ्या बरोबर एक आठवडा मध्य युरोपात येशील का?'
'पण कुठे?' मी गोंधळून विचारलं.
'कुठेही. मला सगळं सारखंच आहे.'

खरोखर आज होम्सची सगळी वागणूकच बुचकळ्यात पाडणारी होती. निरर्थक सुट्ट्या घेऊन भटकणाऱ्यांपैकी होम्स कधीच नव्हता. आणि आज त्याच्या फिकट चेहऱ्यावरचे भाव मला सांगत होते की तो कसल्यातरी जबरदस्त ताणाखाली आहे. होम्सने माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न वाचले असावेत. तो सरसावून बसला आणि मला सांगायला लागला. 'तू कधी प्राध्यापक मॉरीयार्टीचं नाव ऐकलं आहेस?नसशीलच.'
'नाही'
'अत्यंत हुशार आणि धूर्त माणूस आहे. गुन्ह्यांच्या यादीत त्याचं नाव सर्वात वरती आहे. आणि विशेष गोष्ट अशी की त्याच्याबद्दल जास्त कोणाला काही माहीत नाही. खरं सांगतो वॅटसन, मी जर मॉरीयार्टीला पकडवून या समाजाला त्याच्यासारख्या गुन्हेगारांपासून मुक्त करु शकलो तर तो मी माझ्या कारकीर्दीत गोवलेला सन्मानाचा शिरपेच समजेन आणि त्याच्यानंतर एखाद्या निरुपद्रवी धंद्यात शिरेन. तुला म्हणून सांगतो वॅटसन, फ्रान्स आणि स्कँडीनेव्हीयन राजघराण्याच्या मदतीसाठी मी ज्या शोधकार्यात होतो त्याने माझ्यासमोर खूप वेगळी गुपिते उघडली. आता माझ्यापुढे एकच पर्याय होताः सर्व शोधकार्य सोडून देऊन माझ्या रसायनशास्त्राच्या संशोधनाकडे वळणे किंवा सर्व कळूनही शांत बसून राहणे. पण मॉरीयार्टीसारखा समाजकंटक आणि धोकादायक माणूस खुलेआम समाजात हिंडतो आहे हे विसरुन स्वस्थ बसणाऱ्यांपैकी मी नाही.'
'पण त्याने काय केलंय?'- मी.
'त्याची कारकीर्द फारच आगळीवेगळी आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी या माणसाने बायनॉमियल प्रमेयावर शोधनिबंध लिहिला आणि त्याला युरोपात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या जोरावर त्याला अनेक विद्यापीठांमध्ये गणितीय अभ्यासाशी संबंधित उच्च पद सहज मिळत होतं. त्याला या क्षेत्रात खूप चांगला वाव होता. पण एकंदरीत त्याच्या रक्तातच गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने तो त्या दिशेकडे वळत चालला. त्याच्या असामान्य बुद्धीमुळे तो लवकरच एक धोकादायक गुन्हेगार बनला. त्याच्या बद्दल विद्यापीठात वेड्या वाकड्या अफवा पसरत गेल्या आणि त्याला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. शेवटी तो सगळं सोडून लंडनमध्ये आला आणि त्याने सैन्यात शिक्षकाची नोकरी पत्करली. जगाला त्याचा फक्त हाच चेहरा माहिती आहे पण मी स्वतः बऱ्याच गोष्टी उलगडत गेलो. तुला माहितीच आहे, माझा लंडनच्या गुन्हेगारी जगाबद्दल केवढा अभ्यास आहे..गेली कित्येक वर्षं मला वाटतच होतं की बऱ्याच गुन्ह्यांमागे एक जबरदस्त मेंदू आहे, आणि तो पोलिसांनाही हुलकावण्या देतो आहे. दरोडे, फसवणूक,खून सगळ्यांमागे असलेला हा माणूस मी शोधला. अनेक वर्षं मी मोरीयार्टीचा हा बुरखा फाडून त्याला जगापुढे उघडं पाडायचा प्रयत्न करतो आहे. या वेळी मी त्याचा पाठपुरावा करत अगदी जवळ आलो होतो, आणि एक दिवस खुद्द मॉरीयार्टीची आणि माझी समोरासमोर गाठ पडली.'

'तुला सांगतो वॅटसन, तो गुन्हेगारांचा अनभिषिक्त सम्राट आहे. या शहरातल्या जवळजवळ सगळ्या, ज्ञात किंवा अज्ञात कृष्णकृत्यांमधे त्याचा हात आहे. तो भयंकर हुशार माणूस आहे. एखाद्या कोळ्यासारखा तो जाळं विणून जाळ्याच्या मध्यभागी स्वस्थ बसलेला आहे, पण जाळ्याचे सर्व तंतू दूरदूरपर्यंत पसरलेले आहेत. स्वतः तो कशातही प्रत्यक्ष पडत नाही. पण त्याच्या माणसांचं जाळं चांगलं पसरलेलं आहे. माणसं भलेही कधीतरी पकडली जातात, पण या सगळ्याच्या मागे असलेला सूत्रधार पकडला जाणं तर सोडच, संशयितांच्या गणतीत पण नाही. आणि मी हे जाळं शोधून त्याचा नायनाट करण्यात खूप शक्ती घालवली आहे.' होम्स सांगत होता.

'पण मॉरीयार्टीने सर्व इतक्या धूर्तपणे आखलंय की त्याला अडकवणारा पुरावा शोधणं जवळ जवळ अशक्य होतं. माझी कुवत तुला माहित आहेच, पण यावेळी मला तुल्यबळ शत्रू मिळाला आहे. त्याच्या गुन्ह्यांपेक्षाही त्याची गुन्हे करण्यातली धूर्तता माझ्या नजरेत भरते आणि मी त्याला दाद देतो.पण शेवटी त्याने चूक केलीच आणि मी त्याच्याभोवतीचं जाळं पक्कं करत गेलो. तीन दिवसात, म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत मॉरीयार्टी त्याच्या टोळीसहित पोलीसांच्या ताब्यात असेल. तो खटला आजतागायतचा सर्वात मोठा खटला असेल आणि जवळजवळ चाळीस जुन्या गुन्ह्यांमागचे गूढ उलगडेल.पण जर घाई केली तर सर्व जुळून आलेलं बिघडेल आणि मॉरीयार्टी पुराव्याअभावी निसटेल.'

'पण मॉरीयार्टी प्रचंड हुशार माणूस आहे. माझी प्रत्येक खेळी त्याला माहित होती. प्रत्येक वेळी तो सुटायचा प्रयत्न करत गेला पण मी त्याच्यावर मात केली. आमची दोघांची जुगलबंदीच चालू होती. त्याने वार करायचा, मी परत सवाई वार करायचा असं चालू होतं. आता मी माझी शेवटची खेळी खेळली आणि मला सगळं पूर्ण करायला फक्त तीन दिवस हवे होते'

'मी माझ्या खोलीत हाच विचार करत बसलो होतो आणि मॉरीयार्टी माझ्या समोर उभा राहिला. तसं त्याला मी पूर्वी काहीवेळा पाहिलं होतं. कायम अभ्यासात असल्याने पोक आलेले त्याचे खांदे, थोडी पुढे असलेली मान. त्याची मान थोडीशी हलवण्याची लकब मला एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याची आठवण करुन देते. तो माझ्याकडे रोखून पाहत होता.'
'पायजम्याच्या खिशात लोडेड शस्त्रं ठेवणं धोकादायक आहे. तुम्हाला हे कळण्याइतकी अक्कल असेल असं वाटलं होतं.' मॉरीयार्टी म्हणाला.
('खरंतर मी मॉरीयार्टीला पाहूनच धोका ओळखला होता आणि खणातलं पिस्तूल पटकन खिशात सरकवलं होतं. मला माहित होतं की आता त्याच्या सुटकेसाठी मला मारुन सर्व तपासावर पडदा टाकणं हा एकच मार्ग त्याच्यापुढे होता.' होम्स म्हणाला.)
'तुम्ही मला ओळखत नसालच.' मॉरीयार्टी म्हणाला.
'उलट माझ्याइतकं चांगलं तुम्हाला कोणीच ओळखत नसेल. जर तुम्हाला काही सांगायचं असलं तर पाच मिनीटं वेळ मी निश्चित देऊ शकतो. खुर्ची घ्या.' (होम्स म्हणाला.)
'मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही ओळखलं असेलच.' मॉरीयार्टी म्हणाला.
'मग माझं त्याच्यावर उत्तर काय असेल हे तुम्हीपण ओळखलं असेलच.' होम्स म्हणाला.
'तुम्ही आपला निर्णय बदलणार नाही म्हणायचं तर?' -मॉरीयार्टी.
'अर्थात.' -होम्स.
'मॉरीयार्टीने खिशात हात घातला आणि एक नोंदवही काढली.' होम्स सांगत होता.
'४ जानेवारीला तू पहिल्यांदा माझ्या वाटेत आलास.' मॉरीयार्टी म्हणाला. '२३ जानेवारीला तुझ्या हालचालींनी मला काळजीत टाकलं, फेब्रुवारीपर्यंत तू माझ्या कामात बऱ्यापैकी गैरसोय केलीस, आणि मार्चपर्यंत माझ्या योजना तुझ्यामुळे अडायला लागल्या. आणि आता, एप्रिलमधे तू माझ्यासाठी अशी परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहेस की तुला थांबवलं नाही तर माझं स्वातंत्र्य धोक्यात आहे.' मॉरीयार्टी म्हणाला.
'तुम्हाला काही म्हणायचं आहे का?' होम्स शांतपणे म्हणाला.
'तू हे सर्व सोडून दे, खरंच सांगतो.' मॉरीयार्टी म्हणाला.
'सोमवार नंतर.' होम्स म्हणाला.
'अरेरे! तू समजत नाहीयेस, होम्स. तुला माहिती आहे याचा परिणाम काय होईल. आमच्याकडे तो एकच मार्ग उरला आहे.पण तू माझ्या तोडीस तोड बुद्धीमान आहेस आणि मला असा काही टोकाचा निर्णय घेताना वाईट नक्की वाटेल.' मॉरीयार्टी थंडपणे म्हणाला.
'धोक्यांशी मी रोजच खेळत असतो.' होम्स.
'पण हा धोका नाही, तुझा विनाश आहे. तू एका प्रबळ यंत्रणेच्या विरुद्ध उभा राहिला आहेस. आमची कुवत तुला माहित नाही. तू बाजूला होत नसशील तर चिरडला जाशील.' -मॉरीयार्टी.
'मी उठलो आणि म्हणालो, 'माफ करा, पण मला काही महत्त्वाचे काम आहे.' होम्स सांगत होता.'मॉरीयार्टी उठला आणि त्याने हताशपणाचा आव आणून मान हलवली.' होम्स म्हणाला.
'ठिक आहे तर.' मॉरीयार्टी म्हणाला. 'मला जे करता आलं ते मी केलं. मला तुझी प्रत्येक खेळी माहिती आहे. तुला वाटतं की तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करशील. मी तुला सांगतो मी आरोपीच्या पिंजऱ्यात कधीच उभा राहणार नाही. तुला वाटतं तू मला हरवशील. पण मी तुला सांगतो की मी कधीच हरणार नाही. जर तू माझा नाश करण्याइतका स्वत:ला हुशार समजत असशील तर तुला सांगतो, मी पण तुझा काटा काढू शकतो.' मॉरीयार्टी म्हणाला.
'तुम्ही माझी स्तुती करत आहात, मॉरीयार्टी. मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छीतो की समाजाच्या हितासाठी मी जे होईल ते स्विकारायला तयार आहे.' होम्स म्हणाला.
'मी तुला नक्की बघून घेईन.' मॉरीयार्टी म्हणाला आणि खोलीबाहेर गेला.

'तर अशी माझी आणि मॉरीयार्टीची भेट झाली. मी थोडा अस्वस्थ झालो. कारण धमक्या दिल्या नाहीत तरी त्याच्या शांत आणि थंड बोलण्याच्या पद्धतीने मला सांगितलं की तो काहीही करु शकतो. आता तू म्हणशील वॅटसन, की तू पोलीस सुरक्षा का घेत नाहीस म्हणून, पण मला खात्री आहे, यावेळी वार त्याच्याकडून नाही, त्याच्या माणसांकडून होईल. माझ्याकडे आत्ता या क्षणी पुरावे आहेत.' होम्स म्हणाला.

'म्हणजे तुझ्यावर हल्ला झालेला आहे?' मी चकित होऊन विचारलं.
'वॅटसन, तुला काय वाटलं, मॉरीयार्टी स्वस्थ बसून राहील? मी आज काही कामानिमित्त ऑक्सफर्ड मार्गावर गेलो होतो. मी बेंटीक रस्त्याच्या कोपऱ्याला आलो आणि अचानक दोन घोड्यांची एक गाडी माझ्या अंगावर आली. मी पटकन फुटपाथावर उडी घेतली म्हणून थोडक्यात वाचलो. ती गाडी क्षणात एका गल्लीत घुसून दिसेनाशी झाली. त्यानंतर मी फुटपाथावरूनच चालत होतो. पण व्हेर मार्गावर आलो तशी वरुन कुठूनतरी एक वीट माझ्या पायावर पडली आणि पायाचा जवळजवळ भुगा झाला.मी ताबडतोब पोलिसांना कळवून त्यांनी ती इमारत तपासली. पण इमारतीच्या छतावर विटांचा ढीग रचून ठेवला होता आणि पोलिसांनी माझी समजूत घातली की वीट वाऱ्याने पडली. मला तसं अजिबात वाटत नव्हतं, पण जे मला वाटत होतं ते मी त्यांच्यासमोर सिद्ध करु शकलो नाही. त्याच्यानंतर मी गाडी करुन सरळ माझ्या भावाकडे गेलो आणि तिथेच दिवस घालवला. आता तुला भेटायला येत होतो, तर एक गुंड माझ्यावर लाठी घेऊन धावून आला. मी त्याच्याशी यशस्वी झुंज दिली आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पण पोलीस त्या गुंडाचा फळ्यावर गणितं मांडणाऱ्या कोण्या विद्वान गणित प्राध्यापकाशी काही संबंध आहे हे स्वप्नातही शोधू नाही शकणार. आता तुला आश्चर्य वाटणार नाही, की मी तुझ्या खोलीत आल्या आल्या खिडक्या दारं का बंद केली आणि गुपचूप मागच्या दाराने निसटायचं का म्हणतोय ते.' होम्स एका दमात म्हणाला.

माझ्या मित्राचं असामान्य धैर्य मी बऱ्याच प्रसंगात पाहिलं आहे, पण आज एकाच दिवसात इतक्या जोखमीच्या प्रसंगातून गेल्यावर पण त्याला हे सर्व शांतपणे माझ्यापुढे सांगताना पाहून मला त्याच्या हिमतीचं कौतुक वाटलं.
'मग तू रात्री मुक्कामाला आहेस ना?' मी विचारलं.
'नाही रे बाबा. सध्या मी तुझा पाहुणा बनणं तुला पण धोकादायक आहे. त्यापेक्षा माझ्याकडे दुसरी एक योजना आहे. पोलीस आता माझ्या मदतीशिवाय त्याला अटक वगैरे निश्चित करु शकतील, पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध करायला मात्र मी इथे असणं आवश्यक आहे. मला वाटतं की मी काही दिवस कुठेतरी अज्ञातवासात राहणं हाच सर्वात चांगला उपाय आहे. आणि तू माझ्यासोबत मध्य युरोपात आलास तर चांगलंच.'
'सध्या माझ्याकडे जास्त रोगी नाहीत. आणि माझा शेजारी काही दिवस काम सांभाळू शकेल. मी येईन तुझ्याबरोबर.' मी म्हणालो.
'मी उद्या निघू म्हटलं तर?' होम्स म्हणाला.
'जर तशी गरज असेल तर चालेल की.'
'गरज तर आहेच. आणि आता माझ्या सूचना नीट ऐक. तू त्या तंतोतंत पाळाव्यास अशी माझी इच्छा आहे, कारण यावेळी आपली गाठ युरोपातल्या सर्वात हुशार आणि बलाढ्य गुन्हेगाराशी आहे. हां, तर ऐक, तू तुझं सामान कोणीतरी विश्वासू माणसाकडून आधीच पाठवून देशील. सकाळी तू गाडी मागवशील ,आणि तुला स्वत:हून विचारणाऱ्या गाडीत बसणार नाहीस. गाडीवाल्याला लॉथर आर्केडचा पत्ता सांगशील आणि हातात भाडं तयार ठेवून उतरायच्या जय्यत तयारीत राहशील. गाडी थांबल्याथांबल्या उतरुन आर्केडच्या दुसऱ्या टोकाला जाशील. तुला सव्वानऊपर्यंत तिथे पोहचायलाच हवं. तिथे लाल कॉलरीच्या काळ्या कोटात नखशिखान्त झाकलेला माणूस एका गाडीत तुझी वाट पाहत असेल. या गाडीतून तू जाशील आणि व्हिक्टोरिया स्टेशनावर काँटिनेंटल एक्सप्रेस पकडशील.' होम्सने आपली योजना सांगितली.

'पण तू मला कुठे भेटशील?'
'स्टेशनावरच. इंजिनापासून दुसरा डबा आपल्यासाठी राखून ठेवलेला असेल.'
'म्हणजे तो डबा ही आपली भेटायची जागा ना?'
'हो' होम्स म्हणाला.

मी होम्सला थांबण्याचा खूप आग्रह केला. पण त्याला वाटत होतं की त्याच्या थांबण्याने तो माझ्यावर आणि या घरावर संकटाचे सावट आणेल. परत एकदा उद्याच्या योजनेबद्दल सांगून तो मागच्या कुंपणावरुन उडी मारुन मॉर्टीमर रस्त्यावर आला आणि पटकन गाडी बोलावून क्षणार्धात गायब झाला.
दुसऱ्या दिवशी मी होम्सच्या सूचना तंतोतंत पाळल्या.शक्य तितकी गुप्तता पाळून गाडी करुन लॉथर आर्केडवर उतरलो आणि पटकन आर्केडच्या टोकाला गेलो. तिथे एक गाडी आणि काळ्या कपड्यातला एक धट्टाकट्टा माणूस हजर होतेच.मी बसल्याबसल्या माणसाने वेगाने घोडे पिटाळले. आणि स्टेशनावर मी उतरतो न उतरतो तोच तो गाडी वळवून मागे पण न पाहता निघूनही गेला.

आतापर्यंत तरी सगळं ठरवल्याप्रमाणे नीट पार पडलं होतं. मला सामान मिळालं आणि आमचा राखीव डबापण. पण होम्सचा मात्र पत्ताच नव्हता. इतक्यात तिथे एक वृद्ध इटालियन धर्मगुरु आला आणि तो रेल्वेच्या माणसाला त्याच्या अचाट मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये सांगू लागला की त्याचे सामान पॅरीसला न्यायची नोंद करायची आहे. मी त्याचा मदतीला गेलो आणि त्यांचा भाषेमुळे चाललेला सावळागोंधळ मिटवला. होम्सची थोडावेळ वाट पाहून मी डब्याकडे जातो तर काय, रेल्वेच्या माणसाने त्या धर्मगुरुला माझ्याच राखीव डब्यात जागा दिली होती. मी त्याला खूप समजावले की माझे इटालियन भाषेचे ज्ञान त्याच्या इंग्लिशपेक्षाही तुटपुंजे आहे. आणि डबा राखीव आहे. पण त्याने ऐकले नाही. शेवटी मी वैतागून खांदे उडवले आणि होम्सची वाट बघू लागलो. आता मला भिती वाटायला लागली की होम्सचं काही बरंवाईट तर नाही ना झालं? गाडीची शिट्टी वाजली, दारं पण बंद झाली आणि अचानक..

'वॅटसन, तुझ्या मित्राला साधं 'सुप्रभात' पण करणार नाहीस?' एक आवाज आला. मी जवळजवळ उडालोच. बघतो तर काय, त्या वृद्ध धर्मगुरुने माझ्याकडे चेहरा वळवला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसेनाश्या झाल्या, फेंदारलेले नाक सरळ झालं, खालचा लोंबणारा ओठ जागेवर आला, आणि मला माझा होम्स दिसला!! दुसऱ्याच क्षणी त्याने आपला धर्मगुरु अवतार परत आणला.
'होम्स!! मी केवढा दचकलो!' मी उद्गारलो.
'अजून धोका टळलेला नाही. ते मागावर आहेतच. अरे, तो बघ, मॉरीयार्टी.' होम्स म्हणाला.
मी पाहिलं, एक उंच माणूस गर्दीतून वाट काढत येत होता आणि गाडी थांबवायला इशारे करत होता.. पण गाडीने वेग घेतला आणि स्टेशनाच्या बाहेर गेली, त्यामुळे तो काहीच करु शकला नाही.होम्स हसत म्हणाला, 'बघितलंस? आपण येवढी काळजी घेऊन पण तो किती जवळ आला होता?' आणि त्याने त्याची धर्मगुरुची टोपी काढून पिशवीत टाकली.

'आजचा पेपर वाचलास का वॅटसन?'
'नाही.'
'म्हणजे तुला बेकर स्ट्रीटची बातमी माहिती नसेलच. त्यांनी आपल्या खोल्यांना आग लावली काल रात्री. अर्थात फारसं काही नुकसान झालं नाही म्हणा.'
'बापरे, होम्स! ही म्हणजे हद्दच झाली.'
'मला वाटतं, त्या गुंडाला अटक झाल्यावर त्यांचा माग जरा चुकला, नाहीतर त्यांना असं वाटलंच नसतं की मी बेकर स्ट्रीटला खोलीवर परत आलो आहे. अर्थात त्यांनी तुझ्यावर पाळत चांगली ठेवली आणि त्यामुळे तो व्हिक्टोरिया स्टेशनावर आपल्या मागावर आलाच. बरं, तू माझ्या सूचना नीट पाळल्यास ना?' होम्सने विचारले.

'हो, अगदी अक्षर न अक्षर.'
'तुला घोडागाडी मिळाली?'
'हो ती थांबलेलीच होती.' मी म्हणालो.
'तू गाडीवानाला ओळखलं नसशील ना? तो माझा भाऊ मायक्रॉफ्ट होता. अशा वेळी आपल्या अगदी विश्वासू किंवा रक्ताच्या नात्यातल्या माणसांवरच विसंबता येतं. बरं ते जाऊदे, आपण मॉरीयार्टीचं काय करायचं आहे आता?'
'त्याचं काय? आता आपली गाडी तर निघाली आणि पुढची आपण पकडणार आहे ती बोट पण पोहचल्यावर लगेच आहे. आपण त्याला हुलकावणी दिली आहे.'
'वॅटसन,मी तुला काय म्हणालो होतो? तो मला तुल्यबल टक्कर आहे. आणि तुला काय वाटतं, येवढ्याश्या अडथळ्याने तो माघार घेईल? मी घेतली असती का?'
'मग, तुला काय वाटतं? तो काय करेल?'
'मी जे केलं असतं तेच.'
'पण तू काय केलं असतंस?'
'दुसरी गाडी पकडली असती.'
'पण आतातर उशीर झाला आहे.'
'अजिबात नाही. आपली गाडी कँटरबरीला थांबते. आणि बोट बऱ्याचदा पंधरा एक मिनिट उशिरा असते. तो आपल्याला तिथे नक्की गाठेल.' होम्स म्हणाला.
'पण मी म्हणतो, आपण असं चोरासारखं त्याला का घाबरायचं? तो बंदरावर आल्या आल्या पोलिसांकडून त्याला अटक करवू. प्रश्नच मिटला.' मी म्हणालो.

'अशाने तीन महिन्यांची मेहनत वाया जाईल. मोठा मासा तर जाळ्यात सापडेल, पण लहान सहान मासे मात्र निसटून जातील. सोमवारपर्यंत धीर धरला तर सगळेच मासे आपल्या जाळ्यात असतील.' होम्स म्हणाला.
'बरं, मग काय करायचं म्हणतोस?'
'कँटरबरीला उतरायचं.'
'मग?'
'तिथून आपला आधीचा रस्ता बदलून न्यूहेवनला जायचं, तिथून डाइप ला. मॉरीयार्टी असं करेल की तो आपली सामानाची नोंद बघून त्याप्रमाणे पॅरिसला उतरुन दोन दिवस आपण सामान घ्यायला यायची वाट बघेल. यादरम्यान आपण मोजकंच सामान घेऊन भटकायचं आणि लक्झेंबुर्ग, बाजलं मार्गे स्वित्झरलँडला जायचं.'

तसा मी सामानाअभावी अडून बसणारा प्रवासी नाही, पण एका गुन्हेगारासमोर आपणच गुन्हेगार असल्याप्रमाणे लपतछपत प्रवास करण्याच्या कल्पनेने मी जरा चिडलोच होतो. अर्थात, होम्स जे करत होता ते होम्सला स्वत:ला चांगलं माहिती होतं. आम्ही कँटरबरीला उतरलो. न्यूहेवनच्या गाडीला अजून एक तास अवकाश होता. मी जरा हताश होऊनच आमच्या सामानासहित पुढे जाणाऱ्या सामानाच्या डब्याकडे बघत होतो, तितक्यात होम्सने माझी बाही ओढली आणि एके ठिकाणी माझं लक्ष वेधलं.'ते बघ.' होम्स म्हणाला.एक इंजिन धूर सोडत आमच्या समोरुन गेलं. आम्ही पटकन ते समोर येण्या आधीच सामानाच्या ढिगा आड दडलो म्हणून बरं.'हाहा! म्हणजे इथे मॉरीयार्टीच्या बुद्धीला मर्यादा आहेत. जर त्याने मी काय करणार हा नीट विचार करुन तसंच केलं असतं तर मात्र आपली पंचाईत होती.' होम्स म्हणाला.

'आणि समजा त्याने आपल्याला गाठलं असतं तर काय केलं असतं?' मी विचारलं.
'शंकाच नाही. त्याने माझ्यावर नक्की खुनी हल्ला केला असता. पण ते जाऊदे, आता प्रश्न असा आहे की आपण आता इथे खायचं की न्यूहेवनला जाऊनच खायचं?' होम्सने विषय बदलला.
त्या रात्री आम्ही ब्रुसेल्स ला पोहचलो आणि तिथे दोन दिवस मुक्काम केला. नंतर आम्ही स्ट्रासबुर्गला गेलो. होम्सने तिथून सोमवारी लंडन पोलिसांना तार केली. पण तारेच्या उत्तराने मात्र तो वैतागला आणि त्याने तार दूर भिरकावली.
'मॉरीयार्टी निसटला. त्यांनी त्याच्या पूर्ण टोळीला अटक केली पण तो मात्र पोलिसांना गुंगारा देऊन निसटला. वॅटसन, आता हा खेळ जास्त जोखमीचा झाला आहे आणि मला वाटतं की तू लंडनला परत जावंस.' होम्स गंभीरपणे म्हणाला.
'का पण?'
'आता माझ्याबरोबर राहिलास तर तुलापण धोका आहे. मॉरीयार्टीचा बुरखा फाटला आहे आणि मी जर त्याला बरोबर ओळखत असलो तर तो आता आपली पूर्ण ताकत माझ्यावर सूड उगवण्यात पणाला लावेल. तू जर परत गेलास तर बरं होईल.'

अर्थातच मी ऐकणाऱ्यातला नव्हतो कारण मी त्याचा चांगला मित्र होतो. आम्ही स्ट्रासबुर्गमध्ये काहीकाळ या मुद्द्यावर वाद घातला आणि सरतेशेवटी दोघेही जिनीव्हाला गेलो.
नंतरचा पूर्ण आठवडा आम्ही मजेत घालवला. ऱ्होनच्या दरीत भटकलो, आणि ल्युक आणि जेमी फाट्यामार्गे इंटरलाकेन आणि तिथून पुढे मिरींगनला गेलो. अर्थातच ती सफर सुंदर होती, पण पूर्ण प्रवासभर क्षणभरही होम्स आपल्यावर असणाऱ्या संकटाच्या सावलीचे अस्तित्व विसरला नव्हता. आजूबाजूचा प्रत्येक चेहरा बारीकपणे न्याहाळणारी नजर पाहूनच मला कळत होतं की त्याला खात्री आहे की कितीही दूर गेलो तरी आम्ही त्या धोक्यापासून सुटू शकणार नव्हतो..

मला आठवतं, आम्ही भटकत असताना एक दगड वरुन गडगडत आला आणि नदीत पडला. होम्सने पटकन वर चढून कोणी दिसतं का याचा शोध घेतला. अर्थात आमच्या वाटाड्याने आम्हाला सांगितलं की इथे अशा दरडी अधून मधून कोसळतच असतात, पण होम्सचा विश्वास बसला नव्हता. तो बोलला काहीच नाही, पण माझ्याकडे बघून एखाद्या जाणकार माणसासारखा हसला. 'बघ, माझे अंदाज खरे ठरत आहेत!' तो मूकपणे मला सांगून गेला.

पण इतकं असूनही होम्स निराश झाला नव्हता. तो पूर्ण सफरभर उत्साही होता. काहीवेळा तो असेही म्हणाला की मॉरीयार्टीसारखा गुन्हेगार समाजातून जाण्याच्या बदल्यात तो आपली कारकीर्दही सोडून द्यायला तयार आहे.. 'वॅटसन, आतापर्यंतच्या माझ्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर मी समाधानी आहे. मी कुठेही असत्याची बाजू घेतलेली नाही. अन्यायाची साथ दिलेली नाही. बघ, तुझ्या माझ्या कामगिऱ्यांच्या आठवणी माझी ही सर्वात उच्च कामगिरी नोंदून संपतील.माझ्या कारकीर्दीतली ही श्रेष्ठ कामगिरी असेल, जेव्हा मी मॉरीयार्टीला गजाआड करेन.'

मी आता जास्त पाल्हाळ लावत बसत नाही, कारण या आठवणी माझ्यासाठी पण अप्रिय आहेत. पण मला आवश्यक ते तपशील सांगणं भाग आहे.

३ मेला आम्ही मिरींगनला पोहचलो आणि एका हॉटेलात उतरलो. आमचा मालक तीन वर्षे लंडनला एका हॉटेलात वेटर म्हणून राहिलेला असल्याने त्याला उत्तमपैकी इंग्लीश येत होतं. त्याच्या सल्ल्यावरुन आम्ही दुसऱ्या दिवशी डोंगरापलीकडे असलेल्या एका प्रेक्षणीय स्थळी जायला निघालो. अर्थात आम्हाला सांगितलं गेलं होतं की राइनबाख धबधबा अत्यंत सुंदर आहे आणि त्याला भेट देण्याची संधी गमावू नये. म्हणून आम्ही तिथे गेलो.

राइनबाख धबधबा सुंदर असला तरी जरा धोकादायक जागा आहे. वितळलेल्या बर्फामुळे खोल दरी तयार झाली आहे आणि धबधबा खूप उंचावरुन खाली कोसळतो.वरचा कडा जरा निमुळता आहे. धबधब्याची उंची पाहून कधीकधी गरगरल्यासारखं होतं, इतका तो उंच आहे. धबधब्याचा मार्ग वरपर्यंत गेला आहे. पण वर जाऊन पुढे तो संपला आहे आणि गेलेल्याला त्याच वाटेने परत यावे लागते. दुसरी वाटच नाही. आम्ही परत जायला वळलो, तितक्यात एक स्थानिक तरुण आम्हाला घाईघाईने वाट चढताना दिसला. त्याच्या हातात हॉटेलमालकाचं माझ्या नावाने पत्र होतं. कागदही हॉटेलाच्या शिक्क्याचा होता. पत्रावरुन असं दिसत होतं की एक इंग्लिश स्त्री हॉटेलात अचानक खूप आजारी पडली होती आणि काही क्षणांची सोबती होती. पण मरण्या आधी तिला जर इंग्लिश डॉक्टरकडूनच उपचार मिळाले तर तिला थोडाफार विसावा मिळाला असता. त्यामुळे जर मी परत हॉटेलात येऊ शकलो तर बरे होईल इ.इ.इ.

अर्थातच मी ही विनंती नाकारु शकत नव्हतो. पण मला होम्सला एकटे सोडून जाववत नव्हते. शेवटी असं ठरलं की होम्स त्या स्विस माणसाबरोबर राहील आणि तो माणूस त्याला परतीच्या वाटेवर साथ करेल. मी परत निघालो. निघताना मी मागे वळून पाहिलं तर होम्स हाताची घडी घालून एका खडकाला टेकून उभा होता आणि त्या विशाल धबधब्याकडे पाहत होता.

मला माहिती नव्हतं की माझ्या प्रिय मित्राचं, होम्सचं हे शेवटचं दर्शन होतं..

खाली उतरताना मी परत वळून पाहिलं. वाट वेडीवाकडी असल्याने मला धबधबा दिसणं तर शक्यच नव्हतं पण त्या वाटेवर दूर मला एक माणूस घाईघाईने वाट उतरताना दिसला. पुढे माझ्या परतण्याच्या घाईत मी ही घटना विसरुन गेलो. मिरींगनला हॉटेलावर परत आलो तर मालक बाहेर उभा होता. मी घाईत विचारलं, 'आता ती कशी आहे? मला उशीर झाला का?'
त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या काळजात एकदम धस्स झालं.
मी पत्र दाखवलं. 'म्हणजे हे पत्र तुम्ही नाही लिहिलं? इथे कोणी आजारी इंग्लिश बाई नाही??'
'नाही! पण हा तर हॉटेलाचा कागद आहे. हे त्या उंच माणसाने लिहिलं अ...'पण मी पुढचं ऐकायला थांबलोच नाही. मी परतीच्या वाटेला ताबडतोब निघालोच. तरी मला राइनबाख ला पोहचायला तीन तास लागले.

राइनबाख चढून मी परत त्या जागी गेलो. पण होम्सचा पत्ता नव्हता आणि त्या स्विस तरुणाचा पण. होम्सची एक वस्तू मात्र तिथे होती. म्हणजे होम्स गेला नव्हता.. तिथेच त्याच्या शत्रूने त्याला गाठला होता. मी होम्सच्या तपासाच्या पद्धतीने डोकं शांत ठेवून काही धागा दिसतो का शोधायला लागलो. अचानक काहीतरी चकाकणाऱ्या वस्तूवर माझी नजर गेली. ती होम्सची सिगारेटची डबी होती. मी ती उचलली तर एक कागदाची घडी खाली पडली. मी ती उलगडली. ती होम्सच्या वहीतून फाडलेल्या तीन कागदांची चिठ्ठी होती आणी माझ्याच नावे होती. अक्षर तेच माझ्या मित्राचं ओळखीचं अक्षर होतं. स्थिर आणि आपल्याच खोलीत बसून शांतपणे लिहिल्यासारखं. पत्रात लिहिलं होतं:

'प्रिय वॅटसन,मी हे पत्र मॉरीयार्टीच्या परवानगीने लिहितो आहे. आमच्यातल्या संघर्षाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तो माझी वाट पाहतो आहे. त्याने मला त्याच्या युक्त्या आणि पोलिसांना दिलेल्या चकव्यांबद्दल बरंच काही सांगितलं आहे आणि माझा त्याच्या बुद्धिमत्तेबद्दलचा आदर वाढला आहे. समाजातून मॉरीयार्टीसारख्या माणसाला हद्दपार करणं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, पण अर्थातच त्यासाठी जो मार्ग मला अवलंबावा लागणार आहे तो माझ्या प्रिय माणसांना, खास करुन तुझ्या सारख्या जिवलग मित्राला बराच दु:खद ठरणार आहे. मी तुला सांगितलंच होतं की ही माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी असेल आणि आता माझ्याजवळ दुसरा काही पर्यायच नाही. खरं सांगायचं तर मला तो निरोप घेऊन आलेला माणूस आणि त्याचा निरोप बनावट आहे हे माहीत होतं. पण एकदाची या प्रकरणाला काहीतरी निर्णायक दिशा मिळावी म्हणून मी तुला जाऊ दिलं. इन्स्पेक्टर पीयरसनला सांग की त्याला हवी असलेली कागदपत्रे एम तिजोरीत 'मॉरीयार्टी' असं लिहिलेल्या एका लिफाफ्यात आहेत. मी माझ्या इस्टेटीची वासलात इथे येण्या आधीच लावून आलो आहे आणि ती आता माझा भाऊ मायक्रॉफ्टच्या मालकीची असेल.वॅटसन, माझ्या प्रिय मित्रा, सौ. वॅटसनला माझे नमस्कार सांग.
-तुझाच,
शेरलॉक होम्स.'

त्या पत्राने मला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. तज्ज्ञांच्या तपासणीनुसार, होम्स आणि मॉरीयार्टीमधला संघर्ष त्या दोघांनी एकमेकांच्या मिठीत एकत्र दरीत उडी घेण्यात संपला असावा..तो स्विस माणूस परत सापडला नाही आणि तो मॉरीयार्टीचाच माणूस असावा यात शंका नाही. मॉरीयार्टीची सर्व टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली. आणि अत्यंत जड अंत:करणाने मला त्याच्या कामगिऱ्यांचा हा अखेरचा वृत्तांत लिहावा लागतो आहे. यात मात्र शंका नाही की होम्स इतका श्रेष्ठ आणि बुद्धिमान माणूस मी आजतागायत पाहिला नाही.
- वॅटसन.


(समाप्त.)
फायनल प्रॉब्लेम चा स्वैर अनुवाद.
डॉयलने लिहिलेली/लिहायचं ठरवलेली ही शेवटची होम्स कथा. पण लोकाग्रहास्तव त्याला काही वर्षांनी होम्सला परत आणावे लागले. आणि यापुढे काही वर्षांनी परत होम्स कथा सुरु झाल्या. पण होम्सच्या परतीचा वृत्तांत परत कधीतरी..
-अनुराधा कुलकर्णी

1 comment:

Anonymous said...

सुंदर अनुवाद. होम्सच्या शेवटाची ही कथा माझ्या वाचनात नव्हती. मराठीतून होम्स वाचणे अतिशय आनंददायी आहे. अनेक धन्यवाद.