(रोज २)थरारक प्रवास
"चिर्रर्र ऽऽ!!! बाजूऽऽ!!" 'आपल्याच बापाचा रस्ता. वाहने येत असली म्हणून काय? थांबतील मी जाईपर्यंत. ' म्हणून आरामात रस्ता ओलांडणारा एक माणूस. विद्युतघट संपल्यामुळे घसा बसलेल्या दमेकऱ्यासारखा कष्टाने वाजणारा अनुच्या दुचाकीचा भोंगा. कानात कुजबुजल्यासारखा हळूच 'चिर्र ऽऽ' किंवा 'पिर्र ऽऽ' आवाज करणारा हा भोंगा ऐकू जाणार कोणाला? म्हणून लगेच 'बाजू ऽऽ' हा मानवी भोंगा पण अनुने वाजवला आणि दुचाकीचा गतिरोधक करकचून दाबला. महान माणूस विजयी हास्य करत मंदगतीने रस्ता ओलांडून गेला. "xxxxxx!! तुझ्या बापाचा रस्ता काय रे नालायका?" अनुने मनातल्या मनात जोरात एक शिवी देऊन घेतली आणि दुचाकीचा गतिवर्धक पिळला.
रोज संध्याकाळी तोच रस्ता. तीच तुंबलेली रहदारी. 'जीवाची काळजी घ्यायला तो खुदा बसलेला आहेच. हाणा बिनधास्त वेडीवाकडी गाडी.' या महान विचारसरणीचे पुणेरी दुचाकी, त्रिचाकी आणि चौचाकीकर...पाऊस बदाबदा कोसळतोय. रस्त्यावर 'वॉटर पार्क' मधल्या पाण्याच्या घसरगुंडीसारखे घोटाभर पाणी. 'दुचाकीला सर्दी होऊन तिने भर रहदारीत संप पुकारला तर' या विचाराने टरकीफाय झालेली अनु. तितक्यात वाहतूक दिवा लाल झाला आणि रहदारी थांबली. दिवा लाल झाला तरी 'वाहतूकमामा कुठे दिसत नाहीयेत. जाऊ पटकन' म्हणून एक बाईकस्वार सुर्रकन पुढे पसार होतो. बाकी थांबलेले दुचाकीस्वार द्विधा. 'उगाच थांबलो ईमानदारीत. गेलो असतो पटकन.'
वाहतूकदिवा लाल असताना १-२ मिनीटात मासिके विकणारा पोऱ्या धावत आला. 'कसं चालत असेल बाई बिचाऱ्याचं..किती कठिण इतक्या कमी वेळात विकणं. आणि एखादा पैसे न देता पुढे गेला तर. घेऊन टाकावं का एखादं 'भारत आज'' असे कनवाळू विचार अनुच्या मनात यायला लागले. पोऱ्याने 'हिच्याकडे आंग्ल मासिक विकत घेऊन वाचण्याइतके पैसे असतील का' हा मूक अंदाज घेतला आणि तो पळत शेजारच्या 'होंडा शहर' वाल्यापाशी जाऊन मासिके फडकाऊ लागला.
लाल दिवा हिरवा व्हायला २० सेकंद.. मागच्या सर्व गाड्यांचे भोंगे वाजू लागतात आणि १५ सेकंद अजून उरली असूनही पुढच्या रांगेतले स्वार भरधाव सुटतात. एकाच दुचाकीवर स्वार ३ चहासदरे आणि उलट्या टोप्याधारी तरुण भोंगा वाजवत नागमोडी रस्ता काढत पुढे जातात. 'बिनदास आगे जानेका भिडू. जादा सोचनेका नही. रुल्स तो बेवकूफ लोग फॉलो करते है!! ऐसा झेंडू के माफिक रुलसे गाडी चलायेगा तो पार्टीमे लेट हो जायेगा!!' मागचा तरुण पुढच्या टोपीधारी सारथ्याला सांगत होता. 'आपली महागडी गाडी आणि मुलगा जोरात गाडी हाणतो म्हणून आईबापाच्या जीवाला लागलेला घोर याची या मुलांना कधीच काळजी नसेल? किती दिवस चुका करुन वाचणार? एक अपघात एक दिवस सगळ्याची वाट लावेल.' अनुचे पोक्त विचार.
डावीकडे वळायचं आहे, पण इतक्या गर्दीतून बाजू बदलणार कधी? दुचाकीला आरसे नाहीत. नुसता वळणदर्शक दिवा मिचकावत वळावे तर मागचे सर्व चालक समजूतदार असतीलच असं पण नाही. म्हणून अनु चांगली २ वळणं आधीपासूनच डाव्या बाजूला येते. पण आधीच्या २ वळणांवर वळणाऱ्याना अनुची ही दूरदृष्टी मंजूर नाही.. 'वळायचं नाही तर साईड ब्लॉक का करता' म्हणून तणतणून एक काका टक्कर टाळून वळतात.
घर जवळ येत आहे. आता बस ४ किमी आणि २ वळणं. अनुचा वेग नकळत वाढतो. तितक्यात दुचाकी 'माझं पोट रिकामं होतंय, मी बंद पडणार' म्हणून इशारा देते. आता आली का पंचाईत. रस्त्याच्या मधून बाजूला अचानक जावं लागणार. अनु हात वर करुन मागच्यांना इशारा देऊ पाहते. (तो इशारा अनु सोडून कोणालाच समजत नाही.) हळूहळू अनु दुचाकी बाजूला घेते. आसपासचे स्वार 'काय चक्रम बाई आहे' म्हणून पुढे जातात..आता दुचाकी तिच्या पक्क्या पायांवर लावून लाथ मारायच्या दांड्याला लाथा मारुन अनु दुचाकीला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करते. शेवटचा रामबाण उपाय!! बजाजच्या दुचाकीप्रमाणे तिला कलती करणे. (असं केल्याने नक्की काय होतं हो?) रामबाण उपाय लागू पडतो आणि दुचाकी सुरु होते.
आता ते आडबाजूचं वळण. समोरुन गाड्या सुसाट वेगाने.. वळण लवकर दिसतच नाही. पण हा बिकटमार्ग पत्करुन १ किमी इंधनबचत होते. अनुसारखाच विचार करणाऱ्या २ दुचाकीस्वार काकू वळायला लागतात. समोरुन वेगाने जाणाऱ्या तरुणाला त्या मानेने 'आम्ही आधी जाणार' खुणावतात. तरुण त्या खुणेचा 'तू जा आम्ही थांबतो' असा सोयीस्कर अर्थ काढतो. आणि मग.. एक टक्कर. तरुणाच्या गाडीचा दिवा आणि काकूंच्या गाडीचे कंबरडे धारातिर्थी पडते आणि एक सुंदर भांडण सुरु होते. पण अनुला ते बघायला वेळ नाही. भांडणामुळे मोकळ्या झालेल्या रस्त्यावर तिला वळायचे आहे.
आता शेवटचं बिबवेवाडी वळण. भाजी घेणाऱ्या बायका, आईचा हात धरुन फिरायला निघालेली देवाघरची फुले, संध्याकाळचा फेरफटका करणारी आजोबामंडळी,मैत्रिणींबरोबर फिरणारी प्रेक्षणीय स्थळं, गाड्या उभ्या करुन मित्रांबरोबर पक्षीनिरीक्षणार्थ थांबलेली तरुण मंडळी यातून आट्यापाट्या खेळत अनु घरी येते.
'युद्धभूमीवर लढणारे सैनिक धोक्यात खरे, पण आपण रोज दोनदा रहदारीत दुचाकी चालवून आपला जीव कितपत सुरक्षित आहे? जीवन नश्वर आहे. आत्मा अमर आहे. आणि पुण्याचे वाहनचालकच आपल्या जीवनाचे कर्तेधर्ते परमेश्वर आहेत.' हा विरक्त विचार करुन अनु भाज्या चिरायला घेते....
(वि. सू. पुणेरी वाचकांना यात अतिशयोक्ती वाटल्यास हलकेच घ्यावे. आणि हा लेख केवळ निखळ विनोदार्थ लिहीला आहे. कोणालाही दुखावण्याचा हेतू मुळीच नाही.)
-अनुराधा कुलकर्णी
7 comments:
एकदम कर्रेक्ट....अनु. अजिबात अतिशयोक्ती नाही. हे तर रोजचच आहे.
मार्मिक मुद्दा, मस्त(funny) भाषेत... व्वा .. मज्जा आली. :)
खरं सांगायचं तर पुलंची आठवण आली, तुमचा लेख वाचुन....
anu...chaan lihilays...ek point....ha lekh lihitana tu ji shailee vaparleys...mhanaje tu ghari yetana manat je vichar aale....tasechya tase mandana...farch chaan...pan pratyek veli vinodi asaylach hava ka? kahi jaga khup chaan aahet, like masika viakanara mulaga....accident zala asunahi, nokala rasta jasta imp vatana....tya vinodapai kami explore zalya asa vatla...pan overall first class....
Pratisadabaddal dhanyavad.
'pan pratyek veli vinodi asaylach hava ka?' ase kahi nahi.As many famous people say, "People like to laugh. There are many difficulties in our life, which cannot be solved.The pains of those can be reduced by joking on them."
And of course, I have my serious self explored in some of my writings. But fear that people will be bored with them, so do not put them here much.
Very glad to hear frank comments. They always help improving the writing quality.
अंहं, मला असं म्हणायचं नव्हतं. विनोदी असणं वाईट नाही. प्ण त्या दोन प्रसंगात, मला असं वाटलं की विनोदानी, real stuff झाकोळला. बाकी लेख सुरेखंच आहे....बरं तुझी परवानगी न घेता, तुझ्या blog ची link माझ्या blog वर दिलेय. hope you dont mind...
ha ha ha.
maza aa gaya
masttt
I liked this one too - just that it seemed a bit too long towards the end - but not too much!
While reading this I was picturing my own rides to my home when I was in India and was pleasantly surprised that you were writing about the same ride that I used to take (I guess somewhere from laxminarayan to bibwewadi)
BTW, I did not agree with 'koham's' comment - I did not think you 'tried to' make it humorous.
आशुतोष बाळा पुलंच्या वाचनाचा अभ्यास वाढव. काशाला त्यांच्या आत्म्याला क्लेष देतो आहेस.
Post a Comment