माझा पिवळेपणाकडे प्रवास -६
यापूर्वी वाचा: खालचा 'भाग ५'
सोमवारच्या ऐवजी मंगळवारी डॉक्टरांनी पेशंटाला सोडायची परवानगी दिली. आज पूर्वकल्पना दिल्याने 'पेशंट' आणि पेशंटचा नवरा पण जाण्याच्या पूर्ण तयारीतच गाशा गुंडाळून बसले होते. आता 'बहिणी' आणि 'भावांशी' चांगली ओळख झाली होती. पटकन आवरुन खाली नाश्ता करायला गेलो. आजही आंघोळीला सूर्याने गरम पाणी दिले नाही ते नाहीच! नाश्ता करत होतो तर बालडॉक्टर त्याच्या सहकाऱ्यासोबत नाश्त्याला आला. आम्हाला खालीच पाहून तो सौम्य वैतागला. 'हे काय, तुम्ही अजून खालीच? आता दहाला मोठ्या डॉक्टरांचा राउंड आहे. लवकर खोलीत जा.'
मी पटकन खोलीत जाऊन रोगीपणाच्या भूमिकेत गेले. डॉ. आले आणि त्यांनी रोग्याला सोडायला परवानगी दिली. नवरोबा खाली पैसे द्यायला आणि कागदपत्रे घ्यायला गेले. आणि बहिणीने मला एक फीडबॅक फॉर्म आणून दिला. 'फीडबॅक फॉर्म' म्हटलं की माझ्या अंगात भलता उत्साह संचारतो. मागच्या वेळी कोकणात एका हाटेलाच्या फीडबॅक फॉर्म मधे 'शॉवर कर्टन एका ठिकाणी फाटला आहे.मालकाचे हॉटेलाकडे लक्ष नाही' इ.इ. लिहीले होते. नवरोबा अशावेळी जरा वैतागतो. 'नाही त्या ठिकाणी तुझा स्पष्टवक्तेपणा.आपण निघाल्यावर ते तो फॉर्म ठेवतात की त्याच्यात भेळ खातात आपल्याला काय माहित?' पण फीडबॅक फॉर्म म्हटलं की प्रेमपत्र लिहीत असल्यासारखं मी पानंच्या पानं लिहायला निघतेच. आज नवरोबा जवळ नसल्याने भरपूर लिहीले. सूर्य गरम पाणी या खोलीत देत नाही, कॉफी यंत्राची कूपने चौथ्या मजल्यावर विकत मिळायला हवीत, जेवणाचे दर जास्त आहेत, इ.इ. 'खोलीत डिव्हीडी प्लेयर ठेवा' आणि 'रोग्यांना त्यांच्या पैशाचा मोबदला म्हणून ज्या गायिकेचे इस्पितळ आहे तिचे एक गाणे रोज संध्याकाळी 'लाइव्ह' ऐकवा' इ. लिहीण्याचा बेत होता. पण नंतर परत इथेच येऊन 'टुचुक' करावे लागले तर उट्टे निघेल या भीतीने लिहीले नाही.
मी घरी आले आणि ताबडतोब परीचित व नातेवाईकांचा घरगुती औषधविषयक सल्ल्यांचा मारा सुरु झाला.
'दह्यात सोडा कालवून रोज सकाळी सकाळी खावे.'(स्वगतः दह्यात सोडा? पण चहाचे काय?)
'खुन्या मुरलीधराजवळ एक वैद्य आहे तो सकाळी सूर्याच्या प्रकाशात डोळे बघून निदान करतो आणि औषध देतो.'(स्वगतः आमचे नशिब असे की आमच्या वेळी बरोबर ढग यायचे!इस्पितळात पण सूर्याने पाणी कुठे तापवून दिलं?)
'लोणावळ्याला एक वैद्य आहे.भल्या पहाटे घरातून निघा आणि तिथे जा. मोठी रांग असते. तो दोन थेंब देतो.'(स्वगतः दोन थेंबांसाठी लोणावळा?)
'आमच्या समोर एक वैद्य राहतो तो फुकट औषध देतो. ते उकडलेल्या केळ्यात कालवून खायचं पटकन गुण येतो.'(स्वगतः उकडलेले केळे? व्या ऽऽऽ क!)
'लिंबू अजिबात खाऊ नका.'(स्वगतः पण इंटरनेटावर म्हणतात की सारखे लिंबूपाणी प्या.)
'रोज चार किमान वेळा तरी लिंबूपाणी द्या.'(स्वगतः पण आमचे शेजारी म्हणतात की लिंबू अजिबात टाळा.)
'मी तुम्हाला सांगतो,काविळीवर जगात कोणतेही ऍलोपाथिक औषध अजून निघालेलं नाही. तुम्ही ऍलोपाथिक औषधं आधी बंद करा पाहू!फक्त कडक पथ्यं पाळा आणि ताक भाकरी खा.तेलतूप अजिबात बंद ठेवा. असं तीन महिने करा.'(स्वगतः तीन महिने???बापरे!)
'होमियोपाथीची औषधे घ्या.ऍलोपाथीची बंद करा.'(स्वगतः का पण?दोन्ही चालू ठेवली तर ती एकमेकांना मारतात का?)
शेवटी होमियोपाथीची औषधे घ्यायची आणि ऍलोपाथीची पण चालू ठेवायची हा तोडगा निघाला. एका प्रसिद्ध तज्ज्ञाची वेळ ठरवली. हा तज्ज्ञ ज्या ठिकाणी राहतो असे सांगितले होते तिथे गेलो तर तिथे त्वचारोगाचा दवाखाना! चौकशीअंती कळले की हा 'हॉक्टर'(होमियोपाथी डॉक्टर) दुसरीकडे गेला होता. त्याचा पत्ता 'एस. एन. डि.टी. च्या जवळच कुठेतरी राहतो' असा कळला. आता जवळ म्हणजे उजवीकडे, डावीकडे, पुढे का मागे? 'ते नक्की माहित नाही. तिथे जाऊन विचारा.कोणीही सांगेल.'
आम्ही एस. एन. डी.टी. ला उतरलो आणि चौकशी करु लागलो. एकदोन जणांनी 'पुढे चांभार आहे त्या गल्लीत आहे' म्हणून सांगितले. तिथे गेलो तर तो 'बालरोगतज्ज्ञ' निघाला. आम्ही परत मागे आलो.त्या तज्ज्ञाकडे दूरध्वनी केला. सहकाऱ्याने सांगितले की 'एम. एस. इ.बी. च्या मागे आहे.' तिथे गेलो तर काहीच दिसेना. शेवटी शोधत 'स्वाद' हॉटेलापाशी आलो. आतले 'स्वाद' पोटाला खुणावत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत 'हॉक्टर' कडे दूरध्वनी केला.
'आम्ही इथे स्वाद च्या बाहेर आहोत. तुमच्या जवळची काहीतरी खूण सांगा.'
'नाही हो, आमच्याजवळ काहीच नाही.फक्त आम्हीच आहोत.' (बापरे! आता पुण्यात राहून पाच वर्षं झाली. पण ही अशी उत्तरं ऐकली की हबकायला होतं. एस. एन. डी.टी. नळस्टॉपसारखा भरगच्च परीसर,आणि यांच्या जवळपास खूण म्हणून काहीच नाही?म्हणजे रिकामी पोकळी आहे चक्क? हे म्हणजे फारच झालं हां!)
'अहो पण काहीतरी जवळपास असेलच ना? एखादी तरी खूण सांगा.''अं... हां. अभिनव शाळेच्या जवळ एक पेरुवाला राहतो. या पेरुवाल्याच्या उजव्या हाताला एक गल्ली जाते. या गल्लीच्या टोकाला आमचा दवाखाना आहे.'
पुढची दहा मिनीटे पु लं. च्या 'मद्रासी रामासारखं' 'अभिनवचा ऽऽ पेरुवाला ऽऽ सांगा कुणी पाहिला ऽऽ' झालं. तितक्यात एक बोरंवाली सापडली. हिच्या उजव्या हाताच्या गल्लीत वळावं का यावर आमचे विचारविनीमय सुरु झाले.
'पण ही तर बोरंवाली आहे.'
'मग काय झालं? हिच्या गाडीवर पेरु पण असतील. हिचा नवरा बसत असेल, तो आज आला नसेल.' (सर्वांची तर्कशास्त्रं वेगाने धावत होती.)
'तिलाच विचारु?'
'हाहाहा! काय विचारायचं? की बाई, तू गाडीवर पेरु ठेवतेस का?आणि तुझा नवरा गाडीवर बसतो का?आणि गाडी आज नेहमी उभी करतेस त्याच दिशेला उभी केली आहेस ना?'
तितक्यात खराखुरा पेरुवाला पलिकडे दिसला आणि आमचा शोध संपला. त्याच्या उजव्या हाताला नाही, पण समोर गल्ली होती आणि तिच्या टोकाला दवाखाना पण!
होमियोपाथी हे एक प्रभावी शास्त्र असलं तरी त्याच्याबाबत अनेक गैरसमज आहेत. 'ते होमियोपाथीवाले म्हणजे आपल्या पोटात दुखत असलं तरी 'कातरवेळी उदास वाटतं का?' 'चादर घेऊन झोपता का नुसते?' 'हाताला खाज येते का?' असे असंबद्ध प्रश्न विचारतात.' हा एक नेहमीचा विनोद आहे. त्यामुळे आता काय काय प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील म्हणून मी तयारीतच होते. पण सुदैवाने जास्त प्रश्न विचारले नाहीत. गोळ्या दिल्या आणि 'ते ऍलोपाथीचं औषध बंद करुन टाका.' असा सल्ला दिला. मी तो ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिला. गुरुवारी ऍलोपाथी वैद्याला 'होमियोपाथी चालू केली आहे' सांगितल्यावर तोही तेच म्हणणार होता. 'आता बरी होत आली आहे ना काविळ? मग उगाच कशाला होमियोपथी आणि आयुर्वेद? नीट औषधे घ्या, पथ्यं पाळा. आपोआप बऱ्या व्हाल.'- इति ऍलोपाथी डॉक्टर उवाच.
गोळ्या देताना 'हॉक्टर' ने बरेच सल्ले दिले. 'गोळ्याना हात लावू नका, चावू नका, कागदावर घ्या आणि गिळा, जादा गोळ्या पडल्या तर परत बाटलीत टाकू नका,गोळ्यांच्या आधी आणि नंतर अर्धा तास व्हिक्स, मुखशुद्धी, चहा,पाणी,कॉफी, कांदा,लसूण घेऊ नका इ.इ.' या सर्व सूचमांबरहुकूम गोळ्या घ्यायला लागले तर बऱ्याचदा त्या खालीच पडायच्या.एकदा नाकात गेल्या. तेव्हा मात्र आई म्हणाली, 'चमच्यातून घे ना गोळ्या. अशाने सगळी बाटली जमिनीलाच खाऊ घालशील.' अरे हो की! ये अपने भेजेमेच नही आया!
अखेरीस ५ जानेवारीला आजारी पडून मी ८ फेब्रुवारीला पूर्ण बरी झाले आहे आणि पुनश्च काम, स्वयंपाक, रस्ते, खड्डे, कचेरी आदी दिनक्रम सुरु. 'कशाने बरी झाले?' अं..विचार करावा लागेल. बऱ्याच शक्यता आहेत.
१. घरच्यांचे प्रेम आणि माझी इच्छाशक्ती
२. होमियोपाथी
३. ऍलोपाथी
४. कधीतरी एकदा दोन मिनीटे केलेला कपालभाती प्राणायाम
५. खाल्लेला ऊस आणि काकवी
६. पथ्यपाणी
७. कधीतरी एकदा प्यायलेला गव्हाच्या रोपांचा रस
८. आजाराला माझ्या शरीरात राहून आलेला कंटाळा
९. पुष्कराजाच्या अंगठीमुळे वाढलेले गुरुबळ (??)
असो, शेवट गोड ते सारेच गोड. म्हणून याचे श्रेय सगळ्यालाच देऊया. बरेच पैसे, बऱ्याच सुया, घरच्यांचा बराच वेळ खाऊन संपलेला हा पिवळेपणाकडे प्रवास मला हे शिकवून गेला की 'तुमच्याकडे २ बंगले, ३ गाड्या, चार कंपन्या असतील, पण शरीर एकच आहे, म्हणूनच त्याची यथायोग्य काळजी घ्या.' गंभीर आजारासाठी 'इस्पितळाची पायरी' चढण्याची वेळ कोणावरही येऊ नये हीच सदिच्छा!
"सर्वे ऽ पि सुखिन: संतु । ।
(समाप्त)
-अनुराधा कुलकर्णी
1 comment:
'हाहाहा! काय विचारायचं? की बाई, तू गाडीवर पेरु ठेवतेस का?आणि तुझा नवरा गाडीवर बसतो का?आणि गाडी आज नेहमी उभी करतेस त्याच दिशेला उभी केली आहेस ना?' - :))
I am sorry if all these comments are annoying you, but I just cant stop appreciating your posts....
BTW, who in their right senses would read 'kaajaL maayaa' in hospital? Also which hospital other than 'Deenanath' would keep it in their library?
Due to my JPP background I know a lot of people there and thats why Ive never been there. I mean I have been a witness to it since it was just a 'concept' but still...
Post a Comment